Sanvedanshilata | संवेदनशीलता

By // 6 comments:
प्रेमास विरोध केला म्हणून मुलीने आईच्या डोक्यात मुसळ घालून हत्या केली. महाविद्यालयात शिकत असणाऱ्या बहिणीने तंग कपडे परिधान केले म्हणून भावाने मारहाण करून बहिणीचा जीव घेतला. काही दिवसापूर्वीच्या वर्तमानपत्रातील या बातम्या. यातील एक घटना जळगाव जिल्ह्यातील दुसरी कोल्हापूरकडील. राज्याच्या दोन दिशांना घडलेल्या. ‘रोज मरे त्यास कोण रडे’ म्हणून वाचून काही विसरलेही असतील. काही क्षणभर अवाक झाले असतील. काहींनी या घटनांचं विश्लेषण केलं असेल. समाज नैतिक जाणिवा विसरून संवेदनाहीन होत चाललायं म्हणून व्यवस्थेला दोष दिला असेल. काहींच्या मनात प्रश्न निर्माण झाले असतील. कोणी काहीच का करू शकत नाही म्हणून कदाचित काहीजण अस्वस्थही झाले असतील. असं काही घडल्यावर समाज क्षणभर अस्वस्थ होतो, हळहळतो आणि ‘आलिया भोगाशी’ म्हणीत मुकाट्याने नियतीने नेमून दिलेल्या मार्गाने मार्गस्थ होतो. पोटाची खळगी भरण्याचे प्रश्नच मोठे असल्याने त्यावर विस्मरणाची धूळ साचत जाते. रोजच्या जगण्याचे गुंते सोडण्यात माणसे गुंततात. प्रश्न तसेच मागे उरतात. संवेदनशील माणसे विचार करतात. इतक्या टोकापर्यंत जाऊन माणसं संवेदना कशा काय हरवून बसतात, याची कारणं शोधू लागतात. खरंतर या घटनातील मुलंमुली अवघ्या सोळा ते एकोणावीस वयोगटातील. ज्या वयात जगण्याचा आनंद घ्यावा. त्या वयात असा अविचार घडावा, याला काय म्हणावं? माणूस म्हणून जगताना संवेदना एवढ्या बोथट कशा काय होत असतील?

माणूस समाजशील प्राणी असल्याचं कुठेतरी लिहिलेलं वाचतो. तसाच तो भावनाशील असल्याचेही म्हणतो. म्हणूनच तो विचारांचं प्रतीक आहे, तसा विकारांचे प्रतिबिंबही आहे, हे दुर्लक्षून चालत नाही. विचारांपेक्षा विकार प्रबळ होतात, तेव्हा जगण्याचे प्रश्न अधिक जटील होत जातात. सारासारविवेकाने विचारविश्वातून काढता पाय घेतला की, अप्रिय घटना सामाजिक वैगुण्य बनून प्रकटतात अन् माणसं जगण्यातील सहजपण हरवून बसतात आणि अविचाराने वर्तायला लागतात. अशा घटनांचं वास्तव नाकारून चालत नाही. माणूस समाजाचाच घटक असल्याने याचं उत्तरदायित्व शेवटी समाजाच्या व्यवहारातच शोधायला लागतं. माणसाच्या इहलोकीच्या प्रवासाच्या यात्रेचे संचित त्याने आत्मसात केलेले संस्कार असतात. ती त्याच्या जगण्याची श्रीमंती असते. संस्कारांनी निर्मिलेली वाट चालणारा समाज भरकटतो, दिशाहीन होतो, तेव्हा जगण्याच्या पद्धतींना मुळापासून तपासून पाहावे लागते. मनात निर्माण होणाऱ्या आसक्तीपरायण विचारांमुळे माणसं हल्ली सहज जगणं विसरत चालली आहेत. आदिम अवस्थेपासून त्याच्या जडण-घडणीचा प्रवास काही लाख वर्षाची खडतर तपस्या आहे. उत्क्रांतीच्या क्रमसंगत मार्गावरून चालताना इहतलावरील सर्वाधिक विचार करणारा प्राणी म्हणून तो घडला. म्हणूनच तो अधिकाधिक उन्नत, परिणत व्हावा हीच अपेक्षा त्याच्या उत्क्रांतीच्या वाटेने होणाऱ्या प्रवासाला आहे. एखाद्या घटनेने माणूसपणावरील विश्वासच उठून जावा असे काहीतरी घडते. माणूस कितीही विकसित झाला, तरी जीवशास्त्राच्या परिभाषेत तो प्राणीच असल्याचे अशावेळी प्रकर्षाने जाणवते. विचारांनी वर्तला तर तो प्रेषित होतो आणि विकारांनी वागला तर पशू.

