परिभाषा

By // 2 comments:
काही माणसे जन्माने मोठी असतात. काहींवर मोठेपण लादले जाते. पण काही माणसे असेही असतात ज्यांच्या असण्याने मोठेपणाला नवी उंची मिळते. समाजात वर्तताना सामान्यांच्या जगण्याला नवे आयाम देणे, हेच आपलं जीवितकार्य मानणारी माणसे समाजासाठी आस्थेचं लेणं असतात. भरकटलेल्या गलबतांना किनारा सापडावा म्हणून दीपस्तंभ बनून कार्य करणाऱ्यांची जातकुळीच वेगळी असते. परिस्थितीपरिवर्तनाची मशाल हाती घेऊन, वंचितांच्या वेदनांना समजून घेत; अनवरत संघर्ष करीत असतात ते परंपरागत मिरासदारी या संज्ञेला अपवाद असतात. सर्वसामान्य घरातला कोणी एखादा स्वकर्तृत्त्वाने सेवापरायणतेची शिखरे निर्माण करू शकतो. शोधलंच तर अशी अनेक माणसे आसपास नजरेस येतील. पण त्यासाठी पाहणं नाही, शोधणं घडावं लागतं. प्रतिकूल प्राक्तन घेऊन नांदणाऱ्यांच्या प्रांगणी प्रसन्नतेचा परिमल पसरत राहावा म्हणून प्रयत्नरत राहताना फकिरीही प्रमुदित अंतःकरणाने स्वीकारणारे कशाचीही फिकीर करत नाही, तेव्हा कुबेर शब्दाचा खरा अर्थ आकळतो.
 
परंपरांच्या चौकटी मोडीत काढून परिघाबाहेर पाऊल टाकल्याशिवाय वेगळे साहस सहसा घडत नाही. मनात ध्येयवेडी स्वप्ने उदित झाल्याशिवाय आकांक्षांची क्षितिजे खुणावत नाहीत. क्षितिजांच्या कमानी काळजात कोरल्याशिवाय नवे परगणेही हाती लागत नसतात. ज्याला परंपरांचा पायबंद पडला, त्याला नवे रस्ते कसे निर्माण करता येतील? परिस्थितीला व्यवस्थेच्या वर्तुळातून शोधून वेगळं केल्याशिवाय विचारांची डूब कळत नसते. पद, पैसा, प्रतिष्ठा मिळाली म्हणून कोणी लागलीच असामान्य नाही होत. आसपास झगमग दिसत असलीच तर तो तात्पुरता प्रकाश असतो. परिस्थितीचा अक्ष बदलला की, उजेडाचे अर्थ बदलतात. अंधाराची सोबत घडताना कवडशांच्या परिभाषा आकळू लागतात अन् आयुष्याचे अर्थ समजायला लागतात. मोठेपण मिरवण्यात नसतं, तर इतरांना मोठं करण्यात असतं. हीच खरी दौलत असते. सार्वजनिक जीवनात तत्त्वांसाठी आग्रही असणारे; पण वैयक्तिक जीवनात निराग्रही असणारे उमद्या मनाचे धनी म्हणूनच सगळ्यांना आपले वाटत असावेत. सेवा माणसांच्या संस्कारीत आयुष्याचे अविभाज्य अंग आहे याबाबत संदेह नसला की मूल्यांच्या व्याख्या देखण्या होतात.

परिस्थितीच्या रखरखत्या उन्हात सापडलेल्यांसाठी आल्हाददायक सावली माथ्यावर धरणारं डेरेदार झाड होता नाही आलं, तर एखादं झुडूप तरी बनता यावं. अभावग्रस्तांच्या आयुष्याचे काठ भरजरी विणता नाही आले, तरी किमान प्रभावाची किनार रेखता यावी. वंचित, उपेक्षितांचे कैवारी म्हणून बिरूद धारण करणे सुलभ आहे; पण हे असिधाराव्रत निष्ठेने सांभाळणे सहज नसते. परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग केल्याशिवाय बदलांना चेहरा गवसत नाही. व्यवस्थेचे ताणेबाणे झेलून आपला बाणा जपणारी माणसं शोधण्यासाठी कणा सलामत असणारी माणसे म्हणूनच आसपास असायला लागतात. ज्यांच्या जगण्याचं प्रत्येक चरण सत्प्रेरीत प्रेरणांच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत घडणारा प्रवास असतो, त्यांना समाजासाठी केलेल्या सेवेचं कौतुक अन् केलेल्या कार्याचं नवल नसतं. कारण, त्यांचं जगणं हीच नवलगाथा असते. 
••

आत्मनिष्ठ जाणिवांचे किनारे धरून वाहणारी कविता.

By // No comments:
संवेदनशील मनाला विचार करायला उद्युक्त करते ती कविता, असं म्हटलं तर कोणतीही कविता आनंदाचं अभिधान असते, तशी अनुभवाचं अधिष्ठानही असते. तिच्यात भावनांची स्पंदने अखंड निनादत राहतात. ती सौंदर्याचा वेध घेत असते. समस्यांवर बोलत असते. वैगुण्यांना अधोरेखित करीत असते. सामाजिक दूरिते पाहून विचलित होत असते. तिचं आकाश मर्यादांच्या परिघात बंदिस्त नसतं. म्हणूनच तिच्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांना मर्यादांच्या चौकटी नसतात. कविता जेव्हा जगणं होते, तेव्हा ती जीवनाविषयी बोलत असते. कविता भावनांचा कल्लोळ असते. भावनांना मुखरित करण्याचं माध्यम असतं. भावोत्कट उद्गार असते. उत्कट अभिव्यक्तीचा हात धरून आलेल्या बाळकृष्ण सोनवणेंच्या कविता अनोखेपण सोबत घेऊन प्रवास करीत राहते, जाणिवांचे किनारे धरून वाहत राहते अन् संवेदनांच्या परिघात नांदते.

