संदेहाच्या परिघाभोवती
एक किंतु अधिवास करून असतोच
कारणासह कारणाशिवाय
सगळेच कंगोरे कळतात असं नाही
ते पिंपळपान जतन करून ठेवता यावं
भेटी लागी जीवा
सुखांचं गोत्र
संथ वाहणं
कृतार्थ
विकल्प
झालं असं की...
असो,
तर त्याचं झालं असं की, व्हॉटसअॅपच्या एका समूहात मला समाविष्ट करून
घेण्यासाठी समूहप्रशासक भावाचा संदेश आला. आता तुम्ही विचाराल की, संदेश
काय एकट्या तुम्हालाच येतात का काय? आले तर यात नवीन ते काय? समजा नवीन
काही असलं, तर ते काही जगावेगळं वगैरे थोडीच असणार आहे. आणि या भावाला काही
नावबिव आहे की नाही? आहे हो...! सांगतो ना सावकाश. एका दमात किती प्रश्न
समोर उभे केले तुमचे तुम्ही? मान्य आहे की माणसांच्या मनातून प्रश्न वजा
केले, तर मागे काय उरेल हाही प्रश्नच आहे. नाव कसंही असो सरळ, वाकडं,
आवडतं, नावडतं ते सगळ्यांनाच असतं. आहे ते नाव त्याच्याकडे असतंच, पण
कोणीतरी कुठल्याशा निमित्ताने आणखी काही नावे त्याला चिटकवून देतो. एकुणात
काय की, नाव नाही असा इहतली कोणी नाही. निदान मलातरी गवसला नाही.
शेक्सपिअर
वगैरे नावाच्या कोण्या मोठ्या माणसाने लिहून की सांगून ठेवलंय, नावात काय
असतं म्हणून. ते त्यानं विलायतेत वगैरे सांगितलं. पण आपल्याकडे कोणालाही
विचारलं तर हमखास सांगेल की, ‘बस नामही काफी है...’ वगैरे वगैरे.
नाममहात्म्याची महती माहीत असणारी आपण माणसे. कोणाकोणाला कोणकोणत्या
नावांनी आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कायम कोंबत आलो आहोत. एखाद्या
नावाविषयी आस्था असणं काही वावगं नाही. अनुरक्त असण्यात अतिशयोक्ती नाही
अथवा कोणी अंतर राखून असेल, तर तसं असणंही स्वाभाविकच. एखाद्या गोष्टीबाबत
काही इकडे, थोडे तिकडे करणारे कंगोरे असतातच. अशावेळी प्रश्न पडतो, नेमका
कोणता कोपरा आपला म्हणावा. बुद्धिमंत माणसे सतत शब्दांशी खेळत आली आहेत.
सामान्यांच्या वकूबाची काही काळजीच नसते हो महानतेची महती माहीत असणाऱ्या
या माणसांना. त्यांचा प्रवासच महत्तेच्या वाटा धरून चालणारा. तर ते असो. हे
काही फार फार महत्त्वाचं नाही येथे.
तर, तो भाऊ म्हणाला. सर,
“तुमची हरकत नसेल तर आमच्या अमक्या अमक्या समूहात तुम्हाला जोडून घेतो...”
समूहाचं नाव येथे उधृत करायलाच हवं, असं काही नाही. नामाची महती मलाही
मान्य असली तरी. हे महात्म्य वगैरे खरं असलं, तरी माणसाच्या मनाला
वास्तवापासून विलग नाही करता येत, हेही खोटं नाहीये. वास्तव हे आहे की,
आपल्या आकलनाचे सगळे संदर्भ कुठल्यातरी नावाभोवती प्रदक्षिणा करत असतात.
नाव वाजत राहण्यासाठी अन् गाजत ठेवण्यासाठी काय आणि किती कष्ट करायला
लागतात. नाव नावाजलेलं असेल तर प्रश्नच नाही, पण कुठल्याशा कारणाने वाजलेलं
असलं तर संधी साधून गाजवावं लागतं, नाही का?
