कविता समजून घेताना... भाग: सतरा

By // No comments:

तू गप्प असतोस

तू गप्प असतोस
आणि मी बोलते
मी बोलत रहाते तासनतास
मुलांबद्दल
घराबद्दल
तुझ्याबद्दल
माझ्याबद्दल

मग अचानक सगळा संवाद एकतर्फी असल्याचं जाणवतं
जाणवतं की ह्या सगळ्या संवादात
तुझा एक साधा 'हुंकार'सुद्धा नाहीये
जाणवतं की आतापर्यंतचं सगळं काही हवेत विरलंय
जाणवतं की माझ्या कुठल्याच शब्दाला
गाठता आला नाहीय तुझ्या मनाचा तळ

किंवा असंही जाणवतं की-
तू आकाश आहेस अन् माझी झेप तोकडी
किंवा मला आवाजच नाहीये
किंवा तुला कानच नाहीत
किंवा तू इथे नाहीयेस
किंवा मी उगाचच इथे आहे !
किंवा... किंवा... किंवा... कितीतरी शक्यता !

आणि सर्व शक्यतांचे निदान एकच-
'तुझ्या जगातून मी उठलेय!'

पण…
हे कळेपर्यंत सगळं संपलेलं असतं
मी हळूहळू वजा होत गेलेय हे कळतं
शब्दांसह हवेत मीही विरलेय हे समजू लागतं
मी म्हणजे काहीही नाही हे उमजू लागतं
मग माझी समज, उमज मी प्राणपणाने जपू लागते

इतक्यात कधीतरी लहर येऊन तू विचारतोस-
"गप्प का आहेस?"

मी गप्पच

मग आर्जवतोस-
"बोल ना! बोल काहीतरी…"

मी गप्पच

मग अगदीच न राहवून तू सांगतोस-
"तू काहीही बोलू शकतेस,
हवं ते, हवं तितकं, हवं तसं..."

त्याहीवेळी मला काहीच बोलता येत नाही,
कारण
शून्याला बोलता येत नसतं !
 

विनया निलेश
*
लग्नाआधी ती बोलते, तो ऐकतो. लग्नानंतर तो बोलतो, ती ऐकते आणि मुलंबाळं झाली की, दोनही बोलतात अन् शेजारी-पाजारी ऐकतात. या विधानातील विनोद वगळला, तरी वागण्यातली विसंगती कशी वगळता येईल? आयुष्याच्या वाटेने चालताना असे काही मुक्कामाचे पडाव येतात, ज्यावर रेंगाळताना आनंद ओतप्रोत भरून वाहत असल्याचं वाटतं. हे सगळं पाहताना हरकून जातो आपण. ते जगण्याचा भाग कधी होतात, कळतही नाही. कुणीतरी तो आणि कुणीतरी ती ठरवून म्हणा, अनपेक्षित म्हणा किंवा अरेंज मॅरेजच्या मान्यतेची मुद्रा अंकित करून असेल किंवा आणखी काही, एकमेकांच्या आयुष्यात येऊन सामावतात. त्यांचं आयुष्यात सामावणं मुरत जातं मातीवर पडलेल्या पाण्याच्या थेंबासारखं. त्याचीही सवय होते कालांतराने. समीप येण्याची अनामिक ओढ असतेच प्रत्येकाच्या मनात अधिवास करून. समाजमान्यतेची मोहर अंकित करून एकत्र आलेल्यांचे जरा बाजूला राहू देत. पण प्रेमात असणाऱ्यांसाठी मर्यादांचे कसले आलेयेत बांध. वयात आलेल्यांचं एकमेकांसाठी झुरणी लागणं स्वाभाविकच. ते काही नाकारता नाही येत. यालाच कुणी समर्पण म्हणतात, कुणी प्रेम, कुणी आणखी काही एवढंच.

