Bhumika | भूमिका

By // 4 comments:
श्वास सोबत घेऊन आलेला प्रत्येक जीव आपल्या उपजीविकेच्या वाटा शोधत इहतली नांदतो. श्वासांची सोबत असेपर्यंत त्याचा प्रवास सुरु असतो. जीवन सगळ्यांच्या वाट्याला येतं, पण जगणं किती जणांचं घडतं? सांगणे अवघड आहे. पण जगण्याच्या सूत्रांना सोबत घेत सगळेच काहीना काही शोधत असतात. हा शोध सुखांच्या क्षितिजांचा असतो. आयुष्याचे पोत तलम असावेत. नाती आस्थेच्या धाग्यांनी गुंफलेली असावीत. आपलेपण त्यातून झुळझुळ वाहत राहावं. प्रसन्नतेचा परिमल घेऊन परिसर दरवळत राहावा. सुखांचं इंद्रधनुष्य आयुष्याच्या क्षितिजावर कमान धरून उभं राहावं. जीवनाचे मळे बहरलेले राहावेत. अशा आयुष्याची चित्रे माणूस मनात रंगवत असतो. जगणं आनंदपर्यवसायी असावं, म्हणून अनेक खटपटी करून सुखतीर्थे गाठण्याचा प्रयत्न करीत असतो. सुख अंगणी नांदते असणाऱ्या आयुष्याची सगळ्यांनाच आस लागलेली असते. असे असण्यात अप्रस्तुत काही नाही. सुंदर आयुष्याची संकल्पित चित्रे मनाच्या कॅन्व्हासवर माणसे सतत साकारत असतात. पण आयुष्य काही आखून दिलेल्या चाकोऱ्यांच्या रेषा धरून पुढे सरकत नसते. दिसल्या उताराने पाण्यासारखे वाहत नसते. त्याच्या मार्गात अनेक व्यवधाने असतात. ते असतात म्हणून पर्याय शोधावे लागतात. याचा अर्थ शोधलेले प्रत्येक पर्याय अचूक असतातच असे नाही. त्याची व्यवहार्यता, उपयुक्तता, प्रासंगिकता तपासून बघायला लागते. कोणत्यातरी विचाराने आणि भूमिकेने वर्तावे लागते. म्हणूनच शोधलेल्या पर्यायांना आणि धारण केलेल्या भूमिकांना वैचारिक अधिष्ठान असावे लागते.

आयुष्यात प्रत्येकाला स्वतःची एक चौकट हवी असते आणि ती सुरक्षित असावी असेही वाटत असते. सुरक्षेच्या अशा चौकटी उभ्या करून माणूस प्रवाहासोबत वाहत असतो. फार थोडे असतात, ज्यांना प्रवाहाच्या विरोधात पुढे जाण्याची स्वप्ने येतात. जगणं काही आखीव रेखीव साच्यांच्या चौकटीत सामावलेला आनंदाचा उत्सव नसतो. सरळ रेषेत पुढे सरकत नसतं ते कधी. त्याच्या प्रवासाच्या वाटा अडनिड वळणं घेत पळत राहतात. इच्छा असो नसो तुम्हांला चालावे लागतेच. पायाखालच्या वाटेची सोबत असतेच. फक्त त्या निवडता यायला हव्यात. निवडलेल्या वाटांची सोबत करीत माणसे निघतात, आपलं असं काही आणण्यासाठी. काही धावतात, काही रखडत सरकत राहतात, काही सरपटत राहतात, एवढाच काय तो फरक.

वैगुण्ये, वंचना, उपेक्षा, अपेक्षा, दुःख, वेदना, समस्या, प्रश्न कुठे नसतात? त्यांचं सर्वत्रिक असणं सार्वकालिक सत्य आहे. ते सगळीकडे असतात आणि सगळ्यांसाठी असतात. त्यांना राव-रंक सगळे सारखेच. त्यांच्या असण्यात काही फरक असलाच, तर प्रत्येक प्रश्नांचे पैलू निराळे आणि उत्तरांचे पर्याय वेगळे असतात. पण प्रश्न नाहीत, असा माणूस आसपास असणे जवळपास असंभव. प्रश्न असतात म्हणून उत्तरेही असतात. फक्त ती शोधावी लागतात. प्रत्येकवेळी ती अचूकच असतील असेही नाही. बऱ्याचदा अपेक्षाभंग करणारी असतात. म्हणून प्रश्न बदलता नाही येत. प्रश्न केवळ एकेकटेच असतात असेही नाही. अनेक गुंत्याना घेऊन त्यांचा प्रवास घडत असतो. आपल्या अंगणी त्यांचा अधिवास घडणे सगळ्यांना अप्रिय असते. अर्थात, सकारात्मक विचार अन् सर्जनशील कृती घेऊन येणारे प्रश्न यास अपवाद असतात, हे काही वेगळं सांगायला नको. काही प्रश्न साधेपणाची घोंगडी पांघरून येतात, काही समस्यांची वसने परिधान करून. म्हणून ते नाहीत, असे सहसा घडत नाही. कधी परिस्थितीनिर्मित प्रयोजनांची सोबत करीत ते आयुष्यात येतात. कधी प्रासंगिक पर्याय बनून दारावर दस्तक देतात, तर कधी हात दाखवून आपणच ओढवून घेतलेले असतात. माणूस त्यांच्या परिघात फिरत असतो. हे फिरणंही अटळ भागधेयच. हजारो वर्षापासून सुरू असणारी ही भटकंती कितीतरी पिढ्यांची सोबत करीत चालतेच आहे. चालणं तिचा धर्म आणि पर्यायांच्या शोधात भटकणं माणसाचं कर्म असतं.

प्रत्येकाचा जगण्याचा पैस ठरलेला असतो. जीवनविषयक काही धारणा असतात. निवडलेल्या विचारधारा असतात. अंगीकारलेल्या भूमिका असतात. आपला वकुब ओळखून पर्याय मात्र त्यालाच शोधायला लागतात. पुढ्यात येणारे प्रश्न प्रत्येकवेळी निराळे असतात, म्हणून उत्तरेही तशीच निवडावी लागतात. त्यांचे साचे नसतात, आधीच निर्धारित केलेल्या कोंदणात ओतून हवा तसा आकार देणारे. आयुष्यात अकल्पित येणाऱ्या गोष्टी काही सांगून येत नसतात. अनपेक्षितपणे दारावर दस्तक देतात त्या. त्यांच्या स्वागताची तयारी मात्र ठरवूनच करायला लागते. जगण्यात समस्यांची कमतरता कधी नसते? त्यांचं असणं आहेच, म्हणून त्यांची धग अनुभवण्याची तयारी असायला लागतेच. यापासून कुणी सुरक्षित राहिला आहे, असे सहसा घडत नाही. अर्थात, ही जाणीव नाही, असा माणूस शोधून सापडणार नाही. समजा सापडलाच असा एखादा तर, तो एकतर वेडा असला पाहिजे किंवा सर्वसंग परित्याग केलेला यती, संत, महंत तरी.

