Jibhau | जिभाऊ

By // 4 comments:

डोक्यावर अस्ताव्यस्त विखुरलेले केस वाऱ्याच्या संगतीने नाचत राहायचे. बहरात आलेल्या पिकात वारा शिरून सळसळ होतांना हालचाल व्हावी, तसे डौलात डोलत राहायचे. त्यांच्या स्वैर विहाराला मर्यादांचे बांध क्वचितच घातले जात. कोणत्यातरी कार्यक्रमाच्या निमित्ताने डोक्यावर टोपी विसावलेली असायची, तेव्हाच हे घडायचे. अन्यथा स्वतःला बंदिस्त करून वावरण्याचे प्रसंग त्यांच्या वाट्याला फार कमीच. कारण टोपी प्रासंगिक निमित्तालाच परिधान करायची, हा जिभाऊचा स्वतःपुरता अलिखित नियम. टोपी नसायची तेव्हा डोक्यावर बागायतदार रुमालाचे मुंडासे गुंडाळलेले. डोक्याभोवती रुमालाने वेढलेल्या वेटोळ्यातून लहान लेकरासारखे उत्सुकतेने वाकून बघणारे केस वाऱ्यासोबत हितगुज करीत मजेत डुलत राहायचे. विखुरलेल्या केशसंभारातील बहुतेकांनी रुपेरी रंग धारण केलेला. काळेपण जपून असणारे काही केस कोणाचं तरी आपल्याकडे लक्ष वेधून घेणाऱ्या लावण्यवतीसारखे उगीचच मिरवत राहायचे, आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असल्यासारखे. डोक्यावर टोपी असली की, गोरे काय अन् काळे काय, सारेच गुण्यागोविंदाने एका छत्रात विसावलेले. माथ्यावर पुढच्या जागा धरून बसलेल्या केसांचा रंग ना काळा, ना पांढरा. कपाळी चढवलेल्या अष्टगंधाच्या केशरीपिवळ्या छटांनी सदानकदा सजलेले. टोपीच्या पुढच्या टोकालाही याचा संसर्ग झालेला. कपाळावर शक्य असेल तितक्या वाढवत नेलेल्या टिळ्याने चेहऱ्यावर भक्तीची डूब साचलेली. ओठांवर कोरलेल्या पिळदार मिशा, त्यांना तोलून धरणारा लांबसर चेहरा. त्यावर विसावलेले किंचित धारदार नाक. डोळे भव्यदिव्य स्वप्ने पाहण्यासाठी असतात याची जाणीवच नसलेले, दिसेल ते आणि तेवढेच पाहण्याचे काम करीत आसपासच्या खाणाखुणा शोधत राहणारे.

या सगळ्या ऐवजाला सांभाळणारी सुमार उंचीची आणि मध्यम चणीची आकृती. कुणाचंही लक्ष आपल्याकडे चटकन वेधून घ्यावं, असं काहीही नसलेला एक देह. या सगळ्या संभाराला सावरण्यासाठी पांढरा सदरा येऊन अंगावर स्थानापन्न झालेला. कधी कळकटपणा धारण करून मरगळलेला, तर कधी शुभ्रतेची झाक घेऊन उगीच तोऱ्यात चमकणारा. परिधान केलेल्या पेहरावाने पारंपरिक अस्तित्वाच्या साऱ्या खाणाखुणा जाणीवपूर्वक जपलेल्या. निळीच्या सततच्या वापराने त्यावर निळसरपणाची झाक चढलेली. ह्या साऱ्या जामानिम्यासह ‘बारकू जिभाऊ’ नावाची ओळख गावात मिरवत राहायची, अनेकातली एक बनून.

व्यक्तित्वाला कोणतेही लक्षणीय वलय नसलेला; पण जगण्यालाच अनामिक वर्तुळात घेऊन नांदणारा. कोणी भरभरून स्तुती करावी, असे काहीही जगणे आणि जगण्यात नसलेला. कोणतेही नैसर्गिक भांडवल सोबत न देता नियतीने इहलोकी पाठवलेला हा देह गावराहटीत आपले ओंजळभर वेगळेपण अधोरेखित करीत राहिला. आयुष्य म्हणून नियतीने पदरी दिलेले पंचावन्न-साठ वर्षे सोबत घेऊन गावात आनंदाने नांदला. मनीमानसी नसतांना निसर्गनियमांचे बोट धरून अंतर्धान पावला. देह मातीचा होता, मातीत जाऊन विसावला. त्याच्या पार्थिव अस्तित्वाला विसर्जित करून काळ आठ-दहा वर्षे पुढे निघून आला, अनेक नव्या आशयांना आणि घटितांना घटनांच्या क्रमात बद्ध करून.

माणसं इहलोकी येतात आणि जातात. काहींच्या येण्याने आनंदाची अभिधाने अधोरेखित होतात. काहींच्या जाण्याने दुःखाचे कढ मनातून उमटत राहतात, काहींचे जाणे सय बनून समाजाच्या स्मृतिकोशात नांदते. काहींची काळही दखल घेत नाही. मात्र, कोणतेही अपूर्व योगदान नसतांना काहींना गाव, गावातील माणसे आठवत राहतात. अशी माणसे संख्येने कमी असली, तरी अपवाद वगैरे नसतात. ती असतात, हे नाकारता येत नाही. स्वतःचा पसाभर परीघ सोबत घेऊन गावपांढरीतील प्रघातनीतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत राहणारं ‘बारकू जिभाऊ’ नाव गावाच्या आठवणीत कोरले गेले आहे. माणसांच्या मनात गोंदण करून वसतीला राहिले आहे. रोज त्याची आवर्जून आठवण करावी असे काही अपूर्व वगैरे योगदान नसलेला. तरीही प्रासंगिक का असेना, पण वर्षातून किमान एकदा तरी हा आठवला जातोच जातो.