या आधी प्रकाशित झालेल्या ‘स्त्री सुक्ताच्या कविता’ (२००७), ‘उजेड गाभाऱ्यातला’ (२०१५) या संग्रहातून बाळकृष्ण सोनवणे वाचकांना अवगत आहेत. काळाची मनोगते घेऊन लेखांकित होणाऱ्या त्यांच्या कवितेला स्वतंत्र चेहरा लाभला आहे. काळाचा प्रभाव झेलून ती आपणच आपल्याला शोधत राहते. सोयीसाठी या कवितांना कोणत्यातरी निर्धारित परिभाषेत अधोरेखित करता येईलही, पण तिचं वेगळं असणं तिच्यापुरती तिची व्याख्या निर्धारित करते. कवीची स्वतंत्र अभिव्यक्ती लेखनाला नवे आयाम प्रदान करते. काळाची सूत्रे सोबत घेऊन निघताना अभिव्यक्तीची प्रयोजने ही कविता शोधत राहते.   
  
कविता प्रकारची व्याख्या काही असू द्या. अंतरी निनादणाऱ्या स्पंदनांची सोबत करीत निघालेली कविता परिभाषेच्या कुंपणात सहसा बंदिस्त नाही करता येत. कविता नुसती कविता असणं पुरेसं असतं का? खरंतर नाहीच. ती सत्यान्वेशी असावीच असावी; पण तिला साक्षात्काराच्या पातळीवर विहरता यायला हवं. अर्थात, आपल्याकडे असणाऱ्या अनुभवांच्या विश्वात नेमकं काय सामावलं आहे, त्यात तिचं असणं असतं. कितीतरी गोष्टी आसपास नांदत्या असतात. काही सहजपणे सामावून जातात जगण्यात. काही अगत्याने सांभाळतो, कारणासह अथवा कारणाशिवाय. जतन करीत राहतो काही आपलं म्हणून, काही निसटते तसेच. ओंजळीतून पाण्याचे थेंब लीलया ओघळून जावे तसे. कवी म्हणतो,
किती जिव्हाळ्याचे असतात
आपले लोभस मिथ्याभास
प्रदीर्घ प्रवासात आयुष्याच्या

अंतर्यामी अधिवास करून असणारी आस एक अस्वस्थ तगमग आयुष्यात उभी करते. ती जगण्याला अर्थ देणारी वाट होते. आठवणींच्या अंधारात विसावलेला भूतकाळ अन् अस्वस्थ वर्तमानाच्या वर्तुळात वेढलेले आयुष्य हरवलेल्या क्षितिजांचा वेध घ्यायला प्रेरित करते. भविष्याच्या पटलावर दिसणारे आस्थेचे कवडसे वेचायची उमेद जागती ठेवते. व्यवस्थेच्या वर्तुळात वर्तताना घडणारी वंचना, आयुष्याच्या चौकटींना संकुचित करणारी विषमता, आकांक्षांचे परीघ शोधतांना प्रत्ययास येणारा अपेक्षाभंग, पावलागणिक गडद होत जाणारी जीवनाची दाहकता, विचारात विसावलेली दुरिते, जगण्याची गणिते अन् आयुष्याची सूत्रे ही कविता शोधू पाहते. आस्थेचे अनुबंध मनावर कोरून आयुष्याला भिडू पाहते. कवी म्हणतो,
चेतव तुझ्या उजेडाची वात
मातीत दरवळतील
गंधभारले श्वास
मार्दव अस्तित्वाने
जुन्या दुःखाचे दिवे
पाऊस पंखांचा
वारा श्वासाश्वासागणिक
अंगागावर
गोंदवून घेईन
मी

काळाचा हात धरून आलेल्या प्रश्नांना भिडणारे साहित्य वाचकाला आपले वाटत असते. अनुभवांचे संचित हाती देऊन काळ पुढे निघतो. वळताना मागे काही प्रश्न ठेऊन जातो. काळाने समाजजीवनावर ओढलेल्या ओरखड्यांचा शोध साहित्यिक घेत असतो. परिस्थितीने पुढ्यात मांडलेल्या गुंत्याची उकल करू पाहत असतो. समूहाची विखंडीत स्वप्ने अधोरेखित करणारी साहित्यकृती व्यवस्थेने नाकारलेल्या उत्तरांचा शोध घेत असते. काळाचे किनारे धरून ती पुढे जात असते. अंतर्यामी अधिवास करणाऱ्या अस्वस्थपणाला घेऊन ही कविता विहार करीत राहते. बदलता आसपास, मूल्यांचा अवनतीकडे होणारा प्रवास समजून घेण्याचा प्रयत्न करते. स्वतःला मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त न करता, आपला मार्ग निवडून आसपास घडणाऱ्या घटितांचे चिंतन करत चालत राहते. कवी म्हणतो,
परिघाबाहेरच्या अंधाराला
घातला नाही वळसा
त्याच्या जखमांनी होऊन विद्ध
चेतवले रान
कवितेतून माझ्या

कवीच्या विचारांत समतेची, समन्वयाची  स्वप्ने सजलेली आहेत. स्वातंत्र्याचे अर्थ त्यांना अवगत आहेत अन् त्याचं मोलही ठाऊक आहे. स्वप्न आणि साध्यापर्यंतच्या प्रवासात अनेक व्यवधाने असल्याचे सजग भानही त्यांना आहे. ते म्हणतात,
गदगदून मनाच्या फांदीवर
औपचारिक विवशता
फेकून देत वाऱ्यावर
ठेवतो डोळे उघडे
माझ्या स्वप्नांना
फुटतात धीराचे अंकुर 

