एकांत आणि लोकांत

By // No comments:
काहींना एकांत प्रिय वाटत असेल, काहींना लोकांत आवडत असेल. कोणाला आणखी काही. कोणाला काय वाटावे, याची काही निर्धारित केलेली नियमावली नसते. कोणाला एकांत भावत असेल, कुणाला लोकांत आपला वाटत असेल, तर निवडीचे स्वातंत्र्य त्याचेच असते, नाही का? त्याच्यापुरती विशिष्ट विचारधारा निवडून तो वर्तत असेल, तर त्यात वाईट ते काय? प्रत्येकाकडे आपलं असं काही असतं अन् ते त्याला सांभाळून ठेवायला आवडत असतं. नसेल कोणाला पदरी पडलेल्या प्रवासाचा पथ पर्याप्त वाटत, तर ते त्याचं स्वातंत्र्य. याचा अर्थ असा नाही की, तुमच्या विचारांची चाके लावून त्याने निर्धारित केलेल्या पथावरून पुढे पळायला हवं. आखून दिलेल्या चाकोऱ्यांना प्रमाण मानून गुमान चालत राहावं. कोणताही किंतु मनाच्या कोपऱ्यात न ठेवता पदरी पडलं ते पर्याप्त मानून प्रमुदित राहायला हवं.

अशी सक्ती करता येते? कसं शक्य आहे ते. कुणी कुणाच्या स्नेहात असावं, हा भाग ज्याच्या त्याच्या निवडीचा अन् कोणाच्या आज्ञा प्रमाण मानव्यात हा भाग आवडीचा. तो काही कोणावर लादता नाही येत. एखाद्याविषयी आतून आपलं असं काही वाटत असेल, तर आस्था दाखवण्यासाठी कवायत नाही करायला लागत. भक्त जमा करता येतात. अनुयायी गोळा करता येतात. त्यांच्या मुखी महतीची स्तोत्रे पेरता येतात, पण महात्म्याचा साक्षात्कार घडवण्यासाठी स्वतःला महानतेच्या परिभाषा अवगत असायला लागतात. महात्म्य काही मागून मिळत नाही की लादून, त्याकरिता आपणच आपल्या उंचीशी स्पर्धा करायला लागते. आपणच आपल्याला वाहता वाहता नितळ करता यायला हवं. आपणच आपल्याला खरवडून काढावं लागतं. भक्तांची गर्दी भलेतर भास निर्माण करू शकेल. अनुयायांचे आवाज आसपास ऐकू येतील, पण आतला आवाज ज्याचा त्यानेच सांभाळायचा असतो. तो काही उसना आणता नाही येत कुठून. 

माणसांच्या गर्दीत राहणारे सगळेच दर्दी अन् गर्दी टाळून आपणच आपल्याला शोधणारे कोलाहलाची सर्दी झालेले असतात असंही नाही. कुणी कुठे राहावं, कसं असावं, कसं नसावं, हा सगळा वैयक्तिक निवडीचा भाग. आपल्याच कोशात रममाण असणं अन् आपणच घालून घेतलेल्या मर्यादांच्या कुंपणाभोवती प्रदक्षिणा करणं, ही माणूसपणाची मर्यादा असेलही. म्हणून ती काही एखाद्याच्या व्यक्तित्वाची पूर्ण व्याख्या नाही होऊ शकत. तसंही माणसांच्या गर्दीत राहून माणूसपण कळतेच असे नाही. माणूस कळायला माणसांची गर्दी हे एकक नाही वापरता येत. परिमाणच लावायचं असेल तर माणूसपणाच्या परिभाषा सर्व कोनातून समजून घ्यायला लागतील. पण हे शतप्रतिशत संभव असणं अवघडच.

गर्दीचा भाग बनून स्वार्थ शोधणाऱ्या बगळ्यांपेक्षा कुठल्यातरी एकांतस्थळी विहरणाऱ्या पाखरांचा पैस अधिक असू शकत नाही का? स्वार्थाच्या परिघाभोवती फेऱ्या करण्यापेक्षा आकाशाला पंखावर घेण्यासाठी केलेल्या प्रदक्षिणाचे मोल अधिक असते, नाही का? प्रत्येकाचा पैस सारखा नसेल हे निर्विवाद. काहींना परीघ पकडता येतात, काहींना त्याच्या विस्ताराच्या परिभाषा आकळतात, तर काहींना त्याभोवतीच्या प्रदक्षिणा कळतात. काय कळावं हे कळतं, त्याला आयुष्याचे ज्ञातअज्ञात कंगोरे कळत जातात. नियतीने म्हणा अथवा परिस्थितीने पदरी पेरलेल्या प्राक्तनाचे प्रत्येक कोपरे सजवता येतात त्यांना अंधाराच्या पटलावर पसरलेल्या चांदण्यांच्या चमकण्याचे एकेक अर्थ अवगत असतात.