हा जो नामजप मी करतो
आहे, त्याचा संदर्भ व्यक्तीपूजेशी आहे. अन्य कोणत्या बाबींशी नाही, हे आधीच
नमूद करून घेतो. नाही तर माझ्या नावालाच महात्म्याची लेबले लावून मंडित
केलं जाईल. झालं परत विषयांतर... असं असतं वाहवत जाणं. काही सवयी सहज सुटत
नाहीत हेच खरं. आता कुणी याला जित्याची खोड... वगैरे म्हणलं तर राग यावा
असं काही नाही. तर, तो भावड्या म्हणाला, “समूहावर सगळेच बऱ्यापैकी
साहित्यिक अन् विचक्षण वाचक वगैरे असल्याने इतर समूहांमध्ये असणारा वैताग
येथे असण्याची शक्यता नाही.”
आता याला तुम्ही संवाद म्हणा की आणखी
काही. काहीही असलं, तरी ते काही फार आवश्यक नाही. सांगणं महत्त्वाचं.
समूहात असण्याचे अगणित अनुभव अनेकांना आहेत, म्हणून त्यावर तुमचा वेळ खर्ची
नाही घालत. मूळ मुद्द्यावर येतो. त्याचं म्हणणं वाचून येथे वैताग नाही, या
एका वाक्यावर रेंगाळलो. वैताग नाही, चांगली गोष्ट आहे. पण आपल्यालाच या
सगळ्या गोष्टींचा वैताग असेल तर...? आता तुम्हाला वाटेल की, हा काय स्वतःला
मोठा साहित्यिक, विचारवंत वगैरे कोणी समजतो का? की आपलं नसलेलं महत्त्व
अधोरेखित करण्यासाठी उगीच आढेवेढे घ्यायचे? नाही हो, मी असा काहीही नाही.
अंशमात्रही नाही. खरंतर काहीच नाही, हे म्हणणं अधिक सयुक्तिक. पण असं कुठे
आहे की, सामान्यांनी आपले विचार व्यक्त करू नयेत. एखादी गोष्ट नसेल आवडत तर
भूमिका घेऊ नये का?
असो, विषय भलतीकडे वळतो आहे. तर वाचून वगैरे
लिहलं, “भावा, मला तुमच्या समूहात घेऊन फारसा काही उपयोग नाही. म्हणजे असंय
की, माझा आजपर्यंत कुठल्याही समूहातील वास्तव्याचा लौकिक आहे की, सबंधित
समूहातील सगळ्यात अधिक निष्क्रिय सदस्य कोण? असं कुणी विचारलं तर डोळे
झाकून माझं नाव घेता येतं. बऱ्याचदा, म्हणजे जवळपास नेहमीच म्हणाना,
याबाबतीत माझा प्रथम क्रमांक ठरलेला. आयुष्यात काही कुठली बक्षिसे नाही
मिळवता आली कधी. पण कोणी भविष्यात समूहावरील निष्क्रिय सदस्याला बक्षीस
दिलं, तर ही संधी मात्र कधीच हातची जाऊ देणार नाही मी. समूहावर ना मी कुठली
प्रतिक्रिया देत, ना कुठल्या पोस्ट पाठवत. म्हणजे एका अर्थाने असून
अडचण... वगैरे वगैरे.”
“असूद्या हो सर, त्यानी फारसा काही फरक पडत
नाही अन् असंही तुम्ही करीत असलेलं लेखन चांगलंच (?) असतं. निदान
यानिमित्ताने का असेना कधीतरी, काहीतरी समूहावर येईल. किमान एखाद दोनांकडून
वाचलं जाईल.”
मूठभर काय पण टोपलीभर मांस आधीच कृश असलेल्या माझ्या
देहावर चढलं. साला, एवढे दिवस आपण कोण, हेच आपल्याला कळत नव्हतं की काय,
असं उगीच वाटून गेलं! आता आपण एवढे उंच झालोच आहोत तर घ्या मिरवून, हा
मनाला सुखावणारा विचार अधिक प्रबळ होत गेला. खरे असोत की खोटे, असे
साक्षात्कार अधूनमधून झाले की, आयुष्य गोड, मधुर काय म्हणतात, ते वाटायला
लागतं, नाही का? तर ते असो. नाईलाजाला कोणत्याच शास्त्रात अन् शस्त्रात
क्षतिग्रस्त करण्याचा काडीमात्र इलाज नसतो. म्हणूनच त्याला नाईलाज म्हणत
असावेत. शेवटी काय... तर आणखी एका समूहावरचा निष्क्रिय सदस्य म्हणून यादीत
सन्मानाने स्थानापन्न झालो.
आता तुम्ही म्हणाल, निष्क्रिय राहायचं
तर मग जागा कशाला अडवून बसायची. स्पष्टपणे नाही म्हणजे नाही सांगायचं ना!
बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझी अजिबातच हरकत नाही. पण काय असतं की, स्नेह
नावाचा एक मधाळ प्रकार असा काही असतोना की, तेथे अन्य उपाय चालत नाहीत. आणि
गुंता तेथेच असतो. या स्नेह नावाच्या प्रकाराचं क्षेत्रफळ अजिबातच काढता
नाही येत. त्याच्या लांबीरुंदीखोलीची मापे मोजणं अवघड. एकूण प्रकरण असं
असल्याने ज्याकाही मर्यादा असतात, यांनाच कोणी भीड, मुर्वत वगैरे म्हणतात.
त्याला वळसा टाकून पुढे नाही पळता येत माझ्यासारख्या सामान्य माणसाला.
असामान्यपणाची लेबले कोणालाही लावता येतात, पण खरं कारण मोह टाळता नाही येत
हेच खरं. समजा पलायनाचा पर्याय स्वीकारला, तरी तुमच्याविषयी एक प्रतिमा
तयार झालेली असते, त्याचं काय? ती धूसर होणे अथवा काळवंडणे कोणाला रास्त
वाटेल? असं आडमुठेपणाने वागणंही सयुक्तिक नसते, नाही का? झालं परत
विषयांतर. मोहात्मा बनणं काही केल्या टाळता नाही येत हेच खरे.
तर,
मी लिहतो... म्हणजे असंय की, काहीतरी निमित्ताला कारण देऊन माझ्याकडून
खरवडलेल्या अक्षरांना अधोरेखित करून आंतरिक आस्थेतून स्नेही मंडळी मला
लिहितो वगैरे नावाचं लेबल चिटकवतात. आपल्याकडे नसलेल्या अशा बिलोरी
आरशांच्या नक्षीने सजवलेल्या झुली कोणी अंगावर टाकून जात असेल, तर त्या
अधिक देखण्या वाटायला लागतात. त्याचं अप्रूप वाटतंच कितीही नाही म्हटलं
तरी. मी काय किंवा आणखी कोणी काय, शेवटी माणूस या शब्दापर्यंतच आपला परीघ
असतो, नाही का?
लेखक म्हणवून घेणं कितीही आनंददायी असलं, तरी
लिहित्या हातानी लेखांकित केलेल्या अक्षरांनी आयुष्यातील असे कोणते प्रश्न
निकाली निघाले? केवळ अक्षरांचा संभार सांभाळून जगण्यातून विवंचनानी काढता
पाय घेतला, प्रश्नांनी अखेरचा आचका घेतला. काळवंडलेलं आभाळ नितळ वगैरे
झालं, असं कधी प्रकर्षाने प्रत्ययास वगैरे आलं आहे का? अशा सरळसोट गोष्टी
घडणं जरा अवघड आहे. निदान आपल्याकडे तरी तसे दिसत नाही. अन्यत्र असेलही असं
काही, माहीत नाही. खरंतर एवढा इतमाम आपल्याला पेलवत नाही. कोणी म्हणत असेल
की, अवधी लागत असला तरी साहित्याच्या परिशीलनाने परिस्थितीत परिवर्तन
वगैरे नक्कीच होत असतं. त्याकरिता लिहावं. असेलही कदाचित तसं. चांगली गोष्ट
आहे. स्वप्ने सगळीच वाईट नसतात, हेही खरेच.
आता वादाला अनायासे
मुद्दा मिळाला असेल कोणाला तर आधीच सांगतो, काही विधाने, घटना, प्रसंग,
पात्रे वगैरे वगैरे केवळ काल्पनिक असतात. त्यांचा जीवित अथवा मृत व्यक्ती,
वस्तू, प्रसंग, स्थळ, घटना इत्यादी इत्यादीशी दुरान्वयानेही संबंध नसतो.
असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हुश्श! आता कसं मोकळं वाटतंय! काय असतं
की, हल्ली माणसांची मने फार म्हणजे फारच प्रचंड कोमल, संवेदनशील वगैरे झाली
असल्याने कशावरून अन् कोणत्या कारणांनी दुखावतील हे सांगण अवघड. बरं
ज्याचं हे संवेदनशील मन वगैरे दुखावलं गेलं, त्या दुखावणाऱ्या जिवाला तरी
माहीत असतं की, नाही कोण जाणे, आपण का दुखावले गेलो आहोत? उगीच आपल्यावर
आघात नको व्हायला. नाहीतर आपली आपण आतापर्यंत आस्थापूर्वक सांभाळलेली आकृती
बिघडायची.
