Pariksha | परीक्षा

By // No comments:
दहावीच्या परीक्षेचे रीसिट वर्गात विद्यार्थ्यांना देत होतो. मुलंमुली एकेक करून आपापले प्रवेशपत्र घेऊन त्यावरील नोंदी व्यवस्थित आहेत का, याची खातरजमा करत होती. ज्यांना शंका होत्या ते विचारून समजून घेत होते. वर्गातून बाहेर निघून पुढे सूचनाफलकावरील तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक पाहत उभे होते. तेथे जमा झालेली गर्दी वर्गातून पाहत होतो. प्रत्येकाला आपली परीक्षा कोणत्या बॅचला याची उत्सुकता. प्रत्येक जण गर्दीतून आपला क्रमांक, बॅच शोधून परीक्षा केव्हा आहे, ते आपल्याकडील कागदांवर, वहीत लिहित होते. काही चाणाक्ष मंडळीनी लिहिण्याच्या भानगडीत न पडता आजूबाजूला पाहिले. जवळपास कोणी शिक्षक नसल्याची खात्री करून घेतली आणि खिश्यातून गुपचूप मोबाईल काढले. फलकावरील बैठकव्यवस्थेचे फोटो घेतले. गर्दीतून जरा बाजूला सरकून मोबाईलस्क्रीनवर पाहू लागले. सूचनाफलकाजवळ विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला. वाढत्या गर्दीला सावरण्यासाठी दोनतीन शिक्षक धावत आले. रागावले थोडे त्यांच्यावर. सारे विद्यार्थी रांगेत नीट उभे राहिले.

माझ्या वर्गात परीक्षाप्रवेशपत्र वाटून झाले. काही दोनचार शिल्लक होते, त्या राहिलेल्या विद्यार्थ्यांची वाट पाहत थोडा सैलावलो. बसलो खुर्चीत. थोडा अवधी गेला असेल नसेल, बाहेरून पाचसहा मुलामुलींचा घोळका वर्गात येऊ का, म्हणून विचारीत आत आला देखील. त्यांच्याकडे पाहिलं थोडं. माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नांकित भाव पाहून एक विद्यार्थिनी बोलती झाली. “सर, आमच्या तोंडी परीक्षा उद्याच्या बॅचला आहेत. त्याविषयी विचारायचं आहे थोडं.” “हा, विचारा काय विचारायचे आहे?”- मी. “सर, परीक्षा कशा घेतल्या जातील?” एका मुलाचा प्रश्न. “जशा मागीलवर्षी घेतल्या तशाच.” मी त्यांना म्हणालो. आणखी एक मुलगा सहभागी होत म्हणाला, “म्हणजे नेमकं काय विचाराल सर? आम्ही प्रश्न कोणत्या प्रकारचे तयार करायचे?" मी त्यांच्याकडे आश्चर्यदग्ध नजरेने पाहत होतो. “सर, परीक्षा खूपच कठीण घेतल्या जातील का? आम्हांला तर खूपच भीती वाटतेय! काय होईल या विचाराने काहीच सुचत नाहीयेय. काय करावे कळत नाही.” घोळक्यातून एक घाबरलेला, गोंधळलेला आवाज.