‘मेड फॉर इच अदर’ असा काहीसा प्रकार एकमेकात रमणाऱ्या जिवांच्या प्रत्ययास येणे काही नवीन नाही. अर्थात, यात निसर्गप्रणीत प्रेरणांचा भाग किती आणि आतूनच उमलून येणाऱ्या आस्थेचा किती, हा विचार तसा नंतरचा. विश्वाच्या अफाट पसाऱ्यात शोधलं, तर यांच्या अस्तित्वाचा बिंदू शोधूनही सापडणं अवघड, तरी सारं विश्व आपल्याला आंदण मिळाल्याच्या थाटात वावरत असतात. उगवणारी प्रत्येक पहाट यांच्यासाठी प्रसन्नतेचा परिमल घेऊन येते. मावळणारी संध्याकाळ उगीचच लाजून चूर होते. चांदण्यांनी लगडून आलेल्या रात्री हितगुज करीत राहतात. बरसणाऱ्या जलधारा, वाहणारा वारा, रंग पंखांवर घेऊन भिरभिरणारी फुलपाखरे सगळं सगळंचं आपलं वाटत असतं यांना. नात्यांचे बहुपेडी गोफ विणले जातात. त्याचे पीळ जसजसे घट्ट होतात, तशी आकांक्षांच्या आभाळात स्वप्नांची एकेक नक्षत्रे उमलू लागतात.

संगतीने आयुष्य व्यतीत करण्याची स्वप्ने रंगू लागतात. व्यवस्थेने आखलेल्या चाकोऱ्यांचे रस्ते धरून सप्तपदीच्या वाटेने चालत उंबरठ्याचं माप ओलांडून दोघेही सामावून जातात आयुष्याच्या चौकटीत. एकेक मनसुबे कोरले जातात मनी वसणाऱ्या क्षितिजावर. प्रवाह बनून मनाच्या प्रतलावरून प्रेम वाहत राहतं, अवखळ झऱ्यासारखं. शिशिर सरून आयुष्यात वसंत येतो. सगळं काही आपलं आणि आपल्यासाठी असल्याचं उगीचच वाटत राहतं. बहर ओसरला की पानगळ हलक्या पावलांनी चालत येते, तेव्हा जगण्याचे सगळेच ऋतू काही बहरलेले नसतात, याची प्रकर्षाने जाणिव होते. आयुष्याच्या पटलावर अंथरलेले एकेक रंग आकळत जातात. त्याच्या आणि तिच्या जगण्यातला ऋतू कूस बदलतो. वावटळी अवतीभोवती फेर धरू लागतात. तेही सरावाचं होत जातं. मग सुरु होतं गृहीत धरणं. आनंदाच्या लाटांवर विहार करताना दुर्लक्षित झालेले एकेक पैलू प्रकर्षाने प्रकट व्हायला लागतात. सौख्याच्या झुल्यावर झोके घेत आभाळाला स्पर्श करू पाहताना आयुष्यात असलेल्या अभावाच्या चौकटी दिसत नाहीत. गुणांचा गौरव करण्यात दोष कसे दिसतील? त्यांचा तर स्वप्नातही विचार केलेला नसतो. काळ पुढे सरकायला लागतो, तशा एकेक आकृत्या ठळक व्हायला लागतात, अगदी नजरेत भरण्याएवढ्या. आणि सुरु होतो एक नवा खेळ. हा तिला, ती त्याला खो देण्याचा.

तिच्या प्रेमाची परिभाषा फुलपाखराचे पंख लेऊन आकांक्षांच्या गगनात विहरत असते. तो व्यवहाराच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करीत असतो. तिला हवं असतं शारीर नात्यापलीकडे उरणारं तिचं वर्तुळ. रेशीमधाग्यांनी विणलेलं घरटं. तिच्या संसाराची व्याख्या तो आणि ती असली, तरी त्यात आणखीही काही धागे गुंफलेले असतात. त्याची स्वप्ने तिच्याजवळ येऊन संपतात. तिची त्याच्यापासून सुरु होऊन नवी क्षितिजे कवेत घेऊ पाहतात. ती शोधत राहते मनाचे गुंते प्रत्येक धाग्यात. हा चालत राहतो परिस्थितीने अंथरलेल्या वाटेवरून. खेळत राहतो वास्तवाच्या निखाऱ्यासोबत. घरातील प्रत्येक कोपऱ्यात सामावलेल्या सुविधांच्या सुखात याचं प्रेम वसती करून असतं. तिचं प्रेम आभाळच बनू पाहतं. अर्थात, वस्तूंनी आबाद असणाऱ्या घरात सुख नांदतेच असे नाही. सुखाला समाधानाचा सात्विक स्पर्श असावा लागतो. तिचं समाधान आस्थेचा ओलावा घेऊन वाहणाऱ्या शब्दात विसावतं. हा शब्दांपासून सरकत राहतो दूर आणखी दूर. काळ चालत राहतो त्याच्याच तालात. त्याचा तोल सगळ्यांना सांभाळता येतोच असं नाही. एकेक ओरखडे उमटत राहतात त्याचे आयुष्याच्या वाटांवर. सुखाच्या व्याख्या विसंगतीत संगती शोधू लागल्या की, अपेक्षांना तडे जायला लागतात. प्रत्येकाचे परीघ वेगळे आणि प्रदक्षिणा वेगळ्या कधी होतात, हे कळतही नाही.

