गावगाड्यात हरवलेला चेहरा: नारायण मामा
ताई, नवरदेव-नवरीले हायद लावले चाला! अप्पा, मानतानं निवतं शे! जिभाऊ, शेवंतीले निघा! बापू, टायी लावाले चाला! आबा, तात्याकडनं चुल्हाले निवतं शे! या आणि अशाच प्रसंगपरत्वे अगदी बारश्यापासून बाराव्यापर्यंत कार्यक्रमांसाठी निवते देणारा खणखणीत आवाज गल्लीच्या सीमा पार करून निनादत राहायचा काही वेळ तसाच आसपासच्या आसमंतात. त्या सांगण्यात एक लगबग सामावलेली असायची. आजही हा आवाज मनात आठवणींच्या रूपाने स्पंदित होतो. स्मृतीच्या गाभाऱ्यातून निनादत राहतो. या आवाजाचा धनी कालपटाने जीवनग्रंथात अंकित केलेल्या काही वर्षांची सोबत करून निघून गेला आहे. देहाचे पार्थिव अस्तित्व विसर्जित झाले. पण गावाला सवय झालेल्या या आवाजाची सय अजूनही तशीच आहे. गावातल्या लग्नकार्याच्या, कुठल्याशा सण-उत्सवाच्यानिमित्ताने कळत-नकळत त्याच्या आठवणी जाग्या होतात आणि बारा-तेरा वर्षापूर्वीचं चित्र मनःपटलावरून सरकत काही प्रतिमा साकार करीत राहतं.
हे आठवण्याचं कारण असं फार काही विशेष नाही. केवळ योगायोगाने निमित्त घडलं. काही कामानिमित्ताने गावी गेलो होतो. शेताकडे गेलेली माणसे दिवसभराची कामे आटोपून संध्याकाळी एकेक करून घरी परतायला लागलेली. लहानपणापासून सोबत असणाऱ्या आणि आता पोटपाण्याच्या प्रश्नांची उत्तरे शेतातल्या काळ्या मातीत शोधणाऱ्या सवंगड्यांना एव्हाना मी गावी येऊन टपकल्याची चाहूल लागलेली असते. शेतातून परतताना सोबत असलेले साहित्य घरी टाकून एकेक करून जमू लागतात. शेताकडून लवकर परतलेले मित्र आधीच येऊन घराच्या ओसरीवर विसावलेले. त्यांच्यासोबत गप्पा छाटत बसलो होतो. एकेक करून सगळे जमा झाले. गप्पांचा फड चांगलाच रंगलेला. रोजच्या जगण्यातली सुख-दुःखे, शेतशिवार, गुरंवासरं, सणसमारोह अशा एकेक विषयांना नव्याने जाग येत होती. सगळेच संवादात सामावून गेलेले. मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेल्या हळव्या, नितळ, प्रिय, अप्रिय आठवणींनी गर्दी केलेली. काळ कोणताही असो, माणसांना स्मृतिरंजनात विहरायला मनापासून आवडते, हे मात्र नक्की. त्याच्या दृष्टीने तेव्हा असणाऱ्या सगळ्या गोष्टी चांगल्याच असतात. पण आत्ताच हे सगळं बदलून गेलेलं असतं. अर्थात, प्रत्येक पिढीचे हे सार्वकालिक गाऱ्हाणे असते.
अण्णांच्या मुलीचं लग्न उद्याच्या मुहूर्तावर गावात होणार असते. अण्णा गावातील बऱ्यापैकी संपन्न असणारं नाव. मोठ्या लोकांत त्यांचे उठणे-बसणे असल्याने साहजिकच त्यांच्या शब्दाला वजन प्राप्त झालेलं. वजनदार आसामींशी असणाऱ्या ओळखीमुळे ते मोठे झाले असे नाही, तर कोणी मदतीसाठी त्यांना अर्ध्या रात्री हाक दिली तरी धावून जाण्याचा स्वभाव त्यांच्या मोठेपणाची साक्ष होता. सालस स्वभावामुळे माणसे त्यांच्या गोतावळ्यात जुळत गेली. सगळी गावकी, भावकी आपल्या घरातलंच कार्य समजून लग्नाची तयारी करण्यात लागलेली. आपापल्या वकुबाप्रमाणे साऱ्यांनी कामे वाटून घेतलेली. लग्नसमारंभाचे निमंत्रण सांगणारा आवाज पलीकडच्या गल्लीतून घुमतोय. एकेक घर ओलांडून पुढे सरकतो आहे. पुन्हा-पुन्हा तेच संबोधणे, तेच सांगणे, आवाजाचा तोच रियाज. आण्णा, अप्पा, आबा, तात्यांना साद घालणेही तसेच. लगबग पण अगदी तशीच. पण त्यातून काहीतरी निसटल्याचे जाणवत होते. मनात साठवून ठेवलेल्या आवाजाची धार या शब्दांना जाणवत नव्हती.
