Paus | पाऊस

By // No comments:
आला पाऊस एकदाचा. त्याच्या लांबलेल्या आगमनाची प्रतीक्षा संपली. आसपासच्या साऱ्या आसमंताला चिंबचिंब भिजवत राहिला. त्याच्या येण्याने सृष्टीचा साराच नूर बदलला. वाऱ्यासोबत पाठशिवणीचा खेळ खेळत थांबला एकदोन दिवस मुक्कामाला प्रसन्न सोबत करीत. हुलकावण्या देणाऱ्या वांझोट्या ढगांकडे पाहून थकलेल्या नजरांचा त्याच्या आगमनाने सारा नजाराच बदलला. काळाचे भकास स्वप्न बदलून आशेचे नवे गीत गवसले. सचैल न्हालेल्या सृष्टीच्या आरस्पानी रूपाने वातावरणात चैतन्याचे सूर निनादू लागले. सुटकेचा मनमोकळा श्वास साऱ्यांनी घेतला. परिस्थितीने कूस बदलली. बरसणाऱ्या धारांनी ताल धरला. माणसांनी हा सुखसोहळा याची देही अनुभवला. मनात आनंदाचं  गोंदण करून गेला. पुन्हा परत येण्यासाठी.

सर्जनाचा गंध घेऊन धरतीवर अवतीर्ण होणारा ‘पाऊस’ चैतन्याचा साक्षात्कार. त्याच्या आगमनात इहलोकीच्या आनंदाची सारी गणिते एकवटली आहेत. चराचराला आपल्यात सामावून घेणारा पाऊस इहलोकी येताना आनंदयात्रा होतो. सृष्टीच्या रंगगंधांना सोबत घेऊन धरतीवर अवतीर्ण होताना सृजनसोहळा बनून प्रकटतो. सहस्रावधी सरींनी चराचराला भिजवणारा पाऊस सुखांची अनवरत बरसात करीत राहतो. त्याच्या आगमनात आशा-आकांक्षांचं आकाश समावलेलं असतं. त्याच्या येण्याने जगण्याच्या वाटा संपन्नतेच्या पथावरून मार्गस्थ होतात. उद्याचं भविष्य त्याच्या आगमनाने सजलेले असते. भविष्यातील सारी सुखं त्याच्या येण्यात सामावलेली असतात. तो यावा, वेळीच यावा; म्हणून त्याच्या येणाऱ्या वाटांकडे असंख्य डोळे लागलेले असतात. त्याच्या आगमनाने केवळ धरतीलाच चैतन्याची पालवी फुटते असे नाही, माणसांच्या मनातही आकांक्षांचे कोंब अंकुरित होतात. हिरवाईने सजलेल्या पानाफुलात मनातील रंगांच्या छटा उमटतात. बरसणाऱ्या धारांनी धरणीसोबत भिजणारी मने उद्याचं आश्वस्त जिणे पदरी आल्याने आनंदाच्या आकाशात मुक्त विहार करीत राहतात.

पाऊस वेळीच बरसला की, चेहरे आनंदाच्या स्मितरेषा सोबत घेऊन प्रसन्न तेजाने उजळून येतात. नसेल वेळेवर तर चेहऱ्यावरील तेजही काळवंडते. तो उदंड बरसावा आणि वेळीच बरसावा म्हणून माणसं मनातून प्रार्थना करीत राहतात. या प्रार्थनेत पुढील परिस्थितीची प्रखर वास्तवता सामावलेली असते. वेळीच येणार म्हणून त्याच्या आगमनाच्या मार्गावर अपेक्षांच्या पायघड्या घालून उभी असतात. पाऊस केवळ आकाशातून कोसळणाऱ्या जलधारा नाहीत. धारांसोबत माणसांची जीवनधारा जुळलेली असते. जगण्याचं आश्वस्त अभिवचन त्यातून प्रवाहित होत असतं. सर्जनाचा सोहळा बनून बरसणाऱ्या जलधारांमुळे जगण्याचे आश्वस्त अभिवचन मिळते. जगण्याचे सगळे संघर्ष आनंदपर्यवसायी व्हावेत म्हणून माणसं प्रतीक्षा करीत असतात. ज्या देशाची कृषीव्यवस्था पाऊस शब्दात सामावलेली असते, त्या देशाला त्याच्या आगमनाची प्रतीक्षा असणे स्वाभाविक आहे. तो येणार म्हणून केवळ शेतकरीच आसुसलेले नसतात, तर त्याच्याशी निगडित सगळेच त्याची करुणा भाकत असतात. 

अनेकांच्या आस्थेशी जुळलेला पाऊस अनेक रुपात धरतीवर अवतीर्ण होतो. तो केवळ पाऊस राहत नाही, तर अनेक रूपं धारण करणारा बहुरूपी होतो. खेळिया होतो. त्याच्या रूपाचं देखणंपण वेगळे आणि त्याच्या येण्याचे सोहळेही आगळे. कधी धो-धो कोसळणारा, कधी रिमझिम बरसणारा, कधी थेंबाथेंबातून निथळणारा, कधी मुसळधार कोसळणारा, कधी झड लागून दैनंदिन व्यवहार ठप्प करणारा. त्याच्या प्रत्येक भेटीचं रूपं आगळे, भेटीचा सोहळासुद्धा वेगळा. कसाही येवो, साऱ्यांना प्रिय असणारा पाऊस माणसांच्या जिवाचा जिव्हाळा असतो. म्हणून त्याच्या आगमनाचाही सोहळा होत असतो. साऱ्यांना त्याची ओढ लागलेली असते. वेळीच आला तर मनामनातून आनंद बनून प्रकटतो. नाहीच आला वेळेवर की, काळजाचा ठोका चुकतो.

