Aswasth Chitre | अस्वस्थ चित्रे

By // 12 comments:
१. सन. २०१५,
सीरियात राहणाऱ्या आयलान कुर्दीच्या मृत्यूने जगभरातील संवेदनशील माणसांची मने गलबलून आली. समुद्रकिनाऱ्यावर निपचित पडलेल्या लहानग्याच्या देहाचं चित्र ज्यांनी पाहिलं, त्या प्रत्येक मनात कालवाकालव झाली. ज्या वयात मुलांनी हसावं, खेळावं त्या वयात मुठभर देह सुरक्षित ठेवण्यासाठी त्याला पालकांसोबत विस्थापित व्हावं लागलं. नियतीने पाश घट्ट आवळले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. जीवनाचं रुजलेलं रोपटं उखडून फेकलं गेलं. सगळ्याबाजूनेच परिस्थितीच बेईमान झाली. स्वकीयांच्या सहवासाचे सगळे पाश सोडून ओंजळभर सुखाच्या शोधासाठी आशेच्या मृगजळामागे धावणे नियतीने निर्धारित केले. जीवनाचे गाठोडे घेऊन दिशाहीन वणवण करणे नशिबी आले. ज्या भूमीत जीवनवृक्षाच्या अस्तित्वाची मूळं रुजली होती तेथील आस्थेचा ओलावा संपला. सहज, साधं, सरळ जगणं शक्य नसल्याने अन्य वाटांनी प्रवास करीत जीवनाची नवी पहाट शोधणे आवश्यक ठरले. जीवनाचा नम्रपणे शोध घेत सरळ मार्गाने वर्तणारी माणसे कलहप्रिय माणसांच्या जगात वेडी ठरतात. त्यातील हेही एक कुटुंब. प्रयत्न करूनही आपलेपणाचा स्नेह हाती लागण्याचा संभव नसल्याने समस्यांच्या सागरात ढकलून सुखाचा किनारा गाठण्याच्या प्रयत्नात नियतीने सगळा खेळ संपवला. डोळ्यात साठवलेला आणि मनात गोठवलेला आशेचा कवडसा परिस्थितीच्या निबिड अंधारात हरवला. सोबत आयलानची आई आणि भाऊही गेले. वडील वाचले, पण त्यांच्याकडे जगण्याची आसक्ती निर्माण करेल असे काहीच शिल्लक नाही. जगातला कोणताही देश आता त्यांना नकोय.

२. सन. १९९३,
सुदानमध्ये दुष्काळ पडला. माणसं हाडांचे सापळे झाले आहेत. उपासमार आणि त्या मार्गाने चालत येणारे भूकबळी जगण्याचे विधिलिखित बनले आहे. एकीकडे जगाचे व्यवहार सुनियोजित सुरु असताना; त्याच जगाच्या दुसऱ्या बाजूला रोजचं जगणं उध्वस्त झालं आहे. माणसे जगण्याच्या संघर्षात तुटत आहेत. परिस्थितीच्या पहाडाला धडका देऊन गलितगात्र झाली आहेत. संघर्ष करूनही हाती काहीच लागत नसल्याने सभोवताली भकासपण दाटून आले आहे. केविन कार्टर नावाचा छायाचित्रकार दुष्काळाचे चित्रण करण्यासाठी तेथे गेला. एक दिवस धान्य घेऊन गाडी आली. प्रत्येकाने मिळाले ते घेतले. केविन काही चित्रे कॅमेऱ्यात बंदिस्त करून थोडा निवांत बसला. अचानक त्याचं लक्ष एका दृश्याकडे गेले. एक मुलगी- तिच्या देह हाडांचा सापळा झालेला. कशीतरी खुरडत खुरडत ती चालते आहे. चालण्याएवढेही त्राण तिच्या देहात उरलेले नाही. खाली पडलेले धान्याचे दाणे कसेतरी वेचते आहे. तेवढ्यात एक गिधाड तिच्या मागे येऊन थांबते. त्याचे लक्ष त्या मुलीच्या खंगलेल्या देहाकडे लागलेले. गिधाडाच्या डोळ्यात सावज सापडल्याचा आनंद. केव्हा एकदा त्या देहातील चैतन्य संपते, याची त्या गिधाडाला प्रतीक्षा. केविन ते दृश्य कॅमेऱ्यात टिपतो. तो प्रसंग कॅमेऱ्यात कैद करून कायमचा साठवला जातो. १९९४ मध्ये न्यूयॉर्क टाईम्समधून ते प्रकाशित झाले. चित्र पाहून संवेदनशील मनं हादरली. त्या मुलीचे काय झाले असेल, या प्रश्नाने अस्वस्थ झाली. छायाचित्रणासाठी असलेल्या पुलित्झर पारितोषिकाने केविनला सन्मानित करण्यात आले. कोणत्याही छायाचित्रकारासाठी असलेले सन्मानाचे स्वप्न स्वतःहून केविनकडे चालून आले. आपल्याकडे काम करण्यासाठी मागेल तो पगार व पद द्यायला नामांकित नियतकालिकं तयार होती. मान-मरातब सारेकाही मिळाले. पण केविन मात्र विमनस्क, विषण्ण होता. त्याच्या डोळ्यासमोरून दुष्काळाची भेसूर दृश्ये हलायला तयार नव्हती. जगाचं भीषण वास्तव पाहून मनातील संवेदना सुन्न झाल्या. अगतिक माणसांसमोर परिस्थितीने निर्माण केलेले प्रश्न त्याला विचलित करीत होते. समस्यांनी दुभंगलेल्या जगासाठी मी काहीही करू शकत नाही, ही खंत मनातून निघत नव्हती. तो अस्वस्थ झाला. माणसांचे असे जग त्याला नको होते. समोर दिसणारे हाडांचे सापळे, भूकबळी, असहाय उपासमार काहीही केल्या विसरू शकत नव्हता. जग स्वतःच्या सुखाच्या वर्तुळातून बाहेर यायला तयार नव्हते. प्रश्नाचे उत्तर सापडत नव्हते. अखेर एक दिवस त्याने आत्महत्या करून आपल्यापुरते या प्रश्नाचे उत्तर शोधले.