शेजारी बसलेल्या मित्राला म्हणालो, “अण्णांकडील लग्नाचे निवतं सांगणारा हा आवाज कोणाचा रे!”
“तो का... अरे, तो आपल्या नारायणअप्पांचा पोरगा!”
“अच्छा! बराच मोठा झाला की, अप्पा गेला तेव्हा अगदी नकळत्या वयाचा होता. समोर काय घडतेय, हेही त्याला नीट ठाऊक नव्हते. पण एक आहे जबादारी अंगावर पडली की, माणूस शहाणा होतो अपोआप. तेथे काही वय ही पात्रता नसते... ते ठीक आहे सगळं. पण अप्पाच्या आसमंत चिरत जाणाऱ्या आवाजाची धार याच्या आवाजाला नाही गड्या! नारायणमामांचा निवतं सांगणारा आवाज अर्धं गाव जागं करायचा. कुणाकडचे निवते आहे, हे परत विचारायची कोणाला गरजच नसायची, नाही का?”
“हो, तेही खरंच. सगळीच माणसे काही सारखी नसतात आणि सगळा काळही काही सारखा नसतो?” आणखी एक मित्र बोलता झाला.
म्हणता म्हणता सगळेच आठवणींच्या रस्त्याने चालू लागले. एकेक प्रसंग आठवून गतकाळाच्या स्मृतींनी बहरलेल्या झाडाच्या पारंब्यांना धरून झोके घेऊ लागले. मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवलेल्या आठवणींचे आभाळ भरून आले. ओथंबून आलेल्या आभाळात शब्दांची पाखरे हरखून मुक्त विहरू लागली.
आमच्या गावात नारायण या नावाभोवती कौतुकाचं, कुतूहलाचं एक वलय लाभलेलं. अशी वलयांकित माणसं गावागावात आजही असतील; पण काही माणसं आपल्या आठवणींचं एक वर्तुळ अनेकांच्या अंतर्यामी कोरून जातात. असंच एक लहानसं वर्तुळ गावातील माणसांच्या मनावर अंकित करून गेलेला- गावातल्या मोठ्या माणसांसाठी नाऱ्या, समवयस्कांचा कधी नारायण तर कधी नाऱ्या, लहान्यांसाठी काका, काहींसाठी काही, कुणासाठी काही; पण माझ्यासाठी गावाच्या नात्याने मामा. या गावातच लहानाचा मोठा झालो. गावाने मला नुसत्या संस्कारांनीच घडवलं नाही, तर विचारांनीही वाढवलं. वाढत्या वयासोबत मनःपटलावर कोरली गेलेली संस्कारांची अक्षरे येथूनच गोंदून घेतली. जगण्याचं अफाटपण येथूनच कमावलं. अमर्याद आकांक्षांच्या आभाळात विहरण्याइतपत पंखाना बळ घेतलं. जगण्याच्या संघर्षात टिकून राहण्याचा चिवटपणा येथूनच देहात रुजला. आपलेपणाचं पाथेय दिमतीला देऊन गावानेच उदरभरणाच्या वाटेने शहरात आणून सोडले. देह शहरात येवून विसावला. पोटपाण्याचे प्रश्न घेऊन येताना मनात जे गाव आणले त्याची सोबत काही टाकता आली नाही. शहरी सुखांच्या चौकटीत स्वतःला फ्रेम करून घेतलं. आजही गावमातीच्या धुळीच्या कणांनी रंगवलेल्या आणि दिसामासाने धूसर होत जाणाऱ्या चित्राची प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न करतो आहे. विटत चाललेल्या आकृत्यांना जतन करून ठेवतो आहे. अंतर्यामी विसावलेलं गाव कधीतरी अनपेक्षितपणे जागं होतं आणि आस्थेचं इंद्रधनुष्य मनाच्या क्षितिजावर आठवणींची कमान धरतं. प्रयत्नपूर्वक सांभाळून ठेवलेली आपली माणसं त्यात शोधत राहतं. काही सापडतात, काही विस्मरणाच्या धूसर पडद्याआड हरवतात.
