Vikalp | विकल्प

By // 7 comments:
आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यात विसावणाऱ्या क्षणांचे प्रयोजन आपल्यासाठी नेमके काय असते, याचा आपण ठरवून सखोल वगैरे विचार कधी केलेला असतो का? मुळात ते असते की, फक्त समाधानासाठी तसं म्हणायचं असतं? तसेही समाधान शब्दाचे निश्चित असे परिमाण सांगता येईल, असे वाटत नाही. समजा या प्रयोजनांचं उत्तर कृतकृत्य होणे वगैरे असे काही असेल, तर सगळ्यांच्या वाट्यास ते सारखेच असते, की प्रेत्येकासाठी भिन्न? बरं, या क्षणांचं मोल मोजून घेण्याचं शहाणपण सगळ्यांना सारखं अवगत असतं का, की ज्याच्या-त्याच्या वकुबाने त्याचे स्तर ठरतात? निश्चित विधान करणे जरा अवघड आहे. कारण एकतर असे स्तर माणसांच्या पात्रता अधोरेखित करतात किंवा मर्यादा निश्चित करतात. मर्यादांचे बांध पडले की, जगण्यात साचेबद्धपणा येतो आणि तो संवेदनांना निष्क्रिय करतो. संवेदनशीलता वांझ होणे आणि आयुष्याला मर्यादांची कुंपणे पडणे व्यवस्थेतील व्यंग ठरते. यदाकदाचित असला आपल्या संवेदनांचा प्रवास समृद्ध वगैरे, म्हणून आयुष्याला अपेक्षित आकार मिळेलच, असे नाही. तरीही परिस्थितीला धडका देण्याएवढा आत्मविश्वास असलाच आपल्याकडे, तर तो जगण्याला नेमक्या कोणत्या उंचीपर्यंत नेऊ शकतो? खरंतर विशिष्ट उंची गाठणारा प्रवास त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. संभवतः परिस्थिती अनुकूल अथवा प्रतिकूल असली, तर मिळणाऱ्या गोष्टींचे मोल त्यानुरूप होत असते का? समजा नसेल होत तर, अन्य विकल्प तपासून पाहण्याची आवश्यकता असते का? क्षणभर गृहीत धरू, असा विचार कुणी एखाद्याने केलाच नाही, म्हणून जगण्याचे काही आडाखे चुकले, तर विसकटलेलं आयुष्य पुन्हा नव्याने सजवता येत नाही का?

खरंतर हे आणि असे अनेक प्रश्न आपल्या आसपास असतात. रोजच्या जगण्याचा भाग असल्याने, ते इतके सरावाचे होतात की, त्याकडे लक्ष जातंच असं नाही किंवा रोजचंच असल्याने त्यांची चिंता करून आपला आज का वाया घालवावा, असे समजून उत्तरे एकतर परिस्थितीवर सोडून दिली जातात किंवा दैवाच्या हाती सोपवून दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, हे सगळं वाचून तुम्हाला वाटत असेल, काय हा रिकामटेकडा माणूस! विचार करण्यासारखे इतके सगळे संदर्भ आसपास असतांना उगीचच शब्दांचे खेळ खेळून पांडित्याचा वगैरे आव का आणत असेल हा? नाही, असं काहीच नाही हो! मी कोणी विद्वान नाही आणि पंडित वगैरे तर अजिबातच नाही. पांडित्य शब्द तुम्ही तुलनेकरिता वापरत असाल, तर चुकता आहात. कारण पंडित शब्दाचा अर्थ समजण्याएवढा तरी वकुब असायला लागतो. त्याच्या आसपास पोहचण्याची पात्रता तरी आहे का माझ्याकडे. त्याऐवजी अकलेचे तारे तोडतो वगैरे म्हणणेच ठीक, नाही का? असो, जे काही असेल ते. पण एव्हाना तुमच्या मनात एक उद्वेगजनक विचार आला असेल, एवढं विसंगत लिहतोयेस, तर तूच सांग ना बाबा, तुला काय वाटतं आणि नेमकं काय म्हणायचं आहे. उगीचच गोलगोल भवरी कशाला खेळतो आहेस? अर्थात, तुमच्यापैकी कोणाला सात्विक वगैरे प्रकारातला संताप अनावर झाला असेल. हा समोर असता, तर हाणलाच असता असे वाटत असेल, तर मला अजिबात राग वगैरे नाही येणार.