३. सन. १९६९,
व्हिएतनाम आणि अमेरिका संघर्षकाळातील हे एक चित्र. युद्धात सारे नीतिसंकेत गुंडाळून ठेवण्याचा माणूस जातीचा इतिहास तसा खूपच जुना आहे. काहीही किंमत मोजून विजय आपल्याला मिळावा म्हणून अनेकदा अविचाराने वागणे घडत आले आहे. हे माहीत असूनही परत त्याच मार्गाने वर्तण्याचा हा परिपाक. अमेरिकेने नापाम बॉम्बचा (पेट्रोलमध्ये अन्य रसायने- जसे रबर, अल्युमिनियमची भुकटी वगैरे मिसळून तयार करण्यात येतो. पेट्रोलच्या प्रत्येक थेंबाची ज्वलनशीलता वाढून अधिक विनाशकारी ठरतो.) वापर केल्याने माणसांचं जगणं होरपळून निघाले. बॉम्बहल्ल्याने  उडालेल्या आगीच्या लोळांपासून स्वतःला सुरक्षित राखण्यासाठी जीवाच्या आकांताने लहान लहान मुलेमुली रस्त्यावरून पळत आहेत, आपला ओंजळभर जीव वाचावा म्हणून. त्यांच्या भेदरलेल्या डोळ्यात मूर्तिमंत मृत्यू दिसतो आहे. जगण्याचे पाश सहज सुटत नाहीत. पण जगणंच जाळायला निघालेल्या उन्मत्त मानसिकतेला ते सहसा नजरेस येत नाही, कारण डोळ्यांवर स्वार्थपूरित विचारांची पट्टी घट्ट बांधून घेतल्यावर समोरचे काही दिसण्याची शक्यता नसतेच. दिसत असतात फक्त फायद्याची गणिते आणि त्यांच्या पूर्ततेसाठी सारासार विवेक विसरून घडणारं वर्तन. नापाम बॉम्ब्स काय करू शकतात याचं हे भयावह चित्र. ही मुले जणू याचंच प्रतीक बनली.

माणसांच्या जगण्याची ही काही अस्वस्थ चित्रे.

संबंधित घटनांच्या काळात काही वर्षांचे अंतर असले, त्या वेगवेगळ्या ठिकाणी घडल्या आणि त्यांच्या मागे असणारे संदर्भ वेगळे असले तरी वेदनांचा चेहरा मात्र सारखाच. सहृदय माणसांचे हृदय पिळवटून टाकणारा.

विद्यमान विश्वाने विकासाची नवी क्षितिजे निर्माण केली, प्रगतीचे नवे आयाम उभे केले म्हणून आम्ही माणसांनी आपलेच कौतुक करून घेण्यात कोणतीही कसर राहू दिली नाही. मानवजातीच्या कल्याणाच्या वार्ता जग करीत आहे. विज्ञाननिर्मित शोधांनी निर्माण केलेली सुखं सोबत घेऊन समृद्धीची गंगा दाराशी येऊन थांबली आहे आणि तिच्या प्रवाहाने जगण्याच्या प्रांगणात संपन्नता आणली आहे. माणसांसमोर आता कोणतेही जटील प्रश्न जणू शिल्लक राहिलेच नाहीत, अशा आविर्भावात वागणे घडत आहे. माणसे सुखाने जीवनयापन करीत असून त्यांच्या समोरील समस्यांचा गुंता बहुतेक सुटला आहे, असे आभासी चित्र उभे केले जात आहे. वास्तव काय आहे, हे लक्षात यायला आवश्यक असणारे सहजस्फूर्त शहाणपण आपल्याकडे आहे का? असा प्रश्न विचारायची कोणालाच गरज नसल्यासारखे वागणे घडत आहे.