सव्वापाच-साडेपाच फूट उंचीचा देह निसर्गदत्त लाभलेली सावळ्या वर्णाची चादर लपेटून कोणत्याही ऋतूत गावात सारख्याच तन्मयतेने वावरताना दिसायचा. साधारण अंगकाठी घेऊन उभी राहिलेली ही आकृती जगण्याचं आकाश पेलून धरण्याची कसरत करीत राहायची. गळ्यातल्या बागायतदार रुमालाशी याच्या कायमस्वरूपी मर्मबंधाच्या गाठी बांधलेल्या. एकवेळ शंकराच्या चित्रात गळ्यात नाग दिसणार नाही; पण याच्या गळ्यात रुमालाने सतत विळखा घातलेला. जणू प्रेयसीने अनुरक्त होऊन लडिवाळपणे दोन्ही हातांनी गळ्याला लपेटून घेतलेलं. हवेच्या झुळुकीने झुलणारा केसांचा झुपकेदार कोंबडा. ओठांवर कोरून घेतलेल्या तलवारकट मिशा. तोंडात गायछाप विसावलेली. तंबाखू नसेल तर विड्याच्या पानाने रंगलेली जीभ. जिभेला निसर्गदत्त मिळालेली धार. पांढरा पायजमा आणि सदरा याव्यतिरिक्त अन्य रंगाचे कपडे असू शकतात का, हा प्रश्न याच्या मनात कधीच उदित झाला नसेल. मनमुराद नीळ वापरल्याने मुळचा रंग हरवून बसलेले हे साधेसे कपडे सगळ्या मोसमात सोबत करणारे. हिवाळ्यात थंडी वाजायला लागली की, गोधडी अंगावर येऊन विसावयाची. पावसाळ्यात घोंगडी. एवढाच काय तो याच्या पेहरावात वरपांगी दिसणारा बदल; पण आतून कपडे तेच.
या सगळ्या भांडवलासह साकारणारी ‘नारायण’ नावाची प्रतिमा गावात आपली स्वतंत्र ओळख घेऊन वावरत असे. नारायण नावाचा धनी बनून ओळखला जाणारा हा साधारण चणीचा देह अख्ख्या गावाचा स्नेहाचा विषय. हा स्नेह अर्थात त्याच्या अंगभूत स्वभावानेच घडविलेला. शिकण्याचं वय असताना शाळेच्या वाटेने न वळलेली आणि जबरदस्तीने ओढून नेले, तरी शाळेच्या प्रांगणात फारशी न रमलेली नारायणाची पावले अनुभवाच्या शाळेत मात्र चांगलीच रुजली. जगणं शिकली. अंगभूत शहाणपणातून कमावलेले शब्द वैखरीच्या वाटेने अनेकांना तृप्त करीत राहिले. अभ्यासू पंडिताच्या जिव्हेवर सरस्वती वसती करायला एकवेळ विसरली असेल; पण नारायणाच्या जिभेवर तिने कायमचा निवारा केला. त्याच्या मुखातून प्रकटणारे शब्द गावातल्या सान-थोरांसाठी स्नेहाच्या धाग्यांनी बांधलेले.
ग्रामीणजीवनाच्या जगण्याच्या साऱ्या खाणाखुणा सोबत घेऊन जगणारे माझे मूठभर गाव. नजरेत सामावण्याइतकी श्रीमंती गावाला द्यायला नियती विसरली; पण सकाळ-संध्याकाळच्या भाकरीचा प्रश्न सोडवण्याइतपत शहाणपण मात्र गावातल्या माणसात खच्चून भरलेलं. उदरभरणाच्या प्रश्नांचं नीतिसंमत उत्तर शोधणं, हेच साऱ्यांच्या जगण्याचं मुख्य प्रयोजन. त्यासाठी प्रामाणिक परिश्रम करायचे. चित्ती समाधान नांदते ठेऊन नाती जपायची. हे यांचं जीवनयापनाचं आधारभूत सूत्र. फार मोठ्या आकांक्षा मनी घेऊन जगण्याचा तो काळ नव्हता. प्रगतीच्या गगनभराऱ्या घेण्याची स्वप्ने मनात असली, तरी त्याचा फारसा सोसही कुणाला नसे. गावाने जगण्याची विशिष्ट चौकट स्वतःच स्वतःभोवती आखून घेतलेली. या आखीव चौकटीत जगणाऱ्या अनेकातला एक नारायण. आपल्या पाच भावंडांना सांभाळणारा. वडील खूपच आधी गेल्याने आईने या सगळ्यांना वाढविले. घडविले. पुढे ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन घरातला मोठा म्हणून नारायणमामाने सगळ्यांना हिकमतीने सांभाळले.
घरची परिस्थिती साधारणच. जगण्याचे एकेक पदर सगळ्याबाजूंनी रोजच उसवत जाणारे, तरी नाउमेद न होता त्यांना टाके घालून सांधणारा. घरांत शिकलेलं कोणीच नसल्याने या परिवाराचं गावात जगण्याचं शास्वत साधन म्हणजे समाजव्यवस्थेने दिलेली बलुतेदारी. गावाचा नाभिक म्हणून प्रामाणिक सेवा करणारा हा परिवार. गावशिवारात नावावर थोडी जमीन, पण तीही पोटापुरता पसा देणारी. त्यातून हाती पैसा येण्याची कुठलीही आस नव्हतीच. गोठ्यात गुरावासरांचा राबता नाही. म्हणून अन्य पाशही जवळपास नाहीत. रोज उगवणारा सूर्य हातात हजामतीची धोकटी घेऊन यायचा आणि मावळणारा सूर्य दिवसभराची कामं करून निवांतपण मनात पेरून जायचा एवढंच. हे सगळं नियतीने आपल्याला दिलेली भेट समजून अंतर्यामी पर्याप्त समाधान घेऊन जगणारा नारायणमामा आमच्या गावातलं सतत खळखळत राहणारं चैतन्य. विद्वतजणांच्या विचारमंथनातून साकारलेल्या जीवनविषयक व्याख्यांच्या चौकटींच्या तुकड्यात न सामावणारा, आपल्या जगण्यालाच जीवनयोग मानणारा.
