एकांत आणि लोकांत

By // No comments:
काहींना एकांत प्रिय वाटत असेल, काहींना लोकांत आपला वाटत असेल, तर निवडीचे स्वातंत्र्य त्याचेच असते, नाही का? त्याच्यापुरती विशिष्ट विचारधारा निवडून तो वर्तत असेल, तर त्यात वाईट ते काय? तुमच्या विचारांची चाके लावून त्याने पळायला हवं का? माणसांच्या गर्दीत राहणारे सगळेच दर्दी अन् गर्दी टाळून आपणच आपल्याला शोधणारे कोलाहलाची सर्दी झालेले असतात, असं कुणी सांगितलं? कुणी कुठे राहावं, कसं असावं, कसं नसावं, हा सगळा वैयक्तिक निवडीचा भाग. आपल्याच कोशात वास्तव्य करणं ही काही त्याच्या व्यक्तित्वाची पूर्ण व्याख्या नाही होऊ शकत. माणसांच्या गर्दीत राहून माणूसपण आकळतेच असे नाही. गर्दीचा भाग बनून स्वार्थ शोधणाऱ्या बगळ्यांपेक्षा कुठल्यातरी एकांतस्थळी विहरणाऱ्या पाखरांचा पैस अधिक असू शकत नाही का? स्वार्थाच्या परिघाभोवती फेऱ्या करण्यापेक्षा आकाश पंखावर घेण्यासाठी केलेल्या प्रदक्षिणाचे मोल अधिक असते, नाही का?

तसेही माणसांत राहून विकारांपासून विलग होता येत नसेल, तर आपण अलग होऊन आपल्या वर्तुळात विहार करणे अधिक श्रेयस्कर असते. गर्दीत हरवलेला चेहरा शोधण्यापेक्षा, आहे तो चेहरा आणखी देखणा करणे अधिक चांगले नसते का? आपलीच आपण आरास मांडून मखरात मंडित होण्यापेक्षा आस्थेच्या मुक्त रंगात माखणे अधिक मोहात पाडणारे असते. स्वार्थपुरीत विचारांना सामाजिकतेच्या धाग्यांनी विणलेल्या रंगीबेरंगी झुलींखाली झाकून मिरवत राहण्यापेक्षा, आहे ते आणि आहे तसे असणे अधिक देखणे असते नाही? 

तुम्ही कोण, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तुम्ही कसे, ते अधिक मोलाचे असते. एखाद्याची किंमत कुणी कशी करावी, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. असतात ते स्वनिर्मित निष्कर्ष. निष्कर्ष माणूस आंतर्बाह्य समजण्याचे प्रमाण नसते. आणि कुणी तसं समजत असेल तर ते पर्याप्तही नसते. असतं ते केवळ अमूर्त एकक, ज्याला जर-तरचा अध्याहृत अर्थ तेवढा असतो. तसेही सजीवांच्या वर्तनव्यवहारांचे कोणतेच निष्कर्ष अंतिम नसतात. ते परिवर्तनीय असतात. निर्णयाप्रत पोहचण्यासाठी प्रयोग करावे लागतात. काही अनुमान अधोरेखित करावे लागतात. प्रत्येकवेळी ते वेगळे असू शकतात. मग माणूस तरी यास अपवाद कसा? अपवाद आले की, प्रवाद पसरतात. प्रवाद संवादाचे सेतू बनले की, अनुमानांना अर्थ गवसतो. संवादाचे किनारे सुटले की, वितंडवाद उभे राहतात अन् वादाचे प्रवाह दुथडी भरून वाहतात. परिवर्तनप्रिय विचार सौहार्दाच्या गगनात आपलं सदन उभं करतो, हे खरं असलं, तरी परिवर्तनाचा प्रवास म्हणजे काही प्राक्तन नसतं, परिस्थितीने पदरी पेरलेल्या प्रयत्नांचा परिपाक असतो तो, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••

परिभाषा

By // No comments:
शब्दांना अंगभूत अर्थ असतो तसा आनुषंगिक आशयही. काळानेच तो त्याच्या कपाळी कोरलेला असतो. त्यांच्या उच्चाराने विशिष्ट अर्थवाही प्रतिमा मनाच्या प्रतलावरून वाहत राहतात. त्यांचे अर्थ अंतरी अंकित होत असतात. शब्द अक्षरांचा हात धरून चालताना दिसत असले, तरी त्यांचे अर्थ कृतीतून गवसतात. बऱ्याचदा शब्द एक, पण अपेक्षित परिणाम निराळा असतो. अर्थांचे अनेक आयाम त्याला लाभलेले असतात. तेच त्यांचं वैभव असतं अन् तीच त्याची श्रीमंतीही. 'माणूस' हा शब्दही याला अपवाद नाही. एखाद्या शब्दाच्या पाहण्याऐकण्यावाचण्याने मनःपटलावर कोणती आकृती अंकित होईल, हा अनुभूतीचा म्हणा किंवा आकलनाचा भाग. 

