वळणाचं पाणी
रखेलीच्या पायी
नवऱ्यानं सोडलं मला
सौभाग्यवती असून
त्यानं विधवा केलं मला
जगावं असं काही राहिलं नव्हतं
पोटाच्या तान्हुल्यासाठी
जगावं लागत होतं
लोकांची उष्टी काढून
जीव थकून जायचा
वाढत्या पोराला पाहून
ताजातवाना व्हायचा
कुणी वाहिनी तर
कुणी ताई म्हणायचे
नजरेत मात्र त्यांच्या
वेगळेच भाव असायचे
त्यांच्या नुसत्या नजरेने
मनाला बलात्काराच्या
वेदना व्हायच्या
तशाच शारीरिक भावनाही
जागृत व्हायच्या
कारण पोटाला उपाशी
राहण्याची सवय झाली होती
शरीराला अजून व्हायची होती
पण मोहाला बळी पडायचे नसते
शील जिवापलीकडे जपायचे असते
असा ठाम होता निर्धार
म्हणूनच खडतर वाट झाली पार
पोरगं माझं मोठं होत गेलं
मीही भूतकाळ विसरून
वर्तमान करपवून
भविष्याकडे वाट लावून बसले होते
आणि इथेच माझे चुकले होते
ज्याला जीव लावला
त्यानेच जीव घेतला
तोही एक पोरीला घेऊन पळून गेला
मला म्हातारीला जुनेच भोग
भोगायला ठेऊन गेला
माझ्या साऱ्या आयुष्याचं पुण्य
एका क्षणात संपून गेलं
अखेर वळणाचं पाणी
वळणाला गेलं!
माधव पवार
•
‘स्त्री जन्मा तुझी कहाणी, हृदयी अमृत नयनी पाणी’ या ओळी कुठेतरी वाचल्याचे स्मरते. माहीत नाही नक्की कोठे? पण ते महत्त्वाचं नाही. या एका ओळीत ‘तिच्या’ जगण्याचे सगळे भोग सामावले आहेत. वेदनांचे वाहणारे प्रवाह आहेत. उपेक्षेचे संदर्भ आहेत. वंचनेची वर्तुळे आहेत. तिचं ‘बाई’ असणं अधोरेखित झालं आहे. प्रघातनीतीच्या परिघाभोवती घडणाऱ्या तिच्या आयुष्याच्या प्रदक्षिणा आहेत. अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण घेऊन वेदनांचे अर्थ शोधण्यासाठी भटकत राहणं आहे. किती वर्षे झाली असतील? किती ऋतू कूस बदलून गेले असतील? किती बहर वळणावर विसावले असतील? कितीदा आभाळ भरून आलं असेल? कितीदा रितं झालं असेल? आयुष्याच्या अफाट पसाऱ्यात सगळ्याच गोष्टींच्या नोंदी काही कुणी करून ठेवत नसतं. कराव्यात असंही काही नसतं. तसंही काही बाबी गृहीत धरण्याचा सराव करून घेतला की, काळाच्या कातळावर नोंदी कोरून घेण्याची आवश्यकता उरतेच किती?
देहाची सोबत करणाऱ्या श्वासांच्या संगतीने म्हणा किंवा नियतीने निर्धारित केलेल्या वाटेने, काही म्हटले तरी अर्थ एकूण एकच. प्रवास सगळ्यांना घडतो. त्यात काही पराक्रम वगैरे असतो असे नाही. उताराचे हात धरून पाण्याने वाहत राहावे, तसे ते वाहणे असते. आयुष्याला अर्थ प्राप्त होतात प्रवाहांना अपेक्षित दिशेने वळते करण्यात. तसेही जगण्यात सामावलेल्या सगळ्याच गोष्टींना अर्थ असावेत असे कुठे असते? असले म्हणून आयुष्याची उंची वाढते अन् नसले म्हणून अगदीच संपते असेही नाही. पण असणे आणि नसणे या बिंदूंना सांधणाऱ्या रेषेवरून घडणाऱ्या प्रवासात जगण्याचे अर्थ शोधावे लागतात. वाचावे लागतात. वेचावे लागतात. हा प्रवास असतो एका किनाऱ्याकडून दुसऱ्या तीराकडे निघण्याच्या. प्रवाहांशी सख्य साधता आलं की, वाहण्यालाही अर्थ मिळतात. माणूस व्यवस्थेचे किनारे धरून वाहतो आहे, कितीतरी वर्षांपासून. व्यवस्था कुण्या एकाच्या विचारांची पावले घेऊन पुढे सरकत नसते. ती उभी असते अनेकांच्या मनात घर करून असलेल्या आकांक्षांवर. ती उभी करता येत असली, तरी चालती करण्यासाठी समान विचारांच्या पणत्या घेऊन पावलापुरता प्रकाश पेरणाऱ्या हातांची आवश्यकता असते. हे हात बाहेरून दत्तक आणता येत नाहीत. व्यवस्थेच्या वर्तुळात ते शोधायला लागतात. वर्तुळांचे परीघ विस्तारण्यासाठी विचार पेरावे लागतात. पण विचारच अंधाराच्या मर्यादांमध्ये हरवले असतील तर...?
