कविता समजून घेताना... भाग: पंचवीस

By // No comments:
वारी

निघाला वारीला
तुझा वारकरी
शेती, माती घरी
सोडुनियां

पेरणीची चिंता
नाही विठू फार
तुझ्यावरी भार
संसाराचा

विठ्ठलाचे नाम
देहाच्या कणात
आषाढ मनात
बरसला

श्वासाचा मृदुंग
पांडुरंग म्हणा
भक्तीरूपी वीणा
झंकारली

कोरडाच गेला
मागचा हंगाम
जगण्यात राम
नाही आता

निरोप ढगाला
सांग विठुराया
घरट्याची रया
उदासली

शेतकऱ्यांसाठी
उघड रे कान
समृध्दिचे दान
देई देवा

गळून पडल्या
जातीच्या साखळ्या
प्रेमाच्या पाकळ्या
फुलारल्या

कुठला दिवस
कुठली रं रात
माणूस ही जात
वारी सांगे

वारीच्या मिसानं
जमे गोतावळा
समतेचा मळा
वाळवंटी

माणसास नको
देऊ युध्द तंत्र
कारुण्याचा मंत्र
देई देवा


नितीन देशमुख


वैशाखाच्या वणव्याने आसमंत होरपळून निघत असतं. जिवांची काहिली सुरु असते. उन्हाळा ऐन उमेदीत असतो. चैत्र, वैशाखाच्या पावलांनी चालत आलेल्या उन्हाळ्याच्या काहिलीत सगळेच कावून गेलेले. शेतकरी कामांच्या पसाऱ्याने हैराण. समोर अनेक प्रश्न उभे. त्यांची उत्तरे पाऊस घेऊन येणार असतो. मनात काही आडाखे बांधलेले. काही स्वप्ने सजवलेली. ती सूत्ररूप स्वप्ने पूर्ण करण्याचा सांगावा घेऊन आषाढाचे आगमन होते. शेतशिवारातून कामांची एकच धांदल उडते. उद्याच्या उज्ज्वल भविष्याची बिजे धरतीच्या कुशीत पावसाच्या साक्षीने पेरली जातात. सगळ्यांनाच घाई झालेली. पेरणीची वेळ साधण्यासाठी सगळीच जमवाजमव चाललेली. कुणाकडे सगळंच काही. कुणाकडे काहीच नाही. काही नाही म्हणून मदतीचे हात शोधले जातात. शेतीची तुंबलेली कामं एकेक करून हातावेगळी होऊ लागतात. दिवसाचे प्रहर अपुरे पडायला लागतात.

कामाच्या धबडग्यात आषाढ ऐन मध्यावर येतो. आषाढाच्या अगमनासोबत वारकऱ्यांच्या मनात विठ्ठलभेटीची ओढ जागू लागते. आसपासच्या वाटांवरून, परिसरातून विठ्ठल नामाचा गजर कानी यायला लागतो. एकीकडे कामांची धांदल, तर दुसरीकडे विठ्ठलाच्या भेटीची आस. या सुखसंवादी द्वंद्वात मन झोके घेऊ लागते. अंतरी वस्तीला असणारा भक्तीचा रंग घननीळ होऊ लागतो. मन पंढरीच्या वाटेने पाखरासारखे घिरट्या घालत असते. पण कामांचा रगाडा काही संपायचे नाव घेत नाही. शेवटी मनातील भक्तीभाव उसळी घेतोच. रस्ते भक्तांच्या पावलांनी चालू लागतात. कुठूनतरी गावशिवाराच्या रस्त्याने भजनाचे सूर कानी येऊ लागतात. दूर क्षितिजाकडून माणसांच्या आकृत्यांचे काही ठिपके दिसू लागतात. अस्पष्ट आकृत्या ठळक होऊ लागतात. कपाळी गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळा आणि मुखी विठ्ठल नामाचा सोहळा घेऊन भक्तांचा मेळा पंढरपूरच्या वाटेने सरकत राहतो. आणखी एक ठिपका मेळ्यात सामावून जातो.

