चेहरे मुखवट्याआडचे

By // No comments:
पद, पैसा, प्रतिष्ठेला अवास्तव महत्त्व आलं की, माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. अर्थात, यामागे सोस अन् कोणत्यातरी आसक्ती असतात. माणूस स्वतःला विचारांनी कितीही समृद्ध वगैरे म्हणवून घेत असला, तरी स्वार्थाची कुंपणे ओलांडून पलीकडच्या परगण्यात पोहचता नाही येत हेच खरं. अंतरी असणारे अहं आसक्तीपासून विलग नाही होऊ देत त्याला. आयुष्य देखणं वगैरे असावं. जगणं सुंदर असावं असं वाटण्यात वावगं काहीच नाही. पण ते नाही म्हणून झुरत राहणं विपरीत आहे. जगण्याच्या परिघात काहीतरी कमतरता राहिली की, मनात अस्वस्थता दाटत जाते. ही अस्वस्थताच आयुष्याच्या सुघड वाटा अवघड करते. ‘बिकट वाट वहिवाट नसावी,’ हे शब्द अशावेळी सुविचारांपुरते उरतात. 

आर्थिक समृद्धीची परिमाणे काही असोत. ती सर्वमान्य असोत की सामान्य अथवा नसोत, पण जगणं श्रीमंत होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले, तरी पर्याप्त असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे? प्रतिमेवर पडलेल्या धुळीला कुठल्यातरी क्लीनरने काढता येईलही, पण मनावर पडलेल्या धुळीला कुठली केमिकल्स वापरून मिटवायचे? आरसा असतो तसाच आणि तोच असतो, पण त्यात दिसणारी प्रतिमा परिस्थितीचा परिपाक असतो. ती पालटता आली की, प्रतिबिंब डागविरहित दिसतं नाही का?

कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘पाहीसनी लोकायचे येवहार खोटेनाटे, बोरीबाभळीच्या अंगावर आले काटे.’ हव्यासापायी जखमा देणाऱ्या काट्यांची कुंपणे आपण स्वतःभोवती का तयार करावीत? केवळ जगाला दाखवता यावे म्हणून? कुंपणाला मालकी असली, तरी अपेक्षित विस्तार असतोच असं नाही. आणि तसंही काट्यांशी सख्य करायला कोणाला आवडेल? पण काहीना कुंपणांचंच अधिक अप्रूप असतं. कदाचित सुखांच्या व्याख्या त्यांना तेथे गवसत असतील, पण खरं हेही आहे की, कुंपणांच्या आत सुखांचा राबता दिसत असला, तरी समाधान नांदते असेलच असं नाही.

नाहीतरी आपण कोणते तरी ऐच्छिक, अनैच्छिक मुखवटे धारण करून वावरत असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो आणि वेळ मिळताच ते मिरवतही असतो. मिरवणं माणसांची मूळ प्रवृत्तीच असावी बहुतेक. माझ्याकडे हे आहे, हे सांगण्यात त्याला सुख सापडत असेलही. पण समाधान... त्याचं काय? ते कुठून आणणार आहोत? ते ना विकत मिळत, ना उसने आणता येत. तो मुळचाच झरा असतो. पण आतला ओलावाच आटला असेल, तर त्याने वाहते राहावे तरी कसे? सोस आणि समाधान यात असलेल्या अंतराचे आकलन करता आलं की, मुखवट्यांच्या मागे असणाऱ्या चेहऱ्याचे विस्मरण नाही घडत.

मुखवट्यांना टाळून माणसांना जीवनयापन करणे काही अवघड नाही. सीमित अर्थाने मान्य करूया की, कधी कधी अनिच्छेने मुखवटेही परिधान करायला लागतात. समजा केला परिस्थितीवश धारण किंवा करावा लागलाच, तर त्यामागचा हेतू स्व-पलीकडे असायला काय संदेह असावा? प्रश्न फक्त एवढाच असतो की, आपण निवडलेला मुखवटा कसा आहे. मुखवटा म्हणजे माणूस नाही, हे माहीत असूनही अंतर्यामी असणारी कोणतीतरी अस्वस्थता माणसांना मुखवटे धारण करून जगायला बाध्य करते, तेव्हा गुंते अधिक जटिल होत जातात.