मला विचारणार असाल याबाबत काही, तर नेमके सांगणे खरंच अवघड आहे. अवघड आहे ना! मग कशाला कोलांटउड्या मारतोयेस रे रताळ्या, असाही विचार मनात क्षणभर चमकून गेला असेल, नाही का? आता फिरतोच आहे गरगर, तर सांगायला लागेलच ना, थोडं इकडचं, थोडं तिकडचं असं काहीतरी! तर त्याचं कारण असं- असा हिशोब कधी मी केला नाही. तशी आवश्यकता वाटली नाही. आवश्यकता नाही! म्हणजे स्वतःला काय महंत, महर्षी, महात्मा समजतोयेस तू! म्हणून संतापाची एक अस्पष्ट लहर या मजकुरावरून तुमची नजर फिरताना मनात नक्कीच येऊन गेली असेल नाही का? तर त्याचं असं आहे की, असे काही भव्यदिव्य वाटण्याइतके देखणे आयुष्य पदरी पडले नाही. मिळालं ते फार मोठी उंची असलेलं, प्रचंड खोली आणि अफाट विस्तार सोबत घेऊन वाट्यास आलं नाही. आहे ते सरळ रेषेत जाणारे, अगदी नाकासमोर दिसणाऱ्या वाटेने. पायाखालच्या मातीशी थोडी सलगी करीत आपलेपण शोधत निघालेले. समाजाने निर्धारित केलेल्या साऱ्याच नाहीत, पण ध्वस्त करण्याची हिम्मत नसलेल्या चौकटींना प्रमाण मानून मुकाट्याने मार्गक्रमण करणारे. अशा सीमांमध्ये संकुचित झालेलं जगणं कोणते नवे आयाम आपल्या असण्याला देऊ शकतं?

यशस्वी होण्यासाठी जगण्याला आशयघन बनवणारे काहीतरी नियतीकडून घेऊन यावे लागत असेल का? की नशीब, प्राक्तन, नियती असं काहीही नसतं? असेल, नसेल ज्याचे त्याला माहीत. पण हेही वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही की, आपणच आपल्या वाटा शोधत मुक्कामाच्या मार्गाला चालायला लागतं. कदाचित याबाबत मत-मतांतरे असू शकतात. असायला हवीत आणि नसली, तरी काही हरकत नाही. ज्याच्या मनात मुक्कामाचे मार्ग कोरलेले नसतात, ते नियतीच्या नावाने आपलं असणं-नसणं अधोरेखित करीत राहतात. असं म्हटलं तर अतिशयोक्त ठरू नये. अर्थात, हाही एक पलायनवादच. तुम्ही याचं नेमकं उत्तर काय द्याल? मला कसे सांगता येईल! पण माझ्याकडून अपेक्षितच असेल, तर माझ्यापुरतं हे सगळं समजून घेणं आणि त्याचे अर्थ लावून सांगणं अवघड प्रकरण आहे. पण एक मात्र नक्की सांगू शकतो, माणसाच्या आयुष्याचा प्रवास प्रामणिक परिश्रमांची गाथा असतो.

नियतीने निर्धारित केलेल्या वाटांवरून चालणे नाकारून नव्या वाटा निर्मिणारे, आयुष्याचा आशयगर्भ अर्थ शोधण्यास प्रेरित करून त्या दिशेने वळते करणारे पर्याय तरी किती होते माझ्याकडे? तसे आजही फार आहेत, असे नाही. नव्हते म्हणणेही अर्धसत्य. असलेले दिसत नव्हते म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत पोहचण्याची पात्रता नव्हती किंवा तसे साहस केले नाही म्हणा. काहीही म्हटलं, तरी अर्थ एकूण एक तोच. क्षणभर मानू या की, जगणं अर्थपूर्ण करणारी फारशी परिमाणे आयुष्याला नव्हती, म्हणून त्याच्याकडे अधिक संवेदनशीलपणे पाहण्याचे प्रयोजन उरले नसेल कदाचित. पण प्रयोजने तरी शोधली का? असतील तर कोणती आणि नसतील तर का नाही शोधली? हा तुमचा पुढचा प्रश्न. काहीही असो, मला वाटतं इहतली वास्तव्य करणारा असा कोणीही माणूस नसेल, जो प्रयोजनाशिवाय काही करीत असेल. प्रयोजने असतात. नसल्यास शोधावी लागतात. शोधूनही सापडत नसल्यास निर्माण करावी लागतात. निदान मलातरी असं वाटतं इतकंच. वाटतं म्हणून साऱ्यांनाच ते अवगत असतील असे नाही आणि परिस्थिती प्रत्येकवेळी पायघड्या घालून तुमच्या मार्गावर उभी असेल, असेही नाही. 

