Manase | माणसे

By
‘माणूस’ असा एक शब्द ज्याभोवती अर्थाची अनेक वलये उभी असतात. तो कसा असावा? कसा नसावा? याबाबत समाजाच्या काही अपेक्षा असतात. माणसाविषयी भाष्य करणाऱ्या अशा प्रश्नांची उत्तरे अनेक पर्यायात समोर येतात. त्याला अथपासून इतिपर्यंत संपूर्णतः समजून घेणे, हे एक अवघड गणित आहे. म्हणूनच की काय माणसाला समजून घेण्यासाठी माणसांनीच निर्माण केलेल्या निकषांच्या मोजपट्ट्या पुरेशा नसतात. राग, लोभ, प्रेम, द्वेष, तिरस्कार, स्नेह, समर्पण, सेवा, सहकार्य, साहचर्य, संघर्ष, स्वाभिमानादी भावभावनांच्या आडव्या-उभ्या धाग्यांनी गुंफलेला बहुपेडी गोफ म्हणजे माणूस, असे कोणी म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. समाजात वावरणाऱ्या अनेकांतील एक म्हणून माणूस नक्की कसा असेल, हे सांगणे अवघड आहे. माणूस म्हणून त्याला एकाच एक साच्यात फिट्ट बसवून मोजता येत नाही. तात्कालिक, प्रासंगिक घटनांनी आणि वर्तनाने ज्याच्या असण्याचे, नसण्याचे दर्शन घडते, तो म्हणजे माणूस असेही कोणी म्हणू शकेल. त्याच्या वर्तनप्रवाहांना समजणे एक अवघड काम आहे. समाजाचा एक घटक म्हणून कोणीतरी त्याच्या प्रासंगिक वर्तनाचा कोणतातरी अनुभव घेतलेला असतो, त्या अनुभवातून निर्मित विचारांचं जे संचित हाती लागते, ती माणूस शब्दाची त्याच्यापुरती व्याख्या असते. अर्थात वैयक्तिक अनुभवातून साकारलेली मते काही सार्वत्रिक मान्यतेची मोहर नसतात. एखाद्या व्यक्तीविषयी तयार झालेलं मत बऱ्याचदा वैयक्तिक असले, तरी ज्याच्या-त्याच्यापुरतं ते एक वास्तव असतं. कदाचित अनुभवणाऱ्याच्या दृष्टीने अर्धच असलं तरी सत्य असतं.

समाजात वावरताना शेकड्याने माणसे आपल्या संपर्कात येत असतात, ती सगळीच काही आपली नसतात. त्यातील काही आपली होतात, काही अंतरावर असतात. काहींशी मनाच्या तारा जुळतात, काहींशी सूर जुळून येतात. काहींच्या सहवासात विचारांचे मळे बहरतात. काहींच्या असण्याने बहरलेले परगणे उजाडही होतात. संपर्कात येणारे काही आषाढाच्या भरून आलेल्या आभाळासारखे असतात, अनंत जलधारा बनून धरतीकडे धावत येणाऱ्या मेघासारखे. बरसताना रिते होऊन चिंब भिजवून काढणारे. काही श्रावणातल्या रिमझिमणाऱ्या जलधारा बनून मनाच्या अंगणाला भिजवणारे, प्रसन्नतेची गंधगार संवेदना निर्माण करणारे. तर काही माळावर फुलणाऱ्या फुलासारखे आपलं लहानसं अस्तित्व सांभाळीत, वाऱ्यासोबत गुजगोष्टी करीत, आपणच आकाश होण्याचे स्वप्न पाहणारे. अंगभूत गंध नसला, तरी देखण्या सौंदर्याने पाहणाऱ्यास मोहात पाडणारे. काहींचा सहवासच मुळात पहाटेच्या प्रसन्न प्रहरी फुललेल्या पारिजातकाच्या परिमलासारखा, अवघा आसमंत गंधाने भारित करणारा. तर काहींचं आगमन अवचित येणाऱ्या वळिवाच्या सरींसारखं, धो-धो बरसणाऱ्या सहस्त्रावधी जलधारांच्या अभिषेकात धुवून काढणारं. काहींचं सोबत असणं पहाटेच्या प्रहरी मंजुळ गान बनून ताणा घेणाऱ्या पक्षांच्या सुरावटींचं. काहींचं असणं रात्रीच्या काळ्याशार आभाळात चमचमणाऱ्या तारकांसारखं, साऱ्या जगाला प्रकाशाने उजळून टाकता येत नसलं, तरी प्रत्येकाच्या मनात लुकलुकणारा प्रकाशाचा कवडसा पेरणारं. काहींचं येणं डोंगराआडून उगवणाऱ्या सूर्याच्या सोनेरी गोळ्यासारखं तेजस्वी. काहींचं इंद्रधनुष्य होऊन क्षितिजाला सप्तरंगी कमान बांधणारं.

