दुभंगलेले आसपास, उसवत चाललेलं सामाजिक भान आणि मोठेपणाच्या कुंपणांनी वेढलेलं बेगडी जगणं पाहून संवेदनशील मने अस्वस्थ होतात. मनात साठलेला कोलाहल उसळ्या मारायला लागतो, तेव्हा कंप होतोच. हे हादरे सहन करून ज्यांना उभं राहता येतं, ते आस्थेचे नवे परगणे निर्माण करतात. प्रश्नांकित चिन्हांची उत्तरे शोधण्यासाठी व्यवस्थेत विशिष्ट विचारधारांनी वर्तावे लागते. व्यवस्थानिर्मित वर्तुळाचा परीघ समजून घ्यायला लागतो. त्याच्या मर्यादांना पार करून पुढे जाण्यासाठी अंतरी आस असायला लागते. ती मिळवण्यासाठी कुठेतरी उभं राहावंच लागतं. पाय स्थिर असलेल्या ठिकाणाला कार्यक्षेत्र वगैरे असं काही म्हणता येईलही. कोणी त्याला तीर्थक्षेत्र वगैरे म्हणतो. पण कोणी काही म्हटल्याने अंगीकृत कार्याप्रती असणाऱ्या आस्थेचे आयाम बदलवता नाही येत. ते आतूनच वाहते असायला लागतात. कार्यक्षेत्रे प्रयत्नपूर्वक उभी करायला लागतात. तीर्थक्षेत्रांचे महत्त्व काळाच्या ओघात आकारास येतं. त्यासाठी सायासप्रयास करण्याची आवश्यकता नसते. एखाद्या गोष्टीला तीर्थस्थानी पोहचवणारा प्रवास श्रद्धेतून घडतो. श्रद्धेसोबत घडणीची सूत्रे असतातच असे नाही. त्यामागे भक्ती असते. भक्ती डोळस असेलच असेही नाही. अढळ निष्ठा घडवणारे साचे नसतात, ओतला लगदा की झाली मूर्ती तयार. विशिष्ट मुशीत तयार झालेली, हव्या त्या आकारात सामावणारी माणसे कोणत्याच ठिकाणी नसतात. असली तर, तो एकतर अपवाद असतो किंवा योगायोग तरी. माणसांच्या मनी विलसणारे विचार त्यांची स्वार्जीत संपदा असते.
प्रत्येककाळी, प्रत्येकवेळी वर्तनातील कृतीबाबत समाजात एकमत झाले आहे, असे फार कमीवेळा दिसते, कारण एखाद्याला एखादी कृती नैतिक वाटते, ती समोरच्याला कदाचित न-नैतिक वाटू शकते. प्रत्येकजण आपल्या आकलनाच्या परिप्रेक्षात संबंधित घटनेकडे पाहत असतो. म्हणूनच नैतिक कोणते अन् न-नैतिक कोणते, याबाबत समजुतीच्या सीमारेषा तशा धूसरच असतात. त्यांच्या धूसर असण्यामुळेच प्रत्येकजण आपापल्यापरीने एखाद्या घटनेचे अर्थ, अन्वयार्थ लाऊन मोकळा होतो. अर्थात आपल्यापरीने अर्थ लावायला ते मोकळे असले, तरी एक गोष्ट उरतेच. ती म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य अन् त्याला असणारी मर्यादांची कुंपणे.
विषमतेच्या वाटा विस्तारत जाणे अन् समतेचे पथ आक्रसत जाणे अनेक प्रश्नांचं उगमस्थान असतं, हे कळतच नसेल का कुणाला. की इतिहासाचे विस्मरण झालं असेल? माणसात अंतर वाढत जाणे नांदी असते कलहाची. परिस्थितीची दाहकता माणसांना सैरभैर करते. कुणी तुपाशी, कुणी उपाशी असणे, हा माणसांच्या जगण्याचा अर्थ नाहीच होऊ शकत. परिस्थितीने पोळलेले हात परिवर्तनाचे हत्यार धरताना थरथरत नसतात. ही अस्वस्थता केवळ आक्रंदन नसते. उसवलेल्या मनातील उद्रेक, संताप सात्विकांच्या जगात मान्य नसेल. शिष्टसंमत विचारांत अधिष्ठित करता येत नसेल त्याला. पण जगणंच प्रश्न होतं, तेव्हा सज्जनांनी आखून दिलेल्या चाकोऱ्या उत्तरे देतीलच असे नाही.
व्यक्तिगत स्वातंत्र्याला जीवनात काही अंगभूत अर्थ असतात. लोकशाही शासनप्रणाली अंगिकारणाऱ्या प्रदेशात तर त्यांना वादातीत महत्त्व असतं. असले वाद तरी असे विषय सर्वमान्य मार्गाने, सामंजस्याने, चर्चेतून निकाली काढता येतात. तसंही स्वातंत्र्य म्हणजे स्व स्वैर सोडून वर्तने नसते. व्यवस्थेच्या पसाऱ्यात वर्तताना कोणी कुणाला अधोरेखित केलं किंवा नाही केलं, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात काही बदल घडत असतात का? ते पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असं सांगता येईलही. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. मग ते वैयक्तिक असोत की सार्वत्रिक. अंतरीचे वणवे संयमाच्या राखेआड दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखायला लागते. हे व्यापक असणंच माणसांच्या मोठेपणाच्या परिभाषा अधोरेखित करीत असते. त्यांच्या प्रगतीच्या वाटा निर्मितीचे कारण असते, नाही का?
**