उत्तरांच्या आत अनेक प्रश्न दडलेले असतात. एकाचं उत्तर शोधावं, तर आणखी दुसरे जन्माला येणारे. म्हणूनच दिसणारे प्रश्न निरखून घ्यावे लागतातच, पण त्यांच्याआड दडलेले पैलू पारखून घ्यायला लागतात. अर्थात, ते सगळ्यांनाच ज्ञात असतील किंवा असायला हवेत असे नाही. ते तसे असतात की नाही? माहीत नाही. समजा असलेच, तर त्यांच्यापर्यंत किती जणांना पोहचता येत असतं? मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी प्रवासाची दिशा निश्चित करायला लागते. त्यासाठी आखून दिलेल्या चौकटी पुरेशा नसतात. इप्सितस्थळी पोहचवणारे रस्ते पायघड्या टाकून अंथरलेले नसतात. परिस्थितीच्या प्रत्येक आघाताला प्रतिकार करीत ते घडवावे लागतात. कोणत्यातरी विचारावर विश्वास ठेवून वाटा तुडवत निघावं लागतं.

जगणं साकारण्यासाठी भूमिका घ्यावी लागते. उन्नत, उदात्त जगणं काही सहजी हाती लागत नसतं. त्यासाठी साधना लागते. कोणाच्या आशीर्वादाने ते घडत नसतं. तीर्थक्षेत्री जावून ते आकाराला येत नसतं. कोणाचातरी अनुग्रह घेऊन आयुष्याला सुखांचे रंग नाही भरता येत. आपलेच कुंचले हाती घेऊन आपणच आपल्याला रंगवल्याशिवाय जगण्याचं इंद्रधनुष्य नाही उमलून येत. त्यासाठी विचारांना दिशा असायला लागते. परिस्थितीचे भान असायला लागते. परिवर्तन घडवण्याचं सामर्थ्य असायला लागतं. ते कुठून उधार आणता येत नाही. त्याकरिता भूमिकांचे परीघ समजून घ्यायला लागतात. कोणत्यातरी भूमिकेने वर्तावे लागते. पण भूमिकेबाबत भूमिका घेणारे किती असतात? सांगणे अवघड आहे. वास्तव हेही आहे की, बऱ्याच जणांना भूमिकांची वर्तुळे आकळत नाहीत, म्हणून भूमिका नाहीत, हे खरे आहे. भूमिकांच्या परिणामांची किंवा पलायनाची प्रत्येकाची कारणे वेगवेगळी असू शकतात. ती शोधावी लागतात. समजून घ्यावी लागतात.

आयुष्याच्या वर्तुळाभोवती परिवलन करताना केवळ फेऱ्या घडत नसतात. प्रत्येक फेरी पदरी काहीतरी टाकून जाते. पदरी पडलेलं दान काही दैवाचं देणं नसतं. त्या-त्यावेळी घडणाऱ्या वर्तनाचा तो परिपाक असतो. हाती लागलेल्या कवडशांचे अर्थ समजून घ्यायला लागतात. त्या प्रकाशात स्वतःच स्वतःला शोधत वाटा चालाव्या लागतात. कधी दिशा चुकतात. वाटा सुटतात. मार्ग भरकटतात. काही माणसे चुकलेल्या वाटांची चिंता करतात, काही चिंतन. चिंतेच्या निबिड जंगलात हरवलेली माणसे आपल्याभोवती समस्यांची झाडे वाढवत राहतात. काही प्राप्त परिस्थितीतून आस्थेचा दिवा विझू न देता मार्गस्थ होण्याचा प्रयत्न करतात. मनी वसतीला असलेल्या परगण्यात पोहचण्यासाठी पावले अपेक्षित दिशेने वळती करायला लागतात. कालसंगत पर्यायांशी सख्य असणाऱ्यांना आव्हाने आपली वाटत, पण प्राप्त परिस्थितीच्या विभ्रमांशी अनभिज्ञ असणारी माणसे समस्यांचे ओझे खांद्यावर घेऊन सरकत राहतात. काही साचेबंद चौकटींच्या कुंपणात उत्तरे शोधत राहतात. अभ्यासाच्या वाटेने घडणाऱ्या चिंतनातून काही पर्याय हाती लागतात. पण ‘स्व’ सुरक्षित राखण्याची काळजी करत घडलेले चिंतन परीघ हरवून बसते.

परिशीलनाने माणूस परिणत होत असतो. जाणिवा विस्तारतात, हे मान्य. पण त्यांना सुरक्षेच्या कुंपणात कोंडून ठेवले, तर प्रगतीचे पथ आक्रसत जातात. समस्यांची उत्तरे शोधून आणण्यासाठी प्रश्नांना भिडावे लागते. अभ्यासाने शहाणी झालेली माणसे प्रश्नांपासून पलायन करू पाहतात, तेव्हा पर्याय हरवतात. ओंजळभर स्वार्थ साध्य करण्यासाठी कोणतीच बाजू न घेता सत्तेचे सापळे हाती असणाऱ्या मंडळींच्या वर्तुळात वर्तताना विचारांना तिलांजली देणे वर्तन विपर्यास ठरतो. सत्तेचे सोहळे साजरे करण्यात काहींना सौख्य सामावलेले दिसते, तर काहींना सत्तेच्या परिघापासून शक्य तितके अंतर राखून ठेवण्याचा पर्याय संयुक्तिक वाटतो. अंतरावर राहणे सीमित अर्थाने रास्त विकल्प असू शकतो, पण त्यात परिस्थितीला भिडायचे धाडस नसते. अगरबत्त्या हाती घेऊन पूजा बांधणाऱ्या आणि आरत्या ओवाळणाऱ्यांना समोर असणाऱ्या प्रश्नाचे अर्थ समजत नसतात. त्यांच्यासाठी स्वार्थ हाच एकमात्र अर्थ असतो.

