Dakhal | दखल

By // No comments:

 

 
 


दिनांक: 10 जुलै 2016, रविवार रोजी दैनिक देशदूत 'शब्दगंध' पुरवणीत प्रकाशित माझा ललित लेख: 'वारी.'
धन्यवाद...! दैनिक देशदूत, जळगाव. 

लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा: 




 
दिनांक: 2 जुलै 2016, शनिवार रोजी दैनिक लोकमत 'विकेंड' पुरवणीत प्रकाशित माझा ललित लेख 'सखा-सोयरा.
'धन्यवाद...! दैनिक लोकमत, जळगाव.

लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
http://www.aksharyatra.com/2015/11/sakha-soyara.html?m=1





दिनांक: २८ जून २०१५, रविवार रोजी ‘मी मराठी’ वर्तमानपत्राच्या ‘सप्तमी’ पुरवणीत माझा ब्लॉग ‘अक्षरयात्रा’मधून ‘हरवलेले काही’ हा लेख ‘ब्लॉगांश’ या सदरासाठी प्रकाशित करण्यात आला.'धन्यवाद...! दैनिक मी मराठी.
 
लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा:
http://www.aksharyatra.com/2015/06/haravalele-kahi.html
 
 
 
 

Gun Ani Gunavatta | गुण आणि गुणवत्ता

By // 3 comments:
गुण आणि गुणवत्ता: भाग एक
 
दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल लागले. नवी उंची गाठणारे निकालांचे आकडे पाहणाऱ्या, ऐकणाऱ्याना सुखद अनुभव देऊन गेले. परीक्षार्थींच्या पदरी गुणांचे भरभरून दान पडले. रित्या ओंजळीतून आनंद ओसंडून वाहू लागला. वर्षभराच्या सायास-प्रयासांना यशाची फळे आली. अनेकांचे टांगणीला लागलेले श्वास मोकळे झाले. घेतलेल्या कष्टांचे चीज झाले म्हणून मुलं, त्यांचे पालक, शिक्षक, शाळा, शिक्षणव्यवस्था सगळेच सुखावले. सत्काराचे, कौतुकाचे, गुणगौरवाचे सोहळे पार पडले. मीडियातून सुहास्य वदनाच्या छबी चित्रांकित झाल्या. त्यादिवासाचा सूर्य मावळला तसा कौतुकाचा आलेला बहरही ओसरला. रात्रीच्या कुशीत माणसे निद्राधीन झाली. दुसऱ्या दिवसाचे दैनंदिन व्यवहार पोटपाण्याच्या दिशेने वळते झाले. निकालाच्या दिवसाच्या साक्षीने पार पडलेले कौतुकाचे सोहळे अनेकांच्या अंतर्यामी ऊर्जा ठेऊन गेले. खरंतर कोणतीही गोष्ट चिरकाल टिकणारी नसते. साजऱ्या झालेल्या आनंदाच्या उत्सवानंतर सोबतच येणारे आणि प्रकर्षाने प्रकटणारे वास्तवही अशावेळी दुर्लक्षित करून चालत नाही. कोणत्याही परीक्षांच्या निकालानंतरचे वास्तवही असेच काही प्रश्न सोबत घेऊन उभे राहते. शंका, संदेह, चिंता, चिंतनाच्या वाटेने चालत येऊन अनेक प्रश्न समोर दत्त म्हणून उभे राहतात. या निकालांनीही काही प्रश्नाचे प्रदेश नव्याने निर्माण केले. अशाच अनेक प्रश्नांपैकी विचारला जाणारा एक प्रश्न होता, ‘गुण मिळालेत, गुणवत्तेचे काय?’ निकालाचा वाढलेला टक्का पाहून गुण आणि गुणवत्ता यांची तुलना झाली, तेव्हा या यशाचे विश्लेषण होऊ लागले. यावर्षाचा मोठ्याप्रमाणावर लागलेला निकाल पाहून अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या. हा निकाल केवळ गुणांची उंची वाढवणारा असून गुणवत्ता मात्र पायथ्याशीच उभी आहे. गुण आणि गुणवत्ता भिन्न परगणे असून, त्यांची तुलना करून पाहणे यानिमित्ताने संयुक्तिक ठरेल, असे विचार प्रश्न विचारणाऱ्यापैकी अनेकांच्या मनात निर्माण झाले. गुणवत्तेबाबत असमाधान असल्याचे सूचित करू पाहणारे हे प्रश्नकर्ते निकालाच्या उंचीबाबत समाधानी दिसत असले, तरी त्यांच्या मनात किंतु होताच.