मनात वसतीला उतरलेली सगळीच स्वप्ने पूर्ण होण्यासाठी असतात असे नाही. मुक्कामापर्यंत पोहचण्यासाठी प्रवास करावा लागतो. तो एकट्याचा असतो. समूहाने निर्माण केलेल्या वाटांचा असतो. परंपरांचा असतो. प्रघातनीतीचा असतो. चालत्या पावलांना परंपरांचा पायबंद पडणे आकांक्षांच्या वर्तुळाचे परीघ सीमित होणे असते. काहींच्या जगण्याला अथांगपण असते. काहींच्या आयुष्याला अफाटपण घेऊन येणारे क्षितिज बिलगलेले असते. पण काहींच्या जगण्याची वर्तुळेच सीमांकित परीघाने बंदिस्त झालेली असतात. ती कधी परिस्थितीने, तर कधी परंपरांनी गोठवलेली असतात. हे गोठलेपण मनी विलसणाऱ्या बहराची सांगता असते. ऋतूनी पेरलेल्या सौंदर्याचं विसर्जन असतं.
नियतीने पदरी घातलेलं दान घेऊन जगण्याची सूत्रे शोधणाऱ्या एका आकांक्षेची सांगता ही कविता अधोरेखित करते. तिच्या प्राक्तनाचे संदर्भ शोधत सरकत राहते. संवेदनांचे किनारे धरून वाहत राहते. विस्कटलेल्या आयुष्याने पदरी घातलेल्या तिच्या वेदनांचे वेद हाती घेऊन कवी एक अस्वस्थपण शब्दांतून पेरत राहतो. आपणच आपल्यापासून सुटत जाणं, निखळत जाणं एक जखम असते. कविता वेदनेची वलये घेऊन मनाच्या परिघाभोवती भ्रमण करीत राहते. स्त्री कोणीही असो, कोणत्याही देशप्रदेशात वसतीला असो. तिच्या क्षितिजांच्या मर्यादा आधीच कोरल्या गेलेल्या असतात. परंपरांचे हात धरून त्या चालत राहतात. कधी कुणी त्याविरोधात आवाज बुलंद केल्याच्या वार्ता कानी येतात, पण या आवाजांचे प्रतिध्वनी आसपासच्या आसमंतात किती काळ निनादत राहतात? गळ्यातले आवाज गळ्यात अडले, तर ते पोहचतीलच कसे? असाच हरवलेला आवाज ‘आई’ नाव धारण करून या कवितेतून आर्त साद देत राहतो. एक हताशपण घेऊन स्वतःच स्वतःची समजूत करून घेत नियतीने आखलेल्या मार्गावरून मन मोडून, मान खाली घालून हरवलेल्या वाटांचा शोध घेत चालत राहतो.
मातृत्वाला मान असावा; पण स्त्रीत्वाचा सन्मान नसावा, एवढा अविचार माणसांच्या जगात का दिसावा? कारुण्यमूर्ती, वात्सल्यमूर्ती म्हणून स्त्रीकडे पाहताना तिच्याठायी असणाऱ्या ममतेचा गौरव होत राहिला आहे. वंश सातत्यात तिची भूमिका अनन्यसाधारण असल्याने तिचा सन्मान होत आला आहे; पण नारी म्हणून वाटेला अवहेलनाच येत राहिली. माता म्हणून तिचा प्रवास कितीही सुंदर असला, तरी तिच्यातील मातृत्व वजा केल्यावर मागे उरणारं तिचं स्त्रीत्व नेहमीच दुय्यम राहिलं. हे दुय्यमत्त्व अधोरेखित करणारी चिन्हे तिच्या सौभाग्याशी जुळवली गेली. वटसावित्री पतीच्या जीविताची हमी ठरविली. अहेवपणी आलेलं मरण तिला जीवनसांगतेची इतिकर्तव्यता वाटू लागलं. जन्मासोबत मिळालेलं नावही त्यांच्यासाठी बदलून घ्यायचं. अस्तित्वच विसर्जित करून ठेवायचे, तेथे नावाचं काय अप्रूप?
