khedyakade | खेड्याकडे

By
खेड्याकडे चला!

शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुसार एकत्र लावताना, माझ्याच वर्गातील काही मुली सर, आत येऊ का? म्हणून विचारीत वर्गात आल्या. त्यांना काहीतरी विचारायचे आहे, त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते. “हा, बोला काय तक्रार तुमची?” म्हणून मी त्यांना बोलतं केलं. थोड्या थांबल्या. काय बोलावं याचा विचार करीत राहिल्या. त्यातील एकीने विचारले, “सर, ‘खेड्याकडे चला’ या विषयावरील निबंधाविषयी विचारायचं आहे. सर, या निबंधात नेमकं काय लिहावं? नीट समजतच नाही.” जमा करून घेतलेल्या उत्तरपत्रिका थोड्या बाजूला ठेवल्या अन् मुद्दामहूनच म्हणालो, “समजत नाही म्हणजे? तुम्हाला वर्गात निबंधलेखन शिकवलं. निबंध कसे लिहावेत, हे समजावे म्हणून उदाहरणासह नोट्ससुद्धा दिल्या. पुस्तकातील ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या पाठांचं अध्यापन सुरु असताना त्या संदर्भात ओघाने आलेले बोलणं तुम्ही ऐकत होतात. समजून घेत होतात. मग तरीही पुन्हा असे पहिले पाढे पंचावन्न कसं काय? तुम्हाला खेडी माहीत नाहीत. खेड्यांविषयी काहीही वाचलं, ऐकले नाही तुम्ही?” असं काहीसं बोलून त्या काय बोलतात, म्हणून माझं बोलणं थोडं थांबवलं.

माझ्या बाजूला घोळका करून उभ्या असलेल्या मुलींमधून एक मुलगी बोलती झाली. म्हणाली, “सर, तुमचं म्हणणं सगळं ठीक आहे. खेडं, खेड्यातील जीवन, तेथील माणसांचे दैनंदिन दिनक्रम, त्यांचे जीवनव्यवहार याबाबत वाचून माहीत आहे; पण ते पुरेसं आहेच कुठे? आणि या ग्रामीण जगण्याचा आम्हाला अनुभव तरी असा कुठं आहे!” त्या मुलीचं बोलणं रास्तच होते. थोडा विचार केला. मनात म्हणालो, या मुलींचं तरी कुठं चुकतंय. जर अनुभूतीच नसेल, तर सहानुभूती तरी कुठून निर्माण व्हावी? विषयाची पुरेशी माहितीच नसेल, तर या विषयावरील निबंधाचे लेखन त्यांना करता कसे येईल? लागलो निबंधाविषयी त्यांच्याशी बोलायला. त्यांनी या निबंधात काय, कसं, किती लिहावं म्हणून बोलत राहिलो. निबंधाचे लेखन व्यवस्थित करता यावे यासाठी एक एक मुद्दे सांगत राहिलो. त्या ऐकत राहिल्या. काहींनी ऐकलेले मुद्दे मनात साठवले. काहींनी हाती वही, पेन घेऊन ऐकलेले मुद्दे कागदावर गोठवले. त्यांचं समाधान झालं असावं. वर्गात जशा चिवचिव करीत आल्या तशाच चिवचिवाट करीत बाहेर निघूनही गेल्या. उत्तरपत्रिकांचा गठ्ठा घेऊन जमा करण्यासाठी मीही शिक्षक दालनाकडे चालता झालो.

सराव परीक्षा सुरु असल्याने असेल त्यात हा प्रश्न निबंधासाठी विचारलेला. नाहीतर असेल कोणत्यातरी सराव प्रश्नपत्रिका संचात. त्यांना अपेक्षित उत्तर नसेल मिळालं कुठे आणि असलं तरी त्यांच्या मनाप्रमाणे नसेल, म्हणून आल्या धावतच विचारायला. कदाचित आज ऐकलेल्या चर्चेवरून, मुद्द्यांवरून लिहितीलही निबंध बऱ्यापैकी. पण त्या मुलींचं बोलणं मात्र मनात घर करून राहिलं. ‘आम्हाला खेड्यातल्या जगण्याचा अनुभव तरी कुठे आहे?’ त्यांचं म्हणणं तसं खरंच. आताच्या पिढ्यांची गावाशी असणाऱ्या संपर्काची नाळ तुटत चालली आहे. ती टिकवून ठेवण्याची प्रयोजनेही फारशी उरली नाहीत. यांच्यातील बहुतेक मुलामुलींचे आईबाबा, त्यांच्या आदल्या पिढ्या गावातच घडल्या, वाढल्या. नंतर शिकूनसवरून उदरभरणाच्या क्रमसंगत वाटेवरून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना गावातून बाहेर पडावे लागले. शहरात येऊन स्थिरावले. विसावले. तरीही गावाशी जुळलेल्या त्यांच्या मनाच्या तारा गावपणाच्या आठवणींनी स्वरांकित होत राहिल्या.