सर्वांचं बोलणं थांबलेलं. क्षणभर शांतता. तेवढी शांतताही त्यांना अस्वस्थ करीत होती. केव्हा एकदा सर आपल्याशी बोलतात म्हणून त्यांची अस्वस्थ चुळबूळ चाललेली. बोलण्यासाठी मुद्दामच मोठा पॉज घेतला. “सर, सांगा ना! परीक्षा कशा घेतल्या जातील?” एका मुलीने शांततेला छेद देत विचारले. माझ्या चेहऱ्यावर मिस्कील हास्य. मी त्यांचे चेहरे निरखतोय. चेहऱ्यावरील तणावाच्या रेषा लांबत चाललेल्या. त्यांच्याकडे पाहत म्हणालो, “जशा नववीच्या वर्गात संबंधित विषय शिक्षकांनी घेतल्या, तशाच याही वर्षी. त्यात घाबरून जाण्यासारखं आहे काय? बोर्डाने परीक्षेचा आराखडा  ठरवून दिलेला असल्याने, आणखी कोणत्या वेगळ्या प्रकारे घेण्याचा प्रश्नच येतो कुठे!” मुलं थोडी स्थिरावली. त्यांच्या मनावरील ताण थोडा कमी झाला. थोडं इकडचं तिकडचं, थोडं अभ्यासाचं बोलणं करीत राहिले. तुमचा अभ्यास तुम्ही नीट करीत राहा, परीक्षांत नवं असं काय असतं? असे म्हणीत त्यांना धीर दिला अन् वाटलीच भीती, आलं दडपण मनावर तर भेटा मला, म्हणून सांगितले. साऱ्यांचे चेहरे थोडे खुलले. वाटलंच तर तुम्हाला भेटू असे म्हणून निघाली घरी जायला. सारी पावलं दरवाज्यातून बाहेर चालत निघाली. त्यांच्या पावलांच्या आवाजासोबत आपापसातील बोलण्याच्या सरमिसळ आवाजाची चिवचिव कानी येत हळूहळू अस्पष्ट होत गेली.

खरंतर, ही सगळी मुलं काही पहिल्यांदाच परीक्षेला सामोरी जात नव्हती. आईबाबांचे बोट धरून रडत-रडत बालवाडीच्या वर्गात आले, तेव्हापासून एकेक परीक्षांना सामोरे जात येथपर्यंत पोहचले, ते परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळेच. मग आताच परीक्षेचा ताण त्यांच्या मनावर का यावा? तसं पाहता मनावर थोडाफार ताण असल्याशिवाय यशाचे मार्ग आपल्याला आक्रमिता येत नाहीत, हेही खरंच. पण हा ताण जेव्हा तुटेपर्यंत ताणला जातो, तेव्हा प्रश्न मोठे होतात आणि उत्तरे लहान. उत्तरांपेक्षा प्रश्नांनाच खूप महत्त्व दिले जाते, तेव्हा साध्यासाध्या समस्याही खूप अवघड झालेल्या असतात. मुलं परीक्षांना सामोरे जात असताना त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी, समाजाने भावनिकदृष्ट्या त्यांच्या सोबत राहणे म्हणूनच आवश्यक असते.

पण असं न घडता सगळ्याच नाही; पण काही पालकांकडून आपल्या वैयक्तिक महत्वाकांक्षा मुलांवर लादल्या जातात. आपणास जे करता आले नाही, ते आपल्या मुलांनी करायलाच हवं, असा अट्टाहास केला जातो. या अट्टाहासापायी मुलांना स्पर्धेत धावणारे घोडे समजून त्यांना धाप लागेपर्यंत पळवत राहतो. पालकांना वाटते याने अधिक गुण मिळवायलाच हवेत. तुला काय हवे ते सांग? तुला ते आणून देतो, पण नव्वदपेक्षा कमी गुण नकोच. शाळांना अग्रमानांकित व्हायची घाई म्हणून पळवा मुलांना स्पर्धेत. मी शिक्षक कसा उत्तम म्हणून हाकला मुलांना अभ्यासाच्या रस्त्याने. चांगला निकाल नाहीच लागला, तर अनुदानाचे काय? मग दामटा मुलांना अभ्यासाच्या गर्दीत. तुझ्या ताईने / दादाने एवढे गुण मिळविले, तुला नाही मिळाले तर नातेवाईक काय म्हणतील? म्हणून पळ टक्के मिळवायच्या रस्त्याने. पडला, ठेचकाळला, रक्तबंबाळ झाला तरी मध्येच नाही थांबता येणार. होऊ दे जे व्हायचे ते. असं सगळं असेल तर अशावेळी मुलांनी करायचे तरी काय?