राज्याचा दहावीचा निकाल ९१.६० टक्के इतका लागणे हा शिक्षणव्यवस्थेसाठी, शिक्षणप्रक्रियेसाठी आनंदयोग असेलही; पण कधीही एवढ्याप्रमाणात निकाल पाहण्याची सवय नसणारी आमची समाज नावाची व्यवस्था प्रश्न विचारू लागली, उंचीचे नवे शिखर गाठणारा हा निकाल गुणवत्ता म्हणायची की, गुण संपादनाच्या मार्गांचा परिपाक म्हणायचा? म्हणणारे काही म्हणोत, समोर येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला कृष्णधवल अशा दोन बाजू असतात. हे विसरून कसे चालेल! बोर्डाकडून गुणांची खैरात होत्येय, त्या गुणांच्या दानातून फळास आलेली ही पुण्याई आहे, असा काहींचा सूर लागला. एवढे गुण कसे मिळू शकतात, हा प्रश्न विचारतानाच ९० ते ९९ टक्क्यांपेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे विद्यार्थी अन् त्यांना घडवणारे तत्सम घटक प्रज्ञावान असले पाहिजेत. त्यांच्या प्रयत्नांचं हे फलित असेल, तर यांचे हे गुणवैभव गुणवत्तेचे मानबिंदू मानायचे का? वगैरे प्रश्न शंका बनून उत्तरांच्या शोधात भटकत राहिले. त्यांना उत्तरे मिळतील किंवा न मिळतील हा पुढचा प्रश्न, पण व्यवस्थेत विश्वासाच्या जागी संदेह अधिष्ठित झाला एवढे मात्र नक्की. असे प्रश्न विचारणे म्हणजे व्यवस्थेवर अविश्वास आहे, असेही काही म्हणतील. पण हेही सत्य आहे की, कधीकाळी शाळेत ऐंशी-पंच्याऐंशी टक्के गुण मिळवणारे हाताच्या बोटावर मोजता येण्याएवढेच स्कॉलर असत. सांप्रत नव्वद टक्क्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्याच सुमारे अठ्ठेचाळीस हजारापेक्षा अधिक आहे. जर नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणारे एवढे विद्यार्थी शिक्षणव्यवस्थेत असतील तर ते सगळे हुशारच असले पाहिजेत किंवा परीक्षेतील गुणसंपादनाचे कौशल्ये अवगत असल्याने परीक्षातंत्रावर हुकुमत गाजवून आपले लक्ष त्यांनी प्राप्त केले असावे. हे सगळे गुणवान आहेत, असे मान्य केले तर हीच मुले जेव्हा पुढील शिक्षण घेतात तेव्हा नेमके कुठे जातात? त्यांचे शैक्षणिक गुणवत्तेचे अस्तित्व किती उरते? हे बऱ्याच जणांच्या बाबत कळतही नाही. ही गुणवंतांची मांदियाळी या भूमंडळी गुणांच्या वर्धिष्णू आलेखासह नांदताना का दिसत नसावी?

प्रश्न परीक्षेतील गुणांचा असला, तरी त्यासोबत गुणवत्ताही गृहीत धरलेली असते. गुणवान किती? या प्रश्नाला अर्थाचे अनेक पदर असू शकतात. आपण गुण आणि गुणवत्तेची सांगड कशी घालत असतो, यावर ते ठरत असते. या एवढ्या ‘गुण’वानांमधील ‘गुणवत्ता’धारक किती, हा प्रश्न संशोधनाचा विषय असल्यासारखा वाटतो. केवळ गुणांचा डोलारा उभा करून स्वप्नांचे महाल सजत नसतात. ते उभे करण्यासाठी अंगभूत गुणवत्ताच असायला लागते. परीक्षा देऊन गुण मिळवता येतात; पण गुणवत्ता अशा कोणत्याही औपचारिक परीक्षा देऊन मिळवता येत नाही. ती आतूनच उमलून यावी लागते. गुणांचे यश तात्कालिक असते, पण गुणवत्तेचे वैभव दीर्घकाळ टिकणारे असते. गुण विसरले जातत. गुणवत्ता अनेकांच्या अंतर्यामी आपला अधिवास करून असते. म्हणूनच कदाचित समाज अशा ‘गुण’वानांकडून गुणवत्तेची अपेक्षा करीत असतो. आणि समाजाने अशी अपेक्षा करण्यांत काही अप्रस्तुतही नाही.