विज्ञानाने जी काय सुख-दुःखे माणसाच्या पदरी घातली असतील ती असोत. पण आपणच तयार करून घेतलेल्या जीवनविषयक श्रद्धांमध्ये समाधान मानणाऱ्या अनेक माणसांच्या गर्दीतला हा एक हरवलेला चेहरा. विद्यमान काळाने हरवलेल्या अनेक चेहऱ्यांना स्वतःची ओळख दिली. परिस्थितीचे पाश सैल होऊन ओळखीचे आकार त्यात दिसू लागले आहेत. साकारू लागले आहेत. नसेल तसे, तर माणसे तसे घडवून घेत आहेत. मनाच्या सौंदर्याला श्रीमंती मानणाऱ्यांची समाजात आजही काही कमी नाही. देहाला सजवण्याचा उद्योग करणाऱ्यांची वानवा नसली, तरी साधेपणात सौंदर्य शोधणारे आहेतच. देहाचे सोहळे साजरे करून स्वतःला नटवता येते. विश्वाची सुंदरी होण्याच्या स्पर्धा जिंकता येतात. यासाठी सौंदर्यवर्धनाचे प्रयोग करणाऱ्या स्पा, ब्यूटीपार्लर नामक प्रयोगशाळा उभ्या राहिल्या आहेत. प्रचंड किंमत आकारून देहाला सुगठित आकाराने मंडित करून सौंदर्याचा साज चढविणारी अनेक प्रतिष्ठाणे शहरी सुखांच्या झगमगाटात चमकायला लागली. केस कापण्याच्या दुकानांनीही स्वतःला देखण्या रुपात मढवून घेतले. स्पंजच्या गुबगुबीत आकाराच्या आणि लिबलिबीत देहाच्या फिरत्या खुर्च्यांसमोर अख्खा माणूस दिसेल एवढा आरसा लावलेला. त्याच्या आजूबाजूला, मागे आणखी तेवढेच दुसरे आरसे. त्यातून चारही बाजूने दिसणाऱ्या प्रतिमा पाहून माणसाचे मन हरकून जाते. समोर पडलेला वेगवेगळ्या सौंदर्यप्रसाधनांचा खच. शेजारीच दोन-तीन वर्तमानपत्रे. बाजारात कोणत्या नव्या फॅशन आल्या, ते चित्रांसह सांगणारी मासिके. आणखी काय काय. हा सगळा सरंजाम प्रगतीची मिरास मिरवणारा. देखणेपणाला किमतीची लेबले लावून सुंदर होण्याची हमी देणारा. अर्थात माणसांचं जगणंच बेगडी झाल्यावर अशा तात्कालिक सुंदरतेला वर्धनाच्या वाटेने नेणारा आणि नटवणारा विचार दृढमूल होणं क्रमप्राप्तच. सलूनलाही देखणा लुक मिळून तेथील पर्यावरणाला रोमांटिक वगैरे फील प्राप्त झालेला.
मी लहान असतानाचा काळ आठवतो. असाच कुठलातरी रविवार उगवायचा तो नारायणमामाला सोबत उचलून आमच्या घराच्या ओसरीवर आणण्यासाठीच. आल्या आल्या बाहेरूनच त्याच्याकडून आजोबांना आवाज दिला जायचा. हातातील धोकटी बाजूला ठेऊन हा घरातील धान्याच्या पोत्यांच्या ढिगावर पडलेली रिकामी पोती शोधत असायचा. हाती लागलं ते पोतं उचलून आणायचं आणि जमिनीवर अंथरायचं. धोकटी उघडून कात्री, वस्तरा, केस बारीक करायची मशीन, वस्तऱ्याला धार लावण्यासाठी दगडाची लहानशी सहाण, चामड्याचा पट्टा असं काही काही बाहेर काढून काही इकडे, काही तिकडे ठेवायचा. हजामतीला लागणाऱ्या पाण्यासाठी वापरत असलेली पितळाची कळकट वाटी, वापरून संपण्याच्या मार्गावर लागलेला कुठलातरी साबण, निम्म्या अधिक कामातून गेलेला दाढीचा ब्रश काढायचा. घराबाहेरच्या रांजणातून तांब्याभर पाणी स्वतःच भरून आणायचा. घाई असली की आधी मोठ्यांच्या दाढी-हजामती उरकायच्या. दरम्यान आम्हा मुलांची पळापळ सुरु व्हायची. तेव्हा कटिंग करणे नकोसे वाटायचे. कारण एकतर डोक्यावर झुलफे असावेत असे वाटायचे. आणि दुसरे डोक्यावरून केस बारीक करतांना मशीन फिरायची ती बोथट झाल्याने त्यात केस अडकायचे आणि ओढले जाताना उगीच त्रास व्हायचा. हे सगळं टाळता यावं म्हणून कोण कुठे, कोण कुठे जाऊन लपायचे. नशीब जोरात असेल तर बाहेर पसार होऊन नारायणमामा परत जाईपर्यंत सुटका करून घ्यायची संधी मिळायची. पण असे क्वचित घडे, कारण मोठी माणसे आधी आम्हाला पकडून नारायणमामासमोर बसवायची. कटिंग करतांना रडणं गल्लीभर ऐकू यायचं. भावकीतले, गावकीतले कुणीतरी यायचं. हसत आगीत तेल ओतून जायचं. तेव्हा त्यांच्या बोलण्याचा प्रचंड वगैरे राग यायचा, पण प्रसंगाला निमूटपणे सामोरे जाण्याशिवाय काही पर्याय नसायचा.
