सामाजिक बांधिलकीचा मौलिक अंक: अक्षरलिपी २०१८
(माझे स्नेही ऋषिकेश गंगाधरराव देशमुख यांनी 'अक्षरलिपी' दिवाळी अंकाचं लिहिलेलं परीक्षण.)
उत्सवप्रिय महाराष्ट्रात दिवाळी आली की उत्सुकता लागते ती दिवाळी अंकांची. गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणांहून, वेगवेगळ्या आशय-विषयांना भिडणारी दिवाळी अंक प्रकाशित होतात. गेल्यावर्षी अक्षरलिपी या एका नव्याच पण अत्यंत दर्जेदार दिवाळी अंकाची भर या संपन्न परंपरेत पडली. संपादक म्हणून महेंद्र मुंजाळ , शर्मिष्ठा भोसले व प्रतीक पुरी या समविचारी मित्रांनी एक नवा आयाम स्थापित केला. यावर्षीचा अक्षरलिपीचा अंक तर अत्यंत समृद्ध नि अस्वस्थ करणारा आहे. अस्वस्थ करणारा यासाठी म्हणतोय की दिवाळी अंक म्हणजे दिवाळीतील सुट्ट्या कारणी लावता यावा म्हणून कविता, कथा, ललित आणि प्रवासवर्णन असणारा मजकूर असा एक रूढ संकेत झाला होता. तो आजही काही दिवाळी अंक पाळतात पण त्या रूढ संकेताला कलाटणी देत गेल्यावर्षीपासून अक्षरलिपीने देशात सुरू असणाऱ्या अनेकविध गंभीर प्रश्नांचा, सर्वसामान्य माणसाला भेडसावत असणाऱ्या समस्यांचा अचूक वेध घेणारा रिपोर्ताज विभाग आपल्या दिवाळी अंकातून विकसित केला आहे. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे याचा आम्हाला अभिमान आहे असं आपण म्हणतो पण ज्या त्या प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीनुसार असणाऱ्या समस्याही काही कमी नाहीत. त्या सर्वांचा तळपातळीवर जाऊन घेतलेली दखल वाचकांच्या समोर एक भू-नकाशाच तयार करते. अक्षरलिपीत कथा, कविता, कादंबरी अंश आहेतच पण रिपोर्ताज नव्या विश्वाची जाणीव करून देण्यात मोलाची भर घालतात.
रिपोर्ताज वाचायला, त्यावर चर्चा करायला किंवा लिहायला आपल्याला काही लागत नाही, वाचून अस्वस्थ वगैरे होतो आपण एवढीच आपली संवेदना. मात्र त्या रिपोर्ताजचा वेध घेण्यासाठी जीवावर उदार होऊन माहिती संकलित करावी लागते. अतिसंवेदनशील भागात फिरून अनेकविध प्रश्नांना समजून घ्यावे लागते. प्रवास, प्रश्नांची उत्तरे, अनेकांशी संवाद व तिथुन घरी येईपर्यंतची असुरक्षितता या सर्वांना सामोरे जावे लागते.
यावर्षीच्या अंकात नामुष्कीचे स्वगत, ताम्रपट इत्यादी कलाकृती लिहिणारे माझे आवडते लेखक रंगनाथ पठारे सरांच्या 'सातपाटील कुलवृतांत' या कादंबरीचा काही अंश प्रसिद्ध करण्यात आला आहे. शंभुराव या नायकामार्फत सुमारे सातशे वर्षाचा व्यापक कालपट सरांनी साकार केला आहे. मानवी भाव-भावना, स्त्री-पुरुष लिंगभावात्मक विवेचन आणि एका कुटुंबाची कहाणी ही समूहाची कशी होते याचा अनुभव हा अंश वाचताना लक्षात येतो. अर्थात तो अंश वाचून कादंबरीची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
समकालीन साहित्यात कवयित्री म्हणून कल्पना दुधाळ हे अत्यंत महत्त्वाचे नाव आहे त्यांच्या 'धग असतेच आसपास', 'सिझर कर म्हणतेय माती' या दोन कृषिनिष्ठ कवितासंग्रहानी मराठी कवितेचा परीघ विस्तीर्ण केलेला आहे त्यांचे या अंकातील 'काही नोंदी: शेती-मातीतील जगण्याच्या' या ललित लेखाने कृषिनिष्ठ समूहाची शेतीवर असणारी निष्ठा दर्शवत त्या समूहाची होत असणारी परवड आणि तरीही मोठ्या समूहाचा शेती-मातीवर असणारा नितांत जीव, काहीतरी निश्चितच चांगले घडेल असा दुर्दम्य आशावाद आणि कृषिनिष्ठ समूहाची आस्मानी-सुलतानी संकटांशी चाललेली चिवट झुंज या सर्वांचे यथार्थ दर्शन अस्वस्थ करणारे आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात १३ एप्रिल १९१९ या दिवशी अमृतसर येथील जालियनवाला बागेत सभेसाठी जमलेल्या शेकडो निरपराध भारतीयांवर जनरल डायर या क्रूर अधिकाऱ्याने बेछूट गोळीबार केला. ही घटना एकूण लढ्याला एक नवे वळण देणारी धरली. त्या घटनेला ९९ वर्ष होतात. त्याचे औचित्य साधून मनोहर सोनवणे यांनी 'जालियनवाला बाग १०० वर्षानंतर' या रिपोर्ताजमधून तिथली आजची परिस्थिती, त्यावेळी घडलेल्या घटनांचा क्रम, त्यानंतर ब्रिटिश सरकारवरची त्यावेळीची या घटनेकडे पाहण्याची दृष्टी या सगळ्यांचा आढावा घेतला आहे. डायरच्या शेवटच्या दिवसात या घटनेबद्दल असणारे मत. हे सर्व मुळातून वाचायला हवे. सपूर्ण इतिहास डोळ्यासमोर तरळून जातो आणि आजची परिस्थिती लक्षात येते.