आमची पिढीत परीक्षेच्या निकालाच्या दिवशी आम्हाला प्रश्न विचारले जायचे, पास झाला का? झाला ना पास, मग पुरे. पण आज निकालाच्या दिवशी प्रश्न असतो, किती टक्के गुण मिळविलेत? म्हणजे पास होणे गृहीतच. एखाद्याने सांगितले, “मिळालेत ऐंशी टक्के.” ऐकताच समोरच्याचा चेहरा प्रचंड चिंताग्रस्त होऊन म्हणतो, “अररे! ऐंशी टक्के, काही फार नाहीत. चांगल्या महाविद्यालयात प्रवेश कसा व्हायचा एवढ्या गुणांनी?” वरून त्या कॉलेजमध्ये एवढी, एवढी कट ऑफ लिस्ट असते. असे उपदेशाचे डोज. कमी गुण मिळवून याने फार मोठा अपराध केला आहे आणि आता तो जगायला लायकच नाही जणू, असा भाव विचारणाऱ्याच्या चेहऱ्यावर असतो. त्यांच्या गुणांची टक्केवारी ऐकून आंबट चेहरा अन् लांबट तोंड करणारे आपण किती गुण मिळवले होते, हे तेव्हा सोयिस्कर विसरलेले असतात. दिलीच करून त्यांच्या गुणांची, शैक्षणिक कारकिर्दीची आठवण, तर उत्तर “अहो, तेव्हा एवढी स्पर्धा होतीच कुठे? जेमतेम गुण मिळाले, तरी पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यापुरती व्यवस्था व्हायची आमच्याकाळी. झाली ना आमची! पण अस्सं कुठं राहिलं आहे आता.”

खरंतर शाळेत दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून मिळणाऱ्या गुणांचा आणि जीवनाच्या गुणवत्तेचा संबंध असतोच किती? शाळेत शिकवलेलं विसरून गेल्यावर, समाजात जगतांना तुमच्याकडे जे उरते तेच खरे शिक्षण. काही दिवसापूर्वी माझा एक विद्यार्थी बीजगणिताचे पुस्तक सोबत घेऊन माझ्याकडे आला. म्हणाला, “सर, गणिताच्या शिक्षकांना भेटायला जायचे आहे. जाऊ का?” त्याला थोडं थांबवलं. म्हणालो, “बघू काय आहे?” तो काही न बोलता माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत राहिला. त्याला वाटले असावे; सर, तुम्ही मराठी विषयाचे शिक्षक. तुम्हाला काय कळतंय गणितातलं. खरंतर एकही शब्द न बोलता त्याने माझ्या कुतूहलजनक प्रश्नाचे उत्तर दिलं होतं. कधीतरी शिकविताना मी म्हणालो असेन, शाळेत शिकत असताना मला गणितातील एकच संख्या आवडायची, ती म्हणजे बावन्न. (आमच्या वेळी पासिंग एवढ्याच गुणांचे असायचे ना!) तुमचं ते एक्स मानू आणि वाय समजू, हे आपल्याला कधी समजलंच नाही आणि समजलं नाही म्हणून मानलंही नाही. आपलं एक्स आणि वायचं ज्ञान तो विषय पास होण्यापुरतं. खरंतर गणित, इंग्रजी हे विषय त्यांच्याविषयी वाटणाऱ्या भीतीमुळे, चुकीच्या दृष्टिकोनामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या कुंडलीत नेहमी वक्रीच असतात. मग त्यांना संतुष्ट करण्यासाठी धावाधाव सुरु होते. अर्थाशिवाय पाठांतर आणि घोकंपट्टीच्या समिधा टाकून अभ्यासकुंड प्रज्वलित ठेवण्यासाठी केलेली केविलवाणी धडपड. आमच्यावेळीही असंच होतं. त्यात फारसा फरक पडला आहे, असे नाही. इतिहास शिकविताना गमतीने मुलांना मी नेहमी सांगतो, “मी इंग्रजांना कधीच घाबरलो नाही; पण इंग्रजी समोर दिसली की, आपलं पानिपत ठरलेलं. पानिपतचा इतिहास काही असो, तुम्हाला तुमचं पानिपत होऊ द्यायचं नसेल, तर राहा उभे इंग्रजीशी दोन हात करायला. नाहीतर आपलं अज्ञानात सुख आहेच शेवटी!”