सत्तेचे गालिचे पसरून त्यावर सिंहासने मांडून बसलेल्यांना दुखावले, तर संधी हातातून निघेल, म्हणून सावधगिरी बाळगणारे आसपास असतातच. त्यांचे प्रश्न सुरु होतात त्यांच्यापासून आणि संपतात स्वतःजवळ. अशा विचारधारांना विकल्पांशी काही देणे-घेणे नसते. प्रत्येक पर्याय अशांसाठी स्वतःच्या संकुचित विश्वाच्या वर्तुळाएवढे असतात. निष्क्रिय कर्मवादाचे अनुसरण करणाऱ्या प्रत्येकाची तीर्थक्षेत्रे असतात. लहानमोठ्या पायऱ्या आखून घेतलेल्या असतात त्यांनी. तेथील प्रसाद हाती लागला, माथ्यावर आशीर्वादाचा मळवट भरला की, अशा विचारधारांना आणि त्याप्रती असणाऱ्या निष्ठांना सिद्ध करण्याची आवश्यकता नाही उरत. त्यांचे तसे असणेच निष्ठांची परिभाषा असते.

काहींना कुणाच्या अध्यात पडायचे नसते, ना कुणाच्या मध्यात. आपले मूठभर अस्तित्व सांभाळत अशी माणसे वाट्यास आलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. सारी ताकद एकवटून आलेला दिवस ढकलत नेतात पुढे. त्यांच्यापुरते ते सुख असल्याचे सांगतात, पण या सुखाला समाधानाची किनार खरंच असते का? आणि अशा समाधानाला नैतिकतेचे अधिष्ठान असते? स्वतःसाठी जगणारे स्वतःपुरते उरतात. इतिहासाची पाने यांच्या कार्याच्या नोंदीनी कधी अक्षरांकित होत नसतात. काहींना मुळात कसल्याच वादात पडायचे नसते. कशाला हात दाखवून अवलक्षण करून घ्या, अशा विचारांनी वर्तणारी माणसे काही मतप्रदर्शनासाठी धाडस गोळा करू शकत नाहीत. विशिष्ट विचारातून निर्मित भूमिकांचा अंगीकार तर यांच्यासाठी खूप दूरची गोष्ट असते. यांच्या धाडसाच्या कहाण्या इतरांच्या पराक्रमात आनंद शोधणाऱ्या असतात.

आयुष्याच्या वाटेने प्रवास घडताना काही विचार, काही मते घेऊन पावले उचलावी लागतात. परिस्थितीचे अवलोकन करीत जगण्याची दिशा ठरवावी लागते. काही आडाखे बांधायला लागतात, काही गणिते आखायला लागतात. सूत्रे शोधायला लागतात. घेतलेल्या भूमिका तपासून बघायला लागतात. विचारांशी पडताळून पाहायला लागतात. भूमिका अनुकूल असो अथवा प्रतिकूल. तिची किंमत मोजण्याची मानसिकता अंतर्यामी रुजून यावी लागते. रुजलेल्या विचारांच्या साक्षीने चालत राहावे लागते. भूमिका घेतली, तर त्यासाठी किंमत मोजण्याची तयारीही असायला लागते. अशी तयारी नसल्यामुळे काहीजण गप्प राहतात. परिस्थितीपासून पलायन करणाऱ्या, वेगवेगळ्या कारणांनी वजा होत जाणाऱ्यांना वगळले तर उरतात किती?

व्यवस्थेच्या खडकावर कशाला डोके आपटून घ्या, म्हणून मागच्या रांगेत उभे राहून पाहणारे अनेक असतात. एकेक वजा होत जाणारे निघाले की, वावटळींना अंगावर घेण्याची तयारी असणारी मूठभर माणसे मागे उरतात. जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रात ठाम भूमिका घेणाऱ्यांचे प्रमाण तसेही फार मोठे नसते. हे सावर्कालिक सत्य आहे आणि ते तेवढेच राहील, हेसुद्धा वास्तवच. काळाच्या कोणत्याही तुकड्यात यांना शोधले, तरी सुरक्षित अंतर राखणारी माणसे सहज हाती लागतील. प्रश्नांना भिडणारी माणसे शोधल्याशिवाय सापडत नसतात. नुसती नजर इकडे-तिकडे वळवली, तरी मिरवणारे असंख्य जीव आसपास वळवळताना दिसतील. कोणताही काळ याला अपवाद नसतो. सांप्रत काळही यास कसा अपवाद असेल.

सहकार्य, साहचर्य, सहिष्णुता ही सार्वकालिक मूल्य आहेत. त्यांच्या कक्षा कधीही संकुचित नसतात. सोयीचे अर्थ काढून माणसे आपल्या भूमिकांना त्यात घट्ट बसवण्याचा प्रयत्न करतात. समाज काही सतत निरामय विचारांनी वर्तत नसतो. त्यात दुरिते असतात. वैगुण्ये असतात. ती वाढू नयेत म्हणून प्रयत्न करायला लागतात. त्यात कालानुरूप परिवर्तन घडवावे लागते. बदलांना परिपूर्णता तेव्हाच प्राप्त होते, जेव्हा त्यांच्यामागे नैतिक विचारांचे अधिष्ठान असेल आणि विचारांना कार्यान्वित करणारी भूमिका. लोकशाही शासनप्रणाली विचाराने वर्तणाऱ्या समाजाचा सहिष्णुता श्वास असते. जगण्यात ती रुजावी म्हणून योजनांची मुळाक्षरे गिरवावी लागतात. स्वीकारलेल्या विचारांचे परिशीलन घडून त्यांची वर्तुळे विस्तारायला लागतात. प्रत्येकवेळी आपलेच विचार रास्त असतात असेही नाही. काही कमतरता असल्यास, त्या दूर करता यायला हव्यात. म्हणून अंगीकारलेल्या भूमिकांची पडताळणी करून अनावश्यक भाग खरवडून काढता यायला हवा. समानता सन्मानाने समाजात सामावली की, अंतरे मिटवता येतात. संकुचित विचारातून निर्मित अहं प्रगतीच्या प्रवासाला खीळ घालतात. सर्वांप्रती समत्वदर्शी नजरेने बघणारे विचार, हीच माणसाची खरी कमाई. सत्याला सामोरे जातांना विचारांत सहजपण सामावलेले असले की, विकासाचे पथ प्रशस्त होत असतात.