काही दिवसापूर्वी आईशी बोलत होतो. बोलण्याच्या ओघात विषय शेतीकडे आणि शेतीकडून पावसाकडे वळला. पावसाने यावर्षी चांगल्याच वाकुल्या दाखवल्या असल्याने तिच्या शब्दांतून चिंता प्रकटत होती. पावसाचे आगमन लांबल्याने जगण्याची स्वप्ने विस्कळीत होत चालल्याची वेदना जाणवत होती. आजच्या वास्तवात उद्याच्या भकास भावविश्वाचे भाकित दिसत होते. शेतं उजाड पडत चालल्याचे दुःख होते. माणसांच्या देहात जीव असला तरी न येणाऱ्या पावसामुळे आत्मा हरवत चालल्याची जाणीव प्रकर्षाने प्रकटत होती. उद्याच्या उजाड जगण्याच्या भीतीची भाकिते कळत होती. तो यावा म्हणून मनातील आर्तता शब्द बनून प्रकटत होती. याला केव्हा एकदा वात्सल्याचा पान्हा फुटतो आणि वर्षावात सारा शिवार कधी भिजतो, याची आस मनाला लागली होती. उशिरा का होईना; पण तो येईल ही खात्रीही होती. आजूबाजूचे सारे बंध तुटतात; पण माणसाच्या मनातील आशेचे बंध सहजासहजी नाही तुटत. आई तिच्या दैवशरण भावनेतून आस्थेचे समर्थन करताना म्हणीत होती. ‘सृष्टीचा नियंता साऱ्यांना वाऱ्यावर असे कसे सोडेल. तो कनवाळू आहे. येईल त्याला या हताश माणसांची दया.’ आई अजूनही वास्तव परिस्थिती स्वीकारून पराभव पत्करायला तयार नव्हती. भारतीय शेतकऱ्याच्या याच मानसिकतेने अनेक आघातांना सामोरे जाण्याचे बळ पिढ्या न पिढ्या दिले आहे. शेतकऱ्याचा तो विजीगिषू वारसा तिच्या शब्दातून जाणवत होता.

नेमेचि येणारा पाऊस यावर्षी लांबला. माणसांची परीक्षाच घ्यायचे त्याने ठरविले होते जणू. सत्वपरीक्षा शब्दाचा अर्थ काय असतो, याचे उदाहरण जणू तो देतो आहे. येईन म्हणता, म्हणता अनपेक्षित हुलकावणी देत माणसांच्या आकांक्षांवर पाणी फिरवीत आहे. तो यावा म्हणून माणसं कासावीस होत आहेत. येत नाहीये म्हणून अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. माणसं कशीतरी धीर धरून उभी आहेत. ज्याचं सारं जगणं बरसणाऱ्या जलधारांशी बांधलं गेलं आहे, त्याच्या संयमाचे बांध फुटत चालले आहेत. आस्थेचे बंध सुटले आहेत. जीवनाच्या आसक्तीचे धागे तुटत जाऊन उद्याचं भविष्य काय असेल, या भीतीने आजचा वर्तमान उध्वस्त होतोय. जीवनाचे रंग शोधता-शोधता जगण्याचेच रंग हरवत चालले आहेत. त्याच्या असण्याने आणि नसण्याने सारं जगणं मुळापासून ढवळून निघतं. तो यावा, वेळीच यावा म्हणून माणसं आस लावून बसलेली असतात. 

माणूस मुळात श्रद्धाशील प्राणी आहे. उद्याचं भविष्य वर्तमानाच्या वर्तुळात शोधतो. उद्याचं समृद्ध जीवन घडविण्यासाठी धडपडत असतो. धडपडीतल्या कृतकृत्य भावनेचा गंध परिस्थितीच्या अनुकूलतेत सामावलेला असतो. प्रयत्नांनीही प्रारब्ध अनुकूल होत नाही, तेव्हा माणसं गलितगात्र होतात. थकतात. हरतात. जीवनाची स्वप्नेही हरवत जातात. हरवलेलं जगणं शोधताना परिस्थतीशरण होतात. पाऊस येऊन सर्वत्र आबादानी व्हावी, म्हणून देवाला साकडं घालतात. त्यालाच पाण्याखाली कोंडतात. महादेवाचा गाभारा पाण्याने भरतो. तो बुडताना निदान बुडणाऱ्या माणसांना, त्यांच्या स्वप्नांना तरी तरता यावे, ही वेडी आशा मनात घर करते. कोणी धोंडीधोंडी पाणी दे! म्हणीत दारोदार पाण्यासाठी याचना करीत फिरतात, तेव्हा संवेदनशील जिवांच्या मनाचे पाणी पाणी होते. तरीही देवाला पान्हा फुटेलच असे नाही. अशावेळी पराधीन आहे पुत्र जगी मानवाचा या विचारांवर विश्वास करावाच लागतो.

माणसाने कितीही प्रगती केलेली असलीतरी अशावेळी माणूस किती छोटा आहे, याची जाणीव निसर्ग प्रकर्षाने करून देतो. माणसांनी धरणे बांधून पाण्याला अडवलं, साठवलं. कधीतरी ते आटणार आहेतच. या वास्तवाला नाकारून चालणार नाही. आडातच नाहीतर पोहऱ्यात कुठून येणार. आणीबाणीच्या वेळी माणसं पाण्याचं महत्त्व जाणून घेतात. पाणी नियोजनाचा, बचतीचा संकल्प करतात. पण आलेली वेळ टळून गेली की, पुन्हा येरे माझ्या मागल्या. वेळ आल्यावर आपण विचार करतो. पाणी बचतीचा संकल्प करून मोकळे होतो. तो पुढे पूर्ण होतोच, असे नाही. याबाबत आपण कधी संवेदनशील मनाने विचार करणार आहोत कुणास ठावूक? आकाशातून बरसणाऱ्या पाण्याचा थेंब न् थेंब अनमोल असल्याचे नुसते सांगून काय उपयोग. त्या थेंबाचे मोल जाणणारे मन आपल्याकडे असावे. परिस्थती हाताबाहेर गेल्यावर मोल कळून काय उपयोग. तहान लागल्यावर विहीर खणण्यात कोणते शहाणपण सामावले आहे. आपल्या मनातील विहिरींना संवेदनशील विचारांचे झरे असायला नकोत का?