गुणवत्तेचे मोजमाप करताना यशस्वी डॉक्टर, सफल इंजिनियर अशी परिमाणे कुचकामी ठरतात. ‘यशस्वी माणूस’ हेच मोजमाप यासाठी लावले जाते. शिकून मिळालेली पदवीपत्रे, गुणपत्रे समाजात वावरताना आपण काही गळ्यात घालून फिरत नसतो. मात्र परीक्षेत मिळवलेल्या गुणांतून विचारपूर्वक घडवलेली आणि घडलेली प्रतिमा अन् यातून आकारास आलेलं व्यक्तिमत्व आपल्या सोबत घेऊन समाजात वावरत असतो. जबाबदार माणूस म्हणून जगण्यासाठी आवश्यक असणारी गुणसंपदाच माणूसपणाची खरी गुणवत्ता असते. म्हणूनच समाजाचा एक घटक म्हणून जगताना समाजपरायण विचारांनी वर्तणारे सामाजिक आस्थेचे विषय होतात. उदंड यश मिळवून स्वार्थपरायण मानसिकतेने जगणारे समाजास प्रिय कसे होतील? अर्थात काही म्हणतील, समाजास प्रिय असणाऱ्या गोष्टी करण्यात आम्ही आमच्या आनंदाला का म्हणून तिलांजली द्यावी? आमचंही काही वैयक्तिक जीवन आहे की नाही. जीवन आहे म्हणून जगण्याचे सोहळेही आहेत, ते साजरे का करू नयेत? असं करण्यास कोणाची काहीच हरकत नसते. ते जरूर साजरे करावेत. प्रसंगी त्यांचे उत्सव व्हावेत; पण त्यालाही सामाजिकतेची एक ठसठशीत रुपेरी किनार असायला नको का? सामान्य माणसाकडून सगळंच काही समर्पित भावनेने घडत नाही. तसे सर्वथा संभवतही नाही. पण समर्पणपरिघाच्या प्रारंभबिंदूवर तरी या गुणवानांनी पोहचायला नको का?

परीक्षेच्या गुणपत्रकातील गुणांच्या दर्शनाने अनेकांच्या स्वप्नपूर्तीचे क्षण समिप आले असतील. त्यांची पूर्ती होणे कदाचित नजरेच्या टप्प्यात आले असेल. तसेही गुणांची नव्वदी पार करणाऱ्यांसाठी समाजव्यवस्था नेहमीच फ्रेंडली असल्याचे दिसते. शिक्षणाच्या रुपेरी मार्गाकडे जाणाऱ्या वाटा सगळ्याबाजूने या गुणवानांना अनुकूल असतात. पण गुणांच्या स्पर्धेत टिकू न शकणारे आणि जेमतेम या संज्ञेस जे स्पर्श करते झाले, त्यांचे काय? या प्रश्नाचे कोणते समर्पक उत्तर आपल्या व्यवस्थेकडे आहे? त्यांचे काय? हा प्रश्न तरीही शिल्लक उरतोच. कदाचित यातील बरेच जण परिस्थितीशी समायोजन करीत आपापला छोटासा परगणा तयार करतीलही. त्या परगण्यात परिस्थिती निर्मित झगमगाट नसेल. बऱ्याच गोष्टींचा अभाव असेल, समस्या असतील. पण परिस्थितीच्या वादळ-वाऱ्याशी दोन हात करीत, पाय रोवून खंबीरपणे उभे राहून आपले यश साजरे करतात. त्याचे व्यवस्थेत किती कौतुक घडते? प्रवाहाच्या विरोधात पोहणाऱ्यांचे हे गुणच गुणवत्तेचे गमक आहे, असे समाज मानायला सहजी तयार असतो का? हुशार मुलांच्या पालकांना आयआयटीची स्वप्ने मुलांपेक्षा हल्ली जरा जास्तच येतात. त्या दिशेने जाणारा मार्ग निर्माण करण्यासाठी जीवाचा किती आटापिटा चाललेला असतो, हे पाहून करपलेले बालपण काय असते, याची व्याख्या करायची आवश्यकता नाही. काठावरील यश मिळवणाऱ्याना आपले पथ शोधताना भले आयआयटीची स्वप्ने नसतील येत. आयटीआय हाच यांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग असेल; पण यांचीही समाजाला गरज असते. सगळेच डॉक्टर्स, इंजिनियर्स बनून समाजाचं व्यवहारचक्र चालेलच कसे? समाजाची अशीच काही आवश्यक प्रासंगिक कामे आपल्या हस्तलाघवाने लीलया पार पाडणारे गुणवान नाहीत का?