संवेदनांच्या प्रतलावरून प्रवाहित होताना घडणारा सर्जनाचा प्रवास प्रारंभ असतो नव्याचा. आत्मशोधाच्या वाटेने शब्दांशी सख्य साधत घडणारी भटकंती असते. कविता त्या वाटेवरचं माध्यम होत असते. आसपास घडणाऱ्या घटनांचे पडसाद निर्मितीचं प्रयोजन असतं. त्यात अनेक स्तर सामावलेले असतात. कविता वैयक्तिक असते, तेवढीच सार्वजनिक. पण त्यासाठी जाणिवांचं भान असायला लागतं. जगण्यावर आघात करणाऱ्या, अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या प्रश्नांवर कवीने बोलत राहायला हवं अन् प्रश्नांना कवितेने मांडत राहायला हवं. म्हणून कवी म्हणतात,
पाहवत नाही
कुठं दूर पांगत निघून जात आहेत
या पांगळ्या होत जाणाऱ्या
कातर कातर
निराधार मना माणसांच्या
सुरकुतल्या सावल्या
ज्यांच्या जगण्यावर तरारत आहेत
वेदना आणि वंचनेचे निखारे
   
काळाने कोरलेल्या प्रश्नांची जाणीव या कवितात असली, तरी तिला अनेक पदर आहेत. ते केवळ वैयक्तिक नाहीत. संवेदनांना वेदनांचे अर्थ कळले की, त्यांना वैश्विक परिमाण प्राप्त होत असतं. आयुष्यावर अनेक अंगांनी आघात होत असतात. ओंजळभर अस्तित्वालाच ते आव्हान असतं. त्याचे पेच असतात. ते पकडता आले की, स्वप्नांचे प्रदेश अन् वास्तवातल्या जगाची अंतरे आकळत जातात. कोलाहलात हरवलेल्या आवाजांना अर्थ असल्याची जाणीव होऊन शब्दांना अनुभूतीचे आयाम लाभतात. कवी अनुभूतीच्या प्रतलावरून प्रवास करताना कवडसे वेचून आणण्याची नितळ स्वप्ने पाहताना म्हणतो,
मी पहातोय
स्वप्न अम्लान
लावतो दिवा ज्याला येत नाही
काजळी तेजाळताना
श्वासतो तुला
येवून आश्रयाला

बाळकृष्ण सोनवणेंची कविता माणसांभोवती फिरते. जगण्यावर, वागण्यावर, आचार-विचारांवर बोलते, तशी वैगुण्यांवरही बोट ठेवते. जगण्यातल्या समस्यांना अधोरेखित करते. माणूस म्हणून माणसांच्या आशा-निराशांच्या विश्वात विहार करते. इहतली लाभणाऱ्या सुखांच्या केंद्रस्थानी माणूस आहे, नव्हे तो असावाच म्हणून आग्रही होते. आश्वस्त भाव जागा ठेवते. जीवनाची अनेक रुपे समर्थपणे मांडते. आसपासच्या अनुभवांना वेचत, वेदनांना वाचत अन् संवेदनांना अधोरेखित करत भावनांना दिलेलं शब्दांचं कोंदण त्यांच्या कवितेतील आशयाला प्रभावी आणि प्रवाही बनवते. ती मनाचा तळ शोधू पाहते.
कोसळकोसळ नुसता
कोसळत असतो पाऊस धुवाधार
संवेदनाविहीन
जाणीव एकच
दिवसा उजेडी अंधारलेले सारे

दु:ख, दैन्य, वंचना, उपेक्षा, समस्यांना मुखरित करण्याचा प्रयत्न संवेदनशील साहित्यिक करत असतो. जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष माणसांचे अटळ भागधेय असतं. कवीचं जगणं याला अपवाद असेल अथवा नसेल. कदाचित आसपासच्या सजग आकलनातून तसे लिहिता येईलही, पण कसदार कविता अपवादाच्या व्याख्येत नाही बसवता येत. काळोखाच्या कातळावर काव्यतीर्थे कोरण्याची कवीच्या अंतर्यामी असणारी आस साक्षात्कार बनून प्रकटते. प्रश्नांची दाहकता दृगोचर होत जाऊन संवेदनांना ओलावा लाभतो. संवेदनांचे किनारे धरून सरकणारे शब्द अंतरी अधिवास करून असणाऱ्या ओलाव्याला शोधत राहतात. वैचारिक स्थित्यंतर ही कविता घडवू पाहते. प्राप्त परिस्थितीवर भाष्य करते.
मी सहन करतोय
जगण्यातली दाहकता
जी खच्चून भरलीय
सुपीक भोवतालात माझ्या

काळ विचारांचं केंद्र असतं. विचारांचं नातं संवेदनांशी असतं अन् संवेदनांची सोयरिक सर्जनाशी. विचार परिवर्तनीय असतात. त्याचे पडसाद जगण्यात जाणवतात. साहित्य त्यावर भाष्य करीत असते. असण्या-नसण्याचे प्रश्न गुंता घेवून येतात. संवेदनांचा धागा पकडता आला की, अभिव्यक्तीला नवे आयाम लाभतात. जगण्याच्या प्रेरणा सर्जनाला आकांक्षांचं आभाळ आंदण देतात. आत्मशोधाच्या वाटेने वळती झालेली पाऊले भावनांच्या प्रदेशांपर्यंत पोहचली की, जगण्यापासून कविता दुरावत नाही. वेदनाच जगण्याचे ग्रंथ झाल्या की, शब्दांना परिभाषा शिकवायची आवश्यकता नसते. लिहित्या हातांना भावनांचा तळ गाठता आला की, तो केवळ अनुभव नाही राहत. सहजाविष्काराची विलक्षण अनुभूती घेऊन प्रकटणारी बाळकृष्ण सोनवणेंची कविता तरी याला कशी अपवाद असेल?
••

