दुरावा एक लहानसा शब्द. मोजून तीन अक्षरे फक्त. पण त्यात किती अंतर असतं नाही! कित्येक मैल, कितीतरी कोस, अनेक योजने, की अजिबात पार करता न येण्याइतके... की आणखी काही? नक्की सांगता येत नाही. पण काही शब्द आशयाचं अथांगपण घेऊन जन्माला आलेले असतात. तसाच हाही एक शब्द म्हणूयात! अर्थात मनाच्या विशिष्ट भावस्थितीला निर्देशित करणं सगळ्यांना नेमकं येईलच असं नाही. तसं शब्दांचंही आहे. प्रत्येकवेळी आशयाचं अथांगपण त्यांना पेलता येईलच याची खात्री नाही देता येत. तळाचा ठाव घेण्यासाठी शब्दांनाही आशयाची खोली असायला लागते.
दुरावा केवळ नात्यांत निर्माण होणाऱ्या अंतराचा असतो की, भावनांच्या आटत जाणाऱ्या ओलाव्याचाही. तुटत जाणाऱ्या बंधांचा की, आणखी काही? सांगणे अवघड आहे. तो दिसत असला, जाणवत असला, तरी त्याला निर्देशित करण्याची काही निश्चित अशी परिमाणे नसतात. असली तरी ती पर्याप्त असतीलच असं नाही. कदाचित प्रासंगिक परिणामांचा तो परिपाक असतो किंवा आणखीही काही. त्याचं असणं अनेक शक्यतांना आवतन देणारं असतं एवढं मात्र खात्रीदायक सांगता येईल.
काही शब्द आपल्यात अनेक शक्यता घेऊन नांदते असतात. हा 'काही' शब्दही असाच. अनेक शक्यता सोबत घेऊन येणारा. प्रत्येक शक्यता अनेक आयामांना जन्म देणारी असते, फक्त तिचे अर्थ वेळीच आकळायला हवेत. शक्यतांच्या परिघातून प्रत्येकवेळी आशयसंगत विचार जन्माला येईलच असं नाही. बऱ्याचदा त्यात गृहीत धरणंच अधिक असतं. याचा अर्थ सगळ्याच गोष्टींना गृहीतके वापरून नाही पाहता येत. तसंही गृहीत धरायला नाती काही बीजगणित नसतं, याची किंमत एक्स समजू किंवा त्याला वाय मानू म्हणायला. नाती उगवून येण्यासाठी अंतरी असलेल्या ओलाव्यात आस्थेची बीजे पेरायला लागतात. रुजून आलेले कोंब जतन करायला लागतात. आघातापासून सुरक्षित राखायला लागतात.
कोणीतरी निर्धारित केलेल्या सूत्रांच्या साच्यात ढकलून आयुष्याची समीकरणे सुटत नसतात अन् उत्तरेही सापडत नसतात. आयुष्य सहज सुटणारे गणित असतं, तर जगण्यात एवढे गुंते उभे राहिलेच नसते. कधीकाळी आपली असणारी, आस्थाविषय बनून अंतरी नांदणारी, साधीच पण स्नेहाचे झरे घेऊन झुळझुळ वाहणारी माणसं कळत-नकळत दुरावतात. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणारे ओहळ अनपेक्षितपणे आटतात. मागे उरतात केवळ कोरड्या पात्रातील विखुरलेल्या शुष्क स्मृतींचे तुकडे. आसक्तीच्या झळा वाढू लागल्या की, ओलावा आटत जातो. नात्यात अंतराय येतं. सोबत करणारी पावले वेगळ्या वाटा शोधायला लागतात. प्रवास विरुद्ध दिशांना होऊ लागतो. दिसामासांनी दुरावा वाढत जातो. समज थिटे पडायला लागले की, गैरसमज अधिक गहिरे होत राहतात. झाडावर लटकलेल्या अमरवेलीसारखे पसरत जातात. विचारातून स्वाभाविकपण निरोप घेऊ लागलं की, कृतिमपणाला देखणेपणाची स्वप्ने येऊ लागतात. विधायक विकल्प निवडीला पर्याय देतात, पण विचारांत विघातक विकल्पांचं तण वाढू लागले की विस्तार थांबतो.
समजूतदारपणाच्या मर्यादा पार केल्या की, तुटणे अटळ असते. स्नेह संवर्धित करायला अनेक प्रयोजने शोधावी लागतात. नात्यांच्या माळा विखंडीत व्हायला एक वाकडा विकल्प पुरेसा असतो. मने दुरावण्यामागे एकच एक क्षुल्लक कारणही पर्याप्त असते. ते शोधायला लागतातच असं नाही. कधी ती आपसूक चालून येतात, कधी अज्ञानातून आवतन देऊन आणली जातात. अविश्वासाच्या पावलांनी चालत ते आपल्या अंगणी येतात. आगंतुक वाटेवरून प्रवासास आरंभ झाला की, अनेक कारणांचा जन्म होतो. ती एकतर्फी असतील, दोनही बाजूने असतील किंवा आणखी काही.
मूठभर मोहापायी अन् क्षणिक सुखांच्या लालसेपायी माणसे बदलली की, मनाच्या चौकटीत अधिवास करून असलेल्या प्रतिमेला तडे पडतात. हे तडकणे अपेक्षाभंगाच्या वेदना घेऊन वाहत राहते. त्याच्या असण्याचा आनंद निरोप घेतो. अनेक किंतु अन् अगणित परंतुंचं आगमन होतं. मागे उरतात केवळ व्यथा अन् क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या अंतराने जन्माला घातलेल्या वास्तव-अवास्तव कथा. वैगुण्ये वेचून वेगळी करायला लागतात. कारण वेदनांच्या गर्भातून समाधानाचे अंश प्रसवत नसतात. सर्जनात आनंद असला, तरी सगळ्याच निर्मिती काही सर्जनसोहळे नसतात. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••