लहान असताना अनुभवलेला पाऊस आता फक्त स्मृतीतून उरला आहे. आमच्यासारख्या अनेकांचे बालपण पावसाच्या आठवणींनी समृद्ध केले आहे. संपन्न केले आहे. प्रसन्नतेचे दान आमच्या ओंजळीत भरभरून ओतणारा तो पाऊस आता कुठे गेला, कुणास ठाऊक? अनुभवला तसा पाऊस राहिलाच नाही. त्याचं रंगरूप, नूर सारं काही बदललं आहे. चारपाच दिवस झड बनून बरसणारा पाऊस राहिलाच नाही. आला, गेला एवढंच त्याचं अस्तित्व उरलंय. असा अचानक गेला कुठे? त्याला पळवला कुणी? त्याच्या सतत बरसण्याने कधीकाळी माणसे कंटाळत. तो येत नाही म्हणून आता का तरसतात. पावसाचे धोधो कोसळणे फक्त वाक्प्रचारापुरते उरलेय. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आठवणींचा ठेवा झाल्यात. पुराच्या पाण्यात वाहत येणारी लाकडे पकडण्यासाठी बेधडक उडी टाकणारे शोधूनही दिसत नाहीत. प्रचंड वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या छाताडावर नाचत विजयी वीराच्या थाटाने लाकूड ओढून आणणारी माणसं आता दिसतात तरी का?

उफाणलेल्या नदीत बिनधास्त उड्या टाकून पोहणाऱ्यांचे साहस भूतकाळ होऊन स्वीमिंग टँकपुरतेच उरले आहे. उन्हाळ्यातही न आटणाऱ्या नद्या कल्पनाविलासापुरत्या उरल्या आहेत. नदीवर पोहण्यासाठी जाणे हा आमच्या पिढीतील आनंदठेवा होता. आईवडिलांची नजर चुकवून नदीकडे धावणारी अनवाणी पाऊले कशाचीही फिकीर न करता तापलेल्या वाळूतून पोळणाऱ्या पायांना उचलीत पळायची. पोहण्याच्या ओढीने कधी पायाला शेणाने माखून, कधी पाण्यावर जाणाऱ्या म्हशीच्या पाठीवर बसून नदी गाठायची. तासनतास नदीच्या पाण्यात पोहत असायची. नदीच्या अथांग, नितळ पाण्याशी अस्तित्वाची नाळ अशी घट्ट जुळलेली असायची. बऱ्याचदा नदीवरून परत आल्यावर आईच्या हाताचा मार ठरलेला असायचा. पैजा लाऊन नदीचे दोन्ही तीर गाठण्याच्या आनंदापेक्षा मार खाण्यातील दुःख कमी वाटायचे. बालपणातील तो निरागस आनंद वाढत्या वयासोबत दुरावत गेला. नद्यांवरील धरणांनी पाणी साठवले. दुथडी भरलेले पात्र आटवले. नदीकाठ कोरडे पडले. आटणाऱ्या पाण्यासोबत आनंदही आटत गेला. आठवणीचा काठ मात्र अजूनही तसाच अल्याडपल्याड दोन्ही काठ तुडुंब भरला आहे.

पावसाचं येणं जाणं वरचेवर अनियमित होत चालले आहे. माणसांच्या अनिर्बंध हव्यासापोटी निसर्गाच्या चक्रात अक्षम्य हस्तक्षेप करून माणूस निसर्गनियमांचा अधिक्षेप करीत आहे. वैयक्तिक स्वार्थापायी निसर्गाला ओरबडताना आपले अस्तित्व आपल्याच हाताने आज उध्वस्त करीत चालला आहे. जगण्यातील सहजपण विसरून स्वार्थपरायण होत चालला आहे. माणूस जसा बदलत गेला तसा निसर्गही बदलतो आहे. माणसांच्या आवश्यक गरजा पूर्ण करायला समर्थ असणारा निसर्ग त्याच्या स्वार्थाला, लालसेला कसे पूर्ण करू शकेल. ‘धटाशी असावे धट’ या न्यायाने तोही वर्ततो आहे. सहस्रावधी धारांनी बरसताना आनंदाची उधळण करणारा, देहाला भिजवताना मनालाही आकंठ भिजवणारा पाऊस आठवणीत साठला आहे. कधीकाळी संततधार बरसणाऱ्या पाण्याला घालवण्यासाठी पोळवणारी माणसं त्याच्या पाठ फिरवण्याने पोळली जात आहेत. या साऱ्यां बदलांची कारणं माणसांना माहीत नाहीत, असे नाही. पण माणूस काही शहाणा होत नाही. शहाणपण केवळ दिसण्यात नसतं. वागण्यातही असतं, तसं जगण्यातही असतं. आनंदाने जगण्यातच खरे शहाणपण सामावले आहे. असा आनंद आसपासच्या आसमंतात सामावला आहे. हे शहाणपण आम्हा माणसाना कधी येईल? की पावसाप्रमाणे तेही वाट पहावयास लावेल? 

Shantiparate Nahi Sukh | शांतीपरतें नाही सुख

By // No comments:
संत तुकाराम महाराजांचा ‘शांतीपरतें नाहीं सुख । येर अवघेंची दुःख॥’ पाठ्यपुस्तकात असलेला हा अभंग वर्गात शिकवीत होतो. अभंगाच्या ओळींमधल्या आशयाचे विवेचन माझ्या आकलनाच्या परिप्रेक्षात ज्ञात असलेल्या उदाहरणांच्या साह्याने विशद करीत होतो. वर्गाची ‘ब्रह्मानंदी टाळी’ लागलेली. अशा वातावरणात शिकविताना आम्हा शिक्षक जमातीच्या अंगात नेहमीच एक अनामिक उत्साह संचारतो. अनुभव आणि वाचनातून ज्ञानाचं संचित जमा केलेलं असतं. त्यातून असेल नसेल ते आठवून सांगण्याचा प्रयत्न सुरु असतो. विवेचनाने बऱ्यापैकी वेग धारण केलेला असतो. मीही यास कसा अपवाद असेन. जीवनातील शांततेचे महत्त्व, आवश्यकता विशद करून सांगण्यात रंगलो. वर्ग शांतपणे ऐकतोय. माझ्या विवेचनाची वरची पट्टी लागलेली. वाक्यांमागून वाक्ये हात धरून पुढे चालली आहेत. मला थांबवत एक आवाज वर्गातून उमटतो. “सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे, विचारू!” माझं विवेचन थांबवलं. म्हणालो, “विचार! काय म्हणायचे आहे तुला?” “सर, तुम्ही जीवनातील शांतीचे महत्त्व सांगत आहात, ते सगळं ठीक आहे; पण आपल्या आसपास शांतता खरंच दिसतेय का?”

