Mazya Mana... | माझ्या मना...

By // 10 comments:
माणसाचं मन साऱ्या व्यवहारांचं केंद्र असतं. मनाला भावनांचं कोंदण लाभलं, तर त्याच्याइतकी सुंदर गोष्ट इहतली कोणतीच असू शकत नाही. मनाचं नातं मनाशी असावंच, पण त्याची सोयरिक मेंदूशी असावी. मनाची सोबत करणारा मेंदू गहाण पडला असेल, तर अंतर्यामी अधिवास करून असणाऱ्या संवेदना माणूसपण विसरतात. मेंदू बटिक झाला की, पहिला बळी जातो स्वातंत्र्याचा. स्वतंत्र विचारांनी वर्तणारा माणूस परिस्थितीच्या अंधाऱ्या क्षितिजाच्या पायथ्याशी उभा असणे विसंगती ठरते. मन, मेंदू आणि मनगट माणसाच्या जगण्याची दौलत आहे. पण केव्हा, जेव्हा तो स्वतंत्र वृत्तीने आणि स्वप्रज्ञेने आपल्या अभ्युदयाच्या आकाशाचा तुकडा शोधत निघाला असेल तेव्हा.....
 
‘हल्ली बहुतेक सगळीच वर्तमानपत्रे अपराध वार्तांचे वार्तांकन करणारी पत्रे झाल्यासारखी वाटतायेत. आपण वर्तमानपत्र वाचतोय, असे वाटतच नाही हो!’ आमचा एक स्नेही सध्याच्या अस्वस्थ वर्तमानाविषयी उद्विग्नपणे मत व्यक्त करीत होता. अर्थात, या मताविषयी आपण सहमत असाल किंवा नसलात, म्हणून प्राप्त परिस्थितीत फार काही फरक पडत नाही. कारण परिस्थितीपरिवर्तन घडवण्याइतके सामर्थ्य सामान्य माणसात उरले आहे, असे कोणासही वाटत नसावे बहुदा. असे असले तरी त्याच्या विधानातून प्रतीत होणारा आशयही दुर्लक्षित करण्यासारखा नाही, हेही वास्तव आहे. कुण्या मानिनीच्या मानखंडनेच्या, वंचितांच्या वेदनेच्या, उपेक्षितांच्या अवहेलनेच्या, माणसांच्या संकुचित जगण्याच्या कुठूनकुठून येणाऱ्या वार्ता नित्याच्या झाल्या आहेत. नकारात्मकता सोबत घेऊन येणाऱ्या बातम्या समाजाच्या अंगवळणी पडल्यासारख्या झाल्या आहेत. असं काही समोर आल्यावर तात्कालिक प्रतिक्रिया म्हणून मनात एक उद्विग्न संताप दाटून येतो. चारदोन आवाज प्रतिकार बनून प्रकटतात. क्षणिक क्षोभ व्यक्त होतो आणि विसरलाही जातो. दैनंदिन व्यवहारांच्या गुंत्यात गुरफटलेल्या माणसांना जगण्यातील रोजचे प्रश्न सोडवता-सोडवताच नाकी नऊ येत असल्याने त्यांची उत्तरे शोधतांना जीवनकलहात इतर गोष्टी दुय्यम ठरत जातात. परिणामतः लोकक्षोभास कारण ठरलेली घटना कालांतराने विस्मृतीच्या कवचात जाऊन विसावते. समाजात जे घडतंय त्यात आपण फारसे काही करू शकत नसल्याची हतबुद्ध जाणीव अंतर्यामी रुजत जाते. म्हणून की काय त्याकडे दुर्लक्ष करणेच जास्त बरे असल्याचे माणसांना वाटत असावे. जवळपास साऱ्यांच्याच जगण्यात परिस्थितीसापेक्ष दुभंगलेपण गहिरे होत असल्याने अशा बातम्या जेवढ्या तटस्थपणे वाचल्या जातात, तेवढ्याच कोरडेपणाने वर्तमानपत्राची पाने उलटवली जातात.

