कोरोना, लॉकडाऊन, क्वारन्टाईन, आयसोलेशन, सोशल-फिजिकल डिस्टन्स वगैरे शब्दांचे अर्थ सांप्रत काळात अवगत नसतील, असे कोणी असतील तर ते एकतर अपवाद असावेत किंवा सर्वसंग परित्याग करून आपल्या विश्वात विहार करणारे तरी. गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून असा एकही दिवस नसावा की, हे शब्द माध्यम अथवा आपापसातील संवादातून वगळले गेले. काही गोष्टी अशा असतात, ज्यांचं आकलन तर होत असतं; पण त्यांना सामोरे जावं कसं अन् कोणत्या उपायांचा अवलंब करावा, याचा पूर्वानुभव पदरी नसतो. अशावेळी त्यावर ‘न भूतो’ म्हणून मुद्रा अंकित करून माणूस विलग होतो अथवा विचार तरी करीत राहतो.
गेल्या काही दिवसांपासून जवळपास सगळं जग थांबलं होतं. पण तरीही काहीतरी घडत होतं, आत आणि बाहेरही. मनात अनेक किंतु कातर कंप निर्माण करीत होते. काळजी, कळकळ होती, तसा कोडगेपणासुद्धा. सगळ्याच भावनांना उधान आलेलं. जो-तो ज्याच्या-त्याच्यापरीने परिस्थितीचे अर्थ शोधतोय. अन्वयार्थ लावतोय. आचरणात आणल्या जाणाऱ्या कृतीत आस्था आहे, आपलेपण आहे, तसा आशावादही. उद्वेग आहे, वैताग आहे तशी विमनस्कताही. आधीच असलेलं हे सगळं नव्या आयामात जग अनुभवतंय. उत्तरे शोधली जात आहेत. कारणांचा तपास केला जातोय. समस्यांवर पर्याय पाहिले जातायेत. संशोधने होत होती. उपाय अन् अपाय दरम्यान निसटलेला क्षण पकडण्याचा प्रयास केला जातोय. आजही हे सुरूच आहे. परिस्थितीने पदरी पेरलेल्या प्रश्नांची तीव्रता उमगून घेतली जातेय. उत्तरांचं गांभीर्य पाहिलं जात आहे. एक मात्र खरंय की, माणूस आस्थेचा ओलावा शोधत राहतो. आशेचे कवडसे वेचत राहतो अन् आसपास वाचत, हे सार्वकालिक वास्तव आहे.
करोना काळाने जगाला काय दिलं, ते काळच पुढे सांगेल. माणसांच्या वृत्ती-प्रवृत्ती, स्वार्थ, सहकार्य, संवेदना आदी गोष्टी काळाचा हात धरून चालत राहतात. त्या आताही आहेतच, नाही असं नाही. पण त्यांचे अर्थ अन् अन्वयार्थ बदलले आहेत. काळाची समीकरणे समजून वर्तणारे विचारांचं विश्व अधिक उन्नत करून माणूस नैतिकतेच्या वाटेने कसा वळेल, याचं चिंतन करीत राहतात. पण सगळेच काही संवेदनांचे किनारे धरून समोर सरकत नसतात. संवेदनांचा स्पर्शही ज्यांच्या विचारविश्वात विश्वासाने राहू शकत नाही, अशांच्या असण्या-नसण्याचे अर्थ कसे लावावेत, याचा शोध काळ घेत राहील.
