कविता समजून घेताना... भाग: बारा

By // No comments:

ब्र

 

बाईमाणूसच्या निमित्ताने पुन्हा एकदा
'स्त्रीवादा'चा प्रश्न
ऐरणीवर टांगू की?
कसा?
की, खोलवर मिटलेली कळ
तशीच दाबून ठेवू?
प्रश्न उत्तरांच्या अर्थहीन चक्रव्यूहात
फिरता फिरता
एका भोवऱ्यातून दुसऱ्या भोवऱ्यात अडकणारी मी
माझ्याच मनाचा तळ
कधी गवसला नाही मला
अन् त्या बद्दल 'ब्र' तरी काढणार कसा?

युगा युगाच हे 'वादाचं' भांडण
माझंच माझ्याशी,
कधीच न संपणारं
अन् त्या बद्दल मी 'ब्र' तरी काढणार कसा?

मागे मिटलेल्या दिशा
समोर पोकळी
अन् संपून गेलेल्या वाटेशी पुन्हा एकदा
येवून पोचलेली मी एकटी
मला चालायचंय
नवी वाट उलगडण्यासाठी
मुक्कामावर पोहचण्याची घाईही नाही
कारण उद्याचा सूर्य
माझ्याच ओंजळीतून उगवणार
खात्री आहे मला
पण हे असंच मनात दाबून ठेवायचं
की, त्या बद्दल 'ब्र' काढायला शिकायचं
'ब्र' काढायला शिकायचं!
- अरुणा दिवेगावकर
*

‘बाई’ या शब्दात एक अंगभूत वेदना सामावलेली आहे. तिला नाव असलचं पाहिजे असं नाही अन् अर्थ असायलाच हवेत असंही नाही. ती केवळ आणि केवळ स्त्री आहे, एवढं कारण त्याकरिता पुरेसे असते. व्यवस्था तिला वर्षानुवर्षे गृहीत धरत आली आहे. आणि पुढे त्यात फार काही आमूलाग्र वगैरे परिवर्तन घडेल असे वाटत नाही. ‘ती’ केवळ ‘तीच’ कशी राहील, याकरिता परंपरांनी कोणतीही कसर राहू दिली नाही. तिच्याकडे तिचं स्वतःचं असं काही मत असू शकतं. ती स्वतंत्र विचार करू शकते. तेवढी प्रगल्भता तिच्याकडे आहे. हे मान्य करणे अवघड का वाटत असावे? तिच्या मनात सुखांची काही संकल्पित चित्रे असतात. त्यांच्या पूर्ततेसाठी ती काही करू पाहते. हे पुरुषपणाला प्राधान्य देणाऱ्या संस्कारात सहज मान्य होण्यासारखे नसते. तिने तिच्या ‘बाई’ असण्याच्या मर्यादांना स्मरून वर्तावे. आखून दिलेल्या चाकोऱ्या आणि ओढून दिलेली वर्तुळे वेढून प्रदक्षिणा कराव्यात. त्यांचे परीघ विस्तारण्याचा प्रयास करू नये. भोवतीची कुंपणे पार करून मर्यादांचा अधिक्षेप करू नये. असंच काहीसं प्रघातनीतीच्या परिघात वर्तनाऱ्यांना वाटत आलं आहे.

परवशतेचे पाश जखडले असतील, तेथे मुक्तश्वास वाट्यास येणे अवघड असते. स्त्रीचे वस्तूकरण करून तिच्यावर मालकी सांगणारा विचार कित्येक वर्षांपासून येथे रुजला असल्याने, त्याचा पीळ सैल होणे अशक्य नसलं, तरी अवघड आहे. पुरुषाची मालकी सांगणाऱ्या निशाण्या आजही स्वच्छेने म्हणा किंवा परंपरेने दिल्यात म्हणून ‘ती’ मिरवते आहे. गळ्यातील मंगळसूत्र, माथ्यावरील कुंकू, पायातील जोडवे, हातातील बांगड्यांना सौभाग्यालंकार नावाने मंडित करून, प्रतिष्ठाप्राप्त परगण्यात अधिष्ठित केलं. अशा आभूषणांचा वापर स्त्री म्हणून जगण्याची सम्यक पद्धत असल्याचे तिच्या मनावर अंकित केले जात असेल अन् तसंच घडविलं जात असेल, तर प्रतिकाराची मूळं रुजण्यासाठी अवकाश मिळतेच किती? परंपरांनी बांधलेली बंधने स्वीकारावीत किंवा नाकारावीत, हा वैयक्तिक प्रश्न आहे. पण बंधनंच अभिमानाने मिरवण्यात धन्यता मानली जात असेल, तर त्यात प्रतीकात्मकता उरतेच किती? अशा चिन्हांकित अस्मिता आम्हांला नकोत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस किती जणांकडून होत असेल? समजा कोणी केलं तसं काही, तर तो अधिक्षेप कसा काय ठरू शकतो? अर्थात, याविषयी मतमतांतरे असू शकतात. कोणाला यात केवळ प्रतीकात्मकता दिसेल. कोणाला सौंदर्य, कोणाला परंपरेने दिलेलं संचित, तर काहीना परवशता. अर्थात, हा ज्याच्या-त्याच्या मतांचा किंवा आकलनाचा भाग.