संसाराच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करताना अपेक्षांचं क्षितिज घेऊन आलेलं त्याचं आणि तिचं एक वर्तुळ कवयित्री शब्दांकित करते. कविता केवळ कुण्या मानिनीच्या मनाचं मनोगत नाही राहत. मनात वसतीला आलेली सल शब्दांचे हात धरून चालत राहते आपल्याच शोधात, एक अस्वस्थपण घेऊन. स्त्री-पुरुष नात्याला केवळ निसर्गदत्त ओढीपुरते अर्थ नसतात. त्याही पलीकडे आणखी काही आयाम असतात त्याला. हे सगळ्यांना आकळतंच असं नाही. विवाह सामाजिक मान्यतेची मोहर असेल, पण सुखांची खात्री असतेच असे नाही. वास्तव अवास्तव अपेक्षांची गाठोडी घेऊन चालत राहतात माणसे विवाहवेदिकडे. असलेल्या नसलेल्या गुणांचा शोध सुरु होतो. शोधले जातात पत्रिकेतले, पत्रिकेबाहेरचे गुण, तिच्यात अन् त्याच्यातही. गुणांच्या बेरजा वजाबाकी बनून आयुष्यात येऊन कधी विसावतात, ते कळतही नाही.

लग्न नावाचा संस्कार पार पडला की, ती तिची उरतेच किती? विवाहासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्या, कुटुंब, नातीगोती अशा एक ना अनेक गोष्टीत तिला गृहीत धरले जाते. तीही आपले कर्तव्य म्हणून समर्पित होते या सगळ्यात. पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवलेल्या संस्कारांची सोबत करीत निघते एका अनोख्या विश्वात. हाती लागलेल्या वर्तुळात आपलं ओंजळभर जग वसवू पाहते. कालांतराने तिचं असणं आवश्यकता होते सगळ्यांची. हे जमलं ना तुला! मग याहून संसार म्हणजे वेगळे काय असते? आहे यापेक्षा काहीही नवीन करायचे नसते, याबद्दल सगळ्याचे एकमत असते. स्त्री म्हणजे त्याग, समर्पण, स्नेह, सौहार्द वगैरेवगैरेचे मूर्तिमंत उदाहरण होते. मन नावाची वस्तू तिच्या आयुष्यातून वजा झाली की, मागे उरते फक्त स्त्री. खरंतर तिला सखी व्हायचे असते. तिला राधा नाही बनता आलं अन् त्याला कृष्ण, तरी त्याच्या सुरांत तिचे श्वास समर्पित करायचे असतात. सूर सुटतात अन् सोबत येते तडजोड. तिही सवय झाली की, उरतात केवळ उपचार. उपचारांत कसला आलाय ओलावा?

शुष्क होत जाणाऱ्या पसाऱ्यातही ती आपलेपणाचा ओलावा शोधत राहते. तिच्यासाठी तो केवळ तो नसतो. तिच्या कपाळावरील कुंकवाच्या वर्तुळाभोवती तो गुंफला गेला असला, तरी त्याचं आयुष्य तिने मनात बांधून घेतलेलं असतं. तिच्या सुखा-दुःखाचा सवंगडी असतो तो. नव्हे तिला आपल्या आयुष्यात विरघळलेला प्रियकर हवा असतो. नवरा बनता येणं खूप सोप्पं असतं. पण नवऱ्यातला प्रियकर शोधणं अवघड. नवरा बनला की, त्याच्यातला प्रियकर संपतो. ती प्रियकर शोधत राहते. चालत राहते त्या वाटेने. हा तिच्या स्वप्नांपासून किती योजने पुढे निघून गेलेला असतो.