'जंगलातल्या माणुसकथा' हा दत्ता कानवटे यांचा रिपोर्ताज भामरागड या आदिवासी भागातील लोकसमूहाचे जगणे समजून घेण्यासाठी महत्वाचा आहे. आदिवासी लोकसमूह हे निसर्गाच्या कुशीत, निसर्ग देईल तेवढे घेऊन आनंदी जीवन जगत असतात. निसर्गाला ते ओरबाडून जगत नाहीत. त्यांना माहीत आहे निसर्ग आपली भूक भागवू शकतो हाव नाही. त्याबरहुकूम त्यांची खाद्यसंस्कृतीही विकसित झालेली आहे. जल, जंगल आणि जमिनीवर ते नितांत श्रद्धा ठेवून व्यवहार करत असतात. नक्षलवाद हे मोठे आव्हान आहे. तरीही तिथले लोक शिक्षण, आरोग्य या सुविधा मिळाव्यात आपले अस्तित्व टिकवून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहेत.
मुक्ता चैतन्य यांचा 'बोर्डरलगतचं जगणं मुक्काम-पोस्ट पंजाब' हा लेख भारत-पाकिस्तान दरम्यानच्या सीमावर्ती भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या असुरक्षित, अस्थिर व शिरावर कायम टांगती तलवार घेऊन जगण्याऱ्या समूहाची कहाणी सुन्न करणारी आहे. तिथले शिक्षण, तिथली सीमापार जाऊन करावी लागणारी शेती हा रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असाच आहे. तिथल्या शिक्षण, आरोग्याच्या समस्या मोठ्या आहेत.
अभिषेक भोसले यांच्या 'बुलेट्स आणि स्टोन्समधला माध्यमस्फोट' हा लेख जम्मू आणि काश्मीर या स्वतंत्र दर्जा असणाऱ्या राज्यात हिंदू-मुस्लिम तणावाचा तिथल्या धगधगत्या जनजीवनाचा आणि माध्यमात व्यक्त होणाऱ्या उलट-सुलट चर्चेचा सखोल आढावा घेणारा आहे.
शर्मिष्ठा भोसले यांच्या 'जमाव, चार हत्या आणि दोन गोरक्षक' या रिपोर्ताजने मी खूप खूप अस्वस्थ झालो. कारण गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशात धार्मिक नि जातीय विखार वाढतो आहे. टोकदार अस्मितांच्या खेळात मृत्यू स्वस्त झाला आहे. सार्वत्रिक भय आणि असुरक्षित भवताल निर्माण झाला आहे. मॉब-लिंचिंग अर्थात जमवाकडून केल्या जाणाऱ्या निर्घृण हत्या अखंडपणे सुरू आहेत. एखादा माणूस गाईच्या जीवापेक्षा स्वस्त झालाय किंवा गाईसाठी निर्घृणपणे मारला जातोय. हे एकूण आपल्या माणूसपणाला काळिमा फासणारा प्रकार आहे. त्या सामूहिक हत्येचे शिकार झालेल्या कुटुंबाची झालेली परवड काळीज पिळवटून टाकणारी आहे. तिथे जाऊन या सगळ्यांचा आढावा घेणे हे जीवावर बेतणारे असूनही ती हिम्मत शर्मिष्ठा भोसले यांनी दाखवली याला सलाम. दोन गोरक्षकांशी साधलेला संवाद गोरक्षकांची अंध धार्मिकता, त्यांना सरकारचे असणारे छुपे समर्थन व त्यातून ते करत असणाऱ्या कामाचे निर्लज्ज समर्थन हे एकूण आपल्या वाढत्या असहिष्णुतेचा चेहरा दर्शवणारा आहे.