ज्या व्यवस्थेच्या चौकटींमध्ये स्त्रियांची बंधमुक्ती फारशा गांभीर्याने घेतली जात नसते, तेथे सुधारणांना संधी अशी असतेच किती? विज्ञानतंत्रज्ञानाने विद्यमान विश्वाचे वर्तनप्रवाह बदलले. परिवर्तनाचे प्रवाह नव्या उताराने वाहू लागले. प्रगतिप्रिय विचारधारांना नव्या दिशा, नवी क्षितिजे साद देत आहेत. काळ कूस बदलतो आहे, पण तिच्या ‘ती’ म्हणून असण्याची संगती लागली आहे, असे म्हणता येत नाही. ती साक्षर झाली असेलही, पण स्वतंत्र झाली काय? तिच्या विचारांचे विश्व विस्तारले. उंबरठ्याबाहेर टाकलेल्या तिच्या पावलाने परंपरांच्या परिघाचे सीमोल्लंघन घडले. आकांक्षेची क्षितिजे तिला साद देऊ लागली. पण अशा किती मानिनी आहेत, ज्या परंपरेच्या पाशातून मुक्त झाल्या? ‘माझं घर माझा संसार’ या चौकटीतच ती आजही आत्मशोध घेते आहे. ती मुक्त आहे असे वाटत असेल, पण ही मुक्तताच तिला परत त्याच वर्तुळावर आणून उभी करते. मान्य आहे सगळंच आभाळ काही अंधारून आलेलं नाही. आशेचा कवडसा दिसतो थोडा. पण त्याच्या प्रकाशात पायाखालच्या वाटा उजळून टाकण्याइतकं सामर्थ्य आहेच कुठे? संयोगवश ज्यांना संधी मिळाली, त्या शीर्षस्थानी पोहचल्या. पण राहिलेल्याचं काय? मोठा समूह आहे तेथेच आहे. त्यांच्या ललाटी लिहिलेले अभिलेख काही बदलत नाहीत.

तिच्या असण्यात तिचं स्त्रीपण शोधलं जातं, तेव्हा तिचं स्वतःचं अस्तित्व तिच्यासाठी उरतंच किती? कोणातरी पुरुषाच्या नजरेतून तिच्याकडे पाहिले जाते. तिथे तिचे असणे फारसे महत्त्वाचे नसते, तर दिसणे महत्त्वाचे असते. वर-वधूसूचक जाहिरातींमधील वधू आजही गौरवर्णांकित, सुस्वरूप, सुंदर, गृहकृत्यदक्ष अशीच असते. पुरुष सोज्वळ, संयमी, समजूतदार असण्याची आवश्यकता नसते का? नसावी! कारण परंपरा तिच्या सौंदर्याची परिभाषा करतात, त्याच चौकटीत तिने स्वतःला मढवून घ्यायचे, दिसायचे आणि वागायचेसुद्धा. मुक्तीचे मोकळे श्वास घेण्यासाठी काही आवाज प्रातिनिधिक रुपात स्पंदित होत असतील, तर तो परिवर्तनाचा स्वतःपुरता प्रारंभ का ठरू नये? व्यवस्थेच्या वर्तुळात गरगर फिरणारी कितीतरी आयुष्ये परंपरेचे ओझे सोबतीला घेऊन संघर्ष करीत गाव-वस्ती, वाड्या-पाड्यावर झगडत आहेत, कधी दैवाला, तर कधी परिस्थितीला दोष देत. समाजात सगळंच आलबेल चाललेलं असतं असंही नाही. नजरेआडचं वास्तव वेगळंही असू शकतं. व्यवस्थेत काळानुरूप बदल घडवावे लागतात. व्यवस्थेत राहूनच ते करायचे असतात. बदलांना सर्वसंमतीचा अर्थ असायला लागतो. याबाबत संदेह असण्याचं कारण नाही. व्यवस्था प्रयत्नपूर्वक घडवावी लागते. घडणीचा काळ कधीच लहान नसतो. त्याची वाटचाल अव्याहत सुरूच असते.