काहींचा सहवास जणू काही वाऱ्यासोबत वाहणारा, कधी ओहळ बनून झुळझुळणाऱ्या निळ्याशार पाण्यासारखा, नदीची धारा बनून वळणे घेत वाहणारा. उंचावरून उडी घेऊन दरीत कोसळणाऱ्या प्रपातासारखा. अथांग सागराच्या तळाचा ठाव न सापडणारा. तर काहींचं आयुष्यात येणंच भिजवून टाकणारं, पहिल्या पावसाने सचैल स्नान करून न्हालेल्या सुस्नात धरतीसारखं. पहिल्या पावसाला हुंकार देत मातीच्या कुशीतून हळूच डोकावून बाहेर येणाऱ्या कोंबासारखा. संतांच्या प्रासादिक सहवासासारखा अन् दुर्जनांच्या नकोशा सोबतीचाही. अनेकांसारखा, कधी अनेकांतील एका सारखा. कधी सर्वाभूती स्नेह शोधणारा. कधी स्वतःच स्नेहधारा होणारा. विकारांना वश न होणारा, तर कधी विकारांनी विकल होऊन खचणारा. कधी शून्यातून उठून पुन्हा नवं वर्तुळ रेखांकित करणारा. कधी असलेली वर्तुळे उद्ध्वस्त करणारा. आहे त्यापेक्षा जग सुंदर करण्यासाठी इतरांचं जगणं सजवणारा, प्रसंगी कुरूप करून विस्कटवणाराही. कधी गम्य वाटणारा, कधी निबिड अंधारासारखा अगम्य भासणारा. कधी भूमितीतील अवघड प्रमेयासारखा. कधी इतिहासाच्या पानांत पराक्रम बनून विसावलेला. भूगोलाच्या अक्षांशरेखांशावर रेघ ओढून आपापले परगणे तयार करणारा. अशा कितीकिती रुपात तो साठला आहे. बघावा तेवढा वाढतच जाणारा, तरीही फिरून पुन्हा काहीतरी शिल्लक उरणारा. म्हणूनच माणूस सृष्टीच्या सर्जनाचा साक्षात्कार आहे, असे म्हणत असतील का? ज्याच्या असण्याने काही घडते आणि नसण्यामुळे काही बिघडतेही.

कोण माणूस कसा असेल, हे सांगणे तसे अवघड, म्हणूनच त्याच्याभोवती अस्तित्वाचे एक गूढ वलय उभे राहते, यासाठीच कदाचित जाणते नेणत्यांना सांगतात, माणसं ओळखायला शिका. इहतली माणसांइतके काहीच सुंदर नाही आणि त्याच्याइतके कुरुपही काही नाही. ‘माणूस’ या तीन अक्षरांना अर्थाचे अनेक आयाम आहेत. त्याला विचारांची वलये जशी आहेत, तशी विकारांची वर्तुळेही आहेत. या वर्तुळांच्या आत आणि बाहेर जी आकृती घडत असते, घडवली जात असते, साकारत असते तिला माणूस म्हणून ओळखले जाते. माणूस म्हणून जगताना समाजात माणसाची प्रतिमा कशी असावी, याचे नियम माणूसच निर्माण करीत असतो. तरीही तो व्यक्ती म्हणून नक्की कसा असेल, याची खात्री देता येईलच असे नाही. म्हणूनच ‘पिंडे पिंडे मतभिन्नता’ म्हणतात, ते खरे असावे. त्याला समजून घेण्यासाठी त्याच्याकडे अनेक बाजूंनी, वेगवेगळ्या कोनांनी, विविध पैलूंनी, विचारधारांनी पाहावे लागते. त्यात नुसते पाहणेच नाही, तर समजणेही असावे लागते. तरीही तो पूर्णतः कळतोच असे नाही. माणूस विचारांनी घडलेली मूर्ती असला तरी विकारांसह समाजात वावरत असतो. विकाररहित निखळ माणूसपण सापडणं अवघड असतं.