जग एक रंगमंच आहे. येथे प्रत्येकाला आपापली भूमिका घेऊन जीवनयापन वगैरे करावे लागते, असे काहीसे आपण अनेकदा ऐकले असेल. पण या मंचावर वावरताना आपली भूमिका कोणती असेल, हे ठरवायचे कुणी आणि कसे? एकीकडे दिसणारी अगदी साध्यासरळ स्वभावाची माणसं, तर दुसऱ्या बाजूने अंगभूत पात्रता नसतानाही कोलांटउड्या मारून आपली मखरे तयार करून स्वतःची आरास मांडणारीही आसपास बरीच असतात. स्वतःचा वकुब ओळखून वागणारी माणसंही समाजात संखेने खूप आहेत. अशा माणसांच्या सत्प्रेरीत वर्तनातून निर्मित विचार साधेपणाची संगत करीत जगावे कसे, हे सांगणारा वस्तुपाठ असतो. अशा चेहऱ्यांकडे पाहण्याऐवजी आपलं लक्ष मुखवट्यांकडेच का वळत असेल?

- चंद्रकांत चव्हाण
••

समस्यांचे जाळे

By // No comments:
‘समस्या’ हा असा एक शब्द आहे, ज्याभोवती इच्छा असो अथवा नसो, सगळ्यांनाच प्रदक्षिणा करायला लागतात. वांच्छित अवांच्छित असल्या सोईस्कर कप्प्यांत नाही ढकलून देता येत त्यांना. समस्या लहान असतात, मोठ्या असतात, आतल्या असतात, बाहेरच्या असतात अथवा अन्य काही असू शकतात. पण त्या असतातच असतात. त्यांना काही कुणी आवतन देऊन आपल्या अंगणी आणलेलं नसतं. आगंतुक असतात त्या. त्यांना टाळायचे, नसतीलच टाळता येत, तर त्यापासून पळायचे विकल्प बहुदा नसतात. समजा असले म्हणून त्यातून काही मुक्तीचा मार्ग गवसतो असंही नाही. म्हणून की काय त्यांच्याभोवती संदेहाची अनेक वर्तुळे कोरलेली असतात. 

आपली समस्या हीच असते की, आपली समस्या नेमकी काय आहे, हेच आपल्याला उमगत नाही बऱ्याचदा. तसाही माणूस केवळ वलयांकित नसतो, तर समस्यांकितही असतो. जीवनयापन करताना समस्या समोर उभ्या ठाकल्या नाहीत, असा कुणी माणूस इहतली अधिवासास असेल असं वाटत नाही. समस्या वैयक्तिक असतात, सामूहिक असतात. अवघड असतात, सुघड असतात. सहज सुटणाऱ्या असतात, कधी जटिल गुंते घेऊन अमरवेलीसारख्या आयुष्याला बिलगून बसतात. जगण्याला वेढून घेतात त्या, हेही सत्यच. 

सगळ्याच समस्यांना आपण आवतन दिलेलं नसतं. कधीतरी कुठल्यातरी आडवाटेने आगंतुकासारख्या चालत आपल्या अंगणी येतात. उंबरा ओलांडून आपल्या आसपास अधिवास करू पाहतात. समस्या असतात. त्यांची उत्तरे शोधावी लागतात. नसतील हाती लागत, तर अन्य विकल्प पडताळून पाहावे लागतात. कुठल्यातरी पर्यायात त्यांचे उत्तर सापडते. समस्या सोडवणारी आयती सूत्रे नसतात. समीकरणे अवघड असली, म्हणून आयुष्याच्या पानांवर मांडलेली गणिते अशीच सोडून देता नाही येत. चुका घडत राहिल्या, तरी उत्तर हाती लागेपर्यंत आकडेमोड करावी लागते. सुटतो कधी एखादा हातचा, चुकतं एखादं गणित. याचा अर्थ परीक्षेत नापास झालो असं नाही. एखादा कठीण प्रश्न टाळून इतर प्रश्नांची उत्तरे शोधावीत. एखाद्या परीक्षेत चारदोन गुण कमी मिळाले, म्हणून काही पुढे जायला कुणी अपात्र ठरत नाही. म्हणून प्रयत्न नको सुटायला. 