कोणतीही आर्थिक उंची जिभाऊला आयुष्यात कधी गाठता आली नाही; पण त्याने लोकांच्या मनात आपला ओंजळभर आशियाना बांधला, हीच याने मिळवलेली श्रीमंती. आठवणी माणसे गेल्यावरही सोबत करतात, सावलीसारख्या मागेमागे येत राहतात. मांजराच्या दबक्या पावलांनी चालत राहतात. जोपर्यंत गावातील जत्रा आणि त्यानिमित्ताने होणाऱ्या तमाशाचे आयोजन होत राहील, तोपर्यंत प्रत्येकवर्षी जिभाऊ लोकांना भेटत राहील. माणसेही त्याच्या उल्लेखाने क्षणभर सद्गतीत होत राहतील. त्याच्या झोकून देऊन काम करण्याला आठवत राहतील. आठवणींचा कोलाज कोरत राहतील, आसपासच्या प्रतलावर. अंतरी अधिवास करून असणाऱ्या स्मृतींच्या सरी वळीव बनून बरसत राहतील, मनाच्या आसमंतातून.

उन्हाच्या झळा झेलीत अख्खा गाव आकाशाकडे डोळे लावून बसलेला असायचा. ग्रीष्माची काहिली अंगावरून घामाच्या धारा बनून निथळत रहायची. सगळा शिवार उन्हाच्या तप्त झळांनी हेलपाटून निघालेला. वाऱ्याच्या एका शीतल झुळूकसाठी आसुसलेला. दुपारचे प्रखर ऊन टाळून सकाळीच शिवाराला जाग यायची. माणसांच्या गलबल्याने रुक्ष वातावरणात चैतन्याची क्षीण लहर दाटून यायची. सूर्य धिम्या पावलांनी माथ्यावर चढत जातो. त्याची दाहकता क्षणाक्षणाने तीव्र होत जाते. औताला जोडलेले बैल आणि त्यांना हाकणारे माणसे अस्वस्थ होऊ लागतात. घटकाभर विसाव्यासाठी सावलीच्या सोबतीला निघतात.

शेताच्या बांधावर आपल्याच तोऱ्यात उभ्या असणाऱ्या आंब्याच्या, निंबाच्या आश्रयाला थकलेले देह येऊन विसावतात. कारण नसतांना हेलपाटे घालणारे कुत्रे आपल्या धन्याची सोबत करीत सावलीला येऊन थांबते आणि लहाकत राहते, जीभ बाहेर काढून. आसपासच्या शेतात काम करणारी माणसे एकेक करून जमू लागतात. कुणी खिशातून तंबाखू-चुन्याची डबी काढतो, कोणी बिड्यांचे बंडल. त्यांची आपापसात देवाण-घेवाण घडत राहते. पेटवलेल्या बिड्यांचा धूर आणि उग्र दर्प हवेत गिरक्या घेत पसरत राहतो. तंबाखूच्या पिचकाऱ्यांचे रंग जमिनीचा तुकडा रंगवत राहतात. एकमेकांशी संवाद साधत पाणीपावसाचे आडाखे ताडले जातात. गप्पांना रंग भरू लागतो. तापलेल्या वातावरणात संवादाच्या शब्दांनी गारवा भरू लागतो.

शेजारच्या शेतात काम करणारा बारकू जिभाऊ औत थांबवतो. त्रस्त करणाऱ्या उन्हाला झोकदार शिव्या हासडत झाडाखाली येऊन विसावतो. बंडीच्या खिशातून बिड्यांचे बंडल काढून सवंगड्यांना एकेक बिडी देतो. स्वतः एक घेतो. तिच्यावर गुंडाळलेला दोरा वेगळा करून आगपेटीवर उगीचच टकटक करून निरखून पाहतो. वाऱ्याने काडी विझू नये म्हणून हाताच्या पंज्याचा आडोसा करून पेटवायचा. कधीकधी प्रयत्न करूनही काडी विझली की, वाऱ्याच्या माहीत नसलेल्या कुलाचा आठवतील तेवढ्या शब्दांत उद्धार करीत असे. बिडीचा प्रछन्न झुरका ओढून धूर बेफिकीरपणे सोडून देतो. त्याच्या लयदार लाटा आसमंतात झेपावतात. वेडीवाकडी वळणे घेत विरळ होत जातात. तल्लफ पूर्ण झाल्यावर आंतरिक समाधानाची झाक त्याच्या चेहऱ्यावर लांबच लांब पसरत जाते.

एकेक करीत गोष्टींचे धागे विणले जातात, त्यांचे गोफ होऊ लागतात. सुख-दुःख, सोयरे-धायरे, पाणी-पाऊस अशा एकेक ठिकाणांना वळसे घालीत विषय गावाच्या जत्रेवर येऊन विसावतो. जत्रा शब्दाने जिभाऊच्या निस्तेज डोळ्यात क्षणभर असंख्य चांदण्या चमकायला लागतात. आश्वस्त करणारे आनंदक्षण चेहऱ्यावर फेर धरून विहरायला लागतात. दरम्यान बिडी-काडीचा आणखी एक फेर फिरलेला असतो. यावर्षी गावाची जत्रा कशी व्हावी, कोणी कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, येथपासून जत्रा कशी दणक्यात झाली पाहिजे याच्या प्रारंभिक योजना आखल्या जात. झाडाखाली बसून बराच वेळ झाल्याने आणि काम अंगावरचं असल्याने कुणीतरी उठून उभा राहतो. वावरात काम पडलेलं त्याला स्वस्थ बसू देत नाही. पुन्हा औताकडे पाय वळतात. संध्याकाळी पारावर नाहीतर तात्यांच्या घराच्या ओसरीवर एकत्र येण्याचं सांगत माणसे पांगतात आपापल्या कामाकडे.

