श्रद्धा कदाचित असा एकमेव परगणा असावा, ज्याची मीमांसा करणे काळाच्या कुठल्याही तुकड्यात शोधलं तरी बऱ्यापैकी अवघड प्रकरण आहे. विशिष्ट विचारांभोवती विहार घडू लागला की, आकलनाचा विस्तार आपल्या विश्वाएवढा होतो अन् त्याचा परीघही आपल्या वकुबापेक्षा अधिक नसतो हेही खरेच. अर्थात, असं असण्यात काही वावगं वगैरे आहे असंही नाही. श्रद्धा असो अथवा नसो, तिच्या समर्थनाचे कवडसे असतात, तसे विरोधाचे काही कंगोरेसुद्धा. कितीही संवाद घडले, वाद झडले तरी अंशरूपाने का असेनात ते शेष राहतातच. माणसांनी संपादित केलेल्या ज्ञानाच्या व्याख्या काही असू द्या, प्रगतीच्या परिभाषा कोणत्याही असू द्या, श्रद्धेची सामान्य सूत्रे अन् सर्वमान्य व्याख्या करणं बऱ्यापैकी अवघड असतं हेच खरं. श्रद्धा असण्यात वावगं काहीच नाही. खरंतर हा मुद्दा वाद असण्याचा नाही. असलाच तर संवादाचा आहे, पण बऱ्याचदा या परगण्यात विसंवादच अधिवास करून असतो. अर्थात असं असण्यात काही वावगं नाही.
विसंवाद वाईटच असतो असं नाही. वाद वैचारिक असावेत. केवळ वादाकरता वाद नको. विचारांचा प्रवाद विचारांनी करता यायला हवा. वाद वैयक्तिक वाटेवर आले की, विवाद जन्माला येतात. खरंतर संवाद असतो म्हणून विसंवाद वाहत येतो अन् विसंवाद असतो म्हणून संवादाची सूत्रे समजतात. विचारांना विकारापासून विलग करता आलं की, जगण्यातून विवाद वेगळे करता येतात. नकाराचे नगारे बडवून किंवा समर्थनाचे ढोल ठोकून जागर होत नसतो. की परिस्थितीत परिवर्तन. विचारांची विलसिते विहरत राहावी म्हणून आपल्या आकलनाची क्षितिजे विस्तारावी लागतात.
विज्ञान थांबते तेथून श्रद्धेचा परगणा सुरू होतो अन् श्रद्धा उत्तर देण्याचे थांबल्या की, त्या वाटेने अंधश्रद्धा चालत अंगणी येते. माणसाला श्रद्धा सिद्ध करण्यासाठी कुठलीतरी प्रतीके लागतात. मंदिर, मशीद, चर्च वगैरे ही त्याच्या अंतरी अधिवास करून असलेल्या अमूर्त विचारांना अधिष्ठित करण्यासाठी कोरलेली प्रतीके. ईश्वर, अल्ला, जिझस आदी तमाकडून तेजाकडे नेणारे अन् सत्प्रेरीत मार्गाकडे वळते करणारे प्रेरक असतात. परिस्थितीने पुढ्यात पसरलेल्या पसाऱ्यात हरवत जातो आपण, तेव्हा हे प्रेरक पर्याय देतात आपणच आपल्याला समजून घेण्याचा. जाणीव करून देतात आसपास देखणा करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या प्रयासांची. आठवण करून देतात अभावग्रस्तांचं आयुष्य सुंदर करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सायासांची. विचार देतात वंचितांच्या वेदनांचे वेद वाचण्याचा.
प्रेरणा, प्रतीकांचा विनियोग कोण कसा करतो, यात सगळं काही आलं. प्रेरणांचं पसाभर पाथेय पदरी घेऊन जगणं सुंदर करू शकणाऱ्या वाटा मात्र ज्याच्या त्याने शोधायच्या असतात. सजग श्रद्धेच्या बळावर एकलव्य होता येतं. द्रोणाचार्यांनी दिग्दर्शन करण्यासाठी देहाने सोबत असायलाच हवं असं नाही. डोळस आकलनातून आत्मसात केलेल्या विद्येची, कमावलेल्या व्यासंगाची अन् स्वीकारलेल्या विचारांची सजग संगत करता येणं जगण्याची प्रयोजने शोधण्यासाठी पर्याप्त असतं.
शोध स्वतःच स्वतःचा घ्यावा लागतो. इतरांच्या नजरेतून मला समजून घेण्यापेक्षा माझ्या भूमिकेतून इतरांना माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन मला तयार करता यायला हवा. विषय ज्ञात जिव्हाळ्याचा, अज्ञात काळजीचा, आंधळ्या प्रेमाचा, अनाकलनीय श्रद्धांचा अथवा डोळस आस्थेचा असला की, त्याच्या केंद्रबिंदूतून शक्यतांच्या अनेक दृश्य-अदृश्य रेषा जन्मतात. अशावेळी निर्णय सद्सद्विवेकप्रज्ञेने घेणे अधिक श्रेयस्कर असतं. कारण, प्रत्येकाच्या काही धारणा असतात, काही धोरणे. काही जमा बाजू असतात, काही खर्चाचे रकाने असतात. त्यांची गणिते तेवढी जुळवता यायला हवीत. ती जुळवीत म्हणून सूत्रे शोधता यायला हवीत आणि नाहीच सापडली तर स्वतःला ती तयार करता यावीत, नाही का?
किती वर्षे झाली, किती ऋतू आले अन् गेले; पण परिस्थिती दोनही विचारधारा स्वीकारत नाही. देव, दैव, नियती मानणाऱ्यांनी त्यांचा सहर्ष अंगीकार करावा, नाकारणाऱ्यानी अन्य विकल्प सानंद स्वीकारावेत. पण नाही होत असं. आहे म्हणणारे आपल्या विचारांचे पलिते पेटवून पुढे पळतात. नाही सांगणारे विवेकाच्या मशाली हाती घेऊन आसपासचा परगणा उजळू पाहतात. प्रत्येकाचे समर्थनाचे साकव वेगळे. विरोधाचे आवेश आगळे. आस्थेचे अभिनिवेश निराळे.
विशिष्ट विचारधारेचा स्वीकार केला की, केवळ आपल्या आणि आपल्याच भूमिका सयुक्तिक वाटायला लागतात. आपण अंगीकारलेला मार्ग प्रशस्त पथावरील निर्वेध प्रवास असल्याचा अवकाळी साक्षात्कार होऊ लागतो. आहे हे कसं रास्त आहे, हे सांगण्यात माणसे कोणतीही कसर राहू देत नाहीत. पण एक गोष्ट प्रकर्षाने विस्मरणाच्या वाटेवर टाकून येतात, ती म्हणजे प्रत्येक गोष्टीला न दिसणारी दुसरीही एक बाजू असते. त्रिकोनालाही चौथा कोन असतो, तो म्हणजे दृष्टीकोन. विचारधारांचा हा एक काळा अन् हा दुसरा पांढरा अशा रंगात विभागता नाही येत. या कृष्णधवल रंगांच्या संक्रमण सीमेवर एक करडा रंग दडलेला असतो. तो ज्याला सापडतो, त्याला आस्थेचे अनुबंध आकळलेले असतात.
- चंद्रकांत चव्हाण
**