समाजात घडणाऱ्या विपरीत घटनांनी विचलित होणं माणसांच्या मनाने कधीच विस्मृतीच्या गाभाऱ्यात ढकलून दिले आहे. अन्याय, अत्याचार, अनाचार पाहून गहिवरणारी मनेच बोथट होत आहेत, असे वाटण्याइतपत माणसांच्या वागण्यात तुटकपणा येत आहे. एखाद्या विसंगत घटनेविषयी व्यथित अंतःकरणाने व्यक्त होणं हरवत चाललं आहे की काय, असा संदेह मनात निर्माण होण्याइतपत दुरावलेपण विचारांत आले आहे. विचारांचे सैलावलेपण पाहून सरळमार्गाने वर्तणाऱ्या मनात अगतिक अस्वस्थता निर्माण होते आहे. वैयक्तिक लाभाच्या हव्यासात माणूस नावाची ओळख काळवंडत चालली आहे. अन्याय घडत राहतो, न्याय मिळवून द्यावा लागतो. न्यायाच्या बाजूने आणि अन्यायग्रस्ताच्या मागे मूल्यांची मशाल हाती घेऊन माणूस उभा राहिल्याशिवाय वंचितांच्या वेदना संपू शकत नाहीत. माणसांच्या वर्तनातील परिप्रेक्षात न्याय-अन्याय शब्दांच्या परिभाषाही बदलत आहेत. प्रत्येक जण स्वतःला न्यायमूर्ती समजून स्वतःपुरता निवाडा करून मोकळा होतो आहे. हे सगळं पाहून आपल्या आसपासच्या परिसराचं पर्यावरण मर्यादांच्या चौकटींना उल्लंघून पार करण्याइतकं खरंच प्रदूषित झालं आहे का, असा प्रश्न मनात उदित होतो. जर असे घडत असेल, तर माणूस म्हणजे सहृदय संवेदनांनी व्यक्त होणाऱ्या मनाचा मालक, ही त्याची ओळख वर्तमानाच्या वर्तुळात नव्याने शब्दांकित करावी लागेल.

माणसांच्या जगात माणसाकडून माणूसपण विसरणं घडत आहे, म्हणून सगळेच बोलत आहेत. माणसांनी मनातील स्वप्नांच्या आकृत्यांना कोरून उभ्या केलेल्या माणसांच्या जगात माणुसकीच्या चिंधड्या उडत आहेत. जगण्याच्या दैनंदिन व्यवहारात साचलेपण येत आहे. जगण्याचं डबकं होत आहे. नितळ, निर्मळ भावनांचं दान पदरी घेऊन वाहणारे आपलेपणाचे झरे आटत चालले आहेत. दोन्ही तीर धरून वाहणाऱ्या नद्या नजरेसमोर आटत गेल्या. त्यांचे तीर सुकले आणि आसपासच्या परिसराच्या पदरी हिरवाईचं दान देणारे काठ कोरडे पडले. पात्रातल्या पाण्याला निरोप देऊन दगडगोटे शापित विरूपपण घेऊन उघडे पडले. दगडांनी भरलेले किनारे एकटे उरलेत. प्रेमाने दुथडी भरून वाहणारी माणसांची मनेही परिस्थितीच्या मर्यादांचे बांध पडून अशीच अवरुद्ध झाली आहेत. आस्थेने, आपुलकीने भरलेले मनाचे पात्र कोरडे होत गेले. मागे उरल्यात फक्त अस्तित्वाच्या काही शुष्क खुणा. त्यांच्यात आठवणींची श्रीमंती असली, तरी जगण्यातलं भकासपण वास्तवाची जाणीव विसरू देत नाही. नदीपात्रात खड्डा खणून कधीकाळी थोडीतरी ओल हाती लागत असे. तळाच्या उदरी साचलेले झरे संपले. कितीही खोल खणत नेले तरी आस्थेचा ओलावा दूरदूरपर्यंत दिसत नाही. मातीशिवाय हाती काहीच लागत नाही. माणसांच्या मनातला ओलावाही असाच ओसरला आहे. मागे उरला आहे व्यवहाराचा कोरडेपणा. या कोरडेपणातून जगण्यात अनामिक कोडगेपण येत आहे.