तसेही माणसांत राहून विकारांपासून विलग होता येत नसेल, तर आपण अलग होऊन आपल्या वर्तुळात विहार करणे अधिक श्रेयस्कर असते. गर्दीत हरवलेला चेहरा शोधण्यापेक्षा, आहे तो चेहरा आणखी देखणा करणे अधिक चांगले नसते का? आपलीच आपण आरास मांडून मखरात मंडित होण्यापेक्षा आस्थेच्या मुक्त रंगात माखणे अधिक मोहात पाडणारे असते. स्वार्थपुरीत विचारांना सामाजिकतेच्या धाग्यांनी विणलेल्या रंगीबेरंगी झुलींखाली झाकून मिरवत राहण्यापेक्षा, आहे ते आणि आहे तसे असणे अधिक देखणे असते नाही?

तुम्ही कोण? हा प्रश्न महत्त्वाचा नाही. तुम्ही कसे? ते अधिक मोलाचे असते. एखाद्याची किंमत कुणी कशी करावी, याची काही सुनिश्चित परिमाणे नसतात. असतात ते स्वनिर्मित निष्कर्ष. निष्कर्ष काही माणूस आंतर्बाह्य समजण्याचे प्रमाण नसते. असतं ते केवळ अमूर्त एकक, ज्याला जर-तरचा अध्याहृत अर्थ तेवढा असतो. तसेही सजीवांच्या वर्तनव्यवहारांचे कोणतेच निष्कर्ष अंतिम नसतात. ते परिवर्तनीय असतात. निर्णयाप्रत पोहचण्यासाठी प्रयोग करावे लागतात. काही अनुमान अधोरेखित करावे लागतात. प्रत्येकवेळी ते वेगळे असू शकतात. मग माणूस तरी यास अपवाद कसा? अपवाद आले की, प्रवाद पसरतात. प्रवाद संवादाचे सेतू बनले की, अनुमानांना अर्थ गवसतो. संवादाचे किनारे सुटले की, वितंडवाद उभे राहतात अन् वादाचे प्रवाह दुथडी भरून वाहतात. परिवर्तनप्रिय विचार सौहार्दाच्या गगनात आपलं सदन उभं करतो, हे खरं असलं, तरी परिवर्तनाचा प्रवास म्हणजे काही प्राक्तन नसतं, परिस्थितीने पेरलेला प्रयत्नांचा परिपाक असतो तो, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••

नाही शोधता येत सगळीच उत्तरे

By // No comments:
तो आणि ती उमलत्या वयाच्या झुल्यावर स्वार होऊन आभाळाला हात लावू पाहतात. वाऱ्यासोबत वाहतात. झऱ्यासोबत गाणी गातात. पावसात भिजतात. फुलांसोबत खेळतात. पाखरांसोबत उडतात. फुलपाखरांच्या पंखात रंग भरतात. कोमल किरणांच्या वर्षावात नाहतात. चांदण्यांसोबत बोलत बसतात. तीरावरील वाळूत मनोरथांचे मनोरे रचित, स्वप्नांच्या सप्तरंगी इंद्रधनुष्यावर झोके घेत राहतात. त्यांचा उगवणारा दिवस आनंदाची पखरण करतो. काळोखाची चादर देहावर ओढून घेणाऱ्या रात्री सुखाच्या ओंजळी रित्या करतात. अंतरी दाटून आलेल्या अनामिक काळजीने कधी कातरवेळा काळीज कोरत राहतात. साद देत राहतात प्रत्येक पळ. असं काही घडण्यासाठी एक वेडेपण जगण्यात विसावलेलं असायला लागतं.

हो, खरंय! हे सगळं वेडं असल्याशिवाय कळत नाही अन् घडतही नाही. असं वेडं सगळ्यांना होता येतंच असं नसतं अन् वेडेपणातलं शहाणपण अवघ्याना आकळतं असंही नाही. या विश्वात विहार करणाऱ्यांची जातकुळीच वेगळी असते. ना तेथे मर्यादांचे बांध बांधता येतात, ना विस्ताराला सीमांकित करणारी कुंपणे घालता येतात. ना वेग अवरुद्ध करणारे गतिरोधक टाकता येतात. म्हणून ते वेडेच...! तो तिच्यासाठी, ती त्याच्यासाठी आणि दोघे एकमेकांसाठी. जगाच्या गणितात कुठलीही उत्तरे नसणारे, पण अंतरी आपलं ओंजळभर देखणं जग उभं करू पाहणारे.