स्वैर विहार करणारे चुकार ढग आकाशात भटकत राहतात उगीचच. भटकंतीत सोबतीला येऊन मिळालेले आणखी काही ढग हातात हात घालून इकडे-तिकडे पळत राहतात. त्यांच्या रुपेरी काठांना काळ्या किनारी वेढू लागतात. क्षितिजावरून गार वारा पावसाचा सांगावा घेऊन अंगणी येतो. आकाशात ढगांची दाटी होऊ लागते. गडगडाटासह त्यांचा पाठशिवणीचा खेळ रंगू लागतो. लख्खकन चमकून वीज त्यांच्यामधून वाट काढत पळत राहते, घाई झाल्यासारखी. वारा वांड वासरासारखा उधळत राहतो. त्याच्यासोबत जमिनीवरील कचरा गिरक्या घेत नाचत राहतो. वाऱ्यासोबत उडणाऱ्या मातीने क्षितिजावर धुळीचा पडदा धरला जातो. पाण्याच्या थेंबांचे आगमन होते. ते टपोरे होऊ लागतात. धारा बनून धरतीच्या कुशीत शिरू लागतात. सरीवर सरी बरसू लागतात. सारा शिवार सचैल स्नान करून निथळत राहतो. दोन-तीन दिवसाच्या पावसाने भिजून चिंब होतो. शेतातल्या कष्टात झिरपत राहतो. डोंगराच्या कडेकपारीतून पाझरत पळत राहतो. जागा मिळेल तेथे साचत जातो.

मरगळलेल्या मनाला आणि शिवाराला चैतन्याचे अंकुर फुटू लागतात. शिवारभर एकच धांदल उडते. शिवाराला जाग येते. सुख संवेदनांचे सूर सजू लागतात. माणसे झटून कामाला लागतात. काळ्या मातीच्या कुशीत आकांक्षांची बिजे पेरून डोळे भविष्याची हिरवी स्वप्ने पाहू लागतात. शिवाराचा नूर पालटतो. त्याचा हरवलेला सूर परत एकदा लागतो. त्यासोबत माणसे ताल धरू लागतात. सुखाच्या गंधगार संवेदनांनी सगळे हरकून जातात. वेगवेगळे विभ्रम दाखवत पाऊस बरसत राहतो, असाच आणखी काही दिवस. शिवारभर मुक्तपणे नाचत राहतो. त्याचे तरंग माणसांच्या मनात आस्थेची वलये निर्माण करीत राहतात. सुखाचे ठसे मनावर उमटू लागतात. सारीकडे आबादानीची आश्वस्त अभिवचने दिसू लागतात. दिसामासाचा हात धरून उन्हापावसाचा खेळ खेळीत गावात श्रावण अवतीर्ण होतो.

श्रावणातल्या सणवारांना, व्रतवैकल्यांना उधान आलेले. नदीच्या भरलेल्या पात्राने डौलदार लय पकडलेली असते. माणसांची मनेही आनंदाने तुडुंब भरून दोन्ही तीर धरून वाहत राहतात. आशेचे अंकुरलेले कोंब पुढील काळातील जगणं सुसह्य करीत राहतात. हिरवाईने नटून परिसर नव्या नवरीसारखा मुरडत राहतो. आपल्याच देखण्या छबीच्या प्रेमात पडलेला परिसर आरस्पानी सौंदर्याने नटू लागतो. नुकतेच यौवनात पदार्पण केलेल्या षोडशेप्रमाणे आपलीच प्रतिमा हरकून पाहत राहतो. आनंदाच्या लाटांवर स्वैर विहार करीत भिरभिरणाऱ्या परिसराला मरीमातेच्या जत्रेचे वेध लागतात. सगळीच लगीनघाई उडते. तिच्या कोपापासून सुरक्षित राहावे, म्हणून गावातील आस्थेवाईक माणसे साकडे घालीत राहतात. आपल्यावर तिची अनुकंपा राहावी, म्हणून कोणकोणते नवस बोललेले जातात. जत्रेचे प्रयोजन साधून ओंजळभर आनंद शोधला जातो.

श्रावण महिना बऱ्यापैकी निवांतपण घेऊन गावात आलेला, सोबत समृद्धीचे आश्वस्त अभिवचनही. या महिन्यात येणारे सगळेच मंगळवार गावात परंपरेची पायवाट धरून बंदीचे धागे बांधून आलेले. श्रावणातल्या कुठल्याही मंगळवारी कुणीही शेतात कामाला जायचे नाही, हा गावात पडलेला परंपरेचा प्रघात. कधीपासून माहीत नाही, पण खूपवर्षे झाल्याचे जाणते सांगतात. कुणीतरी करून ठेवलेला अलिखित नियम. ही सार्वजनिक सुटी परंपरेने साऱ्यांच्या वाट्याला दिलेली. धावत्या धबडग्यातून काही अवधीसाठी सुटका म्हणून सोयीची. कुणी परंपरेला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला, तर प्रघातनीतीच्या पात्रातून वाहणाऱ्या प्रवाहांना बदलण्याचा घाट घातला, म्हणून गावाकडून दंड ठरलेला. म्हणून तसं धाडस कुणी गावात केल्याचे स्मरत नाही. अर्थात, केलं म्हणून काही बिघडेल आणि नाही केलं म्हणून काही घडेल असंही नाही.

गावासाठी, गावातल्या माणसांसाठी, लेकी-सुना-बाळांसाठी आनंदाचं कोंदण घेऊन जत्रा प्रत्येकवर्षी नियमाने येत राहिली आहे. सासरी नांदत्या लेकी यानिमित्ताने दोन दिवस माहेरी येवून विसावतात. मायेच्या माणसात रमतात. आपलेपणाची ऊर्जा घेऊन परत नांदत्या घरी निघून जातात. पै-पाहुण्यांना आग्रहाची निमंत्रणे पाठवली जातात. कधीकाळी बैलगाडीने गावी येणारे पाहुणे-रावळे आज गावात मोटारगाडीने येतात. प्रासंगिक का असेनात, पण नात्यांचे रेशीम गोफ विणले जातात. त्यांची वीण घट्ट होत राहते. त्यांना गहिरे रंग चढत जातात. पाहुणचाराला उधान आलेले सगळीकडे सरबराई सुरु. गावातला गल्ली, कोपरा थट्टा-मस्करी, रामराम, आगत-स्वागताने फुलून आलेला. प्रत्येकजण सोयाऱ्याच्या सरबराईत रमलेला.

