कविता समजून घेताना... भाग: एकोणीस

By // No comments:

कवच

पगार कधी होणार?
तिचा जीवघेणा प्रश्न
आणि
हँग झालेल्या कम्प्युटरसारखा
असतो तिच्यासमोर उभा
मागणी तसा पुरवठा हे तत्त्व
लागू होत नाही तिच्या आयुष्यात
तिने केलेल्या कोणत्याही
मागणीचा पुरवठा
पुरा करू शकत नाही
माझ्या जगण्यातील
पंचेचाळीस मिनिटाचा काटा
तिने सांगितलेल्या वेळेत

म्हणूनच
तिने दिलेली वस्तूंची यादी
छेदत जाते माझे नेटसेटचे कवच
आणि
उघडा पडत जातो मी
प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या दिवशी
तिच्या पगाराच्या प्रश्नाने

जयप्रभू शामराव कांबळे

विश्वातील सगळ्यात मोठे वर्तुळ कोणते? कदाचित हा प्रश्न अगोचरपणा वाटेल कुणाला. पण असं काही वाटत असलं, तरी वास्तवापासून विचलित नाही होता येत. भाकरीच्या वर्तुळाहून मोठे वर्तुळ अद्याप तरी तयार झाले नाही. जगण्याचे संघर्ष भाकरीच्या वर्तुळात एकवटलेले असतात. व्यवस्थेचे सगळेच व्यवहार तिच्याभोवती प्रदक्षिणा घालत असतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे भौगोलिक सत्य असले; तरी ती भाकरीभोवती भ्रमण करते आहे, हे ऐहिक सत्य आहे. पृथ्वीच्या भ्रमणाला निसर्गाने निर्धारित केलेले नियम असतात. दिशा असते. मर्यादा असतात. पण भाकरीच्या शोधासाठी घडणाऱ्या भटकंतीला ना निर्धारित दिशा असते, ना मर्यादांचे परीघ. तिच्या संपादनाची सूत्रे कोणत्याच साच्यात सामावून सोडवता नाही येत. तो शोध असतो, आपणच घेतलेला आपला. भाकरी स्वप्न असतं, उपाशी पोटातून उगवणारं. माणसे केवळ भाकरीवर जगत नसतात, हे म्हणणं कितीही तर्कशुद्ध, प्रेरणादायी वाटत असलं, तरी स्वप्नांचा प्रारंभ भाकरीच्या वर्तुळातून होतो, याकडे दुर्लक्ष कसे करता येईल? सगळ्याच स्वप्नांना पूर्तीचं सौख्य असतं असं नाही. मनात कोरून घेतलेल्या समाधानाच्या परिभाषा प्रत्येकाच्या वेगळ्या आणि प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. जीवनपथावरील प्रवासाचे एक कारण असतात त्या. पण वंचनेच्या धुक्यात हरवणे त्यांचे भागधेय असेल, तर अंधारून आलेल्या क्षितिजांकडे पाहण्याशिवाय हाती उरतेच काय? स्वप्नांचे तुटणे ठसठसणारी वेदना असते. भळभळणारी जखम असते. सगळ्या जखमा भरून येतातच असे नाही. खपल्या धरल्या तरी कधीतरी अनपेक्षित धक्का लागून त्या वाहत्या होतात. त्यांचं भळभळत राहणं टाळता न येणारं भागधेय असतं.

अपेक्षाभंगाचं दुःख शब्दांच्या चौकटीत मंडित करता येतंच, असे नाही. तो एक अटळ रस्ता असतो परिस्थितीने ललाटी गोंदलेला. आयुष्याचे खेळ नियतीच्या हातातील सूत्रांच्या स्थानांतराने घडत असतीलही. पण जगण्याची प्रयोजने शोधण्यासाठी चालणे टाळता कुठे येते? आस्था आयुष्याचे अर्थ नव्याने शोधायला लावते. आशेचे कवडसे अंतर्यामी एक वात तेवती ठेवण्यासाठी धडपडत राहतात. अंतरीचा ओलावा आटत जातो. जगण्याला तडे पडत जातात, तेव्हा माझ्या मना बन दगड म्हणण्याशिवाय हाती उरतेच काय? परिस्थितीने पायाखाली अंथरलेल्या वाटेने निमूट चालण्याशिवाय विकल्प असतोच कुठे. सगळं करूनही हाती शून्य उरणाऱ्या मनाची वेदना घेऊन येणारी ही कविता एक अस्वस्थपण पेरत जाते, मनाच्या गाभाऱ्यात. कोरत जाते वेदनेच्या आकृत्या काळाच्या प्रस्तरावर. दुभंगल्या मनाचा सल घेऊन चालत राहते. आयुष्याचे किनारे धरून वाहताना विखंडीत होणाऱ्या विश्वासाचा, सुटत जाणाऱ्या संयमाचा शोध घेते. विकल आयुष्याचे अर्थ शोधू पाहते. शिक्षणाने गिरवलेल्या स्वप्नांचा शोध घेता घेता आयुष्याच्या पाटीवरून जगणंच पुसलेल्या आकृत्यांचा माग काढताना होणारी मनाची घालमेल घेऊन येते.