अस्वस्थतेचे वांझ ओझे वाहत वर्तमान अंधारवाटेवरून निघाला आहे. सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्यांच्या वाटेवरचा अंधार नियतीने निर्मिलेले प्राक्तन ठरू पाहत आहे. अंधाराची सोबत करीत निघालेली माणसे अंधारालाच उजेड समजण्याचा प्रमाद करीत आहेत. उजेडाचं स्वप्न पाहत नव्या क्षितिजांच्या शोधास निघालेल्या माणसाचा प्रवास त्याच्या विजिगीषू वृत्तीचे द्योतक होता. अभ्युदयाच्या प्रवासासाठी चालती पावले पथसंभ्रमित होऊन अंधारातून पुन्हा अंधाराकडे वळती होत आहेत. गतीची स्वप्ने प्रगतीच्या गुंत्यात अडकत आहेत. जगण्याला साधेपणाची किनार असली की, दुसऱ्या कोणत्या मखरात मंडित होण्याची आवश्यकता नसते. पण मानसिकता एकूणच बटबटीत जगण्याकडे झुकायला लागली की, मखरेच प्रिय वाटायला लागतात. जीवनाचे परिघ पर्याप्त समाधान शोधण्याचं विसरून आसपास दिसणाऱ्या झगमगीच्या दिपवणाऱ्या प्रकाशाचे कवडसे आपल्या अंगणी आणण्यासाठी अश्वत्थाम्याची अस्वस्थ वणवण करीत आहेत. नियतीने ललाटी लेखांकित केलेल्या शापित जगण्याला पदरी घातलेले दान समजून मुक्तीच्या शोधात भटकत आहेत. माणसाच्या जगण्याला परिस्थितीचे भान असले की, वास्तव दुर्लक्षित होत नाही. वर्तनाला सामाजिकतेचे आयाम असले की, आसपास दिसणारी सामाजिक दुरिते दुःसह होतात. जगण्यातील वैयक्तिक वैगुण्येही वेदनादायी होतात. हाती असणाऱ्या मूठभर परिघाला विश्व समजण्याचा प्रमाद घडतो, तेव्हा व्यवस्थेतील विसंगतीकडे दुर्लक्ष होते आणि स्वार्थाच्या सुळक्यावर लक्ष केंद्रित होते. स्वार्थ हेच जगण्याचे सुयोग्य परिमाण वाटायला लागले की, मनाला संमोहित करून संभ्रमित करणारे सुळके प्रिय वाटायला लागतात.

समाजात साऱ्यांनी सुखाने नांदावे म्हणून माणसाने सुव्यवस्था स्थापित करताना जीवनाच्या गती आणि प्रगतीला सार्वजनिक अपेक्षांमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. साऱ्यांना समाधानाने जगता यावे म्हणून मूल्यव्यवस्थेची निर्मिती करून त्यांना नैतिकतेचे अधिष्ठान दिले. जगण्याच्या वाटेवर मनी वसणाऱ्या स्वप्नांची रांगोळी माणूस आदिम काळापासून काढीत आला आहे. सुखांच्या परगण्यात नेणाऱ्या वाटांना जोडणाऱ्या रेषा अनेक वर्षापासून रेखाटतो आहे. जगण्याच्या पसाऱ्यात विखुरलेल्या दिशाहीन टिंबांना जोडणाऱ्या रेषा शोधतो आहे. मनात उदित होणाऱ्या आकांक्षांच्या स्वप्नांनी सजवलेल्या महालाच्या आकृत्या कोरीत आहे. जगणं समाधानाचं व्हावं म्हणून ओंजळभर सुखाच्या शोधात भ्रमित करणाऱ्या मृगजळामागे धावतो आहे. आभासी सुखांच्या चकव्यात अडकून आनंदाचं चांदणं हाती लागणाऱ्या अडनिड वाटा शोधतो आहे. सुखांचे सुवर्णकण हाती लागावेत या अपेक्षेने सारासार विवेक विसरून वर्ततो आहे. विधिनिषेधशून्य जगणं आपलं समजण्याचा प्रमाद करतो आहे. समाधानाच्या प्राप्तीसाठी अंतर्यामी अस्वस्थता धारण करून सुखांचे परगणे मिळवण्यासाठी उर फुटेस्तोवर पळतो आहे.
 