जगाचं वास्तव दिसतं तसं कधीच नसतं. तेथेही विसंगतीच्या, भेदाभेदाच्या असंख्य लहान-मोठ्या, दृश्य-अदृश्य भिंती उभ्या असतात. महासत्ता, विकसित, विकसनशील, अविकसित अशा परगण्यात जगाला विभागून प्रत्येकाला आपआपला फायदा लाटायची घाई झाली आहे. स्वार्थाकरिता कोणी कितीही कुलंगड्या केल्या तरी काही बिघडत नाही, या विचारांवर विश्वास ठेवून वर्तणाऱ्याची वानवा नाही. यातही विशेष असा की, प्रत्येक देश-प्रदेशाच्या वाट्याला येणाऱ्या फायद्याची आणि न्यायाची परिभाषा बदलत असते. तिच्यात प्रसंगानुरूप परिवर्तन घडत असते. सत्तेच्या सारीपाटावर सोंगट्या सरकवल्या जातात. लहान-मोठे प्यादे हाती घेऊन वजिराला कोंडीत पकडून राजाला शह देण्यासाठी खेळ खेळले जातात. आपापले अहं सांभाळण्यासाठी अतर्क्य, असंभव, अवास्तव गोष्टी घडवून आणल्या जातात. फायद्याचे गणित जुळत असते तोपर्यंत विस्तवाशीही खेळले जाते. गरज संपली की, त्याचं सोयिस्कर विसर्जन केलं जातं. स्वार्थाच्या गणिताच्या उत्तरासाठी आपण म्हणू तसे आणि तेच उत्तर देणारी सूत्रे वापरली जातात. नसतील तर तशी तयार करून घेतली जातात. निसटलेच काही हातचे तर पुन्हा नवा खेळ नव्या पटावर मांडला जातो; फायद्याची गणिते नजरेसमोर ठेऊन.

माणसांच्या जगण्याला मोहरलेपण देणारे, माणसाची प्रतिष्ठा राखणारे भेदरहित जग आकारास आणण्याची वार्ता करायची. त्यासाठी एकीकडे त्याला आश्वस्त करायचे आणि दुसरीकडे विसंगतीने नटलेलं आणि रक्तलांच्छित खेळाने रंगलेलं जग सोबतीला आहे ते आहेच. त्याचे विसकटलेले रंग अजूनही माणसांना बदलता आलेले नाहीत. स्वार्थाच्या कलहात सामान्य माणसांचे जगणे उसवत आहे. अविचाराने घडलेल्या कृतीतून विचारांचे प्रवाह अवगुंठित होत आहेत. स्वार्थपरायण विचारांच्या विकृतीने जग फाटतेय, याची जाणीव असून नसल्यासारखे वागणे घडत आहे. सत्तेसाठी, स्वार्थासाठी विधिनिषेधशून्य खेळ खेळत राहायचे आणि सामान्य माणसांनी अशा जगण्याला आपलं नशीब म्हणून स्वीकारायचे, आला दिवस असंख्य प्रश्नांच्या आवर्तात भिरभिरत राहायचे, हे जगण्याचे प्राक्तन होऊ पाहत आहे. नियतीने नशिबी लादलेले भोग घेऊन माणसे धूसर क्षितिजावर दिसणारा सुखाचा एक पुसटसा कवडसा जीवनाच्या प्रांगणात आणण्यासाठी अस्वस्थ वणवण करीत आहेत. जीवनाच्या विसकटलेल्या वाटांनी फाटक्या नशिबाला सांधण्यासाठी चालत आहेत. आज नसेल निदान उद्यातरी नियती कूस बदलून आनंदाचे ऋतू जीवनी आणेल, या आशेवर जगण्यासाठी किमान आवश्यक गरजांची पूर्तता करू शकणाऱ्या प्रदेशाकडे नेणाऱ्या वाटांचा शोध घेत आहेत.

जग कसे आहे, कसे असावे, याबाबत जाणकारांचे मत काही असो, जगाच्या व्यवहाराचे पीळ कसेही असोत. मुत्सद्यांच्या मुद्देसूद विचारांमध्ये जगाचे चित्र काही असो. विचारवंतांच्या विवक्षित विचारांमध्ये जगाची प्रतिमा कशीही आकाराला येवो. सामान्यांच्या आकलनापलीकडील या गोष्टी असतात. कोण चूक, कोण बरोबर, या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घ्यायला त्यांना नियती उसंतच देत नसते. जगण्याच्या अगणित अवघड प्रश्नांच्या भोवऱ्यात ते भिरभिरत असतात. त्यांचं जगणंचं वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यासारखे. असंख्य प्रश्न घेऊन गरगर फिरणारे. त्यांच्या गरजा समृद्धीची बेटे निर्माण करण्याच्या कधीच नसतात. प्रगतीच्या पंखांवर स्वार होऊन आकाशात मुक्त विहरायच्या नसतात. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरांच्या पर्यायांशी त्या निगडित असतात. भाकरीचा शोध त्याच्यासाठी गहन प्रश्न असतो. भुकेने निर्माण केलेल्या वर्तुळाशी त्याचं जगणं करकचून बांधलेलं असतं. जेव्हा त्याच्याकडून भाकरीच हिरावून घेतली जाते, तेव्हा समस्यांचा गुंता वाढत जातो. व्यवहारातील साधेसेच प्रश्न अवघड होतात आणि हाती असलेले उत्तरांचे पर्याय विफल ठरतात. माणसे परिस्थितीने विकल होतात, तेव्हा मनाच्या मातीत गाडून टाकलेला वणवा वेगाने उसळून बाहेर येतो. त्याला कोणी क्रांती नावाने संबोधतात, कोणी परिस्थिती परिवर्तनाचा प्रयोग म्हणतात. अन्यायाविरोधात, सर्वंकष सत्तेच्या अत्याचाराविरोधात, अविचाराविरोधात एल्गार घडतो. संथ लयीत चालणाऱ्या जीवनप्रवाहात वादळे उठतात. प्राप्त परिस्थितीविरोधात संघर्ष घडतो. अशा संघर्षांचे मोल शेवटी सामान्यांनाच चुकवावे लागते. माणूस म्हणून माणसाला मिळणारा सन्मान नाकारला जातो, तेव्हा सन्मानाने जगण्यासाठी हाती शस्त्रे धारण केली जातात. सत्तेच्या सिंहासनाच्या ठिकऱ्या केल्या जातात. राजा, राजपाट बदलूनही स्वस्थता जीवनी यायला तयार नसते, तेव्हा सुखाच्या लहान-मोठ्या तुकड्यांचा शोध घेत माणसांना अन्य क्षितिजे गाठावी लागतात.