शिकून आयुष्य मार्गी लागेल. जगण्याचं सार्थक शोधता येईल, या लहानशा आशेने शाळा नावाचा अध्याय जीवनग्रंथात लेखांकित होतो. पण त्याची पाने सगळ्यांच्याच आयुष्यात महत्त्वाच्या नोंदींनी अधोरेखित होतातच असे नाही. अर्थ हरवलेल्या अध्यायांचा शोध कवी घेऊ पाहतो. परिस्थितीच्या कातळावर घाव घालून आत्मशोध घेण्यासाठी शिक्षणाच्या वाटेने धावाधाव केली. इयत्तांचे सोपान पार केले. पदव्यांचे टिळे ललाटी लावले. पात्रतेचे मळवट भरले, पण अभागी आयुष्याला परतत्वाचा परीसस्पर्श घडलाच नाही. पुस्तकाकडे वळती झालेली पावले स्वप्ने दिमतीला घेऊन धावत राहिली सुखांच्या शोधात. सुख भाकरीकडे आणि भाकरीचा शोध नोकरीच्या बिंदूवर येऊन विसावतो. आस्थेचा एक हलकासा कवडसा अंधाऱ्या क्षितिजावर लुकलुकताना दिसला. त्याच्या थरथरत्या रेषांचे हात पकडून स्वप्ने सोबत आली. शिक्षकीपेशाच्या पावित्र्याने भारावलेलं मन आदर्शांच्या, मूल्यांच्या परिमाणांना अंकित करू लागते. पण मनात वसतीला आलेल्या सगळ्याच गोष्टी पूर्ण व्हाव्यात, अशी काळाची गणिते नसतात.

गाव सुटतं. शहर धावाधाव करायला लावतं. भणंग आयुष्य मात्र तोंड लपवत खेळत राहतं जगण्याशी, रोज नवे खेळ. शिक्षणाच्या चौकटी त्याच, ज्ञानही तेच. पण त्यातही विषमतेचे मनोरे बांधलेले. पूर्णवेळ, अर्धवेळ, तासिका तत्व, अनुदानित, विना अनुदानित, टप्पा अनुदानित. मजले वाढत जाणारे. समतेची सूत्रे वर्गात शिकावयाची अन् विषमतेच्या सूत्रात आयुष्य शोधायचं. हा विपर्यास विकल करणारा असतो. विषमतेच्या भिंती आपल्या व्यवस्थेला नव्या नाहीत. पण काळाचे किनारे धरून वाहत आलेल्या विषमतेच्या नव्या परिभाषा खपल्या काढत राहतात. जगण्याचे एकेक पदर उसवत जातात. व्यवस्थेने दिलेल्या वेदना सरावाच्या झाल्याने कदाचित प्रासंगिक विकल्प म्हणून समजून घेतल्या जातात. काळाच्या वाटेने वाहताना त्यांची ठसठस संपेल, हा आशावादही असतो. त्या संपतील की नाही, माहीत नाही. पण काळाचे किनारे धरून वाहत आलेल्या नव्या विषमतेचे काय?