तिला त्याच्याशी काय काय बोलायचं असतं... मनात वसतीला आलेली किती गुपिते सांगायची असतात. दिवसभराच्या कामाचा आलेख काढून घ्यायचा असतो. मनात उगीच घर करून असलेल्या चिंता सांगायच्या असतात. मुलांच्या प्रगतीच्या पायऱ्या समजून घ्यायच्या असतात. केवळ आणि केवळ त्यालाच ऐकवायचं असं काही असतं तिच्या अंतरी. लाजून चूर झालेला चेहरा हातानी लपवत त्याला काही सांगायचं असतं. असं आणखी किती किती... काही आपलं, काही दुसऱ्यांचं, काही वाहण्याचं, काही सापडण्याचं, काही सुटण्याचं, काही निसटण्याचं, काही आयुष्याचं, काही भविष्याचं... अनेक विषय. तो मात्र तिला ऐकल्यासारखं करत पद्धतशीर दुर्लक्ष करीत राहतो.

तिला कळू लागतं, या सगळ्या चिवचिवाटात मी आहेच कुठे? तिला फक्त त्याच्या मनाचे तीर दिसले, तळ कुठे गाठता आला. मग तिची चिवचिव हळूहळू ओसरू लागते. आकांक्षा बनून अंतरी वसतीला आलेली स्वप्ने एकेक करून पांगतात. ओथंबून येणारे डोळे आटत जातात कोरड्या ऋतूसारखे. मन शुष्क होत जातं रखरखीत उन्हाळ्यातल्या भेगाळलेल्या भूमीसारखं. डोळ्यात कोंडलेली क्षितिजे धूसर होत परिस्थितीच्या मृगजळात हरवतात. त्याच्या मनाच्या आसमंतात तिला पंख पसरून भरारी घेताच आलेली नसते. त्याच्यापर्यंत पोहचण्याचा किती प्रयत्न केला. कितीदा साद घातली त्याला, पण त्याच्या मनाच्या रित्या दऱ्यांमध्ये प्रतिसादाचा प्रतिध्वनी विखरून गेला. ज्या पोकळीत तिचं सगळं सगळं अस्तित्व सामावलेलं असतं. जेथून तिच्या स्वप्नांचा प्रदेश प्रकाश घेऊन येणार असतो, तेच परगणे ओसाड होतात. त्याच्या जगाचे किनारे सुटलेले असतात. उरतात काठांवर कोरल्या गेलेल्या वाहण्याच्या खुणा. परिस्थिती तिच्याभोवती शून्य गुंफत राहते. ती सरकू लागते त्याच्याकडे, एकेक पावलांनी.

कधीतरी तिच्या अस्तित्वाची त्याला धूसर जाणिव होते. त्या विरघळत्या विश्वाला सूर देण्याचा प्रयत्न करतो तो. पण बोलता काहीच येत नाही, कारण शून्यातून कसले आलेत निनाद अन् कसल्या बेरजा. शून्याचं स्थान संख्येनंतर मोलाचं असलं, तरी संख्येच्या आधी त्याचं भविष्य शून्यच असतं. सावरण्याचा प्रयत्न करतोही तो, पण हे सगळं त्याला समजेललं असतंच असंही नाही. समजा समजलं असलं, तरी त्याच्या अस्तित्वाच्या आकृत्या आयुष्याच्या उतरत्या पडावावर पोहचलेल्या असतात, एवढं मात्र खरं. कवयित्री म्हणते, शून्याला कुठे बोलता येत असतं? समजा हे शून्यच त्याचं झालं, तर या शून्याला ऐकणारं आणखी एक शून्य सोबत असेल? कदाचित नाही. अगदी त्याची अन् त्याचीच 'ती'सुद्धा.

‘शून्याला बोलता येत नसतं!’ म्हणून कविता थांबली असली, तरी या शून्याच्या गर्भात एक धगधगता लाव्हा वाहतो आहे. त्याची दाहकता त्याला वेळीच आकळली असती, तिच्या धगीसह किंवा भूगर्भाच्या आत होणारी उलथापालथ समजली असती, निदान तिचे धक्के तरी. तर... शून्याला अर्थाचे नवे आयाम असते?
 

