Manusaki | माणुसकी

By
वर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. काहींचं वहीत मुद्दे लिहिणं सुरु होतं. मध्येच एक मुलगी उभी राहिली. म्हणाली, “सर, माणुसकी महानधर्म या विषयावर निबंध कसा लिहता येईल, याबाबत सांगा ना!” आधीच्या विषयावरील विवेचन पूर्ण करून विषयाकडे वळलो. मला ज्ञात असणाऱ्या उदाहरणासह समजावता येईल, तेवढं समजावून सांगितलं. मुलांचं समाधान झालं असावं. तासिका संपल्याची घंटा वाजली. बोलणं पूर्ण करून वर्गाबाहेर पडायच्या तयारीत असताना एक मुलगा म्हणाला, “सर, तुम्हाला काय वाटतं, माणुसकीधर्म शिल्लक आहे आज?” थांबलो वर्गावर थोडा. तोच प्रश्न वर्गाला उद्देशून विचारला. “माझं मत राहू द्या, तुम्हाला काय वाटतं?” सगळा वर्ग शांत, स्तब्ध. आपणास विचारलं तर काय उत्तर द्यावं, या विचारात. त्यांना तसंच विचारात राहू द्यावं, असा विचार केला. उद्याच्या तासिकेला तुमच्याशी या विषयावर पुन्हा बोलतो सांगून वर्गातून निघालो.
 
वर्गातून बाहेर पडलो. चालती पावलं सरावाने शिक्षक दालनाकडे वळली; पण मुलाने वर्गात निरागसपणे विचारलेला प्रश्न मनातून काही निघेना. त्यानं सरळ-सरळ विचारलं, ‘तुम्हाला काय वाटतंय?’ खरंतर या प्रश्नाचं उत्तर निबंध लेखनापेक्षा अवघड होतं, कारण निबंध त्रयस्ताच्या भूमिकेतून लिहता येतो. पण आपण त्या प्रश्नाशी जुळतो, तेव्हा ‘दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान...’ अशीच स्थिती होते. काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देणं मलाही अवघडच होतं. जेवढं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला लागलो, तेवढं अधिक कठीण होत गेलं. काही वर्षापूर्वी कवयित्री बहिणाबाईंनी हाच प्रश्न ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ म्हणून माणसाला विचारला आहे. पण हुशार माणसाने हे वाचून, ऐकून माणूस बनण्याचा प्रयत्न कितीसा केला? माहीत नाही. ज्यांनी केला त्यांना तरी या प्रश्नाचं उत्तर पूर्णतः मिळालं असेल का?

विद्यमान विश्वातील प्राणिजगतात माणूस प्रचंड सामर्थ्यशाली प्राणी. सुमार देहाच्या आणि ताकदीच्या माणूस नावाच्या प्राण्यानं आपली नाममुद्रा विश्वाच्या व्यवहारावर अंकित केली. आपल्या सामर्थ्याने विश्वाचा अनभिषिक्त सम्राट बनला. जगातील महाकाय प्राण्यांसमोर नगण्य अस्तित्व असणारा माणूस सामर्थ्यशाली बनला, तो केवळ त्याच्याकडे असणाऱ्या बुद्धीवैभवामुळे. नियतीने हे वैभव त्याला दिले. म्हणून तो सर्वार्थाने सहनशील, संस्कारित, सुखी, संपन्न, समाधानी वगैरे झाला आहे, असे नाही म्हणता येत. आदिम अवस्थेत वावरताना जगण्यासाठी भाकरीचा धड एक तुकडा मिळवायची अक्कल नसणारा माणूस आज विश्वाचा नियंता बनू पाहतो आहे. यापाठीमागे त्याची जिद्द, परिश्रम, चिकाटी, जिज्ञासा हे गुण उभे आहेत. या गुणवैभवाच्या पाथेयावर त्याने समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अनेक अज्ञात परगण्याचा शोध घेतला. त्याच्या शोधयात्रेने त्याला सामर्थ्यशाली बनवले. माणूस संघर्ष करीत आला आहे. संघर्षातून जसजसे सामर्थ्य वाढत गेले, तसतसा तो कालोपघात संकुचितही होत गेला. एकटेपणाची जाणीव त्याला अस्वस्थ करायला लागली. एकटेपणाच्या जगण्यातून बाहेर येण्यासाठी आपलेपणाचा ओलावा शोधू लागला. भावनिक ओलावा शोधताना त्याला कुटुंबाचा, कुटुंबातून समाजव्यवस्थेचा, समाजव्यवस्थेतून परिणत जीवनव्यवस्थेचा शोध लागला. व्यवस्था टिकवण्यासाठी वर्षानुवर्षांच्या अनुभवाने हाती लागलेल्या निष्कर्षातून त्याने नीतिनियम तयार केले. नीतिनियमातून कायदे तयार झाले. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनव्यवस्था जन्माला घालून समाजाचे वर्तनप्रवाह नीतिसंमत मार्गाने प्रवाहित कसे राहतील, याची व्यवस्था उभी केली.