निकालाच्या दिवशी बहुतेक सगळ्याच शाळांमध्ये गुणवंतांच्या सत्काराचे कार्यक्रम प्रतिवर्षी पार पडत असतात. आम्हीही ते करीत असतो. नव्वदपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या अशा साठ-पासष्ट ‘गुण’वान मुलांचे कौतुक करण्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित केला जातो. तसा तो सगळ्याच शाळा आपापल्या कल्पकतेने आयोजित करीत असतात. अर्थात असे गुणवंत घडवतांना शाळा, शिक्षक, पालक, शिक्षणव्यवस्था अशा सर्वच स्तरावरून केलेले कष्ट, गुणवत्ताधारक व्हावेत म्हणून घेतलेली मेहनतही दुर्लक्षित करता येत नाही. म्हणून कोणी असा आनंद साजरा करत असेल, तर त्यात अप्रस्तुत वगैरे वाटण्यासारखे काही नाही. (यानिमित्ताने का असेना, आम्हा शिक्षकांनाही मिरवून घेता येते अन् आमची शाळा गुणवंत विद्यार्थी कसे घडविते हेही समाजास अभिमानाने सांगता येते ना!) या गुणगौरव कार्यक्रमाला मुलं त्यांच्या पालकांसह शाळेत येतात. मुलांचं कौतुक करताना आम्हालाही शिक्षण या एकाच बिंदूभोवती वर्षभर फिरणाऱ्या घटकांनी केलेल्या कष्टाचे, श्रमाचे फळ मिळाल्याचे समाधान असते.

तरीही मुलांचे अभिनंदन करताना सारखे जाणवते की, बऱ्याच जणांच्या मनात एक खंत असतेच. अजून दोन-तीन टक्के जास्तीचे गुण हवे होते, ते मिळाले असते तर...! वगैरे वगैरे. काही अपवाद वगळल्यास गुणांची नव्वदी पार करणारेही हल्ली संतुष्ट आहेत, असे दिसत नाही. ‘अरे, एवढे गुण तुम्हाला मिळालेत, हे काय कमी आहेत!’ म्हणून सांगावं तर यांचं उत्तर ‘सर, स्पर्धेचा काळ आहे. त्यात टिकायला हवे ना! आणि नुसते टिकून काय उपयोग पुढेही जायचे ना!’ ‘आमच्याकाळी नव्वदी पार करणारा औषधालाही सापडत नव्हता. तरीही आम्ही उभे आहोतच की!’ असे सांगून गुणवत्ता गुणांपेक्षा मोठी असते, हे पटवून देण्याचा प्रयत्न करतो पण... ‘हो, ते सगळं खरंय! तुमचा काळ वेगळा होता. तेव्हा स्पर्धा एवढी तीव्र होतीच कुठे?’ अशी समर्थने मुलं तर करतातच, पण त्यांचे पालकही जे- कधीतरी अशाच पिढीतून घडले, ज्या पिढीत गुणांचे सोपान चढण्यापेक्षा गुणवत्तेची शिखरे संपादित करा, असेच शिकवले जायचे आणि तेव्हा परीक्षेचा निकाल पास की नापास एवढेच विचारायचेत. आता किती टक्के मिळाले, हा प्रश्न असतो. नव्वदपेक्षा कमी गुण असणे म्हणजे जणू काही अपराध झाला आहे. कमी गुण असणाऱ्यांसाठी हे जग जसे काहीच करू शकत नाही. या भावनेतून पालक आपल्या मुलाने, मुलीने आपणास जे वाटते ते आणि तसेच करावे, असे बोलून दाखवतात. हे त्यांना वाटते की, त्यांच्या महत्वाकांक्षाना, माहीत नाही. पण त्यांना असेच वाटते की, स्पर्धा खूप मोठी आहे आणि स्पर्धेत आपल्या मुलांनी काहीही करून टिकूनच राहायला हवे. स्पर्धा कधी नसते. माणूस आदिम अवस्थेत जगत असतानाही ती होतीच. तेव्हा भलेही गुणांची स्पर्धा नसेल, पण जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षात स्पर्धा होतीच. स्पर्धेत तो धावला म्हणूनच तर इहतलावर टिकून राहिला ना! स्पर्धा कालही होती, आजही आहे आणि उद्याही असेलच. ती टाळता येणार नाही. पण दुर्दैवाने ती निकोप राहिली नाही. सगळ्यांना दुसऱ्याला मागे टाकून पुढे जायचे आहे. अशा स्पर्धेत परीक्षेतील गुणांचं घोडं खूप मोठं झालंय आणि जीवनातील गुणवत्तेचं घोडं लंगडतंय.
(क्रमशः)

