संकटे कधी एकेकट्याने नाही येत. सगळा लवाजमा गोळा करून मुक्कामालाच येण्याच्या तयारीने ती निघालेली असतात की काय, माहीत नाही. पण त्याचं येणं कुणालाच नको असतं. ती काही कोणाला कळवून नाही येत. तसा निरोप नसतो त्यांनी पाठवलेला. दारावर दस्तक दिली की कळतं, आपल्या पुढयात कोणता पसारा मांडून ठेवला आहे त्यांनी. प्राप्त परिस्थितीला अन् पुढयात पडलेल्या प्रसंगांना सामोरे जाण्याशिवाय अन्य विकल्प असतो तरी कोणता? भिडता येतं त्यांच्याशी ते लढत राहतात. आपापली अस्त्रेशस्त्रे घेऊन कधी एकट्याने, कधी आणखी कोणासह. संकटांतून सहीसलामत सुटण्याची आयती सूत्रे नसतात. संघर्षात अविचल राहण्याची समीकरणे सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही कोसळतात. काही कोलमडतात. अर्थात, हा त्या त्या वेळी घेतलेल्या बऱ्यावाईट निर्णयांचा परिपाक. काही कोसळूनही उभे राहतात. कापून केवळ खोड शिल्लक राहिलेल्या झाडाला नव्याने कोंब यावेत तसे उगवून येतात.
आपत्ती, संकटे सार्वकालिक नसतात. सत्व पाहणाऱ्या संकटांतून मुक्तीचा मार्ग मिळवणाऱ्याचं कौतुक वगैरे होणंही परिपाठच. संकट समयी एखाद्याला सहजपणे सल्ला दिला जातो. सांगितल्या जाणाऱ्या प्रत्येक संदर्भाला सामाजिकतेची वसने चढवून सुशोभित केलं जातं. उमेदीचे उसने शब्द पेरले जातात. कुणी आश्वस्त करणारी अभिवचने देऊन जातो. कुणी कुठून मिळवलेलं तत्त्वज्ञानपर प्रवचन ऐकवतो. कुणी भूतकाळाच्या कुशीत पहुडलेल्या प्रिय-अप्रिय आठवणींना नव्याने रंग भरतो. समूह म्हणून जगताना संकटकाळी माणूस एकटा पडू नये, ही भावना जवळपास सगळ्यांच्याच अंतरी नांदती असते. या सगळ्या गोष्टींना सहज सहकार्याचे कंगोरे अन् स्वाभाविक सौहार्दाचे कोपरे असतात. अर्थात, हे वास्तवही अलाहिदा नाही करता येत.
द्यायचंच असेल तर आयुष्यात दुःख दे, संकटे दे वगैरे सारखी वाक्य कुंतीचा हवाला देऊन कुणी उमेद बांधण्यासाठी सांगतो. कुणी तुकोबाला मदतीला घेऊन सुख पाहता जवापाडेची आवर्तने करीत आयुष्यात कणभर सुखासाठी पर्वताएवढे दुःख झेलावे लागते म्हणून सांगतो. कुणी संत, महाम्ये, महापुरुषांनाही दुःखातून मुक्ती नसल्याची आठवण करून देतो. रामाची वनवासातील वणवण असो की, कृष्णाचं अंतसमयीचं एकटं असणं. ही दुःखे नव्हती तर काय होते, म्हणून धीर बांधू पाहतो. कोणी कर्माला, कोणी धर्माला, कोणी नीतीला, कोणी नियमांना कासरे लावून समोर उभं करतो. एकुणात काय तर जगात वेदनेच्या वाटेने चालणारा तू काही एकटा आणि एकमेव जीव नाही. अनेक जिवांनी दुःखाच्या दाहकतेत शरणागती न स्वीकारता जगण्याचे अर्थ शोधून आपल्या आयुष्याला नवे आयाम दिल्याचं सांगतो.