गाव आणि शहराला जोडणारी त्यांची मने आस्थेचे साकव बांधून आपल्या लहानपणातील वास्तव्याच्या भूमीशी निगडित राहिले. नंतरच्या पिढ्यांनी सर्वसुखसुविधांनी मंडित काळात जन्म घेतला. सुविधा म्हणजेच जीवन अशा समजाने गावाशी, गावपणाशी फारसं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही. घरच्यांनी, आप्तस्वकियांनी गावाशी, ग्रामसंस्कृतीच्या प्रवाहाशी त्यांना आणण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र इन्टरनेट, फेसबुक, बर्गर, पिझ्झा, सुपरमार्केट, मॉल कल्चरमध्ये वाढणारी मुलं अग्रीकल्चर संस्कृतीशी तितकीशी जुळलीच नाहीत. गावाकडच्या घरातील मंगलकार्ये, सणवारांना जाणारी ही मुलं तशी गावात प्रासंगिकच थांबली. तिथं नाही रुजू शकली.

रुजणार तरी कशी? त्यांच्या अस्तित्वाच्या मुळांना संघर्ष करीत टिकून राहण्यासाठी ओलावा शोधण्याची आवश्यकताच नव्हती. असली तरी फार थोडी. कुंडीतल्या शोभेच्या रोपाप्रमाणे काळजी घेत त्यांचं भरणपोषण होत राहिलं. जगण्यासाठी संघर्ष करीत, वाऱ्याशी हितगुज करीत, आभाळाला स्पर्श करण्याचं स्वप्न उरी घेऊन फुलणाऱ्या माळावरील एकाकी फुलाचं फुलणं त्यांच्या वाट्याला आमच्या पिढ्यांनी येऊच दिलं नाही. आमची पिढी, आम्ही अभावात जगलो. जगण्याचा वाटांनी स्वतःला शोधीत येथे आलो. पण खरं जगणंच राहून गेलं. ही भावना मनात कायमच सोबतीला असल्याने निदान पोरांना असं उपेक्षित जिणं जगावं लागू नये, म्हणून काळजी घेत राहिलो. या रोपट्यांना रुजवण्यासाठी हवं नको, ते करीत राहिलो. आम्हाला जे करता आले नाही. मनात असूनही नियतीने तशी संधीच दिली नाही, म्हणून यांना तरी अभावग्रस्त जीवनाला सामोरे जायला लागू नये, या विचाराने त्यांना वाढवीत, घडवीत राहिलो.

बऱ्याचवेळी आपण ऐकतो, वाचतो भारत कृषिप्रधान देश आहे. म्हणून पर्यायाने तो खेड्यांचाही देश आहे. सुमारे साडेपाच- सहा लाख खेड्यांनी या देशाचं देशपण जपलं आहे. देशाला घडवलं आहे. अजूनही बराचसा भारत खेड्यातच वसला आहे. खेडी या देशाचा गौरव आहेत, अस्मिता आहेत. म्हणूनच की काय महात्मा गांधीनी ‘खेड्याकडे चला’ या ग्रामोद्धाराच्या मंत्राचा जागर करीत प्रजेला खेड्याकडच्या वाटांनी वळते करण्याचा प्रयत्न केला. जीवनाच्या संपन्नतेचा पथ दाखवीताना आपणच आपल्या अस्तित्वाच्या मुळांचा शोध घेण्यास प्रवृत्त केले. खेडी घडली तर देश घडेल, या उदात्त विचारातून परंपरेच्या जोखडात बंदिस्त असलेल्या ग्रामजीवनाला मुक्तीचा ध्यास घेण्यासाठी समर्पणाचे श्वास दिले.

अशाच समर्पित भावनेतून महाराष्ट्रही घडला आहे. तापी, पूर्णा, कृष्णा, भीमा नद्यांच्या पाण्याने सिंचित आणि सातपुडा, सह्याद्रीच्या कडेकपारीनी मंडित असलेला महाराष्ट्र देशाचं राकट, कणखर वैभव आहे. जीवन समृद्धीच्या वाटा शोधणाऱ्या, गती अन प्रगतीचे नवे आयाम उभे करणाऱ्या सुमारे त्रेचाळीस हजार खेड्यांनी हे ‘महा-राष्ट्र’ घडविले आहे. याच खेड्यांनी ‘महाराष्ट्र’ संस्कृती घडविली आणि वाढविलीही आहे. उदात्त हेतूने प्रेरित सत्ताकारण, राजकारण करताना परकीय आक्रमकांशी, आक्रमणांशी समर्थपणे दोन हात करीत संघर्षातून ‘स्वराज्य’ निर्मितीचे तोरण या भूमीच्या ललाटी बांधणाऱ्या, युगप्रवर्तक छत्रपती शिवबांनी मराठी मनाची अस्मिता पुलकित केली. या मातीतून ग्रामव्यवस्था सक्षम केली. शेकडो वर्षाच्या इतिहासाची परंपरा असणारा महाराष्ट्र ‘महान राष्ट्र’ करण्याचं काम खेड्यांनीच केलं. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृती, संस्कार, इतिहास घडविणारी बहुतांश ध्येयवेडी माणसं खेड्यातून, खेड्यांच्या मातीतून सत्व आणि स्वत्व घेऊन महाराष्ट्राच्या इतिहासाचे कर्ते म्हणून प्रकटले.