प्रश्न तसा साधाच होता. उत्तर काय सांगायचे, यासाठी मनातल्यामनात वाक्यांची जुळवाजुळव केली. त्याचे समाधान होईपर्यंत स्पष्टीकरण करीत होतो. त्याच्यासह इतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे पालटणारे भाव नजरेने टिपत राहिलो. साऱ्यांच्या चेहऱ्यावरील संमिश्रभाव आपल्या आसपास यातील काहीतरी, कुठेतरी कमी असल्याचे सांगत होते. उक्ती आणि कृतीतील तफावत जाणवत होती. तास संपला वर्गातून बाहेर पडलो. मुलांच्या शंकांचे निरसन करूनही एक संदेह अस्वस्थपणे सोबत करीत होता. वाटले मुलांना शांततेचे महत्त्व तर पटले; पण शांतता आपल्या आसपासच्या आसमंतात अस्तित्वात नसल्याचे यांना का वाटत असावे? यांच्या आसपासचे वातावरण खरंच एवढे प्रदूषित झाले आहे?

‘शांती’ फक्त दोन अक्षरांचा शब्द. यात माणूस आणि माणूसपण सुरक्षित असण्याचे आश्वस्त करणारे केवढे समाधान साठलेले आहे. माणसांना जीवनयापनासाठी कितीतरी गोष्टी आवश्यक असतात. पण त्यासह शांतताही सोबत असायला लागते. ती नसेल तर सर्वकाही असून नसल्यासारखेच. माणूस कशासाठी जगतो, या प्रश्नाचं उत्तर अनेक पर्यायात देता येईलही. मला वाटतं आयुष्यात येऊन विसावणाऱ्या शांततेच्या चार क्षणांना मिळवण्यासाठी माणूस जगतो. ते मिळाले म्हणजे कृतार्थ जीवन जगण्याचं समाधान अंतर्यामी विलसत राहते. नाहीच ते आनंदाचे चार क्षण मिळवता आले तर अंतर्यामात अस्वस्थता वसतीला येऊन सोबत करते. जीवनातील निरामय आनंदापासून माणूस वंचित राहतो. म्हणूनच तुकाराम महाराजांनी मनाच्या प्रसन्नतेचे सुक्त गायले असेल.

पद, पैसा, प्रतिष्ठा सारेकाही आहे, पण जीवनात शांतताच नसेल तर लाख खटपटी, लटपटी करून महत्प्रयासाने मिळवलेल्या या गोष्टीचे मोल उरतेच किती? अशावेळी मातीमोल शब्दाचे महत्त्व काय आहे, याची जाणीव प्रकर्षाने होते. हजारो वर्षापासून माणूस सुख सर्वत्र शोधतो आहे. अजूनतरी ते त्याला मिळाले नाही. मिळाले असते तर आपल्या आसपास प्रसन्नतेचा परिमल दरवळला असता. कलहाचे नामोनिशाण दिसलेच नसते. प्रसन्नता पहाटेच्या प्रहरी परसदारी पसरलेल्या पारिजातकाच्या फुलांच्या परिमलासारखी असते. तिच्या गंधाने मनाचं आसमंत भरून आलं म्हणजे सुखाचा सुगंध जीवनात प्रवेशित होतो. हे सर्वांबाबतीत घडेलच, असेही नाही. सुखातून समाधान आणि समाधानातून शांतता आपल्या अंगणी प्रवेशित होत असते.

शांतता मनाची अशी स्थिती आहे, जी जगण्याचे प्रयोजन अधोरेखित करते. जगावं कसं, या प्रश्नाचं उत्तर कुसुमाग्रजांच्या ‘आकाशापरी जगावे, मेघापरी मरावे, नदीकिनारी फिरुनी तृणपात्यातून उरावे’ या काव्यपंक्तीमधून आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर अन्य स्त्रोत शोधण्याची आवश्यकता राहणार नाही. विद्यमान जगाकडे कटाक्ष टाकल्यास काय दिसते. कलह, संघर्ष, संकटे, शोषण, अतिरेक याचं प्राबल्य वाढत चालले आहे. अन्याय, अत्याचार सहज दृष्टीस पडतो आहे. त्याचीही आम्हाला आता सवय होत चालली आहे. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारे आणि संघर्ष करणारे रियल लाईफमधले हिरो दुर्मीळ होत आहेत. चित्रपटाच्या रिल लाईफमध्ये आम्ही त्यांना शोधतो आहोत. शोषक शोषितांच्या असाहयतेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी पद्धतशीर करतात. अन्याय घडतो, तो समोर दिसतोही. पण संघर्ष करायला बळ असावे लागते, ते आमच्याकडे असूनही आमची अवस्था किंकर्तव्यमूढ अर्जुनासारखी झाली आहे. संघर्ष करावासा वाटतो. परिस्थितीशी दोनहात करण्याचे विचार मनात येतात. पण का उगीच आपल्या मनाची शांतता घालवून बसा, म्हणून निष्क्रिय प्रारब्धवाद प्रबळ होत जातो. माणसं आहे त्यात समाधान मानायला लागतात.

अस्वस्थ जग आपल्या आसपास नांदत असताना शांतता कशी निर्माण करता येईल? जगातील कलह शांततेच्या मार्गानेच सोडवता येतील, या विचारावर विश्वास असणाऱ्या माणसांनी शांततेचे पथ निर्माण करण्याचे प्रयत्न केले. शांततापूर्ण सहअस्तित्वातून घडणारे सुंदर जग निर्माण करण्याचे स्वप्न अनेक धुरिणांनी आपआपल्या काळी पहिले. पण त्यांच्या प्रयत्नांना फलप्राप्तीचा मोहर आला का? कदाचित पुरेसा नाही. शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात सत्ताकांक्षी, साम्राज्यवादी मानसिकतेने वर्तणाऱ्यांकडून विद्वेषाचे वणवेच पेटवले गेले आहेत. विद्वेषातून युद्धे घडली. युद्धाने सारेच प्रश्न सुटू शकतात, असे बऱ्याचदा वाटतेही. अशा विचारांवर विश्वास ठेऊन समर्थन करणाऱ्यांना काही कळत नाही असे नाही. युद्धपिपासू मानसिकतेतून आणखी जटील प्रश्नांचा जन्म होतो. हे आपण सोयिस्कररित्या का विसरतो? 