चंद्रकांत चव्हाण

*

कविता समजून घेताना... भाग: सोळा

By // No comments:

निघून जावे सरळ सुरत

रोहिण्यांनी
अंडे गाळले
जिवाची काहिली
थोडी थंड झाली

मग
आर्द्रा, मृग कोरडाच गेला
मधे थोडा
आडवा-तिडवा पाऊस
फूर-गधडा
आला नि गेला
तो परतलाच नाही

त्याची
वाट पाहून
अंगावर होतं नव्हतं ते
किडकूमिडकू मोडून
पेरणी केली
याही वर्षी!

धोंडी, साधू, फकिरांच्या
आळवणीतून
मग तो आला
लहरिया
मेघुराया..!

पुन्हा मोड-घड झाली
तरी-
मूग, उडिदाने
बरा हात दिला,
साजरा झाला
पोळा

मग पाऊस पुन्हा
गडप झाला
अस्वस्थता
शिगेला पोहचली
घामातून निथळत राहिली
रस्ते, बाजार ओस पडले
निळ्या स्वच्छ आकाशात
पांढरे फट ढग
विकट हसत राहिले

मी करुणा भाकतो
देवा, आता इथे कसे भागवावे?
जनावरांचे, आपले...
आहे ती
ओल टिकवावी
कोळप्याने
मुळांना माती
आशेने लावावी बस्स!

उरलेल्यांनी
गाठावे कारखाने ऊसाचे
वा थापाव्या विटा शेकड्याने
किंवा
निघून जावे सरळ
भुसावळ-सुरत पॅसेंजरने
तिकिटही न काढता
पथारी टाकून
संडास, मुतारीजवळ
कुठेही झोप लागतेच!

लोंढ्यांनी
काम करावे
मिळेल ते
साच्यांवर विणत रहावे
धागे उभे-आडवे
गुंते सोडत रहावे
आपआपल्यापरीने वा
घासावे हिरेही असे
की एक दिवस
आपलेही दैव उजळावे!

धरावा धीर
पहावी वाट
गावाकडे नक्कीच येईल पाऊसही
अन् फुलेल कापूसही!

महेंद्र भास्करराव पाटील

माणसाच्या आयुष्यातील सुखाची पर्याप्त परिभाषा आणि जगण्याचे सगळे संघर्ष भाकरी या एका शब्दाजवळ येऊन थांबतात. ती मिळवण्यासाठी पर्याय शोधायला लागतात. ते काही सहजी हाती लागत नसतात. भाकरीकडे नेणारी एक वाट शेताकडे वळून विसावते. शेती-मातीचे अर्थ पाण्याशी निगडीत आणि पाण्याची सलगी आभाळातल्या भरलेल्या मेघांशी अन् श्रमणाऱ्याचे सख्य पावसाशी असते. एकूण आयुष्याचं गणित केवळ आणि केवळ भाकरीवर येऊन संपत असलं, तरी तिचं वर्तुळ खूप मोठा परीघ आपल्यात घेऊन नांदत असते. भाकरीचे प्रश्न अथांगपण घेऊन येतात. ते सहज असते, तर आयुष्याचे अर्थ प्रत्येकवेळी नव्याने शोधावे लागले नसते. बिरबलाला विचारलेला प्रश्न सर्वश्रुत आहे. सत्तावीसमधून नऊ वजा केले. बाकी शून्य. श्रमिकांच्या आयुष्याची सगळी सूत्रे आणि त्यांची उत्तरे या ‘नऊ’ अंकाभोवती प्रदक्षिणा करीत असतात, असे म्हटले तर अतिशयोक्त ठरू नये. पाऊसपाण्याची गणिते जुळली की, जगण्याला पैस प्राप्त होतो. एखादा हातचा सुटला की, ते अधिक टोकदार होत जातात. जगण्याच्या जखमा दिसत नसल्या, तरी ठसठसणाऱ्या वेदना आयुष्यातील कमतरतेची सतत जाणीव करून देत असतात.