कधीकाळी गावाचं गावपण सांभाळीत ‘स्वयंपूर्ण’ जगणाऱ्या ग्रामजीवनावर ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी राजवटीच्या आगमनाने आघात झाला. औद्योगिकक्रांतीने साम्राज्यवादी राष्ट्रांच्या स्वार्थपरायणतेला महत्वाकांक्षेचे धुमारे निर्माण केले. त्यांच्या सत्तालालसेतून येथील ग्रामव्यवस्थेत, व्यवस्थापनात प्रतिगामी बदल घडले अन् या बदलांनी हळूहळू गावंही स्वतःचा चेहरा हरवून बसली. शतकानुशतके अनुभवातून मिळविलेल्या शहाणपणावर, कौशल्यावर जगणारी साधी माणसं या व्यवस्थेने विकल केली. या अभिशापित सत्तेशी संघर्ष करीत, धडका देत स्वातंत्र्य मिळवलं. स्वातंत्र्याच्या आगमनाने असंख्य भारतीयांच्या मनात नवअस्मितांचा जागर घडत राहिला. सुख-सुविधांनीमंडित जगणं घडवण्याचा विचार आकांक्षांच्या क्षितिजावरून उदयाचली आला. कृषिप्रधान व्यवस्था असणाऱ्या आपल्या देशाच्या विकासाचा पथ ग्रामीणपरिसरातूनच अपेक्षित प्रगतीच्या, साध्याच्या दिशेने जातो याची आठवण करून देत ‘खेड्यांकडे चला’ म्हणीत गांधी नावाचा महात्मा खेडी, खेड्यातील जीवनात आनंदपर्यवसायी परिवर्तन घडवू पाहत होता. त्यांचा हा विचार सोबतीला घेऊन स्वातंत्र्यानंतर गावांना गावपण देण्यासाठी वेगवेगळ्या योजना हाती घेऊन महाराष्ट्र गावांच्या विकासाकडे वळता झाला; पण योजनातून खेडी खरंच पूर्णतः बदलली का? या प्रश्नाचे उत्तर काही अद्याप मिळत नाहीये. स्वातंत्र्योत्तर काळात खूप प्रयत्नांनी खेड्यांसाठी विकासाभिमुख योजना आखल्या गेल्या. मुलभूत सुविधा, उद्योग, आरोग्य, शिक्षणादींच्या माध्यमातून रुजवल्याही. भलेही त्यांना नेत्रदीपक, सर्वंकष वगैरे असे काही नसेल; पण यश मिळाले आहे, हे वास्तव आहे. पण तरीही अजून बरेच प्रश्न शिल्लक आहेत. ज्यांची उत्तरे शोधायची राहिली आहेत.

खेडी ओस पडत असल्याचे बोलले जाते. आपण ऐकतो. प्रसंगी अनुभवतोही आहोत. खेड्यातून जगण्याच्या वाटा शोधत माणसं शहरांकडे धावत आहेत. शहराचं बकालपण वाढत आहे. खेड्यात जगताना निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी बाहेर पडलेली माणसे शहरातील नव्या प्रश्नांना सामोरी जात आहेत. भाकरीसाठी चाकरी शोधत आलेली, ही माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. खेड्यातील तगमग शहराच्या झगमगाटाकडे आकर्षित होतेय. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. शासनस्तरावरून प्रयत्न होऊनही बेकारी, दारिद्र्य, उपासमार, अंधश्रद्धा, जातीयतेचे अभिलेख काही मिटत नाहीत. ललाटी लिहिलेल्या अशा अभिशापातून मुक्ती काही होत नाही.