शंभर वर्षापूर्वी लाखो लोकांच्या जिवाची आहुती देणारा पहिले महायुद्ध नामक रक्तरंजित खेळ विश्वात शांतता प्रस्थापित करण्यासाठी माणसाने खेळून पहिला. यातून जगात कोणती शांतता प्रस्थापित झाली? युद्धातून तह आले. तहातून अपमानजनक अटी. अपमानकारक अटीतून हुकूमशाही विचारधारा प्रबळ होत जाऊन हुकुमशहा घडत, वाढत राहिले. हुकूमशहांच्या महत्वाकांक्षेतून अनिर्बंध, अविवेकी अस्वस्थता प्रबळ होत राहिली. अशा अवस्थ अशांततेतून भीषण संहार पुन्हा घडलाच ना! या रक्तलांच्छित खेळातून आपणास खरंतर शहाणपण यावयास हवे होते; पण ते न येता पुढच्या वीस वर्षात पुन्हा एकदा त्याहून भीषण संहार घडवणारा कलंकित अध्याय इतिहासात दुसऱ्या महायुद्धाच्या रूपाने लिहिला गेला.

दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणूहल्ले करून अमेरिका कोणती शांतता प्रस्थापित करू पाहत होती? अविवेकी आकांक्षेतून, अनिर्बंध कृतीतून कोणते सुख, शांती विश्वाच्या ललाटी लेखांकित होत होती. सहकार्य, सहजीवन ही विद्यमान विश्वाची अनिवार्य आवश्यकता असताना अनेक देश, प्रदेश आजही धुमसत आहेत. दहशतवादी, अतिरेकी कारवाया करणारे बंदुकीच्या टोकावरून कोणती शांतता प्रस्थापित करू पाहत आहेत. महत्वाकांक्षा असणाऱ्या धुरिणांच्या अविवेकी निर्णयातून निरपराध लोकांचे जिणे असह्य होत आहे. इराकमध्ये बंदुकी, बॉम्बच्या ज्वालांनी बळी जाणाऱ्या नागरिकांचा दोष काय? इस्त्राईल, इराण, इजिप्त, सिरीया, युक्रेन अफगाणिस्थान यासारख्या देशातून एकांगी विचार का वाढत चालला आहे? अशा विचारला अस्मिता समजणे, हे जगण्याचं कोणतं सुयोग्य तत्वज्ञान आहे? मोठ्या प्रमाणात घडून येणाऱ्या बदलास क्रांती म्हणतात. असा बदल जाणीवपूर्वक घडवून आणला जातो. अन्यायाच्या विरोधात तो एल्गार असतो. पण अविवेकी विचारातून घडवून आणलेल्या क्रांतीने कोणता सकारात्मक बदल माणूस घडवू पाहत आहे. दहशवादी कारवाया करणारे कोणते नवे जग घडवू पाहत आहेत? रक्ताने माखलेल्या पथावरून सत्तेचे सिंहासन मिळवून सत्ता प्राप्त करता येईलही; पण अशा रक्तलांछित सिंहासनावर अधिष्ठित होऊन शांती कशी निर्माण करता येईल?

‘खायला कोंडा आणि निद्रेला धोंडा’ अशी एक म्हण आपण ऐकतो. अंतर्यामी शांतता वसत असेल, तर भोजनपात्रातील कोंडाही पक्वान्नासमान वाटतो. प्रामाणिक परिश्रमाने थकलेल्या शरीराला सुखनिद्रा येण्याकरिता वातानुकूलित घराची आवश्यकता नसते. थंडी, ऊन, वाऱ्यात असेल तशा परिस्थितीत शांत झोप तेव्हाच लागते, जेव्हा हृदयात मनःशांतीने निवारा शोधून वसती केली असते. आपलं अंतर्याम शुद्ध, स्वच्छ, नितळ, निर्विकार, निर्विकल्प असेल तर निद्रा येईल कशीही आणि कोठेही. पण मनात दोषाचं डबकं साचलं असेल, विकल्पाचं तण वाढलं असेल, अविवेकाचं मोहळ उठले असेल, तर पैसा देऊन विकत घेतलेल्या भौतिकसुखांमध्ये झोप येईलच कशी? जीवनातील शांततेने निरोप घेऊन मन सैरभैर झाले म्हणून माणसं शांततेच्या शोधात वणवण भटकंती करीत राहतात. तीर्थक्षेत्री जाऊन देवाला साकडं घालतात. त्याच्याकडे हात पसरून सुख, शांती मागतात. तेथे जाऊन ती मिळते? माहीत नाही. ‘तुझं आहे तुज पाशी; पण जागा चुकलाशी’ अशी स्थिती आपली झाली आहे. हृदयातील भगवंत हृदयातच उपाशी आहे.

आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक तापांनी मन पीडलेले असेल, तर स्वस्थता लाभेलच कशी? आध्यात्मिक ताप साधकांच्या वाट्याला येतो म्हटल्यास आधिभौतिक, आधिदैविक हे दोन ताप आपण सामान्य माणसांच्या वाट्यास विपुल प्रमाणात येतात. ते नाहीसेही करता येतात. याकरिता मनाची प्रसन्नता आपल्या अंतर्यामी असायला नको का? मन शांत असल्यावर असे ताप चढतीलच कसे? केवळ भौतिक सुखालाच जीवन मानणारे संतुष्ट नाही होऊ शकत. आपल्याकडचा पैसा फेकून भौतिकसुविधा प्राप्त केल्या म्हणजे शांतताही जीवनात प्रवेशित होते, असे म्हणणे आपल्या मनाची वंचना नव्हे काय? सौख्य आणि शांती चंद्रमौळी झोपडीतही आवास करीत असते. त्यासाठी दोनतीन कोटीचा बंगला नावावर असायलाच हवा, असे नाही. इंद्रियसुखांना अविवेकी, अतिरेकी महत्त्व दिल्याने त्यांची तृप्ती होणे संभव नाही. आनंदाची प्राप्ती क्षणिक भौतिकसुखांच्या, सुविधांच्या संपादनात नसून अंतरात्म्याच्या समाधानात असते. चिरंजीव आनंदाचे उगमस्थान आपले अंतर्यामच आहे. शरीराचे सोहळे साजरे करणारी सुखं ‘ययातीचं’ जगणं ललाटी लेखांकित करतात. तारुण्याचं वरदान मागता येईलही; पण चिरतारुण्य म्हणजेच सुख असू शकत नाही. देह वृद्ध झाला म्हणून काही बिघडत नाही. मन मात्र तरुण असायला हवे. तारुण्यातच जीवनाला आकार देण्याचे सामर्थ्य असते. हे सामर्थ्य विवेकी विचारातून घडत जाते. अशा घडलेल्या विचारातून शांतीचा सहवास लाभतो.