आजही या स्थितीत फारसा बदल घडला आहे, असं नाही वाटत. तुम्हाला आवडो अगर न आवडो शाळेने, बोर्डाने ठरवलेले, शाळांनी निवडलेले तेच विषय घ्या (अद्याप तरी आपल्याला आवडतील ते कोणतेही गाभा विषय निवडून परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध असल्याचे मला माहीत नाही, ऐकिवात नाही.) आणि पास होऊन दाखवा. यासाठी परीक्षा नावाचं आव्हान यांच्यासमोर उभं. बरं, या परीक्षापद्धतीविषयी, अभ्यासक्रमाविषयी किती शिक्षणतज्ज्ञांचे ही एकमेव आणि दोषरहित मूल्यमापनपद्धती असल्याचं मत आहे? तसं पाहता आजची परीक्षापद्धती स्मरणशक्तीचीच परीक्षा आहे. वर्षभर घोका अन् दोन-तीन तासात ओका. बस्स, एवढंच. ज्याला उत्तरपत्रिका लिहिताना उत्तरे योग्यवेळी आणि चांगल्यापैकी आठवून लिहिले, त्याच्या गुणपत्रिकेत उत्तम गुण. बाकी कौशल्यांच्या प्रकटीकरणासाठी आमच्या परीक्षातंत्रात कितीसा वाव असतो? महात्मा गांधीजी म्हणाले होते, ‘आमच्या शिक्षणपद्धतीत दोन्ही हातांचा वापर कधी होत नाही. आणि जो एक हात वापरला जातो तो गृहपाठ, उत्तरपत्रिका लिहाण्यापुरताच.’ आमच्या शिक्षणातून जर अर्ध्याच क्षमता वापरात येत असतील, विकसित होत असतील, तर या व्यवस्थेला परिपूर्ण तरी कसे म्हणता येईल? स्वामी विवेकानंदांनी अपेक्षीलेले ‘मॅन मेकिंग अॅण्ड कॅरेक्टर बिल्डिंग’ या विचारांना घडवणारं शिक्षण या व्यवस्थेतून मिळत आहे का?

गुणांवरून गुणवत्ता ठरवण्याच्या आजच्या जगात जर संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद विद्यार्थी म्हणून शिकायला असते, तर गुणवत्तायादीत आले असते का? छत्रपती शिवाजी महाराज हे काही राज्यशास्त्र विषयात विद्यापीठचे गोल्ड मेडलीस्ट नव्हते, संत तुकाराम महाराज समाजशास्त्राचे पदवीधर नव्हते, संत ज्ञानेश्वरांनी काही तत्वज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा, राजनीतीचा अभ्यास करणारे सगळेच स्वकीय-परकीय इतिहासकार, विद्वान एकमुखाने महाराजांच्या राजनीतीला, सामर्थ्याला गौरवान्वित करतात. महाराजांविषयी लिहताना त्यांच्या लेखणीला बहर येतो. ‘बुडती हे जन देखवे ना डोळा’ असे म्हणीत अंतर्यामी अस्वस्थता निर्माण करणारी भावना संत तुकाराम महाराजांच्या वर्तनात समाजाविषयी असणाऱ्या आस्थेतून, कळवळ्यातून प्रकटली होती. ती निर्माण व्हावी म्हणून त्यांच्याकडे समाजशास्त्रीय विचार वृद्धिंगत करणारी कोणती पदवी नव्हती. तो अंतरीचा जिव्हाळा होता. ‘बंधू-भगिनी’ या दोनच शब्दांनी जगाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या नावापुढे केवळ बॅचलर ऑफ आर्ट, ही पदवी होती.