पुरुषाच्या सत्तेवर आणि मत्तेवर चालणाऱ्या जगात बाई म्हणून जगण्यात वाट्याला येणाऱ्या व्यथा, वेदनांना ही कविता मुखरित करते. कवयित्री व्यवस्थेला काही प्रश्न विचारू पाहते आहे. प्रश्न साधेच असले, तरी त्यांची उत्तरं सोपी नाहीत. व्यवस्थेचे बुलंद बुरुज ध्वस्त करूनच ती मिळवावी लागतील. संघर्ष करताना झालेल्या जखमांचे कढ मनातल्या मनात जिरवावे लागतील. वेदनांचे आवाज मनाच्या मातीत गाडून टाकता येतीलही; पण त्यांची ठसठस कशी विसरता येईल? एका किंतुचे उत्तर शोधावे, तर दुसरे दहा परंतु प्रश्न बनून समोर उभे ठाकतात. उत्तरांनाही अर्थ असायला लागतात. प्रासंगिक परिणामांचा विचार करून त्यांना सुनिश्चित परिमाण द्यावे लागते. कातळावर पाणी कितीही पडत राहिले, तरी तेथे अंकुरण्याची शक्यता शून्य असते. उत्तरांच्या व्यूहात गरगरण्यात प्रदक्षिणेशिवाय हाती काही लागण्याची शक्यता नसली, तरी परिस्थितीला भिडण्यात प्रयत्नांचे अर्थ सामावलेले असतात. समस्यांच्या एका आवर्तातून दुसऱ्यात ओढले जातांना मनाचा तळ ढवळूनही काही गवसत नाही. प्रश्नांनी ढवळलेल्या तळात क्षणभर क्षीण हालचाल होते. त्याच्या गढूळलेल्या पटलाआड प्रश्न तसेच राहतात.

वाद व्यवस्थेच्या कठोर काळजावर चरे ओढण्याचा आहे. तसाच आपणच आपल्याशीही आहे. काही संघर्ष सत्वर संपणारे नसतात. कदाचित स्त्री म्हणून जन्मासोबतच ती तो घेऊन आलेली असते. केवळ नियतीने ललाटी लिहिलेले हे अभिलेख आहेत, म्हणून परिस्थिती मान्य केली असेल आणि परंपरा म्हणून मान्यता मिळत असेल, तर पारतंत्र्याशिवाय उरतेच काय हाती? पारतंत्र्यात कसले आलेत मुक्तीचे पंख? अन् आकांक्षांचे आभाळ? प्रवासाला परंपरांचा पायबंद पडला की, प्रयत्न वांझोटे ठरतात. परिवर्तनाचे पलिते हाती घेऊन निघालेल्याच्या वाटेवर पावलापुरता प्रकाश मिळत राहावा, म्हणून अंतर्यामी आस्थेची एक पणती सतत तेवती राहायला लागते. आकांक्षांची रोपं रूजण्यासाठी आतूनच ओलावा असावा लागतो. आपलेपण घेऊन वाहणारे प्रवाहच आटले, तर रुजण्याची आस घेऊन कोणत्या प्रदेशाकडे निघायचे? हरवलेल्या वाटा शोधण्यासाठी कोणत्या दिशांकडे बघायचं?