अमूप सुख ओटीत टाकणाऱ्या साधनांची निर्मिती विज्ञानाने केली, पण या साधनांमुळे जीवनात शांतता आली नाही. अणुशक्तीने विध्वंसही करता येतो आणि विकासही करता येतो. तिचा वापर करायचा कसा, हे माणसाला ठरवावे लागते. विवेकी विचार करणाऱ्यांच्या हाती ती लागली, तर काळवंडलेले आभाळ प्रकाशित करता येते; पण अविवेकाच्या हाती हे सामर्थ्य आले तर अंधाराचे साम्राज्य विश्वात उभे करता येते. वापर करायचा कसा, हे आपल्यालाच ठरवावे लागते. मनात शांतता असल्याशिवाय हे नीट कळेल कसे? कालच्या जगाचं जगणं आणि आजच्या जगाचं जगणं यात खूप अंतर आहे. पूर्वी जीवनात फारशा सुविधा नसतानाही माणसं संतुष्ट वाटत होती. संकटकाळी मदतीला धावून जात होती. आज मला काय त्याचं, या अलिप्ततावादी धोरणाने जगत आहेत. विद्यमानकाळी खूपकाही हाती लागूनही मनातील सुखांची लालसा काही कमी होत नाही. कामक्रोध खवळत आहेत. विवेकशून्य विचार प्रबळ होत आहे. भडकलेल्या कामक्रोधाने जिणं दुष्कर केले आहे. असुरक्षित वाटू लागले आहे. संयमाचे बांध उध्वस्त होत आहेत. कोणातरी निरपराध निर्भयाच्या जीवनयात्रेची सांगता घडत आहे. थोड्याशा धनाच्या लालसेसाठी कोणाचातरी देह धारदार शस्त्राच्या वेदीवर चढत आहे. ‘सुरक्षितता’ शब्दालाच सुरक्षित करायची वेळ आली आहे.

विश्वात माणसाइतका विचारी सजीव कोणीच नाही, हे वास्तव आहे. पण माणसाइतका अविचारही कोणी करू शकत नाही, हेही सत्य नाकारून चालत नाही. उत्क्रांतीच्या टप्यात वानराचा नर आणि नराचा नारायण होणं अपेक्षित आहे. पण परिस्थिती ‘नरेचि केला किती हीन नर’ अशी होत चालली आहे. अशांत विश्वात शांतीचा अधिवास शोधावा कसा आणि कुठे? काय केले असता मानसिक शांती मिळेल, असा प्रश्न निर्माण होतोय. विकारांनी शरीराची बजबजपुरी केली असेल तर तेथे शांती राहीलच कशी? विकारग्रस्त चित्ताला तिळमात्रही शांतता लाभत नाही. विकारांचं अधिष्ठान असणाऱ्या ठिकाणी शांतता असू शकत नाही. मग याकरिता काय करावे? याचे उत्तर तुकाराम महाराजांच्या  ‘बैसोनि निवांत शुद्ध करी चित्त । तया सुख अंतपार नाही ॥’ या अभंगाच्या विचारात आपणास मिळेल. शोधून तर पहा. निष्काम शोधयात्रा आपल्या अंतर्यामी सुख, शांतीचे अधिष्ठान निर्माण करते.

Samadhan | समाधान

By // No comments:
चित्ती असू द्यावे समाधान

‘समाधान’ असा शब्द ज्याचं अस्तित्व आपल्या जीवनात कायम असावं, ही साऱ्यांचीच अपेक्षा असते. तसं थोडंफार समाधान प्रत्येकाकडे असतेच; पण ते नुसते असून चालत नाही. त्याचा प्रवाह आपल्या जीवनसरितेला समृद्ध करीत राहावा म्हणून धडपडही सुरु असते. यासाठी हे प्रवाह जेथूनही आपल्याकडे वळते करता येतील, तेथून वळते करण्यासाठी अखंड धावाधाव करताना काही माणसं आपल्या आसपास दिसतात. धावपळीतून त्यांना समाधानाची प्राप्ती होते का? असा प्रश्न बऱ्याचदा मनात डोकावून जातो. नसावी, कारण समाधानाचा एक प्रवाह आपल्याकडे वळता केला की, आणखी नवे स्त्रोत शोधण्याची इच्छा मनात उदित होत असते. आणि जे मिळालेले असते, ते चिरकाल टिकणारे असतेच असेही नाही. मिळाले तेच समाधान आहे, हे मानायला मन बहुदा तयार नसतेच. कारण हातून काहीतरी निसटल्याचे सतत वाटत असते. त्यातून आणखी काही मिळवण्याची तृष्णा जागी होते.

तृप्ती, संतोष, आराम हे समाधान शब्दाचे समानार्थी शब्द शब्दकोशात पहावयास मिळतात. हे शब्द कितीही चांगले वाटत असलेतरी ‘असमाधान’ या विरुद्धार्थी शब्दाचाच आपल्या जीवनात अधिक अधिवास असतो. आपली इहलोकीची यात्रा सुखमंडित असावी, ही अपेक्षा सतत सोबत करीत असते. म्हणून या अपेक्षेच्या पूर्तीसाठी काहीतरी करणं आलंच. कारण ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ असे वर्तल्यास संपन्न, समृद्ध वगैरे जगणं वाट्याला येणार नाही. पर्यायाने सुखाचा शोध घडणार नाही आणि सुख नाही म्हणून समाधानही नाही. म्हणूनच की काय जगात सुखी माणूस जन्माला यायचा आहे, असं म्हटलं जात असावं. सुख, समाधान ही व्यक्तिसापेक्ष संकल्पना. थोड्याशा अनुकूलतेतही काही माणसं तृप्त असतात. काहींना कितीही मिळालं तरी पर्याप्त समाधान नसतं. त्यांना आपल्याकडे आणखी काहीतरी असावं, असं सतत वाटत असतं.

संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान.’ तुकाराम महाराजांना येथे समाधान शब्दाचा काय अर्थ अपेक्षित असेल? सारंकाही देवाच्या हाती सोपवून आपण निश्चिंत राहावे. नाही! असा निष्क्रिय प्रारब्धवाद त्यांना नक्कीच अभिप्रेत नव्हता. आपल्या अंतर्यामी तृप्तीची धारा प्रवाहित राहावी. याकरिता अहर्निश परिश्रमरत राहून अनंताच्या अधिपत्याखाली आनंदाने जगावे. जगताना अनावश्यक गरजांच्या मागे न धावता अंतरीच्या समाधानाला शोधण्यासाठी जीवनाची शोधयात्रा घडावी. पुढे चालताना हीच जगण्याची आनंदयात्रा ठरावी, हेच त्यांना अपेक्षित असावे. आनंद आपल्या अंतरीचा अनमोल ठेवा असतो. त्याला शोधण्यासाठी कस्तुरीमृगासारखं वणवण धावण्याची आवश्यकता नाही. इहलोकीची सारी सुखं मनाच्या समाधानात साठली आहेत, सामावली आहेत. समाधान प्राप्त करण्यासाठी प्रसंगी आपल्या भौतिक गरजा कमी करून पदरी आलेल्या दैन्याचा विनम्रतेने स्वीकार करीत जीवनाचा नम्र शोध घेण्याची वृत्तीच समाधानाचे प्रदेश निर्माण करीत असते. समाधानाने बहरलेल्या वनात आनंदविभोर होणारं आत्मतृप्त, अत्मापर्याप्त, आत्मलीन मन आपल्यापाशी असलं की, समाधान अंतर्यामी सहज अवतीर्ण होतं.

हजारो वर्षापासून माणसाची जीवनयात्रा प्रगतीच्या नवनव्या प्रदेशांच्या शोधात अनवरत सुरु आहे. हा थकवणारा शोध कशासाठी? सुखप्राप्ती, हे त्याचं उत्तर. यासाठीच तो नव्या गोष्टी शोधत गेला. बैलगाडीपासून आगगाडीपर्यंत आणि आगगाडीपासून अवकाशयानांपर्यंत त्याच्या प्रगतीच्या पाऊलांनी गगनगामी झेप घेतली. समुद्रतळापासून अवकाशतळापर्यंत अनेक अज्ञात परगण्यांची सफर त्याने सुखाच्या शोधासाठी केली. विज्ञानाचे दीप उजळून त्याच्या प्रकाशात अनेक भौतिक साधनं निर्माण केली; पण या साधनांनी माणूस खरंच सुखी झाला का? या प्रश्नाचं हो, असं उत्तर यायला आणखी खूप अवधी लागेल. शोधांनी काहीकाळ समाधान मिळालं असेल. पण ते काही चिरकाल टिकणारे नाही. त्याला अतृप्तीचा अभिशाप आहे. लागलेल्या शोधांनी माणसाच्या जीवनातील सारी दुःखे संपलीत, असंही कोणी म्हणू शकत नाही किंवा तसं म्हटल्याचं आठवत नाही.

विज्ञाननिर्मित सुधारणांसाठी आपल्याला भौतिकसुखांची विपुलता असणाऱ्या अमेरिकन संस्कृतीकडे पाहण्याची आवश्यकता वाटत असेल; पण जीवन समजून घेण्यासाठी कोठे बाहेर जाण्याची गरजच नाही. कारण शेकडो वर्षापासून समर्पणशील विचारांच्या पायावर भारतीय संस्कृती उभी आहे. येथील संस्कारक्षम जीवनाची महत्तता जाणवेल एवढी मोठी आहे. अमेरिकेचा दरडोई उत्पन्नाचा निर्देशांक अधिक असेलही, पण दरडोई समाधानाचा निर्देशांक भौतिकसुविधांमध्ये हरवत चालला आहे. भारतीय लोक संपत्तीने दरिद्री असतील, सुविधांची येथे वानवा असेलही. पण दारिद्र्यातही मनाची श्रीमंती आहे. हल्ली आपल्याकडेही जगण्याच्या कॅनव्हासवरील चित्र हळूहळू बदलत चालले आहे. सुखप्राप्तीचे नवे रंग माणूस त्यात भरू लागला आहे. सुखाच्या स्वनिर्मित मृगजळामागे धावण्याच्या स्पर्धेत जवळजवळ सगळेच सहभागी व्हायला तयार झाले आहेत.

मनात समाधान नाही म्हणून ते शोधण्यासाठी धावाधाव सुरु होते. निघतात माणसं सुखाच्या शोधात. कोणी कुठे, कोणी कुठे. कुणी यात्रेला, कुणी तीर्थयात्रेला, कुणी पर्यटनाला, कुणी परदेश वारीला. निदान तेथेतरी मनाला समाधान देणारा कोणीतरी सुखकर्ता असेल. तो असला म्हणजे तेथे सुखही नक्कीच सापडेल, असं वाटायला लागतं. एकदाचं आपल्याला सुखं मिळालं म्हणजे समाधानही येईलच असं मानून माणसं नद्या, समुद्रात डुबक्या मारतात, स्नान करतात. येथेही क्षणिक समाधानापलीकडे फारसे काही हाती लागतच नाही. शोधायला गेलो होतो, ते हाती आलेच नाही, म्हणून त्यातून पुन्हा आंतरिक अस्वस्थता निर्माण होते. समाधान आपल्या अंतर्यामी आहे. अंतरीचे हे सुख पाहण्यासाठी आपल्याकडे नुसते डोळे असून चालत नाही. डोळे सगळ्यांना असतात; पण दृष्टी फार थोड्यांना असते. ‘तुझे आहे तुजपाशी पण जागा चुकलाशी’ अशीच आपली स्थिती होणार असेल, तर समाधान हाती लागेलच कसे?

समाधानाच्या शोधासाठी क्षणिक सुख पदरी ओतणारी भौतिकसाधनं माणसं पैसे देऊन आणू शकतील. पण समाधान पैसा देऊन विकत घेता येत नाही. घरात टीव्हीसेट आहे, सोफासेट आहे, डिनरसेट आहे, टीसेट आहे; पण माणसं मात्र येथून तेथून अपसेट आहेत. माणसं सुखाच्या शोधात स्वतःला हरवत चालली आहेत. निसर्गातलं निर्व्याज सुख देणारं जंगल दुर्लक्षित करून सिमेंट काँक्रिटच्या जंगलात सुखाचं नंदनवन उभं करायला निघाली आहेत. ते उभं राहावं म्हणून अखंड धडपडतायेत. एअरकंडिशन बसवून समाधानाचा शीतल गारवा निर्माण करू पाहत आहेत. अशा एअरकंडिशन घरांमध्ये काहीकाळ गारवा निर्माण करता येईलही. हा आल्हाददायक गारवा हेच खरे समाधान आहे, असेही वाटेल कदाचित; पण तेही क्षणिकच. कारण बंगल्याबाहेर असमाधानाचा वणवा उभा आहे. त्या वणव्यात गारवा शोधायचा कसा?