या वेदना परिस्थितीवश आयुष्याच्या वाटा धरून चालत आलेल्या असतील किंवा कुठलेच विकल्प नसल्याने लहानमोठ्या गोण्या हाती घेऊन विकत घेतलेल्या असतील अथवा अभिवचनाच्या वाटेने आयुष्यात आल्या असतील. कारणे काही असोत, त्यापासून पलायन नाही करता येत. व्यवस्थेने आखलेल्या चक्रव्यूहात अभिमन्यू लढत राहतात. समरांगणात एकेक वीर धारातीर्थी पडावा, तशी मनात साकळलेली स्वप्ने आकांक्षांच्या प्रांगणात पतन पावतात. घरच्यांसाठी वाढत्या वयाची गणिते संसार नावाच्या चौकटीत अधिष्ठित करण्याकरता पुरेसे कारण असते. कुठल्यातरी विद्यालयात, महाविद्यालयात शिक्षक, प्राध्यापक असल्याच्या धागा हाती घेऊन सप्तपदीच्या वाटेने पडणारी पावले मनात मोरपंखी स्वप्ने गोंदवत उंबरठ्याचे माप ओलांडून येतात. शुभमंगल घडते. पदरी पडलेले पळ पुढे पळायला लागतात. स्वप्नांचे प्रदेश परिस्थितीच्या धुक्याआड विरघळत जातात अन् तोच प्रवास अमंगलाकडे वळायला लागतो. स्वप्नांच्या सोबतीने घडणारा प्रवास परिस्थितीच्या रखरखत्या उन्हात करपायला लागतो. वाटेवरचे काटे टोकदार बनतात. सौख्याच्या परिमलाने गंधाळलेले ऋतू कूस बदलून वास्तवाचे वारे वाहू लागतात. आकांक्षांच्या झाडावर आलेला मोहर झडू लागतो. सुखी संसाराची अन् पर्याप्त समाधांची सूत्रे धाग्यातून सुटू लागतात.

अर्थात तिचंही काय चुकतं? तिनेही काही स्वप्ने पाहिलेली असतात. त्यांचे मोहरलेपण तिच्या सुखांची परिमित परिभाषा असते. पण दैवाचे फासे उलटे पडतात अन् सुरु होतो खेळ वंचनेचा. तीच तगमग. तोच कोंडमारा. तेच ते जगणं. तेच वर्तुळ आणि त्याभोवतीच्या त्याच प्रदक्षिणा अन् भ्रमणाला असणारा उपेक्षेचा शाप. संयमाचे बांध तुटतात. मनाच्या मातीआड दडलेला लाव्हा जागा होतो. अंगावरील हळदीचे ओले रंग विटू लागतात. सुखांच्या नक्षीत समाधान शोधणारं इंद्रधनुष्य रंग हरवून बसते. आयुष्याचे झाड मुळापासून हादरू लागते. आकांक्षांची एकेक पाने फांद्यावरून सुटू लागतात. गळ्यातले आवाज गळ्यात अडतात. संसाराचे सूर जुळून गाणे होत होता साज हरवतात.

पगार कधी होणार? एक लहानसा प्रश्न; पण त्याच्या आत एक अस्वस्थपण सतत नांदत असतं. तिचा हाच प्रश्न त्याच्यासाठी जीवघेणी वेदना घेऊन येणारा. पण उत्तराचे विकल्प कधीच व्यवस्थेच्या दारी पडलेले, शरणागतासारखे. परिवर्तनाच्या पदरवांचा कानोसा घेत. गोठणबिंदूवर येऊन थांबलेला तो. आतून धग कायम ठेवणारी सगळी ऊर्जा संपलेली. हँग झालेल्या कम्प्युटरला रीस्टार्ट करून घेण्याचा निदान पर्याय तरी असतो. पण आयुष्यच गोठतं, तेव्हा मागणीची गणिते पूर्ण करणारी सूत्रे संपलेली असतात, हे तरी तिला कसं सांगावं? मागणी तसा पुरवठा, हे तत्त्व सगळ्याच ठिकाणी लागू होत नसते. आयुष्याची उत्तरे शोधण्यासाठी भाकरीच्या परिघाभोवती फिरणारी याच्या जगण्यातील पंचेचाळीस मिनिटे कधीच परास्त झालेली असतात. तिच्या वेळेची आणि आयुष्याची उत्तरे शोधण्यासाठी स्वप्नांभोवती फिरणाऱ्या याच्या मिनिटांची गणिते कधी सारखी उत्तरे देणारी नसतात.