अनियंत्रित सत्ताधीशांच्या, अविवेकी आक्रमकांच्या अनन्वित अत्याचारांनी सर्वस्व हरवून बसलेली माणसे दुभंगलेले जगणं सोबत घेऊन रोजचं मरण अनुभवत आस्थेचा ओलावा आणण्यासाठी चालत असतात. जगण्याची छोटीशी आस बांधून समस्यांच्या वावटळीत हरवलेली स्वप्ने शोधत राहतात. डोळ्यांनी दिसणारे आणि सुखांची अनवरत रिमझिम बरसात करणारे जग फक्त काही लोकांसाठीच का? या विचाराने विचलित होतात. एकीकडे मूठभर लोकांसाठी सगळंच असणं आणि दुसरीकडे काहीच नसणं, हा जगाचा खरा चेहरा असू शकत नाही, याची जाणीव घडून येते. आपण उपेक्षित का? नियतीने आपल्याच ललाटी हे भोग का लिहिले असावेत? या विचाराने अस्वस्थ होतात. वेगवेगळे प्रासंगिक मुखवटे धारण करून कष्टकऱ्यांच्या जगण्याचा चेहरा आपल्या फायद्यानुसार बदलणाऱ्या स्वार्थपरायण माणसांनी निर्माण केलेली व्यवस्था याचे कारण असल्याचे जाणवते, तेव्हा परिस्थितीने गांजलेली माणसे दांभिकांनी धारण केलेला बेगडी मुखवटा उतरवण्यासाठी रणक्षेत्री उतरतात. आपलं अस्तित्व आणि अस्मिता शोधण्यासाठी संघर्षाची अस्त्रे, शस्त्रे हाती घेत परिस्थिती परिवर्तनाकरिता सर्वस्व उधळण्याची तयारी ठेऊन दोन हात करीत उभे ठाकतात.

कलहाने फाटलेले आणि संघर्षाने विटलेले जग सोबत घेऊन माणूस किती काळ सुखाच्या शोधात जगणार आहे? अस्तित्वाचा हरवलेला ओलावा शोधण्यासाठी सैरभैर झालेलं, स्वतःची ओळख हरवलेल्या चेहऱ्याचं जगणं आम्ही आमच्या पुढच्या पिढ्यांच्या हाती देणार आहोत का? माणूस म्हणून प्रत्येकाला आपलं स्वयंभू अस्तित्व असणारं जगणं देण्यासाठी काहीच न करणारं जग देणार आहोत का? ज्याच्याकडे स्वतःचे निर्णय घेण्याइतपत प्रज्ञा आहे, असा कोणीही माणूस अविचाराने दुभंगलेल्या आणि संवेदनांनी उसवलेल्या जगास आपले म्हणणार नाही. प्रत्येकास त्याच्या वकुबाप्रमाणे जगण्यालायक अंगण मिळावे, म्हणून आधी आपणास इतरांचा सन्मान करता यायला हवा. माणूस म्हणून इतरांना दिली जाणारी प्रतिष्ठा साहजिकच आपणासही सन्मानाच्या परिघापर्यंत पोहचविते. जगाच्या वर्तनाचे प्रवाह सगळेच वाईट असतात किंवा सगळेच चांगले असतील, असे कधीही नसते. चांगले आणि वाईट यांच्या संयोगाने घडणारे व्यामिश्र वेगळेपण हाती घेऊन अनुकूल ते आणि तेवढेच आचरणात आणणे, यातच माणूसपणाचे सौख्य सामावले आहे. वेगवेगळ्या विचारधारांचा तौलनिक मागोवा घेत; चांगले ते स्वीकारणारे व्यापकपण विचारांच्या विश्वात रुजणे म्हणूनच आवश्यक असते.

माणूस जातीचा इहतलावरील जीवनाचा इतिहास संघर्षगाथा आहे. जगण्याचे असंख्य प्रश्न सोबत घेऊन सहस्त्रावधी वर्षापासून तो चालतो आहे, सुखाचे ओअॅसिस शोधत. आहे ते जगणं समृद्ध करून आणखी काही हवे वाटल्याने वेगवेगळ्या विचारधारांचे परिशीलन करीत तो वर्ततो आहे. असंख्य प्रश्नांच्या गुंत्यातून आपणास हवे ते शोधत राहिला आहे. मुक्त असण्याची उपजत ओढ घेऊन जगत आला आहे. तरीही राज्य, राजसिंहासन, धर्म, जात, वंश, कधी आणखी काही, असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या सहज जगण्याला सीमित करीत राहिले आहेत. जोपर्यंत फक्त माणूस म्हणून माणूस जगत होता, तोपर्यंत त्याला माणूस म्हणणे संयुक्तिक वाटत असे; पण माणूसपणाच्या मर्यादांना ओलांडून आपले अहं सुखावण्यासाठी त्याने इतरांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला, तेव्हा त्याच्या जगातून आधी माणुसकी हरवली आणि त्यामागे विचारांचे उसवलेपण आले. स्वाभाविक जगण्याला तिलांजली दिली गेली. सहज प्रेरणांनी प्रेरित जगण्याच्या प्रवाहांना पायबंद पडला. स्वातंत्र्याचा संकोच होत गेला. वेगवेगळ्या प्रासंगिक अपेक्षांच्या चौकटीत बंदिस्त होताना माणसांचं जगणं अधिक जटील होत आहे. प्रश्नांच्या गुंत्यात गुरफटलेली माणसे ओंजळभर सुखाच्या शोधात धावत आहेत.