जगण्याला विशिष्ट आकार देऊन आपलं असणं-नसणं प्रयत्नपूर्वक साकारावं लागतं. सुयोग्य परिमाणे ठरवून आयुष्याच्या पटावर अस्तित्व कोरावं लागतं. आपल्या असण्याला सहजपण देणारी सूत्रे ठरवून घ्यावी लागतात. उत्तराचे विकल्प शोधावे लागतात. हाती येणारी उत्तरे परत नव्याने पडताळून पाहावी लागतात. आधीच घडवलेल्या साच्यांच्या मुशीत ओतून मिळालेला आकार, म्हणजे सर्जन नसते. जगण्याचे साफल्य वगैरे नसते. नावीन्य असले, तरी त्याला दीर्घ अस्तित्व असेलच असे नाही. ठरवलेली सूत्रबद्ध गणिते मला कधी कळलीच नाहीत. तसंही गणित म्हटले की, अजूनही भीतीने पोटात आकडे येतात माझ्या. हिशोब ठेवण्याइतके सुजाणपण नव्हते, म्हणून असेल किंवा विकल्पांचे विश्लेषण करायला अवधीच देता आला नसेल किंवा तेवढा वकूब नव्हता, म्हणून असेल. कारणे काही असोत, पलायनाच्या वाटा आणि समर्थनाचे तोडके शब्द शोधून आयुष्याच्या यशापयशाची सूत्रे सापडत नसतात. जगण्याच्या गणितांची उकल होत नसते. आयुष्यातील सगळेच गुंते काही सहज सुटत नसतात. गुंतलेल्या धाग्यांच्या गाठी निरगाठी अपेक्षित दिशेने वळत्या कराव्या लागतात. वळणाला अनुकूल करीत सोडवाव्या लागतात. चुकीच्या दिशेने ओढला गेलेला एक धागाही गुंता अधिक अवघड करतो. गुंत्यांमध्ये गुरफटणे आणि त्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविकच. काही गुंते लहान असतात, काही मोठे. काहींचे सुघड, काहींचे अवघड, एवढाच काय तो फरक. बाकी गुंते जवळपास सारखे आणि त्यांचे सातत्यही समानच, फक्त प्रसंग, पात्रे आणि स्थळे तेवढी वेगळी.

जगणं मूलभूत गरजांशी निगडित असतं, तेव्हा सुखाची निश्चित अशी काही परिमाणे असतात का, हा प्रश्नच नसतो. शेकडो सायासप्रयास करूनही सुखाचं चांदणं दूरदूर पळत राहणं, त्याचा कवडसाही अंगणी न दिसणं, हीच समस्या असते. खऱ्या म्हणा किंवा आभासी, काही म्हणा, वर्तनाचे व्यवहार सुखांचा शोधात माणसाला अस्वस्थ वणवण घडवतात, तेव्हा जगणं आनंदयोग वगैरे असल्याचं म्हणणं किती बेगडी असतं, याचं प्रत्यंतर प्रकर्षानं येतं. मर्यादांच्या चौकटी आखून सीमित केलेल्या वाटेने चालताना मूलभूत गरजा ज्यांच्या समोरील प्रश्नचिन्हे असतात, ते सुखांचा युटोपिया काय शोधतील? ज्यांच्या आकांक्षांचं क्षितिज चार पावलांवर दिसतं, पण जगणंच दोन पावलांवर संपतं, त्यांना बहरलेल्या मोसमाचे अप्रूप काय असणार? मोहरलेल्या परगण्यात पोहचण्यासाठी धाप लागेपर्यंत धावूनही हाती शून्यच लागत असेल, त्यांनी सुखांची परिभाषा कुठून अवगत करावी?