संयम

By // 1 comment:
कोण कुठल्या कारणांनी ओळखला जावा याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. असली तरी ती पर्याप्त असतीलच असं नाही. सगळ्याच गोष्टीना आकलनाच्या कुंपणात सीमित नाही करता येत. एखाद्याचं असं अथवा तसं असणं-नसणं त्या त्या वेळेचा म्हणा किंवा परिस्थितीचा परिपाक असतो. जगण्याशी निगडित बऱ्याच गोष्टींवर या ना त्या कारणाने प्रासंगिकतेची पुटे चढलेली असतात. थोडक्यात, शितावरून भाताची परीक्षा सर्ववेळी करता येतेच असं नाही. कोणी काळाच्या कातळावर कोरलेल्या कर्तृत्त्वाने ओळखला जातो, कुणी केलेल्या विधायक कामांनी, कुणी अंगीकारलेल्या भूमिकांनी, तर कुणी विसंगत वर्तनाने, कुणी आणखी कशाने. पण कुणी चहा पिण्यासाठी माहिर असल्याचे म्हटलं तर... मनात विचार येईल, काहीतरीच काय हे! असं काही असतं का कुठे? असू शकतं! त्यात अशक्य, असंभव असण्यासारखं काही आहे असे नाही.

व्यवहार सुव्यवस्थितपणे पार पाडता यावेत म्हणून व्यवस्थेने काही नियम ललाटी कोरून घेतलेले असतात. असं असलं तरी व्यवस्थानिर्मित वर्तुळात अपवादही नांदते असतात. काही सत्ये चिमूटभर असली तरी सार्वकालिक असतात हेच खरं. नियम आणि अपवादही त्याच परिघातले प्रवासी. प्रघातनीतीच्या चौकटी नाकारणारं असलंच कुणी, तर त्याला साच्यात सामावून घेण्याचे प्रयास होतच असतात. अपवादांना व्यवस्थेच्या मापात बसवण्याचा प्रयोग होतच असतो. एखाद्या गोष्टीबाबत परिमित प्रमाणापलीकडे एखाद्याचा प्रवास होत असेल तर व्यसन वगैरे म्हणेल कोणी. तसं म्हटलं म्हणून काही व्यसनाधीनतेची मोहर जगण्यावर अंकित नाही होत अन् कुणी समजत असेल तसं तर त्यात आक्षेप घेण्यासाठी फार मोठे कारण आहे असंही नाही आणि यात कुणाचा अधिक्षेप वगैरे होतो असंसुद्धा नाही. आम्ही काही सहकारी नेमक्या अशाच वर्गवारीत सामावलेलो. आमच्या टोळक्यातील पाचसहा लोकांना चहा पिण्यासाठी निमित्त हवं असतंच असं नाही. त्यासाठी कोणतेही कवडीभर कारण पुरेसे असते.

चहाची चाहत असणाऱ्या आम्हां लोकांचा फड शाळा सुटल्यावर आजही नेहमीच्या ठिकाणी जमलेला. हे रोजचंच असल्याने त्यात नावीन्यापेक्षा सवयीचाच भाग अधिक. चहाचे घोट घेताना दोनचार विषय चघळायला मिळतात एवढेच काय ते अप्रूप. अर्थात, विषयही असून असून काय असणार आहेत. प्रासंगिकतेच्या पायऱ्या धरून प्रवास करणारे कोणतेही, काहीही. अगदी सुतावरून स्वर्गावर स्वारी करणारे. कधी पराचा कावळा करणारेही. हेच आणि असेच सूर चर्चेत सजायला हवेत असं कुणाचंही म्हणणं नसतं. रवंथ करण्यासाठी गवसलेली कोणतीही घटना, प्रसंग येथे परिमित कधीच नसतात. पुराणाएवढे पसरट व्हायला एखादा धागा हाती लागणेही पुरेसं असतं. मर्यादांच्या चौकटी असणारे, बंधनांची कुंपणे नाकारणारे, सीमांकित परीघ सहर्ष स्वीकारणारे वगैरे वगैरे सगळेच प्रकार येथे गुण्यागोविंदाने नांदतात. यातले बरेच विषय सवयीच्या वाटांनी चालत आलेले. ज्याच्या चर्वणामुळे पीठ पदरी पडण्याची अन् काही घडण्याची सुतराम शक्यता नाही. सरळ सांगायचे तर येथे गोळा होणारे सगळेच निरुपद्रवी प्राणी. वाद झडतात. विरोधही असतात. खंडन असतं अन् मंडनही. मंथन असतं तसा माजही असतो. सगळं काही असलं, तरी ते आवेश तेवढ्यापुरते. शब्दशः चहाच्या पेल्यातली वादळे असतात ती. 