माणसाला जीवनयापन करताना कोणत्यातरी भूमिकांचा स्वीकार करून वर्तावे लागते. समाजात भूमिका घेणारे आहेत. तसे नाकारणारेही असतात. सगळ्याच भूमिका सगळ्यांना मान्य असतील असेही नाही. नसल्या मान्य, म्हणून त्या त्याज्य असतात असं नसतं. माणूस माणूस म्हणून मोठा व्हायचा असेल, तर त्याचे विचार, त्याचे स्वातंत्र्य मान्य करायलाच हवे. त्याच्या वर्तनाचा प्रतिवाद मान्यतेच्या चौकटीतच करता यायला हवा. समाजाच्या वर्तन व्यवहाराचे सगळेच साचे काही ठरवून घडवता येत नसतात. काळाच्या ओघात त्यांचे आकार बदलत जातात. समाज त्यानुरूप बदलत राहावा असे वाटत असेल, तर सकारात्मक सुधारणांना संधी असायला हवी. सुधारणेचे सगळेच मार्ग संयुक्तिक असतीलच असे नसते.

काळाचे प्रश्न घेऊन समाजाच्या वर्तनाच्या दिशा निर्धारित होतात. अनुकूल आणि प्रतिकूल काय, हे कळले की विकासाचे पथ प्रशस्त होतात. या पथावरून मार्गस्थ होणारी पावले प्रगतीचे आयाम उभे करतात. त्यांची उपयुक्तता प्रासंगिक असो अथवा सार्वकालिक, ती पारखून स्वीकारायला हवी. माणूस आकांक्षांच्या गगनात विहार करीत असतो. कोणत्यातरी अपेक्षांनी सुखांच्या शोधत चालत असतो. समाधानाच्या परिभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या असल्या आणि त्या सगळ्याच पूर्ण होतीलच असे नसले, तरी त्यातून समन्वय साधत सम्यक मार्गाची निवड करणे अशक्य नसते. निर्धारित विचारातून निवडीला आकार देता येतो. कोणत्यातरी भूमिकेच्या चिंतनातून, मंथनातून ती साकारत असते. त्याला आकार द्यायचा असला, तर प्रत्येकाला निदान किमान काही तरी समान विचार असणारी भूमिका घेता यायला हवी, नाही का?
     
(चित्र गूगलवरून साभार)

Shetmajuranchya Kavita | शेतमजुरांच्या कविता

By // No comments:

अस्तित्वाचा अन्वय शोधू पाहणाऱ्या ‘शेतमजुरांच्या कविता.’


कालोपघात बदल घडणे अनिवार्यच. त्यांना टाळून किंवा वळसा घालून मार्गस्थ होणे अवघड असते. काळ बदलतो आहे, तशी माणसेही बदलत आहेत. त्यांच्या जगण्याची, वागण्याची प्रयोजने आणि उद्दिष्टेही बदलत आहेत. वर्तनाचे सारे व्यापार स्वार्थाच्या दिशेने मार्गस्थ होताना आदर्शांचे अर्थ सोयीच्या समीकरणात शोधले जातायेत. उदात्तपण घेऊन आलेली मूल्ये जगण्यातून कापरासारखे उडत आहेत. पडझड अभिशाप ठरू पाहते आहे. समस्या, संबंध, साधने, साध्य, संस्कार, संस्कृतीकडे बघण्याची परिभाषा बदलली आहे. नव्वदनंतरच्या काळातील प्रश्नांचा आलेख अधिक अस्थिर आणि दोलायमान झाला आहे. प्रगतीच्या वाटेने दारी आलेल्या जागतिकीकरणाने तर माणसांच्या जगण्याची प्रयोजने आणि प्रश्नही बदलले आहेत. साहित्यही यास अपवाद नसते. साहित्यातला आदर्शवाद कायम असला, तरी त्याची जागा समकालीन वास्तवाने घेतली आहे.

काळाचा हात धरून आलेल्या प्रश्नांना भिडणारे साहित्य वाचकाला आपले वाटत असते. अनुभवांचे संचित हाती देऊन काळ पुढे निघतो. वळताना मागे काही प्रश्न ठेऊन जातो. काळाने समाजजीवनावर ओढलेल्या रेषांचा शोध साहित्यिक सतत घेत असतो. संवेदनांच्या प्रतलावरून वाहणाऱ्या प्रवाहात जगण्याच्या गुंत्याची उकल करू पाहत असतो. व्यवस्थेच्या वर्तुळात जगताना हरलेल्या, हरवलेल्या समूहाची विखंडीत स्वप्ने अधोरेखित करणारी साहित्यकृती व्यवस्थेने नाकारलेल्या उत्तरांचा शोध असते. काळाचे किनारे धरून उत्तरांच्या शोधात ती पुढे जात असते.

काळाचे गुंते उकलत प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या साहित्यामध्ये आश्वस्त करणारा आशावाद कायम असतो. आस्थेचा ओंजळभर ओलावा घेऊन वेदनांची उत्तरे शोधू पाहणाऱ्या अशा कवितांमध्ये नामदेव कोळींच्या कवितेचा अंतर्भाव आवर्जून करावा लागतो. सामान्यांना विकल करणाऱ्या वर्चस्ववादी नीतीवर प्रहार करण्यात कवीची लेखणी यशस्वी झाली आहे. पद, पैसा आणि प्रतिष्ठेच्या चौकटींमध्ये बेगडी अस्मिता गिरवणारा एक वर्ग व्यवस्थेत सतत वास्तव्याला असतो. संकुचित विचारांना व्यापकतेचे परिमाण देऊन सामान्यांना आपल्या प्रभावात आणण्याची कोणतीही संधी हा वर्ग सहसा सोडत नाही. स्वहित हाच याचा प्राधान्यक्रम असतो. काळाच्या कोणत्याही तुकड्यात याला शोधला, तरी त्याच उन्मादात जगताना तो आढळतो. तर दुसरीकडे आयुष्यात अभावाचाच प्रभाव असणारा आणखी एक वर्गही येथे जगण्याशी दोन हात करत सुखाच्या चांदण्या वेचून अंगणी आणण्याची स्वप्ने पदरी बांधून नांदतो. ज्याच्या समस्यांची उत्तरे सहसा सुगमपणे हाती लागत नाहीत.

व्यवस्थेच्या वर्तुळात हरवलेल्या समूहाचे आवाज ही कविता मुखरित करते. वर्गीय चौकटींच्या परिघांना ओलांडून नव्या परगण्यांचा शोध घेत वास्तवाच्या प्रांगणात येते. व्यवस्थेतील वैगुण्ये मांडतांना विचारप्रवृत्त करते. आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळताना नव्या क्षितिजांचा शोध घेऊ पाहते. आसपासच्या आसमंतातील प्रश्न घेऊन व्यक्त होणारी ही कविता म्हणूनच अधिक परिचयाची आणि आपलीही वाटते.