सुख म्हणजे काय असते? सुख सोबत असले म्हणजे आयुष्याच्या सफलतेची ग्वाही देता येते का? सफल आयुष्याची परिमाणे नेमकी कोणती आणि कशी असतात? त्यांच्या व्याख्या कशा परिभाषित होतात? सुखांचा अधिवास सगळ्यांच्या अंगणी सारखाच असतो का? सुखं सतत नांदती असतात की, त्यांना प्रासंगिकतेचे पर्याय असतात? समाधानाचे कवडसे नेमके काय असतात आणि ते कुठून येतात? समजा असे कवडसे वगैरे काही असले, तरी त्यांना आपल्या अंगणी आणण्याएवढ्या वाटा आयुष्यात असायला हव्यात ना! जगणंच समस्यांनी बंदिस्त झालं असेल, तर पर्याप्त समाधान, या शब्दाला काही अर्थ तरी उरतो का? माणसाचं सगळं जगणंच अनिश्चितेच्या आवर्तात वसतीला असते. हे अनिश्चित असणेही आभासी असते. प्रश्नांचा गुंता नुसता! अजूनपर्यंत निदान मलातरी या सगळ्यांची परिभाषा पूर्णपणे समजली नाही. कोणाला अवगत असेल, तर माहीत नाही. भलेतर समाधानासाठी याला अपवाद वगैरे म्हणू शकतात तुम्ही आणि मीसुद्धा.

आयुष्याचा विस्तार समस्यांच्या चौकटींमध्ये सीमित झाला की, जगणं विवंचनेच्या वर्तुळात बंदिस्त होते. ज्याला रोमँटिक वगैरे जगणं असं काही म्हणतात, तो रोमान्स किती जणांच्या आयुष्यात सामावलेला असतो? बरं, या रोमान्स शब्दाची परिभाषा करताना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अवकाश परिणाम करणारा घटक असू शकतो का? समस्यांच्या जंजाळात भोळवंडून निघालेल्यांच्या आयुष्यात कुठला आला आहे जगण्याचा रोमान्स. त्यांच्यासाठी असा रोमान्स फक्त कुठल्यातरी कथा-कहाणीपुरता उरतो. अशा कहाण्या नेहमीच आनंददायक तरी असतात किंवा तशा प्रस्तुत केल्या जातात. अर्थात, आनंदाचा अधिवास आपल्या अंगणी अनवरत असावा, असं वाटण्यात काही वावगं नाही. आनंदाची वने शोधणे, सुखांचे परगणे निर्माण करणे माणसाची उपजत प्रवृत्तीच आहे. परिस्थितीच्या वाहत्या प्रवाहात सर्वकाही अनुकूलच असेल, असेही नाही. आमच्या पिढीच्या संकल्पित सुखाच्या व्याख्येत या गोष्टी नव्हत्या. कारण परिस्थितीनेच सगळ्या शक्यतांच्या विस्तार सीमित करून घेतलेला असायचा. नियतीने प्रश्नचिन्हांशीच सोयरीक घडवून आणल्याने, प्रश्नांचा परिघ आणि त्याभोवतीच्या प्रदक्षिणा तेवढ्या रोमँटिक वाटत राहिल्या.

माझ्या परिचयातल्या एक गृहस्थाच्या चिरंजीवाचा विवाह नुकताच संपन्न झाला. तुम्ही म्हणाल, आता यात काय विशेष? याआधी का माणसे विवाह करीत नव्हती? हा काय जगातला आगळा-वेगळा विवाह आहे? नाही, तसे नाही. वेगळा वगैरे नसला, तरी एक उदाहरण म्हणून सांगण्यासाठी बोललो. तर हा प्रेमविवाह होता. तुम्ही परत प्रश्न विचारण्याआधीचं सांगतो, कोणीतरी प्रेमाच्या परगण्यात विहार करून विवाह करणे, याचंही अप्रूप असण्याचं कारण नाही हो! प्रेमविवाह होतच असतात. त्यातील काही थोडे संमतीने, बरेच अन्य मार्गाने आणि खूप अनुत्तरित. पण त्यांनी उमद्या मनाने मुलाला विवाहाची अनुमती दिली. अशी अनुमती मिळणं, निदान माझं म्हणणं तुम्हाला सांगण्यासाठी अप्रूप आहे, असं समजूया! खरंतर त्यांच्या उमदेपणाचं कौतुक करायला हवे. पण माणूस दुसऱ्याच्या उमदेपणाला स्वीकाराच्या चार चांगल्या शब्दांनी अधोरेखित करील, तर तो माणूसच कसला!