Haravalele Kahi | हरवलेले काही

By // 4 comments:
‘लहानपणी मी खूप श्रीमंत होतो, कारण पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात माझेपण दोनतीन जहाजे चालायचे. कागदाची का असेनात; मोकळ्या हवेत स्वतःची विमाने उडवायचो. चिखलाचा का असेना; पण स्वतःचा किल्ला असायचा. आता हरवली ती श्रीमंती अन् बालपणही.’ व्हॉट्सअपवर आलेला मॅसेज वाचला. त्यातले शब्द नकळत भूतकाळात घेऊन गेले. मनपटलावरची दृष्ये एकेक करून सरकू लागली. बालपणातल्या हरवलेल्या श्रीमंतीसह पुन्हा एकदा आठवणींच्या हिंदोळ्यावर मन झुलायला लागले. बालपणातील स्मृतींचा जागर घडत राहिला. मनाचा एक कोपरा स्पंदित झाला. ‘लहानपण देगा देवा’ वाक्याचा अर्थ नव्याने लावण्याचा मन प्रयत्न करू लागले. हातून काहीतरी निसटल्याची अस्वस्थता मनाच्या आसमंतात दाटून आली. आठवणींचे मळभ झाकोळून टाकायला लागले. बालपणातला काळ स्मृतींची सोबत करीत नव्याने जागा होऊ लागला. क्षणपळाची गणिते जुळवत काळ चालत राहतो. त्याला कुणासाठी थांबायचं काहीही कारण नसतं. क्षणांमागे क्षण येतात आणि पुढे जातातही. तो वाहत राहतो. प्रवाहासोबत माणसे चालत राहतात. वाढत्या वयाने मोठी होतात. अनुभवाने प्रगल्भ होतात, तशी जाणिवांनीही समृद्ध होतात. जगण्याचे संदर्भ बदलत राहतात. सांसारिक व्यापात आलेल्या जबाबदाऱ्यांची ओझी उचलून कधीही न संपणाऱ्या वाटांनी आपलं स्वतःच असं काहीतरी शोधण्यासाठी चालत राहतात. आपापले पंख घेऊन भराऱ्या घेत राहतात.

जगणं सगळ्यांच्या वाट्याला येत असतं; पण लहान-लहान गोष्टीतून हाती आलेलं संपन्नपण घेऊन जगणं किती जणांचं घडतं? सांगणे अवघड आहे, असे असले तरी ज्याचा-त्याचा विठोबा जसा वेगळा असतो, तशी त्याची भक्तीही वेगळी. आपला भक्तिभाव घेऊन माणसे जगतात. जगणं संपन्न व्हावं म्हणून आपलं स्वप्न शोधण्यासाठी धडपड करतात. या धडपडीत साधेपणाने घडणारं जगणं हातून कधी निसटतं, ते कळतही नाही आणि जेव्हा कळते तेव्हा बरेच पुढे निघून आले असल्याने वळायचे राहून जाते. वयाच्या मर्यादांचे बांध मनाला सीमांकित करून सभोवती बंधनांच्या चौकटी उभ्या करतात. या चौकटींच्या तुकड्यांमध्ये माणसं आपलीच आपल्याला शोधत राहतात. सुखाच्या शोधात वाट चालत राहतात. ‘तुज आहे तुजपाशी’ ही साधीशीच जाणीव विसरून.

‘लहानपण’ या लहानशा शब्दात गतकालीन स्मृतींचे सौख्य सामावलं आहे. जीवनाचा सुवर्णकाळ साकोळलेला आहे. जगाच्या व्यवहारापासून अलिप्त राहून, आपल्याच विश्वात लिप्त राहणारा आणि जे आहे तेच पर्याप्त मानण्याचा तो काळ स्वतःपुरतं एक वेगळंच जग असतं. ऐहिक श्रीमंती नगण्य मानणारा; पण भावनिक श्रीमंतीने भरून वाहणारा. भाववेड्या भावनांनी सजलेला. व्यावहारिक जगापासून कोसो दूर असणारा. सगळ्याच गोष्टीना एक निरामय निर्व्याजपणा लाभलेला. स्वार्थपरायण जगण्यापासून अनभिज्ञ असणाऱ्या आणि आपल्याच विचारविश्वात मग्न असणाऱ्या या लहानग्या जगाचेही संदर्भ काळाच्या ओघात बदलत आहेत. त्यालाही बदलत्याकाळाच्या पाऊलखुणा आपल्या वाटेने चालण्यास बाध्य करीत आहेत. विज्ञानप्रणीत जगाचा संग घडताना निसंग विचाराने वर्तणारे ते निरागस परगणे स्वतःभोवती कोणीतरी दाखविलेल्या सुखाच्या संकल्पित जगण्याच्या चौकटी उभ्या करीत आहे. भौतिक सुखांना प्रगती समजण्याचा मोठ्यांनी केलेला प्रमाद येथेही घडत आहे. ‘मनसोक्त’ शब्दाचा अर्थही बदलतो आहे. हसणे, खेळणे, हुंदडणे, उंडारणे, भटकणे या लहानपणाशी निगडित शब्दांच्या अर्थछटा बालपणातील जगण्यातून निसटून शब्द्कोशातल्या शब्दांच्या अर्थापुरत्या सीमित होत आहेत. काळाच्या बदलत्यासंदर्भांनी आत्मकेंद्रित जगण्याला प्रतिष्ठा मानणाऱ्या विचारांच्या वाटेवर आणून उभे केले आहे. लहानग्यांचे निर्व्याज जगही याला आता अपवाद राहिले नाही.