मांगल्याची आराधना करीत माणसाने मनाच्या मातीत महत्प्रयासाने मूल्य रुजवली. रुजणाऱ्या रोपट्यांना समर्पणाने सिंचित करून संवर्धित केले. सर्व सुखांचा केंद्रबिंदू माणूस असल्याने त्याच्या अपेक्षापूर्तीसाठी मर्यादांच्या काही चौकटी उभ्या केल्या. व्यवस्थानिर्मितीचा प्रयोग करतांना मूल्यांना प्रमाण मानून त्यांचे संवर्धन केले. मूल्यांचा आब राखणे आपले जीवितकर्तव्य असल्याचे समजून माणसे कधीकाळी समाजात वावरत असत. हल्ली अशी माणसे नाहीत असे नाही; पण ती एखाद्या दुर्मिळ प्रजातीसारखी होत चालली आहेत. सामाजिक मर्यादांच्या वर्तुळात वर्तताना भलेही पर्याप्त समाधान नसेल त्याला मिळालं; पण आहे त्यात सुख शोधीत तो इहतली समाधानाने नांदत असे. स्वार्थाचे परिघ समृद्ध होत गेले, तसे माणूसपण संकुचित विचारांच्या वावटळीत पाचोळ्यासारखे दिशाहीन भरकटत राहिले. साधेपणाने जगणारा विचार परिस्थितीच्या आघातांनी ध्वस्त होत गेला. झाडाला मातीने आधार द्यावा; पण मातीनेच मुळांना दगा दिला, तर बहरलेल्या झाडाचा पर्णसंभार देहावर शुष्कवेदना धारण करून विव्हळत उभा राहण्याशिवाय आणखी काय करू शकतो? मूल्ये मनःपूर्वक आपली वाटतात, तेव्हा त्यांना अंगभूत मोल असते. ती पायदळी तुडवली जातात, तेव्हा सारीच क्षितिजे बेईमान होतात. बेईमानीचा दाटलेला अंधार मिटवून टाकण्यासाठी अंधाराला छेद देत उदयाचली येणारा इमानी सूर्य सोबत असावा लागतो. पण येथल्या सूर्यालाच अविवेकाच्या ग्रहणाने ग्रासले आहे. समाजाच्या विचारात विहरणाऱ्या सगळ्याच संवेदना गोठत असतील, तर दोष नेमका कुणाला देणार आहेत?

नियतीने दिलेल्या पहिल्या श्वासापासून आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जिवांचा जगण्याचा कलह सुरूच असतो. नियतीच्या कृपेने आपल्या हाती लागलेला श्वास म्हणजे काही जीवन नाही. ते तर सगळ्यांच्याच वाट्याला येतात. पण या दोन बिंदूंना जोडणारी प्रत्येक स्पंदने जगण्याची प्रयोजने होतात, तेव्हा माणूसपणाचे नवे आयाम कळत जातात. परिस्थितीने ललाटी लेखांकित केलेला प्रवास सामान्यांसाठी वेदनादायी अनुभूती होतो, तेव्हा समाज नावाची चौकट विस्कटत जाते. माणसांच्या जगण्यातला विस्कटलेला वर्तमान पाहून संवेदनशील मनात अस्वस्थ तगमग वाढत आहे. सगळीकडेच एक अनामिक खदखद नांदते आहे. परिस्थितीचे आघात अधिक दाहक होत असल्याने वाट्यास येणारी असह्य होरपळ माणसांची नियती झाली आहे. नीतिसंमत जगण्याची प्रयोजने शोधून मूल्यांच्या वाटेने चालणे जणूकाही भूतकाळ झाला आहे. जगणं आत्मकेंद्री झालं असेल, तर त्याचं समर्थन करणारा विचार प्रबळ होतो. असा विचार समर्थनीय ठरतो, तेव्हा सज्जनांचे सामर्थ्य विकलांग होते. माणूस विश्वातील सामर्थ्यवान सजीव असल्याचे माणूसच म्हणत आला आहे. पण सामर्थ्याला स्वार्थाच्या वर्तुळांनी वेढल्यावर प्रतीत होणारी त्याची प्रतिबिंबे आंधळी होतात. देहाचं आंधळेपण निसर्गशरण अगतिकता असेल; पण स्वतःच डोळ्यांवर स्वार्थाच्या पट्ट्या बांधून अंधाराची सोबत स्वीकारली असेल, तर दोष उजेडाचा असू शकत नाही.

माणसाचं मन साऱ्या व्यवहारांचं केंद्र असतं. हे खरं असेल तर त्याला विकेंद्रीकरणाचे वरदान लाभलेले असावे. मनाला भावनांचं कोंदण लाभलं, तर त्याच्याइतकी सुंदर गोष्ट इहतली कोणतीच असू शकत नाही. मनाचं नातं मनाशी असावंच, पण त्याची सोयरिक मेंदूशी असावी. मनाची सोबत करणारा मेंदू गहाण पडला असेल, तर अंतर्यामी अधिवास करून असणाऱ्या संवेदना माणूसपण विसरतात. मेंदू बटिक झाला की, पहिला बळी जातो स्वातंत्र्याचा. स्वतंत्र विचारांनी वर्तणारा माणूस परिस्थितीच्या अंधाऱ्या क्षितिजाच्या पायथ्याशी उभा असणे विसंगती ठरते. मन, मेंदू आणि मनगट माणसाच्या जगण्याची दौलत आहे. पण केव्हा, जेव्हा तो स्वतंत्र वृत्तीने आणि स्वप्रज्ञेने आपल्या अभ्युदयाच्या आकाशाचा तुकडा शोधत निघाला असेल तेव्हा. वैयक्तिक स्वार्थापायी कुलंगड्या करणाऱ्यांच्या जगात स्वतःला त्यांचे सेवक समजणारी मने आणि मेंदू गहाण पडत असतील, तर विश्वाच्या कोणत्याही कोपऱ्यातून स्वाभिमानाचा सूर्य उदित होऊ शकत नाही. अशावेळी तेजोमय जगण्याच्या प्रार्थना तेजोहीन वाटायला लागतात. अंधाराचं अफाट सामर्थ्य असणारे कृष्णविवरे अनेक तेजोमय सूर्यांचा प्रवास संपवितात.