माझ्या काही स्नेह्यांसोबत याबाबत मी बोलत असतांना बऱ्याच जणांना जणूकाही या माणसाने जगण्याच्या चौकटींना ध्वस्त करण्याची सुपारी घेतली आहे, असा भाव चेहऱ्यावर होता. एवढंच नाही तर आपल्या मतांच्या समर्थनार्थ संस्कृतीच्या, समाजाच्या पारंपारिक प्रवाहातून वेचलेल्या विचारांची आयुधे हाती घेऊन ते लढत होते. तेही स्वतःला अनुकूल असतील तेच आणि तेवढेच मुद्दे घेऊन. त्यांच्या मते असं घडणं सर्वथा अयोग्य. अशा वागण्यामुळेच सामाजिक संरचना विचलित होते आहे. पारंपारिक चौकटींवर आघात होत आहेत. मी त्यांच्या मतांशी सहमत असण्याचा प्रश्नच नव्हता. विसंवादाच्या वर्तुळात आणून उभ्या केलेल्या संवादात त्यांच्याकडून व्यक्त केलेली मते वारंवार विखंडीत करीत असल्याने त्यांच्या दृष्टीने मीही त्याच वर्तुळातला. थोडक्यात, एक आधीच कामातून गेलेला आणि चाललेला हा दुसरा. मुलांना समजून घेण्याएवढे मोकळेपण आपल्या ठायी असले की, सगळेच नाहीत; पण यौवनात पदार्पण करून मनी वसणारी क्षितिजे कुणाच्यातरी सोबतीने शोधायला निघालेल्या मनांचे प्रश्न बऱ्यापैकी सुटतील. नाही का! पण हे सगळं सहज घडतं का? नाही. आणि हा नकार बऱ्याच प्रश्नांना सोबत घेऊन येतो. आपले अहं सांभाळणं अधिक महत्त्वाचं वाटत असल्याने प्रेमाच्या मार्गाने स्वतःचा शोध घेत निघालेल्यांच्या वाटेवरचे काटे वेचण्याऐवजी पेरण्याचेच प्रकार अधिक घडतात.

व्यवस्थेने तत्कालीन गरज म्हणून कधीकाळी निर्माण केलेल्या चौकटींना प्रमाण मानून जगण्याच्या आमच्या सवयी अजूनही सुटत नाहीत, असं म्हटलं तर कदाचित कोणाला राग येईलही. पण त्याला इलाज नाही. कुणाला राग आला म्हणून आणि कोणी सुधारणेच्या वाटेने वळता झाला, म्हणून समाज लगेचच अंतर्बाह्य सुधरत, बिघडत नसतो. सवयी एकतर सोडाव्या लागतात किंवा झुगारून द्याव्या लागतात, तेव्हाच अपेक्षित बदल घडतात. अंगवळणी पडल्या की, त्यांच्या मर्यादाही संस्कार वाटायला लागतात. झुगारून देण्यासाठी खूप मोठे बळ अंगी आणावे लागते. ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. समाज माणसाच्या जगण्याची अनिवार्य आवश्यकता आहे, असं तुम्ही म्हणाल. मान्य, एकदम मान्य! पण याचा अर्थ तो सर्वकाळी, सर्वस्थळी योग्यच असेल, असेही नाही. जो समूह प्रासंगिक पातळीवर परिवर्तनाला नकार देतो, तो प्रगत वगैरे कसा म्हणणार आहोत आपण? प्रगतीच्या काही परिभाषा असतात. प्रासंगिक पर्यावरणानुसार त्या परिभाषित करायला लागतात. पुढे चालून परिवर्ताला कालानुरूप पावले टाकण्यासाठी पथ निर्माण करून ठेवावे लागतात. त्यांचा परीघ परिस्थितीला ठरवू द्यावा. आपण त्या प्रदेशाचे परीक्षण करावे. अनुकूल अगत्याने अंगीकारावे. नको असणारे विसरण्याएवढे प्रगल्भपण विचारांत असावे, असं मला तरी वाटतं. प्रासंगिक अभिनिवेश ओढून ताणून जगण्यात आणायचे. कुठूनतरी आणलेल्या संदर्भांचे स्टीकर त्यांना चिकटवायचे. मनाजोगते चिटकवून झाले की वृथा समर्थन करायचे, ही कवायत हवीच कशाला. दत्तक घेतलेले असे अभिनिवेश जटिल समस्या निर्माण करतात. 