परिसरातून प्राप्त होणाऱ्या अनुभवांचे पाथेय सोबत घेऊन लेखक व्यक्त होत असतो. त्याचे व्यक्तिमत्त्व, जीवनदृष्टी साहित्यनिर्मितीच्या केंद्रस्थानी असते. ती वेगळी गृहीत धरता येत नाही. जगणं काळाशी अन् परिसराशी निगडीत असतं. समाजातून मिळालेलं संचित दिमतीला घेऊन कविता ‘स्व’ शोधता शोधता साकार होते, व्यक्तीकडून समष्टीकडे नेते. नामदेव कोळींची कविता यास अपवाद नाही. या कवितेतून प्रकटणारे प्रश्न भले प्रासंगिक असतील, सीमित असतील; पण प्रकृतीनुसार तसे सार्वत्रिकच आहेत. त्यांना समजून घेताना कवी त्यांच्याशी भिडतो. त्यांत आपले अस्तित्व शोधू पाहतो. त्यांच्याशी समरस होतो. म्हणूनच ते जितके कवीचे असतात, त्याहून अधिक वाचकांचे वाटतात.

साहित्यातून साहित्यिकाला शोधण्याचा प्रयत्न होतच असतो. त्याच्या भूमिका त्यातून पडताळून पाहता येतात. कवीच्या अंतर्यामी भावनांची अनेक आंदोलने स्पंदित होत राहतात. त्यांचा नाद संवेदनशील वाचकाला टिपता येतो. काळोखाच्या कातळावर काव्यतीर्थे कोरण्याची कवीच्या अंतर्यामी असणारी आस साक्षात्कार बनून प्रकटते. एकेक अनुभवांची, प्रश्नांची दाहकता दृगोचर होत जाऊन वाचकांचे वैचारिक स्थित्यंतर ही कविता घडवू पाहते. प्राप्त परिस्थितीवर परखड भाष्य करते. कवी म्हणतो,

साधूचे कुळ पुसू नये,
नदीचे मूळ पुसू नये,
काळोखाचे गूढ पुसू नये.


प्रत्येकाच्या अंतर्यामी काळोखाचे काही कप्पे असतात, पण या काळोखाला चिरत जाण्याची उर्मीही त्याच अंतःकरणातून उदित होत असते. कवितेची सर्वमान्य व्याख्या करणे एक अवघड प्रकरण असते. काळाच्या गर्भातून उगवणाऱ्या वाटेने येणाऱ्या असंख्य प्रश्नांचा तो शोध असतो. कविता वाचतांना आपलं असं काही हाती लागलं, की वाचकाला ते आपलेच वाटायला लागते. परकेपणाच्या सीमा धूसर होत जातात. शब्द कुणाचेतरी; पण अनुभव आपले, असे लेखन म्हणजे कविता. असे म्हटले तर नामदेव कोळींच्या कवितेतून वाचकाला आपलं असं काही गवसल्याने ती आपलीच वाटू लागते.

इतिहास संस्कृतीचे अपत्य आहे. पण संस्कृतीच्या चौकटींमध्ये इतिहासच स्वातंत्र्याला संकुचित करू पाहतो, तेव्हा अंधाऱ्या वाटांवरून चालणारा कोणीतरी पथिक संदर्भांना असणारे पदर उलगडू लागतो. शब्द इतिहासाची पाने तपासून पाहत वास्तवाला सामोरे जातात, तेव्हा काळोखात कुणीतरी खोदकाम करून पलीकडचा उजेडाचा काठ शोधत राहतो. कवी म्हणतो,

इतिहासात
काळोखाचे संदर्भ आहेत
अर्थात ...
काळोखालाही इतिहास आहे.


व्यवस्थेत शतकांपासून चालत येणारी विषमता काही अद्याप संपवता आली नाही, भलेही त्याचे पीळ जरा सैलावले असले तरी. अशा व्यवस्थेत स्वतःचा शोध घेऊ पाहणारा कवी विषमतेची दाहकता विसरू शकत नाही. खरंतर काळोखाचा इतिहास स्वतःहून कधीच बदलत नसतो. तो प्रयत्नपूर्वक बदलावा लागतो किंवा घडवावा तरी लागतो. जगण्याच्या अनेक प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटलेला फाटका माणूस अवस्थ पातळीवर उभं राहून ती बदलण्याची आस ठेवतो.

परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग केल्याच्या कितीही वार्ता घडत राहिल्या, तरी सामान्य माणसांच्या जगण्यातले भोग काही केल्या मिटत नाहीत. मूठभरांच्या सुखांच्या संकल्पित संकल्पना म्हणजे जगणं नसतं. जगण्याला अनेक कंगोरे असतात. त्यांचे परीघ असतात. प्रगतीच्या स्वप्नांना सामान्यांच्या ओंजळभर आकांक्षा का पूर्ण करता येत नसतील, हा प्रश्न अधिक अस्वस्थ करीत जातो. खूप मोठ्या अवकाशाला आपल्यात सामावणारी त्यांची ‘सरकारी दवाखाना’ ही कविता जीवनाच्या संगती-विसंगतीवर प्रखर भाष्य करते. कवी म्हणतो,
 
शहरातल्या सरकारी दवाखान्यात
भरती झालंय गाव,
कुणीतरी वयात आलेली पोरगी
मोजतेय शेवटच्या घटका
आयसीयूच्या पलंगावर
आवडत्या जोडीदाराशी
थाटता आला नाही संसार
अन् परक्या जातीतल्या
मुलाशी नाव जुळल्यानं
बदनामीच्या भीतीपोटी
जीव संपवण्याचा प्रयत्न केलाय तिनं


ज्यांच्या जगण्यात सदैव अंधारच साचलाय, त्यांचं जगणं मुखरित करणाऱ्या नामदेव कोळींच्या ‘शेतमजुरांच्या कवितेचं’ नातं सतत भळभळणाऱ्या जखमांशी आहे. सर्वसामान्यांच्या जगण्यात असणारी असुरक्षिता, अस्वस्थता, अगतिकता घेऊन कवी व्यक्त होतो. गाव, समाज, तेथील माणसे, त्यांचे जगण्याचे प्रश्न, आयुष्यातले गुंते, समस्यांशी त्यांच्या लेखणीचं सख्य आहे. काळ बदलला, त्याची परिमाणे बदलली, तरी परंपरेच्या धाग्यांपासून तुटून दूर जाणे अवघड असल्याची जाणीव या कवितेतून व्यक्त होत राहते.

