प्रतिबिंब

By

अस्वस्थतेचे वांझ ओझे वाहत वर्तमान अंधारवाटेवरून निघाला आहे. सुखाच्या मृगजळामागे धावणाऱ्यांच्या वाटेवरचा अंधार नियतीने निर्मिलेले प्राक्तन ठरू पाहत आहे. अंधाराची सोबत करीत निघालेली माणसे अंधारालाच उजेड समजण्याचा प्रमाद करीत आहेत. अभ्युदयाच्या प्रवासासाठी चालती झालेली पावले पथसंभ्रमित होऊन अंधारातून पुन्हा अंधाराकडे वळती होत आहेत. गतीची स्वप्ने प्रगतीच्या गुंत्यात अडकत आहेत. जगण्याला साधेपणाची किनार असली की, दुसऱ्या कोणत्या मखरात मंडित होण्याची आवश्यकता नसते. पण मानसिकता एकूणच बटबटीत जगण्याकडे झुकायला लागली की, मखरेच प्रिय वाटायला लागतात. पर्याप्त समाधान शोधण्याचं विसरून आसपास दिसणाऱ्या झगमगीच्या दिपवणाऱ्या प्रकाशाचे कवडसे आपल्या अंगणी आणण्यासाठी अस्वस्थ वणवण करीत राहतात. जगण्याला परिस्थितीचे भान असले की, वास्तव दुर्लक्षित होत नाही. वर्तनाला सामाजिकतेचे आयाम असले की, आसपास दिसणारी दुरिते दुःसह होतात. वैयक्तिक वैगुण्येही वेदनादायी होतात. हाती असणाऱ्या मूठभर परिघाला विश्व समजण्याचा प्रमाद घडतो, तेव्हा व्यवस्थेतील विसंगतीकडे दुर्लक्ष होते.
प्रतिमा असतात आसपासच्या आसमंताला अनेक आयामात निर्देशित करणाऱ्या. कवडसे असतात आपणच आपणास शोधत निघालेल्या वाटेवर आश्वस्त करणारे. मनात आकार अंकुरित होतात, ते केवळ आकृत्यांचे कोलाज नसतात. तो शोध असतो मनी वसणाऱ्या स्वप्नांचा. ज्यांना चांगुलपणाचा परिमल परिसराच्या प्रांगणात पसरवता येतो, त्यांना प्रमुदित जगण्याचे अर्थ शोधावे लागत नाहीत. त्यांच्या असण्यातून प्रसवणारे प्रकाशाचे कवडसे आसपास समृद्ध करीत राहतात. ते प्रतिरूप असते सत्प्रेरित विचारांचे. शोध असतो प्रतिरुपाचा. प्रतिष्ठापना असते मूल्यांची. प्रचिती असते नैतिकतेच्या अधिष्ठानाची. प्रतीक असते सद्विचारांनी प्रेरित भावनांचे.

प्रतिबिंब सर्जन असते प्रतिभूत आकारांना जन्म देणारे. आपण त्याला हुबेहूब वगैरे असे काहीसे नाव देतो. शेवटी नावही प्रतिबिंबच, कारण ती ओळख असते कोणत्यातरी आकाराची. आकार चिरकाल असतीलच याची हमी काळालाही देता येत नाही, हेही वास्तवच. चित्रकाराच्या मनातील आकृत्यांचे प्रतिबिंब कँव्हासवर रंगरेषांनी प्रकटते. गायकाच्या सुरातून ते प्रतिध्वनीत होते. धनवंताच्या ऐश्वर्यात चमकते. दारिद्र्याच्या दशावतारात कोमेजते. दैन्य, दास्यात साकळून येते, तेव्हा भेसूर दिसते. अन्यायाच्या प्रांगणात भीषण होते. प्रयत्नांचा परगण्यात प्रफुल्लित होते. आस्थेच्या प्रदेशात देखणे दिसते. लावण्यखणीच्या चेहऱ्यात सजून सुंदर होते. कुरुपतेतही ते असते. वंचनेत विकल होऊन बसते. आनंदात उधानते. दुःखात कोसळते. अनुभवाच्या कोंदणात प्रगल्भ होते. प्रतिमानच प्रतिबिंब बनते, तेव्हा विचारांचा चेहरा देखणा होतो. देखणेपणाची परिभाषा परिपूर्णतेत असते आणि परिपूर्ण प्रकाशाचे चांदणे विवेकाचे प्रतिबिंब बनते. खरंतर प्रतिबिंबही खेळच आहे आभासी आकृत्यांचा.

सगळ्याच दिशा अंधारतात, तेव्हा हरवलेल्या प्रतिमा आपलाच चेहरा शोधीत राहतात वेड्यासारख्या. ओळख हरवलेले चेहरे नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने चालत राहतात स्वतःचा शोध घेत, रित्या ओंजळी घेऊन. तडे जाणं तसं काही नवीन नसतं. एक तर ते सांधता यायला हवेत, नाहीतर त्यांच्या विस्कटलेल्या रेषांमधून मनातील संकल्पनांचे आकार शोधत आनंद घेता यायला हवा. अस्ताव्यस्त आकारांचाही कोलाज देखणा असतो, फक्त नजरेचा कोन योग्य ठिकाणी स्थिर करता आला की झाले. जगणं संपन्न होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले तरी पुरेसे असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे?
••

0 comments:

Post a Comment