एकाने दुसऱ्याचं आणि दुसऱ्याने पहिल्याचं जगणं सांभाळावं, कारण सोबत असण्याची ती सार्वकालिक आवश्यकता असते. असं काही आमच्या जगण्यात नव्हतंच, असं नाही. पण जगण्याचा परिघच मर्यादांनी बंदिस्त असल्याने समोरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच कौशल्ये खर्ची पडली. आपण कसे ‘मेड फॉर इच अदर’ आहोत, म्हणून मिरवण्यासाठी काळही फारसा अनुकूल नव्हता, निदान परंपरांना प्रमाण मानणाऱ्या आमच्या परिसरात तरी. परिस्थितीही अशा मानसिकतेला धार्जिणी नसल्याने, उपलब्ध अवकाशाच्या चौकटीत आपल्या सुखांचं आभाळ आखून समाधानाच्या चांदण्या शोधण्याचा प्रयत्न करण्याला पर्याय नसे. पदरी पडलेले पवित्र मानायचे, हा एक विकल्प हाती असायचा. अर्थात, अशा स्वीकारला सहवासाची, सहवासातून बहरणाऱ्या आस्थेची, आस्थेतून गडद होत जाणाऱ्या आपलेपणाची परिमाणे असायची. बऱ्याचदा मनाच्या मनोगताना विसरून संवाद करत राहणे घडायचे. आजच्या इतकं स्पष्ट सांगण्याएवढं धाडस सगळ्यांकडे कुठे असायचं. बहुदा नसायचेच. मागील पिढीच्या मर्यादित विचारांचा अवकाश आणि संस्कार घेऊन जन्मलेल्या जवळपास सगळ्यांचा अनुभव थोडेफार अनुकूल-प्रतिकूल संदर्भ वगळले तर सारखाच. तुम्ही म्हणाल, मग आता काय वेगळे आहे यात? परिस्थिती थोडीफार इकडेतिकडे सरकतच असते. हो, खरंय तुमचं म्हणणंही. पण आताही परिस्थितीचा परीघ फार विस्तारला आहे असे नाही. अशा विचारांच्या भोवती दाटलेलं मळभ बऱ्यापैकी विरलेलं असलं, तरी त्याच्या कृष्णछाया संपल्या आहेत का? मला वाटतं, पूर्णपणे नाहीत. 

विखंडन अथवा विस्मरण विकल्प म्हणून आमच्या पिढ्यांच्या हाती शिल्लक असायचे; पण आसपासच्या वातावरणाचा दाबच इतका प्रखर असायचा की, तडजोड हा एक तिसरा विकल्प संयुक्तिक वाटायचा. आजच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत कदाचित हे सगळं नाही सामावता येणार. मुक्त विचारांच्या परिघात वर्तणाऱ्यांना मन मारून केलेल्या तडजोडींचं जगणं कदाचित काहीच्या काही वाटेल. पण कधी कधी म्हणतात ना, अज्ञानातही सुख असतं. जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या अज्ञानातून कोणती हानी पोचणार नसेल, तर अशा सुखांचं स्वागत करण्याला सीमित अर्थाने का असेना, संदेह का म्हणून असावा? सकारात्मक स्वीकारातून आयुष्यात वसंत बहरणार असेल, तर तो अंगीकारणेही काही वावगे नसते. अर्थात, तो काळच बंडखोर विचारांशी मैत्री करण्यास फारसा अनुकूल नसल्याने, हे स्वीकारले जायचे, जाणीवपूर्वक अथवा अनिच्छेने. शेवटी काय, तडजोडच ना! मग ती मनापासून असो की, अन्य कुठल्या कारणांनी मान्य केलेली. नियतीने पुढ्यात आखून दिलेल्या चौकटी सांभाळायचा विचार मनात कोरून घेतल्याने त्या सांभाळल्या जायच्या, फारशी खळखळ न करता. तडजोड सवय झाली की, जगण्याचे अनिवार्य अंग होते. याचा अर्थ तडजोडीच्या चौकटींना ध्वस्त करणारे नसायचे असे नाही, पण अशा बंडखोरांचे प्रमाण बहुदा बोटांवर मोजण्याएवढेच.