पुस्तकातील गणित नाही आवडत बऱ्याच जणांना. ते नाकारण्याचा पर्याय हाती असतो, पण जीवनग्रंथावर कोरलेल्या गणिताला उत्तरांच्या विरामापर्यंत पोहचवावे लागते. संख्याना अर्थ द्यावा लागतो. ओंजळभर अनुभूती अन् पसाभर सहानुभूती सोबत घेऊन उत्तरांचा धांडोळा घ्यावा लागतो. सहकार्याचे हात शोधावे लागतात. काही शक्यता गृहीत धरून खेळावे लागतात एकेक खेळ. फेकावे लागतात आयुष्याच्या सारीपाटावर काही फासे. चालव्या लागतात ज्ञात-अज्ञात वाटांच्या चाली. साधावा लागतो संवाद, कधी स्नेह्यांशी, कधी स्वतःशी तर कधी सुखांशी. सुखाची परिमाणे अन् दुःखाचे परिणाम माहीत असतात त्यांना प्रवासाच्या परिभाषा समजून नाही सांगायला लागत. चालण्याचे अर्थ आकळतात त्यांना अडनिड वाटांची अन् वेड्यावाकड्या वळणांची क्षिती नसते. अंतरी आत्मविश्वास असला की, समस्यांचे अर्थ आपसूक कळतात.

संवाद आपणच आपल्याशी केलेला असो की समूहाशी, तो आशेचे कवडसे शोधणारा विकल्प असतो. माणसांचा सगळा प्रवासच आस्थेच्या कवडशांचा शोध आहे. आजचा दिवस वाईट होता, पण उद्या याहून अधिक काही चांगलं असेल, या आशेवरच तर सुरु असतो त्याचा प्रवास. अगदी आदिम अवस्थेपासून आतापर्यंत माणूस म्हणून जेकाही माणसांनी संपादित केलं आहे, ते या आशेच्या धाग्यांनी बांधलेल्या आस्थांच्या अनुबंधचा परिपाक आहे. अंतरी अनवरत नांदती असणारी आस्थाच त्याच्या आयुष्याचं ओंजळभर संचित असतं. 

समोर दिसणाऱ्या कवडशांचा माग काढत चालत राहिले की, सापडते पावलापुरती वाट. संवाद आपणच आपल्याशी केलेला असेल, आपल्यांशी साधलेला असेल अथवा अन्य सूत्रांच्या माळेत ओवलेला असेल. संवादाचा शब्द सोबतीला असला की, असणे शब्दाला आशय गवसतो. प्रश्नांपासून पलायनाचे पथ सुलभ अन् प्रशस्त वाटत असले, तरी त्यांच्यावर मान्यतेची मोहर नाही ठोकता येत. आस्थेची मुळे विस्तारता आली की, ओलावा सापडतो. त्यासाठी अंतरी ओंजळभर विश्वास अधिवास करून असावा लागतो. विश्वास, मग तो आपणच आपल्यावर केलेला असला काय अथवा व्यवस्थेवर असला काय किंवा आणखी कशावर, तो असला की, आयुष्यात किंतु अन् जगण्यात परंतु नाही राहत. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

आयुष्याचा परिघ समजून घेताना

By // No comments:
आसपास वसतीला असलेला अंधार प्रकाशाइतकंच प्रखर सत्य. पण उजेडाची आस अंतरी असणंही तसं स्वाभाविकच. वास्तव आणि कल्पितात अंतर असतं. ते ज्याला कळतं त्याला यश आणि अपयशाच्या व्याख्या पाठ नाही करायला लागत. वास्तवाचा विसर पडणं प्रतारणा असते आपणच आपल्या विचारांशी केलेली. खरं हेही आहे की, हे वास्तवच जगण्याची प्रेरणा असते. पायांचं नातं जमिनीशी अन् विचारांची सोयरिक आभाळाशी असली की, वास्तव विस्मरणात नाही जात.
 