नानाविध स्वभावाची माणसे माणसांच्या संपर्कात येतच असतात, त्यात्यावेळी त्यांना सामोरे जावेच लागते, तुमची इच्छा असो अथवा नसो. काही माणसे गुणांची मूर्तिमंत प्रतीके असतात. काही वैगुण्याचे पुतळे. कदाचित समाजाला असे अनुभव आल्यामुळेच स्वभावो दूरितक्रमः असे म्हटले गेले, ते काही अतिशयोक्त नाही. काहींचं व्यक्तिमत्त्व जगाच्या कल्याणा... या विचारांनी घडलेले असते. कोणाकडे कसलीही अपेक्षा न धरता सुख-दुःखात धावून जाणारे. नसेल फारमोठी मदत करता येत कोणाला; पण भावनिक आधार देणारी ही माणसं कोणत्याही फळाची अपेक्षा न धरता स्वतः सावली देणारी झाडं होतात. परिस्थितीची दाहकता आपल्या शिरी घेऊन इतरांच्या माथ्यावर छत्र धरताना कोणावर उपकार करतो आहोत, या भावनेचा लवलेशही नसणारे. माणुसकीच्या गहिवर घेऊन वाहणाऱ्या अशा नितळ प्रवाहांची जगात नेहमीच वानवा असते. गाजर गवतासारखी कुठेही उगवणारी, विपुल प्रमाणात आढळणारी आणि प्रगतीच्या मार्गांना अवरुद्ध करणारी शेकड्याने मिळतील. ‘खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.’ हा संत ज्ञानेश्वरांचा समाजपरायण विचार अशा लोकांसमोर केवळ स्वप्नाळू आदर्शवाद असतो. तिरक्या चाली चालणाऱ्या आत्ममग्न आत्मनिष्ठांची मांदियाळी या भूमंडळी मुबलक मिळेल. स्वप्रतिमामग्न विचाराने वर्तणाऱ्या माणसांना आपल्यापेक्षा अन्य कोणी श्रेष्ठ आहे किंवा असू शकते, हे मान्यच नसते. खरेतर यांना माहीत असते, आपण जेथे द्वेषाच्या बिया पेरायला निघालो आहोत, तो परिसर आधीच तुळशीच्या रोपट्यांनी बहरलेला आहे. त्याचं पावित्र्य तसूभरही कमी होणार नाही. समाजाच्या इतिहासाची काही पाने उलटून पाहिलीत तर सज्जनांच्या वाटेत काटे उभे करण्याचा छंद असणाऱ्यांनी; संतमहात्म्यांपासून वीरधुरंधरांपर्यंत आणि असामान्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत सगळ्यांनाच आपल्या वर्तनाने त्रस्त करण्याचा उद्योग प्रामाणिकपणे केला असल्याचे अनेक दाखले मिळतील. यांच्या अशा उद्योगप्रियतेच्या आवर्तातून सुटणारे अपवादच असावेत.

स्वप्रतिमामग्न असणारे आणखी काही जीव इहतली सुखनैव नांदताना दिसतात. यांना आपण आणि आपणच केवळ एकमात्र श्रेष्ठ वगैरे असल्याचा आभास होत असतो. ह्यांचे बेगडी मोठेपण सुमार वकुब असणाऱ्या समूहाच्या प्रासंगिक अभिप्रायातून तयार झालेले असते. त्यांचा प्रासंगिक अभिप्राय म्हणजे यांच्यासाठी प्रशस्तिपत्र असते. अशा तकलादू अभिप्रायाची झूल अंगावर चढवल्यावर ही मंडळी उतरवायला तयारच नसतात. माणसाचं मोठेपण म्हणजे नेमके काय? या प्रश्नास यांचे उत्तर असते. मी आणि केवळ मीच. पण मोठेपण मिळवण्यासाठी स्वतःला एकदा आपादमस्तक सगळंच तपासून घ्यावं लागतं, तेही समाजाच्या नजरेतून. त्या नजरांमध्ये काही अपूर्ण दिसत असेल, तर त्यासाठी स्वतःला आधी सोलून घ्यावे लागते. तासून घ्यावे लागते. मनावरील अविचारांची जळमटे धवून काढावी लागतात. अविवेकाची काजळी दूर सारून विवेकाची दिवाळी साजरी करण्यासाठी स्वतःच प्रकाशाचा कवडसा बनावे लागते. पण अंधारच ओळख बनणार असेल, तेथे विचारांच्या पणत्या पेटवल्या, तरी आत्ममग्नतेचा वारा त्यांना प्रज्वलित होऊ देत नाही. अशावेळी ‘फिटे अंधाराचे जाळे झाला मोकळा प्रकाश.’ या शब्दांनाही मर्यादा पडतात. या स्वमग्न असणाऱ्या, स्वप्रतिमेवर प्रेम करणाऱ्यांना जगावर प्रेम करण्याइतके प्रेमळ मन लाभलेले असते का? हा सज्जन लोकांसमोर नेहमीच एक प्रश्न असतो.