जीवनाच्या सगळ्याच क्षेत्रावर परिणाम करणाऱ्या या आपत्तीपासून माणसाने पलायन करून पाहिलं, उभं राहून पाहिलं; पण फारसं काही हाती लागलं नाही. म्हणून तिच्या असण्याला समजून सोबत जगायला शिकावं लागेल, या मानसिकतेपर्यंत तो पोहचला. अनपेक्षितपणे समोर उभ्या राहिलेल्या या समस्येवर अद्याप खात्रीलायक उपाय उपलब्ध नसल्याने काही प्रयोग करावे लागतील, काही प्रयोजने पहावी लागतील म्हणून सगळेच सांगतायेत. या प्रयोगाचा एक भाग म्हणून सोशल डिस्टन्स वगैरे प्रकार सुरक्षेच्या चौकटी आपल्याभोवती आखतो आहे. चौकटी उभ्या राहतात, पण स्वातंत्र्याचं काय...? म्हणून आणखी एक प्रश्न भोवती पिंगा घालतो. एखाद्या गोष्टीची दुसरी बाजू समोर येते, तेव्हा विचार एकतर समर्थन करू शकतात किंवा प्रतिवाद. नसलं कोणाकडे प्रतिवादाला सामोरे जाण्याएवढं प्रगल्भपण तर वितंडवाद उभे राहून भोवती मर्यादांची कुंपणे घातली जातात. मर्यादा मनस्वीपणे मान्य करून, काही गोष्टींना आपलं समजून अंगीकार केल्यास प्रश्नांची तीव्रता कितीतरी सौम्य होते, हेही खरंय.
व्यवस्थेतील सगळीच क्षत्रे या आपत्कालीन कालावधीत गोठलेली असल्याने माणूस मुक्तीचा मार्ग शोधतो आहे. मिळतीलही काही विकल्प. पण सगळेच पर्याय पर्याप्त असतील असं नाही. काही पडताळून पाहावे लागतील. काही आचरणात आणावे लागतील. काही परिणामांचा विचार करून त्यांची परिमाणे बदलावी लागतील. सगळ्याच क्षेत्रांमध्ये परिणामांची तीव्रता कमी-अधिक असण्याची शक्यता असेल. पण ज्या वर्तुळात मुक्तीचे, चैतन्याचे, निरागसतेचे प्रवाह अनवरत वाहते आहेत, तेथे निर्बंध किती परिणामकारक ठरतील, हे सांगणे अवघड आहे. मर्यादांचे सजग भान ठेवून नियोजन करता येईल; पण ते शतप्रतिशत परिणामकारक ठरेलच, हे आज सांगणं अवघड.
‘शाळा’ या एका विषयाभोवती चर्चेच्या प्रदक्षिणा घडतायेत. ज्याचा अभ्यास आहे, तो मत प्रदर्शित करतोच आहे; पण या विषयाची जाण नाही, तोही काळजीयुक्त स्वरात काही संदेश देऊ पाहतोय. शाळा कोरानाचे केंद्र बनू नये, ही अपेक्षा रास्तच. पण समजतो एवढं ते सोपं आहे का? शाळा सुरु कराव्यात, पण सगळं सुरक्षित झाल्याशिवाय धाडस करू नये, अशी मते मांडली जातायेत. काही सुरक्षेचे उपाय करून आरंभ करता आला, तर तेही तपासून पाहावं म्हणून सूचित केलं जातंय. अर्थात यात एक चूक आणि दुसरा बरोबर असं नाही, दोनही बाजूंनी परिस्थितीकडे पाहिलं, तर काळजीचे सूर असणं वर्तमान परिस्थितीत स्वाभाविक आहे.
शिक्षण जगण्याला अर्थपूर्ण आयाम देण्याचं साधन असेल, तर ते मिळण्यापासून किती काळ अंतराय ठेवून राहावं? असाही एक विचार चर्चेच्या सूत्रात सामावून जातो. परिस्थितीची वाकळ पांघरून काळाच्या कुशीत विसावलेलं शाळा नावाचं विश्व चैतन्याने पुलकित करण्यासाठी वापरले जाणारे विकल्प अंतिम उत्तर असेल असं नाही. उपलब्ध पर्यायांचा वापर करणे संभव असलं, तरी त्यात काही व्यवधाने असतील. त्याच्या काही अंगभूत मर्यादा असतील, तशा वापरकर्त्याच्याही काही. उपलब्धतेचा प्रश्न असेल, तसा तदनुषंगिक बाबींचाही. मग यातून मार्ग कोणता अन् कसा? असा प्रश्न असेल आणि शाळा नावाचं गजबजलेलं गाव पुन्हा उभं करायचं असेल, तर सहकार्याचे ध्वज हाती घेऊन उभं राहावं लागेल. काही गोष्टीचे परिणाम तात्काळ हाती येतीलही, पण काही पुढील परिस्थती पाहून कार्यान्वित कराव्या लागतील.