जत्रेच्या निमित्ताने गावातले कर्ते आणि कार्यकर्त्यांचे हात राबताना आणि पाऊले पळताना गल्ल्या कौतुकाने पहात राहतात. या सगळ्या गोंधळात कोणाची अधिक धावपळ नजरेत भरत असेल, तर ती बारकू जिभाऊची. कारभाऱ्याच्या कर्त्या नजरेच्या सूचनांच्या अधिपत्याखाली चोख कामगिरी पार पाडणारा जिभाऊ गावाला न सुटलेलं कोडं. याच्यात एवढी ऊर्जा येते कोठून, या प्रश्नाचं उत्तर माणसे त्याच्या वावरण्यातून शोधत राहायची; पण ते शेवटपर्यंत कोणाला मिळाले नाही. जत्रा एक दिवसाची; पण हा महिना-दोनमहिने आधीच कामाला लागलेला. खरंतर महिना-दोनमहिने म्हणणे सीमित अर्थाने अप्रस्तुतच, कारण यावर्षाची जत्रा पार पडली की, पुढच्या जत्रेच्या नियोजनाचे कच्चे आराखडे याच्या मनात तयार असत. राहिलेल्या उणिवांच्या निराकरणासाठी काही आडाखे आखले जात असत.

आकाशातून बरसणाऱ्या जलधारांच्या साक्षीने वाफाळलेल्या चहाचे घोट घेत, विड्या-तंबाखूची देवाणघेवाण करत जत्रेच्याआधीचे काही दिवस ही मंडळी नियोजनात तासनतास घालवत असत. रात्री उशिरापर्यंत कधी अण्णांच्या, कधी अप्पांच्या, कधी कोणाच्या, कधी कोणाच्या घरी जत्रेच्या नेटक्या नियोजनासाठी मतमतांतरे आणि चर्चेच्या फेऱ्या पार पडत राहायच्या, पुढील काही दिवस. चर्चेतल्या सूचनांचा, अपेक्षांचा आकृतिबंध तयार व्हायचा. गावातील उत्साही मंडळीच्या खांद्यावर काही जबाबदाऱ्या विभागून दिल्या जायच्या.

नियोजनकर्त्या या दहा-बारा माणसांनी औपचारिक शिक्षण संपादित करून कोणतीही पदवी कधी प्राप्त केली नाही आणि त्यांना त्याची तशी आवश्यकताही नाही वाटली कधी. शाळा नावाचा अध्याय यांच्या जीवनग्रंथात काही पाने पुढे सरकून साकोळला आणि कायमचा संपला. शाळेशिवाय यांचं कोणाचं कधी काही अडलं नाही. अनुभवाच्या असीम, अमर्याद आकाशाच्या छत्राखाली जे काही शिकायला मिळालं, ते आणि तेवढं संचित घेऊन ही माणसे आपापल्यापुरती यशाची परिभाषा अधोरेखित करीत राहिली. व्यवस्थापनशास्त्राची पदवी घेतलेल्यांनी यांच्याकडून सामूहिक कार्यक्रमांचे नेटके आयोजन म्हणजे काय, इव्हेंट कशाला म्हणतात, याचं प्रशिक्षण घ्यावं असं काटेकोर नियोजन असायचं.

नियोजनाच्या चर्चेतील गाभाविषय असायचा, कोणी किती वर्गणी द्यायची. गावातल्या माणसांचा जीवनपट उघड्या पुस्तकाच्या पानांसारखा असल्याने त्यातील ओळ न ओळ साऱ्यांना अवगत असायच्या. प्रत्येकाच्या वकुबाप्रमाणे वर्गणीचे वितरण व्हायचे. कर्त्याना अधिकचा भार दिला जायचा. सामान्य म्हणून जगणाराही पायली दोनपायली धान्याच्या रूपाने वर्गणी देऊन जत्रेत माझेही योगदान असल्याचं अभिमानाने सांगायचा. कोणी रोख रक्कम दिली नाही, म्हणून काही अडत नसायचं. बदल्यात असेल ते धान्य दिले जायचे आणि स्वीकारलेही जायचे. अर्थात, या सगळ्या कामाचं नियोजन जिभाऊशिवाय उत्तम कोण करेल?

दहा-पंधरा दिवस आधीच सकाळ संध्याकाळ हा आपल्या सैनिकांसह एखाद्या मोहिमेवर निघाल्याच्या थाटात हातात रिकामी पोटी घेऊन कुठल्यातरी दारासमोर हजर व्हायचा. “चला बापू, काढा बरं मरीमाय ना जत्रानी वर्गणी!” असे म्हणीत घराच्या ओसरीवर विसावयाचा.

आता घाईत आहे, नंतर ये म्हणून कुणी सांगितले की, याचं ठरलेलं असायचं घरातील मालकिणीलाच सांगायचं म्हणजे फार फेरे पडत नाहीत. अशावेळी शब्दांत शक्य तेवढे मार्दव आणीत हा म्हणायचा, “काय आक्का, कवयबी तं वर्गनी देनी शे, मग आत्तेच दी टाका नं! कालदिन दिधी म्हणून तुमना वाटा थोडीच कमी होवाव शे आणि आज नही दिधी, म्हनीसन कनगीमा जिवारी वाढी जावाव शे का?”

त्याच्या चिकाटीने घरातील धान्याच्या पोत्यातून दोनचार पायल्या, जे काही असेल तेवढे धान्य मोकळं व्हायचं. तेवढ्याने याचे समाधान नाहीच झाले की, समोरच्याच्या मगदुराप्रमाणे त्यालाच सांगायचा, “काय आबा, देवनी तुमले इतलं देयेल शे! देशात थोडं आणखी ज्यास्ती तं काय कमी हुई जावाव शे का? जितलं देशात तितलं लेशात. माय दखी राह्यनी. ती दिन तुमले कनग्या भरीसन.”