नीतिमत्ता माणसांच्या वैचारिक प्रगल्भपणाचे द्योतक असते. ‘माणसांनी कसे वागू नये’ या करिता ‘कसे वागावे’, या अपेक्षांतून तयार केलेला मूल्यांचा तो अमूल्य ठेवा असतो. तसा तो आजही आहे. माणसाच्या जगण्यात मूल्ये रुजवताना समाजाच्या इच्छा, आकांक्षाना सद्वर्तनाच्या कोंदणात अधिष्ठित करण्याचे प्रयत्न झाले. जीवशास्त्राच्या परिभाषेत माणूस निसर्गाचं अपत्य आहे, म्हणजे एक प्राणीच. त्याच्यातील पशुत्वाला संपवून संस्कारित करण्याचा प्रयोग होत राहिला आहे. माणुसकी जपणं हेच जीवनाचे उदात्त तत्त्व आहे, या भावनेतून वेगवेगळ्या घटकांशी तो जुळत गेला. त्याचं हे भावनिक नातं म्हणजे माणुसकी. दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होऊन डोळ्यात साठलेले दोन अश्रू म्हणजे संस्कृती, असे म्हणतात. अशा उदात्त विचारांचा स्वीकार करून तो जगायला शिकला. संवेदनशील विचारांची सोबत करीत त्या-त्या काळातील पिढी जगू लागली. येणारी नवी पिढी त्यात भर घालू लागली. उदात्त हेतूने जगण्याचे प्रयोजन मिळत राहिले. ‘मी कसे जगू नये’, याचे उत्तर त्याला ‘मी कसे जगावे’ या विचारातून निर्मित माणुसकीधर्मातून मिळत गेले.

माणूस मुळात श्रद्धावान आहे. जगण्यासाठी त्याला कोणत्यातरी श्रद्धा हव्या असतात. आधार हवा असतो. त्याचा जगण्याचा आधार काढला तर तो कोसळेल. या कोसळण्यापासून सुरक्षित राहता यावे, याकरिता सदाचाराचे मार्ग निर्माण करायला लागतात. सदाचार त्याच्या जीवनश्रद्धांचा आविष्कार आहे. सदाचाराच्या मार्गाने वळती होऊन डोळस श्रद्धेने जगणारी साधी, सद्वर्तनी, सत्यप्रिय, संस्कारित माणसे समाजाचे दिशादर्शक बनली. त्यांच्या आचरणातून समाजाला गती मिळाली आणि प्रगतीही झाली. समाजाच्या प्रगतीला आदर्शरूपाने सांभाळणारी प्रगतिप्रिय माणसं संस्कृतीचं संचित असतात. वंचितांच्या वेदनांनी व्यथित होऊन त्यांच्या जीवनात आत्मतेजाचा सूर्य उदित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रचंड सायास-प्रयास संवेदनशील विचारातून प्रकटलेला माणुसकीचा गहिवर होता. माणसांच्या जगात माणसांना माणसाचं जीवन नाकारणाऱ्या प्रतिगामी विचाराच्या विरोधात समतेचा एल्गार होता. अविचारांची काजळी दूर करून विवेकाची दिवाळी साजरी करू पाहणारा महात्मा फुलेंचा विचार द्रष्ट्या विचारवंताचे जीवन चिंतन ठरले. त्यांच्या प्रगतिप्रिय विचारांनी सार्वजनिक रुपात सत्यधर्माची ज्योत प्रदीप्त केली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आत्मभान देण्याचा प्रयत्न माणुसकीधर्माचा साक्षात्कार होता.

परंपरेने दिलेले जीवन, हेच नियतीचं देणं समजून व्यवस्थेच्या विरोधात अवाक्षरही न काढता जगणे स्त्रियांसाठी शाप ठरले होते. अवहेलनेच्या आघातानी घायाळ होऊन कुठलाही विरोध न करता हेच आपलं प्राक्तन आहे, असे मानीत जगणाऱ्या भारतीय नारीच्या हाती पाटी-पेन्सिल देऊन महात्मा फुलेंनी उपेक्षित आवाजाला स्वाभिमानाचा मार्ग दिला. ज्ञानज्योत हाती घेऊन परिवर्तनाचे पथ प्रशस्त केले. बंधनांमध्ये बंदिस्त असणाऱ्या स्त्रियांना आत्मभान, आत्मसन्मान देत त्यांच्यातले विझलेले आत्मतेज जागे केले. देशातील दारिद्र्य, गरिबी, विषमतेची दाहकता पाहून व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी आपल्या दैनंदिन गरजा सीमित करून साध्या जगण्याचा स्वीकार केला. त्यांनी केलेल्या सुखांच्या त्यागात माणुसकी सामावली आहे. समाजाने नाकारलेल्या, तिरस्कारलेल्यांच्या जगण्याला सन्मान देण्यासाठी बाबा आमटेंनी आनंदवन उभे केले. भूमंडळी माणूस नावाचं अस्तित्व अबाधित राहावे, म्हणून प्रयत्नरत राहणाऱ्यांच्या सद्विचारात माणूसपण साठलेलं आहे. विधायक कार्याच्या मशाली हाती घेऊन अंधारलेले रस्ते उजळण्यासाठी निघालेल्या पावलांच्या ठशात माणुसकीधर्म विसावला आहे. ‘खरा तो एकचि धर्म’ या विचारांनी वर्तणाऱ्या स्नेहधर्मात, प्रेमधर्मात माणुसकी थांबली आहे.