पाठीमागे हरवलेल्या दिशा आणि समोर परिस्थितीने पुढ्यात आणून उभा केलेला अंधार संपलेल्या वाटेच्या त्याच वळणावर आणून उभा करतो आहे. सोबत आहे केवळ एकटेपणाची. पण मनातलं चांदणं उमेद कायम राखून आहे. अन् डोळ्यात स्वप्ने उद्याच्या प्रकाशाची. अंधारल्या वाटांवरील प्रवासाला रस्ता असतो; पण मुक्कामाची ठिकाणे नसतात. पण अंतर्यामी उमेदीचे कवडसे जागे असतील, तर वाटा जाग्या होतात. चालणाऱ्याच्या पावलांसोबत भाग्य चालते. नियतीलाही ते थांबवता येत नाही. खरंतर हा संघर्ष लवकर पूर्णत्वास जाणार नाही, याची जाणीव असणारी कवयित्री नव्या वाटेने भाग्योदयाची सूत्रे शोधू पाहते आहे. मुक्कामाचं ठिकाण खूप दूर आहे. वसतीला जायचं तर दमछाक होईल. पण अंतरीची आस सोडून हरवलेली क्षितिजे कशी शोधता येतील, याचंही भान तिच्या मनात कायम आहे. काळाच्या म्हणा, नियतीच्या म्हणा किंवा आणखी काही म्हणा, यांनी फार फरक पडतो असे नाही. परिस्थितीच्या परिघात काही वेगळीच समीकरणे नांदत असतात. असली तरी, ती सोडवण्याची उमेद मलूल व्हायला नको. आशेचे कवडसे मनाच्या कोपऱ्यात कायम असले की, आस्थेचे अर्थ आकळायला लागतात.

प्राक्तनाचे अभिलेख नव्याने अभिलेखित करता येतात. आत्मसन्मानार्थ काही हवं असेल तर वणवण घडतेच. कदाचित ही शोधयात्रा एकटीची असेल. उदयाचली येणाऱ्या आकांक्षा मनाच्या आसमंतात आस्थेच्या किरणांची पखरण करीत आयुष्याला नवे अर्थ देतील. तो सूर्य उगवणार आहे, हा आशावाद आहेच. पण तो कुठल्या डोंगराचा माथा धरून नाही, तर ओंजळीतून. हाताच्या रेषात भविष्य असते की नाही, माहीत नाही. पण प्रयत्नरत असणाऱ्या हातांच्या मिटलेल्या रेषांमध्ये ते पेरलेलं असतं. मनात घोंगावणारी वादळे किती काळ थांबवता येतील? माहीत नाही. उधाणलेल्या लाटा किनाऱ्यावर धडका देतीलच. विचारांचा कल्लोळ उफाणून वर येणारच नाही कशावरून? तिला गोठलेल्या शब्दांना आवाज अन् विसकटलेल्या बोलांना गाणे द्यायचे आहेत. अपेक्षांच्या चौकटीत रंग भरायचे आहेत. स्वप्नांना अर्थ अन् आकांक्षांच्या पंखाना आभाळ आंदण द्यायचं आहे... पण त्यासाठी प्रतिकाराचा आवाज प्रतिध्वनी बनून आसपासच्या आसमंतात निनादायला हवा, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
**