घराच्या ओसरीवर महिन्यातून एकदा हे दृश्य हमखास दिसायचं. डोक्यावरील केसांनी आपला तळ जवळपास सोडेपर्यंत केस कापले जायचे. हातातला वस्तरा सहाणेवर, पट्ट्यावर चटचट फिरत राहायचा. नारायणमामा उकिडवा बसून उजव्या पायाच्या पोटरीच्या बाजूने वस्तरा आडवा-तिडवा फिरवत असायचा. वस्तरा असा फिरताना त्याला लागत कसा नाही, याचं तेव्हा कुतूहल वाटायचं. कटिंग नावाचा अप्रिय प्रकार पार पडल्यावर मोरीत गरम पाण्याची घंगाळ वाफा सोडीत वाट पहायची. चुलीत सरपण कोंबून पातेल्यात पाणी उकळत असायचं. दगडाचा फेणा जणू कातडी सोलून काढण्यासाठीच आईच्या हातात येवून विसावला आहे असे वाटायचे. या सगळ्या अप्रिय प्रकारामुळे कटिंग नावाचा प्रकार नकोच वाटायचे. यापेक्षा मुलींसारखे केस वाढलेले बरे वाटायचे. अर्थात त्यांची त्यांना किती निगा राखावी लागते याच्याशी आम्हाला काही देणेघेणे नसायचे.
वय वाढत गेले तशी कटिंगविषयी भीती गेली. पण आताही कटिंग नकोच असायची; कारण आम्हाला सिनेमातल्या हिरोसारखे झुबकेदार केस डोक्यावर हवेसोबत झुलताना आणि कोणीतरी आपल्याकडे पाहताना बघायचे असायचे. पण हे सगळं मनातच राहायचं. शाळा शिकताना ते अजागळासारखं राहणंही फारसं कोणी मनाला लावून घेत नसायचं. मनासारखं नाही घडलं तरी धकून जायचं. डोक्यावर अमिताभ, जितेंद्रच्या केसांसारखे केस असावेत म्हणून धडपड सुरु असायची. मोठ्यांसमोर हे बोलायची हिम्मत नसायची. म्हणून नारायणमामाला पटवलं जायचं. पण याबाबत तोही आमच्या घरातील मोठ्यांना सामील झालेला असायचा. मागण्या, विनंत्या मनावर घेण्यासाठी नसतात, हे त्याचं तत्वज्ञान. तसाही तो हे सगळं फारसं मनावर घ्यायचा नाही; पण कधी फारच खुशीत असला की, हवी तशी कटिंग करून द्यायचा. पण तेही सुख तसे अल्पकाळ असायचे. मोठ्यांच्या आज्ञेने केसांना बलिदानासाठी सज्ज व्हावेच लागायचे. अगदी महाविद्यालयात जाईपर्यंत हा रियाज सुरु होता. कॉलेजला शिकताना स्वतःला आरशाच्या स्वाधीन करून निरखित राहणं हा एक उद्योग वाढला. पण केसांचे फार चोचले करण्यासारखी परिस्थिती आसपास नसल्याने बिचाऱ्या केसांनी आपल्या मर्यादेत राहणेच पसंत केले.