आसक्तीच्या धाग्यांचा गुंता तसाच सोडून पावले वारीकडे वळती होतात. वारकरी आणि विठ्ठलाचे एकरूप झालेलं हे नातं. मनाला कितीही आवर घातला, तरी पावले नकळत ओढत नेतात त्या वाटेवर. मैलोनमैल अनवाणी धावणाऱ्या पावलांमध्ये पंढरीच्या वाटेने पळायचं बळ कुठून येत असेल? कोणत्याही भक्ताला विचारून पाहा, ही सगळी पांडुरंगाचीच कृपा असेच तो सांगतांना दिसेल. विठ्ठल त्यांच्या आयुष्याचा उर्जास्त्रोत असतो. तो त्याच्या विचारातच नाही, तर जगण्यात सामावून एकरूप झालेला.

ही कविता भक्तीच्या ‘अभंग’ रंगांना दिमतीला घेऊन प्रसन्नतेचा परिमल पेरत येते. आयुष्याची प्रयोजने कोणी कुठे शोधावीत, हा ज्याच्या त्याच्या आकलनाचा भाग. पण भक्तीचा रंग ज्याच्या मनावर चढला असेल, त्याला सृष्टीच्या मोहपाश विणणाऱ्या रंगांशी कसलं आलंय कर्तव्य. त्याच्यासाठी काळा रंगच एकमेव परिमाण. भक्तीचा कल्लोळ घेऊन वाहणाऱ्या या रचनेतील शब्द विठ्ठलाच्या रंगाइतकेच नितळ. सहजपणाचे साज लेवून आलेले शब्द अंतरीचा आवाज बनून निनादत राहतात मनाच्या गाभाऱ्यात. विठ्ठल भक्तीचा गोडवा घेऊन येणारे हे शब्द भक्ताच्या श्रद्धेइतकेच निर्मळ, निर्व्याज. भक्तीच्या सुरांचे साज लेऊन येणारी ही कविता अंतरीचा भावकल्लोळ आहे. भक्ताने भगवंताच्या चरणी समर्पित भावनेने फुले ठेवावीत, तशी कवी शब्दांची फुले विठ्ठल चरणी समर्पित करतो.   

वारी मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा आहे. मराठी मातीचं सांस्कृतिक संचित. भक्तीचा सहजोद्गार बनून वारीच्या वाटेने वाहणाऱ्या सगळ्या माणसांची जातकुळी एकच, ती म्हणजे विठ्ठल. पांडुरंग त्यांच्या मनाचा विसावा. वारीच्या वाटेने चालणारी माणसे कुणी तालेवार नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या झुली परिधान करून कुणीही वारीत चालत नसतात. वर्षानुवर्षे काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस नशिबाने दिलेलं फाटकं जगणंही आपलं मानतो. उसवलेलं आयुष्य सोबत घेऊन, आहे त्यात सुख शोधत राहतो. ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंतःकरणाने पांडुरंग भेटीला नेणाऱ्या रस्त्याने चालत राहतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचला. सोयीनुसार त्याच्या सुखांची परिभाषा कधीच नाही बदलली. विठ्ठल हेच त्याचे खरे सुख.

मनाला ओढ लावणारं वारीत असं काय असावं? माणसं वारीच्या वाटेने का धावत राहतात? त्यांच्यात हे सगळं कुठून येत असेल? वारीत एकवटलेली माणसं पाहून नेहमीच एक जाणवतं की, येथे विज्ञानप्रणित निकषांना प्रमाण मानून मनातल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करून हाती फार काही लागण्याची शक्यता नाही. या साऱ्या प्रश्नांची उत्तरे भक्तांच्या अंतर्यामी विलसणाऱ्या भावकल्लोळातून शोधायला लागतात. ही सगळी श्रद्धावंत माणसं वारीच्या वाटेने वावरताना मनातला अहं गावाची वेस ओलांडतानाच मागे टाकून येतात आणि माणूस म्हणून एक होतात.