कविता समजून घेताना... भाग: अकरा

By // No comments:
फूल होऊनी फुलावे वाटते

फूल होऊनी फुलावे वाटते
गंध द्यावा...ओघळावे वाटते

पाहुनी डोळ्यात माझ्या आज तू
भाव सारे ओळखावे वाटते

मीच वेडी साद घालू का अशी?
एकदा तू बोलवावे वाटते

बंधनांचा पिंजरा तोडून हा
मुक्त आकाशी उडावे वाटते

लाखदा चुकले तुझ्यासाठीच मी
एकदा तूही चुकावे वाटते

क्षण तुझ्यामाझ्यातले छळती मला
ते तुलाही आठवावे वाटते

हे गुलाबी ओठ ही गाली खळी
धन तुझे तू हे लुटावे वाटते

जीव जडला हा किनाऱ्यावर असा
लाट होऊनी फुटावे वाटते

जे नकोसे वाटते घडतेच ते
ते न घडते जे घडावे वाटते

- अनिता बोडके
**

आयुष्याची काही वळणे अशी असतात ज्यावर केवळ आणि केवळ भावनांचंच अधिपत्य असतं. मेंदूपेक्षा मनाचा अंमल विचारांवर अधिक असतो. कदाचित निसर्गानिर्मित प्रेरणांचा तो परिपाक असू शकतो. ते दिवसच फुलायचे असतात. झोपाळ्यावाचून झुलण्यासाठीच आलेले असतात. या परगण्याकडे पावले वळती झाली की, आनंदाची अभिधाने बदलतात. अंतर्यामी आस्थेचे अंकुर उमलायला लागतात. अंतरीचा ओलावा घेऊन आपलेपणाची रोपटी रुजू लागतात. माणूस मुळापासून समजणं अवघड आहे. त्याच्या मनात अधिवास करणाऱ्या भावना एक न सुटणारं कोडं असतं. एकाचवेळी तो तीव्र असतो, कोमल असतो, कठोर असू शकतो, क्रूरही होऊ शकतो, सहिष्णू असतो आणखी काय काय असू शकतो. हे सगळं असलं तरी मुळात तो स्नेहशील असतो, असं म्हणायला प्रत्यवाय आहे. कारण सर्वकाळ एखाद्याचा द्वेष, तिरस्कार करून जगणं अवघड असतं. तो कसा आहे, हे आकळलायला प्रत्येकवेळी निर्धारित केलेली सूत्रे वापरून उत्तरे मिळतीलच असे नाही. तर्कसंगत विचारांच्या वाटेने त्याच्या अंतर्यामी अधिवास करून असणाऱ्या काही गोष्टींबाबत केवळ अनुमान बांधता येतात. कदाचित त्याचे मनोव्यापार याला कारण असावेत, असतीलही. जीवशास्त्राच्या परिभाषेत माणूस केवळ एक प्राणी असला, तरी इतर जिवांच्या आणि त्याच्या असण्याला काही वेगळे आयाम असतात. त्याचं मन विकाराचं माहेर असेलही, पण मोहरलेल्या मनाचाही तो धनी असतो हेही खरेच. त्याच्या जगण्यातून प्रेम विलग नाही करता येत. वयाच्या वेगवेगळ्या मुक्कामांवर त्याची परिभाषा बदलत जाते एवढेच.

प्रेम- अडीच अक्षरांचा शब्द. पण अर्थाचे किती आयाम, संदर्भांच्या किती कळ्या, आशयाच्या किती पाकळ्या, जगण्याचे किती पदर सामावलेले असतात त्यात. ज्याला हे भावसंदर्भ उलगडतात, ते शहाण्यांच्या जगात उगीचच वेडे ठरतात. प्रेम शब्दात असे कोणते सामर्थ्य सामावले आहे, कुणास ठावूक? किती वर्षे सरली, किती ऋतू आले आणि गेले, तरी त्याची नीटशी परिभाषा माणूस करू शकला नाही. पण वास्तव हेही आहे की, ती जशी प्रत्येकासाठी असते. तशी प्रत्येकाची वेगळी असते. उमलत्या वयातील प्रेम सौंदर्याचे साज चढवून विहरत राहतं उगीचच आभाळभर शीळ घालत. उगवत्या सूर्याची प्रसन्नता, वाहत्या पाण्याची नितळता, उमलत्या फुलांचा गंध त्यात साकळलेला असतो. वारा त्याच्याशी गुज करीत राहतो. चांदण्या त्यांच्याकडे पाहून उगीच कुजबुज करीत राहतात. इंद्रधनुष्याचे रंग त्याला पाहून लाजून चूर होतात. आपलंच एक ओंजळभर विश्व आपल्यात घेऊन नांदत असतं ते.  

कुठल्या तरी गाफील क्षणी नजर नजरेला भिडते. शांत जलाशयात भावनांचे तरंग उठून त्याची वलये किनाऱ्याकडे धावतात. एकेक रंग अंतरंगात उतरत जातात. डोळे मिटले की त्याची प्रतिमा, उघडले की त्याचेच भास. वाऱ्यासारखा पिंगा घालीत राहातो मनाभोवती. आयुष्याला वेढून बसतो, झाडाला बिलगून असलेल्या वेलीसारखा. त्याचंच चिंतन, त्याचेच विचार. त्याच्या आठवणींचा गंध मनावर गारुड करीत राहतो. ती ओढली जाते त्याच्याकडे. गुंतत जाते. पीळ घट्ट होत जातात. नात्याचा रेशीम गोफ विणला जातो. तिच्यासाठी तो आणि तोच, केवळ तोच असतो. बाकीच्या गोष्टी कधी मनाच्या अडगळीत पडतात, हे कळतही नाही. चाकोरीत चालणारं आयुष्य त्याच्या जगण्याशी तिने जोडून घेतलेलं असतं, आपलं जगणं वजा करून. तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात. फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. चांदण्यांच्या सोबत बोलतात. मनोरथांचे मनोरे रचतात. उगवणारा दिवस यांच्यासाठी आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर अंगावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात.