असे काय काय सांगत जिभेवर साखर घेऊन संवाद करीत राहायचा. अधिक काही मिळवत राहायचा. पोतं भरलं की सोबत असणाऱ्या पोरांना अण्णा, बापूंकडे जेथे कोठे ते जमा करीत असतील, तेथे टाकून परत यायला सांगायचा.

पुढच्या घरी गेला की याचं वाक्य ठरलेलं असायचं, “दखा आण्णा, त्या दादास्नी इतलं दिधं. तुम्ही काय त्यासनाथाई कमी शेतस का? मागला वरीसले तुमीन माले कटाई दिनथं, तवय मी तुमनं आईकी लिधं. या सालले आजिबात आईकाव नही. जे देशात ते भरभरीसन द्या. गावनं काम शे, मग आपीनच असा कामले कसाले मागे राहो.”

त्याच्या उपदेश वजा विनंतीचा अपेक्षित परिणाम व्हायचा. शेजारी-शेजारी असणाऱ्या दोन घरातील सुप्त स्पर्धा याच्या पथ्यावर पडायची. मनासारखे दान पदरी पडले की हा म्हणायचा, “आण्णा, या वरीसले जत्रा कशी दनकीसन पार पाडतस दखा तुम्ही.”

सगळ्यांना आश्वासित करीत, शक्य तितकी जास्त वर्गणी काढीत घर अन् घर भटकत राहायचा. वर्गणी जमा करून घेण्यासाठी गावात भटकंती करतांना कंटाळला की, एखाद्या घरी हक्काने चहा मागून घ्यायचा. दमला म्हणून सांगत ओसरीवर बसायचा आणि म्हणायचा, “गावना कामले थकीसन कसं चालीन!” आणि पुन्हा नव्या उत्साहाने उभा राहायचा.

गावात बरेच जण यथातथा आर्थिक परिस्थिती असणारे. म्हणून वर्गणी रोखीने कमी आणि धान्याच्या रुपातच अधिक मिळायची. जमा झालेलं धान्य बाजारात विक्रीसाठी दोनतीन माणसे घेऊन जायची. त्याच्या विक्रीतून येणारा पैसा सायंकाळी गावाच्या कारभाऱ्याच्या स्वाधीन व्हायचा. हे सगळे सोपस्कार पार पाडताना यांनी कधी पै-पैशाची अपेक्षा केली नाही. प्रसंगी स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करून ही माणसे काम चोखपणे पूर्ण करून आलेली असत. पोटात भूक दाटून आलेली असली, तरी या पैशातून छदामही घेत नसत. कुठून आलं असेल या माणसात एवढं प्रामाणिकपण? गावाप्रती असणारी निष्ठा कारण असेल की, ग्रामदेवतेच्या आस्थेपोटी हे सगळं घडत असेल?

जत्रेसाठी आकर्षण अर्थातच तमाशा असायचा. यावर्षी कोणता तमाशा आणायचा यावर बरेच दिवस खल उडत राहायचा. चर्चेच्या फेऱ्या झडत राहायच्या. जमा पैशाचा आणि बिदागीचा मेळ घातला जायचा. बेणं देण्यासाठी ही पाचसहा माणसे शहराकडे निघायची. तेथे तमाशाच्या मालकाशी बिदागीवरून काय काय बार्गेनिंग होत राहायचे. तास-दोनतास हा हो-नाहीचा खेळ सुरु असायचा. मध्येच कोणीतरी बैठकीतून उठायचा आणि शेजारच्याला खाणाखुणा करून बोलावून घेतले जायचे. कानात काहीतरी कुजबूज व्हायची. तमाशाच्या मालकाला बैठकीतून बाजूला घेऊन इमोशनल केलं जायचं. नाही, हो करता करता बिदागी हाती कोंबून तारीख नक्की केली जायची.

साऱ्यांचे चेहरे प्रसन्नतेचा परिमल सोबत घेऊन सायंकाळी गावात परतायचे. फाट्यापासून दोनतीन किलोमीटर पायी चालत येणाऱ्या पावलांना पाहण्याची गावाला उत्सुकता लागलेली असायची. गावाच्या पारावर पोरासोरांची गर्दी वाढत राहायची. बिदागी देऊन परतलेल्यांच्या चेहऱ्यांवरून अनुमान काढले जायचे. ही माणसे सगळा शीण विसरून पारावर गप्पा करीत बसलेल्या जाणत्यासोबत बैठक घालून बसायची. दिवसभराचा सारा अहवाल वाचून विश्लेषण केले जायचे. तमाशा कसा कमी पैशात आणला म्हणून सांगतांना यांचा उर अभिमानाने भरून यायचा. एकेक गोष्टी पोतडीतून निघत राहायच्या. तमाशा कोणाचा, कोणता हे जाहीर केलं जायचं. जाणत्यांपेक्षा पोरांनाच याचा अधिक आनंद असायचा.

कॅलेंडरच्या चौकटी ओलांडत ठरलेला मंगळवार यायचा, तो जत्रेचा सांगावा घेऊनच. जत्रेच्या निमित्ताने गावात उत्साहाला उधान यायचं. कुठून कुठून माणसे येऊन गावात जमायची. कुणी भांडीवाले, कुणी खेळणी विकणारे, कुणी पाळणेवाले आपापल्या मोक्याच्या जागा धरून बसायचे. कुणी शेव-जिलेबी तयार करण्यासाठी भट्ट्या पेटवत राहायचे. कुठे पत्त्यांचे डाव रंगात आलेले, तर लाल-काला करीत नजरबंदचा खेळ खेळणारे, कुणी सोरट लावणारे काय काय असेल, ते सगळे आजच कमावण्याची संधी आहे, असे समजून आपापली मोक्याची ठिकाणे गाठायचे.

