असंच का?

By
एखादा कोणी असाच का वागतो? या प्रश्नाचे उत्तर शोधणे अवघड आहे. गवताच्या गंजीत सुई शोधण्याचा प्रकार म्हणा हवं तर याला. व्यक्ती तितक्या प्रकृती म्हणून काही गोष्टी कोणी काळाच्या ओटीत टाकून देतो. कुणी फारसे महत्त्व नाही देत अशा काही गोष्टींना. काहींना काहीच कर्तव्य नसते काही गोष्टींशी. पण काहींना कारण नसताना खोदकाम करायची सवय जडलेली असते. कुदळ हाती घेऊन तयारच असतात ते. अर्थात, अशा वागण्यातून त्यांच्या हाती काय लागते, त्यांनाच माहीत. पण दिसलं कुठे थोडं काही न्यून की, कर आणखी गाजावाजा, असा स्वभावच असतो काहींचा. हे चूक की बरोबर, याच्याशी काही एक देणे-घेणे नसते त्यांना. छिद्रान्वेषीवृत्ती एकदा का विचारांचा भाग बनली की, विस्तीर्ण आभाळाच्या निळाईतही व्यंग दिसतं, झुळझुळ वाहत्या पाण्याचा नादही कर्कश वाटतो, वाऱ्याचा आल्हाददायक गारवाही झोंबतो अन् पक्षांचा गाता गळाही कुरूप वाटतो. एखाद्याला नकाराचं लेबल लावायचं ठरवलं की, किमतीचे टॅग क्षुल्लक वाटायला लागतात हेच खरं. अशा संकुचित मानसिकतेने वागणाऱ्यांच्या हाती कुठल्या आंतरिक समाधानाचे स्रोत लागतात, त्यांनाच ठाऊक. 

कुणाच्या वागण्याच्या पद्धतीवरून एखादा माणूस पूर्णपणे आकळतोच असं नाही. खरंतर माणूस दिसतो तसा असेलच असं नाही आणि असेल तसा वागेलच, याची शाश्वती नाही. तो वाटतो तितका प्रत्येकवेळी निर्व्याज, नितळ, निखळ वगैरे असेलच असं नाही आणि असायलाच हवा, असंही नसतं काही. तो माणसांच्या घोळक्यात सतत वावरत असेल, म्हणून लोकप्रिय आणि माणसांना टाळत असेल तर आत्मकेंद्रित, असं काही नसतं. त्याचं तसं वागणं कदाचित प्रासंगिकतेचा परिपाक असू शकतो अथवा तसं असणं परिस्थितीनिर्मित असू शकतं. काहींना सगळ्याच गोष्टीत चार हात अंतर राखून राहण्यात आवडतं. काही मर्यादांची कुंपणे कोरून घेतात भोवती. काहींना आपली वर्तुळे सुरक्षित वाटतात. काही पलीकडे जाऊन डोकावून येतात. तर काही मर्यादांची सूत्रेच नव्याने शोधून आणतात. कुणाला माणसांचा राबता आसपास असण्यात आनंद गवसतो, तर कोणाला गजबटाला टाळून. एखादा माणसांच्या कोलाहलापासून पळायला लागला की, त्यावर माणूसघाणा असल्याची मोहर ठोकून आपण मोकळे होतो. 

निकषांच्या लहानमोठ्या मोजपट्ट्या घेऊन काही तयारच असतात, केव्हा याच्याभोवती आपल्या मापाच्या दोऱ्या गुंडाळतो म्हणून. आपल्या खुजेपणाच्या पट्ट्या लावून कोणी कोणाची तरी उंची काढू पाहतो. समजा तुमच्या विचारांच्या कक्षेत तो नसेलही सामावत, म्हणून त्याचं असणं तसंच असतं, असं कोणी सांगितलं? तुमच्या स्वयंघोषित परिमाणात तो सामावयालाच हवा का? सदासर्वकाळ माणसांच्या कोलाहलात माणसांनी आपले आवाज मिसळून बोलावं, वागावं असं काही असायलाच हवं असं नाही. सामूहिक आणि वैयक्तिक मानसिकतेत अंतराय असतं, हे मान्य करायला संदेह असायलाच हवा का? 

- चंद्रकांत चव्हाण
••

0 comments:

Post a Comment