मागच्याच महिन्यात गावी गेलो होतो. गावातल्या शाळेत माझ्यासोबत शिकलेला सवंगडी भेटला. त्याच्याशी बरचसं इकडचं-तिकडचं बोलणं झाल्यावर ‘तुझी मुलं सध्या काय करतायेत?’ म्हणून विचारले तर म्हणाला, “शहरात त्यांना घर घेऊन दिले आहे. राहतात तेथेच. शिकायला हवे ना! नाहीतर राबराब राबून होतील माझ्यासारखे.” त्याला थांबवत म्हणालो, “अरे, राहू देत त्यांना शहरात. शिकू दे काही नवे, त्याशिवाय आपल्याकडे आहे तरी काय त्यांना द्यायला; पण सध्या उन्हाळ्याच्या सुट्या आहेत ना शाळेला! मग ते गावी नाही आले?” “कशाला येतील? आणि तसेही मीच त्यांना नाही येऊ दिलं! सुट्या शाळांना आहेत; पण क्लासेस, शिबिरे आहेत, जातात त्यांना. शिकतात तेथे काहीतरी नवे. येथे येऊन काय करतील, मातीतच लोळतील ना! त्यापेक्षा आहेत तेथेच बरे आहेत.” एका दमात सगळं कथन करीत आपलंच म्हणणं कसं योग्य आहे, हे तो मला सांगत होता.

तरीही मी तोच विषय पुढं दामटत म्हणालो, “ही काळीमाती आपलं अस्तित्व आहे. या अस्तित्वाच्या मुळांनाच तू उखडून टाकायला निघाला निघालायेस का?” “कसली माती? कसली मुळं? कसलं अस्तित्व? आपल्याकाळी ठीक होतं सगळं. गावाला निदान गावपण तरी होतं. गावातील जगण्याच्या साऱ्या खुणा सोबत घेऊन माणसं साधसंच का असेनात; पण समाधानाने जगत होती तेव्हा. सगळीच नसतील; पण त्यातली थोडी का असेनात होती चांगलेपणाने वागणारी. चुकलो की पाठीत दोन धपाटे घालायलाही कमी न करणारी; पण प्रसंगी माया करणारी. हे सगळं आपलंपणच हल्ली हरवलंय. जमिनीतल्या आटत जाणाऱ्या पाण्यासारखे प्रेमाचे पाझरही आटत चालालेयेत. जो-तो आपापले स्वतःचे जग उभे करून जगतो आहे. स्वतःला त्यातला राजा समजतो. सोबत एक सामाजिक जगही असतं आणि त्यातही माणसाला जगायला लागतं, याचं भान नाही राहिलं कोणाला. आपल्याच दुनियेत हरवलेत सगळे.” मनातला राग त्याच्या बोलण्यातून प्रकटत होता, हातून आपलं काहीतरी निसटत चालल्याची खंत त्याच्या मनाला अस्वस्थ करीत होती. काळजात जपून ठेवलेला आठवणींचा ठेवा हरवत असल्याची वेदना त्याच्या बोलण्यातून नकार बनून प्रकटत होती.

