नियती, नियंता वगैरे

By // No comments:
नियती, नियंता वगैरे गोष्टींना आशयघन अर्थ असतो की नाही, हा ज्याच्या-त्याच्या आकलनाचा अन् आस्थेचा भाग. ज्यांना नियतीच्या नियंत्रणावर विश्वास आहे, ते नियंत्याच्या अस्तित्वाला आपलं मानतात. कुठल्यातरी अनामिकाच्या हातात आयुष्याचे अर्थ सुपूर्द केले की, मुक्तीचा पथ प्रशस्त होतो असा विचार करणाऱ्यांचे ते भागधेय बनतं. ज्यांना विश्वाचे व्यवहार निसर्गाच्या नियंत्रण कक्षेत विहार करताना दिसतात, ते त्याचा ताल आणि तोल आयुष्य अर्थपूर्ण करण्याचे प्रमाण मानतात. कोणी कोणत्या गोष्टींना अधोरेखित करावं, हा शेवटी भावनांचा भाग असतो. विचारांना, भूमिकांना दोलायमान करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. साध्यासरळ जगण्याला कधी इकडे, कधी तिकडे भिरकवतात. वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यागत आयुष्य गरगरत राहते. ना दिशा, ना रस्ता, ना मुक्कामाचं ठिकाण. वारा नेईल ती दिशा अन् थांबेल ते ठिकाण. 

आयुष्याच्या पटावर पहुडलेल्या पायवाटेने प्रवास करताना अनपेक्षित व्यवधाने समोर उभी राहतात. अंतर्यामी आस्थेची पणती पेटवून पावलापुरता प्रकाश पेरत काही माणसे चालत राहतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून वातीला आणि तिच्या ज्योतीला सुरक्षित राखण्यासाठी श्रद्धेचा पदर पुढयात ओढून धरतात. काही कोसळतात, काही कोलमडतात. काही उसवतात, काही विखरतात. काही उखडतात. काही भिडतात संकटांशी, ध्वस्त झालो तरी माघारी न वळण्याची तयारी करून. आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचं सम्यक भान असलं की नेणिवेच्या कोशात कोंडलेल्या सुरवंटाला आकांक्षांचे पंख येऊ लागतात. जगण्याला वेढून असणाऱ्या जाणिवांच्या परिघाभोवती आपलेपण नांदते असले की, आयुष्याला आनंदाची अभिधाने आकळतात. ती कुठून उसनी नाही आणता येत. कुणाच्या आशीर्वादाने नाही मिळवता येत.

माणूस फार बलदंड प्राणी नाही. निसर्गाने सोबत दिलेल्या मर्यादा घेऊन तो जगतो आहे. निसर्गाच्या अफाटपणासमोर त्याचं अस्तित्व नगण्यच. त्याचं असं यकश्चित असणंच अंतरी श्रद्धा पेरून जात असेल का? आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अबाधित राखण्याची सहजवृत्ती प्रत्येक जीव धारण करून असतो. स्व सुरक्षित राखण्यासाठी आयुष्य केवढा आटापिटा करायला लावतं. केवढ्या परीक्षा पुढयात मांडून ठेवलेल्या असतात. निसर्गाने पदरी टाकलेले श्वास कायम राखण्यासाठी केवढी यातायात करतो जीव. वाघाच्या मुखी मान अडकलेल्या हरिणाला पाहून क्षणक्षणांनी क्षीण होत जाणाऱ्या अन् देहाचा निरोप घेणाऱ्या श्वासाचं मोल कळतं. वादळाच्या एका हलक्याशा आवर्तात हरवण्याचे सगळे संदर्भ साकळलेले असतात. भूकंपाच्या हादऱ्यांनी मातीशी जखडून असलेल्या मुळांची महती आकळते.
 
