आठवणी

By // No comments:
आठवणी

‘आठवणी’ एक छोटासाच, पण आपल्या आत अर्थाच्या अनेक संदर्भांना सामावून घेणारा शब्द. त्यात जगण्यातील आश्वस्तपण जसे सामावले असते, तसे आनंदाचे सोहळेही साठले असतात. त्यांचा तळ गाठण्याचा प्रयत्न करावा तेवढ्या आणखी खोल जाणाऱ्या समुद्राच्या तळासारख्या. इहतलावर जीवनयापन घडताना इच्छा असो, नसो स्वतःला अनेक रंगांनी रंगवून घ्यावे लागते. त्याच्या नानाविध छटांनी मढवून घ्यावे लागते. अशा रंगांनी मंडित स्मृतींचे इंद्रधनुष्य जीवनाचे रंग घेऊन प्रकटते. त्याने दिलेल्या रंगातून माणूस आपल्या आयुष्याचे रंग शोधत राहतो. स्मृतींची अनवरत सोबत घडत राहते. सुख-दुःख दिमतीला घेऊन मनाचं आभाळ भरून येतं. कधी नुसतेच अंधारून टाकणारे, तर कधी धो-धो कोसळणारे.

स्मृतींच्या वर्षावात भिजत आठवणींचे झाड आस्थेचा ओलावा शोधत उभे असते. बहर अंगावर फुलताना पाहून आनंदते, कधी निष्पर्ण डहाळ्यांवर आशेचे नवे कोंब अंकुरित होण्याच्या प्रतीक्षेत उन्हाची सोबत करीत आस लावून बसते. उत्क्रांतीच्या विकासक्रमात माणूस किती विकसित झाला, हा प्रश्न बाजूला सारून आठवणींच्या लहान-लहान रोपट्यांना मन उत्क्रांत करीत राहते. आठवणींचा बहरलेला मळा मनाची श्रीमंती असते. त्यांची सोबत जगणं समृद्ध करीत राहते. परिस्थितीने माणूस एकवेळ भणंग असेल; पण आठवणींच्या जगाचे सारेच कुबेर असतात. या परगण्याचे सारेच सावकार असतात. येथे राव-रंक असा भेद नाहीच. सोबत करणाऱ्या आठवणी कोणत्या, कशा असतील, हे ज्याचे त्यालाच माहीत. त्या असतील, तशा स्वीकारून जगण्याच्या वाटेने चालत राहतो. वाटा जीवनाचा प्रवास घडवतात. माणसांच्या जगण्याच्या अनेक प्रश्नांची उत्तरे आठवणीत सामावलेली असतात. काहींसाठी त्या आनंदयात्रा असतात, तर काहींसाठी संघर्षयात्रा. मनाला आठवणींचे कोंदण लाभलेलं असतं. एकेक स्मृती चांदण्या बनून चमकत राहतात. आठवणींनी जगणं श्रीमंत केलेलं असतं.

आयुष्याच्या प्रवासाची वळणं पार करीत एखाद्या वळणावर उभे राहून वळून पाहताना बऱ्यावाईट आठवणी उगीच रित्या मनात गर्दी करतात. भलेही सगळ्याच काही सुखावह नसतील; पण त्यांची सोबत घडताना उगीचंच आपण आपल्यापुरते वेगळे असल्याचा भास होतो. सोबत करणारी प्रत्येक आठवण जगण्यावरील श्रद्धा वाढवत जाते. नियतीने नमूद केलेल्या वाटेवरून चालताना विस्मरणाच्या कोशात शिरलेल्या आठवणीं आपलेपण घेऊन अंकुरतात. आस्थेची रोपटी वाढत जातात.

काळाने कोणाला जे काही दिले असेल, नसेल. त्याची समीकरणे सोडवत आपली वाट निवडून चालत राहावे लागते. स्मृतीच्या कोशात विसावलेल्या आठवणींवर साचलेली धूळ वर्तमानातला एखादा क्षण फुंकर घालून उडवून जातो. वाढत्या वयाचे देहाला आणि जगण्याला पडणारे बांध विसरून मन स्मृतीकोशात विसावलेल्या क्षणांना सोबत घेऊन येते. काळाचा पडदा दूर करीत एकेक क्षण आठवणींचा देह धारण करून समोर उभे राहतात. मनःपटलावर आठवणींची गोंदणनक्षी साकारत राहतात.