येथल्या विषयात तर्कसंगती, अर्थसंगती असण्यापेक्षा विसंगतीच अधिक. सगळ्या तर्कांना फाट्यावर मारून आपल्या मतांचे तारे तोडणारे. येथे जमणारे सगळेच आपापल्या पुरते व्यक्ती कमी आणि वल्लीच जास्त. केवळ घटकाभर विरंगुळ्याशिवाय येथे काहीही वेगळं घडत नाही. आणि कुणी शोधलं तरी सापडणार नाही. दिवसभर घड्याळाच्या काट्यांसोबत क्षणक्षणाने सरकत मावळतीच्या संधीप्रकाशात सुटकेचे श्वास शोधणाऱ्यांची ही मांदियाळी. येथे एकत्र येणारे जीव परतीच्या पावलांनी पायवाट धरून निघालेल्या सूर्याच्या साक्षीने दिवसभराच्या कटकटीतून मुक्ती मिळाल्याचा आनंद साजरा करतात असं म्हणणं अतिशयोक्त वाटत असलं, तरी वावगं नाही होणार. व्यवस्थेच्या चौकटींनी निर्धारित केलेल्या चाकोऱ्यांना जगण्याचे प्रमाण मानणारे हे जीव. जगाची प्रमाणवेळ काही असली, तरी यांच्या दृष्टीने सायंकाळी मिळणारा वेळच जगण्याची खरी प्रमाणवेळ समजणारे.
 
असेच कोणत्यातरी विषयावर टोकाचे विचार मांडून आजही नेहमीप्रमाणे वादविवाद सुरु होता. जमलेले सगळेच आपापल्या मतांचे टॅग लावत होते. चर्चेला सूर सापडत असतांना संज्या नेहमीप्रमाणे मध्येच कडमडला. जगाच्या जगण्याच्या सवयी बदलतील, नको असतील त्या सुटतील; पण हा काही आपल्या सवयीं सोडायला तयार नाही. म्हणतात ना, ‘जित्याची खोड...’ याची जातकुळी याच प्रकारची. म्हणाला, "काही माणसे जन्माला येताना फक्त डोकं घेऊन येतात अन् बुद्धी नावाची गोष्ट होते तेथेच विसरून आलेले असतात का रे?" 

याच्या सवयीशी सगळेच अवगत असल्याने त्याचं सांगणं कोणी फारसं मनावर न घेता आपापसातलं बोलणं क्षणभर थांबवलं अन् पुढे काय बोलतो या उत्सुकतेत त्याच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. पण त्याचं आजचं बोलणं नेहमीच्या धाटणीतलं नव्हतं. रोखठोखपणापासून अंतरावर असणारा हा निरुपद्रवी जीव. फटकळपणा दिमतीला घेऊन जगणारा असता, कोणाचा विधिनिषेध न ठेवणारा असता किंवा असं काहीसं असतं तर एकवेळ समजून घेता आलंही असतं. मान्यही केलं असतं. याच्या साधेपणाने वागण्याच्या पद्धतीत टोकाची विधाने कधी सामावली नाहीत. कधी कुणाला दुखावण्याचा विचार चुकूनही याच्या मनी वसतीला आला नाही. तो आज असं काही सांगतोय म्हणजे नक्कीच काही खास घडलं असावं. 

असो, असतो एकेकाचा स्वभाव. कोणी त्याला दोष म्हटलं अथवा गुण, त्यानी कुणाच्या असण्यानसण्यात फारसा फरक पडत नाही. ऐकणाऱ्याने त्याच्या वकुबाने अर्थ शोधावा अन् विचार करणाऱ्याने आपल्या क्षमतांना स्मरून अन्वयार्थ लावावा. खरंतर कोणाला बरं वाटावं म्हणून कोणी बोलू नये अन् तुम्हांला जगाची पर्वा असेलतर बोलण्याच्या भानगडीत पडूच नये. स्वतःला काही मत असतं अन् ते मांडण्यासाठी असतं, हे माहीत असणारी माणसे इतरांच्या मतांची कदर करतील; पण स्वतःच्या अस्मितेचा अधिक्षेप कसा सहन करतील?
 
अर्थात फटकळ, परखड, स्पष्टवक्तेपणा वगैरे सगळे दुर्गुण घेऊन वर्तणारा म्हणून मित्र परिवारात माझं असणं आणि वावरणं सगळ्यांना एव्हाना सवयीचं झालेलं. असं असूनही मला झेलणारे हे एकतर महाम्याच्या महतीची माहिती करून घेत असावेत किंवा याच्या बडबडमुळे होतंय मनोरंजन घटका दोन घटका तर घ्या करून, असं काहीसं समजणारे असावेत. किंवा एखाद्याच्या स्वभावाने आणि बोलण्याने जग बदललं असतं, तर कशाला एवढे सायास करायला लागले असते, असं काहीसं गृहीत धरून असतील. बोलण्याबाबतीत कोणताही प्रवाद नसणारा हा माणूस कधी टोकाची मते मांडत नाही. विचारांना टोक काढायला लागणारं याच्याकडचं शार्पनर कधीचं बोथट झालेले. की करून घेतलेलं, काही म्हटलं तरी अर्थ एकूण एकच. वाद, वितंडवादापासून कोसो दूर राहणारा. झालाच थोडा स्वर चढा तर बोलण्यात जेवढे शब्द वापरले नसतील तेवढ्यावेळा स्वतःला कोसणारा. कोणाला कोलावून लावण्याची कला प्रयत्न करूनही अवगत नसलेला. 