विज्ञानतंत्रज्ञानाची आयुधे हाती घेऊन विश्वात अन्य ठिकाणी कोणी जीव अस्तित्वात आहेत काय, याचा शोध घेण्याचा प्रयत्न माणूस  करतोय; पण जेथे आहे तोच अजून पूर्णतः समजला नाहीये. त्याच्या वागण्याचे मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय विश्लेषण विद्वान करीत असूनही त्यांच्या निष्कर्षांना पद्धतशीर चकवा देणारा माणूस ओळखता आलेला नाही. याचा अर्थ समाजातील सगळीच माणसे वाईट असतात असा नाही. प्रगतीची नवनवी क्षितिजे संपादित करत असतांना अशा काही घटना घडल्या की, संवेदनशीलता हरवत चालल्याचे जाणवते. माणूस भावभावनांचे सरोवर आहे. विकारांच्या अनेक लाटा त्यात उसळतात. पण संयमाचे बांध घालून त्याच्या जीवनतटांना सुरक्षित राखायला लागते. यासाठी अंतर्यामी असणाऱ्या संवेदनशीलतेचे स्फूल्लिंग जपावे लागते, आतल्या माणूसपणाच्या जाणिवेसह. समाज नावाची व्यवस्था उभी करून त्याच्या विसंगत वर्तनाला बांध घालण्याचा प्रयत्न यासाठीच माणूस करतो आहे. कधी नव्हे इतके माणूसपणाचे आकाश अंधारून आलेले आहे, अविचारांनी मनात गर्दी केली आहे. अंधारल्या वाटांनी प्रवास घडतांना आस्थेचा कवडसा अंतर्यामी जाणीवपूर्वक जपायला लागतो. मनातील भावनांना माणूसपणाच्या कोंदणात अधिष्ठित करणे जगण्याची अनिवार्यता असते. माणसांच्या जगण्याचा गुंता मोकळा करून सहजपणाने जगणं घडायला हवं. ज्याला जगण्याचे प्रयोजन कळते, त्याला जगावं कसं, हे प्रश्न पडत नाहीत. जगणं समजलं की, मोठे होण्यासाठी देव्हारे तयार करण्याची गरजच नसते. स्वतःभोवती उभ्या केलेल्या वर्तुळांना जग समजून वागणारा माणूस समरसून जगण्याचे सौख्य हरवत चालला आहे. जगण्याला जीवनयोग न समजता स्पर्धेचे रणांगण समजून प्रवास घडतोय. प्रत्येकालाच पुढे निघायची घाई झाली आहे. जगात रहायचीही स्पर्धा झाली आहे. स्पर्धा जगण्याचे तत्वज्ञान बनते, तेव्हा जीवनातून संवेदना काढता पाय घेतात. मी मागे पडेन या भीतीने सारेच दिशाहीन मार्गाने धावत आहेत. आयुष्याच्या कॅनव्हासवर पद, पैसा, प्रतिष्ठा नावाचे रंग भरण्यातच जगण्याचं सौख्य सामावाल्याचा भ्रम मनात निर्माण झाला आहे. त्यांचा शोध घेताघेता आयुष्याचा कॅनव्हास बेरंग होत चाललाय याची जाणीवच उरली नाही.

जगणं समृद्ध करण्याच्या चौकटी स्वतःभोवती उभ्या करताना सगळंच मला हवंय, ही मानसिकता प्रबळ होत आहे. जे हवं ते नीतिसंमत मार्गाने मिळवावे लागते, याचे भानच सुटत चालले आहे. स्वतःच्या भौतिक गरजा कमी करून दैन्यदेखील विनम्रतेने स्वीकारण्याची मानसिकता विस्मृतीच्या कोशात अंग मुडपून उभी आहे. माणसापेक्षा गरजा मोठ्या झाल्या आहेत. गरजांतून निर्मित आभासी सुखांच्या मृगजळामागे माणूस धावतो आहे. ‘तुज आहे तुज पाशी’ या साध्याशाच विचाराची जाणीव विसरून वर्ततो आहे. सगळीच सुखं झटपट हवी आहेत. या हव्यासापायी ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ असे जगणे जणू अपराध आहे, या भावनेने माणूस वागायला लागला आहे. ‘या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ म्हणणारा विचार वेडगळपणाची गोष्ट वाटतो आहे. संत-महात्म्यांचे विचार मंदिरांमधील पारायणापुरते उरले आहेत. फक्त ऐकायचे आणि आचरण करताना त्याचा सोयिस्कर विसर करायचा. सगळ्यांना सगळेचकाही हवे आहे आणि ते आताच मिळायची घाई झाली आहे. थांबणं आणि वाट पाहणं यातला प्रतीक्षेचा काळ काहीही करून पुसून काढायची घाई झाली असेल, तर संवेदनांचा विचार करतोच कोण? सुखांच्या हव्यासाला खतपाणी घातलं जातंय. चंगळवाद जगण्याचा सिम्बॉल होतोय. पुढच्या शंभर वर्षाचं जगणं दहा वर्षात जगून घ्यायची घाई झाली आहे. संथ लयीत चालणाऱ्या प्रसन्न जगण्याची आस राहिली नाही. जे हवं ते आजच हाती यावं, नसेल सहज हाती येत तर ओरबाडून घेण्याचीही तयारी आहे.

जगात पैसा वाढत चालला आहे; पण नैतिकतेचे प्रवाह आटत चालले आहेत. विधिनिषेधशून्य विचारातून अनैतिकता, त्यातून विकृती आणि त्या पावलांनी चालत येणारी व्यसनाधिनता, हे समाजाचं प्राक्तन होऊ पाहत आहे. कोटीकोटींचे भ्रष्ट्राचार घडूनही कोणाला काही वाटत नाही. दक्षिणातंत्राला संवेदनाहीन माणसांनी प्रतिष्ठेच्या प्रांगणात उभे केले आहे. चिरीमिरी शब्दाला देणे-घेणे अर्थाचा आशय प्राप्त झाला आहे. धनदांडग्यांच्या महालात निवासाला आलेल्या लक्ष्मीने गरिबाघराच्या सरस्वतीला हतबुद्ध करून टाकले आहे. महागड्या गाड्यांखाली रस्त्यावरील निरपराध माणसे तुडवली जात आहेत. बेदरकार वाहने चालवणाऱ्यांच्या समर्थनार्थ संवेदनांना तिलांजली देत उन्मत्तपणाचं समर्थन करणारी माणसं उभी राहत आहेत. आपल्या माणूसपणाच्या पाऊलखुणांचे ठसे दूरच्या क्षितिजावर सोडून आलेली बोथट मने माणुसकीची व्याख्या आपल्यापरीने करीत आहेत. धनदांडगे असणं जगण्याची नवी आयडेंटीटी होत आहे. जगण्याची नवी पात्रता ठरू पाहत आहे. पैशाला जगण्याचं परिमाण मानण्याचा प्रमाद घडतो आहे. स्वैराचाराला मिळणारे वलय समाजातील संवेदनशीलता हरवल्याचे द्योतक ठरतो आहे.