गझलेचं रचनातंत्र, तिचा आकृतिबंध वगैरे गोष्टी, ज्या काही असतील, त्या अभ्यासाचे विषय असू शकतात. भावनांना कसले आलेय रचनेचे तंत्र! त्या तर 'स्व’ तंत्राने चालत राहतात, आपल्याच नादात. अवघं विश्व आंदण दिल्याच्या थाटात. प्रेमाचे हे तरल भाव घेऊन ही गझल फुलपाखरासारखी भिरभिरत राहते मनाच्या आसमंतात. मुग्ध वयातल्या प्रेमाचं अंगभूत लावण्य असतं. त्यात एक तरलपण साकळलेलं असतं. आतून उमलून येणारं आपलं असं काही असतं. प्रीतीच्या या तरल स्पंदनांचे सूर छेडीत कवयित्री शब्दांचे साज त्यावर चढविते. एकेक शब्द वेचून भावनांना गुंफत राहते, गजऱ्यात फुले बांधावी तशी.

यौवनात पदार्पण करणारी कोणी लावण्यवती प्रेमाच्या परिमलाशी नव्यानेच अवगत होत आहे. मनात वसतीला आलेले ऋतू कूस बदलून नव्या वळणावर उभे आहेत. नुकताच बहरू लागलेला वसंत तिच्या अंगणात मोहरलेपण घेऊन आलेला आहे. तिच्या आसपासच नाही, तर मनातही आकांक्षांची अगणित फुले उमलू लागली आहेत. त्यांच्या ताटव्यात फुलपाखरासारखं भिरभिरत राहतं तिचं मन. कळीच्या पाकळ्या हलक्याच जागे होत उमलत जाव्यात तशा. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी परसदारीच्या प्राजक्ताचा परिमल आसमंतात भरून राहावा. त्याची मनावर मोहिनी पडावी. हृदयाच्या पोकळीत तो कोंडून घ्यावा अगदी तसं. तिलाही गंध होऊन त्याला वेढून घ्यावं वाटतं. त्याच्याचसाठी ओघळत राहावेसे वाटते. खरंतर प्रेमाची कबुली देण्यात स्त्रीसुलभ लज्जा असतेच. भलेही शब्दांनी ती तसे सांगू शकत नसेल, पण तिच्या डोळ्यात साकळलेले भाव त्याने ओळखावे. प्रत्येकवेळी मीच का साद द्यावी? कधी प्रतिसादाचा प्रतिध्वनी बनून त्यानेही निनादत राहावे, मनाच्या रित्या दऱ्यांमध्ये. निदान एकदा का असेना, त्याने त्यांच्या प्रेमाविषयी बोलावेसे तिला वाटते.

प्रेमाच्या वाटा कधी सुगम असतात? त्याच्याभोवती बंधनाची कुंपणे घातली जाणंही काही नवं नाही. ते नेहमीच संदेहाच्या परिघात मोजले जाते. बंधनांना मर्यादा असतील, पण भावनांना कसल्या आल्यायेत मर्यादा. सगळे पाश सोडून पाखरासारखं आभाळभर भिरभिरत राहावंस वाटतं तिला. नजरेत गोठलेली अन् मनात साठलेली क्षितिजे वेचून आणण्यासाठी धावत राहावंसं वाटतं. त्याच्यासाठी तिने काय करायचे शिल्लक राहू दिलेले असते? त्याच्यासाठी ती अभिसारिका होते. जगाच्या नजरा चुकवून धावत असते त्याच्याकडे; नदीने सागराच्या ओढीने पळत राहावं तसं. प्रमाद घडूनही ती पळते आहे, मनात बांधलेल्या त्याच्या प्रीतीच्या अनामिक ओढीने. तिला वाटतं कधी त्यानेही हा प्रमाद करावा. चुकून पहावं. एकदा का असेना, चुकीचा असला तरी वळणाचा हात धरून माझ्याकडे वळावं. त्याच्या हाती आयुष्याची सूत्रे कधीच सोपवली. मनात त्याचीच प्रतिमा गोंदवून घेतली. हृदयावर कोरलेले सगळे क्षण नसतीलही त्याला आठवत. पण मनाची घालमेल तर कळतं असेलच ना!