तिने दिलेल्या वस्तूंच्या यादीला वास्तवाची धग असते. यादीला एकवेळ पर्याय असू शकतो, पण पोटात खड्डा पाडणाऱ्या भुकेला विकल्प कुठे असतो? परिस्थितीने पुढ्यात आणून अंथरलेल्या आयुष्यातील उसवलेल्या आकांक्षांना नेटसेटचे कवच नाही सुरक्षित करू शकत. पदवीची झूल पांघरून पात्रतेची पूर्तता करणाऱ्या कागदाच्या चतकोर तुकड्यावर कोरलेली अक्षरे अभिवचन नसते; पर्याप्त समाधान घेऊन नांदणाऱ्या आयुष्याचे. अक्षरे अन् अंक यापलीकडे त्यांना काही अर्थ नसतो अशावेळी. पात्रतेच्या अवघड वाटांनी घडणारा प्रवास हाती लागणाऱ्या पदवीच्या कागदाच्या चौकोनी विश्वात आयुष्याचे अर्थ शोधत नव्या जगाची रचना करीत असतो. त्याचा प्रत्येक कोन अन् त्या कोनात सामावलेली अक्षरे समाधान अंगणी नांदते राहण्याचे अभिवचन वाटते. पण तीही एक वंचना ठरते. विना अनुदान अन् पूर्णवेळ श्रमदान नावाचे नवे सूत्र अंगीकारणाऱ्या व्यवस्थेत उघडं पडत जाण्याशिवाय हाती असतेच काय शेष? महिन्याच्या शेवटच्या दिवशी तिच्या पगाराच्या प्रश्नाने आयुष्यातील अभावाची रेघ आणखी थोडी वाढत जाते पुढे. समस्यांचे बिंदू तिच्या वाटेवर अपेक्षाभंगाचे दुःख गोंदवत राहतात.

शिकवता शिकवता शिक्षणावरचा विश्वास विरू लागतो. पानावर पडलेल्या मोत्यासारखे वाटणारे शिक्षण परिस्थितीच्या प्रकाशात ओघळून जाते. वर्षे सरत जातात. मागे उरतात ओरखडे. जिवाच्या आकांताने ओरडावे वाटते, पण कुणीतरी गळाच आवळल्याने आतले आवाज आताच हरवतात. शाळा, शिक्षक, शिक्षण व्यवस्थेने निर्माण केलेली बेटे. यांनी जगण्याला संपन्नता येत असते; पण त्यात व्यवहार आला की, त्यांचा आत्मा हरवतो. कधीकाळी शाळा जीवनशिक्षणाचे मंदिरे म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या जागी एज्युकेशन देणारी पंचतारांकित संकुले उभी राहिली. या संकुलांमध्ये आपापल्या कुलांना इतमामाने सामावून घेण्याची व्यवस्थाही आली. शिक्षणसम्राट उपाधीनेमंडित नव्या सम्राटांचा वर्ग अस्तित्वात येऊन स्थानापन्न झाला. यांच्या अधिपत्याखाली गुणवत्ता, विद्वत्ता मांडलिक झाली. राजा, राज्य, राज्याभिषेक, राजसिंहासन हे शब्द कधीच कालपटावरून संपले. व्यवस्थेने संस्थानिकांचा नवा वर्ग उदयास आणला. त्यांनी संस्थाने उभी केली. संस्थानांच्या सेवेत रममाण असणाऱ्यांच्या वाटेला मधुर फळे यायला लागली. तत्त्व, तत्त्वनिष्ठा शब्दांचा अर्थ कोशात बंदिस्त झाला. कोणातरी स्वयंघोषित आदरणीय महात्म्याच्या कृपाकटाक्षाकरिता, मर्जीसंपादनाकरिता स्पर्धा सुरु झाली. तत्त्वनिष्ठ माणसं मांडलिकांच्या जगात वेडी ठरली.