पुरुषी मानसिकता घेऊन नांदणाऱ्या जगात स्त्रीच्या कर्तृत्वातील, सामर्थ्यातील सुंदरता शोधण्याऐवजी पुरुषाची नजर तिच्या देहात सौंदर्य शोधते. गौरवर्णांकित असणं तिच्या सौंदर्याचं परिमाण असतं. नितळ अंगकांती असणारी नारी सौंदर्याची परिभाषा ठरते. ‘स्त्रीचे सौंदर्य म्हणजे तिचे सामर्थ्य, तर पुरुषांचे सामर्थ्य म्हणजे त्याचे सौंदर्य’ यासारखे विचार जन्माला येताना, स्त्रीने तिचे सामर्थ्य कमनीय बांध्यात शोधावे, असंच काहीसं नीतीसंकेत निर्धारित करणाऱ्यांना सूचित करायचं असेल का? ती नेहमी ‘बार्बीडॉल’ म्हणूनच दिसावी, या विचारांतून तिला पाहिले जाते. मनाचं सौंदर्य चिरकाल टिकणारे असते, हे विसरून अटकर बांध्यात तिचं स्त्रीत्व उभं केलं जात असेल, तर तिच्या असण्याला अर्थ उरतातच किती?
नीतीसंकेतांची निर्मिती समाजाचे व्यवहार सुस्थापितरित्या चालत राहावेत म्हणून झाली असली, तरी सगळेच त्यांचे निर्वहन करतात असे नाही. त्याने काही केले तरी त्याच्या वर्तनाला नेहमीच पुरुष म्हणून मोजताना पदरी झुकतं माप घातलं जातं. तिने मात्र मर्यादांची वर्तुळे पार करायचा प्रयास केला की, संस्कारांचा अधिक्षेप असतो. जगण्याभोवती घातलेली कुंपणे नाकारणे प्रवाहांविरोधात प्रवास ठरतो. त्याच्या मनात वसतीला असलेल्या आनंदाची अभिधाने शोधण्याला पुरुषार्थाची लेबले लावली जातात. ती परिधान केलेल्या वस्त्रासारखी असते. वस्त्रे बदलता येतात. टाकून देता येतात. नवी घेता येतात. मनात वसणाऱ्या सुखांचा शोध घेताना भावनांच्या आवेगात चुकून एखादे पाऊल वाकड्या वाटेने वळते झाले की, तिला वारयोषिता म्हणून अधोरेखित करणे अधिक सुगम असते.
सौभाग्यवती असूनही कुण्या प्रियतमेच्या पायी नवऱ्यानं टाकून देण्याच्या वेदना तिच्याशिवाय अधिक कुणाला आकळतील? अहेवपणी विधवा होणं काय असतं? हे शब्दांचे गुच्छ तयार करून कसे मांडता येईल? त्याच्या एका निर्णयाने संसाराची स्वप्ने विखरत जाणे, जगणे दुभंगणे काय असते, हे तिच्याशिवाय कुणाला कसं सांगता येतील? ज्याच्या काळजावर घाव घातले जातात, त्यांना वाहत्या जखमांच्या वेदनांचे अर्थ समजून नाही सांगायला लागत. ज्याच्या प्रेमाच्या चार शब्दांनी जगण्याचा धीर यावा, त्यानेच नाकारल्यानंतर जगावं असं काही तिच्या आयुष्यात शेष राहिले असते का? पण कधी परिस्थितीच अशा वळणावर आणून उभी करते की, प्राप्त प्रसंगापासून पलायनाचे सारेच पर्याय संपलेले असतात. उदरी वाढणाऱ्या अंकुराला आकांक्षांचे आकाश मिळावं म्हणून नियतीने केलेले आघात ती झेलत राहते.