खरंतर त्याच्याकडून येणारं हे वाक्य ऐकून थोडा संभ्रमात पडलो. अर्थाचा अन्वय एवढ्या विधानावरून काही कळत नव्हता. बरं बोलणारा कुणी अनोळखी असता, तर एकवेळ समजून घेता आलं असतं. तो काही तसा नव्हता. पण त्याचं असंबद्ध सुरात सजवलेलं हे गाणं समजून घेणं मात्र अपरिचित होतं. कदाचित कोणत्या त्राग्यातून बोलला असेलही. कशाचा कशाला मेळ लागत नव्हता. विधानांचा आणि आशयाचा अर्थ आपापसात जुळत नव्हता. सगळंच अनाकलनीय असल्याने म्हणालो, "बाबारे, लोकांना कळेल अशा भाषेत बोलावं. आपण बोलतो ते इतरांना समजावं म्हणूनच ना! मग ही कोडी कशाला घालतो आहेस? आधीच डोक्यात दिवसभरातला कचरा जमा झालेला. या डम्पिंग ग्राउंडवर जागाही पुरेशी उरलेली नाही. आणखी कचरा जमा करून कशाला ओततो आहेस? या कचऱ्यात काही शिरायला संधी नाही आणि गेलं तरी समजायची मारामार. त्यात तुझे हे स्मरणशक्तीची परीक्षा घेणारे अचाट प्रयोग आमच्यावर कशाला करतोस? आम्ही बुद्धिगुणांक तसाही कमीच घेऊन आलोयेत इहतली अधिवास करायला. तेवढ्याने काम भागतं आमचं. आहे त्याला पुरवून वापरतोय अन् तू त्याचा भुगा करायचं म्हणतोयेस."

"ये, पुरे रे तुझा पांचटपणा. नुसते आचरट विनोद करण्यात हयात घालवतो आहेस नुसती. कधीतरी गंभीर वगैरेही होत जा ना! साला, तुम्हांला कधी काही गोष्टी कळतात? कळतील तरी कशा? त्यासाठी आधी वळायला लागतात ना!"

“अरे वळायला निदान वाट अवगत असायला लागते. तसंही कोणाच्या आयुष्याच्या वाटा काही कोणी निर्धारित करीत नाही. ज्याचा त्याचा सौदा असतो हा. कोणी किती बोली लावावी, हे कोण कसं सांगेल? आणि आयुष्यावर कोणाची अधिसत्ता असते रे, आपलीच ना! मग कोणाच्या मेहरनजरची कशाला आशाळभूतपणे वाट पहावी. आपणच आपल्या प्राक्तनाचे अभिलेख अंतरीच्या आस्थेने लेखांकित करावे. या परगण्यात प्रत्येकजण अनभिषिक्त सम्राट असतो. आयुष्य समजून घेत जगणारा सिकंदर असतो.”

"किती पुस्तकी? किती कोरडे तत्त्वज्ञान हे? जरा लोकांच्या भाषेत व्यक्त होत जा ना! साध्या शब्दांत बोलायला डॉक्टरने पथ्य दिलंय का रे तुला? तुमचं बोलणं तर काय विद्वत्ताप्रचुर शब्दांचा मोहर. भावविभोर शब्दांचा गंध ल्यायलेलं. आशयघन शब्दांचा संभार आणि त्यास लाभलेला अनुभूतीचा तरल स्पर्श वगैरे वगैरे... साहेब, सगळीच माणसे सारखी नसतात रे. काही असतात येडीगबाळी. पण म्हणून काय झालं. नसेल त्यांना अवगत सुंदरतेचा साज लेऊन सजलेली तुमच्यासारखी भाषा. म्हणून ती विशेष नसतात का? त्यांचं विशेषत्व साधेपणात सामावलेलं असतं इतकंच. त्यांना पाचपेच नसतो. कारण त्यांची पोहच परिमित असते. हीच त्याची पोच असते, नाही का?”

“झालं का तुझं बोलून? उगीच सीधासाधा सदा असल्याचा आव नको आणूस. तू काय आहेस हे माहीत नसणाऱ्याना सांग. पुरे झालं तुझं हे पुराण. नमनाला घडाभर तेल वाया घालवलं, त्यात आणखी भर नको करू. चुकलेली वाट बदलून मार्गावर ये. तसंही तुझं बोलणं तरी कधी सरळमार्गी असतं रे?”

“साला, माणसे ओळखण्यात नेहमीच मी कमी पडतोय. कदाचित हा माझा स्वभावदोष असेल. आपण नितळपणाने समोरच्याला सामोरे जावं तर, तो आपलीच वाट लावायला लागलेला असतो. स्वतःकडे तितकी पात्रता असेल तर एकवेळ समजूही शकतो. पण कवडीएवढा स्व नसणारी ही माणसे स्वतःला सर्वज्ञ समजून वागतात तेव्हा कीव वाटते रे यांची. राग वगैरे म्हणालो असतोही, पण त्यांच्या वर्तनाच्या तऱ्हा पाहून राग बाजूला राहतो अन् कणव वाटू लागते. कसला माज असतो या लोकांना कोणास ठावूक? आज हुकुमाची काही पाने यांच्या हातात आहेत, पण उद्याचं काय? विचार करावा न जरा माणसाने. पण नाही. कुठून येत असेल एवढा आत्मविश्वास अशा माणसांकडे?

“अज्ञानातून...!”

“अचूक निरक्षण म्हणावं का याला? आम्हांलाही हे रोज दिसतंय. पण अज्ञान अज्ञान तरी किती असावं माणसाकडे? डोकं केवळ केशसंभार सांभाळण्यासाठी असतं का? त्यात सुरक्षित असणाऱ्या मेंदू नावाच्या अवयवाचा कधीतरी उपयोग करावा ना! आयुष्य मर्यादांच्या परिघातल्या प्रदक्षिणा असतात, हे सांगायला कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नाही. चार उन्हाळेपावसाळे झेलले असतील अन् दोन पुस्तके डोळ्यासमोरून सरकली असतील आणि एखाददोन चांगली माणसे समोरून जाताना दिसली तर कळतं की, आपली औकात काय आहे? पण या परोपजीवी जंतूना हे सगळं कळेल तर ना!”

