संकुचित विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्यांना व्यापक असण्याचे अर्थ अवगत असतात? सांगणे अवघड आहे. शक्यतांचे दोनही किनारे धरून ते वाहत असतात, पण प्रवाहच आटले असतील तर वाहण्याचे अर्थ बदलतात. एक ओसाडपण आसपास पसरत जातं. चिमूटभर ज्ञानाला अफाट, अथांग, अमर्याद वगैरे समजून त्यावर आनंदाची अभिधाने चिटकवणाऱ्यांना प्रगल्भ असण्याच्या परिभाषा कशा उमगतील? विवेकाच्या वाती विचारांत तेवत असतील, तर पावलापुरता प्रकाश सापडतो. अंतरी नांदत्या भावनांचा कल्लोळ असतो तो. शहाणपण शब्दच मुळात शेवाळल्या वाटेवरून चालणारा. पुढच्या पावलावर सरकण्यापेक्षा निसटण्याच्या शक्यताच अधिक.
इहतली अधिवास करणाऱ्या जिवांकडे जुजबी असली, तरी काहीतरी माहिती असतेच. ती अनुभवातून अंगीकारली असेल, निसर्गदत्त प्रेरणांच्या पसाऱ्यात सामावली असेल अथवा गुणसूत्रांच्या साखळ्या धरून वाहत आली असेल. याचा अर्थ एखाद्याकडे असलेली माहिती म्हणजे ज्ञान असते का? माहितीचे उपयोजन सम्यक कृतीत करता येण्याला ज्ञान म्हणता येईल आणि ज्ञानाचा समयोचित उपयोग करता येण्याला शहाणपण. पण वास्तव हेही आहे की, सम्यक शहाणपण प्रत्येकाकडे पर्याप्त मात्रेत असेलच असे नाही. याची खात्री बुद्धिमंतांनाही देता येणार नाही.
जगण्याच्या वाटेवरून घडणाऱ्या प्रवासाची पावले पुढे पडताना काहीतरी पदरी पडतेच, हेही खरेच. पण पदरच फाटका असेल तर... त्याला इलाज नसतो. शहाणपण काही कोणाची मिरासदारी नसतं. खाजगी जागीर नसते. कुळ, मूळ बघून ते दारी दस्तक देत नसतं. त्यासाठी माणूस असणे आणि किमान स्तरावर का असेना विचारी असणे पर्याप्त असते. विचारांच्या वाटेने वळते होण्यासाठी अनुभूतीचे किनारे धरून वाहते राहावे लागते. केवळ कोरडी सहानुभूती असणे पुरेसे नसते. नियतीने माथ्यावर धरलेल्या सावलीपासून थोडं इकडेतिकडे सरकून ऊन झेलता आलं की, झळांचे अर्थ आकळतात. वातानुकूलित वातावरणात वास्तव्य करणाऱ्यांना चौकटींपलीकडील विश्वात नांदणारी दाहकता कळण्यासाठी धग समजून घ्यावी लागते. ती समजून घेण्यासाठी स्वतःभोवती घालून घेतलेली मर्यादांची कुंपणे पार करायला लागतात. सुखांच्या वर्षावात चिंब भिजणाऱ्यांना वणव्याचा व्याख्या आकळतीलच असं नाही.
हे वाचतांना तुमच्या मनात एव्हाना एक विचार नक्की आला असेल की, काय म्हणायचं आहे नेमकं या माणसाला? कशाचा संबंध कशाशी नाही. उगीचच वडाचं पान पिंपळाला जोडणं आहे हे! असेलही, हवंतर तसे म्हणूयात. बादरायण संबंध समजा याला, हवं तर. पण विचारांचे तीर धरून वाहत येणारे वास्तव प्रवाहपासून विचलित कसे होईल? नियत मार्ग बदलेल कसे? विचार केवळ कल्पनेचे किनारे धरून वाहत नसतात, तर वास्तवाच्या प्रतलावरून पुढेही सरकत असतात. नसतील तर तो सत्याचा अपलाप असतो. बघा, आला ना पुन्हा 'विचार' शब्द लिहिण्यात! मलाही नेमकं असंच काहीसं सांगायचंय. एक लहानसा 'विचार' सोबत घेऊन मीही 'विचारच' करतो आहे की! हां, कुणी याला अविचार वगैरे प्रकारातलं लिहिणं म्हटलं, तर अजिबात वाईट वगैरे वाटणार नाही. कारण वाचणाऱ्यांनाही 'विचार'स्वातंत्र्य आहेच हो! लागलं ना स्पष्टीकरणाचं शेपूट परत वाढायला? गुंडाळतो. करतो घडी त्याची. आवरतो पसारा. आता विषय अधिक ताणत नाही. नाहीतर तुटायचा आणि हाती उरायचे अर्थहीन तुकडे. उगीच नमनाला घडाभर तेल नाही वाया घालवत.