आयुष्याचा विस्तार काही आपल्या हाती नसतो, पण त्याचा परीघ समजून घेणं शक्य असतं. त्याची लांबीरुंदी किती असावी हे आपल्या हाती नसलं, तरी कोण्या नजरेला अधोरेखित करता येईल एवढी खोली देता येणं संभव आहे. डोळ्यात स्वप्ने आणि नजरेत क्षितिजे सामावली की, आपल्या असण्याचे ज्ञातअज्ञात अर्थ उलगडू लागतात. धुक्याची चादर ओढून निवांत पहुडलेल्या क्षितिजावर चमकणाऱ्या आकांक्षांच्या नक्षत्रांकडे पाहत माणूस चालत असतो. ती खुडून आणायची आस अंतरी नांदती असते त्याच्या. तेथे पोहोचणाऱ्या वाटा शोध असतो, आपणच आपला घेतलेला. आपल्याला नव्याने समजून घेण्यासाठी वणवण असते ती. परीक्षा असते संयमाची. लपलेल्या असतात अनेक सुप्त कांक्षा तेथे. त्या वैयक्तिक असतील अथवा मनाच्या मखरात मंडित केलेल्या. कुठला तरी नाद अंतरी नांदत असतो. त्याची स्पंदने साद देत राहतात. तो संमोहित करीत राहतो. 

काळ काहींच्या आस्थेचा विषय असतो. काहींचा परिशीलनाचा तर काहींचा अभिनिवेशाचा. काहींना अस्मितेचे धागे गवसतात त्याच्या अफाट पसाऱ्यातून. काहींना माणूस नावाच्या अस्तित्वाचा अर्थ. कोणास आणखी काही. पण त्याची समीकरणे एवढी साधीही नसतात, जितका त्यास आपण समजतो. कधी त्याचा गुंता जटिल होत जातो. कधी उलगडत जातात एकेक पदर. त्याला शोधतांना लागतं काही हाती. तरीही बरंच काही निसटतं. लागलाच एखादा तुकडा हाती की, अनुमानांच्या पात्रातून वाहत राहतो तो. शोधू पाहतो कुणी त्यातून आपला उन्नत, उर्ज्वस्वल वगैरे वारसा. गवसलाच एखादा संदर्भ की, तर्काचे किनारे धरून वाहू लागतो त्याचा प्रवाह.
 
काहींना सापडतात त्यात आपले अहं. काहींना अवकाळी श्रेष्ठतेचा साक्षात्कार वगैरे होतो अन् पूर्वी कधीतरी प्राप्त केलेल्या प्रगतीचे पंख लावून अभिनिवेशांचा आसमंतात प्रवास सुरू होतो. अस्मिता वगैरे नावाच्या गोंडस झुली टाकून तो सजवला जातो. पडद्याआड पडलेला माणूस आणला जातो समोर. त्याच्या महात्म्याचे, कर्तृत्वाचे अध्याय अधोरेखित केले जातात. आवळले जातात एकेक सूर काळाच्या कोशात विसावलेल्या समृद्धीचे. प्रगतीच्या परिभाषा नव्याने पाहून घेतल्या जातात. कधीकाळी हे आपल्याकडे असल्याचे सांगताना अभिनिवेशाला अस्मितेच्या वर्तुळात स्थानापन्न केले जाते. परिशीलन बाजूला पडते अन् उरतो प्रसिद्धीपरायण उथळपणा. 