वैयक्तिक स्वार्थ साधणारे सारे विधिनिषेध विसरून स्वार्थाच्या वर्तुळांची भक्कम तटबंदी करून आपले परगणे सुरक्षित करीत आहेत. माणसांसमोरील सगळ्या प्रश्नांचे मूळ अविचाराने घडणाऱ्या कृतीत असते. तसेच आपण वागतो आहोत, ते आणि तेवढेच योग्य आहे, असे समजण्यातही असते. ज्याला माणूस म्हणून जगण्याची प्रयोजने समजतात त्याला जगावे कसे, हे प्रश्न सहसा पडत नाहीत. पण हल्ली विचारांचं व्यापकपण सोबतीला घेऊन वर्तणाऱ्याची वानवा नजरेत भरण्याइतपत जाणवत आहे. समाजाच्या संवेदनांचे प्रवाह संकुचित होणे सांस्कृतिक तेजोभंग असतो. सांस्कृतिक पडझड माणसांना नवी नाही. माणसाच्या इतिहासाचे ते अविभाज्य अंग आहे. पडझडीनंतर उठून पुन्हा उभं राहण्यात संस्कृतीचे सामर्थ्य सामावलेले असते. पुनर्निर्माणाची ताकद गमावलेली माणसे विकासगामी पथ निर्माण करण्याची क्षमता हरवून बसतात. ज्याला परंपरांचे पायबंद पडतात ते आनंदाचे नवे प्रदेश निर्माण करू शकत नाहीत. संवेदनांचे विस्मरण घडलेला समाज माणसांच्या मनात आकाशगामी आकांक्षांचे दिवे प्रदीप्त करू शकत नाही. विचारांचे तेजस्वीपण हरवलेली पराभूत मानसिकता आस्थेचा कवडसा शोधायला निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या अंधारल्या वाटा उजळू शकत नाही.

एक मरे दुजा त्याचा शोक वाहे, नकळत तोही पुढेच जात आहे, असे म्हणतात. आरंभ, स्थिती, लय क्रमाने प्रत्येक जिवाची जीवनयात्रा सुरु असते. देहासह नांदणारे चैतन्य एक दिवस संपते. शिल्लक काहीही उरत नाही. उरल्याच तर स्मृती; तेही संबंधितांचे कार्य त्या रुतब्याचे असेल तर, अन्यथा अनेक जीव जसे जन्माला आले आणि गेले त्यातला हाही एक. पण एखाद्याच्या जाण्याने अनेकांच्या पापण्यांच्या कडा ओलावतात. त्यांच्या जाण्याने अनामिक अस्वस्थता निर्माण होते. ओळखीचे कोणी असेल तर माणसे हळहळतातच; पण जगात अशीही काही माणसे असतात, ज्यांना आयुष्यात आपण कधीही पाहिले नसते. ना त्यांचा देश ठाऊक असतो, ना त्यांचे नाव-गाव ठावूक असते, तरीही त्यांचे अनपेक्षितपणे जाणे समोर येते आणि माणसे अस्वस्थ होतात. त्यांच्यातील माणूसपणाला देश, प्रदेश, धर्म, पंथ, जातीची कुंपणे नाही बंदिस्त करू शकत. ज्याच्याजवळ मनाचं नितळपण शिल्लक आहे आणि संवेदनांनी गहिवरणारी मन नावाची अमूर्त; पण सहवेदना बनून प्रकटणारी भावना आहे, त्यातून प्रकटणारी स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून डोळ्यांमध्ये आसवांचे दोन थेंब आहेत अशी माणसे अस्वस्थ होतात, हे अस्वस्थपण माणसातील माणूसपण शिल्लक असल्याचे द्योतक असते.

Shodh | शोध

By // 6 comments:
माणूस इहलोकी जन्माला येतो तो नियतीने दिलेलं गाठोडं सोबत घेऊन. नियतीने रेखांकित केलेल्या जीवनरेषेवरून त्याचा जगण्याचा प्रवास घडत असतो. ही रेषा सरळसोट असेलंच असे नाही. बऱ्याचदा ती वेगवेगळी वळणं घेऊन पुढे सरकत असते. माणसं चालत राहतात परिस्थितीने नेमलेल्या मार्गावरून काहीतरी शोधत. जे त्याला खुणावत असते आपल्याकडे येण्यासाठी. त्यातून लागते हाती काही, काही निसटते. सुटले ते मिळवण्याकरिता सुरु होतो पुन्हा शोध. माणसं धडपड, धावाधाव करीत राहतात. ज्याचा शोध घेत होते ते हाती लागल्याने सुखावतात. शोधूनही हवं ते न मिळाल्याने निराश होतात. मार्ग अवरुद्ध होत जातात. आलेल्या अपयशाशी दोन हात करीत उभं राहण्याची उमेद अशी सहज टाकता नाही येत, म्हणून परिस्थितीशी धडका देत राहतात. प्रश्नांचा गुंता वाढत जातो. त्यांचे पीळ सैल करीत, गाठी-निरगाठी सोडत माणसांची शोधयात्रा सुरु असते. कोणास काय हवे, ज्याचे त्याला माहीत; पण हे शोधणंच माणसांच्या जगण्याला विश्वास देत असते. हा विश्वास जीवनात लहानसहान गोष्टीतून मिळणारा आनंद निर्माण करण्यासाठी प्रेरित करीत राहतो.