आयुष्याच्या वाटेने आत्मशोध घेत निघालेल्या प्रत्येकाकडे ठरवून घेतलेली किंवा ठरवलेली मते असतात. जगण्याला प्रयोजन देणाऱ्या दिशेचा शोध घेण्यासाठी अंतर्यामी असणाऱ्या संवेदनांच्या आदेशाने चालणे घडते. आयुष्याची वाट वेडीवाकडी वळणे घेत पुढे सरकत असते. सुप्त असतील अथवा दृश्य, प्रत्येकाच्या जगण्यात काही अहं असतात. प्रासंगिक कारणांनी असो अथवा सामाजिक दडपणामुळे, ते मनाच्या मातीआड राहिले की, त्यांचे कंगोरे कळत नाहीत. त्यांची टोकं टोचत नाहीत. त्यांच्यावर स्वार्थाची पुटे चढायला लागली की, अधिक धारदार होत जातात. मनाच्या मातीत पडलेले अहं अंकुरित होण्यास अनुकूल परिस्थिती असली की, त्याची रोपटी झपाट्याने वाढत जातात. कुठल्यातरी सांदीकोपऱ्यात वाढणाऱ्या पिंपळाच्या रोपट्यासारखे, कितीही तोडा, परत उगवणारे. शुष्क कोपऱ्यांच्या आश्रयाला अधिवास असणाऱ्या पिंपळाच्या रोपट्याला जगण्याचा ओलावा कुठून मिळत असेल, कोणास ठाऊक? पण त्याची जिगीषा काही, ते सोडत नाही. तोडलं, मोडलं तरी परत परत डोकावून त्याचे कोंब अस्तित्व दाखवतातच.

मनात उगवणारी काटेरी झुडपं माणसांना का नाही तोडून टाकता येत? काटे टोचून रक्तबंबाळ करण्याचा त्यांचा धर्म विसरत नसतील, तर अशा काट्यांचे कुंपण करून संस्कारांचे संवर्धन करण्याचा धर्म माणूस का विसरत असेल? काट्याच्या संगतीने गुलाब मोहरतो. त्याचा रंग, गंध मनाला मोहित करतो. मग मनात साकोळलेला आपलेपणाचा परिमल परिस्थितीच्या वाऱ्यांचा हात धरून का नाही पसरत. नाहीच घडत असं बऱ्याचदा. कारण एवढं उमदेपण जगण्यात जाणीवपूर्वक रुजवावे लागते. आयुष्याच्या नव्या दिशा शोधू पाहणाऱ्यांच्या वाटेवर मनातले अभिनिवेश उभे राहतात. हे अभिनिवेश कुरवाळण्यासाठी वेगवेगळे विकल्प शोधून, खोदून आणले जातात. त्यांना जात, धर्म, वंश, परिस्थितीची धारदार पाती जोडली जातात. पात्यांचा धर्म एकच असतो, जखमा करणं. रक्ताळलेल्या वाटा आणि वाहणाऱ्या जखमा काही माणसांच्या जगण्याची आवश्यकता नाही. पण काय आवश्यक आणि काय अनावश्यक, हे कळण्याइतके सहजपण आपल्या विचारांत असायला हवे ना! माणूस नेमका येथे कमी पडतोय. प्रगतीचे कितीही क्षितिजे त्याला संपादित करू द्या. त्याच्या विचारांचे विश्व विस्तारत नाही, तोपर्यंत त्याने प्रगतीच्या वगैरे वार्ता करणे केवळ खडकावरचा पाऊस असेल. त्यात कोणत्याही बीजांना अंकुरित करण्याचं सामर्थ्य नसतं.

मनाची मनोगते शब्दांच्या वाटेने प्रकटतीलच असे नाही. अपेक्षांची पालवी अंकुरित होणार नसेल, तर मोहरणे खूप दूरची गोष्ट. प्रत्येक पिढीच्या जगण्याच्या चौकटी ठरलेल्या असतात. बहुदा तत्कालीन विचारांच्या परिघात वर्तणाऱ्या समाज नावाच्या समूहाने त्या निर्धारित केलेल्या असतात. या चौकटींना काही नात्यांबाबत आणि नात्यांचे पदर धरून प्रकटणाऱ्या आस्थेबाबत नेहमीच संदेह राहिला आहे. हा संदेह होताच, पण आजही त्याचे पीळ फार सैल वगैरे झाले आहेत, असे नाही. त्याच्या प्रकटनाच्या पद्धती पूर्णतः पालटलेल्या आहेत, असेही नाही. हा एक मात्र घडलं, त्याचा परीघ विस्तारताना विचारांचे वारे थोडी का असेना, पण दिशा बदलत आहेत.