गावातील माणसे जत्रेत मिरवत राहायची. लेकीबाळी सजून-धजून खरेदीसाठी बाहेर पडायच्या त्यांचा अखंड गलका सुरु असायचा. लहान लेकरांचा जत्रेतून दिसेल ते काहीनाकाही घेण्यासाठी हट्ट सुरु असायचा. नाही मिळाले, म्हणून उगीच भोकांड पसरून रडण्याचा, मधूनच कुण्या दुकानदाराचा वस्तू विकण्यासाठी ओरडून आवतन देणारा, मुलांच्या हाती लागलेल्या पिपाण्यांचे, कोणीतरी कुणाला ओरडून साद देणारा, असे एक ना अनेक आवाजांची एकमेकात सरमिसळ होऊन गलका वाढत राहायचा. पाळण्यात बसलेली लहान मुले ओरडून आईबापाला साद घालायची. एखादं भेदरलेलं लेकरू तेथून उडी टाकायला बघायचं, तर त्याचं कुणी तरी त्याला घट्ट पकडून धरायचं.

मरीमातेच्या मंदिराला नुकताच दिलेला रंग भक्तीच्या रंगात मिसळून अधिक गहिरा वाटायचा. मंदिराचा परिसर प्रसन्नतेचा परिमल घेऊन दरवळत राहायचा. नवससायास बोलले जायचे. साकडे घातले जायचे. सुख आपल्या अंगणी नांदते राहावे, म्हणून माणसे कामना भाकत राहायचे. कुणाला पीकपाणी चांगले हवे, कुणा मानिनीला कूस उजवण्याची आस लागलेली असायची. कुणाच्या लेकराला नोकरी मिळवायची अपेक्षा असायची. कुणाच्या लेकीला हळद लागेली पहायची ओढ लागलेली. काय काय अपेक्षा घेऊन माणसे मरीमायच्या पायावर माथा टेकून आशीर्वाद घ्यायची. नारळं वाढवली जायची. त्यांच्या पाण्याने परिसर पाझरायला लागल्यासारखा व्हायचा. नैवद्याची ताटे घेऊन मंदिरात गर्दी वाढत जायची. जत्रेचा रंग गडद व्हायचा. ऊनपावसाच्या खेळाने आकाशात इंद्रधनुष्यी रंगांची कमान धरली जायची. इकडे माणसांच्या मनातले रंग आणखी नव्या छटा घेवून बहरून यायचे. दिवस हलक्या पावलांनी मावळतीच्या वाटेने लागायचा.

इकडे तमाशातील कलाकारांना घेऊन मोटार दुपारीच गावात दाखल झालेली असायची. त्यांच्या जेवणाची, थांबण्याची व्यवस्था आधीच झालेली असली, तरी ऐनवेळी काहीतरी सुचायचे आणि धावपळ होत रहायची. गाडीतील साहित्य उतरवून घेण्यासाठी न सांगता अनेक हात मदतीला लागायचे. कुठल्यातरी घरी तमाशातील मंडळी तिसऱ्या प्रहरपर्यंत पेंगत पडलेली असायची. त्यांना पाहण्यासाठी पोरांची गर्दी उसळायची. लहान-लहान डोळे कुतूहलाने त्यांच्याकडे टकामका पाहण्यात लागलेले असतांना मागून कुणीतरी पुढच्यांना ढकलायचे आणि नेमके त्यातला कोणीतरी या लोकांच्या अंगावर पडायचा. ते पाहून पोरासोरांकडे लक्ष ठेऊन असणारा कोणीतरी जाणता गडी पोरांच्या अंगावर धावून येत हाकलायचा. कधी कधी एखादं धीट कार्ट त्याच्यावरच उखडायचं आणि भांडणाला तोंड फुटायचे. संतापाच्या भरात थोबाडीत ठेऊन भांडणाऱ्या पोराचं बखोटं धरीत बाहेर हाकललं जायचं. मार खाणारं पोरगंही काही कमी नसायचं त्याच्या आनंदावर विरजण टाकणाऱ्याला सुचतील तितक्या अस्सल शिव्या हासडून पळायचं.

बारकू जिभाऊच्या सूचनांना उधान यायचं. साऱ्यांची सरबराई राखण्यासाठी पळत राहायचा. नियोजनात त्रूटी राहू नयेत म्हणून जिवाच्या कराराने धडपड करीत राहायचा. गावात तगतराव उभा करण्याचा अनुभव गाठीशी असलेली माणसे तयारीला लागलेली असायची. मध्येच हा त्यांच्याकडे जावून आवश्यक सूचना सांगून तिसरीकडेच निघायचा. स्वयंपाक काय शिजतो आहे, त्याची चौकशी करून तेथेही दोनचार सूचना टाकून परत पहिल्या ठिकाणी येऊन थांबायचा.

तगतराव जोडण्याच्या तयारीला लागलेला कुणीतरी मधूनच ओरडायचा, “ओ जिभाऊ, अरे दोऱ्या, दोरखंड धाड ना रे भो! अरे हाई शिंगाडे बरोबर नही, धाकलं पडी राह्यनं, दुसरं देखाले सांग.”

हा परत तिकडे पळायचा. तेव्हाशी तगतरावला जुंपल्या जाणाऱ्या जोड्या का आल्या नाहीत म्हणून कुणीतरी सांगायचे. हा गोठ्याकडे पसार व्हायचा. तेथे बैलांना झुली, गोंड्या-बाशिंगांनी सजवत असलेल्या माणसांवर खेकसायचा. बैलांना साज चढवणारे आपल्या स्थितप्रज्ञतेला जराही धक्का लागू न देता आपले काम करीत राहायचे. आता दहापंधरा मिनिटात आलोच म्हणून याला तेथून कटवायचे. तिकडून निघाला की, तगतराववर उभे राहणाऱ्या तमाशातील कलाकारांना मध्येच दटावून यायचा. “आरे, कितला पावडर, टिकल्या लायी राह्यानात! गह्यरं हुई गे ना भो! आवरा रे आते.” म्हणत त्यांच्या मागे लागायचा.

तगतराव निघेपर्यंत सारी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन धावत राहायचा. एकदा का नारळ वाढवून, गुलाल उधळून मरीमायच्या जयघोषाने तगतराव बाहेर पडला की, हा सुटकेचा श्वास सोडायचा.