तर, विषय असा की, समाजमाध्यमांच्या स्वैर, सैल अन् अप्रस्तुत वापराबाबत आपण बरंच ऐकतो, बोलतो अन् अनुभवतोही. फक्त एवढंच करतो (?) तसंही सामान्य माणसाकडे करण्यासारखे वेगळं काय असू शकतं? आखून दिलेल्या चौकटीतील चाकोऱ्या चालत राहतो तो अवघी हयात. अर्थात, सामान्य वकुब असणारा कोणीही परिस्थितीत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्याची शक्यता असली, तरी तशी नगण्यच. त्याला वैयक्तिक चेहरा तसाही नसतोच. असतो तो समूहाचा. समूहात स्व ओळखणे तसेही अवघड. कारण मिरवणारे मुखवटेच अधिक. मुखवटे देखणे असू शकतात, पण प्रामाणिकपणाच्या परीक्षानळीत नाही पारखता येत त्यांना. मुखवट्यांना लिटमस टेस्ट लागू नाही पडत. त्यांची रासायनिक सूत्रे वेगळी असतात. असाच काहीसा अनुभव कथन करीत माझा एक स्नेही जरा उद्वेगानेच म्हणाला, "कारे, माणसांचा मेंदू कधीकधी डोक्याकडून सरकत सरकत गुढग्यात येऊन राहतो का?"
त्याच्या बोलण्यातला उपहास कळला. पण त्याचा खटका नेमका कुठे पडला होता, त्यालाच माहीत. चेहऱ्यावर शक्य तेवढा निरागसपणा आणत त्याला म्हणालो, "का? काय झालं असं? का जगाची व्यर्थ चिंता करतो आहेस? महात्म्याचा अवकाळी साक्षात्कार वगैरे झाला की काय तुला? असं असेल तर एकदा प्रकृती तपासून घे चांगल्या डॉक्टरकडून."
त्याला कुणाला तरी मनातली खदखद सांगायची होतीच. योगायोगाने मी आयता गवसलो. म्हणाला, "आमच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर अभिनंदनाचे संदेश एकामागे एक येऊन धडकत होते. पावसाची झड लागून तास-दोन तास झोडपून काढावं अगदी तसं. असा कोणता आनंद झाला असेल या लोकांना, म्हणून हे सगळे चेकाटले असतील? सहज कुतूहल चाळवंलं गेलं, म्हणून संदेशाच्या उगमापर्यंत पोहचलो. संदेश होता, 'आपले अमक्या अमक्या महिन्यातले पगार बँक खात्यात जमा झाले.' पगार बिल तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक वगैरे वगैरे आणि अधिकाऱ्याने त्यावर सही करून प्रकरण मार्गी लावले; म्हणून दे अभिनंदन, पाठव फुलांचे गुच्छ, दाखव अंगठे, ढकल सुहास्यमुद्रेच्या इमोजी. आणखी काय काय. ग्रुपवर आलेले खंडीभर संदेश पाहून डोक्यात तिडीक उठली. केवढा बालिशपणा हा? माध्यम हाती आहे, म्हणून त्याचा उपयोग काहीही करायचा का? याला विचार म्हणावं का? सगळेच सुशिक्षित (?) असल्याने अविचार म्हणणं विचारांती नको वाटत होते. मग असं नसेल, तर काही विशेष प्रयोजन असेल का? की कुणीतरी आर्थिक विवंचनेतून मुक्तीचा विकल्प मिळाला म्हणून आनंदित झाला असेल? मान्य करूयात, असेल एखाददुसऱ्याची तशी समस्या. पण येथे तर आपल्या निष्ठा प्रदर्शित करण्याची चढाओढ लागलेली. मग याला प्रामाणिकपणा म्हणून अधोरेखित करावा की, लाचारी म्हणावं? की अंधानुकरण? कुणीतरी एकाने आपल्याकडे निसर्गाने दिलेल्या प्रज्ञेला अविचारांच्या दावणीला बांधले, म्हणून इतरांनीही मेंदू फ्रीजमध्ये ठेऊन कळपामागे धावत सुटावं का? तारतम्य नावाचा काही प्रकारही असतो, याचं ज्ञान कुणालाच तसूभरही नसेल का?"