रायबाचं लग्न नंतर, आधी कोंडाण्याचं असं म्हणणारे तानाजी मालुसरे, लाख मरोत पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणीत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे बाजीप्रभू कोणत्या शाळेत त्याग, समर्पण, स्वामिनिष्ठा शिकले. न्यूटन, आईन्स्टाईन, एडिसन त्यांच्या विद्यालयांच्या गुणवत्ता यादीत आले होते का? शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या या लोकांच्या लोकविलक्षण जीवनकथा आम्हांस माहीत असूनही अंगभूत गुणवत्तेला नाकारून गुणपत्रकातील गुणांचाच आग्रह का, कशासाठी? थ्री इडियट चित्रपटात एक संवाद आहे, ‘काबिल बन, कामयाबी अपने पीछे आयेगी.’ जर यशस्वी होणं गुणांवरच अवलंबून असेल, तर मग समाजातील बहुसंख्य माणसे, जे गुणवत्ता यादीत कधीच आले नव्हते, ते जगायला अपात्र ठरतील. आणि गुणवत्ता यादीत जे आलेले असतात, त्यापैकी बऱ्याच जणांचे काय चालले आहे, त्यांनी पुढे जाऊन काय केले आहे, हे तरी कुठे आपणास माहीत असते. अनुभवातून आलेले शहाणपण घेऊन जगणारा एखादा खेडूतही कधी कधी प्रकांड पंडिताला व्यावहारिक शहाणपणात शरण जात नाही. हे सारं पाहून, दिसूनही आपलं त्याकडे दुर्लक्ष का होतं?

काळ कोणताही असू द्या. परीक्षापद्धती कोणतीही असू द्या, विद्यार्थी तोच असतो. परीक्षा नामक दिव्यांस सामोरे जाणारा. त्याच्या भावस्थितीचा आपण कधी पुरेसा विचार करतो का? इवलासा कोमल अंकुर वाढत, वाढत आकाश कवेत घेण्याचे स्वप्न घेऊन ऊन, वारा, पाण्याशी सख्य साधत जमिनीत रुजतो. सुरक्षेचे कवच असले, तर निर्वेधपणे त्याची वाढ होते. आम्ही आमच्या मुलांना आश्वस्त करणारं भावनिक सुरक्षेचं कुंपण कधी देणार आहोत? विद्यार्थ्याचा कर्तृत्वसिंधू उचंबळून यावा, म्हणून आपला स्वतःचा जीवनबिंदू अर्पून त्याला असीमता कधी प्रदान करून देणार आहोत? झाडाच्या सळसळत्या हिरव्या पानांत, झुळझुळणाऱ्या झऱ्यात, गाणाऱ्या पक्षांच्या गळ्यात, दूरदूर वनराईत नेणाऱ्या वळणावळणाच्या पायवाटेत, नदीच्या खळाळत्या पाण्यात खरं शिक्षण सामावलेलं आहे. पुस्तकं दडली आहेत. ती उघडून वाचण्यासाठी आम्ही त्यांना तेथे कधी नेणार आहोत का? की गुणांच्या वणवण शोधाच्या भोवऱ्यात ढकलणार आहोत?