बापाला परिस्थितीच्या चक्रात फिरण्याचा शाप नियतीने दिलेला आहे. नियतीच्या अभिलेखाना नाकारून परिस्थितीवर स्वार होत लढण्याचे वरदानही अभावग्रस्त जगण्याने दिले आहे. बापाचं नातं गावातील मातीशी घट्ट जुळलं आहे. परिस्थितीची दाहकता सहन करूनही न मोडणारा, एकाकी झुंज देणारा योद्धाच जणू. आयुष्याच्या उतरणीवर लागूनही बापाचं संस्कृतीशी, संस्कारांशी असणारं नातं दोलायमान होत नाही. शेत, शिवार, गुरावासरांशी त्याच्या मर्मबंधाच्या गाठी बांधल्या आहेत; गोठ्यात एकही ढोर शिल्लक नसले तरीही. कवी याच विजिगीषू संस्कारात वाढला, घडला आहे. परिस्थितीच्या परिघात स्वतःचा शोध घेत राहिला आहे. त्यांचे अनुभव, दुःख नुसते परिघाभोवतीचे परिवलन नाही, म्हणूनच त्यांचे शब्द अंगभूत सामर्थ्य घेऊन अभिव्यक्त होतात. गावमातीच्या गंधाची सोबत करीत राहतात.

महात्मा गांधींनी खेड्यांना सक्षम करण्याचे स्वप्न पाहिले. पण काळाचा रेटाच मोठा असल्याने त्यांच्यात घडणारे बदल थांबवता आले नाहीत. साठ-सत्तर वर्षापूर्वी दिसणारी गावे आज गावपण विसरून शहरी सुखांच्या उताराने वाहत आहेत. परिस्थितीच्या आवर्तात सापडलेली गावं जागतिकीकरणाच्या वाटांनी चालताना अगतिकीकरणाच्या वळणावरून वळत आहेत. पण व्यवस्थेच्या चौकटी अभ्येद्यच आहेत. त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक आघात करूनही त्यांचा टवकासुद्धा उडत नाहीये. मूठभर लोकांच्या खिशात आलेल्या पैशाने देशाला महासत्ता होण्याची स्वप्ने येत आहेत. पण सर्वसामान्यांच्या जगण्याच्या स्वप्नांची वाताहत होते आहे. माणसं सैरभैर झाली आहेत. शोषण काही संपले नाही. हा विचार व्यक्त करताना ‘दोन नोंदी’ या कवितेत कवी म्हणतो,

घर चालावं म्हणून
बाप
दुसऱ्याच्या वावरात
राबराब राबला
रेताड बखळ जमीन
रक्ताचं पाणी
हाडांची काडं होईस्तोवर
आतड्यांना पीळ देत
सुपीक केली
घराची बिघाभर जमीन मात्र
शेवटपर्यंत
पडीकच राहिली.


व्यवस्थेने ललाटी लेखांकित केलेला हा अध्याय अद्याप बदलत नाही. यालाच कोणी प्रारब्ध, प्राक्तन वगैरे असे काही म्हणत असतील, तर काहींच्याच वाट्यास हे भोग का असावेत? दुसऱ्याचं जगणं सावरताना स्वतःचं जगणं उद्ध्वस्त झालेला बाप व्यवस्थेने आखून दिलेल्या वर्तुळाभोवती गरगर फिरतो आहे. आणि त्याच्यासोबत सप्तपदी करून आलेली माय अस्तित्वात नसणाऱ्या क्षितिजावर सुखाचा सूर्य शोधत आहे. जो तिच्या सरणापर्यंत कधीच येणार नाही, हे माहीत असूनही. म्हणूनच कवितेतल्या या नोंदी नुसत्या नोंदी राहत नाहीत, तर वाचकास प्रश्न विचारतात. गरिबांना स्वप्ने पाहण्याचा अधिकार आमच्या व्यवस्थेत आहे का? असेल तर किती? मनात निर्माण होणाऱ्या अशा प्रश्नांनी वाचक अस्वथ होत जातो. अंतर्मुख होतांना विचारचक्रात फिरत राहतो.

व्यवस्थेने अन्याय करूनही कोणताही आक्रस्थाळेपणा, आक्रोश, आक्रंदन आदी भावनांचा हात न धरता कवितेतले शब्द संयतपणे जगणं सांगण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतात. तरीही मनाच्या मातीत दडलेला वणवा दाहकता घेऊन नांदता राहतो. ‘हिशोब’ कवितेत ते म्हणतात,

पाटलाच्या पोरीनं वापरलेली पुस्तकं
मला मिळावीत म्हणून
खंडीभर ढोरं गव्हाऱ्यात फुकट वागवलीत बापानं
त्याच पुस्तकातून शिकलो
इतिहास, नागरिकशास्त्र
अन मूल्यसंस्कार जपणं.


जुनी पुस्तके आपल्या मुलास शिकण्यासाठी मिळावीत, म्हणून बाप पाटलाची खंडीभर ढोरे कोणत्याही मोबदल्याशिवाय चारतो आहे. उद्याचे उज्ज्वल भविष्य पाहताना, आजच्या शोषणास विसरू पाहतोय. पुस्तकातल्या अक्षरातून इतिहास बदलण्याची स्वप्ने पाहत कवी शिकतो आहे. अभावाच्या अंधारल्या क्षितिजावर परिवर्तनाची नवी पाहट आणण्यासाठी व्यवस्थानिर्मित चौकटींच्या तुकड्यात नवी मूल्ये शोधतो आहे. पण येथला इतिहास बदलण्यास तयार नाहीच. व्यवस्था कूस बदलायला तयार नाही. इतिहासच शोषणाचा असेल, शास्त्र नागरिक म्हणून सन्मान देण्यास सक्षम नसेल आणि मूल्य मूठभरांची मिरासदारी असेल, तर कोणत्या क्षितिजाला इमानी सूर्याचे दान आपण मागावे, असा प्रश्न नकळत कवी उपस्थित करतो.

मास्तराने उदात्त, उन्नत मूल्यांची आणि जगण्याची प्रयोजने आपल्या आचरणातून मनात रुजवावित. सतशील विचारांची दीक्षा द्यावी, त्या गुरूने गुरुकुलाचा वारसा विसरणे विपर्यस्त वाटते. ज्ञानासाठी आसुसलेल्या एकलव्याला दिलेल्या विद्येचे मोल म्हणून घरातील अठराविश्वे दारिद्र्याशी झगडणारी आई गुरुदक्षिणा म्हणून दाळ-दाणा देत राहिली. हे वास्तव वाचून व्यवस्थेत माणूस पराभूत असतो, यावर विश्वास ठेवावाच लागतो. अक्षरशून्य माय-बापाला जगण्याच्या प्रश्नांची उत्तरे शोधताना हिशोब कदाचित कळला नसेल; पण शोषण हाच पाया असणाऱ्या व्यवस्थेला मात्र ती संधीच वाटत राहिली. परिस्थितीने अगतिक झालेल्यांना हिशोब कळेलच कसा? परंपरेचे पायबंद पडल्यावर प्रगतीचे पथ आक्रसत जातात. या मार्गाला प्रशस्त करण्याचा उपाय शिक्षण असल्याचं निरक्षर माय-बापाला ठावूक आहे. म्हणूनच पोरगं शिकतांना आभाळभर आनंद ही माणसे शोधत आहेत.