आयुष्याची वाट सहजसाध्य कधीच नसते. जीवनाचा सोपान यशापयशाच्या शिड्यांनी घडतो. यशाने हुरळून जाऊ नये आणि अपयशाने विकल होऊ नये, हा जगण्याचा सहज पाठ असतो. अपयशाने जाणते व्हावे, आयुष्याला आकार देत सहजपणाने जगण्याची प्रयोजने शोधत रहावीत; पण परिस्थितीशी संघर्ष करताना हताश झालेले जीव अविचारी कृतीने स्वतःच निर्माण केलेल्या समस्यांच्या आवर्तात सापडतात. जगण्याची गणिते चुकत जातात. उत्तरे अवघड होत जातात, तेव्हा माणसं कोणतातरी आधार शोधतात. प्रयत्नांती परमेश्वरही प्राप्त होतो, हे विसरून किंकर्तव्यमूढ होतात. गलितगात्र झालेल्या मनासाठी आधार शोधत कुणातरी स्वार्थपरायण बुवा-बाबा-मातेच्या आश्रयाला जाऊन विसावतात. जगणं उसवलेली आणि समस्यांनी दुभंगलेली माणसे त्यांच्या चरणी आपल्या निष्ठा समर्पित करतात. सारासार विवेक विसरून भोंदूंच्या भजनी लागतात. स्वयंघोषित गुरूंच्या लीला उजागर होतात. समाजाचे भावनिक शोषण करणारी ही माणसे कोणत्यातरी आरोपांनी जेरबंद झाल्यावर त्यांच्या समर्थनार्थ अंधश्रद्ध भक्तगण रस्त्यावर उतरतात. तेव्हा समाजाच्या वागण्याची कीव करावीशी वाटते. कुणातरी मानिनीची मानखंडना करणाऱ्या कलंकित बुवा-बाबाच्या मुक्ततेसाठी कुठल्यातरी अंधश्रद्ध नारी त्यानेच निर्माण केलेले आंधळ्या भक्तीचे झेंडे हाती घेऊन प्रयत्न करतात, तेव्हा समाजमन कोणत्या दिशेने चालले आहे, याची उत्तरे मिळणे दुष्कर होत जाते. कर्मकांड, अंधश्रद्धांना बरकत येणे समाजाचे वैचारिकस्वास्थ्य ठीक नसल्याचे लक्षण असते. समाजातील अविचाराची काजळी दूर करून सकळ जणांना शहाणे करू पाहणाऱ्या विवेकी माणसांची हत्या घडूनही समाजमन सुधारायला तयार नसेल, तर संवेदनांचे वाहते झरे शोधावेत कुठून?

आपण निर्धारित केलेल्या विचारधारांनी जगाचे जगणे घडावे आणि आपण ठरवू तसेच माणसांनी वर्तावे यासाठी हाती शस्त्रे घेऊन निरपराध्यांच्या जगण्याचा अध्याय संपवणाऱ्या रक्तरंजित खेळाचे पट अतिरेकी मांडत आहेत. संवेदना विसरलेल्या आत्मघातक्यांची नवी जातकुळी आकाराला येत आहे. आपल्या अनैतिक तत्वांच्या स्थापनेसाठी माणसांना किडे-मुंग्या समजून रक्तलांच्छित खेळ करणाऱ्या संघटना ही काही संवेदनशील मनांची निर्मिती नसते. या संवेदनाशून्य शिकारी टोळ्या समाजाच्या संस्कारशील मनावरील कलंक आहेत. जगाला कलह, संघर्ष काही नवा नाही. आजपर्यंत जगात जेवढी जीवितवित्तहानी युद्धांनी घडली नसेल; त्यापेक्षा अधिक हानी संवेदना विसरून कृती करणाऱ्या आणि विचारांवर धर्मांधतेची पट्टी बांधून वर्तणाऱ्या वृत्तींनी घडवली आहे. जगातले सगळेच धर्म शांततेची सूक्ते आवळताना दिसतात. असे असूनही जातीय, धर्मीय, वंशीय अभिनिवेश धारण करून वागणारे अकारण आपणच श्रेष्ठ असल्याचे समजतात, तेव्हा धर्म नाही; माणुसकीधर्म संकटात सापडतो. जर देवाचं अस्तित्व निर्गुण, निराकार असेल आणि तो अरत्र, परत्र, सर्वत्र असेल, तर जगातील अनेक परगणे द्वेषाच्या वणव्यांनी का पेटत आहेत? संवेदना विसरलेली माणसे माणुसकीपेक्षा धर्म मोठा समजतात, तेव्हा माणूसपणाचा पहिला बळी जातो. माणूसपण विसरून जग वागत असेलतर धर्म कोणासाठी असेल? माणसाशिवाय धर्म असून नसल्यासारखा नाही का? 