परिस्थितीच्या निर्मम खेळात एकवेळ धीराने उभं राहता येतंही, पण भाकरीचे प्रश्न सहज उभं कसं राहू देतील? हातपाय चालले, तर जगणं उभं राहतं. आयुष्याच्या पटावरून तुटलेल्या तुकड्यांना ती सांधत राहते. लेकराच्या जगण्यासाठी लोकांची उष्टी काढून आयुष्याची गणिते सोडवत राहते. जीव थकूनही जीव लावण्यासारखे काही हाती लागल्याने, जीव ओतत राहते. दुःखाचे हेही दिवस कूस बदलतील. सौख्याचा वसंत अंगणी येईल म्हणून आपल्या अस्तित्वाच्या अंशाकडे पाहून उमेदीचे कवडसे शोधत राहते. अंधाराची क्षितिजे पार करीत येणारा आस्थेचा एक अनुबंध हरवलेल्या उमेदीला लेकराच्या रूपाने दिसायचा. धूसर होत जाणारी रेषा ठळक व्हायची. विसकटलेल्या आयुष्य अन् उसवलेल्या जगण्यावरची श्रद्धा वाढत रहायची.
परिस्थितीला एकवेळ समजून घेता येतं. पण विकार घेऊन आसपास विहार करणाऱ्या नजरांना समजावयाचे कसे? नजरेत विकारांची पाखरे सतत भिरभिरत असतील, तर फुलपाखरांच्या पंखांची अपेक्षा करावी कशी? विषाक्त नजरांसाठी एकाकी जीव संधी असतो. कुणी कोणत्या नात्यांची नावे वापरून संबोधित केलं, म्हणून विचारातून विकारांचे विसर्जन होतंच असं नाही. नजरेने देहाची मापे काढणारी विकृती दिसत नसली, तरी तिचं देहाभोवती भिरभिरत राहणे कसे नाकारता येईल? मनावर झालेला आघात एकवेळ विस्मरणाच्या अंधाऱ्या कप्प्यात ढकलता येईल. कदाचित विसरता येईलही. पण वासनांकित नजरा देहाभोवती फिरताना रोजच घडणारा नजरांचा बलात्कार विसरायचा कसा? देह नजरांनी पिण्यासाठीच असतो, अशा विचारांनी वर्तणाऱ्यांच्या विकारग्रस्त नजरांचे वासनांकित बलात्कार टाळायचे म्हटले तरी टाळता येतात कुठे? अगतिक जिवांच्या वाट्याला येणारे हे भोग मनावर होणाऱ्या बलात्काराच्या वेदनाच.
कुणी निर्धारित केलेल्या नियमांच्या चौकटींच्या अधीन राहण्यास निसर्ग अंकित नसतो. त्याचे सोहळे ठरलेले असतात. संस्कार अंगीकारता येतील, भोवती घातलेली कुंपणे मर्यादांचे परिमाणे म्हणून मान्य करता येतीलही, पण देहाभोवती लगडलेल्या आसक्तीचे विचार सहजी निरोप घेत नसतात. त्याच्या मागण्या उचंबळून येतच असतात. एक लाट थांबवावी, दुसरी आवेगाने धावत येते. मन मानायला तयार असते, पण शरीर? त्याच्या गरजा टाळायच्या कशा? तिच्या देहाला बिलगलेल्या भावना अशाच अवचित जाग्या होतात. एक अस्वस्थपण विचारांत कोरून जातात. पोटाला उपाशी राहण्याची सवय करून घेता येते, पण शरीराला ही अवघड वळणे पार करण्यासाठी तयार करायला लागते. काहीही करायला लागले, तरी मोहाच्या क्षणांना थांबवून धरायचे अन् यातच तुझ्या आयुष्याचे सार्थक असते, हा विचार तिच्या मनाच्या मातीत परंपरांनी रुजवला आहे. चारित्र्य आयुष्याचा आरसा असतो. त्यावरील एखादा डागही चमक घालवायला पुरेसा ठरतो. शील अलंकार असतो, तो जपायचा निग्रहपूर्वक, काहीही झाले तरी. हा विचार मनाच्या अथांग डोहात उतरला असल्याने, ती प्रवादांना जपते. निग्रहाने स्वतःला जपलं म्हणून आयुष्याची खडतर वाट पार झाली म्हणताना परंपरानिर्मित विचारांचा तिला अभिमान वाटतो. कुणीतरी तयार केलेली सूत्रे तिच्या दृष्टीने अस्तित्वाला आयाम देणारे प्रमाण ठरते. स्वातंत्र्याला संकुचित करणारी प्रमेये ती मान्य करते. तो मात्र त्याच्या सुखांची समीकरणे त्यानेच निर्धारित केलेल्या सूत्रात शोधतो. प्रवाद त्याच्यासाठी कोसो दूर अंतरावर असतात.