घर, बंगला, गाडी, माडीत काहींना संतोष मिळत असतो. पण तो काही चिरंजीव नाही. गाडीचे मॉडेल बदलून नवे आकर्षक मॉडेल बाजारात आले, ते आपल्याकडे असावं म्हणून वाटेल. स्मार्टफोन नव्याने मार्केटमध्ये आला. तो माझ्याकडे का नसावा, म्हणून मन झुरणी लागेल. माडीवर माडी बांधावी म्हणून कधीचा विचार करतोय, म्हणून मन स्वस्थ बसू देत नाही. हे मिळवण्यासाठी अस्वस्थता वाढत जाईल. त्यातून अंतरीचे समाधान अंतर्धान पावेल. आजूबाजूला दिसणारी झगमग आपल्या मनाची तगमग वाढवेल. खरंतर विद्यमान जग आपल्याला जगण्यासाठी कालच्या असुविधायुक्त जगापेक्षा सुसह्यच नाही, तर सुखाचंही झालं आहे. पण उद्याचं अधिक संपन्न, समृद्ध वगैरे प्रगत जग घडवण्याचा हव्यासातून अतृप्तीची बीजें मनात अंकुरतात. आजूबाजूला काटेरी झुडपे सहज नजरेस पडतात; पण चंदनाची झाडे क्वचितच दिसतात. ही चंदनाची झाडे जागोजागी रुजवल्याशिवाय समाधानाचा सुगंध आसपासच्या आसमंतात कसा पसरेल?

काही दिवसापूर्वी माझा एक विद्यार्थी भेटला. दहावीच्या परीक्षेत थोडे कमी गुण मिळाल्याने त्याला आवडणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार नसल्याची खंत व्यक्त करीत होता. शिकायला केवळ तेच महाविद्यालय कशासाठी हवं? इतरही महाविद्यालये आहेत, तेथे शिक्षण घे म्हणून सांगितले तर म्हणाला, “मी निवडलेल्या महाविद्यालयात चांगलं शिक्षण मिळण्याची संधी आहे. तेथे प्रवेश घेणारे विद्यार्थीही अभ्यासू, हुशार वगैरे असतात. मात्र, एवढ्या गुणांनी तशी संधी मिळण्याची शक्यता नाही. म्हणून विचारात पडलोय कोणता पर्याय निवडावा.” त्याच्या मनात समाधान-असमाधानाचे द्वंद्व सुरु झालेले. मिळवायचे होते, ते राहून गेल्याची खंत मनाला सतत कुरतडत राहील. त्यातून असमाधानाचे काटेरी झुडपं त्याच्या विचारविश्वात जोमाने वाढत राहतील. ‘आलीया भोगाशी असावे सादर’ म्हणीत परिस्थितीविषयी थोडा सकारात्मक विचार याला करता आला असता तर... पण नाहीच करीत आपण तसं. खरंतर समाधान शब्दाची परिभाषा आपण आपल्यापुरती तयार करून घेतलेली असते. त्याप्रमाणे जीवनात नाहीच काही घडलं की, मनात अस्वस्थतेचे मळभ जमा व्हायला लागतात अन् त्यातून असमाधानाचे विचार जन्म घेतात. त्यांना मनात एकदाची जागा करून दिली की, ते पद्धतशीर वाढत जातात.

परिपूर्ण समाधानी असणं लौकिक अर्थाने कितीही उत्तम असले, तरी भौतिक सुख-सुविधांकडे नेणाऱ्या मार्गाच्या निर्मितीसाठी अंतर्यामी थोडी अस्वस्थता, थोडे असमाधान असल्याशिवाय नव्या गोष्टी शोधणं माणसाला शक्यच होणार नाही, हेही तितकेच खरे आहे. सुखासाठी काहीतरी हवं, ही भावनाच माणसाला नव्या परगण्यांकडे चालण्यासाठी प्रेरित करते. कोणत्यातरी अपेक्षेने मनात उदित होणारी अस्वस्थताच नव्याचा शोध घेण्यासाठी उद्युक्त करीत असते. अल्पसंतुष्ट राहून घडणाऱ्या प्रगतीचं बोनसाय होणं, हे लिहिताना अपेक्षित नाही. गरजांतून निर्मित सुविधांचा वटवृक्ष वादळवाऱ्याशी संघर्ष करीत उभा राहणं आणि त्याचा विस्तार घडत राहणं, म्हणजे प्रगती. प्रगती घडताना आवश्यक काय, अनावश्यक काय याची जाण असणं आवश्यक आहे. नैतिकमूल्यांची होणारी पडझड थांबवून, त्यांचा अवनतीकडे होणारा प्रवास टाळला की, समाधान देखण्या पावलांनी चालत आपल्याकडे वसतीला येते.

मिळाले तेवढेच पुरे आहे, अशा समजाने संतुष्ट होऊन माणूस जगला असता, तर प्रगतीचा एवढा मोठा पल्ला त्याला गाठताच आलाच नसता. माणसाची सर्वांगीण प्रगती जीवनाला सुखी करण्यासाठीचा प्रवास असावा. अस्वस्थ दिशेने नेणारा विकास नसावा. संत ज्ञानेश्वरांच्या ‘आनंदे भरीन तिन्ही लोक’ या भावनेचा परीसस्पर्श विकासाला असावा. त्यातून तृप्तीचे, संतोषाचे निर्झर जन्माला यावेत. या निर्झरांनी माणसाच्या जीवनाला समृद्ध करण्यासाठी अनवरत प्रवाहित राहावे. त्याच्या नितळ प्रवाहाने आजूबाजूचा आसमंत फुलून यावा. बहरणे घडावे. या बहरण्याला कृतकृत्य झाल्याचे समाधान मिळावे. अशा समाधानातून प्रगतीकडे नेणारा जीवनाचा प्रवास म्हणजे खरे समाधान असेल, नाही का?