दुःखे, संकटे, समस्या मातीत जन्म मळलेल्या माणसांना नवीन नाहीत. त्यांच्याशी दोन हात करीत आला आहे तो. पण परिस्थितीच सगळीकडून कोंडी करायला लागते. कोरड्या जाणाऱ्या हंगामात तगून राहण्याची उमेद क्षणाक्षणाला तुटत जाते. अंतरी अधिवास करणारा आस्थेचा ओलावा आटत जातो. जगण्यात राम दिसत नाही. आसक्तीचे धागे एकेक करून सुटू लागतात. आयुष्याचं रामायण होण्याची वेळ येते. तेव्हा विकल झालेलं मन उसवणाऱ्या संसाराकडे हताशपणे पाहण्याशिवाय काय करू शकते? काडीकाडी जमा करून उभ्या केलेल्या घराची रया निघत चाललेली. तरीही आभाळाला दया नाही येत, म्हणून तो विठ्ठलाला विनवणी करतो. ओसाड अंत:करण असणाऱ्या आभाळाला आमचं सांगणं नाही कळणार, निदान तू तरी ओथंबलेल्या ढगांना निरोप दे! आमचे आवाज निदान तुझ्या कानी पडू दे! कोणी बंगला, गाडी, माडी मागत असेलही. पण याला यातलं काही नको. पोटापुरती पसाभर समृद्धी पदरी पडावी म्हणून पांडुरंगाला साकडे घालतो.  

वारी साऱ्यांना आपल्यात सामावून घेते. तुम्ही राव-रंक कुणीही असा, सत्तेची वस्त्रे विसरून वारीत विरून जात असाल, तर सगळ्यांनाच माउलीरूप होता येते. कोणत्याही भेदभावाच्या अतित असणारी वारी माणसांच्या विचारांचा परिघ विस्तारत नेते. मनात निर्माण झालेलं मीपणाचं बेट वारीत पार वितळून जातं. मागे उरतं निखळ माणूसपण. चार दिशांनी येणारी चार माणसं, चार दुःखं दिमतीला घेऊन आलेली. या साऱ्यातून मुक्ती मिळू दे, म्हणून त्याला साकडं घालायचं असतं. वारीसोबत वावरतांना अनोळखी मने संवाद साधतात. संवादाचे साकव उभे करून प्रवास घडत राहतो. आपली त्यांची सुख-दुःखे एकमेकांना सांगितली जातात. ऐकली जातात. मनात लपवलेले दुःखाचे कढ वाटून हलके होत जातात. केवळ मलाच दुःखे, वेदना, यातना, समस्या नाहीत, ही जाणीव होऊन जगण्याचं बळ वाढत जातं. आयुष्याची प्रयोजने अधिक गडद होत जातात.

विठ्ठल सर्वसामान्यांचा समन्वयवादी देव आहे. माणसांचं रोजचं अवघड जगणं सुघड करणारा. रोजच्या मरणाला सामोरे जाणाऱ्या माणसांच्या मनात जगण्याचं प्रयोजन पेरणारा. विठ्ठल महाराष्ट्राचा सामाजिक देव. ना त्याच्या हातात कोणती आयुधे, ना कोणती अस्त्रे-शस्त्रे. भक्ताला तो हेच सांगत असावा की, तुझं नितळ, निर्मळ मन हेच जग जिंकण्याचं आयुध आहे, ते सांभाळलं की पुरे. जग जिंकण्यापेक्षा स्वतःला जिंकलंस तरी खूप झालं.