माणसांचं जगणं हीच एक शोधयात्रा आहे. त्याच्या आदिम अवस्थेपासून ती सुरु आहे. निसर्गाच्या सानिध्यात टिकून राहावं कसं, या प्रश्नाचा शोध त्याच्या जीवनाच्या शोधयात्रेचा प्रारंभ होता. निसर्गाचा न्यायच कठोर असल्याने तेथे पुनर्विचार नाही. चुकांना क्षमा नसते. एक चूक आयुष्याचा शोध संपण्याचे कारण ठरू शकते, म्हणूनच सुखमंडित जगण्यासाठी अनुकूल पर्यायांचा शोध घेणं त्याची आवश्यकता होती. उपजीविकेची प्रगत साधने हाती नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न नित्याचाच होता. भाकर कमावण्याचे तंत्र अवगत नसल्याने जिवंत राहण्याकरिता शिकारीमागे धावाधाव करणे गरजेचे होते. एवढे करूनही हाती काही लागले नाही की, हताश होण्याशिवाय काही उरत नसे. अशावेळी भुकेचा प्रश्न सोडवण्यासाठी अन्य पर्याय तपासून पाहण्याची गरज निर्माण झाली असेल. कालांतराने काही विकल्प हाती लागत गेले. जीवन स्थिरचित्त होण्याच्या दिशेने निघाले. निसर्गाच्या सानिध्यात विहरताना अनेक गोष्टी दिसत गेल्या, त्यांची चिकित्सा होत गेली. जगण्याला अनुकूल असणाऱ्या गोष्टी स्वीकारल्या गेल्या. धरतीतून अंकुरित होणारी रोपटी भाकरीच्या शोधाचे उत्तर असू शकते याची जाणीव झाली. शेतीचा शोध लागून भाकरी हाती आल्याने आपणाकडे आणखी काही असावे असे वाटायला लागले. जिज्ञासा, कुतूहल उपजतच असल्याने स्थिरचित्त झालेल्या मनात अन्य गरजांचा शोध घेण्याची आकांक्षा निर्माण झाली. जीवनाच्या विकासक्रमातील प्रगतीचे एकेक टप्पे प्रासंगिक गरजपूर्तीच्या उत्तरांचा शोध होता. माणूस तंत्रज्ञान निर्माण करणारा जीव असल्याने ज्ञान, तंत्रज्ञान, विज्ञान, कला, साहित्य आदी क्षेत्रात त्याच्या प्रज्ञेचा प्रकाश पडायला लागला. वास्तव्याच्या ठिकाणी भिंतींवर कोरलेल्या साध्याशा रेषेपासून नाना रंगांनी मंडित जगण्याच्या आविष्कारांपर्यंत घेतलेली झेप त्याच्या सामाजीकरणाच्या वाटेवरील सहज प्रेरणांचा शोध होता.

माणूस आज ज्या स्थानी येऊन पोहचला आहे, तेथपर्यंतचा प्रवास त्याच्या प्रामाणिक परिश्रमांची शोधगाथा आहे, त्याच्या आकाशगामी आकांक्षांचे फलित आहे. अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत पोहचण्यामागे माणसांची शोधवृत्तीच महत्त्वाचे कारण ठरली आहे. मनात उदित होणाऱ्या अनेक प्रश्नांनी त्याच्या प्रवासाला दिशा दिली. प्रश्नांकित समस्या त्याला अपरिचित परगण्याच्या शोध घेण्यास प्रेरित करीत राहिल्या. मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांनी समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अज्ञात प्रदेशांचा शोध घेण्यास उद्युक्त केले. विश्वाचे गूढ त्याच्या भटकंतीच्या आयुष्यापासून सोबत होतेच. ते जाणून घेण्याच्या इच्छेतून अनेक घटनांचे अन्वयार्थ लावीत तो अज्ञाताचा शोध घेत राहिला. आपण इहतली आहोत, तसेच विश्वात अन्यत्र कुणीतरी जीव अस्तित्वात असतील का? या प्रश्नाच्या शोधासाठी विज्ञानतंत्रज्ञानाचे पंख लेऊन अवकाशात भराऱ्या घेतो आहे. मनी विलसणारे कुतूहल त्याच्या शोधदृष्टीचा परीघ विस्तारत नेण्याचे कारण आहे. धरतीवर जीवनयापन घडताना अनेक जीवजातीसोबत वावरतो आहे. जीवनयात्रा घडते कशी, या प्रश्नाचा धांडोळा घेतो आहे. कितीतरी गोष्टी शोधूनही मनाला स्वस्थता लाभत नसल्याने त्याला आणखी काही हवे आहे. हवं ते मिळणे त्याच्यासाठी सुखाचा शोध आहे. सुख माणसांची सार्वकालिक गरज आहे. पण सुख म्हणजे काय? याचाच शोध अद्याप लागायचा आहे. कुणाला सत्तेचं सुख हवं आहे, कुणाला संपत्तीत सुख गवसतं, कुणाला पदांमध्ये प्रतिष्ठा दिसते. कुणाला आणखी काही हवं आहे. हे काहीतरी मिळणं महत्त्वाचं वाटल्याने, ते मिळवण्याकरिता सगळेच पर्याय तपासून पाहतो आहे.