हे सगळं मिथ्या आहे, असं कोणी म्हणणार नाही. चालते करण्यासाठी आधी पायांवर उभं करणारे अनुभव सांगण्यात वावगं काहीही नाही. पण सगळ्यांनाच असं काही करणं साध्य होतंच असं नाही. दुःखाचा रंग सगळीकडे सारखा असला, तरी त्याच्या छटा वेगळ्या असतात. परिमाणे अन् परिणाम निराळे असतात. दुःखाची परिभाषा प्रत्येकाची वेगळी आणि प्रत्येकासाठी निराळी असते. या वास्तवाला वळसा घालून उत्तरे नाही शोधता येत. विस्तवाचा दाह काय असतो, हे चटका अनुभवलेल्यालाच ठाऊक असतं, नाही का? बाकीचे केवळ तर्क, अनुमान आणि असलेच तर अनुषंगिक अनुभव. तरीही प्रत्येक जण प्रबोधनकार असल्याच्या आविर्भावात आपल्या अनुभवांचे गाठोडे उपसत असतो.
हे सगळं सांगण्याचं कारण, आई आणि नंतर बाबांच्या आजारामुळे गेल्या काही दिवसात कशा आणि कोणत्या प्रसंगांना सामोरे जावं लागलं. हे सांगणारा संदेश एका स्नेह्याने आमच्या व्हाटसअॅप समूहावर पाठवला. परिस्थितीने प्रखर पेच समोर उभा केलेला. जगण्याच्या सगळ्याच चौकटी विस्कळीत झालेल्या. अवतीभवती कोणीतरी खच्चून अंधार भरून ठेवलाय. तो अधिकच निबिड होतोय. आशेचा पुसटसाही कवडसा कुठून दिसत नाही. मेंदू विचार करणेच विसरला की काय. एक हताशा जगण्याला वेढून बसलेली. काय करावे काही सुचेना. अगदी कोसळण्याच्या बिंदूवर नेणारी परिस्थिती वगैरे वगैरे. मित्र ऐनवेळी मदतीला धावून आले. कशाचीही तमा न करता पळत राहिले सोबतीने. त्यांच्या ऋणातून कसं उतराई होता येईल, म्हणून कृतज्ञ अंतकरणाने मनातले भाव शब्दांकित केलेले.
अर्थात, समाज माध्यमांवर सतत घडतं ते येथेही. मॅसेजची अक्षरे स्क्रीनवर साकार झाल्या झाल्या सहवेदनेचे सूर सजायला लागले. ओथंबलेपण घेऊन अक्षरे अंकित होऊ लागली. सहानुभूतीची एक लाट सरकली की, दुसरी तिचा माग काढत येतेय. संवेदनांच्या सरीवर सरी बरसतायेत. सांत्वनाच्या सहृदयी भावनेने शब्द मोहरून आलेले. मॅसेज वाचून कुणी तक्रार करतो आहे, आम्हांला का नाही कळवलं म्हणून. कुणी सांगतो आहे अरे, अशावेळी त्याने तरी काय करावं? कुणी म्हणतो आहे, बरं की मित्र सोबत होते. कुणी दैवाला दोष दिला. कुणी देवाला बोल लावला. आणखी कुणी काय, कुणी काय. प्रतिसादाचा परिमल व्हाटसअॅपच्या प्रांगणात पसरतोय. थोडी काळजी, थोडी चिंता, बरीचशी चीड, विखंडित विमनस्कता, अगणित अगतिकता... भावनांचा एकच कल्लोळ. शक्य असेल तसा प्रत्येकजण व्यक्त होतोय. आपल्याकडून प्रतिसाद नाहीच दिला गेला, तर माणुसकी वगैरे प्रकार नसलेला म्हणून अधोरेखित होण्याच्या अनामिक भीतीपोटी येतील तशी अक्षरे खरवडली जातायेत. व्यक्त होणाऱ्यांचा हा प्रमाद नाही. माणूस असल्याच्या मर्यादा आहेत. अशावेळी ज्या स्वाभाविक प्रतिक्रिया यायला हव्यात, त्या आणि तशाच येतायेत. सगळेच भावनांचे किनारे धरून वाहतायेत.