व्यवस्थेतील काहीक्षेत्रे संदेहाच्या परिघात पाहिली जात असतीलही. ती एक वेळ प्रदूषित झाली तरी चालतील; मात्र शिक्षणक्षेत्र कलंकरहित असावे, अशी अपेक्षा कोणी व्यक्त करीत असेल, तर त्यात वावगं काय आहे? ज्या संस्कृतीत माता-पित्यानंतर गुरूलाच देवतास्वरूपात पाहिले जाते, ब्रह्म, विष्णू, महेशाच्याठायी गुरु शोधला जातो; त्यादेशात गुरूला लघूरूप येणं परिस्थितीचा विपर्यास नाही का? गुरूच्या सानिध्यात जीवन सफल झाल्याच्या, आयुष्य घडल्याच्या कहाण्या माणसे ऐकत, वाचत, लिहित, शिकत आली, तेथे या गुरूला लघुरूप का येत आहे? जगण्याचे संदर्भ बदलत आहेत. सुखाच्या दिशेने ते प्रवाहित होत आहेत. मी आणि माझं सुख तत्त्वांपेक्षा महत्वाचं ठरू लागलं. कधीकाळी पैशापेक्षा वर्तनाने माणूस ओळखला जायचा. चारित्र्यसंपन्न माणसे समाजासाठी मूल्यसंवर्धनाचे वस्तुपाठ असत. पैसाच मोठा झाल्याने माणूस छोटा झाला. शिकविण्यासाठी मूल्ये एक आणि वागताना दुसरीच, हा वर्तनविपर्यास विसंगत नाही का? मातीशी अस्तित्वाची घट्ट नाळ असणारी मुळं खिळखिळी होत चालली आहेत. आसपास दुभंगतो आहे. जगणं उसवत आहे. स्वार्थ परायण विचारांचा परीघ समृद्ध होताना माणूस अभंग राहणे आवश्यक आहे. पूजा आदर्शांचीच होते. उंची कळसाची मोजली जाते. पायथ्याची नाही. आदर्श जगण्यात सामावणे आनंदाचे अभिधान असले, तरी केवळ आदर्शांच्या परिभाषा करून आयुष्याचे अर्थ सापडत नसतात. त्याकरिता मनात उगवणारं विकल्पांचं तण वेळीच उपटून काढता यायला हवं, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••

कविता समजून घेताना... भाग: अठरा

By // No comments:
नाही रमत जीव या अजस्त्र शहरात

नाही रमत जीव
या अजस्त्र शहरात
इथले रस्ते रस्त्यांना मिळतात
आणि गिळतात देखील...
पसरून आहेत अजस्त्र अजगरासारखे हे रस्ते
स्वतःमधे वाकडे तिकडे गोलगोल
जीवे वाचण्याच्या अट्टाहासाला
हे शहर बर्म्युडा ट्रँगलसारखे
खेचत जाते आतआत
नि नेत असते खोल खोल

सहमत नाही होता आले की,
तोहमत येतेच मग...
त्यापेक्षा वाहत राहावे इथल्या रस्त्यावरून
स्वतःच्या इच्छेला चार गोष्टी समजावत
इच्छा असो वा नसो

विरोध हेच मरण
शरण हेच जीवन
हेच अजस्त्र शहराचे सूत्र

मी मित्राच्या फोरव्हिलरमधून,
लोकलमधून, बसमधून, रिक्षामधून
तर कधी पायीपायी
वाहतो आहे या शहरातून

हे गोलगोल गरगरणे
मला नेईल या शहराच्या मुळाशी
निमुळत्या स्क्रूसारखे

मला खात्री आहे
सहमतीचे स्मित करत
हे शहर
माझे बोट सोडणार आहे
तोपर्यंत
इथे
सहमतीने गरगरायला
पर्याय नाही

कमलाकर आत्माराम देसले
*
माणूस कसा असावा हे सांगता येतं. पण तो कसा असतो, हे अनुभवल्याशिवाय नाही कळत. कोणत्या विचारांनी त्याने वर्तावे याबाबत काही अपेक्षा करता येतात. प्रासंगिक वर्तनावरून त्याच्यासंदर्भात काही अनुमानही बांधता येतात. पण तो आकळतोच असे नाही. विशिष्ट परिभाषा वापरून आयुष्याची प्रयोजने जशी अधोरेखित करता येतात, तश्याच भरल्यापोटी वर्तनाच्या परिभाषा तयार करता येतात. पण हातातोंडाची गाठ सहजी न पडणाऱ्याला विचारा त्याचे आदर्श नेमके कोणते असतात? आदर्शांची परिमाणे शोधायचीच असतील, तर भुकेइतके प्रांजळ उत्तर मिळणे असंभव. टीचभर पोटाची खळगी भरण्यासाठी माणूस अख्खं आयुष्य हातावर घेऊन वणवण करीत असतो. कोणी काहीही सांगितले, तरी जगणं भाकरीभोवती बांधलेलं असतं, या वास्तवापासून पलायन करता येत नाही. नाकारताही येत नाही? स्वीकारावे तर पर्याप्त संधी प्राप्त होतीलच असे नाही. आयुष्याचे उन्नत, प्रगत वगैरे प्रयोजने अधोरेखित करून कोणी मांडली, तरी जगण्याचे संदर्भ आणि टिकून राहण्याचे संघर्ष भाकरीजवळ येऊन संपतात, हे कसे नाकारता येईल? आकाशातला चंद्र पाहणाऱ्याला देखणा वगैरे वाटत असला, तरी भाकरीचा चंद्र जगण्याचं वास्तव असतं अन् त्यावर काही प्रेमकविता लिहिता येत नसतात. भाकरी आयुष्याच्या असल्या नसल्या प्रयोजनांचं उत्तर असतं अन् या उत्तराच्या शोधात घडणारी वणवणही.