जे काही असेल ते असो, साहित्याचा विद्यार्थी असल्याने
मनातले विचार बऱ्यापैकी शब्दांकित करता येतात इतकेच. एम. ए. तीसएक
वर्षांपूर्वीच झालं. पण अजूनही विद्यार्थीच समजतो मी स्वतःला. (विनयशीलता!)
समोरचा माणूस एवढा विनयाने वाकला की कसं मूल्यांनी संपन्न, संस्कारांनी
समृद्ध असल्याचं वाटतं नाही! आपली संकृती, परंपरा अशाच वागण्यातून सुंदर
दिसते नाही का? स्वतःला विद्यार्थी म्हणवून घेताना एक चांगलं असतं की,
झालाच काही गाढवपणा आपल्याकडून तर सुटायला मोकळं. हा यातला अध्याहृत फायदा.
खरंतर साहित्य विषयातून अभ्यास करणाऱ्या कुणाही विद्यार्थ्याला किमान
स्तरावर अभिव्यक्त होता यायलाच हवं, नाही का? हे जरा अवघड होतंय नाही?
साहित्यातून
पदवी, पदव्युत्तर पदवी संपादित करणारे धड चार चांगली वाक्ये लिहू, बोलू
शकत नसतील, तर याला प्रगतीच्या कोणत्या कप्प्यात कोंडावं? आला वादाचा
मुद्दा! असो, कुणाला तसं वाटत वगैरे असेल तर वरच्या परिच्छेदात उल्लेख केला
आहेच. निव्वळ योगायोग समजावा. परत हुश्श!! अर्थात उत्तम गुण खात्यात जमा
होण्यामागे कोणत्यातरी आयत्या नोट्सच्या रतीबाची किमया अथवा उत्तम
स्मरणशक्तीची पुण्याई असू शकते. याला काही कोणी आव्हान नाही देऊ शकत, नाही
का?
अरे हे काय चाललंय? विषयांतर नको. मूळ मुद्दा सोडून भलतीकडेच
चाकं वळतायेत. हो, आलोच! हे असं होतं बघा. माणसाचा स्वभावाच असा की,
तुम्हाला चांगलं लिहिता, बोलता येतं असं कुणी सांगितलं की, आपल्या असलेल्या
नसलेल्या; बहुदा नसलेल्याच उंचीचे आकस्मिक साक्षात्कार व्हायला लागतात.
आत्मप्रतिमा, आत्मप्रत्यय वगैरे मानसशास्त्रातील संकल्पना आपल्याकरिताच
तयार झाल्याचं वाटायला लागतं. असतो हो स्वभाव माणसाचा थोडा असा आणि थोडा
तसा. सुखावतो तो असं काही सकारात्मक ऐकायला आलं की. सगळ्यात लिप्त असतो तो.
अलिप्त राहायला तो काय अलौकिक असं काही सोबत घेऊन जन्माला आलेला नसतो अथवा
कोण्या महात्म्याने निर्देशित केलेल्या वाटेने प्रवास करायला संतमहंतही
नसतो.
असो. शेपूट वाढतच चाललं आहे आणि विषय बाजूला पडतोय. तर मी
लिहितो म्हणजे काय करतो. हे मी कसं सांगावं? मनात उदित होणाऱ्या विचारांना
अक्षरांच्या कुशीत देऊन भावनांना आकार देण्याचा प्रयत्न करतो. तर, माझ्या
अशा व्यक्त होण्याला कुणी वेगळी शैली, कुणी आगळी अभिव्यक्ती वगैरे गोंडस
नावांनी संबोधतात इतकंच. (निर्व्याज स्नेह, दुसरं काय...) खरंतर शैली
अभिव्यक्ती वगैरे खूप भारदस्त शब्द झाले.
असो. प्रत्येकाच्या
व्यक्त व्हायच्या काही धारा असतात, तशा काही धारणा. काही वाटा असतात, काही
दिशा. अक्षरांची संगत करीत निघालेल्या वाटेवर काही अवचित भेटतं. शब्दांशी
सख्य साधताना संवाद घडतो अन् त्याला अक्षर परिमाण लाभतं. याचा परिणाम अशा
मोठेपणाच्या झुली आस्थेतून चढवल्या जातात. इच्छा असो, नसो मिरवाव्या
लागतात. त्या दिसतात छान. वाटतात त्याहून छान. पण याचा अर्थ सगळं सुंदरच
असतं असं नाही. काही सोयीचे कंगोरेही असतात त्याला.