माणूस समूहप्रिय असल्याचं आपण म्हणतो. तो आहेच. संदेह असण्याचं कारण नाही. पण सांप्रत स्थितीकडे पाहिलं तर त्याच्या समूहनिष्ठेवर प्रश्नचिन्ह अंकित करण्याइतपत संदेह विचारात वसती करून आहे, हेही दुर्लक्षित नाही करता येत. आपापली कोटरे अन् त्यातले कोपरे प्रिय असण्याच्या काळात अपेक्षा तरी कसल्या अन् कोणत्या कराव्यात? संपर्काची साधने संवादाला सक्षम बनवतायेत, पण माणसे संकुचित होत आहेत. सहज जुळणाऱ्या स्नेहाचे सूर जगण्यातून सुटतायेत त्याचं काय? आयुष्याला वेढून असलेल्या प्रश्नाची सम्यक उत्तरे शोधूनही सापडत नाहीयेत माणसांना.
सामान्य माणसांच्या जगण्याच्या काही व्याख्या असतात, तसे आयुष्याचे अर्थ शोधणारी गणितेही. ती फार गहन, किचकट वगैरे असतात असं नाही. पण प्रत्येकवेळी अचूक उत्तर देणारी सूत्रे त्याला सापडतातच असंसुद्धा नाही. बऱ्याचदा त्याचं विश्व त्याच्या विचारांपासून सुरु होतं आणि त्याच्या असण्यात संपतं. त्याच्या पुरतं तरी हे वास्तव असतं. काळाच्या कुठल्यातरी तुकड्यात असण्याला ओंजळभर चौकट मिळते. पण त्यांचे अन्वयार्थ लागतीलच असं नाही. काळ अफाट आहे. अथांग आहे. त्याच्या तळात डोकावण्याचा प्रयत्न माणूस शतकांपासून करतोय, पण तो तसूभरही कळला आहे की, नाही कोण जाणे? माणसांच्या या मर्यादाच. विस्ताराचे बांध असूनही अमर्याद आकांक्षाच्या आभाळात तो विहार करतोय. जगणं सीमांकित वर्तुळात मर्यादित होतंय. हे कळत नाही असं नाही, पण वळत नाही, हेच दुर्लक्षित वास्तव. माणूस इहतली अधिवास करून असणाऱ्या जिवातला प्रज्ञावान वगैरे असल्याचा अहं केवळ वल्गना ठरवू पाहणारा हा काळ. गती-प्रगतीच्या परिभाषा प्रचंड वेगाने बदलत आहेत. जगावर हुकुमत गाजवण्याची तंत्रे अवगत झाली. पण स्वतःच सूत्रातून सुटण्याच्या टोकावर माणूस लटकला आहे. आपण सगळं काही असल्याचा साक्षात्कार केवळ आभास ठरू पाहतोय.
आपल्यातला मी वगळून आसपासचा अदमास घेत राहतात त्यांना सभोवतालातले सूर समजावून नाही सांगायला लागतं. मनातले अहं उंबरठ्याबाहेर ठेवता आले की, आयुष्य समजून घेण्यास सुलभ पडते. संयम राखणाऱ्यांना मर्यादांचे अर्थ अवगत असतात. पण एकदाका अंतरी अहं रुजले की, त्यांचा विस्तार अमरवेलीसाराखा सहज होत राहतो. कुठलाही आधार त्याला पुरतो. यशाची शिखरे सर करताना पायथा दुर्लक्षित झाला की, कोसळण्याचा अदमास नाही घेता येत. आकांक्षांच्या गगनात विहार करताना अहंविहिन राहणं आपण अवगत केलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर हो असेल, तर हीच तुमच्यातल्या तुम्ही असण्याची जमा बाजू. असलेलं नसलेलं महात्म्य कथन करून काही कोणाला महंत नाही होतं येत. अतिशयोक्तीच्या शिड्यांवरून शिखरांना हात लावू पाहणाऱ्यांना पायांना असणाऱ्या आधाराचं नातं जमिनीशी असत याचं भान असायला हवं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••