Nav-varsh | नववर्ष

By // 1 comment:
२०१३ हा अंक बदलून त्याजागी २०१४ अंक कलेंडरच्या पानांवर अंकित होईल. कालचक्राचा एक छोटासा तुकडा, जो मोजण्याच्या सोयीसाठी आपण केला आहे. तो संपेल. पुढच्या क्षणाला लागून आलेल्या क्षणाच्या संधिप्रकाशात नववर्षाचे आगमन होईल. वर्तमानात त्याला आठवताना फक्त स्मृतिशेष आठवणी निघत राहतील. पुढचा येणारा क्षण जो भविष्य असेल, त्याविषयी आम्ही काही विचार करू का? केला आहे का? विचारलं तर बघू, पुढचं पुढे! कदाचित अशीच मानसिकता माझ्यासह आपल्यापैकी बऱ्याच जणांची असेल.

माणूस मुळात उत्सवप्रिय प्राणी असल्याने, तो सणवार साजरे करण्यासाठी कोणतीतरी निमित्ते शोधतो, ठरवतो. तेवढेच आनंदाचे चार क्षण आयुष्याच्या ‘सेव्हिंग अकाऊंटमध्ये’ जमा खात्यावर असण्याचे समाधान. कधीही समाधान न देणारी आयुष्यातील गोष्ट म्हणजे, समाधान! हे माहीत असूनही असे क्षण तो शोधत असतो. मानसिक समाधान नावाचं मृगजळ माणूस जन्माला आला तेव्हापासून शोधतोच आहे. त्याच्या आयुष्यात येणाऱ्या समाधानाच्या क्षणांची परिभाषा प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यात बदलत राहिली आहे. ते मिळवण्याच्या आणि साजरे करण्याच्या तऱ्हाही बदलतच आहेत.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना जोडणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांना माणसाने उत्सवाचे निमित्त दिले. नव्यावर्षाच्या स्वागताला समोर जावं कसं, याची नियोजने झाली असतील. जो तो आपापल्यापरीने आनंद मिळवीलही. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंध फेसाळ रात्रीला काहींची बेधुंध पाऊले थिरकतील. मध्यरात्री बाराच्या ठोक्याला कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. मध्यानरात्री नवा सूर्य उगवल्याचा आनंद माणसांच्या मनात प्रकाशित होईल. गारठलेल्या थंड वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंधीत नवं वर्ष येईल आणि पुढे जाईल. अर्थात, सगळेच नववर्षाचं असं स्वागत करत असतील, असं नाही. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची छोटीशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठीही निघतील.

हा आनंद साजरा करण्याचं भाग्य इहतलावरील साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केले नसेल. नववर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा हजारो माणसं अर्धपोटी- उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी हव्या असणाऱ्या भाकरीच्या शोधात झोपले असतील. आयुष्यातील सरलेलं वर्ष भाकरीच्या शोधात संपले. येणारे वर्ष कदाचित भाकरीच्या विवंचना सोबत घेऊन अंगणात येईल. शेकडो आदिवासी डोंगरदऱ्यात, रानावनात जगण्याचा शोध घेत भटकत असतील. भटके विमुक्त आपापली पालं घेऊन व्यवस्थेच्या चौकटीत पोटापुरती भाकर आणि निवाऱ्यापुरतं आखर शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात जगण्याच्या उद्याची सुखं शोधत असेल. हक्काच्या शिक्षणाचा कायदा असूनही शाळेत शिकून जगण्याची कोणतीही स्वप्न पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून कचऱ्याच्या कुंडीत जगण्याचे वास्तव लहान, लहान हात शोधत असतील. खूप पाणीपाऊस असूनही डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन वणवण फिरणाऱ्या वाडीवस्तीवरील बायाबापड्या त्यांच्या दारी जलगंगा येईल कधी, या विवंचनेत पाण्याचा पाझर शोधत असतील. शिक्षण नावाच्या व्यवस्थेत पास झालेला आणि हाती पदवी घेऊन भटकणारा सुशिक्षित बेरोजगार जगण्याच्या परीक्षेत खरंच आपण नापास आहोत का? या प्रश्नाचं उत्तर शोधत असेल. कालचक्राच्या गतीत अशी कितीतरी आयुष्ये गरागरा फिरत असतील. जी आपल्या नजरेस आली नसतील. गेल्यावर्षात ती फिरत होती. येणाऱ्या वर्षातही अशीच फिरत राहतील का?