प्रवाहित असताना पाणी प्रवाहापासून कधीच पतित होत नाही. त्याच्या प्रांजळपणात परिसराच्या प्रतिमा प्रतीत होतात. वाहते पाणी साचते, तेव्हा त्याचे डबके होते. डबक्यांचे प्राक्तन कुजणे असते. माणसांच्या परित्राणाच्या गाथा लेखांकित करण्यासाठी प्रेमाचे प्रवाह बनून वाहणाऱ्या मनाचीही डबकी होत चालली आहेत. साचलेल्या डबक्यांवर अविचारांचे शेवाळ पसरायला लागले आहे. विचार करून वर्तणारे जीव उत्क्रांतीच्या वाटेने प्रगतीची शिखरे संपादित करतात. निसर्गाच्या या नियमाला माणूस अपवाद ठरू पाहतोय. वानराचा नर आणि नराचा नारायण होणे जिवांचं निसर्गनिर्मित प्राक्तन असतं. माणसांच्या उत्क्रांतीचा पुढचा टप्पा कोणता असेल, हे सांगणे अवघड होत आहे. मनाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना अद्यापही माणसाच्या मनाचा तळ शोधता आला नाही. तो ज्याचा त्यालाच शोधावा लागतो. तळाशी आपण कोठे आहोत, हे तपासून पाहावे लागते. आदिम अवस्थेपासून आरंभलेला प्रवास अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंतच्या त्याच्या प्रगतीची यशोगाथा आहे. प्रगतीची मिरास त्याच्या पदरी आहे. निसर्गाच्या अगाध शक्तींवर माणसाने विजय मिळवला; पण त्याच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांचं काय? त्याकडे असणाऱ्या मनाचं काय? मोठमोठ्या विजयांचा धनी असलेल्या माणसाला मन नावाच्या लहानशा गोष्टीवर अद्याप नियंत्रण का मिळवता आले नसेल? माणसांच्या आदिम अवस्थेतील भटकंतीचा पुढचा टप्पा प्राण्यांना आपलं बनवणे होता. त्यांना पाळीव बनवून त्याने आपलेसे केले. माणसाच्या आज्ञांकित राहणाऱ्या प्राण्यांनी प्रामाणिकपणा जपला. पण माणूस किती प्रामाणिक राहिला? या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड आहे. मुके प्राणी आपल्या धन्यासाठी जीव टाकत राहतात. हल्ली माणसंसुद्धा पाळीव होत चालले आहेत, असे वाटायला लागले आहे. ज्याच्याकडे पद, पैसा, प्रतिष्ठा त्यांच्या दावणीला तो बांधला जातोय.