वंचित, उपेक्षित, अव्हेरलेल्या जिवांचा जगण्याचा एकमेव आधार श्रद्धा असते. वेदनांनी विसकटलेल्या मनात संत-महात्म्यांनी विचाराची बिजे रुजवली. समाजाच्या विचारात परिवर्तन घडवून आणण्याचे काम केले. सर्वसामान्यांची गरज देव आणि श्रद्धा असते, हे पाहून सहज पेलवेल असे दैवत विठ्ठलाच्या रूपाने त्यांच्या हाती दिले. स्वतःची कोणतीही ओळख नसणाऱ्यांना विठ्ठलाच्या रूपाने आधार गवसला. भागवतभक्तीच्या भगव्या पताका मुक्तीचे निशाण बनून फडकल्या. मातीचा गंध लेऊन वाहणारा सत्प्रेरित विचार या पताकेखाली एकवटला. साऱ्यांच्या अंतर्यामी समतेचा एकच सूर उदित झाला. एकत्र आलेली पावले चालत राहिली पंढरपूरच्या वाटेने, मनात श्रद्धेचा अलोट कल्लोळ घेऊन.

भागवतसंप्रदायाची सगळी व्यवस्था उभी आहे श्रद्धेच्या पायावर. जगण्याची साधीसोपी रीत संतानी सामान्यांच्या हाती दिली. जातीयतेचे प्राबल्य असलेला तो काळ. विषमता पराकोटीला पोहोचलेली. माणसातील माणूसपण नाकारणाऱ्या मानसिकता जागोजागी प्रबळ झालेल्या. या विपरीत विचारांच्या वर्तुळांना ओलांडून अठरापगड जातीजमातीची माणसे भागवतधर्माचे निशाण हाती घेऊन एकत्र आली. संतांनी सामान्यांच्या सन्मानाने जगण्याचा विचार दिला. हाच विचार जगण्याचे अभिधान झाले आणि भक्तीचे अंतिम विधान ठरले. तत्कालीन समाजाचा परिवेशच सीमांकित होता. त्यात परिवर्तन घडवून आणणे एक अवघड काम होते. दिवा पेटवून रात्रीचा अंधार थोडातरी कमी करता येतो. पण विचारसृष्टीला लागलेलं ग्रहण सुटण्यासाठी परिस्थितीत परिवलन घडून येणे आवश्यक असते. समाज पारंपरिक विचारांच्या वर्तुळातून पुढे सरकणे आवश्यक होते. सामान्यांच्या विचारकक्षेत असणारा अंधार दूर करण्यासाठी संतांनी सद्विचारांचे पलिते प्रदीप्त करून पावलापुरता प्रकाश निर्माण केला. संतांच्या लेखणी-वाणीतून अभंगसाहित्य प्रकटले.

विठ्ठल सर्वसामान्यांचा हाकेला धावून जाणारा. पुंडलिकासाठी विटेवर वाट पाहत तिष्ठत राहणारा. त्यांनी फेकलेली वीट सिंहासन समजून त्यावर आनंदाने विराजमान होणारा. भक्तांच्या भेटीची ओढ खरंतर त्यालाच अधिक. तो साऱ्यांचाच आहे. तो सापडावा म्हणून सायासप्रयास करायची आवश्यकताच नाही. त्याला भेटायचं तर कुठल्या सोवळ्या-ओवळ्याची वस्त्रे परिधान करून जाण्याची आवश्यकता नाही. हृदयातून उमलून येणारा आणि ओठातून प्रकटणारा प्रत्येक शब्द गीत होतो. त्याच्या नामस्मरणासाठी हातात टाळ असले तर उत्तमच, नसले तर टाळ्याही चालतात. म्हणूनच संत जनाबाई ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणाल्या असाव्यात. संत सावता कधी विठ्ठलाच्या दर्शनाला धावले नाहीत. त्यांना त्यांचा विठ्ठल कांदामुळाभाजीत दिसत होता. संत सेना महाराजांना आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगण्यात सापडत होता. संत नरहरींना विठ्ठल नामाचा व्यवहार कळला होता. म्हणूनच की काय, पांडुरंगालाही भक्तांचा लळा होता.