“विसर ते आता सारं! राहू दे, काही माणसं विसरली असतील कदाचित असं साधेपणाने जगणं; पण या मुलांना ते साधसं जगणं समजायला नको का? नदी, नाले, विहिरी, शेतं, गुरं-वासरं, मंदिरे, जत्रा, रीतिरिवाज, रूढी-परंपरांनी समृद्ध असलेलं जगणं सांगितल्याशिवाय आणि स्वतः अनुभवल्याशिवाय त्यांना कळेल कसे काय?” माझ्या मनातील गावपण सोबत घेऊन सजलेल्या आठवणींनी बांधलेला विचार त्याला समजावून सांगतोय. पण मला मध्येच थांबवत म्हणाला “तू काय किंवा मी काय लहान असतानाचा जगलेलो गाव विसर आता. तो भूतकाळ झाला आहे. गावातली नदी, शेते, मंदिरे, शाळा, गावाच्या जत्रा पहिल्यासारख्या राहिल्या आहेत कोठे आता? जत्रा नावापुरत्या उरल्या आहेत. मंदिरातल्या भजनाचे सूर हरवले, नदीचे पाणी आटत गेले, तसे संस्कारही आटत चाललेयेत. अरे, अशात नदीकडे जाऊन पाहा! बाराही महिने वाहणाऱ्या त्या नदीचे डबके झाले आहे. नदी उजाड होऊन दरिद्री झाली; पण तिच्या पात्रातील वाळूने मात्र अनेकांचे भाग्य उजळले. गावात मंदिरे नव्याने बांधली गेली; पण मंदिरात मनास मिळणारी शांतता झगमगाटात हरवली. गाभाऱ्यातला तेवणारा दिवाही हल्ली मलूल वाटायला लागला आहे. गावात पैसा आला, घरे बांधली गेली. मातीची घरे पाडून सिमेंट, विटांच्या सुंदर इमारती उभ्या राहिल्या. घराला लागून असलेले गुरांचे गोठे बदलले; पण गोठ्यातल्या गुरावासरांनी भरलेली श्रीमंती संपली. आता दारासमोर बैलजोडी असणं अजिबात प्रतिष्ठेचे राहिले नाही. ट्रॅक्टर असणं सन्मानाचे झाले आहे. जगण्याचे सारेच व्यवहार जेथे फायद्याच्या गणितांनी ठरत असतील अन् पैशालाच जीव लावण्यात सारे रमले असतील, तेथे या मुक्या जिवांमध्ये कोण जीव गुंतवतो.” त्याच्या मनातला बदलत्या परिस्थितीविषयी असणारा राग काहीकेल्या कमी व्हायचं नाव घेत नव्हता. कदाचित त्याचं बोलणं टोकाचं असेलही; पण तो काय चुकीचं सांगत नव्हता. आम्ही या धावत्या जगात आणखी किती आणि काय काय हरवणार आहोत, कोणास ठाऊक?

लहानपण शब्दाची परिभाषाही सध्या बदलत चालली आहे. लहानपणालाही त्याच्यापुरते प्रतिष्ठेचे वलय लाभते आहे. प्रत्येकाला स्पर्धेत चमकायची घाई झाली आहे. प्रत्येकाला काहीतरी भव्यदिव्य करायची स्वप्ने येतायेत. या चमकणाऱ्या आणि प्रसिद्धी देणाऱ्या काळात कधीकाळी जगलेल्या बालपणाचे संदर्भ हरवले, जगणेही बदलाच्या वाटांनी नव्या वळणावर येऊन उभे आहे. नुसते बालपणच नाही, तर त्यावेळचे मुलांचे खेळणे, पळणे, शाळा सारंसारंच हरवले आहे. स्मार्टफोन हाताळणाऱ्या हातांमध्ये कागदाच्या होड्या अन् विमाने हल्ली शोभतच नाहीत. ते आउटडेटेड झाले आहेत. कागदाच्या का असेनात होड्या करून साचलेल्या पाण्यात सोडायला रस्त्यावर डबकी तर असायला पाहिजेत ना! रस्ते, वाटा पक्या झाल्या. आणि तसाही डबकी भरण्याइतका पाऊस हल्ली येतोच कितीदा? झडीचा पाऊस, संततधार, मुसळधार हे शब्दही मुलांना समजणं अवघड आहे. निसर्गही माणसासोबत बदलतो आहे. त्याचीही बदलण्यासाठी स्पर्धा लागली आहे. तोही स्वतःची ओळख हरवत चालला आहे.

रिमोटवर चालणारी विमाने खेळण्यासाठी हाती आल्याने कागदाची विमाने उडवणार आहे कोण? आणि चिखल-मातीत खेळून हातपाय, कपडे मळवून घ्यायला आईबाप मुलांना उसंत तरी देतात का? दहा सेकंदात हात स्वच्छ करणारे, नव्याण्णव टक्के निर्जंतुक करणारे साबण सोबत असतानाही कोणी चिखलात हात भरून घ्यायला उत्सुक नसतो. ‘दाग अच्छे है!’ म्हणणं जाहिरातीपुरतं ठीक वाटायला लागलं आहे. पण कोणालाही चिखल सोबतीला नको. कपड्यांवर पडलेले चिखलमातीचे डाग हल्ली गावंढळपणा ठरतो. चिखल तुडवीत शाळेत जाण्याचा काळ इतिहास जमा झाला आहे. गावातले रस्ते काँक्रिटच्या झुली परिधान करून टणक बनले आणि त्यावरून चालणाऱ्या माणसांची मनेही तशीच कठोर होत आहेत. मुलांच्या प्रगतिपत्रकातील गुणांची चिंता करणाऱ्या आईबापाना मुलांच्या सहज जगण्याचं चिंतन करायला वेळ आहेच कुठे?