शिक्षण एक पद्धती आहे. ती आत्मसात करावी लागते. ती प्रयत्नसाध्य आहे. या प्रयत्नात कदाचित काही चुका जाणते-अजाणतेपणी मुलांकडून घडतीलही. अपयश पदरी येईल; पण अपयश हा काही शेवट नाही. फारफारतर अपयश हा यशाचा चुकलेला मार्ग असू शकतो, तो रस्त्याचा शेवट नाही. रस्ते आणखीही आहेत. नसतील तर नव्या पाऊलवाटा तयार करता येतात. ते रस्ते मुलांना दाखवू या! कारण चाकोरीतला रस्ता कोणतंही नवं ठिकाण शोधू शकत नाही. प्रत्येकाकडे त्याच्या क्षमता असतात. त्याला त्या शोधू द्या. नसतील समजत तर मदत करा. धावण्याच्या क्षमतेवर कविता राऊत यशस्वी होते. निरीक्षणबळावर न्यूटन थोर शास्त्रज्ञ होतो. डॉ. कलाम आपल्याकडील अंगभूत गुणांनी मिसाईल मॅन म्हणून ओळखले जातात. मदर तेरेसा सेवेने जग फुलवतात. बाबा आमटे आनंदवनात आनंदाचे मळे फुलवतात. क्रीडांगणावरील फलंदाजीच्या नैपुण्याने तेंडूलकर महान होतो. कोणी उंच उडी, कोणी लांब उडी मारून उच्चांक करतो. यश मिळवू शकतो. थोडे वेगळे काम करायची तयारी असली, थोडी युक्ती असली की यशाचे मार्ग निर्माण करता येतात. पोहण्यासाठी आधी पाण्यात सूर मारावा लागतो. तेव्हा पोहण्याचा सूर सापडतो. मुलांना त्यांच्या पद्धतीने जगण्याचा सूर सापडावा, म्हणून जगण्याच्या नव्या सुरावटींचा साज निर्माण करून दिला, त्यांचं जीवनसंगीत तन्मयतेने घेतले समजून तर...! नाहीतरी यशस्वी होण्यासाठी कशावरतरी, कोणावरतरी श्रद्धा असावी लागते. जर ही श्रद्धास्थाने समाज, पालक, शाळा, शिक्षक झाले, तर मुलांच्या मनातील परीक्षेची भीती, अभ्यासाच्या समस्या, जगण्यातील गुंता सहज संपवता येईल. नसेल सुटत सगळा गुंता, निदान प्रकाशाचा थोडासा कवडसा तरी नजरेस येईल. त्या प्रकाशाच्या दिशेने जातील त्यांची पाऊले चालत. घेतील शोध आपणच आपल्या ध्येयाचा आणि देतील जीवनास आकार. कारण, श्रद्धेच्या बळावर एकलव्यसुद्धा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ धनुर्धर होऊ शकतोच ना!

Manusaki | माणुसकी

By // No comments:
वर्गात निबंध लेखन शिकवत होतो. वेगवेगळ्या प्रकारातील निबंधांचे लेखन कसे करता येईल, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगत होतो. मुलं ऐकत होती. काहींचं वहीत मुद्दे लिहिणं सुरु होतं. मध्येच एक मुलगी उभी राहिली. म्हणाली, “सर, माणुसकी महानधर्म या विषयावर निबंध कसा लिहता येईल, याबाबत सांगा ना!” आधीच्या विषयावरील विवेचन पूर्ण करून विषयाकडे वळलो. मला ज्ञात असणाऱ्या उदाहरणासह समजावता येईल, तेवढं समजावून सांगितलं. मुलांचं समाधान झालं असावं. तासिका संपल्याची घंटा वाजली. बोलणं पूर्ण करून वर्गाबाहेर पडायच्या तयारीत असताना एक मुलगा म्हणाला, “सर, तुम्हाला काय वाटतं, माणुसकीधर्म शिल्लक आहे आज?” थांबलो वर्गावर थोडा. तोच प्रश्न वर्गाला उद्देशून विचारला. “माझं मत राहू द्या, तुम्हाला काय वाटतं?” सगळा वर्ग शांत, स्तब्ध. आपणास विचारलं तर काय उत्तर द्यावं, या विचारात. त्यांना तसंच विचारात राहू द्यावं, असा विचार केला. उद्याच्या तासिकेला तुमच्याशी या विषयावर पुन्हा बोलतो सांगून वर्गातून निघालो.
 