निसर्गाच्या प्रकोपासमोर क्षतविक्षत होताना माणसाला आपल्या वकुबाचा प्रत्यय येतो अन् तो अधिकच खुजा होत जातो. आकांक्षांचे अगणित तुकडे होतांना एकटा होत जातो. ध्वस्त होत जातो तसा त्याच्या ज्ञानाने, अभ्यासाने आत्मसात केलेल्या सगळ्या गोष्टी क्षणभंगुर वाटू लागतात. क्षणात होत्याचं नव्हतं होत जाणं अनुभवतो, तसा तो विखरत जातो. विखरत जातो तेवढा अधिक सश्रद्ध होत जातो. फरक एवढाच असतो की, काही दैवावर सगळा भार टाकून निष्क्रिय प्रारब्धवाद कुरवाळत राहतात. काही पुढयात पसरलेली शक्यतांची क्षितिजे पाहतात. तेथे नेणाऱ्या वाटा निरखत राहतात. पायथ्याशी पोहोचवणाऱ्या ऊर्जास्त्रोतांचा शोध घेत राहतात. 

आपल्या गती-प्रगतीचे आपण कितीही नगारे बडवले, तरी निसर्गाच्या एका आघाताने हाती शून्य उरतं. याचं भान असलं की, आयुष्याचे अन्वयार्थ कोशात नाही शोधायला लागत. आपल्या असण्यात ती सापडतात. संकटे समोर ठाकली की, आपत्तीला सामोरे जाणाऱ्यांनाच पर्याय शोधावे लागतात. देव, दैव स्तब्ध होतात. प्रार्थनास्थळे मूक होतात, तेव्हा तेथल्या मौनाची भाषांतरे करता यायला हवी. मौनाची भाषा कळते, त्यांना श्रद्धेचे अर्थ अवगत असतात. आघात अनाकलनीय असले की, सगळ्याच कृतींमध्ये साचलेपण सामावतं. हतबल झालेली माणसे. गलितगात्र झालेली प्रज्ञा अन् हतबुद्ध शास्त्र आयुष्याच्या चौकटींच्या रेषा सुरक्षित राखू शकत नाही, म्हणून अधिक अगतिक बनत जाऊन माणूस अज्ञात शक्तीच्या कृपेची कांक्षा करू लागतो. दोलायमान जगण्यात अपघाताने अथवा योगायोगाने कुण्यातरी अनामिक शक्तीच्या सामर्थ्याचा प्रत्यय येऊ लागतो अन् आस्था अधिक गहिऱ्या होऊ लागतात. संसाराची सूत्रे कोण्या अज्ञाताच्या हाताची किमया असल्याचं वाटू लागतं. आधीच यकश्चित असलेला माणूस संयमाच्या सूत्रातून सुटत जातो अन् श्रद्धा अधिक घट्ट होत जातात. त्याचं असणं डोळस की, केवळ अनुकरण हा विचारच मनोभूमिकेतून वेगळा होतो. विवेक विराम घेतो, तेव्हा विचार पोरके होतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