आयुष्याने जगण्यात अधोरेखित केलेले प्रश्न समजून घायला लागतात. उत्तरांसाठी मार्ग निर्धारित करून विकल्प पडताळून पाहायला लागतात. पोटाला जगणं बांधून कोणी वहिवाटीच्या वाटा निवडून निघतो. कोणी अज्ञात परगण्याकडे नेणाऱ्या मार्गांचे परिशीलन करतो. कोणी मळलेल्या वाटा मोडून चालता होतो. वाटा केवळ वळत्या पावलांना दिशा देण्याचे साधन नसतात, तर जगण्याच्या प्रयोजनांना मोहरलेपण देणाऱ्याही असतात. अज्ञात प्रदेशांना जोडणाऱ्या वाटेवरचा प्रवास माणसांच्या तात्कालिक गरजांचा शोध असतो. अर्थपूर्ण जगण्याची आस मनात अधिवास करून असते. कणभर सुखासाठी मणभर कष्ट उपसित हवे असणारे काहीतरी शोधत चालणे घडते. उपजीविकेसाठी देशांतर घडून माणसे ज्ञात-अज्ञात प्रदेशात पोहचतात. आकांक्षेच्या गगनात सुखाचे सदन शोधत राहतात. पण मनी वसतीला असलेल्या क्षितिजांपर्यंत पोहोचणं काही सहजसाध्य नसतं.

आयुष्यात समस्यांची कमतरता कधी नसते? कालानुरूप त्यांची रूपे वेगळी असतात इतकेच. पोटात खड्डा पाडणारी भूक अस्वस्थ वणवण करायला भाग पाडते. जगणं पणाला लावणारा संघर्ष सार्वकालिक सत्य आहे. भाकरीभोवती साकळलेल्या ओंजळभर आकांक्षांचा शोध आयुष्यभर पुरतो. अनेकांची आयुष्ये या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपतात. आजही यात फार सुगमता आली आहे असे नाही. अपेक्षांच्या पावलांनी चालत येणाऱ्या विवंचना संपल्या आहेत असेही नाही. प्रश्न कधी नव्हते? काल होते, आज आहेत आणि उद्या कदाचित तीव्र-कोमल किंवा आणखी काही असतील. मनात सुखांची संकल्पित चित्रे साकारलेली असतात. तेथे पोचण्याच्या मनीषेने सगळेच पळतायेत आपापली गाठोडी घेऊन. भलेही ती स्वेच्छेने डोईवर घेतलेली असतील अथवा परिस्थितीने लादलेली असतील. पळती पावले भटकंती सोबत घेऊन येतात हेही खरेच.