“आकाशात उंच उडणारा फुगा पाहिला आहेस ना? गॅस असेपर्यंत उडत असतो, उंच आणखी उंच; पण एकदाका त्याच्यातली हवा गेली की काय होतं? येतोच ना जमिनीवर. अरे, यांच्या अज्ञानाला शहाणपण असं नाव देऊन उडत ठेवणारा धागा कुणाच्या स्वार्थी हातात आहे. त्याने पकडून ठेवलंय तोपर्यंत यांना आकाश आपल्याला आंदण दिल्याचा माज आहे. एक सांगू का? भाव आणि आविर्भाव यात अंतर असतं. भाव आतून ओलावा घेऊन वाहता राहतो. तो काही कुणी काढलेल्या परिपत्रकाच्या चौकटीतून प्रवास करत नाही. आविर्भावला कोणी आयुष्याचा अन्वयार्थ म्हणत असेल, तर अज्ञान शब्दाचा अर्थ अन्यत्र शोधायची आवश्यकताच काय? अंगभूत पात्रता नसताना केवळ कर्मधर्मसंयोगाने कोणी हाती दिलेल्या शिड्यांवर चढून ढगांचा मुका घेण्याचा प्रयोग करीत असेल तर तेथून पडून दोनचार हाडे खिळखिळी झाल्याशिवाय आभास शब्दाचा अर्थ आकळत नाही.” संवादाला आणखी एक पाऊल पुढे नेत प्रदीप बोलता झाला. 

“अगदी...! कुणीतरी माखलेले रंग देहावर लपेटून फुगे स्वतःला देखणे समजून उगीचच उडत असतात. आभाळाशी गुज करू पाहतात. ही आपलीच जागीर असल्याच्या थाटात मर्यादा विसरून आणखी वर पोहचण्याची कामना करतात. पण काळ काही कोणाचा सोयरा नसतो. तो प्रत्येकाला त्याच्या जागी आणून उभा करतो. फक्त तो क्षण योग्य स्थानी यावा लागतो. तो कधी येईल, त्याचा मुक्काम केव्हा असेल तेही काळालाच माहीत असतं. अशा पाखंडींच्या बेताल वागण्याने विटलेली माणसे वाट पाहण्याशिवाय करूही काय शकतात आणखी!” जयेश मनातल्या सात्विक संतापाला वाट रिती करून देत बोलला. 

“पुरे रे, तुमचे हे वांझोटे पुराण! तुमच्या चर्चेने हे जे कोणी असतील ते काही सुधारणार नाहीत. स्वयंप्रज्ञेने प्रवास करणारी माणसे कोणी आपल्याकडे अंगुलीनिर्देश करण्यासाठी संधी चुकूनही राहू देत नाहीत. ज्यांच्या विचारातून प्रगल्भपण पसार झालं आहे, ते कसला विधिनिषेध पाळतायेत? तसं असतं तर तुम्हांला एवढी वाफ वाया घालवायची आवश्यकता असती का? निघा रे आता घराकडे! तुमच्या वायफळ चर्चांनी ना ते बदलतील, ना त्यांच्या अंतरी नांदणारा अज्ञानाचा अंधार निरोप घेईल. कोडगेपण ज्याच्या जगण्याचा भाग झाला आहे त्याला कसली आलीयेत नैतिकतेची बंधने? प्रत्येक गोष्टीला काळाच्या कक्षा वेढून असतात. वेळेची गणिते असतात. काळाच्या अफाट पटावरून वेळ वजा केली की, आयुष्याचे अर्थ उमगतात. आपल्या मर्यादा समजतात. काय समीकरणे सोडवायची त्याची सूत्रे तुम्ही शोधा. नसतील सापडत तर तयार करा. उगीच वेळेचा अन् उर्जेचा अपव्यय कशाला करतायेत? जे काही करायचं ते काळ निर्धारित करेल. अरे, मोठे मोठे सम्राट काळाच्या एका आघाताने संपले तेथे अपघाताने मिळालेल्या चतकोर तुकड्यांवर सत्ता सांगणाऱ्यांची काय बिशाद. होणार असेल ते होईल. तुम्हांला असेल अन्यायाची चीड अन् न्यायाची चाड तर करा ना दोन हात परिस्थितीशी सरळ सरळ. कशाला उगीच व्यर्थ बडबड करतायेत? आयुष्य संघर्ष आहे म्हणतात ना, लढा ना मग! परिस्थितीशी भिडणाराच टिकतो नाही का?” मारुतीच्या शेपटासारख्या विस्तारत जाणाऱ्या चर्चेला पूर्णविरामाच्या चिन्हात ठेवत प्रशांतने भैरवीचे सूर सजवले. 
  