"अरे ठीक आहे ना. यात एवढं संताप करण्याचं कारण काय? या गोष्टी समाजमाध्यमांना काही नवीन नाहीत. सरळ दुर्लक्ष करायचं ना! तुम्ही दखल घ्यायलाच हवी, अशी काही सक्ती असते का?" - मी
माझ्या स्वयंघोषित तत्त्वज्ञानपर विधानाला विरोध नव्हताच त्याचा, पण समूहावरील महानुभावांच्या उक्ती अन् कृतीतील अंतराय स्पष्ट जाणवत होतं. बहुदा माझ्या मताचे समर्थन करणे मान्य नसावे त्याला. म्हणाला, "मान्य की सक्ती वगैरे काही नसतं; पण माणसांच्या जगण्यात तारतम्य नावाचा थोडाफार भाग असतो ना! विचार प्रत्येकाकडे असतात, त्यांना विचारपूर्वक वापरायला नको का?"
"विचार करायला हवाच, याबाबत संदेह असण्याचं कारणच नाही. पण सगळ्यांनाच सगळं अवगत नसतं. द्यायचं सोडून त्यांचं त्यांच्यावर. अशा वागण्यात असेल मिळत आनंद त्यांना तर घेऊ दे ना!"- मी
माझं बोलणं ऐकून क्षणभर विचार करत राहिला. मग काहीतरी आठवल्यासारखं करीत म्हणाला, "प्रश्न अभिनंदन करायचं की, नाही हा नाहीच. तो वैयक्तिक विचारांचा भाग झाला. पण मळे बहरत असताना तण दणकून वाढत असल्याने पीकच उद्ध्वस्त होण्याची वेळ आली असेल तर...? तण हिरवेगार दिसते, म्हणून कोणी पिकात ते राहू देतं का? खरंतर या लोकांना नियंत्रित करणाऱ्यांच्या नाकर्तेपणाने म्हणा किंवा यांच्या वैयक्तिक अभिनिवेशामुळे किंवा यांनीच निर्माण केलेल्या समस्यांमुळे म्हणा, वेतनाला विलंब झाला. चारदोन माणसांमुळे साठसत्तर माणसे वेठीस धरली जात असतील, तर त्याचं स्पष्टीकरण घेण्याऐवजी सगळेच हाती तबक घेऊन आरतीला निघाले. जणूकाही प्रेषित बनून, हे अवतीर्ण झाले आहेत आणि या सगळ्या गोष्टी या सत्शील माणसांच्या प्रेरक प्रज्ञेमुळे अन् अथक प्रयासानेच मार्गी लागल्यात. काय म्हणावं या बुद्धिमांद्याला? शब्दच नाहीत माझ्याकडे. अरे, ही कामे करण्यासाठीच तर नियुक्त्या झाल्या आहेत ना त्यांच्या? ते काही कोणी संत, महंत नाहीत; तुमचं कल्याण करायला आलेले. जसं वेतन तुम्हांला मिळतं, तसंच त्यानाही. ते तुम्हांला महत्त्वाचं, तसंच त्यांनाही. मग तुम्हालाच हा पुळका का? तुम्ही वर्गात एखादा पाठ शिकवला, म्हणून तुमचं कुणी अभिनंदन करतं का? उत्तरपत्रिका तपासल्या, म्हणून कुणी पुष्पगुच्छ तुमच्या हाती नाही कोंबत. परीक्षेचा निकाल वेळेवर लावला, म्हणून पुष्पहार गळ्यात घालून तुमची वाजत गाजत मिरवणूक काढतं का कुणी? नाही ना! मग ही माणसे निर्धारित चौकटींतलं काम करत असतील, तर तुम्ही हारतुरे घेऊन का धावतायेत?"