माणूस समाजशील प्राणी असल्याचे म्हणतो. समाजाचं जगणं संपन्न होण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज असते. सर्वांच्या सहकार्याचा परिणाम समाजजीवनाचा विकास असतो. माणूस समाजाचा घटक असल्याने त्याच्या मनात उदित होणाऱ्या भावभावनांना सत्प्रेरित विचारांच्या कोंदणात अधिष्ठित करण्याची गरज सामाजिक जाणिवांचा शोध होता. सहकार्य भावनेतून घडणारा माणसाचा प्रवास उन्नतीकडे घडतो, उदात्त विचारांची प्रतिष्ठापना करण्यास कारण होतो. सर्वांचे वर्तन नीतिसंमत असावे म्हणून जगण्याच्या चौकटींना मर्यादांची कुंपणे घातली. बंधनांच्या शृंखलांनी स्वतःला सीमित करून घेतले. शोध माणसाची सार्वकालिक आवश्यकता आहे. तिचा कधी शेवट होत नाही. एका शोधाचा शेवट दुसऱ्याचा आरंभ असतो. आहे त्यापेक्षा आपल्याकडे अधिक काही असावे, असे वाटण्याच्या भावनेचा तो परिपाक असतो. सार्वजनिक व्यवहारात वर्तताना जबाबदारीचे विकेंद्रीकरण घडणे आवश्यक असते. पण सगळ्याच गोष्टी काही सामाजिक मर्यादांच्या चौकटींमध्ये अधिष्ठित करता येत नाहीत. बऱ्याच बाबी वैयक्तिक सुखांच्या वर्तुळांना वलयांकित करतात. तोही त्याच्यापुरता शोधच असतो. हव्यासापायी कुणी पदाचा, प्रतिष्ठेचा, पैशाचा शोध घेतात. मर्यादांची बंधने विसरून वर्ततात. जवापाडे सुख हाती लागावे, म्हणून पर्वताएवढ्या दुःखाला सामोरे जातात. वैयक्तिक सुख हव्यासात बदलत नसेल तर सकारात्मक अर्थाने तो आनंदाचा शोध असतो. हव्यासाचा अतिरेक विसंगतीचे कारण ठरते. माणसांच्या स्वकेंद्रित, स्वार्थलोलुप जगण्याचा त्याग घडणे समाजाची आवश्यकता असते. म्हणूनच सद्विचारांच्या वाटांनी माणसांची पावले वळती करून जगण्याला दिशा मिळावी असे वाटणे हा सत्प्रेरित विचारांचा शोध असतो.

शोध सगळेच चांगले असतील असे नाही. प्रबोधनयुगातील बदलत्या विचारधारांनी माणसांच्या जीवनात क्रांती घडवली. पण सोबत स्वार्थलोलुप विचारही मोठे झाले. स्वार्थपरायण विचारधारांनी सर्वसामान्यांचे जिणे दुःसह केले. समाजाच्या रचनेच्या चौकटी बंदिस्त केल्या. विषमतेने, अन्यायाने, अत्याचाराने कळस गाठला, तेव्हा अन्यायग्रस्त समूह क्रांतीचा उद्घोष करीत माणसाच्या मुक्तीगाथा लेखांकित करता झाला. माणसांच्या सामाजिक सुखांसाठी घेतलेल्या शोधाचा परिणाम या क्रांती होत्या. साम्राज्यवाद, वसाहतवाद सामाजिक अभिसरणातील व्यवधाने होती. त्यांचा शेवट करणाऱ्या मार्गाचा शोध व्यवस्थापरिवर्तनाच्या मार्गावरील विसावा होता. परिस्थिती परिवर्तनासाठी कुणी हाती शस्त्रे घेतली, कुणी शास्त्रे, कुणी लेखण्या. माणसे आपापल्या मार्गांनी परिवर्तनाचा शोध घेत होती. कोलंबसला सागरी मार्गाने भारताकडे यायचे होते. जुजबी माहितीच्या आधारावर सफर करणे त्याच्यासाठी जसा शोध होता, तसा जगासाठीही काहीतरी मिळवण्यासाठीचा शोधच होता. जगाचा अंधार दूर सारण्याची किमया करू शकणारा अणू विभाजनाचा प्रयोग जगात कायमचा अंधार निर्माण करू शकतो, हे ज्ञात असूनही त्याचा शोध घेण्याची इच्छा सामरिकदृष्ट्या सक्षम बनू पाहणाऱ्या लालसेचा शोध होता. पाण्यात माशासारखे सूर मारण्याचे स्वप्न पाणबुड्या आणि जहाजांच्या शोधाचे कारण होते. डोक्यावरील निळ्याशार आभाळाची विशाल पोकळी विहरण्यासाठी माणसांना खुणावत होती. पक्षांचे पंख घेऊन आपण विहार करू शकतो का, या प्रश्नाचे उत्तर विमानांचा शोध आहे. कुणीतरी युरी गागारीन अवकाशात जाऊन परत येतो. तेथे आणखी काही आहे का, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मार्ग मोकळा होतो. न्यूटनच्या अंगावर पडणारे सफरचंद गुरुत्वाकर्षणाचा शोध ठरते. एडिसनचा दिवा जगातला अंधारा कोपरा उजळवणारा शोध ठरतो. चाकाच्या शोधाने जगाला गती दिली. प्रगतीवर पंखांवर स्वार झालेले विद्यमान विश्व जीवनाच्या नव्या प्रेरणांचा शोध घेत आहे. ग्लोबलायझेशनच्या चक्रावर आरूढ होऊन प्रवासास निघालेल्या जगाच्या सीमा लहान होत आहेत. बदलत जाणाऱ्या संदर्भांना आपल्यात सामावून जग नव्या अर्थकारणाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा शोध घेऊ पाहतेय.