मर्यादा

By // No comments:
तुम्ही पदाने कोणत्या उंचीवर आहात. पैशाने केवढ्या योग्यतेचे आहात आणि वयाने किती आहात याला फारसं महत्त्व नसतं. पद, पैसा, प्रतिष्ठा यांना आयुष्य असतंच किती? तुमच्याकडे असेपर्यंत. तुम्ही थकला, चुकला की, या सर्वांपासून हुकालात एवढं नक्की. समजा वय हीच एकमेव पात्रता असली सुज्ञपणाची, तर शंभरी पार करणारे अगाध, अलौकिक वगैरे ज्ञानाचे धनी आयला हवे. पण तसं नसतं. वयापेक्षा सोय समजणं अधिक महत्त्वाचं. अनुभवाने समृद्ध होत राहण्याला प्रगती, वाढ, विकास वगैरे सारख्या शब्दांचं कोंदण देता येतं. नुसते शब्दांचे बुडबुडे उडवून मोठं होता येतं असं कुणाला वाटत असेल, तर तो त्यांच्या स्वातंत्र्याचा भाग. पण ते तर अज्ञान. सर्वज्ञ हा एक नितांत सुंदर शब्द. सर्वज्ञ संज्ञेस सर्वथैव पात्र असलेला असा कोणी जीव इहतली अधिवास करून असल्याचा दावा कोणताच जीव करत नाही. या शब्दाच्या अर्थाचा प्रवास कधीच पूर्णत्वाकडे प्रवास करत नाही. त्याला अपूर्णतेचा अभिशाप आहे आणि वरदानही. शाप यासाठी की, या शब्दात अनुस्यूत असलेले अर्थ समारोपाच्या बिंदूंवर पोहचवणारा काळालाही जन्मास घालता नाही आला. वरदान आहे, कारण प्रयासांच्या परिभाषा अवगत असणारे पूर्णत्वाचा धांडोळा घेत राहतात. वेचलेल्या ओंजळभर समिधा समर्पित करून प्रयोजनांना पूर्णत्त्वाच्या कोंदणात कोंडण्यासाठी झटत असतात.  

खरंतर माणसांचं आयुष्यच मर्यादांच्या कुंपणांनी सीमांकित. मर्यादांचे बांध असले म्हणून पलीकडे दिसणारा किनारा आपला करण्याची उमेद टाकून नाही देता येत. पैलतीरी पसरलेला प्रसन्नतेचा परिमल माणसाला सतत संमोहित करत आला आहे. हे संमोहनच अज्ञात परागण्यांचा धांडोळा घेण्यास उद्युक्त करते. आपलं असं काही शोधण्याच्या प्रयासांना प्रशस्तिपत्राची आवश्यकता नसते. व्यवस्थेच्या वर्तुळात विहार करताना गतीचं ज्ञान आणि प्रगतीच्या परिघांच भान अगत्यपूर्वक सांभाळावं लागतं. 

आपल्याला काय वाटतं ते महत्त्वाचंच, पण प्रत्येकवेळी तसंच पदरी पडेल असं नाही. खरंतर आपण आपल्याला अवगत असलेल्या सूत्रांचा उपयोग करीत जगण्याची समीकरणे सोडवावीत. नितळ, निर्मळ, निखळ वगैरे राहण्याचा प्रयास करावा. तुम्ही कसे जगतात, याची काळजी नाही करायची. करायचीच तर समाज करेल. त्यांना ठरवू द्या, भलंबुरं काय ते. बऱ्यावाईटाच्या व्याख्या तुमच्या तुम्ही तयार करून सत्प्रेरीत विचारांच्या वातींनी उजळलेल्या ज्योती सांभाळणाऱ्या पणत्या हाती घेऊन चालत राहावं. आवश्यकता असलीच आणि रास्त असलं तर अपेक्षांच्या अनुषंगाने बदलत राहावं. अवास्तव कांक्षा आणि अपेक्षाही अपायकारकच. पाण्यासारखं असावं आपलं असणं. आयुष्याचे किनारे धरून वाहताना संगमाकडे सरकता यावं. प्रमादाची वळणे वाटेवर भेटलीच तर वळसा घालून वेळीच वेगळी करता यायला हवीत.

समूहभावना सामान्य गोष्ट, आपण माणूस असण्यातली. खरंतर आयुष्य नावाचा अध्याय समृद्ध करणारी. समूहात विहार करताना अनेकांच्या आपल्याकडून किमान काहीतरी अपेक्षा असतात. त्या नसाव्यात असं काही कोणी सांगत नाही. विरोध वगैरे प्रकार असतो. त्यामागे प्रासंगिकतेची प्रयोजने असू शकतात. असलाच तर प्रत्येकवेळी तो प्रखर असेलच असं नाही आणि प्रत्ययकारी असेलच याचीही शाश्वती नसते. बहुदा काही गोष्टी मनानेच मान्य केलेल्या असतात. अपेक्षांचं एक असतं. त्यांना अस्तित्व असतं; पण आकार नसतो. त्याचा कोलाज ज्याचा त्याने करायचा असतो. चांगल्या, वाईट अशा कोणत्याही कप्प्यात त्यांना कोंडता येतं. कधी सोयीने, तर कधी सवडीने टॅगही लावता येतात त्यावर. कोणी कोणता टॅग लावावा, हे लावणाऱ्याने ठरवायचं. 