आजच्या पिढीला असं काही अनुभवायला येणं अवघड आहे. गावातला नाभिक व्यवसायही आज कितीतरी बदलला. हातात धोकटी धरून दारोदारी सुरु असणाऱ्या त्याच्या भटकंतीला विराम मिळाला. फार देखण्या वगैरे नसतील; पण लहानमोठ्या रुपात सलूनच्या मोडक्यातोडक्या का असेनात; टपऱ्या गावातील मोक्याच्या जागी येऊन विसावल्या. त्यात एकदोन खुर्च्या, बसण्यासाठी बाकडा- तोही सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून तयार केलेला. बऱ्याचदा लाकडाचे ओंडके ठेवलेले. आमच्या काळात चुकुनही न दिसणारे वर्तमानपत्र आता गावातल्या पानटपऱ्या आणि सलूनच्या दुकानात हमखास असतात. तेथे दोनचार रिकामी माणसे वर्तमानपत्रातील ओळ न ओळ वाचत बसलेली दिसतील. कधीतरी तालुक्याच्या गावाला कामानिमित्ताने जाणं घडलं म्हणून आणलेला मायापुरीचा अंक येऊन विसावलेला. अनेक हातांनी हाताळल्यामुळे जवळपास मरणपंथाला लागलेला. तरी त्यातील नट्यांची चित्रे तेवढ्याच उत्सुकतेने परत परत पाहणारे शौकीन. हा अंक खास आकर्षणाचा विषय. काळाच्या वेगात बरंच बदलत गेलं. त्याला ही दुकाने तरी कशी अपवाद असतील.
हजामतीच्या कामाचा मोबदला धान्याच्या रुपात दिला जायचा. तोही सुगीच्या दिवसात. याला आमच्याकडे ‘गव्हाई’ असे म्हणतात. वर्षातून एकदाच मिळणारे धान्य घराघरातून जमा करून न्यायला येताना रिकामी पोती आणायची. पायलीने धान्य मोजून दिले जायचे. प्रत्येकवेळी दोन-चार पायल्या अधिक मिळाव्यात, म्हणून नारायणमामांचा असणारा आग्रह. सुगीचे दिवस त्यातही खळ्यात अधिक धान्य असले म्हणजे दिलंही जायचं. अर्थात हजामतीच्या कामाचा हा मोबदला असला, तरी त्याच्या जगण्याचं ते साधन असायचं. आज मनात प्रश्न येतो, एवढ्या धान्याने वर्षभर हजामती करणारा नारायणमामा संतुष्ट कसा काय राहत असायचा. कदाचित त्याने त्याच्या गरजा आवकएवढ्या सीमित करून घेतल्या असतील. या व्यतिरिक्त गावातील सण-समारंभांची निमंत्रणे देण्याचं कामही करावं लागायचं. यासाठी काही वेगळे दिले जायचे, पण तेही घासाघीस करूनच. देताना मालक चार तत्वज्ञानपर गोष्टी ऐकवायचा. नारायणमामाला त्याचे बोलणे कळो अथवा न कळो, तो शांतपणे ऐकत राहायचा. मालकाचे बोलून झाले की हळूच सांगायचा, “आबा, तुमच्याशिवाय आम्हाला आहे का कोणी आधार? तुम्हीच तर आमचे मालक. तुम्हीच असे करायला लागला, तर आम्हा गरीब माणसांनी काय करायचं?” त्याचं असं काही बोलणं ऐकून समोरचा माणूस कितीही संतापात असला तरी सारं विसरायचा. कदाचित ही कला त्याला परिस्थितीने शिकवलेल्या ज्ञानातून अवगत झाली असावी. नेमक्यावेळी नेमके बोलावे कसे, याचा तो वस्तुपाठ होता. गावात नाभिकांची अधिक घरे असतील, भावाभावांच्या वाटण्या होऊन वेगळे झाले असतील, तर बलुतंसुद्धा वाटून घेतली जायची. गावातला अमका वाडा तुझा, तमकी गल्ली माझी अशी तोंडी विभागणी केली जायची आणि प्रामाणिकपणे त्याचं पालनही व्हायचं.
गावातल्या वरच्या जातीतल्या लोकांच्या हजामती खुशीने करणारी ही मंडळी कुठलीही खळखळ न करता मुकाट्याने आपलं काम करीत रहायची. गावातल्या प्रतिष्ठितांनी रागावणे, बोलणे गृहीत धरले जायचे. तो त्याचा अधिकारच आहे, असे समजून प्रतिउत्तर देण्याचे टाळले जायचे. मात्र गावकुसाबाहेरील लोकांच्या हजामती ही मंडळी करीत नसत. मग ही माणसं घरीच एकमेकांकडून केस कापून घेत. किंवा आठवड्याच्या बाजाराला तालुक्याला गेले की, कटिंग करून येत. तेव्हा माझ्या मनात सारखा एक प्रश्न यायचा, या लोकांच्या हजामती शहरातला केस कापणारा करतो, तो त्यांची जात कोणती विचारत नाही. मग गावातच असे का असेल? शहरातल्या दुकानात यांचा विटाळ होत नाही, मग गावातच का? एकदा नारायणमामाला हे विचारले तर म्हणाला, “अरे, ही आपल्या समाजाची पद्धतच आहे. मी कशी मोडायची?” आज असे काही नाही होत. जातीयतेचे पीळ सांभाळीत जगणारा तेव्हाचा गाव आणि गावातली माणसं स्वतःला कोणत्या अधिकाराने श्रेष्ठ समजत असतील, कोणास ठावूक. पण त्यांच्या श्रेष्ठत्वाच्या परिभाषा त्यांच्यापुरत्या महान वगैरे असायच्या. समाजाच्या वर्तनातून भलेही हे सगळं आज संपलं असेल; पण मनातून... नाही सांगता येत.