ही कविता याच वेदनेची सोबत करीत वाहत राहते, अस्वस्थ आयुष्याचे तीर धरून. शेतकऱ्यांच्या जगण्याची सूत्रे आकाशातून बरसणाऱ्या धारांसोबत जुळलेली असतात. पडत्या पाण्यासोबत वाहत असतात ती. ‘पोटासाठी दाही दिशा का हिंडवीशी आम्हां जगदीशा’ या एक वाक्याने माणसांच्या मर्यादांना अधोरेखित करता येते. आयुष्याचे आपल्यापुरते अर्थ शोधत प्रत्येकाला वर्तावे लागते. भले त्या जगण्यात सुखांचे वाहते स्त्रोत नसतील. जवाएवढं सुख वेचून आणण्यासाठी पर्वताएवढे कष्ट उपसायला लागतात. अपेक्षांची अवजड ओझी घेऊन आपणच आपला शोध घ्यावा लागतो. उपजीविकेसाठी अनभिज्ञ वाटांनी निघणे नियतीचे संकेत ठरतात. गाव परिसर काही कोणी सहजी सोडून जात नाही. गावाची वेस ओलांडणे कधीही आनंददायक नसते. आपल्या अस्तित्वाची मुळं तुटण्याची जखम क्लेशदायक असते. या वाहत्या जखमांना घेऊन ही कविता मनात अस्वस्थपण पेरत जाते.    

पाऊस एक, मात्र त्याची रूपे कितीतरी. कोणासाठी तो लोभस असतो, कुणासाठी विलोभनीय, कुणाला रमणीय वाटतो. आणखी कुणाला काही काही. त्याच्या आगमनाची नांदी अनेकांच्या प्रतिभेला पंख देणारी. कोणासाठी सर्जनाचा सांगावा घेऊन येणारी. कोणाच्या पदरी भिजल्या क्षणाचं संचित पेरणारा. प्रेम पथावर प्रवास करणाऱ्यांसाठी त्याचं असणं किती विलोभनीय असतं. संवेदनांच्या प्रतलावरून वाहणाऱ्यांना तो रमणीय वगैरे वाटतो. असेलही तो तसा, पण प्रत्येकवेळी तो दिसतो तसा असेलच असे नाही. आकाशाच्या विस्तीर्ण पटावरून उतरताना तो देखणा वगैरे वाटत असला, तरी तोच पट रिता होतो अन् कुशीत वांझोटेपण घेऊन वसतीला उतरतो, तेव्हा त्यात केवढातरी गुंता सामावलेला असतो. तो ठरल्या वेळी येतो, मनाजोगता येतो, तेव्हा त्याचं असणं आनंदाचं अभिधान असतं. पण त्याने वाकुल्या दाखवायला सुरवात केली की, तो किती वेदनादायी असतो, हे त्याच्याशी ज्याचं जगणं बांधलं गेलं आहे त्यांना विचारा. त्याच्या कृपेने संसार बहरतात. अवकृपेने विखुरतात. आगमनाने आकांक्षांची अगणित पाखरे आभाळभर भिरभिरायला लागतात. आयुष्याच्या वाटा त्याच्या भिजलेपणात न्हाऊन निघतात. त्याच्या येण्याने केवळ सृष्टीलाच नाही तर आयुष्याला चैतन्याचा मोहर येतो. हे मोहरणे, उजडणे नियतीचे अभिलेख असतात की काय माहीत नाही, पण पाऊस या एका शब्दापाशी अनेकांच्या आकांक्षा अडकलेल्या असतात.    

रोहिणी नक्षत्राचा हात धरून तो धरतीवर हलक्या पावलांनी उतरतो. त्याचं चारदोन थेंब घेऊन येणं जगण्यात आश्वस्तपण पेरून जातात. ग्रीष्माची काहिली थोडी थांबते. क्षितिजावरून एक धूसर उमेद जागते. आशेचा क्षीण कवडसा मनाच्या आडून अलगद डोकावतो. पण कधीकधी ही उमेदच राहते. कारण ओंजळभर पाण्याने काही शेतशिवार आपल्या देहावर हिरवाई पांघरून घेत नाही. असे असले तरी पुढच्या नक्षत्रांची नांदी असते ती. आभाळाकडे डोळे लागलेले असतात. विस्तीर्ण निळ्या पटलावर काळ्या मेघांनी गर्दी करायला सुरवात केली की, उमेदीचा एकेक अंकुर मनाच्या मातीतून अलगद मान वर काढू लागतो. आयुष्याचे काही आडाखे, काही आराखडे आखले जातात. पण त्याचे आराखडे कोणाला कळले आहेत? असते कळले तर कशाला प्रार्थना करायला लागली असती त्याची. तो त्याच्या खेळी खेळतो. माणसे पळत राहतात त्याच्या पाठी. तो खेळत राहतो. आषाढातील काळ्या मेघांनी दाटून आलेलं आभाळ रस्ता चुकतं अन् वांझोट्या वाटांनी वाऱ्यासोबत धावत राहतं. प्रतीक्षेचे तीर कोरडे होतात. मृगात धारांनी धरतीला अभिषेक करावा, पण तो कोरडेपण घेऊन रखडत चालत राहतो. आर्द्रा कोरड्याच जातात. अधेमधे थोडा असल्या-नसल्यासारखा येऊन जातो. आशेचा एक कवडसा जागतो, पण तोही कुठे समाधानाची गंगा घेऊन वाहतो. कुठे येतो आणि कुठे जातो...