भगवंताला भक्तांची कामे करण्यात कोणतेही कमीपण कधी वाटले नाही. तो संत जनाबाईंच्या सोबत दळण दळत होता. संत गोरोबांच्या घरी मडकी घडवण्यासाठी चिखल तुडवण्यात त्याला आनंद मिळत होता. संत चोखोबांच्या सोबत गुरे ओढत होता. संत रोहिदासांना चांबडं रंगवून देत होता. संत कबीरांचे शेले विणीत असे. सगन कसायाच्या सोबत मांस विकायला बसत असे. म्हणूनच की काय साऱ्यांना तो आपला आणि आपल्यातील एक वाटत असे. विठ्ठलाने भक्तांच्या हाकेला धावून जाण्याचे व्रत कधी टाकले नाही. या गोष्टी कदाचित विज्ञानयुगात कपोलकल्पित वाटतील. विज्ञानाच्या परिभाषेत असंभव वगैरे वाटतील. याबाबत संदेह नाही. पण विज्ञानाचा प्रदेश जेथे संपतो तेथून श्रद्धेचा परगणा सुरु होतो, हे वास्तवही नजरेआड करून चालत नाही. वारकऱ्यांच्या श्रद्धा विठ्ठल चरणी समर्पित आहेत. श्रद्धेत डोळसपणा असेल, तर भक्तीवर आक्षेप घेण्याचे कारण नाही. श्रद्धाशील अंतःकरण कोणतातरी आधार शोधत असते. त्यांच्या जगण्याला आश्वस्त करणारा आधार विठ्ठल होत असल्यास संदेह निर्माण होण्याचे कारण नाही. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ हे संत नामदेवांचे म्हणणेही अशा भूमिकेत खरेच ठरते. विठ्ठलभक्तीचे साध्यही ज्ञानदीप प्रज्ज्वलित करणे हेच आहे. भक्तीतून भावनांचा जागर करीत भावकक्षा विस्तारत नेणे, हेच संतांच्या साहित्याचे, प्रबोधनाचे उद्दिष्ट होते.

गेल्या सहा-सातशे वर्षापासून महाराष्ट्रातील माणसे आषाढी-कार्तिकीला वारीच्या वाटेने चालत आहेत. संसारातील समस्या, सुख-दुःख सारंकाही विसरून विठ्ठलाच्या ओढीने वारीला जात आहेत. चंद्रभागेतील पाण्याच्या स्पर्शाने पुलकित होत आहेत. विठ्ठलाची भेट व्हावी. त्याच्या पायी क्षणभर माथा टेकवावा, अशी अपेक्षा त्यांच्या मनात असतेच. पण एवढे सायासप्रयास करूनही विठ्ठलाचे दर्शन नाहीच झाले, तरी यांच्या मनात कोणताही राग नाही आणि तसा आग्रहतर नाहीच नाही. नुसत्या कळसाचे दर्शन झाले तरी आत्मीय समाधान त्यांच्या अंतर्यामी विलसते. मग प्रश्न असा निर्माण होतो की, हे सगळे भक्त का करीत असावेत एवढे सव्यापसव्य? का करीत असावेत एवढे सायासप्रयास? कदाचित आपल्या पाठीशी विठोबा उभा आहे आणि तो जगायला प्रयोजने देतो, असे त्यांना वाटत असेल का? कारणे काहीही असोत, आषाढ मासाचा प्रारंभ झाला की, आजही मराठी माणसाचे मन पंढरपुराकडे धाव घेतं एवढं मात्र नक्की. विठ्ठलभक्तीचं हे बीज जणू त्याच्या रक्तातच पेरून आलेलं असतं. परिस्थितीच्या अवकाशात ते वाढत जातं. दिसामासाने वाढणाऱ्या भक्तीच्या या रोपट्याला आलेलं फळ म्हणजे विठ्ठल. नाही का?

चंद्रकांत चव्हाण
••