माणूस या शब्दाने माणसाच्या मनात माणसाविषयी नेमकी कोणती प्रतिमा मनात निर्माण होते? इहतली अधिवास करणारा प्रगत जीव की, प्रगतीच्या परिभाषा अवगत करून अभ्युदयाच्या आकांक्षा अंतरी कोरून आभाळाएवढा होऊ पाहणारा की, आपल्या ओंजळभर विश्वात आत्मरत असलेला स्वार्थपरायण जीव? की यापेक्षा आणखी काही. शब्दांना अंगभूत अर्थ असतो. ती केवळ अक्षरांची जुळवाजुळव नसते. बरे-वाईट-चांगले-ठीक वगैरे अशा काही अर्थांच्या आकृत्या मनात उभ्या करीत असले, तरी त्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रतिमेचे अर्थ सार्थपणे समोर येतीलच असं नाही. शब्द स्वतंत्र असतील किंवा वाक्यांच्या समूहात, सर्वकाळ त्यांचे अर्थ सुयोग्य असतीलच असं नाही. त्यात काही सोयीच्या वाटा असतात. संदेहाची काही वळणे असतात. माणूस म्हणून आपण अशा शब्दांना किती समजून घेतो? माणूस माणसाला समजून घेतो की, भाषेचे किनारे धरून वाहत आलेला केवळ एक शब्द म्हणून पुढ्यात पडलेल्या शब्दांचे अर्थ लावतो. की याहून आणखी काही कंगोरे त्याच्या कृतीला असतात? अगदी ठामपणे काही सांगता येणं अवघड. माणूस या शब्दाची सुनिश्चित परिभाषा असली, तरी तो अथपासून इतिपर्यंत कोणाला आकळला आहे? अद्याप तसा कोणी दावा करत नाही. तसं असतं तर माणूसच माणसाला सगळ्यात बदमाश प्राणी वगैरे असल्याचं म्हटला असता का? माणूस मुळात प्रश्नांच्या संगतीत अन् संदेहाच्या पंगतीत विहार करणारा जीव आहे. त्याच्या जगण्याची सूत्रे अन् आयुष्याची समीकरणे सांगता आली, तरी ती सोडवता येतातच असं नाही.    

भाषेतील एक शब्द म्हणून किती सुगम वाटतो नाही माणूस हा शब्द! पण त्याचा तळ गाठताना त्याचं अथांग असणं आकळतं अन् विस्तारला समजून घेताना अफाट असणं कळतं. तो सहजगत्या कळला असता, तर त्याच्याभोवती संदेहाचे एवढे धुके जमा झाले असते का? माणूस या शब्दाची व्याख्या काही असू द्या. ती त्या शब्दाला अन् त्याभोवती असणाऱ्या संदर्भांना केवळ निर्देशित करेल; पण सभोवती साकळलेला संदेह सोडता नाही येत. शक्यतांच्या परिघात त्याला पाहता येणं संभव असलं, तरी त्या पलीकडे आणखी काही काकणभर उरतं. त्याच्या असण्याचा लसावि काढता येणं अवघड. 

माणूस हा शब्द व्याकरणाच्या परिभाषेत सामान्यनाम निर्देशित करणारा असला, तरी माणूस म्हणून जगणारा प्रत्येक माणूस स्वतःला असामान्य समजतो. असलेच काही अपवाद अन् ते वगळले तर इहतली अधिवास करणाऱ्या माणसांना आपण असामान्य असल्याचा अवकाळी साक्षात्कार अनवरत अथवा अधूनमधून होत असतो. आपण असामान्य वगैरे आहोत असं वाटून घेऊ नये असं नाही. पण त्या असामान्यत्वाला किमान काही अर्थ असावेत की नाही. आपण कोणी काहीतरी वेगळे आहोत ही अंधश्रद्धा अंतरी अधिवास करून असणे आत्म्याला संतुष्ट करणारं असलं, तरी माणूस म्हणून विचारांना पुष्ट करणारं नसतं. 