जाणारं आणि येणारं वर्ष वार, महिन्यांच्या हिशोबाने सारखंच असलं, तरी काहींच्या वाट्याला त्याच्या गणिताचे हिशोबच जुळत नाहीत. काहींसाठी सुखाचं आणि काहींच्या वाट्याला दुःखाचं, असं का यावं? कदाचित काही म्हणतील, शेवटी ज्याचं त्याचं दैव. मग हेच दैव असेल, तर त्यानं माणसा-माणसांमध्ये असा भेद का करावा? जाणाऱ्या वर्षाला भेदाच्या भिंती पाडता नाही आल्या, निदान येणाऱ्या वर्षाने तरी ह्या भिंती उध्वस्त कराव्यात. जागतिकीकरणाने जग जवळ आल्याचे आपण म्हणतो; पण अगतीकीकरण झालेल्यांच्या आयुष्याचे काय? आस्थेचा, आशेचा प्रकाश घेऊन येणाऱ्या वर्षाने वंचितांच्या, उपेक्षितांच्या दारी यावे. त्यांच्या उसवलेल्या आयुष्यात प्रगतीचा, परिवर्तनाचा प्रकाश निर्माण करून अंधारलेलं जगणं उजळून टाकावं. अशी अपेक्षा करायला काय हरकत असावी? नाहीतरी माणूस प्राणी आशावादी आहेच ना! 

'Swant Sukhay' | ‘स्वान्त सुखाय.’

By // 3 comments:
कॅलेंडरची पानं एकेक करून उलटवली गेली. जानेवारी ते डिसेंबर असं एक आवर्तन पूर्ण झालं. कालगणनेचे एक वर्ष संपून दुसरं नवं वर्ष सुरु झालं. कॅलेंडरच्या पानातल्या चौकटींना पार करीत तेही पूर्ण होईल. तीही पानं उलटली की, परत नवं वर्ष. वर्षे येतील आणि जातील. माणसे आपल्या परीने ती साजरी करतील. प्रत्येकाच्या कल्पकतेने ते साजरे होतीलही. नव्या वर्षासाठी काहीजण कोणतेतरी संकल्प करतील. केलेले संकल्पही नवलाईचे नऊ दिवस संपले की, संपतील. कालचक्र अनवरत फिरत राहील. काळाच्या वर्तुळात फिरताना मी, तुम्ही, आपण सारे आनंदाचे काही लहानमोठे तुकडे जमा करण्यासाठी धावाधाव करीत राहिलो. काही लागले हाती. काही निसटले. काही राहिले. मिळाले नाही ते यावर्षी मिळवायचे म्हणून असेच कोणतेतरी संकल्प करु, त्यातील किती पूर्ण होतील? हे काळालाच माहीत.

हे लिहिण्याचं कारण, मागील दोनतीन वर्षापासून आमचा चिरंजीव सतत सांगत होता “पापा, तुम्ही शिक्षक. वर्गात बोलणं, शिकवणं तुमचं काम. ते तर तुम्ही करतातच. पण ते किती जणांसाठी? दिवसातून फार-फारतर चार-पाचशे मुलामुलींकरिता. तास संपला, तुम्ही वर्गाबाहेर आणि तुमचं बोलणंही. तुमचं बोलणं किती काळ विद्यार्थ्यांच्या मनात राहत असेल. काही तास, दिवस, महिने. बस्स, एवढंच. बरोबर ना!” मुलाच्या या प्रश्नाने माझ्यातील शिक्षक जागा होतो. (कदाचित डिवचल्या जाणाऱ्या) म्हणतो, “म्हणजे? अरे, असे असतेतर इतक्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी शिक्षक म्हणून आवडीने (!) मला स्वीकारले तरी असते का?” “ते ठीक आहे, तुम्ही चांगले शिक्षक आहात. (?) विद्यार्थी तुमचा आवडते शिक्षक म्हणून अभिमानाने वगैरे उल्लेख करतात. मीही तसाच करतो. (पापा म्हणून कसा, ते नाही सांगितले; पण चांगलाच असावा!) मराठी, इतिहास विषय शिकवणारा शिक्षक असाच असतो, (की असावा?) हे मी तुमच्याकडून शिकताना अनुभवले आहे. पण तुम्ही तुमच्या भोवतीच्या परिघालाच जग समजून, त्या भोवती स्वतःच ठरवून घेतलेल्या वेगाने फिरत आहात आणि त्या गतीलाच प्रगती समजत आहात, नाही का?”