पाणी वाहता वाहता नितळ होत जाते. उताराचे हात धरून ते सरकत राहते पुढे. वळणांशी गुज करीत पळत राहते. वाहत्या पाण्याला नितळ असण्याचं वरदान आहे, पण प्रवास थांबला की, त्याचे डबके होते अन् डबक्याला कुजण्याचा अभिशाप. प्रवाहांना साचलेपण आले की, वाहण्याचे अर्थ हरवतात. साचलेपणात काहींना समृद्धीची सूत्रे सापडतात. ती त्यांची त्यांनीच तयार केलेली असतात बहुदा. सूत्रांचा संदर्भ सम्यक जगण्याच्या समीकरणांशी जुळवला जातो. काळाच्या कुशीत दडलेल्या यशाच्या व्याख्या नव्याने लेखांकित करून, आपणच निर्माण केलेल्या निकषांच्या निर्धारित चौकटीत अधिष्ठित केल्या जातात. वास्तव विस्मृतीच्या वाटेने वळते करून दुर्लक्षित केलं जातं. अभावाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करणारा माणूस मात्र जिथे होता तिथेच राहतो. 

काल जेथे तो उभा होता आजही तेथेच दिसतो. त्याचे आवाज नाही पोहचत व्यवस्थेच्या पोकळीत. चौकटींतून मुक्तीची प्रतीक्षा करीत साद देत उभा असलेला नाही दिसत तो. निनादणाऱ्या आवाजाचे अर्थ नाही आकळत. अभ्युदयार्थ आळवले जाणारे आवाज आतच कुठेतरी अडतात. अभाव आणि प्रभावाचा खेळ सुरूच असतो अनवरत, पण या दोघांमध्ये निभाव लागायचा असेल, तर नजरेला माणूस दिसायला हवा अन् संवेदनांना कळायला. पण खरं हेही आहे की, कुठला काळ असा होता की, आयुष्याचे अवघे अन्वयार्थ आकळले होते? अभाव होता, आताही आहेच, पुढेही तो असणारच आहे. सत्य हे आहे की, प्रभावाच्या परिभाषा बेगडी अभिनिवेशात बंदिस्त झाल्या की, वास्तव दुर्लक्षित होते. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

दिसतं तसं नसतं

By // No comments:
एखादा कोणी असाच का वागतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. गवताच्या गंजीत सुई शोधण्याचा प्रकार म्हणा हवं तर याला. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून काही गोष्टी कोणी काळाच्या ओटीत टाकून देतो. कुणी फारसे महत्त्व नाही देत अशा काही गोष्टींना. काहींना काहीच कर्तव्य नसते काही गोष्टींशी. पण काहींना कारण नसताना खोदकाम करायची सवय जडलेली असते. कुदळ हाती घेऊन तयारच असतात ते. कोण कोणत्याकाळी, कसा वागेल, याची हमी कोणाला देता येत नाही हेच खरे. हमी देण्याइतका माणूस कोणत्या काळी नितळ होता? सांगणं अवघड आहे. काळाला हा प्रश्न विचारला, तर कदाचित त्यालाही हे काडीमात्र सांगता नाही येणार. 

माणूस म्हणून माणसांच्या प्रगतीचा माणसांना कितीही अभिमान असूद्या, पण त्याच्या वर्तनातील वैगुण्यांचंही सम्यक भान असणं आवश्यक नाही का? कुठल्याही गोष्टीला समजून घेताना समोर न दिसणाऱ्या देखणेपणाचं कौतुक अवश्य व्हावं, पण पलीकडील बाजूला असणाऱ्या पैलूंचाही विचार करता यायला हवा. पलीकडच्या बाजूचा विचार केला की, उजेडाच्या झगमगाटात अंधार दुर्लक्षित नाही होत. 