अश्मयुगापासून अण्वस्त्रयुगापर्यंत माणसांचा प्रवास त्याच्या विजीगिषू वृत्तीची संघर्षगाथा आहे. अपार संघर्ष करून समस्यांमधून सहीसलामत सुटण्याचे प्रयोग आहेत. नेट-इन्टरनेटच्या वेगावर आरूढ झालेल्या विद्यमान विश्वात विज्ञानाने असंख्य सोयीसुविधा निर्माण केल्या. इहलोकी प्रतिसृष्टी साकारण्याइतपत माणूस सक्षम झाला; पण त्याला नितळ, निखळ, निर्व्याज संवेदना काही निर्माण करता आल्या नाहीत. प्रगत देशातील प्रचंड प्रगती एकीकडे तर दुसरीकडे अप्रगत प्रदेशातील मागासलेपण, ही विषमता का दूर होत नाही? जगातली सगळी मानव जमात एकच असेल, तर एकीकडे पंचतारांकित जगणे आणि दुसरीकडे जगण्याच्या कलहात अनेकांच्या जीवनाच्या गाथा संपुष्टात येणे घडते. हे संवेदना हरवलेल्या आमच्या मानवकुलास दिसत नसावे का? देशाच्या विकासाच्या आपण वार्ता करतो. उद्याची महासत्ता म्हणून अभिमानाने बोलणे घडते. तेव्हा दहा-पंधरा कोटी माणसे दारिद्र्याला जीवन मानून नियतीने दिलेलं जगणं स्वीकारून कसेतरी जगत असतील, तर स्वतःला महान वगैरे म्हणवून घेणे आपलीच वंचना नाही का? विवाहसोहळ्यावर लाखो रुपये खर्च करून आपला इतमाम समाजाला दाखवण्याचा प्रयत्न काही माणसे करतात. आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढल्याच्या आभासी सुखात रममाण होतांना समारंभासाठी आलेल्यांच्या भरल्या पोटात आणखी ढकलत राहतात. त्यांच्या भोजनपात्रातील पदार्थांचा एकेक घास घेतला तरी पोट भरून शिल्लक उरेल एवढे पदार्थ दाटीवाटी करून सामावलेले असतात, तेव्हा भाकरीच्या एका तुकड्यासाठी कोणीतरी अश्राप जीव टाकलेलं उष्ट उचलून पोटाची खळगी भरण्यासाठी धडपडत असतो. हे आमच्या समाजव्यवस्थेला दिसत नसावे का? याला कुठली संवेदनशीलता म्हणावे? आला दिवस कसातरी ढकलीत माणसे अर्धपोटी, उपाशीपोटी परिस्थितीशी दोन हात करीत आजही जगत आहेत. प्रामाणिक प्रयत्न करूनही यांच्या जगण्याच्या प्राक्तनरेखा पालटत नसतील, तर दोष आमच्या हरवलेल्या संवेदनाचा आहे. विस्कटलेल्या स्वकेंद्रित विचारांचा आहे, हे आपण कधी मान्य करणार आहोत?

लाखालाखाच्या महागड्या बाईक्स धूमस्टाईलने सुसाट उधळताना रस्त्याने पायी चालणाऱ्यांची जाणीव आपणास असते का? जाणिवांचे विस्मरण घडून जगणे माणूसपणाची व्याख्या नाही. कोटीकोटींचे बंगले बांधले तरी निद्रेसाठी सातआठ फुटाची जागाच प्रत्येकाला हवी असते. नावावर शेकडो एकर जमिनी असल्यातरी पोटासाठी लागणारी भाकर सगळीकडे सारखीच असते. मग अधिक काही असण्याचा सोस कशासाठी? माणूस वगळून धरतीवर जगणारे अन्य जीव आपल्या गरजेपुरते घेतात. त्यांनी आपल्या घरात फ्रीज नाही सांभाळले. तिजोऱ्या नाही केल्या. आधुनिक सुखसाधनांनी मंडित किंगसाईज जगणं म्हणजे माणसाच्या जीवनाची इतिकर्तव्यता असते का? विस्तीर्ण घर, अंगणात लागलेला वाहनांचा ताफा, सोबतीला विज्ञाननिर्मित सुखांची रेलचेल असणं आणि दारी विसावलेल्या सुखांनाच जगण्याचे परिमाण समजणं संवेदनशील विचारांची वंचना नाही का? जगणंच उसवलं; त्याला टाके घालूनही सांधता येत नाही, म्हणून कोणातरी शेतकरी कोलमडतो. सततच्या संकटांशी लढूनही जगण्याचा मोह पडण्यासारखे हाती काहीच न लागल्याने परिस्थितीशी धडाका देऊन थकलेला जीव जीवनयात्रा संपवतो, तेव्हा त्याच्या अकाली मरणालाही रंग चढतात. कोणाला त्याचं आकस्मिक जाणं प्रेमभंग दिसायला लागतो. कोणाला त्यात व्यसनाधीनतेचा शोध लागतो. हे माणूसपणाच्या कोणत्या संवेदानाचे रूप आहे. कोण्यातरी धनिकाने उभ्या केलेल्या पंचतारांकित महालाचे कौतुक करताना काहींच्या वैखरीला बहर येतो; पण तो उभा करण्यासाठी राबणाऱ्या हजारो हातांचे श्रम दुर्लक्षिणारी माणसे कोणती संस्कृती, कोणते परगणे आपल्या संवेदनशील विचारांनी संपन्न करीत असतात. सुंदरता उभी करणारे हात अंधारात राहणे आणि ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आहे त्यांची नावे अजरामर होणे, हा संवेदनशीलतेचा विपर्यास आहे.