अक्षरलिपी परिवाराने नेहमीच आपल्या कामातून सामाजिक बांधिलकी जपली आहे. यावर्षी त्यांनी 'आनंदाची सावली' या पराग पोतदार यांच्या लेखातून अनाथ मुलांच्या संगोपनासाठी नितेश बनसोडे यांच्या अथक परिश्रमाची, प्रतिकूल परिस्थितीतही निर्माण केलेल्या अनाथ आश्रमाची ओळख करून दिली आहे. अंकविक्रीतून काही रक्कम त्या संस्थेला देण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. वाचकांनी त्या संस्थेला हातभार लावला पाहिजे.
'नियमगिरी हमार ठा' या आदर्श पाटील यांच्या रिपोर्ताजमधून ओडिशातल्या आदिवासींच्या बहुपदरी संघर्षाची कहाणी स्पष्ट केली आहे. वेदांता या कंपनीने विकासाच्या नावाखाली तिथल्या जनजीवनात केलेली ढवळाढवळ तिथल्या सर्वसामान्य माणसाला पक्की ठाऊक झाली आहे. आम्ही आमची मुले सरकारी शाळेत शिकवू पण वेदांतानी सुरू केलेल्या शाळेत शिकवणार नाही ही त्यांची जिद्द डोळस आहे कारण ही कंपनी आमच्या अस्तित्वावर घाला घालणारी आहे ती आमच्या मुलांना त्यांच्या सोयीचे शिकवतील ही रास्त भीती त्यांच्या मनात आहे. त्याची आहार पध्दती, त्यांचे जगणे हे उपलब्ध निसर्गानुसार आहे.
'जटा मोकळ्या होतात तेव्हा' हा हिनाकौसर खान-पिंजार यांचा लेख मला स्त्रीत्वाच्या श्रद्धा-अंधश्रद्धा यांच्याविषयी पुर्नमूल्यांकन करायला लावणारा आहे. देवाच्या भीतीने माणसाला निर्भेळपणे जगता येत नाही ती भीती भ्रामक असते हे पटवून देण्यासाठी हा लेख महत्वाचा आहे.
'तो एकटा की एकाकी' हा मिनाज लाटकरचा लेख सार्वत्रिक एकाकीपणावर भाष्य करणारा आहे. खरंतर आपण सगळेच आज एकाकी आयुष्य जगतो आहोत. मोबाईलच्या नसण्याने अस्वस्थ होणारे आपण एकमेकांशी संवाद होत नाही म्हणून अस्वस्थ होत नाही हे या काळाचे चित्र आहे. सार्वत्रिक संवादहिनतेचा शाप आपल्याला लागलेला आहे. मात्र जर कोणी पुरुष किंवा स्त्री एकटी, एकाकी राहत असेल तर मात्र आपण त्यांच्याकडे वेगळया नजरेने पाहतो हे सर्वथा चुकीचे आहे.
'पिसारा मानवी मोराचा' हा हृषीकेश गुप्तेचा स्त्री-पुरुष भावसबंधाचा त्यातील लिंगभावाचा यथार्थ वेध घेतो.
अंकातील एकूण सर्व विभाग अत्यंत महत्त्वाची मांडणी करण्यात यशस्वी झाले आहेत. कविता व अनुवादित कविता विभाग खूपच सशक्त आहेत. कथाही आवडल्या विस्तारभयास्तव काही भागावर लिहिता येत नाही याचे शल्य आहेच.
इंद्रजित खांबे यांच्या मुखपृष्ठ चित्रातून अभावग्रस्त सकल श्रमजीवी स्त्रीची सागरासारखी विशाल संकटांना झुगारून देत जगण्याची जिद्द, आव्हानांना पेलण्याची उमेद व आत्मविश्वास दिसून येतो.
संपादक म्हणून महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले व प्रतिक पुरी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संचितात मोलाची भर घालत आहेत. त्यांना एक विनंती की अंकातील रिपोर्ताज विभागाचा हिंदी व इंग्रजी भाषेत अनुवाद करावा कारण हे रिपोर्ताज देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक सद्यस्थितीचे यथार्थ दर्शन घडवणारे आहेत. प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला 'अक्षरलिपी' एक नवी दृष्टी देईल यात शंकाच नाही.
••
दिवाळी अंक : अक्षरलिपी
संपादक : महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतिक पुरी
मूल्य : १६० रुपये
अंकासाठी संपर्क : ७७४४८२४६८५
••
ऋषिकेश गंगाधरराव देशमुख
मुपो : शिळवणी ता : देगलूर
जि : नांदेड . ४३१७४१
संपर्क : ९९२३०४५५५०, ७५५८३४५५५०