कार्यान्वित शब्द कितीही देखणा वगैरे असला तरी त्यासोबत येणारं उत्तरदायित्व अटळ भागधेय असतं, या गोष्टीचं विस्मरण होऊ नये. अर्थात, उत्तरदायित्व असतं तेथे अधिकृत आणि प्राधिकृत अधिकारांचे अर्थ शोधावे लागतात. त्यांचा अन्वयार्थ समजून घ्यावा लागतो, अन्यथा चौकटींचा अधिक्षेप ठरलेला असतो. कोणा एकांगी विचाराच्या अधिपत्यात कार्य तडीस जात नसतात, तर त्यांना तडा जाण्याचा संभव अधिक असतो. अनेकांच्या आस्था एखाद्या कार्यात ऐकवटतात, तेव्हा सिद्धीसाठी साधकांची आवश्यकता नाही उरत. सत्प्रेरीत प्रेरणाच त्यांना मुक्कामच्या ठिकाणी नेत असतात.
अधिनियमांच्या चौकटी ज्ञात असतात, त्यांना आपल्या कार्याचे अर्थ अवगत असतात. आपल्या भूमिकेचं आकलन असतं, ते उद्दिष्टांपासून विचलित नाही होत. उत्तरदायित्व घेणाऱ्याला या सगळ्या गोष्टींचं वहन करताना ‘कोऽ अहं’ शब्दाचा पैस समजला की, झुलींचं अप्रूप नाही राहत. मला सगळं अवगत आहे, या भ्रमात विहार घडत असेल, तर प्रवाह पार करून पैलतीर गाठता नाही येत. प्रवाहासोबत पुढे सरकताना त्याच्या खोलीचाही अदमास घ्यावा लागतो. काही किंतु असल्यास त्यामागे व्यवस्था ठाम उभी असणं आवश्यक असतं, हे सांगण्यासाठी कोण्या भविष्यवेत्त्याची आवश्यकता नसते. काही प्रमाद घडतात. काही गोष्टी सुटतात. काही मुद्दे दुर्लक्षित होतात, तेव्हा ते दुरुस्त करण्यासाठी सहकार्याची गुढी हाती घेऊन मार्गावर उभं राहणं आवश्यक. केवळ प्रसिद्धीच्या पताका घेऊन वाटेवर उभं असणं घटकाभर सुखावह वाटेलही, पण तो काही पर्याप्त पथ नाही. सिद्धीचा मार्ग सहकार्याच्या साकवावरून पुढे सरकतो. सहकार्य, संयोजन, संवाद, सामोपचार, संवेदना सोबत असल्याशिवाय परिस्थितीचं सम्यक आकलन होणं अवघड असतं हेच खरे.
व्यवस्थापन अन् प्रशासन यात नितळ स्नेह अन् सहकार्य असल्यास उत्तरदायित्त्व शब्दाला असणारे आयाम अधिक देखणे करता येतात. त्यासाठी संवाद निरंतर असणे आणि तो सस्नेह असणे अनिवार्यता असते. प्रत्येकाला आपल्या भूमिकांचे अन्वय आकळले की, बरेच किंतु उत्तरांच्या विरामापर्यंत नेता येतात. शासकीय पातळीवरून निर्णय होतील. त्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे दिली जातील. शासनाच्या काही, काही समाजाच्या अपेक्षा असतील. त्यात समन्वय साधणं महत्त्वाचं. कारण मुले काही सारख्या वयाची अन् समान समज असलेली नसतात. शाळा सुरु करणं आवश्यक असेल, तर त्यांना अन् त्यांच्या वयाला आणि वयानुरूप जगण्याला समजून घेणं आवश्यक आहे.