एखादा देश जाणून घ्यायचा असेल, माणसे समजून घ्यायची असतील तर तेथील रस्त्यावर उभं राहून पाहावं. ज्या माणसांमध्ये रहदारीचे साधे नियमही पाळायचीही शिस्त नसते, पात्रता नसते त्यांच्यासाठी संवेदनशीलता हा खूप दूरचा परगणा आहे. रस्त्यावर हात पसरून याचना करीत केविलवाणी फिरणारी लहान मुले आणि जगण्याची रया गेलेली, दारिद्र्याने पिचलेली, परिस्थितीने लाचार झालेली माणसे सहज दृष्टीस पडणे देशाच्या सामाजिक प्रगतीचे भविष्य कथन करीत असते. असंख्य समस्यांचे मोहोळ सोबत घेऊन उभ्या राहणाऱ्या झोपड्यांमधील शापदग्ध जगण्याला नियतीचे देणे मानून राहणाऱ्यांच्या जगाला माणसांचं जगणं म्हणावं का? देशातील उपलब्ध सोयीसुविधा देशाचा स्वभाव कथन करीत असतात. प्रचंड धूर मागे टाकीत रिक्षा पुढे दामटणारे तुमच्या देशाच्या आरोग्याबाबत किती संवेदना धारण करून वागतात, सार्वजनिक आरोग्याचा किती विचार करतात ते दिसते. कोणत्यातरी सणसोहळ्यात, उत्सवात वावरणारी माणसे रस्त्याला आपली वैयक्तिक जागीर समजून वागतात. कानठळ्या बसवणाऱ्या डीजेच्या तालावर बेधुंद होऊन कसलीही तमा न बाळगता थिरकतात. भोगवादी विचारांना जगण्याचे लेबले चिकटवून आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये सांस्कृतिक मर्यादांचे कुंपणे पार करून तरुणाई भान विसरून झिंगताना दिसते, तेव्हा कळते देशाचे भविष्य किती उज्ज्वल आहे. समाज, सामाजिकता आणि सामाजिक दूरिते काय आहेत, याची जाणीव नसणाऱ्यांकडून संवेदनशीलतेची अपेक्षा करणे, म्हणजे खडकावरचा पाऊस आहे. कितीही बरसला तरी एकही कोंब अंकुरित होण्याची शक्यता नाही. आपण आणि आपलं सुख, हे आणि एवढंच ज्याचं विश्व आहे, त्याला संवेदना या शब्दाचा अर्थ शिकवणे अवघड आहे.

राष्ट्राचाही एक स्वभाव असतो. माणसे आपल्या वागण्यातून तो घडवत असतात. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झालेला जपान फिनिक्स बनून झेपावला. आपलं सगळंच अस्तित्व उधळून बसलेला जर्मनी चिकाटीच्या बळावर उभा राहिला. आपल्याकडे असं घडण्यासाठी आपणही तशाच कोणत्यातरी युद्धाची वाट पाहणार आहोत का? त्यांच्याकडून वस्तू घेतो, तंत्रज्ञान घेतो मग संवेदना जागे करणारे विचार घेता नाही का येणार? इस्रायलसारख्या लहानशा देशाला शेती, पाणी क्षेत्रात जे जमलं, ते धो-धो पाऊस पडूनही आपल्या देशाला अजूनही का जमत नाही? आम्हाला असं नाही का करता येणार? याचा अर्थ आपल्याकडे विधायक काही घडतंच नाही असे नाही. संवेदनांची छोटीछोटी बेटे आजही आपल्या इतमामात उभी आहेत. समाजातील वेदानांकित जिणे पाहून व्यथित झालेली संवेदनशील माणसे आस्थेचे पाथेय हाती घेऊन दुभंगलेली मने सांधण्यासाठी आणि विझलेल्या स्वप्नांना बांधण्यासाठी मरणकळा आलेल्या दारी जात आहेत. करपलेल्या मनात आस्थेचा अंकुर फुलवून नेत्रात नवी उमेद उभी करीत आहेत. विकल मनांचा हरवलेला श्वास अभंग ठेवण्यासाठी धीर देत आहेत. जीवनाच्या निसटत्या वाटांवर चालताना जगण्याचे परगणे हरवलेल्यांना आत्मविश्वास देत आहेत; पण एवढ्या अफाट जनसागरात ती बहुदा दिसतंच नाहीत.

आमचं जगणं आमच्या संवेदनांचा प्रवास असतो, त्या आपण कधी जाग्या करणार आहोत? समाज नुसता अप्रिय घटनांनी व्यथित होऊन चालत नाही. त्यावर चिंतन करून काहीतरी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकतो, तेव्हा काहीतरी शुभंकर घडण्याची शक्यता असते. समाजात अन्याय, अनाचार, अत्याचार घडत राहतो; न्याय मिळवून द्यावा लागतो. न्यायप्रिय मानसिकतेने जगण्यासाठी अंतर्मनात संवेदनांचा झरा जिवंत ठेवावा लागतो. जगण्याची स्वप्ने भंगतात, जगणं विस्कटतं तेव्हा माणसांचा जीवनावरील विश्वास उठत जातो. माणसांचे संयमित विचार उसवतात, माणूसपणाचे समृद्ध आभाळ अविचारांनी अंधारून येते, तेव्हा सगळा समाजच चक्रव्यूहातल्या अभिमन्यूसारखा होतो. आत शिरता येते, पण बाहेर पडणे अशक्य झालेले असते. संभ्रमात पडलेला अर्जून बनून समाज किंकर्तव्यमूढ झाला की, परिस्थिती परिवर्तनाचे सगळे पर्याय थांबतात. यासाठी जीवनगीता सांगणारा कृष्ण सोबतीला असायला लागतो. असा कृष्ण विद्यमानयुगात गवसणे दुरापास्त असल्याने, प्रत्येकाला कृष्ण बनता येत नसले, तरी त्याचे विचार स्वीकारून सारथी व्हावे लागते. कोणीतरी येऊन आमच्या भाग्योदयाचे साचे बदलून जाईल म्हणून वाट पाहत बसले की, हाती शून्यच लागते. अशावेळी महान परंपरांचा उद्घोष करीत, आम्ही किती वैभवशाली जगलो, याचे दाखले देत संस्कारांचा जागर घडवला, तरी मरणासन्न संवेदनशीलतेला संजीवनी मिळण्याची शक्यता जवळपास नसते.