माणूस हा केवळ एक शब्द नाही. त्यासोबत अनेक शक्यता, अनंत अपेक्षा चालत येतात. असंख्य आडाखे आणि आराखडे त्यात अनुस्यूत असतात. या शब्दाची व्याकरणातील जात कोणतीही असो. संदर्भ काय असतील ते असोत अथवा कोशातले अर्थ काही असोत, या काहीच्या यापलीकडे तो आणखी काहीतरी असतो, हेही खरेच. अर्थात, धांडोळा घेतलेल्या सगळ्याच गोष्टी काही अर्थाच्या परिघात नाही सापडत. त्याच्या असण्यानसण्याचे अनेक कंगोरे असतात. त्याभोवती काही वलये असतात. याचं विस्मरण व्हायला नको. इहलोकी नवलकथांची कमी नाही. माणूस आणि त्याचं असणंसुद्धा अनेक शक्यता घेऊन नांदणारी एक कथा आहे, असं म्हटलं तर अतिशयोक्त ठरू नये. माणूस म्हणून त्याचं असणं माणसाला अवगत असलं, तरी तो आकळतोच असं ठामपणे सांगता येत नाही, याचं कारण हेच असावं बहुदा. 

आयुष्याचे अर्थ शोधता शोधता कित्येक शतकाचं अंतर पार करून माणूस वर्तमान वळणावर येऊन उभा आहे. मोजलेच तर महिने दिवसांची संख्या लक्षणीय असेल, हे निर्विवाद. तास, मिनिटे, सेकंदाच्या हिशोबात तर डोळे विस्फारून पाहण्याइतके अंक मोठे असतील. चारदोन वळणे ओलांडून आला, याचा अर्थ त्याला आयुष्याचे सगळेच अर्थ आकळले असं नाही आणि अन्यांना त्याचे अन्वयार्थ लावता येतीलच असंसुद्धा नाही. अर्थात, हे सगळं सगळं खरं असलं, तरी संख्यात्मक उंची म्हणजे आयुष्याच्या यशाची परिमाणे नसतात. नियतीने म्हणा अथवा निसर्गाने, तुमच्या पदरी पेरलेले क्षणच खरे, बाकी सगळी जुळवाजुळव असते. हे जोडणं अन् तोडणंही सोयीच्या व्याख्या घेऊन असतं. वय वाढत जातं, तसे अनुभव आयुष्यात घ्याव्या लागणाऱ्या निर्णयांना परिपक्वतेकडे नेत असतात. इहतली जीवनयापन करताना झेललेले उन्हाळे, पावसाळे तुमच्या प्रवासाच्या कहाण्या सांगत असतात. ह्या कहाण्याही प्रत्येकाच्या निराळ्या अन् प्रत्येकासाठी वेगळ्या. कोणाच्या आयुष्यात कोणते अध्याय लिहले जातील अन् खोडले जातील, हे कोणी अन् कसे सांगावे? कदाचित काळच त्याची अक्षरे आयुष्यपटावर कोरत असेल.

हाती लागलेल्या ओंजळभर मोहरलेपणाला सौख्याचे क्षण गंधभारित करत असतात. फक्त तो परिमल पदरात साकळून घेता यावा. ऋतू आपल्या मार्गाने चालत येतात, रमतात दोनचार दिवस अन् निघून जातात आपल्या वाटेने, कोणताही मोह मनात न ठेवता. त्याचं येणं जेवढं स्वाभाविक, जाणंही तेवढं सहज. त्यांना या म्हणून कोणी आवतन देत नाही अन् आले की, राहा आणखी चारदोन दिवस जास्तीचे म्हणून थांबवूही शकत नाही. तो नियतीने निर्धारित केलेला मार्ग नसतो, तर निसर्गाने आखून दिलेला पथ असतो. निसर्ग हस्तक्षेपाशिवाय विचलित नाही होत. निर्धारित मार्गाने क्रमण करीत राहणे त्याचं प्राक्तन नसतं, तर परिपाठ असतो. त्याच्या प्रवासाच्या सुनिश्चित व्याख्या करता येत असल्या, तरी पथ नाही बदलता येत कुणाला. 