त्याने तिला, तिने त्याला नजरेच्या वाटेने अंतरी उतरवत मनाच्या गाभाऱ्यात कधी कोंडून ठेवलं... काहीच आठवत नाही... प्रारंभ नेमका कुठून आणि कुणाकडून झाला, हे सांगणही बऱ्याचदा अवघड. असा कोणता क्षण असेल तो, ज्याने ही दोन टोकं सांधली गेली असतील? असं कुठलं बंधन असेल ज्याने हे बांधले गेले असतील? जगात वावरणारे असंख्य चेहरे आसपास असताना हेच नेमके एकमेकांना का दिसावेत? बघून आपण एकमेकांसाठीच आहोत असंच का वाटावं? असा कुठला क्षण होता, या हृदयाचे त्या हृदयी पोहचवणारा? अशी कोणती स्पंदने होती, एकच सूर छेडणारी? असे कोणते बोल होते, एकच गीत गाणारे? नाही करता येत काही प्रश्नांसोबत असणाऱ्या किंतुपरंतुंची मीमांसा. नाही शोधता येत त्यांची उत्तरे लाख धांडोळा घेऊनही. नाही सांगता येत सगळ्या गोष्टींमागची कारणे. नाही करता येत विशद सगळ्याच भावनांच्या व्याख्या, हेच खरंय.

प्रेमात पडायला वयाच्या चौकटी निर्देशित करणारा भाग वगैरे कारण असतो का? कदाचित नसावा. तसं असतं तर वयाच्या वर्तुळांचा विसर प्रेम परगण्यात विहार करणाऱ्या जिवांना कसा पडला असता? खरं हेच आहे की, प्रेमाला बहुदा बंधने मान्य नसतात कुठलीच. मग ती कशीही असोत. उमलतं वयचं वादळविजांचं. नवथर संवेदनांचे पंख लेऊन आभाळ आंदण दिल्याच्या थाटात विस्तीर्ण निळाईत विहार करीत राहायचं. झोपाळ्यावाचून झुलायचं. 

दोघेही स्वप्नांच्या झोक्यावर बसून आकाशाशी सलगी करू पाहतात. आभाळ त्यांना खुणावतं. वारा धीर देत राहतो. आयुष्याचे कंगोरे समजून घेता घेता मनं कधी बांधली जातात, कळतच नाही. कळावंच कसं, कळण्याआधी वळावं लागतं. वळणाचा प्रवास वेग कमी करतो. वेगाशी सलगी करणाऱ्यांना संथ वाहणे कसे रुचेल? मनात विसावलेल्या वाटेची वळणं निवडून धावतात तिकडे. रमतात जगाच्या गतिप्रगतीच्या परिभाषांपासून कोसो दूर. भावनांच्या रिमझिम वर्षावात चिंब भिजत राहतात. किनाऱ्याच्या वाळूवर कोरलेल्या आपल्याच पदचिन्हांच्या नक्षीत भविष्याचा कोलाज शोधत राहतात.

तो आणि ती... एक पूर्ण वर्तुळ. की फक्त एक मात्रा आणि एक वेलांटीची सोबत करीत लेखांकित करता येणारी वर्णमालेतील अक्षरे. काहीही म्हणा, त्याने असा कोणता फरक पडणार आहे. पण कधी कधी काही अक्षरांना अक्षय आशय प्राप्त होतो. कुण्या अज्ञाताने कधीकाळी शिलाप्रस्तरावर कोरलेली अक्षरे अनपेक्षित हाती लागतात. काळाच्या उदरात सामावून पडद्याआड गेलेले संदर्भ नव्याने उलगडत जातात. विस्मृतीच्या निबीड अंधारातून कवडशाचा हात धरून विसकटलेले प्रसंग, विखुरलेले संदर्भ चालत येतात, कुठलीतरी कहाणी सोबत घेऊन. विस्मृतीच्या कोशात विरलेले अध्याय नव्याने वाचले जातात आणि आशयाच्या अथांग डोहात विहार करीत राहतात. जगण्याच्या वाटेवर आतापर्यंत अशा किती कहाण्या हरवल्या असतील आणि गवसल्याही असतील, माहीत नाही. 

जगण्यात गोमटेपण कोरणारा हा खेळ किती काळापासून काळ खेळतो आहे, ते त्यालाही अवगत नसेल कदाचित. इतिहासाच्या कुशीत विसावलेल्या त्याच्या तुकड्यांनाच ते विचारता येईल. पण त्याला तरी ते सांगता येईल का? माहीत नाही. वाटेवर चालून थकलेले, हताश झालेले, जिंकलेले आणि हरलेले... असे कितीतरी तो आणि ती काळाच्या अफाट विवरात सामावले. काही कायमचे हरवले. काही हरवून गवसले. गवसले त्यांना काळानेच चिरंजीव केले. पण वास्तव हेही आहे की, सगळ्यांच्या ललाटी पुन्हा प्रकाशण्याचे प्राक्तन नियतीने पेरलेलं नसतं, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••