Manase | माणसे

By // 10 comments:
‘माणूस’ असा एक शब्द ज्याभोवती अर्थाची अनेक वलये उभी असतात. तो कसा असावा? कसा नसावा? याबाबत समाजाच्या काही अपेक्षा असतात. माणसाविषयी भाष्य करणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे अनेक पर्यायात समोर येतात. त्याला अथपासून इतिपर्यंत संपूर्णतः समजून घेणे, हे एक अवघड गणित आहे. म्हणूनच की काय माणसाला समजून घेण्यासाठी माणसांनीच निर्माण केलेल्या निकषांच्या मोजपट्ट्या पुरेशा नसतात. राग, लोभ, प्रेम, द्वेष, तिरस्कार, स्नेह, समर्पण, सेवा, सहकार्य, साहचर्य, संघर्ष, स्वाभिमानादी भावभावनांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी गुंफलेला बहुपेडी गोफ म्हणजे माणूस, असे कोणी म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. समाजात वावरणाऱ्या अनेकांतील एक म्हणून माणूस नक्की कसा असेल, हे सांगणे अवघड आहे. माणूस म्हणून त्याला एकाच एक साच्यात फिट्ट बसवून मोजता येत नाही. तात्कालिक, प्रासंगिक घटनांनी आणि वर्तनाने ज्याच्या असण्याचे, नसण्याचे दर्शन घडते, तो म्हणजे माणूस असेही कोणी म्हणू शकेल. त्याच्या वर्तनप्रवाहांना समजणे एक अवघड काम आहे. समाजाचा एक घटक म्हणून कोणीतरी त्याच्या प्रासंगिक वर्तनाचा कोणतातरी अनुभव घेतलेला असतो, त्या अनुभवातून निर्मित विचारांचं जे संचित हाती लागते, ती माणूस शब्दाची त्याच्यापुरती व्याख्या असते. अर्थात वैयक्तिक अनुभवातून साकारलेली मते काही सार्वत्रिक मान्यतेची मोहर नसतात. एखाद्या व्यक्तीविषयी तयार झालेलं मत बऱ्याचदा वैयक्तिक असले, तरी ज्याच्या-त्याच्यापुरतं ते एक वास्तव असतं. कदाचित अनुभवणाऱ्याच्या दृष्टीने अर्धच असलं तरी सत्य असतं.

समाजात वावरताना शेकड्याने माणसे आपल्या संपर्कात येत असतात, ती सगळीच काही आपली नसतात. त्यातील काही आपली होतात, काही अंतरावर असतात. काहींशी मनाच्या तारा जुळतात, काहींशी सूर जुळून येतात. काहींच्या सहवासात विचारांचे मळे बहरतात. काहींच्या असण्याने बहरलेले परगणे उजाडही होतात. संपर्कात येणारे काही आषाढाच्या भरून आलेल्या आभाळासारखे असतात, अनंत जलधारा बनून धरतीकडे धावत येणाऱ्या मेघासारखे. बरसताना रिते होऊन चिंब भिजवून काढणारे. काही श्रावणातल्या रिमझिमणाऱ्या जलधारा बनून मनाच्या अंगणाला भिजवणारे, प्रसन्नतेची गंधगार संवेदना निर्माण करणारे. तर काही माळावर फुलणाऱ्या फुलासारखे आपलं लहानसं अस्तित्व सांभाळीत, वाऱ्यासोबत गुजगोष्टी करीत, आपणच आकाश होण्याचे स्वप्न पाहणारे. अंगभूत गंध नसला, तरी देखण्या सौंदर्याने पाहणाऱ्यास मोहात पाडणारे. काहींचा सहवासच मुळात पहाटेच्या प्रसन्न प्रहरी फुललेल्या पारिजातकाच्या परिमलासारखा, अवघा आसमंत गंधाने भारित करणारा. तर काहींचं आगमन अवचित येणाऱ्या वळिवाच्या सरींसारखं, धो-धो बरसणाऱ्या सहस्त्रावधी जलधारांच्या अभिषेकात धुवून काढणारं. काहींचं सोबत असणं पहाटेच्या प्रहरी मंजुळ गान बनून ताणा घेणाऱ्या पक्षांच्या सुरावटींचं. काहींचं असणं रात्रीच्या काळ्याशार आभाळात चमचमणाऱ्या तारकांसारखं, साऱ्या जगाला प्रकाशाने उजळून टाकता येत नसलं, तरी प्रत्येकाच्या मनात लुकलुकणारा प्रकाशाचा कवडसा पेरणारं. काहींचं येणं डोंगराआडून उगवणाऱ्या सूर्याच्या सोनेरी गोळ्यासारखं तेजस्वी. काहींचं इंद्रधनुष्य होऊन क्षितिजाला सप्तरंगी कमान बांधणारं.

काहींचा सहवास जणू काही वाऱ्यासोबत वाहणारा, कधी ओहळ बनून झुळझुळणाऱ्या निळ्याशार पाण्यासारखा, नदीची धारा बनून वळणे घेत वाहणारा. उंचावरून उडी घेऊन दरीत कोसळणाऱ्या प्रपातासारखा. अथांग सागराच्या तळाचा ठाव न सापडणारा. तर काहींचं आयुष्यात येणंच भिजवून टाकणारं, पहिल्या पावसाने सचैल स्नान करून न्हालेल्या सुस्नात धरतीसारखं. पहिल्या पावसाला हुंकार देत मातीच्या कुशीतून हळूच डोकावून बाहेर येणाऱ्या कोंबासारखा. संतांच्या प्रासादिक सहवासासारखा अन् दुर्जनांच्या नकोशा सोबतीचाही. अनेकांसारखा, कधी अनेकांतील एका सारखा. कधी सर्वाभूती स्नेह शोधणारा. कधी स्वतःच स्नेहधारा होणारा. विकारांना वश न होणारा, तर कधी विकारांनी विकल होऊन खचणारा. कधी शून्यातून उठून पुन्हा नवं वर्तुळ रेखांकित करणारा. कधी असलेली वर्तुळे उद्ध्वस्त करणारा. आहे त्यापेक्षा जग सुंदर करण्यासाठी इतरांचं जगणं सजवणारा, प्रसंगी कुरूप करून विस्कटवणाराही. कधी गम्य वाटणारा, कधी निबिड अंधारासारखा अगम्य भासणारा. कधी भूमितीतील अवघड प्रमेयासारखा. कधी इतिहासाच्या पानांत पराक्रम बनून विसावलेला. भूगोलाच्या अक्षांशरेखांशावर रेघ ओढून आपापले परगणे तयार करणारा. अशा कितीकिती रुपात तो साठला आहे. बघावा तेवढा वाढतच जाणारा, तरीही फिरून पुन्हा काहीतरी शिल्लक उरणारा. म्हणूनच माणूस सृष्टीच्या सर्जनाचा साक्षात्कार आहे, असे म्हणत असतील का? ज्याच्या असण्याने काही घडते आणि नसण्यामुळे काही बिघडतेही.