जगण्याचं निर्व्याजपण शिकविणाऱ्या संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराजांचे व्यसनमुक्तीचे प्रयत्न आदर्शरूपाने समोर असताना, व्यसनांच्या आवर्तात खेडी का अडकतायेत? एकवेळ गावात दूध मिळणार नाही; पण अपवाद सोडले तर मद्याचे मळे गावोगावी बहरलेले सापडतील. व्यसनाधीनता वाढत आहे. व्यसनांनी प्रवाहपतित झालेल्यांना प्रतिष्ठेच्या प्रांतात कसे आणता येईल? प्रबोधनाच्या परगण्यात प्रवेशित करण्यासाठी विचारांचे परगणे उभे करावे लागतील. ग्रामीण, शहरी राहणीमानातील अंतर कमी करावे लागेल. माणसांच्या जीवनातील विसंगती, तफावत दूर करून शहरांकडे वाहणारे प्रवाह उपजीविकेच्या संधी निर्माण करीत थोपवावे लागतील. काहीतरी विधायक करण्याचं स्वप्न मनात घेऊन जगणाऱ्यांच्या हाती स्वप्नपूर्तीचं आकाश आणि अवकाशही द्यावं लागेल. छोट्या-मोठ्या उद्योगांची चक्र गावातच गतिमान करावी लागतील. गतीसोबत परिसराची प्रगती घडविण्यासाठी माणसं घडवावी लागतील.

खेडी संपन्न, समृद्ध होणं आवश्यकच. गावापर्यंत रस्ते पोहचले हे चांगलंच; पण त्याच रस्त्यांनी जगण्याची साधनंही पोहोचणं गरजेचे आहे. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणासारख्या सुविधा पोहोचवताना त्याचं समन्यायी वितरण होणं आवश्यक आहे. आठ-दहा तास विजेच्या नावाने अंधार असेल, आरोग्यकेंद्रे आहेत; पण औषधं नाहीत. शाळा आहेत, शिक्षक नाहीत. शाळा, शिक्षक दोन्ही आहेत; पण विद्यार्थी नाहीत आणि हे सगळे आहेत, तर शिक्षणच नाही. अशी परिस्थिती असेल आणि साध्यासाध्या गोष्टींकरिता माणसांची अस्वस्थता वाढत चालली असेल, तर ती गावात थांबतीलच कशी? पूर्वीची गावं आज असणार नाहीत, दिसणार नाहीत, हे खरं आहे. काळाच्या ओघात जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. पूर्वीच्या मर्यादित ग्रामीण व्यवहारांना आज व्यापक स्वरूप आलंय. गाव तेथे पार आहे. पारावरील स्वारही आहेत. पण तेथून चालणारा गावाचा कारभार गावाला गावपण देणारा आहे का?

पंचायती राजव्यवस्थेने गेल्या काही दशकांमध्ये खूप सकारात्मक बदल घडविले आहेत. गावातील कालचे चिखलमातीने माखलेले रस्ते काँक्रिटचे झाले. त्यांना देखणेपण मिळाले. म्हणून माणसांच्या मनांचेही काँक्रिटीकरण होऊ द्यावे का? माणसांच्या मनाचे हळवे कोपरे सांभाळीत अधिक सक्षम बनवावे लागेल. ग्रामस्वच्छता अभियानाने गावं, गावातील रस्ते स्वच्छ केले; पण गाव घडविण्यासाठी माणसांची मनेही स्वच्छ करावी लागतील. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित सृष्टी त्यांच्या हाती देताना त्यांच्या जीवनातील आणि जगण्यातील अंधश्रद्धा, निरक्षरता, बेरोजगारी, दारिद्र्य यासारखी दुरिते दूर करावी लागतील. आदर्श गावं प्रयत्नपूर्वक घडवावी लागतील. आदर्शगाव ही संकल्पना बक्षिसांसाठी, बक्षिसांपुरती न उरता सगळीच गावं आदर्श परंपरांच्या वाटेवरून चालत राहावीत, असे काहीतरी करावे लागेल. लहानमोठ्या शेकडो गावांमधून घडलेला, वाढलेला आणि रुजलेला संपन्न विचारच सक्षम भारत घडवेल. कारण भारताची खरी ओळख खेडीच आहेत. तोच भारताचा चेहराही आहे. गरज आहे या चेहऱ्यांवर संपन्नतेच्या प्रसन्न, प्रमुदित हास्याला फुलविण्याची. हे देशातील शहरात आणि खेड्यात राहणारी एकशेवीस कोटी माणसंच फक्त करू शकतात. कारण म्हणतात ना ‘एकमेका साह्य करू...’

4 comments:

  1. kharay sir tumcha agdi. attachya kalat khedyanchya chhotya chhotya gharanchi jaaga uncha emartini ghetli pan tya emartinmadhe rahanara manus matya bilatalya munngipekshahi chhota hot chalala ahe. tumcha ha blog pratyekane vachayalach hava.
    tumchach ek vidyarthi.

    ReplyDelete
  2. सर तुमचाहा लेख अतिशय अप्रतिम आहे.

    ReplyDelete
  3. उत्तम लेखन सर. वाचून जूने दिवस आठवले.🙏
    ---तुमचाच विद्यार्थी

    ReplyDelete