रात्री अकरा-बारा वाजता तमाशा फडावर उभा राहायचा. संध्याकाळी तगतराव गावभर फिरत राहायचा. ढोलताशांच्या गजराने गाव निनादत राहायचा. मरीमायच्या नावाचा घोष गावच्या आसमंतात घुमत राहायचा. उधळलेल्या गुलालाने आकाशाने जणू गुलाबी रंगाची ओढणी ओढून घेतल्यासारखे वाटायचे. भक्तीच्या वाटेने तगतराव एकेक पाऊल पुढे सरकत राहायचा देवळाच्या दिशेने. सारा गाव फिरून मरीमायच्या देवळाजवळ येवून हजेरी व्हायची. ठेवणीतल्या नव्या कपड्यांनी सजलेले देह गावभर मिरवत राहायचे. बारकू जिभाऊचा पांढरा सदरा आणि धोतर या दिवशी हमखास चरम मर्यादेपर्यंत नीळ घेऊन मुळचा पांढरा रंग हरवून बसलेले असयाचे. कडक इस्त्री करून ठेवलेली टोपी अभिमानाने डोक्यावर चढायची. माणसं गावभर पळत रहायची. त्या धावण्यातही लगबग साठलेली. प्रत्येक पावलांना आस्थेची, भक्तीची वाट शोधायची घाई झालेली. गर्दीत अनेक चेहरे आपापले आनंद घेऊन मिरवत राहायचे.

गर्दीतून मध्येच पसार होऊन काही चेहरे हातभट्टीची बरकत आपल्या उदरी साठवून यायचे. त्याचा आनंद घेत मनमुराद नाचत राहायचे. जिभाऊ सहसा घेत नसायचा, पण कोणीतरी सोबत घेऊन जायचा. आग्रहाने म्हणा किंवा आणखी काही कारणाने त्याच्या मुखातून थोडे तीर्थ पोटात येवून विसावले की, याच्या अंतरी अधिवास करून असणाऱ्या चैतन्याला उधान यायचे. रसवंती अनेक वळणे घेत नागिणीसारखी सळसळत रहायची. याच्यातला कलाकाराला जाग यायची. या नादात तगतराववर चढून ढोलकीवर थाप द्यायचा. कधी नाच्याच्या सोबत ताल धरायचा. हे जुळलेले सूर अगदी रात्री तमाशातही सजत राहायचे. तमाशातील कलाकारांच्या एन्ट्रीपेक्षा जिभाऊची एकदोन मिनिटांची प्रेमाची प्रासंगिक एन्ट्री शिट्या आणि टाळ्यांची दाद घेणारी असायची.

रात्र गडद होत जायची, तसा तमाशाला रंग चढत जायचा. झुंजूमुंजू होईपर्यंत आनंदलहरींनी आसमंत भरून जायचे. सळसळते चैतन्य घेवून अख्खी रात्र अंधाराला खेळवत नाचत रहायची. मध्येच लाईट गेली की गॅसबत्त्या तयार असायच्याच, त्यांना पेटवण्याची धावपळ उडायची. माणसे तशातही तमाशा पाहत राहायची. मनमुराद दाद द्यायची. गणगौळण, पोवाडे, वग, सवाल-जवाब, गाणी कायकाय रंग भरून यायचे. आरोळ्या, शिट्ट्यांनी परिसर दुमदुमत राहायचा, अगदी पहाट फुटेपर्यंत. आसपासच्या खेड्यातून आलेली माणसे पहाटेच्या तांबडं फुटायच्या आधी घराच्या रस्त्याने लागायची.

तमाशा थांबायचा. तमाशा पाहण्यासाठी उत्साहाने आलेली मुलं डोळ्यांत झोप दाटून आली की, रात्री केव्हातरी तेथेच निजून गेलेली असायची. सकाळी मायबाप त्यांना शोधत यायचे. नाहीतर कोणी त्यांना जागे करून घराकडे रवाना करायचे. पोरांची पेंगलेली पावले गोधडी सावरत घराच्या रस्त्याने लागायची. तमाशातील कलाकारांना चहापाण्याच्या व्यवस्थेसाठी जिभाऊची शोधाशोध व्हायची. रात्री जरा जास्तच तर्र झालेला जिभाऊ कुठेतरी आसपासच घोरत पडलेला असायचा. कोणीतरी जावून याला जागा करायचा. हा जागा व्हायचा तो या लोकांची व्यवस्था बघायची जबादारी असल्याची जाणीव घेऊनच.

सगळी सूत्रे हाती घेऊन याची परत पळापळ सुरु व्हायची. सकाळपर्यंत यात्रेचा उत्साह संपलेला असायचा. न मागता मदतीला येणारे हात आणि व्यवस्था करण्यासाठी पळणारे पाय कोणत्यातरी वाटेने निघून गेलेले असायचे. हा एकटा आणि असलेच कोणी दोनतीन जण मदतीला तेव्हढेच तिथे दिसायचेत, पण तेही लोकांच्या नावाने बोंबा मारत राहायचे. तमाशाचे साहित्य मोटारीत कोंबले जायचे. काही आठवणी घेऊन, काही मागे ठेवून गावाची वेस ओलांडून धुळीचे लोट अंगावर घेत तमाशाची गाडी निघून जायची. मोटार रस्त्याने लागली की जिभाऊ तिच्या अदृश्य होत जाणाऱ्या प्रतिमेकडे डोळे किलकिले करीत बघत राहायचा, नजरेआड होईपर्यंत.

कालच्या उधाणलेल्या चैतन्याला ओहटी लागायची. आलेली पावले परतीच्या वाटेने निघायची. लेकीबाळी भरलेला कंठ आणि डबडबलेल्या डोळ्यांनी माहेरचा निरोप घेऊन सासरी रवाना व्हायच्या. कालचं जग आज नसायचं. परवाच्या पूर्वपदावर येवून चालत राहायचं, आश्वस्त करणारे आनंदाचे काही क्षण मागे ठेवून.