वर्गातून बाहेर पडलो. चालती पावलं सरावाने शिक्षक दालनाकडे वळली; पण मुलाने वर्गात निरागसपणे विचारलेला प्रश्न मनातून काही निघेना. त्यानं सरळ-सरळ विचारलं, ‘तुम्हाला काय वाटतंय?’ खरंतर या प्रश्नाचं उत्तर निबंध लेखनापेक्षा अवघड होतं, कारण निबंध त्रयस्ताच्या भूमिकेतून लिहता येतो. पण आपण त्या प्रश्नाशी जुळतो, तेव्हा ‘दुसऱ्या सांगे ब्रम्हज्ञान...’ अशीच स्थिती होते. काय वाटतं? या प्रश्नाचं उत्तर देणं मलाही अवघडच होतं. जेवढं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करायला लागलो, तेवढं अधिक कठीण होत गेलं. काही वर्षापूर्वी कवयित्री बहिणाबाईंनी हाच प्रश्न ‘माणसा माणसा कधी होशील रे माणूस?’ म्हणून माणसाला विचारला आहे. पण हुशार माणसाने हे वाचून, ऐकून माणूस बनण्याचा प्रयत्न कितीसा केला? माहीत नाही. ज्यांनी केला त्यांना तरी या प्रश्नाचं उत्तर पूर्णतः मिळालं असेल का?

विद्यमान विश्वातील प्राणिजगतात माणूस प्रचंड सामर्थ्यशाली प्राणी. सुमार देहाच्या आणि ताकदीच्या माणूस नावाच्या प्राण्यानं आपली नाममुद्रा विश्वाच्या व्यवहारावर अंकित केली. आपल्या सामर्थ्याने विश्वाचा अनभिषिक्त सम्राट बनला. जगातील महाकाय प्राण्यांसमोर नगण्य अस्तित्व असणारा माणूस सामर्थ्यशाली बनला, तो केवळ त्याच्याकडे असणाऱ्या बुद्धीवैभवामुळे. नियतीने हे वैभव त्याला दिले. म्हणून तो सर्वार्थाने सहनशील, संस्कारित, सुखी, संपन्न, समाधानी वगैरे झाला आहे, असे नाही म्हणता येत. आदिम अवस्थेत वावरताना जगण्यासाठी भाकरीचा धड एक तुकडा मिळवायची अक्कल नसणारा माणूस आज विश्वाचा नियंता बनू पाहतो आहे. यापाठीमागे त्याची जिद्द, परिश्रम, चिकाटी, जिज्ञासा हे गुण उभे आहेत. या गुणवैभवाच्या पाथेयावर त्याने समुद्रतळापासून सूर्यबिंबापर्यंत अनेक अज्ञात परगण्याचा शोध घेतला. त्याच्या शोधयात्रेने त्याला सामर्थ्यशाली बनवले. माणूस संघर्ष करीत आला आहे. संघर्षातून जसजसे सामर्थ्य वाढत गेले, तसतसा तो कालोपघात संकुचितही होत गेला. एकटेपणाची जाणीव त्याला अस्वस्थ करायला लागली. एकटेपणाच्या जगण्यातून बाहेर येण्यासाठी आपलेपणाचा ओलावा शोधू लागला. भावनिक ओलावा शोधताना त्याला कुटुंबाचा, कुटुंबातून समाजव्यवस्थेचा, समाजव्यवस्थेतून परिणत जीवनव्यवस्थेचा शोध लागला. व्यवस्था टिकवण्यासाठी वर्षानुवर्षांच्या अनुभवाने हाती लागलेल्या निष्कर्षातून त्याने नीतिनियम तयार केले. नीतिनियमातून कायदे तयार झाले. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी शासनव्यवस्था जन्माला घालून समाजाचे वर्तनप्रवाह नीतिसंमत मार्गाने प्रवाहित कसे राहतील, याची व्यवस्था उभी केली.