आपत्ती संकटे माणसाला काही नवी नाहीत. त्यांच्याशी दोन हात करीत आपली विजयध्वजा तो लहरवत आला आहे. यशोगाथा लेखांकित करण्यामागे त्याचा वैयक्तिक स्वार्थ असेलही; पण त्याला सामाजिकतेचे आयामही होते. त्याच्याकडे असणारे मन डबके झाले नव्हते. स्व अधिक आत्मकेंद्रित झाला आणि स्वार्थाचे डोह अधिक खोल होत गेले. देवशरण आणि दैवशरण असणारा माणूस विज्ञानशरण झाला. विज्ञानाच्या वाटेने भौतिक सुखे त्याच्या अंगणी आली. त्यांची सोबत करीत सुखांची लालसा मनात मुक्कामाला आली. त्यांच्या सहवासात त्याला आनंद मिळू लागला. तो मिळवण्यासाठी कोणतेही विधिनिषेध न राखता मिळेल तेथून सुखे ओरबाडताना माणूस माणूसपण विसरून वागू लागला. स्वार्थाच्या व्यूहात बंदिस्त होतांना आपले कोण, परके कोण समजण्याचा विवेक हरवत चालला आहे. सहजपणाचे वरदान घेऊन वाहणाऱ्या संवेदनाच बधिरतेचा शाप घेऊन जीवनाच्या प्रांगणात नांदत आहेत. समाजात घडणारा अन्याय, अनाचार, अत्याचार पाहून सहृदय मनांमध्ये धग जागायची. आक्रंदन करणाऱ्यांचा आक्रोश अनुभवून संवेदनशील अंतरंगात अस्वस्थता दाटून यायची. अंतर्यामी कोंडलेला लाव्हा उसळून वर यायचा. क्षोभ धमण्यांतून वाहत राहायचा. पण सध्याची स्थिती पाहून देहात संचार करणारे रक्तचं गोठले आहे की काय, असे वाटण्याइतपत विचारांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे. परिस्थिती परिवर्तनाचे प्रयोग जगाला नवे नाहीत. उठाव, क्रांती त्याचा उत्कट आविष्कार होते. समाजाचे वर्तमान पाहून वाटते की, परिवर्तनाच्या वाटेने निघालेल्या क्रांतीलाही गलितगात्र होण्याचा शाप मिळाला आहे.

प्रस्थापित आणि विस्थापित अशी टोकाची दुरिते निर्माण झाली आहेत. प्रस्थापितांना विस्थापितांच्या जगण्याची वार्ताही नसावी एवढे अनभिज्ञपण जगण्यात येत आहे. वंचितांचं वेदनादायी जगणं पाहून अस्वस्थ होण्याइतपतही संवेदना समाजाच्या ठायी उरल्या नसतील का? समाजव्यवस्थाच पक्षपाती जगणं आपलं मानायला लागली असेल, तर परिस्थिती बदलाच्या वाटा हाती कशा लागतील? मनांत पेटलेला अस्वस्थततेचा वणवा विझवण्यासाठी सद्विचारांचे सिंचन घडत राहणे सार्वकालिक गरज असते. त्यासाठी परिवर्तनप्रिय पावले अपेक्षित प्रगतीच्या दिशेने वळती करावी लागतात. समाजात समतेची स्वप्ने स्थापित करण्यासाठी संघर्ष अनिवार्य झाला आहे. शोषितांच्या जगण्याला शोषण कुरतडत राहते, तेव्हा संयमाची परिसीमा घडून मनाच्या मातीत गाडलेला वन्ही वणवा बनून पेट घेतो. वंचितांच्या जगण्यात न्याय नाकारला जात असेल, तर अंतर्यामी अस्वस्थता वाढत जाऊन सत्तापरिवर्तनाचे प्रयोग घडतात. सांप्रत माणूसच सर्वबाजूंनी परास्त होतो आहे. रास्त असणारे परास्त होत असेल, तर पराभव संस्कृतीचे अटळ प्राक्तन ठरते. परास्त होणारे परगणे पाहूनही आसपास नांदणारी पराभूत मानसिकता परिवर्तनाचे पलिते प्रदीप्त करायला उद्युक्त होत नसेल, तर दोष तरी कुणाला द्यावा? नजरा फायदा नावाच्या गणितावर खिळलेल्या आणि मन स्वार्थाच्या वर्तुळाभोवती घिरट्या घालत असेल, तर संयमाची अपेक्षा करावी तरी कशी? सामान्य माणूस रोजच्या मरणाने मरतो आहे. देहात चैतन्य असूनही माणसे चालते-बोलते मृतात्मे बनून जगत आहेत. समाजाच्या जगण्याच्या काही मर्यादा असतात. त्यांचे भान साऱ्यांनाच राखावे लागते. माणसांकडून मर्यादांचे भान सुटले की, ते मनाने मृत होतात. देहाचं मरण अटळ असतं. माणूस मनाने मरणे संस्कृतीचा अवनतीच्या दिशेने घडणारा प्रवास ठरतो.