गावातल्या लग्नकार्यात आहेर वाजवण्याचा कार्यक्रम असायचा. हा कार्यक्रम नारायणमामाची खास ओळख. अमक्याकडून तमक्यांना आलेला आहेर सांगायचा, तेव्हा ऐकणाऱ्याचे मन आनंदित व्हायचे. स्पीकरची सोय सहज उपलब्ध नसलेल्या काळात हा खणखणीत आवाज मांडवभर दुमदुमत राहायचा. पंचक्रोशीत असा आवाज कोणाचा नाही म्हणून आलेली पाहुणे मंडळी त्याला दिलखुलास दाद द्यायची. त्यांच्या बोलण्याने नारायणमामा हरकून जायचा. कितीतरी दिवस मुलां-माणसांना सांगत राहायचा. अमक्या गावाच्या पाहुण्यांनी माझे कसे कौतुक केलं वगैरे वगैरे. त्याच्या त्या कहाणीत मात्र प्रत्येकवेळी काही नव्या कड्या जुळत राहायच्या. हळदीचे, वरातीचे, लग्नाच्या टाळीचे निवते देताना नारायणमामाला जरा जास्तच चेव यायचा. त्यात हातभट्टीची थोडी रिचवली असली की, थाट काही और असायचा. गावात लोकांना जेवणाचे निवते सांगताना सारखा या गल्लीतून त्या गल्लीकडे धावत राहायचा. मंडपात मोक्याच्या जागी उभा राहून हातातल्या निमंत्रणाच्या यादीवर जेवणाला आलेल्यांच्या नावासमोर खात्री करीत बरोबरच्या रेघोट्या ओढीत राहायचा. उरलेल्यांना बोलावण्यासाठी परत धावत राहायचा. कधी थोडी अधिक रिचवून झाली की, त्याच्या गप्पांना अद्भुततेची रुपेरी किनार लागायची. खास ठेवणीतल्या गोष्टी, आठवणी एकेक करून जाग्या व्हायच्या. प्रत्येक वेळी तीच गोष्ट आणखी काही भर घालून रोचक होत जायची. आम्हा मुलांना त्या अद्भुतकथा ऐकून याच्याविषयी प्रचंड वगैरे प्रकारातला आदर वाटायचा. काय माणूस आहे हा, म्हणून आपल्या मनानेच त्याला प्रशस्तिपत्र आम्ही देऊन टाकायचो.
काळाच्या प्रवाहात आसपास बदलतो, तशी माणसेही बदलत जातात. परिवर्तनाच्या गतीशी जुळवून घेणारे पुढे निघतात; पण ज्यांना जुळवून घेता येत नाही, ते थबकतात. साचतात. हे साचलेपण घेऊन आहे तेवढ्या ओलाव्यात आस्था शोधत राहतात. परिस्थितीच्या रुक्ष वातावरणात ओल आटत जावून भेगाळलेल्या भुईच्या तुकड्यांशिवाय काहीच उरत नाही, हे माहीत असूनही. नारायणमामाही परिस्थितीच्या भेगाळलेल्या तुकड्यांना जमा करून सांधत, बांधत राहिला, अनेकातल्या एकासारखा. आयुष्याच्या वाटेने चालत राहिला. थकला. थांबला. परिस्थितीच्या कर्दमात रुतला. संपला. येथील चैतन्याचा निरोप घेतला. नियतीने त्याच्या जीवनग्रंथाला पूर्णविराम दिला. पण अनेकांच्या अंतर्यामी आपल्या अस्तित्वाच्या खुणा आठवणींच्या रूपाने तो कोरून गेला.