माणूस कुठेही असला तरी काळाचा लहानमोठा तुकडा सोबत घेऊन असतो. प्रत्येक तुकड्यात काही कहाण्या दडलेल्या असतात. त्याच्या कृष्णधवल छटांचे अर्थ तेवढे शोधता यायला हवे. स्मृतीच्या पडद्याआड दडलेल्या तुकड्यांचे अन्वयार्थ लावण्याएवढं सुज्ञपण आपल्याकडे असायला हवं. आयुष्य काही एखाददोन दिवसात आकाराला आलेली आकृती नसते. जगण्याला आलेला मोहर अनुभवण्यासाठी ऋतूंचे सोहळे समजून घ्यायला लागतात. पानगळ अनुभवल्याशिवाय बहरण्याचे अर्थ कसे आकळतील. सायासांची समीकरणे समजून घेता  आली की, प्रयासांच्या परिभाषा अधोरेखित होतात. संदर्भांचे धागे पकडून जगण्याला एका सूत्रात बांधण्याचा प्रयत्न करता यायला हवा. आयुष्याला वेढून असलेल्या गणितांना सोडवण्याची सूत्रे सापडली की, संकल्पनांनी साकारलेल्या चित्रात मनाजोगते रंग भरता येतात. आसपास अंधार गडद होत असलेल्या काळात आस्था कायम ठेवणाऱ्या किमान काही कवडशांना चिरंजीव करता यावं. आकांक्षा, अपेक्षा, श्रद्धा वगैरे शब्दांनी अधोरेखित केल्या जाणाऱ्या गोष्टी काही नव्या नाहीत. सगळं जुनंच, पण त्याला वेढून असलेली आस्थेची वर्तुळे तेवढी नव्याने समजून घेता यावीत. त्याचं असणं ठळक असावं म्हणून रेषांचे किनारे नेमकेपणाने गिरवता यावेत. 

सहानुभूतीचे चार शब्द सांडून संवेदना प्रकट करता येतीलही. पण संकटकाळी सोबत असतो, त्याचं नाव माणूस अन् सभोवती कोरलेल्या मर्यादांच्या रेषा विधायक हेतूंसाठी पार करता येतात ती माणुसकी. आसपास अनेक माणसांचा सतत राबता असतो, पण त्यांत माणसे किती असतात? असते ती केवळ गर्दी, स्वतःचा चेहरा नसलेली. खरंतर माणूस शब्दाची पर्याप्त परिभाषा तयार झाली नाही. आहे त्यातूनही काहीतरी सुटतं. नाही त्यात आणखी भर होत राहते. सापडलंच काही, तर काहीतरी निसटतंच. मुखवटे मिरवण्याच्या काळात निखळ माणूस मिळवणं अवघड आहे. चिमूटभर स्वार्थासाठी संवेदनांना सोडून पळणारे अनेक. पण सभोवती विहार करणाऱ्या वेदना पाहून वितळणारे फार कमी. सहवेदनेच्या मार्गावरून प्रवास करणारे तर मोजकेच. सहानुभूतीची वानवा नाही. अनुभूतीचे किनारे कोरडेठाक पडलेले. 