मनात असणारी आस काही सहजी टाकून देता येत नाही. उमेद कशी सोडता येईल? एक ही उमेदच तर जगण्याच्या गणितांना परत नव्याने शोधायला लावते. कधीतरी जमा केलेलं तोळा-मासा किडूकमिडूक कुठल्या कोपऱ्यात अडीनडीसाठी दडवून ठेवलेलं काढून आयुष्य पेरले जाते. नियतीसोबत जुगार खेळला जातो. वाहणं विसरून गेलेला तो जातो; तो परत येतच नाही. त्याच्या वाटेकडे आस लावून बसलेल्या डोळ्यातून मात्र वाहत राहतो. तो लहरीच. आले देवाजीच्या मना, तेथे कोणाचे चालेना म्हणतात ना! मग देवालाच साकडे घातले जाते. धोंडी काढून माणसे पाणी मागत राहतात. महादेवाला गाभाऱ्यात कोंडले जाते. हताश मने एक आस्थेचा कवडसा शोधत राहतात सश्रद्ध अंत:करणाने. कधी साधू, फकिरांच्या आळवणीतून आली दया अन् आलाही थोडा, तरी तो नांदेलच असे नाही. पुन्हा मोड-घड होऊन गणिते विसकटतात, ती काही केल्या जुळत नाहीत. दैव संयमाची परीक्षा पाहते. अस्वस्थता टोक गाठते. आकाशातून पाणी नाही, पण आयुष्यातून अपेक्षाभंगाच्या वेदना निथळत राहतात. रस्ते, बाजार शेत-शिवारावर उदासपणाची चादर ओढली जाते. आभाळाची निळाई मोहक वाटत असेलही कुणाला. नितळ गगनात दिसणारा पौर्णिमेचा चंद्र देखणा वगैरे वाटत असेल. पण पावसाळ्यातल्या रात्री चांदण्यांनी हसणारं आकाश वेदनादायीच. शेतकरी करुणा भाकतो. उत्तरे काही हाती लागत नाहीत. विवंचना असते, आहे त्यात भागवावे कसे? जगावे कसे? माणसे कसेतरी पोट भरून घेतीलही, पण जनावरांचे काय? आकाशातून पाण्याच्या नाही, पण आयुष्याच्या कोरड्या आभाळातून प्रश्नांच्या धारा बरसत राहतात अपेक्षाभंगाच्या वेदना घेऊन.  

जगणं काही असं वाऱ्यावर भिरकावून देता येत नाही. आयुष्याला अपूर्णतेचा शाप असला, तरी उमेदीचं आश्वस्तपणही असतंच. ही उमेद माणसांना ढकलत नेते भाकरीच्या शोधात. घरातल्या कर्त्यांना जडावलेल्या पावलांनी निरोप घेणे भाग असते. मागे राहिलेले रखडत दिवस ढकलत राहतात. कोणी ऊसाचे कारखाने गाठतात. कोणी विटांच्या धगधगत्या भट्ट्यात आयुष्य जाळत राहतात. शेकड्याने हजाराने तयार होणाऱ्या विटा हाती चिल्लरशिवाय काही देत नाहीत. भटकंतीच्या वाटा सैरभैर करतात माणसांना. कोणी कुठे, कोणी कुठे वळचणीला जावून पडतो. कोणी निघून जातो  सरळ पॅसेंजरने तिकिटही न काढता, सुरतच्या रस्त्याने. पथारी टाकून संडास, मुतारीजवळ मूठभर देह विखरून पडतो. क्लांत देहाला कसली आलीयेत सुखांची स्वप्ने? कुठेही झोप लागतेच. शहरातही कुठल्याश्या गर्दीचा चेहरा बनून काम करावे. मिळेल ते घ्यावे. कुणी साच्यांवर धागे विणत राहतो. उभे-आडवे गुंते सोडवत. पण आयुष्याचे गुंते काही सहज नसतात सुटायला. कुणी घासतो हिरे. एकेक पैलू चमकत राहतात त्यांचे. मोल वाढत जातं त्यांचं, पण यांच्या जगण्याचं मोलाचं काय? एक दिवस आपलेही दैव उजळावे, या आशेने नशिबाला तो घासत राहतो. धरून असतो सुटणारा धीर. डोळे मात्र गावाच्या वाटेकडे लागलेले. प्रतीक्षा असते गावाकडे बरसणाऱ्या पावसाची. येईल अन् करपलेलं आयुष्य पुन्हा तरारून येईल याची.