‘शेतमजुरांच्या कविता’ व्यवस्थेतील शोषक आणि शोषित भाव व्यक्त करते. शेत मालकाला जास्तीचं काम करून हवंय. अडचणी पाचवीलाच पुजल्या असल्याने कधी आस्मानी, कधी सुलतानी संकटांशी दोन हात करताना शेतकरी, शेतमजूर हवालदिल होतो आहे. कुणाचा बाप गेला, कुणाचा बैल गेलेला. प्रत्येकजण आपले मरण आपल्यात शोधतो आहे. परिस्थितीने सर्वबाजूंनी कोंडी केलेली. निदान शासनस्तरावरून काही हाती लागेल, या आशेने तो अपेक्षा करतो आहे. पण योजना तशा कागदावरच राहतात. योजनाप्रिय शासनातील लोककल्याणकारी कारभारावर भाष्य करताना कवी मनातला सल व्यक्त करताना म्हणतो,

शासनाकडून अपेक्षा करतोय
शेतमजूर
साऱ्या योजना पुसून गेल्या आहेत
कागदावरून.


नोकरशाही, लालफितीचा कारभार, लोकनेते यांच्या वागण्याची निर्लेपवृत्ती खूप खणूनही पाझर न सापडणारी. नियमांच्या शुष्क चौकटींमध्ये कामं अडतात. मजूर मात्र आश्वासनांच्या क्षणिक तुषारांवर जगण्याची उमेद घेऊन उभा आहे, परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी झुंजत. हाती केवळ शून्यच असणारा जन्मदत्त वारसा. पद, पैसा, प्रतिष्ठा यापासून कोसो दूर ठेवला गेलेला. शतकांपासून भाकरीचा शोध घेत पोटाच्या पसाभर परिघाभोवती गरगर फिरतो आहे.

निरक्षरता कष्टकऱ्यांच्या जीवनाला मिळालेला शाप आहे. अज्ञानाने केलेले अनेक आघात झेलत, ते नियतीशी लढत आहेत. पण धनदांडग्यांच्या दांडगाई विरोधात अवाक्षर उच्चारण्याचा या माणसांना धीर होत नाही. हाताला काम, कामाला दाम आणि दामाला सन्मान असे काहीसे विचार समाजवादी व्यवस्थेत चांगले वाटत असले, तरी भांडवलशाहीच्या दमननीतीत सगळे वाद संपतात. मागे उरतो तो केवळ निराशावाद. निढळाच्या घामाचा पैसाही राबणाऱ्यांच्या हाती वेळेवर मिळत नाही. हे वास्तव अंतरंगात झिरपत जाते. ‘ही कुठली दहशत?’ या कवितेतला प्रत्येक शब्द अंगार बनून समोर येतो. ढोर मेहनत करणारा बाप, धसकटे वेचताना अधमेली होणारी माय, सगळं काही करूनही मुलांच्या शाळेची फीसुद्धा वेळीच देऊ शकत नाहीत. अन्यायाविरोधात कोणीच कसे बोलत नसेल, या विचाराने वाचकाला अस्वस्थ करणारी, ही कविता शब्दांची शस्त्रे यत्ने करायला लावणाऱ्या तुकाराम महाराजांच्या शब्दांशी नाते शोधू पाहते.

कष्ट, उपेक्षा, अभाव या साऱ्या घटनांना घेऊन कवी आपल्या जगण्याचे वास्तव अधोरेखित करीत जातो. कवितेतून अंगारफुले शोधू पाहतो. आटोपशीर असणाऱ्या या कविता संग्रहात शब्द मात्र ताकदीने समोर येतात. कदाचित त्यांनी मांडलेलं दुःख, ते व्यक्त करण्यासाठी निवडलेले शब्द वैयक्तिक असतील. अनुभवांचे प्रयोजन वैयक्तिक असेल, ते प्रासंगिकही असू शकते; पण अनुभवाची चिंतनशीलता, खोली वैश्विक आहे. काव्यलेखनात कवी अनुभवांची अलिप्तता जपत असतो, असे म्हणतात. या कवितेतून कवीला वाचक वेगळे काढूच शकत नाहीत, इतका तो वास्तवाशी एकजीव झाला आहे. त्यांचा प्रत्येक शब्द मनात रुजत जातो, धरतीच्या कुशीत रुजणाऱ्या बिजासारखा. परिस्थितीची दाहकता दाखवणारा दर्पणच जणू.

मायबाप कष्टात जगणारे. रात्रंदिन श्रम करून आपापला विठोबा शोधणारे. उद्याच्या सुंदर दिवसांची कामना करणारे. कवी कधीतरी तारुण्यसुलभ भावनेतून या साऱ्या कष्टांना विसरतो. माध्यमांच्या मायाजालात गुंततो. या मोहमयी रंगबेरंगी दुनियेत हरवतो. वास्तवाच्या विखारातून निसटण्याचा प्रयत्न म्हणूनही असेल कदाचित. मृगजळी सुखाला आपलं समजून जगाशी कनेक्ट राहताना आपल्यांच्या दुःखाशी डिसकनेक्ट होत राहतो.

बाप फाटक्या कपड्यानिशी देहाची दुखणी सोबत घेऊन शेतात राबतो. माय पायात काट्यांनी केलेल्या कुरूपांची वेदना घेऊन शेतातून घरी परतणारी. आयुष्याच्या वाटेने चालताना परिस्थितीने दिलेली अनेक कुरूपे वागवणारी. वेदना चेहऱ्यावर दिसू न देता, देव आणि दैवाशी झगडणारी. माणसं सगळीकडे देहाने सारखीच; पण मनाच्या वेदना भिन्न असतात. या वेदनांशी नातं सांगणारी ही कविता काळजाला चरे पाडते.