कोणी सांगतो
की, तुमचं हे-ते लिहिलेलं मस्त आहे. कोणी कळवतो की, तुमच्या अमक्या-तमक्या
अनुभवांना घेऊन केलेलं लेखन मनात प्रसन्नतेचा परिमल पेरून जातं. खरंतर कोणी
काही लिहितो तेव्हा यात वेगळं असं काहीच नसतं. आपल्या असण्या-नसण्यावर
परिसराचे, परिवाराचे, वातावरणाचे संस्कार वगैरे होणं साहजिक असतं.
कुणाच्याही बाबतीत सहज घडणारी ही क्रिया आहे. त्यात नवं काहीच नाही. असलंच
काही, तर त्याठायी असणारी संवेदनशीलता. फक्त तिला तेवढ्याच तरल मनाने
प्रतिसाद देता यायला हवा. कदाचित मला तो बऱ्यापैकी देणं जमलं इतकंच. हे
भागधेय म्हणू माझं हवंतर. हे पाथेय दिमतीला घेऊन व्यक्त होतोय, यात वेगळं
ते काय?
अस्तित्वाच्या मुळांपासून सहजी विलग होणं अवघड. साहित्य,
कला, संगीत वगैरे गोष्टींशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या घरात जन्मलो. पण
आस्थेच्या कोंदणात सजलेल्या संदर्भांना समजून घेणाऱ्या परिसरात वाढलो, घडलो
असल्याने, हे संचित सोबत घेऊन आयुष्याचे अर्थ परिमित का असेनात समजून
घेतोय. आणि हो, हे समजून घेताना एक समजलं की, आयुष्य खूप लहान आहे अन्
आसपास अमर्याद... आता उरलेल्या उन्हाळ्यापावसाळ्याची बेरीज करत जगण्यातून
वजा होत जाणाऱ्या चिन्हांचे अर्थ लावतो आहे. बघू, नियती म्हणा अथवा निसर्ग
किती सोबत करतोय. आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यासाठी अन् आनंदासाठी
आवश्यक असणाऱ्या काही विधायक उचापती करतोय, तो जगण्याचा एक भाग मानतो.
नाकासमोर चालणे वगैरे म्हणतात ना तसाच आहे. कुणाच्या अध्यात, ना मध्यात.
फार बोलघेवडा नाही, पण माणूसघाणाही नाही. ज्याला भिडस्त वगैरे स्वभाव
म्हणतात ना, तसाच काहीसा! अंतरावर उभं राहून कुणासाठी ओंजळभर काही करता
येणं संभव असेल तर करणारा.
आता या लिहण्याला कुणी परिचय समजा,
मिरवणूक म्हणा, मखरात मंडित होणं समजा की आणखी काही, त्यानी असा कितीसा फरक
पडणार आहे? फार काही जगावेगळं कर्तृत्व नसलेला, पण आपली वाट शोधण्यासाठी
ओंजळभर आस्था घेऊन चालणारा नक्कीच आहे. कुणीतरी आखून दिलेल्या चौकटीत
चारचौघांसारखा विहार करीत असलो, तरी कुंपणे पार करण्याची उमेद घेऊन आनंदाची
अभिधाने शोधण्याची आस अंतरी कायम असणारा अवश्य आहे.
हे लिहिण्याची
काही आवश्यकता होती का? बरं लिहलं, तर एवढा फाफट पसारा कशासाठी? अन् संबंध
जोडायचाच, तर तो बादरायण कशाकरिता? असं कुणाला वाटत वगैरे असेल तर तुमचा
तो हक्क अबाधित आहेच. आयुष्याला अर्थ देणाऱ्या, न देणाऱ्या सगळ्याच गोष्टी
ठरवून कराव्यात असं कुठे आहे? काही सहज करून बघाव्यात अशाही असतातच. जावं
कधीतरी त्याही वाटेने पावले वळती करून. व्यक्त आणि अव्यक्त यातलं अंतर
कळण्याइतके कृतीचे कंगोरे आयुष्यात कोरता यावेत. ते कोरता आले की आयुष्याला
आकार देता येतो. भले सगळ्याच आकारांची सुंदर शिल्पे नसतील होत. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
**