मला काही समजले नाही. म्हणलो, “म्हणजे?” “अहो पापा, या परिघाबाहेर आणखीही एक प्रगत अन् व्यापक जग आहे. थोडं त्याकडे तुमचं पाऊल वळवा ना! नाहीतरी तुम्हीच म्हणाला होता ना की, काळाशी जे सख्य साधत नाहीत, जुळवून घेत नाहीत, ते मागे पडतात. शिकणं, शिकवणं म्हणजे चार भिंती आणि त्यावरील छताच्या आतला सीमित संवाद नसतो. तुम्ही हा संवाद नव्या तंत्रज्ञानाने इतरांशीही साधू शकतात.”- चिरंजीव. मला काहीच समजे ना. “म्हणजे, तुला काय म्हणायचे आहे, ते नीट कळू तरी दे!” - मी. “पापा, मी कधीपासून सांगतोय तुम्हाला. तुम्ही शिकवतात चांगलं, बोलतातही छान, फक्त बोलतातच; पण लिहितात कुठे? मग लिहा ना काही तरी. दिसामाजी काही तरी लिहित जावे, हे संत वचनातील शब्द तुम्हीच आम्हाला शिकवले. ते काही नाही, मी तुम्हाला ब्लॉग तयार करून देतो; मग तुम्ही लिहा वेळ असेल तसे, शक्य असेल तितके. लिहताना लेखनाच्या मर्यादा सांभाळून लिहिले म्हणजे पुरे.”

आता मला सारं समजलं. मुलांना आपण वर्गात जे शिकवलं, त्याचं हे पोरगं उपयोजन करतंय. माझंच शिकवणं मला शिकवतोय. “ठीक आहे! चला लिहू या, पण एक शंका. समजा मी लिहिलं, तर ते तुझ्या पिढीला वाचावसं वाटेल? मी काही कोणी लेखक, साहित्यिक नाही लिहायला. आणि मी लिहिलेलं लोकांनी तरी का वाचावं?”- मी. “पापा, लिहिण्यासाठी लेखक, साहित्यिकच असावं लागतं, असं कोण म्हणतंय? कोणत्याही साध्या माणसाच्या मनात आपणही काही लिहावं, असे विचार नाही का येवू शकत? आणि त्यानं लिहलं तर लोकांनी वाचावंच, असं काही नाही. लिहिल्यानंतर तुमचं तुम्हाला समाधान मिळालं, मग पुरे! आणखी कसला विचार का करायचा."- इति चिरंजीव.

अरेच्च्या ! ‘स्वान्त सुखाय’ हे साहित्याच्या लेखनाचं एक प्रयोजन असतं, असं मराठीची पदवी घेताना कधीतरी शिकलो होतो. हे कारटं तर आज आपल्याला हेच सांगतंय. म्हणजे, मराठी विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली मी. आणि संगणक विषयाची पदवी घेणारं, हे पोरगं मला साहित्यलेखनाचं प्रयोजन शिकवतंय. चला, ठीक आहे. करू या प्रयत्न, म्हणून घेतली लेखणी हातात. बघू या, कसं जमतयं! जमेल तसे आणि जमेल तेवढे लिहू या.

येणारी पुढची पिढी मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून जन्माला आलेली असल्याकारणाने तिला लांबचं क्षितिज दिसतं, असं म्हणतात. कदाचित या लांबच्या क्षितिजाला आपण पाहिलं नसलं, तरी तेथपर्यंत नजर पोहोचवण्याची माध्यमे आज आपल्या हाती आहेत. तसंही पुढच्या पिढीला लांबचं क्षितिज दाखवणारा खांदा तर आपलाच ना! विज्ञानतंत्रज्ञानाने मंडित जगात या पिढीला वावरताना, अशा गोष्टीची कदाचित अपूर्वाई नसेलही. या पिढीचं नातं नावीन्याशी आहे. पण आपली पिढी संक्रमणाच्या सीमारेषेवर उभी असल्याने आपलं नातं दोन्ही काळाशी आहे, हे आपलं भाग्य नाही का? कदाचित या पिढीएवढा वेग धारण करून आपणास धावता नाही येणार, पण तंत्रज्ञानाची एक खिडकी उघडून त्यातील गती, प्रगतीचा आपण थोडासा अनुभव घेवू शकतो. नाहीतरी शिकायला वयाचं बंधन असतंच कुठे. आम्ही शिकलो, आज वर्गातून शिकवतो; पण शिकण्याला विराम आहेच कुठे! म्हणतात ना, ‘थांबला तो संपला.’ पण संपेपर्यंत आपण थांबायचंच कशाला? चालत राहू. एकटेच का असेनात. लिहिलेले आवडले काहींना तर आनंदच. नाही आवडले, तर लेखनाचं एक प्रयोजन आहेच ना ‘स्वान्त सुखाय’.