समर्पणाच्या निसरड्या कड्यावर उभी राहून ती साद घालते आहे. तिचं असणं-नसणं त्याच्यात विसर्जित झालं आहे. सगळंच आयुष्य त्याच्या हाती सोपवून दिलं आहे तिने. आतापर्यंत राखून ठेवलं, ते सगळं उधळायला निघाली आहे. केवळ त्याच्यासाठी राखून ठेवलेलं त्याने घ्यावं. जडलेला जीव परिणामांची क्षिती बाळगत नाही. उधाणलेल्या लाटांना किनाऱ्याकडे धावतांना कोणता आनंद मिळत असेल? माहीत नाही. किनाऱ्याशी जडलेलं त्यांचं नातं आदळून ठिकऱ्या होऊन विखरणार असलं, तरी त्या फुटण्यात, विखरून जाण्यात आपलं असं काहीतरी गवसत असावं, जे सांगता येत नाही. सगळ्याच गोष्टी शब्दांनी व्यक्त करता येत नसल्या, तरी भावनांनी जाणता येतात. हा प्रवास असतो, या हृदयापासून त्या हृदयापर्यंत पोहोचणारा. प्रेमात पडलेल्यांच्या पदरी पडणाऱ्या प्रत्येक क्षणाचं प्राक्तन वेगळं असतं. हाती लागलेले क्षण पाऱ्यासारखे असतात. दिसतात सुंदर, पण निसटण्याचा शाप घेऊन आलेले. खरंतर असं काही घडायला नको. पण मनातला खेळ मनात कधी थांबतो? तो धावत राहतो सारखा. निखारे खेळण्यातही आनंद असतो त्याला. घडू नये घडत गेलं तरी, ते घडावे असं का वाटत असेल?        

रोमियो-ज्यूलियट, लैला-मजनू, बाजीराव-मस्तानी ही नावे इतिहासाच्या पात्रातून वाहत प्रेम परगण्यात चिरंजीव झाली. निस्सीम प्रेमाचे संदर्भ म्हणून माणसांच्या मनात आजही आहेत. अथांग प्रेम कसे असते, याची साक्ष देत स्मृतीतून विहरत आहेत. प्रेमाबाबत प्रत्येकाची अनुभूती वेगळी. प्रत्यंतर वेगळं तसे परिणामही वेगळे. काहींचं मनातल्या मनात समीप राहणं असतं. काहींचं मनात उगम पावून जनात प्रकटतं, सर्जनाचा गंध लेऊन वहात राहतं. प्रेमभावनेचा परीसस्पर्श ज्या मनाला झाला, त्याला अवघं विश्व आपलंच वाटतं. प्रेमात स्नेहाचे मळे फुलवण्याची किमया असते. माणसांच्या जगातून प्रेम काढून टाकले तर... जगणे अभिशाप वाटेल. निर्हेतुक वाटेल. उद्यानातील फुले कोमेजतील, कोकिळेचे कूजन बेसूर भासेल, सूर्य निस्तेज दिसेल, चंद्र दाहक वाटेल. जग जागच्या जागी असेल. त्याचं चक्रही सुरळीत चालेलं असेल. क्षणाला लागून क्षण येतील आणि जातील; पण त्यांचा नाद संपलेला असेल. रंग विटतील. निर्झर आटतील. जीवनची गाणी सूर हरवून बसतील.

‘प्रेम’ शब्दाभोवती तरल भावनांचे वलय आहे, तेवढेच संशयाचे धुकेही दाटले आहे. खरंतर प्रेम ही भावना उदात्त आहे. म्हणूनच की काय, ‘त्याने प्रेम केले तिने प्रेम केले, करू दे की, त्यात तुमचे काय गेले?’ असा प्रश्न कवी पाडगावकरांना विचारावासा वाटला असेल का? निरपेक्ष प्रेम स्नेह करायला शिकवतं. ही अशी एक उन्नत, उदात्त गोष्ट आहे, जिला कोणतीही जात नाही. कोणताही धर्म, वंश नाही. तेथे एकच धर्म असतो, तो म्हणजे प्रेम. प्रेम देशप्रदेशाचे कुंपणे मानीत नाही. अंतरे मोजत नाही. मग ते उमलत्या वयातलं असो की, आणखी कोणत्या. नाही का?

-चंद्रकांत चव्हाण  
**