कोण माणूस कसा असेल, हे सांगणे तसे अवघड, म्हणूनच त्याच्याभोवती अस्तित्वाचे एक गूढ वलय उभे राहते, यासाठीच कदाचित जाणते नेणत्यांना सांगतात, माणसं ओळखायला शिका. इहतली माणसांइतके काहीच सुंदर नाही आणि त्याच्याइतके कुरुपही काही नाही. ‘माणूस’ या तीन अक्षरांना अर्थाचे अनेक आयाम आहेत. त्याला विचारांची वलये जशी आहेत, तशी विकारांची वर्तुळेही आहेत. या वर्तुळांच्या आत आणि बाहेर जी आकृती घडत असते, घडवली जात असते, साकारत असते तिला माणूस म्हणून ओळखले जाते. माणूस म्हणून जगताना समाजात माणसाची प्रतिमा कशी असावी, याचे नियम माणूसच निर्माण करीत असतो. तरीही तो व्यक्ती म्हणून नक्की कसा असेल, याची खात्री देता येईलच असे नाही. म्हणूनच ‘पिंडे पिंडे मतभिन्नता’ म्हणतात, ते खरे असावे. त्याला समजून घेण्यासाठी त्याच्याकडे अनेक बाजूंनी, वेगवेगळ्या कोनांनी, विविध पैलूंनी, विचारधारांनी पाहावे लागते. त्यात नुसते पाहणेच नाही, तर समजणेही असावे लागते. तरीही तो पूर्णतः कळतोच असे नाही. माणूस विचारांनी घडलेली मूर्ती असला तरी विकारांसह समाजात वावरत असतो. विकाररहित निखळ माणूसपण सापडणं अवघड असतं.

नानाविध स्वभावाची माणसे माणसांच्या संपर्कात येतच असतात, त्यात्यावेळी त्यांना सामोरे जावेच लागते, तुमची इच्छा असो अथवा नसो. काही माणसे गुणांची मूर्तिमंत प्रतीके असतात. काही वैगुण्याचे पुतळे. कदाचित समाजाला असे अनुभव आल्यामुळेच स्वभावो दूरितक्रमः असे म्हटले गेले, ते काही अतिशयोक्त नाही. काहींचं व्यक्तिमत्त्व जगाच्या कल्याणा... या विचारांनी घडलेले असते. कोणाकडे कसलीही अपेक्षा न धरता सुख-दुःखात धावून जाणारे. नसेल फारमोठी मदत करता येत कोणाला; पण भावनिक आधार देणारी ही माणसं कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता स्वतः सावली देणारी झाडं होतात. परिस्थितीची दाहकता आपल्या शिरी घेऊन इतरांच्या माथ्यावर छत्र धरताना कोणावर उपकार करतो आहोत, या भावनेचा लवलेशही नसणारे. माणुसकीच्या गहिवर घेऊन वाहणाऱ्या अशा नितळ प्रवाहांची जगात नेहमीच वानवा असते. गाजर गवतासारखी कुठेही उगवणारी, विपुल प्रमाणात आढळणारी आणि प्रगतीच्या मार्गांना अवरुद्ध करणारी शेकड्याने मिळतील. ‘खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.’ हा संत ज्ञानेश्वरांचा समाजपरायण विचार अशा लोकांसमोर केवळ स्वप्नाळू आदर्शवाद असतो. तिरक्या चाली चालणाऱ्या आत्ममग्न आत्मनिष्ठांची मांदियाळी या भूमंडळी मुबलक मिळेल. स्वप्रतिमामग्न विचाराने वर्तणाऱ्या माणसांना आपल्यापेक्षा अन्य कोणी श्रेष्ठ आहे किंवा असू शकते, हे मान्यच नसते. खरेतर यांना माहीत असते, आपण जेथे द्वेषाच्या बिया पेरायला निघालो आहोत, तो परिसर आधीच तुळशीच्या रोपट्यांनी बहरलेला आहे. त्याचं पावित्र्य तसूभरही कमी होणार नाही. समाजाच्या इतिहासाची काही पाने उलटून पाहिलीत तर सज्जनांच्या वाटेत काटे उभे करण्याचा छंद असणाऱ्यांनी; संतमहात्म्यांपासून वीरधुरंधरांपर्यंत आणि असामान्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनाच आपल्या वर्तनाने त्रस्त करण्याचा उद्योग प्रामाणिकपणे केला असल्याचे अनेक दाखले मिळतील. यांच्या अशा उद्योगप्रियतेच्या आवर्तातून सुटणारे अपवादच असावेत.