सारा शीण निघून गेल्यावर माणसं सायंकाळी पारावर परत जमायची. यात्रेतील आनंदाची आवर्तने आवर्जून आठवली जायची. गेल्यावर्षापेक्षा यावर्षी सगळंच कसं चांगलं झालं, म्हणून गावच गावाचं कौतुक करीत राहायचं. कौतुकाचा प्रवाह वाहत राहायचा आणि वाहता वाहता जिभाऊकडे वळायचा. कुणीतरी म्हणायचं, “हाई सगळी धावपय पार पडनी, गह्यरं मस्त व्हयनं; पन यानामागे जिभाऊ उभा होता म्हणून. जिभाऊ, तुनी खरंच कमाल शे भो! तूच करू जाने हाई सगळं.”

जिभाऊ म्हणायचा, “कसानी कमाल हो आबा! आपला गावना लोकेस्नी साथ नही राहती तं मी ऐकला काय कराव होतू?”

तरीही माणसे कौतुक करीत राहायची. जिभाऊ धन्य व्हायचा. रात्रीपर्यंत हाच विषय सुरु राहायचा. पुढे दोनतीन दिवसांनी हळूहळू त्यावर विस्मरणाचा पडदा पडायचा. रोजच्या गडबडीत माणसे अडकत जायची. नवी सुख-दुःखे, नव्या समस्या विषय बनून माणसांच्या बोलण्यात अलगद सामावून जायच्या.

जिभाऊ मात्र कौतुकाची ही ऊर्जा घेऊन वाहत राहायचा, सुखद स्मृतींच्या लाटांवर. कधीतरी थोडी घेतली की, मनात जत्रेच्या आठवणींचा मोहर फुटायचा. हातभट्टीच्या लागलेल्या वरच्या पट्टीसह स्मृतींच्या गंधाची सरमिसळ वातावरणातून वाहत राहायची. जिभाऊ मनातलं दुःख लपवत आनंदाचे लहानसे कवडसे शोधत राहिला. आपल्या दुःखाचे कढ कोणाला दिसू नयेत, म्हणून पाणावलेल्या डोळ्यांना समजावत राहायचा. लोकांना काही कळू नये, म्हणून चेहऱ्यावर प्रसन्नता आणून संवाद साधत राहायचा. या प्रसन्नतेच्या आत अंतर्यामी दुःख, वेदना साचलेल्या होत्या, तो अखेरपर्यंत त्या झाकत राहिला.

परिस्थितीने पाचवीलाच दारिद्र्य पूजलेले. लहान असताना वडिलांचं छत्र हरपलं. आईने लोकांकडे मोलमजुरी करून वाढवलं. लहानाचा मोठा केला. कष्ट रक्तातच होते. राबणे नशीब बनले होते. नशीब पालटायची संधी शिक्षणाने दिली; पण त्याचे सोने करायची अचूक वेळ याला साधता आली नाही. तो काळच प्रघातनीतीच्या परिघात फिरण्याचा. शिक्षणाचा परीघ विस्तारायचा होता. याच्यापर्यंत तो पोहचला नाही. खरंतर हाच त्या वाटेने चालता झाला नाही.

नियतीचे खेळ समजून त्याच्या सोबतची सगळीच माणसे स्वतःला नशिबाच्या कृपेवर सोडून देत होती. नशिबालाच आपल्या जगण्याचा परीघ करून आहे त्यात हा सुख शोधत राहिला. गरिबी माणसांना बरंच काही शिकवून जाते. हाही तिची सोबत करीत जगणं शिकला. आहे तेच पर्याप्त मानून आला दिवस ढकलू लागला. कुलाचा वारसा जन्माने संपन्न होता; पण परिस्थितीने वंचनेच्या वर्तुळात आणून उभे केले. या वर्तुळात स्वतःचं विश्व शोधत राहिला. जीवनग्रंथाच्या पानांवर लेखांकित झालेले दुःखाचे, वेदनेचे अध्याय मिटवण्यासाठी धडपडत राहिला. परिस्थितीशी अखेरपर्यंत लढत राहिला एखाद्या वीराच्या थाटात. परिस्थितीवर स्वार होण्याची धमक अंगी घेऊन नांदत राहिला.  रोज जगण्याचा नवा अनुभव घेत राहिला. आला दिवस आपला म्हणून साजरा करीत राहिला.

माणसाचं जगणंच निसर्गाच्या चक्राशी बांधलं गेलेलं. नियंत्याच्या हाती स्वतःला सोपवून आपण प्रयत्न करीत राहणे हाच जीवनयोग असतो, असं म्हणणारा जिभाऊ आपल्या जगण्याचे प्रयोजन थाटात कथन करून सांगायचा, तेव्हा एखाद्या विचारवंताच्या सोबत अभ्यासाला होता की काय असे वाटायचे. हे विचार दिमतीला घेऊन तो कर्मयोगात जीवनयोग साधत राहिला. निसर्गाच्या सानिध्यात जगण्याची प्रयोजने शोधत राहिला आणि एक दिवस निसर्गचक्राच्या गतीत स्थिरावला. देहाच्या चैतन्याला निसर्गानेच पूर्णविराम दिला.

त्याने गावाचा निरोप घेऊन आठ-दहा वर्षे झाली असतील. पण या सगळ्या वर्षातले एकही वर्ष आणि एकही जत्रा अशी नसावी; ज्या दिवशी तो गावाला आठवत नाही. वर्षभर त्याला आठवत राहावे, असे त्याचे काही कार्य नसले, म्हणून काही बिघडत नाही. पण गावात जत्रेचे आयोजन होत राहील, तेव्हा तेव्हा तो आठवत राहील. गावच्या जत्रेसाठी केलेल्या कामाने लोकांच्या स्मृतींवर आपलं नाव कोरून तो कायमचा निघून गेला आहे. मागे उरल्या आहेत त्याच्या आठवणींची अक्षरे आणि धावपळीच्या पाऊलखुणा, ज्या काळालाही मिटवता येणे शक्य नाही. जोपर्यंत माणसे त्या स्मृतींना ठरवून निरोप देत नाहीत तोपर्यंत.