ऋतू कूस बदलून नव्या वळणावर विसावताना आपल्या अस्तित्वाच्या काही खुणा वाटेवर कोरून जातात. त्यांचा माग काढत माणूस पळत राहतो. पुढे पळणाऱ्या प्रत्येक पावलांना मुक्कामाची ठिकाणे गवसतातच असं नाही. संक्रमणाचं बोट धरून पुढे निघताना ऋतूंनी मागे ठेवलेल्या ठशांचे अर्थ आकळायला आधी आपल्या असण्या-नसण्याचे आयाम अवगत करून घ्यायला लागतात. आयुष्य अशाच प्रयत्नांना दिलेलं नाव आहे. म्हणूनच प्रयत्नांच्या परिभाषा त्यातल्या कंगोऱ्यांसह समजून घ्यायला लागतात. पण सत्य हेही आहे की, प्रयासांच्या परिभाषा प्रत्येकवेळी सफल व्हाव्यात असं नसतं. कधी प्रमाद घडतात, कधी पदरी पडलेली परिस्थिती प्रयत्नांच्या व्याख्या लेखांकित करीत असते. प्रमादांची पावले घेऊन चालत आलेल्या दुःखाबाबत एकवेळ समजून घेता येतं. एक मानसिक तयारी असते, त्यासाठी करून घेतलेली. पण परिस्थितीच पराभव ललाटी गोंदवून जात असेल तर...? 

अशावेळी पहाडाला धडका देण्याशिवाय माणूस करूही काय शकतो? पण एक नक्की की, आयुष्याला अर्थ देता येतात. ते देण्याएवढी प्रगल्भता तेवढी विचारांमध्ये नांदती असायला हवी. विचार तर सगळेच करतात, पण त्यांचं प्रयोजन कृतीत किती जण शोधतात? विचारांचं वैभव कळलं की, कृतीचे संदर्भ सापडत जातात. लढून उभं रहायची उमेद अंतरी नांदती असेल तर त्यासाठी माथा फोडून घ्यायची तयारी असायला लागते. नसेल तर परिस्थितीत परिवर्तनाची प्रतीक्षा करण्याशिवाय आणखी विशेष काही करता येतं? समजा करता आलं तरी ते प्रत्येकवेळी सफल असेलच असं नाही आणि झालं तरी पर्याप्त असेलच असं नाही. प्रमाद कुणाचा, प्रयास कुणाचा, यश कुणाचं, अपयश कुणाचं, हे अवश्य शोधता येतं. सांगताही येतं, पण प्रत्येकवेळी पराक्रमाची अन् पराभवाची सम्यक कारणमीमांसा करता येतेच असंही नाही. कारण त्यांच्या परिभाषा प्रत्येकवेळी वेगळ्या असतात अन् प्रत्येकासाठी निराळ्या असतात, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण  
••

झोका

By // No comments:
तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात. फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. कोमल किरणांच्या वर्षावात नाहतात. चंद्राच्या प्रकाशात मनातलं गुज कथन करीत राहतात. चांदण्यांच्या सोबत बोलत बसतात. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित, स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत राहतात. त्यांचा उगवणारा दिवस आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात. अलगद पावलांनी धरतीवर चालत येणारा अंधार कधी मनात उगीचच काहूर उठवतो. संधिप्रकाशाचा हात धरून मावळतीच्या क्षितिजावर रंगांनी केलेली उधळण मनात आस्थेचे हवेहवेसे रंग भरते. अंतरी दाटून आलेल्या अनामिक काळजीने कधी कातरवेळा काळीज कोरत राहतात.... हो, खरंय! हे सगळं वेडं असल्याशिवाय कळत नाही अन् घडतही नाही. असं वेडं सगळ्यांना होता येतंच असं नसतं अन् वेडेपणातलं शहाणपण अवघ्याना आकळत असतं असंही नाही. या विश्वात विहार करणाऱ्यांची जातकुळीच वेगळी असते. ना तेथे मर्यादांचे बांध बांधता येतात, ना विस्ताराला सीमांकित करणारी कुंपणे घालता येतात. म्हणून ते वेडेच...! तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी आणि दोघे एकमेकांसाठी.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने अंतरी उतरवत मनाच्या गाभाऱ्यात कधी कोंडून ठेवलं... काहीच आठवत नाही... प्रारंभ नेमका कुठून आणि कुणाकडून झाला, शोधूनही उत्तरे हाती नाही लागत. मग घडलंच कसं हे सगळं? असा कुठला क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा. अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी. असे कोणते बोल होते, एकच गीत गाणारे. असा कोणता नाद होता, जो एकच तराणा छेडीत होता. नाहीच सांगत येत. पण कुठल्यातरी चुकार क्षणी हे घडले आणि त्यांचे प्रत्येकक्षण आसुसलेपण घेऊन प्रतीक्षेच्या तीरावर संचार करीत राहिले...