स्वप्रतिमामग्न असणारे आणखी काही जीव इहतली सुखनैव नांदताना दिसतात. यांना आपण आणि आपणच केवळ एकमात्र श्रेष्ठ वगैरे असल्याचा आभास होत असतो. ह्यांचे बेगडी मोठेपण सुमार वकुब असणाऱ्या समूहाच्या प्रासंगिक अभिप्रायातून तयार झालेले असते. त्यांचा प्रासंगिक अभिप्राय म्हणजे यांच्यासाठी प्रशस्तिपत्र असते. अशा तकलादू अभिप्रायाची झूल अंगावर चढवल्यावर ही मंडळी उतरवायला तयारच नसतात. माणसाचं मोठेपण म्हणजे नेमके काय? या प्रश्नास यांचे उत्तर असते. मी आणि केवळ मीच. पण मोठेपण मिळवण्यासाठी स्वतःला एकदा आपादमस्तक सगळंच तपासून घ्यावं लागतं, तेही समाजाच्या नजरेतून. त्या नजरांमध्ये काही अपूर्ण दिसत असेल, तर त्यासाठी स्वतःला आधी सोलून घ्यावे लागते. तासून घ्यावे लागते. मनावरील अविचारांची जळमटे धवून काढावी लागतात. अविवेकाची काजळी दूर सारून विवेकाची दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच प्रकाशाचा कवडसा बनावे लागते. पण अंधारच ओळख बनणार असेल, तेथे विचारांच्या पणत्या पेटवल्या, तरी आत्ममग्नतेचा वारा त्यांना प्रज्वलित होऊ देत नाही. अशावेळी ‘फिटे अंधाराचे जाळे झाला मोकळा प्रकाश.’ या शब्दांनाही मर्यादा पडतात. या स्वमग्न असणाऱ्या, स्वप्रतिमेवर प्रेम करणाऱ्यांना जगावर प्रेम करण्याइतके प्रेमळ मन लाभलेले असते का? हा सज्जन लोकांसमोर नेहमीच एक प्रश्न असतो.

या सगळ्या पसाऱ्यात फारसा उपद्रवी नसलेला, पण आत्मप्रौढीत रममाण होणारा कोणीतरी आपल्या आसपास असतोच. स्वतःभोवती बेगडी प्रतिष्ठेची अनेक मखरे उभी करून आपलीच आरास मांडणारे आणि आरती करवून घेणाऱ्यांचा हा अवतार म्हणजे काम कणभर आणि मळवट मणभर असाच काहीसा प्रकार असतो. यांच्या असण्याने सामाजिक प्रतिष्ठेत कोणती मोलाची भर पडण्याची शक्यता जवळपास नसते आणि नसण्याने कोणते नुकसान होण्याचे कारणही नसते; पण काहीही करून प्रसिद्धीच्या झगमगाटात राहून स्वतःभोवती स्वयंघोषित प्रतिष्ठेचे वर्तुळ निर्माण करीत, आपण आहोत त्यापेक्षा आपली सामाजिक आणि वैयक्तिक उंची वगैरे खूपच मोठी असल्याचे भासविणारी ही माणसे स्वतःला मिरवून घेण्यात धन्यता मानतात. मिरवून घेण्याची कोणतीच संधी सोडायला ते तयार नसतात. समाजात चमत्काराशिवाय नमस्कार घडत नाही. पण यांचा प्रसिद्धीपरायण नमस्कार हाच एक चमत्कार असतो. स्वतःभोवती वर्तुळ उभं करण्याची यांची केविलवाणी धडपड कोणत्या आस्थेतून प्रकटते कोणास ठाऊक. म्हणतात ना, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकुती. तसंच जशा वृत्ती तशा प्रवृत्ती.

मनात उदित होणाऱ्या अन् अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांतून माणसांची प्रतिमा विचारांच्या परगण्यात आकारास येत असते. या आकारांसह आपापले वेगळेपण घेऊन माणूस साकारतो. त्याच्या असण्याने समाज घडतो. समाज माणसांचा असतो. तो माणसांसाठी असतो. माणसांच्या जगात अशी अनेक माणसं असतील, जे आपल्यास भेटतील अथवा न भेटतील, तुमची इच्छा असो वा नसो. तुम्ही त्यांच्या मार्गात भलेही नसाल जात, ते तुमच्या मार्गात येतील. त्यांना टाळून समाजाचा घटक म्हणून आपलं जीवनयापन घडणं अशक्य. यांचा सहवास स्वीकारताना अथवा नाकारताना प्रत्येकाच्या त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा असतातच. त्यानुरूप माणसं कधी आपली तर कधी परकी ठरत असतात. परिस्थितीवश आपल्या सहवासाच्या कक्षेत आलेल्या माणसांकडून भलाबुरा अनुभव मिळतो. त्यातून त्यांच्याविषयी विशिष्ट मत तयार होऊन त्यांचा सहवास स्वीकारता येतो अथवा अव्हेरता तरी येतो. जगराहटीत कोणती माणसे तुमच्या वाट्याला यावीत, हे त्यावेळची परिस्थिती ठरवते. चार वाईट माणसे समोर उभी-आडवी आली, म्हणून सगळेच काही तसे नसतात. इतरही आणखी चांगली दोन माणसे समाजात असतात आणि अशाच माणसांमुळे समाजाचे व्यवहार सुरळीत सुरु असतात. या साऱ्या पसाऱ्यात आपण कोण? आपले कोण? परके कोण? हे ज्याला कळते, त्याला जगावं कसं? हे प्रश्न पडत नसतात. या सुंदर जगात जगताना माणसांचे आयुष्य प्रेम करायलाही पुरेसे नाही. तर द्वेषाचे परगणे उभे करून जगायला उरतेच किती? म्हणून आपल्याकडे जे नाही, त्याची खंत करत बसण्यापेक्षा, आहे त्यात संतुष्ट असणे केव्हाही चांगले नाही का?