ज्ञानविज्ञानाने माणसांचं जग संपन्न केलं; पण त्यात साचलेपण येत चालले आहे. निसर्गाच्या सहवासात आपणही निसर्गाचेच एक घटक होऊन जगण्याचे दिवस संपल्यात जमा आहेत. असं जगण्यासाठी अंतर्यामी इच्छा असायला लागते, तिच हरवत चालली आहे. निसर्ग समजून घेण्यासाठी कोणतेतरी निमित्त शोधून सहली आयोजित कराव्या लागतात किंवा ट्रेकिंग, समर, विंटर वगैरे गोंडस नावांनी सजलेले कॅम्प आयोजित केले जातात. पैसे मोजून पालक मोठ्या हौसेने मुलांना तेथे पाठवतात; पण पैज लावून टेकडीवर धावत चढण्याचा आनंद दुर्लक्षित झाला आहे. पालकांची नजर चुकवून नदीच्या पाण्यात पोहत राहण्याचा सराव आता नाहीच, कारण स्वीमिंग टँकमध्ये सूर मारण्यात समाधान मानण्याचा या काळात नद्यांमध्ये दाखवायलाही पाणी शिल्लक नसेल, तर तिच्या वाहत्या पाण्यातला सूर कसा सापडेल? पावसाळ्यात बरसणाऱ्या पाण्यात डोक्यावर घोंगडी घेऊन साचलेल्या डबक्यातले पाणी उडवत शाळेत जाण्याची सवय रेनकोटच्या सुरक्षेत हरवली आहे. गावातल्या मातीतले खेळ मातीमोल होत आहेत. क्रिकेट खेळणे प्रतिष्ठित प्रकार झाला आहे. विटीदांडू, भोवरे, गोट्या खेळणारे मागास ठरत आहेत. सूरपारंब्यातला सूरच हरवला आहे. गुरावासरांसोबत सहवासाने सहज निर्माण होणारा जिव्हाळा संपून डिस्कव्हरी, अॅनिमल प्लॅनेट चॅनेलवरील प्राण्यांपुरता कळवळा उरला आहे. माळावरून चरून सायंकाळी घराकडे वासराच्या ओढीने धावत येणाऱ्या गायींचं वासरासाठी हंबरणं दूरदूरपर्यंत ऐकू येईनासे झाले आहे.

निसर्गाचे आविष्कार आजही तसेच असले तरी ते पाहण्यास शाळा, क्लासेसच्या वेळापत्रकामुळे वेळच नाही. काळ्या मातीतले पिकांचे ऋतूमानाप्रमाणे बदलणारे रंग शेतात राहिले; पण मनातून हरवले. गावे ओस पडत आहेत. गावाचा पार सुनासुना झाला आहे. शेतांना अर्थकारण न मानता जगण्याचे कारण मानणारा साधाभोळा शेतकरी स्टेटसच्या चौकटीत बसत नसल्याने दूरवर राहिला आणि त्याच्या जगण्याचे विषय प्रश्नपत्रिकेतील निबंधाच्या विषयापुरते सीमित झाले. शेतं उजाड होत असताना तेथे आपलं भविष्य शोधतो कोण? शेतीच्या मशागतीच्या अवजारांची नावेही माहीत नसणाऱ्या पिढीचा शिबिरांच्या नावाने निसर्गाच्या सानिध्यात रुक्ष संचार घडतोय, तोही शिस्त नावाचं ओझं मानगुटीवर घेऊन आणि या ओझ्यालाच सौख्य मानणाऱ्यांची मांदियाळी वाढतच चालली आहे. असे सगळे घडत असताना सहजपणे उपलब्ध होणाऱ्या श्रीमंतीचे ओझे उचलण्याची ताकदच उरली आहे कोठे? गाव, गावातलं जगणं, गावातली माणसं, गावातली शाळा, गावातले खेळ, गावातले सणवार, संस्कार सारंसारं बदलाची झूल पांघरून आधुनिकतेने मंडित होत आहे. बदलांच्या वाटेने नव्या क्षितिजाला कवेत घेण्यासाठी निघाले आहे.

बदल घडणं कालसंगत असेल, अनिवार्य असेल तर ते जरूर घडावेत; पण त्यासाठी जगण्याच्या सहजपणाचं मोल माणसांनी द्यावं का? सहजपणाने जगण्यातील श्रीमंती विसरून भौतिक सुखांनी निर्मित झगमगीतून आलेल्या श्रीमंतीला संपन्नता मानणं ही वंचना नाही का? बदल असावेत, त्या बदलांनी आलेली भौतिक श्रीमंतीही असावी; पण आपल्या जगण्यातील सहजपणाने आलेल्या श्रीमंतीचं मोल देऊन नाही.