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. प्रेम परगण्यात विहार करायला कसली आलीयेत वयाच्या मर्यादेची वर्तुळे. उमलतं वयचं वादळविजांचं. या स्वप्नाळू वयाच्या आसपास दोघेही... नवथर संवेदनांचे पंख लेऊन आभाळ आपल्याला आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत राहतात. तसं हे वय झोपाळ्यावाचून झुलायचे. दोघेही झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहतात. आभाळ त्यांना खुणावतं. वारा धीर देत राहतो. मनाच्या गाभाऱ्यात लपलेल्या संदर्भांचा शोध घेता घेता मनं कधी बांधली जातात, कळतच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं. वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना संथ वाहणे कसे रुचेल? मनात विसावलेल्या वेगळ्या वाटेची वळणं निवडून धावतात तिकडे. रमतात. जगाच्या गतिप्रगतीच्या परिभाषांपासून कोसो दूर भावनांच्या रिमझिम वर्षावात चिंब भिजत. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचा कोलाज शोधत राहतात...

तो आणि ती... एक पूर्ण वर्तुळ. की फक्त एक मात्रा आणि एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित करता येणारी वर्णमालेतील अक्षरे. काहीही म्हणा, त्याने असा कोणता फरक पडणार आहे.... पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर आतापर्यंत अशा किती गोष्टी हरवल्या असतील आणि गवसल्याही असतील, माहीत नाही. हा खेळ काळ किती काळापासून खेळतो आहे, ते त्यालाही अवगत नसेल कदाचित. इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या त्याच्या तुकड्यांनाच ते विचारता येईल. पण त्याला ते सांगता येईलच याची शाश्वती नाही. वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, जिंकलेले आणि हरलेले... असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले. काही कायमचे हरवले, काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण वास्तव हेही आहे की, सगळ्यांच्या ललाटी पुन्हा प्रकाशण्याचे प्राक्तन नियतीने पेरलेलं नसतं, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
••

असंच का?

By // No comments:
एखादा कोणी असाच का वागतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. गवताच्या गंजीत सुई शोधण्याचा प्रकार म्हणा हवं तर याला. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून काही गोष्टी कोणी काळाच्या ओटीत टाकून देतो. कुणी फारसे महत्त्व नाही देत अशा काही गोष्टींना. काहींना काहीच कर्तव्य नसते काही गोष्टींशी. पण काहींना कारण नसताना खोदकाम करायची सवय जडलेली असते. कुदळ हाती घेऊन तयारच असतात ते. अर्थात, अशा वागण्यातून त्यांच्या हाती काय लागते, त्यांनाच माहीत. पण दिसलं कुठे थोडं काही न्यून की, कर आणखी गाजावाजा, असा स्वभावच असतो काहींचा. हे चूक की बरोबर, याच्याशी काही एक देणे-घेणे नसते त्यांना. छिद्रान्वेषीवृत्ती एकदा का विचारांचा भाग बनली की, विस्तीर्ण आभाळाच्या निळाईतही व्यंग दिसतं, झुळझुळ वाहत्या पाण्याचा नादही कर्कश वाटतो, वाऱ्याचा आल्हाददायक गारवाही झोंबतो अन् पक्षांचा गाता गळाही कुरूप वाटतो. एखाद्याला नकाराचं लेबल लावायचं ठरवलं की, किमतीचे टॅग क्षुल्लक वाटायला लागतात हेच खरं. अशा संकुचित मानसिकतेने वागणाऱ्यांच्या हाती कुठल्या आंतरिक समाधानाचे स्रोत लागतात, त्यांनाच ठाऊक. 

कुणाच्या वागण्याच्या पद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे आकळतोच असं नाही. खरंतर माणूस दिसतो तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि असायलाच हवा, असंही नसतं काही. तो माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, असं काही नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला गजबटाला टाळून. एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. 

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या कक्षेत तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का? 

- चंद्रकांत चव्हाण
••