अर्थात, अशा वागण्यातून त्यांच्या हाती काय लागते, त्यांनाच माहीत. पण दिसलं कुठे थोडं काही न्यून की, कर आणखी गाजावाजा, असा स्वभावच असतो काहींचा. हे चूक की बरोबर, याच्याशी काही एक देणे-घेणे नसते त्यांना. छिद्रान्वेषीवृत्ती वगैरे म्हणतातना तो प्रकार असतो काहींच्या जगण्यात विसावलेला. त्यांना आसपास अंधारच वसती करून असलेला दिसतो. कवडशांच्या व्याख्या त्यांना कितीही आणि कशाही शिकवल्या, तरी उमेद शब्दाला असणारे अर्थ नाही सापडत त्यांना. सगळे कोश त्यांच्यासमोर शून्य असतात. माणूस आपल्याच कोशात शिरला की, सगळ्या कोशांची प्रयोजने संपतात अन् मागे उरतो केवळ गुंता. 

कवडशांकडे लक्ष असण्याऐवजी आसपास असणारा अंधारच बघायची अंतरी आस असली की, उजेडाचे अर्थ हरवतात. एकदा का ही मानसिकता विचारांचा भाग बनली की, विस्तीर्ण आभाळाच्या निळाईतही व्यंग दिसतं, अथांग सागरातही न्यून सापडतं, झुळझुळ वाहत्या पाण्याचा नादही कर्कश वाटतो, वाऱ्याचा आल्हाददायक गारवाही झोंबतो अन् पक्षांचा गाता गळाही कुरूप वाटतो. एखाद्याला नकाराचं लेबल लावायचं ठरवलं की, किमतीचे टॅग क्षुल्लक वाटायला लागतात हेच खरं. अशा संकुचित मानसिकतेने वागणाऱ्यांच्या हाती कुठल्या आंतरिक समाधानाचे स्रोत लागतात, त्यांनाच ठाऊक. 

कुणाच्या वागण्याच्या पद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे आकळतोच असं नाही. खरंतर माणूस दिसतो तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि असायलाच हवा, असंही नसतं काही. तो माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, असं काही नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित असू शकतं. 

काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला गजबटाला टाळून. एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. मत प्रदर्शित करायला फार कष्ट घ्यायची आवश्यकता नसते, पण माणूस समजून घायला पर्याप्त वेळ द्यावा लागतो. कारण असणं अन् दिसणं यात अंतराय असतं, नाही का.

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या कक्षेत तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं,  हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का? 
- चंद्रकांत चव्हाण
••

चेहरा

By // No comments:
माणसांना स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. साधेपणाने जगण्यात सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून, मुखवटे परिधान करीत कोणत्यातरी मोजपट्टीवर स्वतःला का सिद्ध करू पाहत असतील? सांगणं अवघड असलं, तरी असंभव नाही. माणसांच्या असण्यातच त्याचं उत्तर आहे असं म्हणणं वावगं ठरू नये. मुळात कोणत्यातरी निकषांवर आपली उंची नजरेत भरण्याइतकी ठसठशीत असावी अशी आस जवळपास प्रत्येकाच्या अंतरी सुप्तावस्थेत का असेना, पण अधिवास करून असते. आहोत त्यापेक्षा अधिक काही आहे आपल्याकडे, हे दाखवणं आनंददायी असतं आणि वाटणं सुखावणारं असतं म्हणून असेल तसे.

समाज नावाच्या व्यवस्थेत प्रत्येकाच्या हातात आपली एक मोजपट्टी असते. त्या वापरून समोरच्याला मोजण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून त्यांच्याकडील पट्ट्यांच्या लांबीची, उंचीची चिंता का करावी? त्यांच्या पट्ट्यांची मापं आपल्याला लावून घेण्यात कुठलं शहाणपण आहे? आपली असलेली, नसलेली उंची वाढवण्यासाठी माणसं नको तितकी धडपडत राहतात. हेलपाटतात. स्वतःला सिद्ध करण्यासाठी कवायत करत राहतात. मुखवटे हाती घेऊन उभे राहतात. या धडपडीचा शेवट काय असेल, याचा विचार न करता का चालत राहतात?