सूर्याने कूस बदलली. निरोप घेऊन जातांना पश्चिम क्षितिजावर त्याने उधळलेल्या रंगांची आभा धूसर होत गेली. घराकडे वळणाऱ्या वाटा परतीच्या पावलांची वाट पाहू लागल्या. आपापल्या दुचाकी वरून एकेक मार्गस्थ होऊ लागले. सगळा रस्ता आपल्याला आंदण दिल्याच्या थाटात चालणाऱ्याच्या स्वैर स्वातंत्र्याचा सन्मान सांभाळत मिळेल तशा जागेतून गाडी पुढे नेत होतो. पण मैफल संपूनही चर्चेच्या सुरांचे साज मनात निनादत होतेच. माणूस म्हणून मी यात नेमका कोठे उभा आहे? समाज म्हणून माणसे मला किती ओळखता आली? अनोळखी माणसांबाबत समजण्याच्या मर्यादा मान्य. पण ज्यांच्याकडून आगळीक घडणार नाही असं वाटतं त्यांच्याबाबत सगळे आडाखे क्षणात ध्वस्त का होत असतील? अस्वस्थपणाचे भुंगे अंतरी गुंजारव करू लागले. प्रश्नांच्या मुंग्या सोबत घेऊन घर गाठलं. पण विचारांनी मेंदूवर मारलेल्या गाठी काही सोडता येत नव्हत्या.            
कारणांचा शोध घेण्याचं काम मेंदू परत परत करतोय. पण त्याचे नीट अन्वयार्थ काही त्याच्या हाती नाही लागतं. माणूस नावाचा प्राणी मुळात असाच आहे की, सापडलेली सत्तेची छडी त्याच्या विचारात स्नेह नावाचं सदन सजवूच देत नाही? पूर्वग्रहदूषित विचार असा एक शब्द असतो. त्याचा मुलामा आयुष्यावर चढला की, अहं घेऊन उगवलेली बांडगुळे अधिक विस्तारू लागतात. अर्थात, या शब्दाला वेढून असणाऱ्या अपेक्षांचा अर्थ सगळ्यांना अवगत असेल याची खात्री देता येईलच असं नाही. वाचून आशय कळेलही कदाचित, पण तो आकळण्यासाठी अनुभवावा लागतो. माणूस संस्कारशील वगैरे जीव असल्याचं सगळेच ऐकत आलेत आणि सांगणारे तसं सांगतातही, पण त्याच्या महतीचे पोवाडे गायले म्हणून महात्म्यांनी अंगीकारलेले विचार दत्तक घेता येतातच असं नाही. महानतेच्या वाटांनी घडणारा प्रवास एक अवघड वेदनेचा शोध आहे म्हटलं तर अतार्किक नाही ठरणार. 

महात्म्याचे प्रयोग करणे सगळ्यांना संभव असलं, तरी मुक्कामाची ठिकाणे प्रत्येकाला गवसतात असंही नाही. फार कमी लोकांना हा मकाम साधता येतो. केवळ आकसापोटी अथवा अंतरी अधिवास करून असणाऱ्या अहं तुष्टीसाठी कोणी गुणवत्तेला नाकारून व्यवस्थानिर्मित चौकटींची सूत्रे सुमारांच्या स्वाधीन करत असेल, तर संस्थात्मक संरचनेचा साचा सुत्रांतून सुटतो, हे सांगायला भविष्यवेत्त्याची आवश्यकता नसते. मेंदूवर अविचारांची चादर ओढून घेतली असेल, तर तेथे सारी तत्त्वज्ञाने तकलादू होतात. शास्त्रे वांझोटी ठरतात अन् शस्त्रे बोथट. अंधाराशी असणारं सख्य उजेडाशी सोयरिक नाही होऊ देत. माणसांनी तरतम भावाने वर्तावे, ही जगण्याची सामान्य अन् सर्वमान्य रीत. पण केवळ द्वेषभावनेतून पायाखालचा आधारच कोणी जाळायला निघाला असेल, तर त्याचं उत्तर सापडणं अवघड. असं असलं तरी परिणाम मात्र निश्चित असतो. निखाऱ्यांशी सख्य साधंलं की, दाहकतेची परिभाषा विचारावी नाही लागत. अनुभवावी लागते. निखाऱ्यांचा धर्म धग असतो. ज्वालांशी संगत केली की, राखेचे ढीग सांभाळावे लागतात.

द्वेष करायला निमित्ते शोधायला नाही लागत, एखादे क्षुल्लक अन् खोटे कारणही त्याकरता पर्याप्त असते, पण स्नेह जडायला विकल्प शोधावे लागतात. धांडोळा घेऊन आहे त्या मापाचं आणि आवश्यक तेवढ्याच विस्ताराचं वर्तुळ भोवती आखता येईलच असंही नाही. वर्तुळे आभासी अहं निर्माण करतात. अहंकार आत्मशोध थांबवतो. मूठभर विस्तार असणारी वर्तुळे विश्वाएवढी वाटू लागतात, तेव्हा सत्प्रेरीत भाव अंतरी पेरणारे विचार वाटा बदलून नव्या वळणाचा शोध घेतात. ओंजळभर यशाचा साक्षात्कार होऊ लागले की, अथांग असण्याचे अर्थ हरवतात. ओंजळीनी समुद्र ओतून रिता नाही करता येत. 

खंडीभर पर्यायांचा ढीग उपसून एखादेच मनासारखे वर्तुळ गवसते. त्याच्या परिघात सगळेच सामावण्याएवढा सत्प्रेरीत भाव असेल तर प्रभावाच्या परिभाषा पूर्णतेचा प्रवास करतात. कदाचित त्याला मर्यादांचे बांध वेढून असतील. विस्ताराचं क्षितिज सीमांकित करणारे कुंपणाचे काटे ओलांडून पाऊल अपेक्षित ठिकाणी तेवढं ठेवता यावं. यासाठी आपल्याकडे मनाचं नितळपण असलं तरी पर्याप्त असतं. मन प्रक्षुब्ध होतं, तेव्हा सिंहासनाच्या ठिकऱ्या होतात. ताज उधळले जातात. संयम असेपर्यंत आखून दिलेल्या चौकटींची अन् वेढून घेतलेल्या परिघाची बूज राखली जाते. पण तोल ढळला की, सगळेच ताल सुटतात, हेही वास्तव दुर्लक्षित नाही करता येत. म्हणूनच माणूस संयमी असावा, पण शहाणाही व्हावा. शहाणपण जन्मते ते संस्कारातून, वाढते शिक्षणातून अन् बहरते कृतीतून. नाही का?
••