अनेक आदर्श स्मृतिरुपाने सोबत करीत असतांनासुद्धा आज माणुसकीधर्माचा संकोच होत आहे. स्वार्थपरायण भाव अधिक मोठा होत आहे. देशातल्या संतानी, सुधारकांनी माणूसधर्माचा जागर घडवूही सदाचाराचा आधार ढासळत चालला आहे. विज्ञानतंत्रज्ञानाने सांप्रतकाळी सुखांची आरास मांडली असतांना धर्माच्या नावाने अधर्म होतो आहे. अद्यापही समाजव्यवस्थेतून जातीयतेचे ग्रहण सुटले नाही. आपल्या आसपास अगणित सुविधांचं जग उभं असतानाही माणसांना गावकुसाबाहेरचं, रानोमाळ अस्वस्थ वणवण करीत भटकंतीचं जीवन जगावं लागणं, हा माणुसकीधर्म कसा काय असू शकतो? सणवारात, समारोहात भोजनाच्या पत्रावळीवर हजारोंचा खर्च होतोय. पण मंडपाच्याबाहेर पोटातल्या भुकेला दोन घास मिळतील, म्हणून कोणीतरी उपाशी उपेक्षित, वंचित, विकल जीव आशाळभूतपणे वाट पाहत बसलेला आहे. लोकांनी पत्रावळीवर टाकलेलं, राहिलेलं उष्ट-खरकटं जमा करण्यासाठी धडपडत आहे. या जगण्यालाच विधिलिखित मानणाऱ्या परिस्थितीशरण, अगतिक माणसांना सन्मानाने दोन घास देण्याची व्यवस्था आमच्या माणूसधर्माला अजूनही का करता आली नसेल?

एकीकडे नारीचा सन्मान करायचा तर दुसरीकडे परंपरेचे पायबंद घालून आकांक्षांच्या आकाशात विहार करू पाहणाऱ्या तिच्या पंखाचा विच्छेद करायचा. तिच्यावर अत्याचार करून नाजूक आयुष्य, कोमल जीवन संपवून टाकायचं. हा जगण्याचा कोणता माणूसधर्म? महिला सबलीकरणाच्या वार्ता कराव्यात आणि त्यांच्यावर अत्याचार घडल्यावर प्रतिकारासाठी तेवढ्यापुरतं पेटून उठलं म्हणजे काम संपत नाही. मनातला आक्रोश अन्यायाचं उच्चाटन करण्यासाठी वणव्याचं रूप धारण करतो, तेव्हा माणुसकीधर्माचा जागर घडतो. माणुसकी नुसती शिकून आणि शिकवून येत नाही. ती आचरणात आणावी लागते. समाजपरायण विचाराने वर्तणारी माणसे माणूसधर्माचा जागर करीत समाज घडवण्यासाठी उभी राहतात, तेव्हा परिवर्तन घडते. समतेचे दीप प्रज्वलित करून विधायक वाटेवर चालण्यासाठी माणसांना प्रेरित करतात, तेव्हा संस्कारांचा जागर घडतो. संस्कारातून संस्कृती साकारते. या साकारला मिळालेला आकार हाच माणुसकीधर्म असतो.

माझा सभोवताल उध्वस्त होत आहे. पण मला काय त्याचं म्हणून मी निष्क्रिय राहत असेल, तर माझ्यात आणि अन्य प्राण्यात फरक काय? आग लागल्यावर तुमचं घर सुरक्षित ठेवायचं असेल, तर शेजारच्या घराला लागलेली आग पसरू नये म्हणून आधी शेजारच्या घरावर पाणी टाकून नियंत्रित करावी लागते. शेजार जळत असेल आणि आपण म्हणत असू, अजून माझ्यापर्यंत त्याची दाहकता नाही, तर तुम्ही किती काळ सुरक्षित राहाल? इहतलावरील माणसांचं वास्तव्य सरासरी साठ-सत्तर वर्षाचं असतं असे मानले, तर आपण गेल्यावर एकच गोष्ट आपल्यानंतर शिल्लक उरते, ती म्हणजे आपल्या संस्कारसंपन्न जगण्याच्या आठवणी. तुमच्या इहतलावरील वास्तव्याच्या आठवणींना माणुसकीचा गहिवर असेल, तर तुम्ही खऱ्याअर्थाने जगलात. तुमचं तसं जगणं हाच खरा माणुसकीधर्म असतो. अनंत काणेकरांच्या दोन मेणबत्त्या लघुनिबंधात वाक्य आहे, ‘स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास.’ असं दुसऱ्यासाठी जगणं आणि मरणं म्हणजेच माणुसकी. अशाच कोणत्यातरी सत्प्रेरित वर्तनाच्या कृतीतून निर्माण होणारा उदात्त विचार म्हणजे, मानवधर्म.

0 comments:

Post a Comment