संकटांचा सामना करताना विकल झालेले जीव देव, दैवाला दोष देत आला दिवस ढकलत राहतात. नशीब, भाग्य, प्राक्तन वगैरे शब्दांचे अर्थ काही असोत. तो ज्याच्या त्याच्या आस्थेचा भाग. आपलेपणाचा ओलावा अंतरी नांदता ठेवणारे ओथंबलेपण शब्दाचा अर्थ असतात. स्वतःकडे देण्यासारखं काही नसलं, तरी सहकार्याचे साकव टाकून वाटा जागत्या ठेवतात. संवेदनांचे किनारे धरून सोबत वाहत राहतात. 'भाग्य' शब्दाची हीच न कळलेली परिभाषा असते. 

आपत्ती संकटे समोर येतात. अशावेळी माणसातलं माणूसपण अधिक ठळक वगैरे होतं असतं. खूप चांगली गोष्ट. पण सहानुभूतीच्या पलीकडे माणूस पोहचतो का? कदाचित या विधानात काही अपूर्णता असेलही. काळजी घे, गाफील, राहू नको वगैरे सारख्या चावून चावून चोथा झालेल्या शब्दांव्यातिरिक्त वेदनेच्या वाटेवरून प्रवास करणाऱ्यांच्या पदरी आपण पेरतो तरी काय? कुणी म्हणेल की, दोनचार शुष्क शब्दांशिवाय सामान्य माणसाकडे असतं तरी दुसरं काय देण्यासारखं? समजा असलं काही करण्याजोगतं, तरी आधी माझ्यातला स्वार्थ पलायनाचे पथ आसपास आहेत का, हे शोधत असतो. कशाला उगीच झेंगट मागे लावून घ्यायचं, म्हणून शक्य तेवढं मागे राहण्याचा पर्याय शोधत राहतो. म्हणतात ना, पर दुःख शीतल. जखमांची ठसठस सांगून कशी कळेल? अनुभूतीशिवाय वेदनांचे अर्थ कसे आकळतील? जखमेवर अत्तर लावलं म्हणून वेदना काही सुगंधित नाही होत. सहानुभूतीने केवळ वांझोटा आशावाद पेरता येतो. माणूस जगवण्यासाठी ओलावा नांदता ठेवावा लागतो. 

माणूस म्हणून माझ्या काही मर्यादा असतात, हे मान्य करण्यात कशाला हवा संदेह. अर्थात, हे शंभरातल्या नव्याण्णव माणसांबाबत असं म्हणता येईल. मी या नव्याण्णवातला एक. कारण राहिलेल्या एकातला एक मला नाही होता येत, या वास्तवाला विस्मरणातल्या कोपऱ्यात ढकलून नामानिराळे नाही होता येत. खरं हेही आहे की, माणूस म्हटला, म्हणजे त्याच्या असं असण्यातही नवलाई नसते. बांधिलकी सोबत बंध असले की, अनुबंधाची परिमाणे नव्याने तयार होतात. त्यांना किनार असते स्नेहाची. स्नेहच संवाद झाला की, संवेदनांना मोहर धरतो. माणसे माणूसपणाच्या मर्यादांनी भलेही सीमांकित असतील, पण त्याने सत्प्रेरीत प्रेरणेतून केलेलं काम परिमाण असतं त्याला समजून घ्यायचं. नितळपणाला कोणत्याच कुंपणात नाही कोंडता येत, हेच खरं. कृतिशील कार्य वगैरे काय म्हणतात ते हेच. काळ अन् वेळ यामध्ये असणाऱ्या अंतरात कर्म प्रवास करत असतं. सत्प्रेरीत प्रेरणांचं पाथेय प्रवासात सोबत असलं की, कृती कर्तव्याच्या कोंदणात सजते. कृतीची प्रयोजनेच तुमच्या पदरी पुण्याई पेरणारा पर्याप्त पर्याय होत असतात. जगण्याला प्रामाणिकपणाचा अन् विचारांना निरामयतेचा गंध असला की, आसपास प्रमुदित होतोच होतो, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••