यंत्रणा काळजी घेईलच. तरीही काही अनाकलनीय समस्या अनपेक्षितपणे समोर येतात. अघटित प्रसंग घडू शकतात. अशावेळी व्यवस्थापनाचा प्रशासकीय यंत्रणेवर अन् प्रशासकीय व्यवस्थेचा सहकाऱ्यांच्या कामावर विश्वास असणे आवश्यक असतं. व्यवस्थेत किंतु असतील, तर संदेह चालत अंगणी येतात. यंत्रणांमध्ये सुसंवाद असल्यास सकरात्मक परिणाम हाती येण्याची शक्यता अधिक असते. सतत घडणारा सकारात्मक संवाद संभ्रमातील अंतरे कमी करतो. ‘सर्वांची सुरक्षा, सगळ्यांची जबाबदारी’ या विचाराने वर्तने आवश्यक. मोठ्या परिघाभोवती प्रदक्षिणा करायची असेल, तर आपला पैस पुरेसा असायला लागतो. अंगीकृत कार्याला पूर्तीपर्यंत नेण्यासाठी कृतीत प्रयोजने पेरता यायला हवी. संवादाचा सूर सतत कसा निनादत राहील, याबाबत सजग असणे आणि आवश्यकता असल्यास लवचीकता धारण करणे गरजेचं असतं.
एकुणात, जगात काय चाललं आहे त्याचा अभ्यास, देशात काय चाललं आहे याचं अवलोकन अन् आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचा अदमास घेऊन आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधन-सुविधांसोबत पाऊल उचलावं लागेल. स्पर्धेत पळणाऱ्या सगळ्यांनाच फिनिशलाईन पार करता नाही येत, म्हणून ते काही कायम पराभूत नसतात. अनुकरण म्हणून धावता कोणालाही येतं. पण आपल्या मर्यादांचे सम्यक आकलन अन् बलस्थानांचं रास्त भान असलं की, पुढे पळणाऱ्या पावलांना गतीचे अर्थ आपसूक गवसतात.
परिस्थिती सर्वकाळी अन् सर्वस्थळी सारखी कधीच नसते. तिचे काही कंगोरे असतात. काही कोपरे. त्यांचा पृथक विचार करायला लागतो. थोडक्यात, काळ, काम अन् वेग याबाबत सम्यक विचारमंथन घडून, घडवून तारतम्याने निवडलेले विकल्प समर्थनीयच नाही, तर सर्जक ठरतात. म्हणून रास्त पर्याय निवडून स्थानिक परिस्थितीनुरूप निर्णय घेणे अधिक सुयोग्य. यंत्रणेला आपल्या भूमिकेप्रती व्यवस्थेचा विश्वास संपादित करून अंकुरित झालेलं आस्थेचं रोपटं ओलावा धरून ठेवलेल्या भूमीत रुजवावं लागेल, हे खरंच. पण त्याआधी निर्धारित कार्यक्षेत्राच्या चौकटीत आपल्या मर्यादांचं भान असणारा आत्मविश्वास पेरावा लागेल, नाही का?
(शाळा सुरु कराव्यात की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे. सुरु करायच्या तर कधी आणि कशा वगैरे प्रश्न आहेत. अनेक पण, परंतु आहेत. अगणित किंतु आहेत. आसपास अपेक्षा, काळजी, कळकळ वगैरे भावनांचा कल्लोळ आहे. या काळजीपोटी काय असावं, काय नाही याविषयी सांगितलं जातंय. अर्थात, यात काही अप्रस्तुत नाही. प्रस्तुत लेखनात संबंधित विषयाच्या अनुषंगाने काय योग्य, काय अयोग्य, याबाबत कोणतंही मत नाही. विकल्पांची वर्गवारी नाही. कोणत्याच किंतु, परंतुविषयी उहापोह नाही. काय असावं, काय नसावं याबाबत मत नाही. असणे आणि नसणे दरम्यानच्या संक्रमण रेषेवर क्षणभर रेंगाळताना मनात उदित झालेल्या विचारांसह कल्पनेच्या प्रतलावरून वाहने आहे फक्त. गवसलंच काही कोणाला तर शब्दांचा मनाशी संवाद आहे, तोही स्वतःचा स्वतः साठी.)
▪▪