पोरगं मोठं होत गेलं, तसा वेदना पदरी पेरणारा भूतकाळ विसरून जगण्याची प्रयोजने शोधत ती पुढे चालत राहते. वर्तमान करपत गेला तरीही भविष्याच्या उदरात लपलेल्या सुखांच्या तुकड्यांकडे डोळे लावून बसते. आयुष्याच्या वाटेवर अंथरलेल्या अंधारात लपलेल्या आकृत्या विस्मरणाच्या डोहात टाकू पाहते. पण सगळीच गणिते काही इच्छेच्या अधिनस्थ नसतात. कधी आखलेले आडाखे बिघडतात. आराखडे आकार हरवतात. आयुष्याचे अनुमान अनुबंधाचे आयाम विसरतात. तेव्हा ‘इथेच माझे चुकले होते’ म्हणताना कासावीस होते. उसवत जाते. नवऱ्याने टाकून दिल्याच्या वेदनांपेक्षा अपेक्षाभंगाचा आघात तिला क्षतविक्षत करतो. ही जखम तिच्या आयुष्यातून सतत वाहत राहते. खरंतर ज्याच्यासाठी तिने आयुष्याचा होम केला. समाधानचे सोहळे संपन्न करणाऱ्या सुखांना अंतरावर थांबवून ठेवले. समर्पणाच्या समिधा आकांक्षांच्या धगधगत्या यज्ञकुंडात समर्पित केल्या. स्वतःला स्वतःतून वजा करून त्याच्यासाठी सुखांच्या बेरजा करत गेली. दुःखाचे दान झेलत गेली. पण त्यानेच तिला आपल्या विश्वातून वजा केलं. ज्याला जीव लावला, त्यानेच जीव घेतला.
पोरीला घेऊन तो पळून जातो. आयुष्याचे एक वर्तुळ पूर्ण होते. इतिहास एक प्रदक्षिणा पूर्ण करून त्याच बिंदूवर येऊन थांबतो. विस्मृतीच्या अंधारात भिरकावून दिलेले वेदनांचे तुकडे दिसू लागतात. प्रसंगांची पुनरावृत्ती प्राक्तनाच्या पथावरून चालत समोर येते. पात्रांची नावे तेवढी बदलतात. जुनेच भोग नव्याने आयुष्याच्या उंबरठ्यावर येऊन विसावतात. प्राक्तनाचे भोग मागे ठेऊन तो परागंदा होतो. तिचं सगळं आयुष्य कापरासारखं जळत राहिलं. चिमणीच्या चोचीने वेचून आणलेलं चिमूटभर पुण्य एका क्षणात संपून गेलं. मागे उरल्यात केवळ रित्या ओंजळी. नियतीने पदरी घातलेल्या श्वासांना सांभाळत उसवलेल्या आयुष्याला टाके घालत राहते. आता उरतेच काय तिच्या जगण्यात, ज्यासाठी तिने आयुष्याला समजावत राहावे? स्वप्ने पाहत रहावीत? जगण्यात विसावू पाहणारा मोहर अवकाळी करपतो. डहाळीचा हात सोडून देठातून सुटलेल्या पानांसारखं वाऱ्यासोबत सैरभैर भिरभिरत राहणं अटळ भागधेय होतं. ना कोणती दिशा. ना मुक्कामाचं अंगण. ना आस्थेने ओढून आणणारा उंबरठा. नियतीच्या लाटांवर वाहत राहणे हाती उरतं. अखेर ‘वळणाचं पाणी वळणाला गेलं’ म्हणत नियतीचे ललाटी लेखांकित केलेले अभिलेख वाचण्याचा विकल प्रयत्न करीत राहते. प्राक्तनाने आयुष्यात गोंदलेल्या प्रश्नचिन्हाचा शोध घेत राहते. मिळतील तिला उत्तरे...?
चंद्रकांत चव्हाण
••