घर, गाव, परिसर, श्रद्धा, समस्या, संकटे, आस्था, अपेक्षा अशा अनेक पातळ्यांवर वावरणारी ही कविता माणसांच्या मनात उदित होणाऱ्या भावांदोलनांना नेमकेपणाने पकडते. मनात आस्थेचा सूर्य जागवणारी ही माणसे परिस्थितीचे वारंवार पडणारे तडाखे झेलूनसुद्धा न मोडणारी. झुंजारपण दिमतीला घेऊन जगण्याच्या प्रश्नांशी भिडतात. या सगळ्याच कवितातून एकेक सत्य वास्तवाच्या गाभ्यातून अंकुरित होते. वरवरचे अनुभव घेऊन शब्दांशी केलेली ती झटापट नाही. वास्तवाला भिडणारा अनुभव, हेच या कवितेचे बलस्थान आहे. माय कवितेत ते म्हणतात,

माय
बापाला आंधणासोबत मिळालेली
जिवंत वस्तू
माय
सदा खुंट्यांवर बांधलेलं
गरीब जित्राब.


तेव्हा अजूनही वाटते महिला सक्षमीकरणाच्या, हक्कांच्या कितीही वार्ता केल्या, तरी बदलाचा वारा येथल्या मानसिकतेला अद्याप स्पर्शून गेलाच नाही.

माय
वास्तवाच्या विस्तवावर भाजलेली
गवरीची राख...
माय
सासरच्या आगीत जळलेली
अधमेली चिता.


या ओळींमधून जाणवणारी धग संवेदनशील मनात कालवाकालव करते.

प्रेम, प्रणय, हृदयातील गुंता या भावनांपासून अलिप्त असणारी कवीची लेखणी हृदयातील आग धगधगत ठेवते. वास्तवाच्या वेदनाच इतक्या मोठ्या आहेत की, त्यांना प्रणयातल्या धुंदपणाचं अप्रूप वाटत नसेल. संघर्ष करीत जगणारी माणसे कष्टालाच रोमान्स समजतात. हताश होऊनही अंतरी वाहणारा आस्थेचा ओलावा जपत पुढे चालण्याची उमेद ही माणसे नाही सोडत. भरारी घेण्याचं सामर्थ्य अंगी असणारी वृत्ती माणसांचे मोल वाढवते. आपत्तीचे आघात सतत झेलणाऱ्या या माणसांविषयी म्हणूनच आपलेपणा वाटतो.

पाण्याच्या प्रश्नांनी वैतागून शिव्या घालणाऱ्या बाया. मोडका संसार सांभाळून झुंजणारी माय, शिक्षणासाठी धडपडणारा पोरगा ही कष्टाची अधोरेखिते समोर रोजच दिसत असताना साहजिकच वास्तवाच्या वाटेने अनुभव शब्दांकित झाले आहेत. समकालीन वास्तवाचे भान ठेवीत चिंतनाच्या वाटेने कवी एकेक अनुभव शब्दांकित करून काही सांगू पाहतो. अनुभवाचं आकाश आपल्या कवेत घेऊ पाहतो.

साहित्यिक मूल्यांनी परिपोषित होणारी ही कविता जगण्याचे उमदेपण घेऊन येते, तशी माणसाला त्याच्या सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव करून देताना विचार करायलाही भाग पाडते. ‘सातपुडा’ या कवितेत ते म्हणतात,

उडत चाललेल्या हिरवळीसारखी
सातपुड्यातून निघून चाललीयेत
माणसं देशभर
शेतमजुरी करत
विखुरलीयेत शेतमाळावर
गावोगावच्या गावदरीवर


गावपरिसरात प्रगतीच्या पाऊलखुणा दिसू लागल्या, त्या पावलांचे ठसेही तेथल्या मातीत गोंदले गेले; पण त्यासाठी मोल चुकवणाऱ्या माणसांचं काय? पुसल्या जाणाऱ्या त्यांच्या पाऊलखुणांना कुठलेच आयाम का नसावेत? विस्थापित होणं हेच प्राक्तन असेल, तर व्यवस्थेनेच ते यांच्या ललाटी लेखांकित केले आहे. वैधव्य भोगणारा यांचा वर्तमान वळचणीला, तर भविष्य अंधारात विसकटलेलं जगणं शोधत आहे.

अश्वत्थाम्याची भळभळणारी जखम घेऊन येणारी ही कविता अस्वस्थ वेदना व्यक्त करते. मूल्यप्रेरित जगण्याला समजून घेताना समाजातील दुरितांचे सम्यक भान राखणारी नामदेव कोळींची कविता सत्य, शिव, सुंदराची आराधना करीत मांगल्याची प्रतिष्ठापना करू पाहते. ‘प्रश्नांचं मोहळ, भंगतीचा पाय, पाण्याचा धर्म या कविता वाचकाला नुसते सजगतेचे भान देत नाहीत, तर नेणिवेच्या पातळीवरून जाणिवेच्या पातळीवर आणून उभं करतात.

एक समृद्ध; तरीही अस्वस्थ करणारा अनुभव नामदेव कोळींची कविता वाचकाला देते. भाषा सहज आविष्कृत होणारी आणि साधेपणाचे साज घेऊन आलेली. आलंकारिकता, अतिशयोक्ती, अभिनिवेशांचे कोणतेही अवडंबर नसणाऱ्या या कविता प्रांजळ मनातून प्रकटलेले भाषिते वाटतात. मूल्यव्यवस्थेवर भाष्य करणारी ही कविता जशी प्रतिमांच्या माध्यमातून प्रकटते तशीच माणसांच्या आणि कवीच्या मनातील श्रद्धांचाही वेध घेते. निसर्ग, पर्यावरण, पाणी, गावाचं दुभंगलेपण, शहरी सुखांची आस, निसटलेलं बालपण या साऱ्यातून कवी उजेडाची एक तिरीप शोधू पाहतो आहे. गावाच्या मातीत अस्तित्वाची मुळे घट्ट रुजवणारी, तेथल्या संस्कारांशी नाळ बांधून ठेवणारी आणि गावातल्या माणसांना शोधणारी ही कविता मनात रुजते. नुसती रुजतच नाही, तर वाढत जाते. जाणीवेच्या सकस रोपांना रुजवण्याचं काम नामदेव कोळींची कविता करते आहे. ज्याच्या साहित्याकडे आश्वासक भावनेतून पाहता येईल, असे हे एक नाव मराठी काव्यविश्वात आपली ‘नाममुद्रा’ अंकित करीत आहे. त्यांच्या कवितेकडे पाहताना एक आश्वासक चित्र मनाच्या कॅनव्हासवर रेखांकित करण्याचे सामर्थ्य या कवितेत आहे, हे म्हणणं अतिशयोक्त ठरणार नाही, असे वाटते.
*
शेतमजुरांच्या कविता
कवी: नामदेव कोळी
संवाद: ९४०४०५१५४३
*
चंद्रकांत चव्हाण
संवाद: ९४२०७८९४५५