झाडाच्या शाखांपासून विलग होणारे प्रत्येक पान पानगळीचा हात धरून जमिनीकडे गरगरत येते, तेव्हा त्याचा विसर्जनाचा क्षणही साजरा करते. मातीत मिसळून जाताना सर्जनचे स्वप्न घेऊन जाते. अशी कितीतरी स्वप्ने घेऊन माणूस जगतो. तो कालच्या पिढीतील असू द्या, नाहीतर उदयाचली येणाऱ्या पिढीचा. स्वप्नांचा प्रवास सत्यात बदलता आला की, बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हाती येतात. शेवटी काय आहे की माणूस प्रश्नांच्या संगतीत रमणारा आणि विचारांच्या पंगतीत फिरणारा आहे. त्याच्या जगण्यातून प्रश्नचिन्हे वजा होऊ शकत नाहीत. कारण प्रश्न नसलेला काळ कधी त्याच्या वाट्याला आला नाही आणि येणारही नाही.

आता तुम्ही म्हणाल, हे एवढं सगळं सांगण्याचं प्रयोजन काय तुमचं? सांगतो, तुमच्या वाचन संयमाचा खूप अंत पाहिला आतापर्यंत.

तर त्याचं असं झालं- प्रेमविवाहबाबत आम्हां काही सहकाऱ्यांमध्ये बोलणं सुरु असतांना एका स्नेह्याने मला प्रश्न विचारला, “तुम्ही तुमच्या मुलाच्या विवाहाबाबत त्याच्या मताचा कौल मान्य कराल का?”

“अर्थातच!” क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना म्हणालो.

माझ्या तात्काळ उत्तराने ते थोडे विस्मयचकित झाले. माझ्याकडून असे उत्तर येईल यावर त्यांचा विश्वास असणे अवघड असावे कदाचित. म्हणाले, “नुसतं सांगायला काय जातं तुमचं! वेळ आली की कळतं, काय असतं या सगळ्याला सामोरे जाणं.”

“अहो, हे सगळं ज्याला संसाराच्या वाटेने चालायचे आहे, त्याला ठरवू द्यायला काय संदेह असावा? त्याचा निर्णय त्याने घ्यावा. आणि मी तरी त्याच्या निर्णयात मध्ये का यावं?”- मी.

मला मध्येच थांबवत म्हणाले, “पण रूढीपरंपरा, प्रथा वगैरे काही असतात की नाही. समाज नावाची चौकट असते. स्वातंत्र्य देणारे तुमचे विचार मान्य हो! पण त्यालाही मर्यादा असाव्यात की नाही?”

त्यांच्या विधानांचा युक्तिवाद करून फारसं काही हाती लागणार नव्हतंच. आधीच ठरवून घेतलेल्या त्यांच्या मतात फारसा बदल घडणे शक्य नव्हते, म्हणून विषयाला पूर्णविराम देत म्हणालो, “आपण हे सगळं परिस्थितीवर सोडून दिलेलं चांगलं नाही का?”

कदाचित त्यांना आपल्या विचारांचा जय झाला, असं वाटलं असावं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची अस्पष्ट रेषा हसत राहिली थोडा वेळ तशीच आणि मी त्या रेषेचे अर्थ शोधत राहिलो उगीचच.

बरं हे गृहस्थ उच्चविद्याविभूषित असल्याने त्यांच्या बोलण्याने मी क्षणभर विचलित झालो. त्यांनी संपादित केलेल्या ज्ञानाबाबत माझ्या मनात कोणताही किंतु नाही, पण विद्यासंपादन करून माणूस चौकटींच्या पलीकडे पाहीलच असं नाही. ज्ञानसंपादनाने माणूस शिक्षित होईल, पण परिवर्तनाच्या कृतीने समृद्ध होईल असे नाही. कालसुसंगत मत केवळ शिक्षणाने नाही, तर समजूतदारपणाने येते. बदल स्वीकारावे लागतात. आवश्यक ते स्वीकारून आणि अनावश्यक ते नाकारून पुढचे पथ संपन्न करावे लागतात. यासाठी विचक्षण विचार अंगीकारावे लागतात. काळासोबत चालणारे विचार जगण्याचा भाग झाले की, परिवर्तनाची नांदी ठरतात, नाही का?
***