गावातली माणसं आजही त्याला आठवतात. भलेही ते आठवणे प्रासंगिक असेल. त्याला ओळखणाऱ्या पिढीच्या मनात तो अजूनही जिवंत आहे आणि नव्या पिढीच्या मनात कोणाकडूनतरी त्याच्याविषयी ऐकलेल्या गोष्टीतून स्मृतिरूपाने रुजतो आहे. जगातल्या अनेक सामान्य माणसांसारखा तो जगला. त्याच्या असण्याने गावाची कोणतीही भौतिक प्रगती झाली नसेल. किंवा त्याच्या जाण्याने कोणतेही नुकसान झाले नसेल. त्याच्या असण्या-नसण्याने समाजाच्या दैनंदिन व्यवहारात कोणताही फरक पडला नसेल. पण काही माणसे अशी असतात की, आपल्या अस्तित्वाच्या लहानमोठ्या आठवणी गोळा करून मनांत लहानशी घरटी बांधून जातात. परिस्थितीच्या वादळवाऱ्याशी धडका देत ती कोटरे टिकून राहतात. कालोपघात जीर्ण होऊन दोलायमान होतात. रिती होतात; पण आपल्या अस्तित्वाच्या लहानशा धाग्याने स्मृतींच्या फांदीवर लटकून थरथरत रहातात. नारायणमामा अजूनही गावातल्या माणसांच्या मनात जिवंत आहे, त्याच्या खणखणीत आवाजाच्या रूपाने. का कुणास ठाऊक; पण हा आवाजही आता आपल्या अस्तित्वाला विसर्जनाकडे न्यायला आसुसलेला आहे, असे वाटायला लागले आहे. काळाच्या ओघात सगळ्याच गोष्टीना संपण्याचा शाप असतो. त्याला हा आवाज तरी कसा अपवाद असेल. या आवाजाची आठवणीतील धारही क्षीण होत चालली आहे.
माणसाचे जगणे नव्या संदर्भांची सोबत करीत अवघड वळणांना वळसे घालीत सुखाच्या मृगजळामागे धावते आहे. कधीकाळी गावातला व्यवस्थेशी बांधलेला बलुतेदारांचा वर्ग विज्ञानतंत्रज्ञाननिर्मित प्रगतीच्या आयामांना आपल्यात सामावून घेऊ शकला नाही, तो परिस्थितीच्या आघाताने व्यवस्थेच्या बाहेर फेकला गेला. गावाची वेस ओलांडून गेले, त्यांना त्यांचं मूठभर आकाश हाती लागलं. पण ज्यांच्याकडे सगळ्या क्षमता असूनही परंपरांचा पायबंद पडला, गावगाड्याशी बांधले गेले म्हणून गावातच राहिले, ते विस्मरणाच्या वाटेवर हरवले. माझ्या गावातल्या सुतार, लोहार, कुंभार, नाभिकांकडे कौशल्यांची काही कमी नव्हती. शहरात जाऊन सुमार गुणवत्तेवर जीवनाचा कायापालट करणारे अनेक आहेत. पण यांच्याकडे गुणवत्ता असूनही, हे गावमातीच्या कोरड्या तुकड्यांमध्ये आपली मुळे रुजवू पाहत होते. हे सारं यांना समजले नसेल का? की समजूनही समजून घ्यायची यांच्या मनाची तयारी नसावी? की यांच्या अस्तित्वाची मुळे गावातल्या मातीत घट्ट रुजल्यामुळे, ही रोपटी दुसरीकडे रुजण्याची शक्यताच नव्हती?
कारणे काहीही असोत, ही माणसे आपला परीघ ओलांडून बाहेर पडली नाहीत, म्हणून आहे तेथेच समाधान शोधत राहिली. समाधानाची व्याख्या शक्य तितकी संकुचित करून तिला पर्याप्त समजू लागली. शहरातल्या कोणत्याही सलूनवाल्याशी व्यावसायिक स्पर्धा केली असती, तर पुरून उरण्याइतकं सहजपण आणि शहाणपणही नारायणमामाकडे होतं. हातातील कात्रीत व्यावसायिककौशल्ये एकवटलेली होती. याला गाव कळले, गावातली माणसे कळली; पण व्यवहार समजला नाही. आपल्या अंतरमनाला कौल लावता आला नाही, असंच आज वाटतं. कदाचित एक नारायण चुकला असेल किंवा माहीत असूनही त्याने तसे मुद्दाम जाणवू दिले नसेल. आहे त्यात समाधान मानून राहण्याची संतुष्टवृत्ती असेलही त्याच्या प्रासंगिक परिस्थितीत सामावलेली किंवा काही अगतिकताही असेल. काय असेल ते असो. पण असे नारायण प्रत्येक गावात असतात. त्यांचं असणं तेवढं आपणास दिसतं, पण त्यांच्या अस्तित्वाला असणारे आयाम दिसूनही कळत नाहीत. उत्क्रांतीच्या वाटेने निघालेल्या वानराचा नर झाला, असे शाळेत शिकवलेलं असतं. नराचा नारायण होऊ शकतो, असेही कुणी सांगतात. पण आमचा नारायणमामा खऱ्या अर्थाने नरातला नारायण होता. निदान आमच्या गावापुरता तरी. असे कितीतरी नारायण गावागावात अजूनही असतील कदाचित. आवश्यकता आहे, आपल्या संकुचित सुखांच्या संकल्पनांचे वर्तुळ ओलांडून बाहेरच्या व्यापकपणात हरवलेल्या नारायणाला शोधणाऱ्या भक्तांची.
***