दिवस, महिने, वर्षाची सोबत करीत काळ पुढे सरकत राहतो. आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा मनात कोरून जातो. आयुष्य आपल्या वाटांनी माणसांना पुढे नेत राहते. उपजीविकेच्या क्रमसंगत मार्गाने प्रवास घडतो. कोण कुठे, कोण कुठे स्थिरावतो. कुठल्याशा निमित्ताने आठवणींच्या झाडाची पाने थरथरतात. आठवणींचे एक गाव प्रत्येकाच्या मनात गजबजलेले असते. कोणत्यातरी अवचित क्षणी गगनभरल्या आठवणींचे थवे मनाच्या गर्द झाडीत शिरतात. मंतरलेल्या क्षणांची सोबत घडत राहते. एकेक पाकळ्या उमलत जातात. आठवणींची फुलं उमलू लागतात. मनाचं आसमंत गंधित करीत राहतात. स्मृतींच्या वेली मांडवभर पसरून वाढत राहतात. ऊन-सावली, पावसाचा खेळ सुरु असतो. रिमझिम धारा बनून चिंब भिजवत राहतात आठवणी. फुलांचा गंध साकळून वाऱ्यासोबत वाहत राहतात. कधी ओहाळ बनून झुळझुळतात. कधी चांदण्यांशी गुजगोष्टी करीत राहतात. झाडावेलींवर मोत्यासारख्या चमकत राहतात. आठवणींच्या बहरलेल्या झाडावर स्मृतींचे पक्षी क्षण-दोनक्षण येऊन विसावतात अन् चिवचिव करीत जीवनाचे गाणे गात राहतात.
**

समाधान

By // 4 comments:

समाधान

काही गोष्टी निसर्गनिर्मित असतात, काही माणसांनी तयार केलेल्या. निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी स्वाभाविकपणे वाट्यास येत असतात. प्रासंगिकता त्यांचे प्राधान्यक्रम ठरवत असते. काही माणूस स्वतः निर्माण करतो. ती त्याची परिस्थितीजन्य आवश्यकता असते. उदात्त असं काही विचारांत वसाहत करून असेल, तर ते योजनापूर्वक घडवावे लागते. ते काही वाहत्या उताराचे पाणी नसते. सहजपणे मार्गी लागायला. इहतली जगणाऱ्या प्रत्येकाला त्याच्यापुरता इतिहास असतो, तसा भूगोलही. काहींच्या वाट्याला अफाट असतो, काहींचा पसाभर, एवढाच काय तो फरक. अथांग, अफाट, अमर्याद वगैरे केवळ शब्दांचे खेळ, परिमाण दर्शवणारे. त्यांचे परिणाम महत्वाचे. ओंजळभर कर्तृत्वाच्या इतिहासाचे गोडवे गाऊन कोणाला मोठं वगैरे होता येत नसते. इतिहास गोडवे गाण्यासाठीच नसतो, तर परिशीलनासाठीही असतो. तसा अज्ञाताच्या पोकळीत हरवले संचित वेचून आणण्यासाठी प्रेरित करणाराही असतो. प्रेरणांचे पाथेय सोबत घेऊन आपणच आपल्याला पारखून घेत आपल्या वकुबाने आपले परगणे आखून घ्यायला लागतात. त्या आपल्या मर्यादा असतात.

कृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या निर्णयांचा परिपाक असतो. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार असतो पण आत्मा नसतो. सत्प्रेरित विचाराने उचललेली चिमूटभर मातीही स्नेहाचे साकव उभे करू शकते. सुखांचा अवास्तव हव्यास माणूसपणावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. समाधान सापेक्ष संज्ञा असते. पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. अर्थात, हे सगळ्यांनाच अवगत असते किंवा मिळवता येईलच, असे नाही. पण अगत्य सगळ्यांनाच साधते. मोहाचा कणभर त्याग समर्पणाची परिमाणे उभी करतो, फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संस्कृतीने दिलेल्या संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक सुंदर दिसतात. माणसांचा स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं.

रिकाम्या ओंजळी जगण्याची प्रयोजने शिकवतात. आयुष्याच्या अर्थांना आस्थेचा ओंजळभर ओलावा आपलेपण देतो. जगण्याच्या दिशेने निघालेल्या सगळ्याच वाटा काही संपन्नतेचं दान पदरी टाकण्यासाठी येत नसतात. नसल्या म्हणून त्या टाकूनही नाही देता येत. पायाखालची वाट ओळखीच्या चिन्हांना गोंदवून मनाजोगत्या मापांनी आखलेली असणे जवळपास दुर्लभ. असं असलं म्हणून माणसांनी लक्षाच्या दिशेने चालणे काही सोडून दिले नाही. तसेही वाटा चालण्यासाठी असतात. कोणीही अगदी ठरवून वाटेसाठी चालत नसतो. पण डोईवर असणारं आभाळ आश्वस्त करणारं असलं की, पावलांना हुरूप येतो. ध्येय बनून असो अथवा नियती बनून, आयुष्यात आलेल्या वाटांच्या असण्या नसण्याला अधोरेखित करीत चालणे घडते. वाटेवरच्या धुळीत मनी वसतीला असलेली चिन्हे अंकित करून मार्गस्थ होणे संभव-असंभवाच्या शक्यतांचा खेळ असतो. तसंही नियतीने निर्धारित केलेले खेळ इच्छा असो-नसो खेळायलाच लागतात, जय-पराजयाच्या शक्यतांना गृहीत धरून. समृद्धीच्या मार्गाने घडणारा प्रवास कदाचित सुख देईल, पण समाधान संघर्षातूनच गवसते. सुखाला आयुष्य किती असेल, हे काळही सांगू शकत नाही, पण समाधान चिरंजीव असतं. हे संघर्षरत असणारा कोणीही अभिमानाने सांगू शकतो. नाही का?
**