देश बदलला आहे. स्वतःची ओळख निर्माण करण्याएवढा. पण देशात राहणाऱ्या साऱ्यांना चेहरा मिळाला आहे का? ज्याच्याकडे पद, प्रतिष्ठा, पैसा आहे त्यांनी सर्वत्र असावं; पण ज्यांच्याकडे यापैकी काहीच नाही त्यांनी कुठेच नसावं का? देश स्वयंपूर्ण वगैरे झाल्याच्या वार्ता झडत राहतात. पण किती शेतकरी स्वयंपूर्ण झाले? काही थोड्यांच्या आयुष्यात समृद्धीचा वसंत फुललाही असेल. ते प्रगतीशील वगैरे झाले असतील, फार्महाउसचे मालकही असतील. पण ज्यांच्याकडे जमिनीचा तुकडा नावालाच आहे, त्यांनी जगावं कसं?

खेड्यातही प्रगतीच्या वाटेने चालत आलेल्या काही पाउलखुणा दिसू लागल्या. तरीही शेतकरी प्रसन्नतेच्या भावनेतून शेती व्यवसायाकडे का पाहत नाही? शेती कसत आहेत, त्यांना जाऊन विचारा, या व्यवसायात तो किती संतुष्ट आहे. यातील बहुतेक शेतीला रामराम ठोकण्याच्या मानसिकतेत असल्याचे दिसेल. कितीही राबा मातीतलं जीवन मातीमोल असल्याची खंत मनातला सल बनून, त्यांच्या बोलण्यातून प्रकटते. ज्यांच्याकडे खूप शेती आहे, त्यांच्या घरांचे पालटलेले रूप, धान्याच्या पडलेल्या राशी, दूधदुभात्याने भरलेले गोठे, अंगणात उभी असणारी वाहने, हे प्रगतीचं सार्वत्रिक चित्र नाही. कुडाच्या सारवलेल्या भिंती, धुरानं कोंदटलेले छप्पर, दाराशी असणारी चारदोन जित्राबं आणि छतातून गळणाऱ्या पावसाच्या पाण्यासह मनातलं गळणारं अवसान सावरत उभा असणारा विकल चेहराच नजरेसमोर दिसतो. खिशात खुळखुळणाऱ्या पैशातून आलेल्या समृद्धीने ब्रॅन्डेड वस्तूंचा तोरा मिरवणारे एकीकडे, तर दुसरीकडे कोणताच ब्रॅन्ड नसलेलं जगणं. कोंड्याला मांडा आणि निद्रेला धोंडा, असं जगणं सोबत घेऊन परिस्थितीशी धडका देत माणूस उभा आहे. उजाड झालेल्या आयुष्याच्या वाटेवरून चालताना आशेचे कोणतेही ओअॅसिस दमलेल्या जिवांना दिसू नये का?

एखाद्या गोष्टीविषयी नुसती सहानुभूती असून चालत नाही. तिची अनुभूतीही असावी लागते. अनुभूतीशिवाय सहानुभूती विफल असते. जगण्याच्या वाटा शोधत माणसं शहरांकडे धावत आहेत. शहराचं बकालपण वाढत आहे. बाहेर पडलेली माणसे नव्या प्रश्नांना सामोरी जात आहेत. भाकरीसाठी चाकरी शोधत आलेली, ही माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. साध्यासाध्या गोष्टींकरिता अस्वस्थता वाढत चालली असेल, तर त्यांनी करावं काय? गाव तेथे पार आहे. पारावरील स्वारही आहेत. पण तेथून चालणारा कारभार गावाला गावपण देणारा आहे का? हे एकदा तपासून पाहायला काय हरकत असावी, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••