गाव, गावगाडा, आपली माणसे सोडून काही कोणी सहजी स्थलांतर करीत नाही. स्थिर जगण्याचे साधन उपलब्ध असेल, तर मनात संदेह नसतो. भाकरीच्या शोधार्थ वेस ओलांडून जाणं आनंददायी कसं असू शकतं? पायाखालच्या मातीला घट्ट बिलगून असलेली  अस्तित्वाची मुळं सैलावणं वेदनादायीच असतं. मातीचं सत्व आणि स्वत्व घेऊन वाढणारं रोपटं काढून दुसऱ्या जागी रुजवण्याचा प्रयत्न यशस्वी होईलच असे नाही. केला तरी ते जोमाने वाढेलच याची शाश्वती नाही देता येत. मातीपासून विलग होण्याची सल घेऊन ही कविता वाहत राहते. आस्थेचा गंध घेऊन मनाच्या आसमंतात विहरत राहते. आशयघन शब्दांचा हात पकडून वाचकासोबत भटकत राहते. आपलं असं काहीतरी मागे टाकून आल्याची रुखरुख घेऊन. समर्पक प्रतिमा कवितेच्या आशयाला उंची प्रदान करतात. सहजपणाचे साज लेवून आलेल्या शब्दांच्या प्रतिध्वनीचे पडसाद मनाच्या प्रतलावरून परावर्तीत होत राहतात. जगण्याचा वाटा कोणाला कुठे आणतील, हे काळालाही अवगत नसते बहुदा. अनेकातील एक वाट उपजीविकेच्या उतारांना धरून शहराच्या दिशेने सरकत राहते अन् थांबते प्रश्नांचे गुंते घेऊन विणलेल्या जाळ्यात. जगण्याची प्रयोजने शोधतांना हरवत जाणाऱ्या आपणच आपल्या असण्याशी आणि त्या असण्याने आलेल्या अर्थांशी जुळवून घेताना होणारी मनाची तगमग कवितेतून ठळक होत राहते. जाणिव करून देते आपल्या अगतिकतेची. आयुष्यात अधिवास करणाऱ्या अपुरेपणाची.

शहर नावाच्या अजस्त्र पसाऱ्यात आपल्या अस्तित्वाचे आयाम शोधतांना आतून तुटणं कोणालाही नाही विसरता येत. येथला झगमगाट डोळ्यांना सुखावणारा असला, तरी मनाला समाधान देणारा असेलच असे नाही. विकास, अभ्युदय वगैरे परिस्थतीसापेक्ष संज्ञांचा अर्थ कोणाला कसा समजावा, हा भाग वेगळा. पण वास्तव हेही आहे की प्रगतीच्या परिभाषा शहराभोवती प्रदक्षिणा करीत आल्या आहेत आणि असतीलही. बेगडी झगमगाटाच्या विश्वात उपरेपण घेऊन नांदणाऱ्या जगातला सामान्य वकुब असणारा माणूस सामावतोच असे नाही. अंगावरून गुळगुळीतपणा पांघरून पडलेले रस्ते गर्दीने भरून वाहत असले, तरी त्यात आपलेपणाचा ओलावा असेलच असे नाही. रस्त्यांच्या दुतर्फा ओसंडून वाहणारी संपन्नता, म्हणजे आयुष्याच्या विकासाचे हमीपत्र नसते. आकाशाला स्पर्श करू पाहण्याची इमारतींमध्ये लागलेली स्पर्धा म्हणजे जगण्याची उंची नसते. महागड्या गाड्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने धावतांना दिसणे, याचा अर्थ जगण्याच्या प्रगतीने वेग धारण केला आहे असा होत नाही. इकडून तिकडून आलेल्या रस्त्यांनी गळाभेट घेणे, म्हणजे त्यावरून चालणाऱ्या माणसांच्या प्रगतीचे पथ प्रशस्त झाले असा नाही. रस्त्यांच्या संगमठिकाणांनावर थुईथुई नाचणारी कारंजी नेत्रसुखद असतीलही; पण कोरड्या डोळ्यात अनेक प्रश्नचिन्हे घेऊन शहराच्या उदरात साकळलेली सुखे वेचून आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रदक्षिणा प्रगतीचे परिमाण नसते. रस्ते केवळ शहराच्या सीमांना वेढून नसतात. अजगरासारखे पडलेले रस्ते विळखा घालून बसतात अनेकांच्या आकांक्षांना.

बर्म्युडा ट्रँगलमध्ये जहाजे, विमाने हरवली. कदाचित गूढ असं काही असेल या प्रदेशात. त्यामागे असणाऱ्या कारणांची उकल विज्ञानाने केली. आणखी काही हाती लागेलही. पण शहरांच्या कोणत्याही कोनात गेला तरी माणूस हरवतो, स्वतःपासून, आपल्या असण्या-नसण्यापासून, त्याची उकल कोणत्या शास्त्राने करता येईल? शहर नावाच्या वर्तुळात अशी कोणती शक्ती अधिवास करून असते कोणास ठावूक, जी माणसांना आपल्यात ओढून तर घेते; पण बाहेर पडायचे मार्ग अवरुद्ध करते. अभिमन्यूच्या चक्रव्यूहातील प्रवेशात परतीची संधी होती, पण शहराच्या व्यूहातून परतीचे मार्ग धूसर का राहत असतील? शहरात केवळ स्वप्ने हरवतात असे नाही, तर आनंदाचं सदन शोधण्यासाठी वणवण भटकणारी माणसे आकांक्षांचे गगन हरवून बसतात. त्याच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडायचा कितीही प्रयत्न केला, तरी निघता येणं अवघड होऊन जातं. शहरे माणसांच्या कोणत्या अगतिकतेला ओळखून असतात, कोणास माहीत?