माणसांच्या अंतरंगाचा ठाव नाही घेता आला अद्यापतरी कुणाला. कुणी कितीही कोपरे कोरले तरी काकणभर उरतोच तो. माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी, मानसशास्त्रज्ञांनी केला. तो सफल की असफल हा भाग नंतरचा, पण विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या हाती यातून कोणत्या गोष्टी लागल्या असतील, त्या असोत. हा मतमतांतरांचा विषय आहे. माणसांना जगण्यासाठी नेमकं काय हवं असतं? मूलभूत गरजांची पूर्ती झाली की, त्यात संतुष्ट असायला काय हरकत असावी? काहीच नाही. पण समाधानही नाही. तेच नसेल तर आणखी नवे काही घडण्याची शक्यताच मावळते. 

समर्पणशील जगण्यात जीवनाचं सौंदर्य सामावलेलं असतं. त्यागात कृती असते, तर नीतिविसंगत भोगात विकृती. निरामय विचारांनी वर्तणारा माणूस जगण्याचा देखणा चेहरा असल्याचे सांगून-सांगून जगभरातील संतमहंत थकले. तरीही माणसांच्या मनातील विकार काही निरोप घेत नाहीत. जग अनेक विसंगतींनी खच्चून भरले आहे. कलहांनी फाटले आहे. याची कारणे काय असावीत? 

‘स्वार्थ’ या एका शब्दात याचं उत्तर सामावलेलं असल्याचं अनेक मुखातून ऐकू येतं. स्वार्थ सोडून जगणं काही असंभव नाही आणि फार अवघड आहे असंही नाही. पण तरीही सगळ्यांना असं असणं का जमत नसेल? मोहत्याग महत्त्वाचा कसा, याचं मंडन माणसे करीत राहतात. मोहमय आयुष्य अप्रस्तुत असल्याचं सांगतात. काही मोहापासून विलग राहण्यातले फायदे मांडत राहतात. मोहाच्या मायाजालातून मुक्त होता येतं, त्यांना माणूस असण्याचे अर्थ अवगत असल्याचे माहितीपूर्ण विवेचन करतात. आपली परंपरा भोगात नसून त्यागात असल्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होतात. हे सगळं अवास्तव वगैरे नसलं, तरी त्यांना माणूसपण खरंच आकळलेलं असतं का? 

माणूस नावाची व्याख्या तयार करून त्या साच्यात सगळ्यांना सामावून बसवण्याचा प्रयत्न करतात, त्यांना माणूस खरंच कळलेला असतो का? जी मुखे मोक्षाची महती मोठ्या हिरहिरीने मांडतात, तेच मुखवट्यांच्या मोहात का पडत असतील? आसक्ती वगैरे याचं उत्तर असेल तर त्यात तरी संदेह का असावा? अर्थात स्वार्थाची परिभाषाही परिस्थितीजन्य आणि परिस्थितीसापेक्ष असते. तिची सुनिश्चित परिमाणे नसतात, पण परिणाम असू शकतात. 

काही माणसं जगण्यातलं साधेपण आपल्यात सहज सामावून घेत असतात. नाकासमोर चालत राहतात. बिकट वाट वहिवाट नसावी म्हणून कटाक्षाने काळजी घेतात. कष्टाच्या भाजीभाकरीत त्यांना आयुष्याचे अर्थ सापडतात. काही तूपसाखरेच्या गोडीसाठी विसंगत मार्गाने चालताना क्षणभरही विचलित होत नाहीत अन् विचार करत नाहीत. सगळ्या चौकटी फाट्यावर मारतात. मर्यादांचे बांध ध्वस्त करतात त्यांच्या आणि संकेताना जगणं अन् परंपरांना प्रमाण मानणारी माणसे यांना मोजण्याची परिमाणे सारखी कशी असतील? माणूस मोजण्याची सूत्रे सारखी नसली, तरी माणुसकी समजण्याची समीकरणे सामायिक असू शकतात. अर्थात, कोणी कोणत्या वाटेने निघावे, हा ज्याच्या-त्याच्या पसंतीचा पर्याय असतो. ती निवड वैयक्तिक असते, समाजमान्यतेची मोहर नसते, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण 
••