माणसांना आपल्यातील बेगडी महात्म्याचा जणू साक्षात्कार झाला आहे, असे वागणे घडत आहे. माणूस महानच, पण त्याचं सध्याचं जगणं पाहून नीतिहीन महात्म्याच्या दिवसाचं महत्त्व वाढत आहे, असे वाटायला लागले आहे. मूल्यांच्या कसदार मातीत मुळं धरू पाहणारी संवेदनांची रोपटी बेगडी महात्म्याच्या क्षणिक प्रकाशात जगतील तरी कशी? मनातले हळवे कोपरे सांभाळून जगणारी माणसे समाजाची कधीकाळी ओळख होती. सामाजिकतेचे भान असणारे निर्व्याज चेहरे समाजाचे वैभव समजले जात असत, पण चेहरे रंगवण्याच्या नादात मुखवटे प्रिय होऊ लागले आहेत. आपलं नितळपण विसरून मने ढवळून निघत आहेत. मनाच्या तळाशी साचलेला गाळ वर येवून जगणंच गढूळ होत आहे. माणसांना मुखवटे अधिक आवडायला लागले आहेत. जगाला दाखवण्याचा चेहरा सौंदर्यप्रसाधनांनी रंगवून तात्कालिक समाधान मिळेलही; पण चेहऱ्यावरून रंग उतरल्यावर काय? याचा विचार करायला कोणाला वेळच नाही. सज्जन शब्दालाही स्वार्थपूरित विचारातून निर्मित नवे अर्थ मिळत आहेत. सज्जनांच्या चारित्र्यात असणारे सद्विचारांचे गंधटिळे पावित्र्याचे प्रतीके समजली जात. सज्जनशक्तीच्या शालीन वर्तनाच्या प्रतिमा समाजाच्या मनात प्रतिबिंबित झालेल्या असत. सज्जनांचे चेहरेच प्रश्नांकित बनून संदेहाच्या चौकटीत स्थापित केले जात आहेत.

सत्तेच्या सारीपाटावर स्वार्थाच्या सोंगट्या सहज सरकवता येतात, असे समजणारे सत्ता-संपत्तीचे धनी सामान्यांना स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या मर्जीने सरकवत राहतात. स्वार्थपूरित जगण्याला प्रमाण मानणारी माणसं स्वतःची ओंजळभर सुखं साकोळण्यासाठी त्यांच्या तालावर नाचत राहतात. सुखाच्या चार क्षणांची सोबत घडावी म्हणून कोरड्या डोळ्यात स्वप्ने सजवीत राहतात. मनात सजवलेल्या स्वप्नांचा परिस्थितीच्या आघाताने चुराडा उडतो, तेव्हा जगणं पाचोळ्यासारखं दिशाहीन भिरभिरत भटकत राहतं. फाटकेपण सोबत घेऊन जगणं प्राक्तन ठरते, तेव्हा वाट्यास येणारे प्रत्येक क्षण दैवशरण अगतिकता म्हणून स्वीकारले जातात. विसकटलेल्या स्वप्नांना फक्त शाप असतो. मुक्तीचा उःशाप नसतो. वेदनांनी क्षतविक्षत होणारी माणसे अस्वस्थपण सोबत घेऊन सैरभैर होतात, तेव्हा घायाळ करणाऱ्या वेदनांनाही अर्थ उरत नाही.