समस्याच्या साच्यात अडकलेल्या जगण्याला कसले आलेयेत आकार अन् कसल्या आल्यायेत आकृत्या. विकल्प हरवलेल्यांच्या हाती निवडीचे पर्याय असतातच किती? सहमत व्हा अथवा तोहमतीला सामोरे जा, एवढा एकच पर्याय हाती असेल, तर हतबल होण्याशिवाय उरतेच काय? प्रवाहाच्या विरोधात वाहणे पराक्रमाची परिभाषा असेलही. पण मनगटात बळ असूनही केवळ अगतिकतेमुळे शस्त्र म्यान करावं लागत असेल तर... आल्या गोष्टीना आपलं म्हणावं का? आकांक्षा, अस्मितांना गहाण टाकून जगणं आयुष्याचं संयुक्तिक प्रयोजन नाही होऊ शकत. अगतिकता स्वप्नांना, अस्मितांना संपवते, हे कसे नाकारता येईल?

जगण्याची समाजसंमत सूत्रे असली, तरी शरणागताला कोणत्या सूत्रांच्या निवडीचं स्वतंत्र्य असतं? तुम्ही एकदाका गर्दीचा भाग झालात की, कसला आलायं स्वतंत्र चेहरा? खरंतर तो बिनचेहऱ्याच्या गर्दीत कधीच आपली ओळख भिरकावून आलेला असतो. मागे उरतो केवळ मुखवटा. तो स्वच्छेने स्वीकारलेला असेल अथवा नसेल. त्याला परिधान करून जगणं भागधेय बनलं की, गर्दीत विहरताना आघातांची काळजी करण्यापेक्षा गर्दीचा एक भाग बनण्याची धडपड क्रमप्राप्त होते. अफाट पसाऱ्यात वाहत राहण्याशिवाय मार्ग नसतो. शहरच आपल्याला आत ओढत नेतं. एखाद्या स्क्रू सारखं आत ढकलत राहतं, चौकटीत फिट्ट बसवताना. चौकटी काही अभावग्रस्तांच्या मर्जीने आकारास येत नसतात. प्रभाव असणाऱ्यांच्या आज्ञेने त्या घडतात. अभावात आयुष्याचे अर्थ शोधणाऱ्यांनी चौकटींच्या आकारचं व्हावं अथवा आहे ते पर्याप्त मानून जगण्याच्या वाटा वाहिवाटीच्या म्हणून चालत राहावं, एवढेच विकल्प हाती उरतात. सामावणे आधी, मग विचार करणे चौकटींच्या जगाचा अलिखित नियम असतो. अगतिकांच्या आयुष्याला तसेही विचार करण्याचे स्वातंत्र्य असतेच किती?

अर्थात, या सगळ्यामागे कारणवश सहमती असेल अथवा नसेलही. कारणे काही असली, तरी चेहऱ्यावर स्मित कायम ठेऊन शहराचा एक घटक व्हावं लागतं. सहमतीचं शास्त्र अवगत झालं की, वेदनांचे आवाज हळूहळू हरवतात. हताशा असो की, निराशा शहराच्या हाती एकदाका बोट दिलं की, ते सहजी नाही काढून घेता येत. त्याला पर्यायही नसतो. तसेही आयुष्य काही फुलपाखराचे रंग लेऊन विहार करीत नसते. त्यात संगतीपेक्षा विसंगतीच अधिक असते. उपेक्षा, विवंचना, समस्यांना आयुष्यात कमतरता कधी असते? सुखांचा सोस असणे वेगळे आणि पावलापुरता प्रकाश शोधत अंधारलेल्या कोपऱ्याच्या पदरी उजेडाचं दान टाकणारं चांदणं आणण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, त्याहून वेगळे असते, नाही का?

चंद्रकांत चव्हाण
**