कदाचित काही घडलं असेल किंवा काही बिघडलंही असेल. घडण्या-बिघडण्यामागची प्रयोजने प्रासंगिक असतील किंवा आणखी काही. शक्यता आहे, एक बाजू पाहिली असेल किंवा न दिसलेली दुसरी बाजू दुर्लक्षित राहिली असेल. जे काही असेल, ते असो; मतितार्थ महत्त्वाचा. सर्जनशील कृतींना विरोध नाही; पण त्यांचे प्रयोजन नेमके काय, हे माहीत असायला नको का? भूस्तरीय समस्यांचा विचार आभाळात विहार करून येत नसतो. प्राप्त परिस्थिती, समयांकित समस्या, व्यामिश्र व्यवधाने असू शकतात, नाही असे नाही. किंतु-परंतु असतात. ती परिस्थितीजन्य असतील किंवा प्रासंगिक, समजू शकतो. पण कुणाच्या तरी अभिनिवेशी वर्तनातून ती पेरली जात असतील, तर त्यांचे समर्थन करायचे कसे? प्रयोजने, नियोजने सकारात्मक विकल्पांचा विचार करत असतील, तर विरोधाचे नगारे बडवायची आवश्यकता नाही. पण कुणी नाकर्तेपणाच्या पिपाण्या फुंकत असतील अन् तुम्ही त्याला सुरावटींचा साज म्हणत असाल, तर एकदा आपले सूर तपासून घेणेच योग्य.
प्रश्न हा नाही की, हे असावं की नसावं. प्रश्न आहे आपला परीघ तपासून पाहण्याचा. पण रोज मिळणाऱ्या एक-दीड जीबी इंटरनेट डाटाने माणसांना कॉपीपेस्टफॉरवर्डमध्ये एवढं गुंतवून ठेवलं आहे. विधायक विरोध तर सोडाच, पण सकारात्मक विचार करायलाही पुरेसा वेळ नाही. विचारांनी वर्तायला वेळ नाही, वार्ता मात्र विश्व परिवर्तनाच्या. फक्त ढकल टपालावर विद्वत्तेचं प्रदर्शन करणाऱ्या अन् कुणीतरी कोरलेले विचार इतरांच्या माथी चिटकवण्यात धन्यता मानणारे कसलं परिवर्तन घडवतील? कृतीची प्रयोजने विचारांवर कोरता येत नाहीत, ते बदलाच्या परिभाषा कशा लेखांकित करतील?
परिस्थिती परिवर्तनासाठी आधी आपल्या वर्तनाचा विचार करावा लागतो, नाही का? उपदेश करणे, तत्वज्ञान सांगणे सोपे असते, आचरणात आणणे अवघड. मूळ प्रश्नांवरून लक्ष विचलित झालं की, स्व-महात्म्याच्या साक्षात्कार होतो. अशा बेगडी महात्म्याला बरे दिवस आले आहेत. बरकतीचे वरदान लाभले आहे. दिवस मिरवण्याचे आहेत. चमकोगिरी करण्याचे आहेत. दोन प्रकारची मानसिकता समाजात नांदत असते. एक, बोलते सुधारक आणि दोन, कर्ते सुधारक. दुसरा प्रकार दुर्मीळ प्रजातीसारखा होत आहे हल्ली, ज्याला संरक्षित प्रजाती म्हणून सुरक्षित राखायला लागेल बहुदा. सुधारणा काय फक्त परिपत्रकांच्या पसाऱ्यात होत असतात? परिस्थितीचं परिशीलन करता आलं की, उसने अवसान आणण्याची आवश्यकता नाही राहत. उपक्रमशीलता विचारांत असली की, कृतीत कोरता येते, पण... हा 'पणच' अनेक प्रश्नांना चिन्हांकित करतो, हेही खरेच.
••