गौतम बुद्धांची तपःसाधना जीवनातील शाश्वत सत्यांचा शोध होता. गांधीजींचे सत्याचे प्रयोग स्वतःच स्वतःचा घेतलेला शोध ठरला. छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक महाराष्ट्रीय अस्मितांचा शोध म्हटला गेला. विश्व स्वधर्म पाहो अशी आकांक्षा करणाऱ्या ज्ञानदेवांनी विश्वमानवाच्या कल्याणाचा शोध घेण्याचा विचार अनेक मनात रुजवला. बुडती हे जण देखवे ना डोळा म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांच्या हृदयातले दुःख व्यवस्थापरिवर्तनाचा प्रयोग होता. वंचितांच्या वेदनादायी जीवनात प्रज्ञेचा प्रकाश निर्माण करण्यासाठी त्यांच्या अंतरंगातला दीप प्रज्वलित करून माणूस म्हणून जगण्याची अस्मिता देणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा संवेदनशील विचार वर्णव्यवस्थेच्या, जातीपातीच्या शृंखलातून मुक्तीचा शोध होता. अडाणी, अशिक्षितांना आत्मभान देऊन माणूसपणाची जाणीव निर्माण करू पाहणारा महात्मा फुल्यांचा कर्मयोग समतेवर आधारित व्यवस्था निर्मितीचा प्रयोग ठरला. कुष्ठरोग्यांच्या आयुष्याच्या उजाड झालेल्या बागेत आत्मविश्वासाची रोपटी लावून त्यांच्या जीवनातला हरवलेला वसंत फुलवण्यासाठी उभं राहिलेलं आनंदवन बाबा आमटेंच्या सहृदय विचारांच्या निर्मितीचा शोध आहे. एकेका शोधासाठी स्वतःला वर्षानुवर्षे प्रयोगशाळेत गाडून घेणारा वैज्ञानिक, रात्रंदिवस आभाळाकडे टक लावून पाहत बसणाऱ्या खगोलशास्त्रज्ञाच्या मनात लुकलुकणाऱ्या असंख्य प्रश्नांच्या चांदण्या शोधाचे तारे बनून चमकतात, तेव्हा कोणत्यातरी ग्रहाचे स्थान नवे नाव धारण करून माहितीच्या जगात वास्तव्यास येते.

सर्वांभूती समन्वय साधणाऱ्या सत्यान्वेषी विचारांचा शोध माणुसकीच्या परित्राणासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयासांचा परिपाक असतो. या मार्गाने चालण्यासाठी माणसांना प्रेरित करणारा विचार सहजभावनेने जगण्याचा आविष्कार असतो. समाजाच्या जगण्याला दिशा मिळावी या अपेक्षेने विचारांचे पाथेय सोबत घेऊन चांगुलपण शोधण्यासाठी निघालेल्या माणसांच्या शोधयात्रेचे फलित जगण्याला आलेला मोहोर होतो. काहीतरी करू पाहणाऱ्या जिद्दीची ती लोभसवाणी रूपे असतात. माणूस लाखो वर्षापासून जगात भटकतो आहे. त्याच्या भटकंतीला निर्णायक दिशा देण्याचे काम शोधदृष्टीने केले. सृष्टीतील नवलाई शोधण्याची दृष्टी देणारी शोधयात्रा त्याच्या जगण्याचा परिघ व्यापक करीत आहे. विश्वातील अनेक गोष्टी माणसाने शोधल्या; पण एक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेच, त्याला स्वतःचा शोध लागला आहे का? तो चंद्रावर जाऊन आला. मंगळावर जाण्याचे मनसुबे रचतो आहे; पण स्वतःच्या मनापर्यंत पोहचून आपण आपलाच शोध घेतला का? आपल्या जगण्यात असणारी अनेक वैगुण्ये अजूनही आहेत तशीच आहेत, याची जाणीव त्याला आहे का? लालसा, स्वार्थ जगण्यातून निरोप का घेत नाही? माणसांचं मन विकारांचे माहेर आहे असे म्हणतात. तो विकारांनी घडला आहे, हे माहीत असूनही विकारांचा शेवट करणाऱ्या मार्गाचा शोध अद्याप का घेता आला नसेल? समाजात अनेक दूरिते आजही आहेत. त्यांचा शेवट करण्याच्या उपायांचा शोध कधी होणार आहे? विश्व समजून घेतले, पण माणूस अजून समजायचा आहे. त्याच्या मनात काय आहे याचा शोध घ्यायचे तंत्र अवगत व्हायचे आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही, नाही का?