सगळीकडे संवेदनाशून्य गुंता वाढत चालला आहे. जग माणसाचं असतं आणि माणसांसाठी असतं म्हणून माणसांनीच त्याला सजवायचं असतं, हे माहीत असूनही माणूसच माणसाला आडवा करायला निघाला आहे. दुबळ्यांना संघटित होण्याचं वरदान असावं; पण दुर्दैवाने त्यांना विखुरण्याचा शाप असतो. संघटित होण्यातलं कसब मुंगीसारख्या क्षूद्र जिवाला अवगत आहे. पण माणसाला हे का समजू नये, असा प्रश्न पडतो. संघटनाच्या बळावर रानावनात विहार करणारे जीव स्वजातीयांना सुरक्षित ठेवण्याची शाश्वती देतात. संघटित होत नाहीत, त्यांचा जीवनप्रवास वेदनांची गाथा ठरतो. जीवघेण्या स्थितीत जगणारी असंख्य माणसे इहतली वास्तव्यास आहेत. माणसांच्या जगात काही तुपाशी आणि काही उपाशी असणे, हा न्याय होऊ शकत नाही. वंचितांच्या, उपेक्षितांच्या विश्वात निर्माण होणारा नकार अन्याय संपवू शकतो. पण केव्हा, जेव्हा मनात अन्यायाविरोधात अस्वस्थता धगधगत असेल आणि परिवर्तनप्रिय विचारांच्या वाऱ्याने मन वणवा बनून पेटत असेल तेव्हाच. अन्याय घडूनही शांतता आहे. सगळीकडे विझलेली राख विखुरलेली. कुणीच कसे बोलत नाही अशी स्थिती. अन्याय घडत असताना अस्वस्थ न होणारी मने निर्जीव होतात. अशा मनांमध्ये नांदणारी निष्क्रिय शांतता काट्यांची टोकं बनून जखमा करणारी ठरते. अगतिकतेतून आलेले असह्यपण अधिक वेदनादायी होत असते. कोण्या एकाच्या नकाराने जग नाही बदलवता येत हे मान्य; पण संघटनाचा बुलंद आवाज स्वार्थाच्या उन्मत्त इमारती हादरवू शकतो. सुमार वकुबाची माणसे स्वतःला सम्राट समजायला लागतात, तेव्हा सामन्यांचा संतापच स्वयंघोषित सम्राटांची सिंहासने क्षतविक्षत करू शकतो. फ्रेंच राज्यक्रांतीने, रशियन राज्यक्रांतीने माणसाला हे आधीच शिकवले आहे. गरज आहे तो असा उर्जस्वल वारसा जपण्याची. परिवर्तनप्रिय इतिहास समजून घेण्याची. तो पूजनाचा विषय नको व्हायला. कोणत्याही गोष्टींचे उदात्तीकरण वाईटच. इतिहासाचे गौरवीकरण घडून स्वार्थासाठी थडगी उकरली जात असतील, तर जीवंतपण गाडले जाते, हेही तेवढेच सत्य.

संत ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वाच्या कल्याणाच्या वार्ता केल्या. कलंकरहित चांदणं त्यांचं स्वप्न होतं. मांगल्याची आराधना करीत विश्वाचे सुख त्यांनी विश्वात्मक शक्तीकडे मागितले. खलांचा नाहीतर त्यांच्यातील खलत्वाचा नाश घडावा म्हणून अपेक्षा केली. सांप्रत हे मागणं पसायदानापुरतं उरलंय. अलांछन असणारे चंद्र कलंकित होत आहेत. मार्तंड तापदायक ठरत आहेत. धवल असे जणूकाही शेष नाहीच, इतकी अविवेकाची काजळी आसपासच्या आसमंतात दाटत चालली आहे. माणसाच्या जगण्याचं मोल मुंगीच्या जगण्याइतके होत आहे. नियतीच्या हाती पडलेलं जगणं मनाशी जुळलेली माणुसकीची नाती विसरवत आहे. आस्था, आपुलकी, आपलेपण घेऊन प्रकटणारे प्रांजळपण संकुचितपणाच्या चौकटींमध्ये बंदिस्त होत आहे. सज्जनांच्या प्रामाणिक प्रयासांच्या पराक्रमात प्रतिगामी परास्त होतात, हा इतिहास आहे. पण विवेकी विरोधाचे अस्त्र हाती पेलण्याइतकेही बळ समर्थांच्या बाहूत नसावे का? संवेदनां बनून प्रकटणाऱ्या अभिव्यक्तीत नसावे का? विधायक विचारांच्या शक्तीत नसावे का?

प्रत्येकालाच आपले अहं गोंजारण्यात आनंद मिळतो आहे. तो मिळवण्याचे मार्ग प्रत्येकजण शोधतो आहे. प्रगतीच्या वाटेने निघालेल्या माणसांचे जग मोठे झाले, पण मने संकुचित झाली. वैयक्तिक उंची वाढवण्याच्या नादात सामाजिक उंची हरवत चालली आहे. समाजाची वैचारिक उंची खुंटणे माणसाच्या जगण्याला मिळालेला शाप ठरतो. अन्याय, अत्याचार, अनाचार दिसूनही कोणास काहीच म्हणायचे नसले की, परिस्थिती परिवर्तनाचे सारेच प्रयत्न थांबतात. उरतात फक्त प्रश्नचिन्हे. माणसांच्या जगण्यात थंडपण येऊन मने बर्फासारखी गोठत आहेत. बर्फाला दाहकतेचा थोडा स्पर्श झाला तरी तो वितळतो, पण माणसांच्या मनाचं गोठलेपण कोणतं हिमयुग धारण करून आहे आणि कितीकाळ असेल? कोणास माहीत. सांगणं अवघड आहे. अशावेळी विंदा करंदीकरांच्या कवितेतील ओळी खऱ्या वाटायला लागतात आणि म्हणावेसे वाटते, 'माझ्या मना बन दगड.'