या सगळ्या पसाऱ्यात फारसा उपद्रवी नसलेला, पण आत्मप्रौढीत रममाण होणारा कोणीतरी आपल्या आसपास असतोच. स्वतःभोवती बेगडी प्रतिष्ठेची अनेक मखरे उभी करून आपलीच आरास मांडणारे आणि आरती करवून घेणाऱ्यांचा हा अवतार म्हणजे काम कणभर आणि मळवट मणभर असाच काहीसा प्रकार असतो. यांच्या असण्याने सामाजिक प्रतिष्ठेत कोणती मोलाची भर पडण्याची शक्यता जवळपास नसते आणि नसण्याने कोणते नुकसान होण्याचे कारणही नसते; पण काहीही करून प्रसिद्धीच्या झगमगाटात राहून स्वतःभोवती स्वयंघोषित प्रतिष्ठेचे वर्तुळ निर्माण करीत, आपण आहोत त्यापेक्षा आपली सामाजिक आणि वैयक्तिक उंची वगैरे खूपच मोठी असल्याचे भासविणारी ही माणसे स्वतःला मिरवून घेण्यात धन्यता मानतात. मिरवून घेण्याची कोणतीच संधी सोडायला ते तयार नसतात. समाजात चमत्काराशिवाय नमस्कार घडत नाही. पण यांचा प्रसिद्धीपरायण नमस्कार हाच एक चमत्कार असतो. स्वतःभोवती वर्तुळ उभं करण्याची यांची केविलवाणी धडपड कोणत्या आस्थेतून प्रकटते कोणास ठाऊक. म्हणतात ना, जितक्या व्यक्ती तितक्या प्रकुती. तसंच जशा वृत्ती तशा प्रवृत्ती.

मनात उदित होणाऱ्या अन् अंतर्यामी विलसणाऱ्या भावनांतून माणसांची प्रतिमा विचारांच्या परगण्यात आकारास येत असते. या आकारांसह आपापले वेगळेपण घेऊन माणूस साकारतो. त्याच्या असण्याने समाज घडतो. समाज माणसांचा असतो. तो माणसांसाठी असतो. माणसांच्या जगात अशी अनेक माणसं असतील, जे आपल्यास भेटतील अथवा न भेटतील, तुमची इच्छा असो वा नसो. तुम्ही त्यांच्या मार्गात भलेही नसाल जात, ते तुमच्या मार्गात येतील. त्यांना टाळून समाजाचा घटक म्हणून आपलं जीवनयापन घडणं अशक्य. यांचा सहवास स्वीकारताना अथवा नाकारताना प्रत्येकाच्या त्यांच्याकडून आपल्या काही अपेक्षा असतातच. त्यानुरूप माणसं कधी आपली तर कधी परकी ठरत असतात. परिस्थितीवश आपल्या सहवासाच्या कक्षेत आलेल्या माणसांकडून भलाबुरा अनुभव मिळतो. त्यातून त्यांच्याविषयी विशिष्ट मत तयार होऊन त्यांचा सहवास स्वीकारता येतो अथवा अव्हेरता तरी येतो. जगराहटीत कोणती माणसे तुमच्या वाट्याला यावीत, हे त्यावेळची परिस्थिती ठरवते. चार वाईट माणसे समोर उभी-आडवी आली, म्हणून सगळेच काही तसे नसतात. इतरही आणखी चांगली दोन माणसे समाजात असतात आणि अशाच माणसांमुळे समाजाचे व्यवहार सुरळीत सुरु असतात. या साऱ्या पसाऱ्यात आपण कोण? आपले कोण? परके कोण? हे ज्याला कळते, त्याला जगावं कसं? हे प्रश्न पडत नसतात. या सुंदर जगात जगताना माणसांचे आयुष्य प्रेम करायलाही पुरेसे नाही. तर द्वेषाचे परगणे उभे करून जगायला उरतेच किती? म्हणून आपल्याकडे जे नाही, त्याची खंत करत बसण्यापेक्षा, आहे त्यात संतुष्ट असणे केव्हाही चांगले नाही का? 

10 comments:

 1. Khup chhan ahe sir
  Neha

  ReplyDelete
 2. Kar ahe sor aplyakade je ahe tyat samadhan manave

  ReplyDelete
  Replies
  1. समाधान मानन्यावर असते; पण बऱ्याचदा तेच जमत नाही, म्हणून सोपी उत्तरे अवघड होतात.

   Delete
 3. khup chan ahe sir
  shivani

  ReplyDelete
 4. khupch mst vichar aht sir............................

  ReplyDelete