नीतिमत्ता माणसांच्या वैचारिक प्रगल्भपणाचे द्योतक असते. ‘माणसांनी कसे वागू नये’ या करिता ‘कसे वागावे’, या अपेक्षांतून तयार केलेला मूल्यांचा तो अमूल्य ठेवा असतो. तसा तो आजही आहे. माणसाच्या जगण्यात मूल्ये रुजवताना समाजाच्या इच्छा, आकांक्षाना सद्वर्तनाच्या कोंदणात अधिष्ठित करण्याचे प्रयत्न झाले. जीवशास्त्राच्या परिभाषेत माणूस निसर्गाचं अपत्य आहे, म्हणजे एक प्राणीच. त्याच्यातील पशुत्वाला संपवून संस्कारित करण्याचा प्रयोग होत राहिला आहे. माणुसकी जपणं हेच जीवनाचे उदात्त तत्त्व आहे, या भावनेतून वेगवेगळ्या घटकांशी तो जुळत गेला. त्याचं हे भावनिक नातं म्हणजे माणुसकी. दुसऱ्याच्या दुःखाने व्यथित होऊन डोळ्यात साठलेले दोन अश्रू म्हणजे संस्कृती, असे म्हणतात. अशा उदात्त विचारांचा स्वीकार करून तो जगायला शिकला. संवेदनशील विचारांची सोबत करीत त्या-त्या काळातील पिढी जगू लागली. येणारी नवी पिढी त्यात भर घालू लागली. उदात्त हेतूने जगण्याचे प्रयोजन मिळत राहिले. ‘मी कसे जगू नये’, याचे उत्तर त्याला ‘मी कसे जगावे’ या विचारातून निर्मित माणुसकीधर्मातून मिळत गेले.

माणूस मुळात श्रद्धावान आहे. जगण्यासाठी त्याला कोणत्यातरी श्रद्धा हव्या असतात. आधार हवा असतो. त्याचा जगण्याचा आधार काढला तर तो कोसळेल. या कोसळण्यापासून सुरक्षित राहता यावे, याकरिता सदाचाराचे मार्ग निर्माण करायला लागतात. सदाचार त्याच्या जीवनश्रद्धांचा आविष्कार आहे. सदाचाराच्या मार्गाने वळती होऊन डोळस श्रद्धेने जगणारी साधी, सद्वर्तनी, सत्यप्रिय, संस्कारित माणसे समाजाचे दिशादर्शक बनली. त्यांच्या आचरणातून समाजाला गती मिळाली आणि प्रगतीही झाली. समाजाच्या प्रगतीला आदर्शरूपाने सांभाळणारी प्रगतिप्रिय माणसं संस्कृतीचं संचित असतात. वंचितांच्या वेदनांनी व्यथित होऊन त्यांच्या जीवनात आत्मतेजाचा सूर्य उदित करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले प्रचंड सायास-प्रयास संवेदनशील विचारातून प्रकटलेला माणुसकीचा गहिवर होता. माणसांच्या जगात माणसांना माणसाचं जीवन नाकारणाऱ्या प्रतिगामी विचाराच्या विरोधात समतेचा एल्गार होता. अविचारांची काजळी दूर करून विवेकाची दिवाळी साजरी करू पाहणारा महात्मा फुलेंचा विचार द्रष्ट्या विचारवंताचे जीवन चिंतन ठरले. त्यांच्या प्रगतिप्रिय विचारांनी सार्वजनिक रुपात सत्यधर्माची ज्योत प्रदीप्त केली. माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी आत्मभान देण्याचा प्रयत्न माणुसकीधर्माचा साक्षात्कार होता.

परंपरेने दिलेले जीवन, हेच नियतीचं देणं समजून व्यवस्थेच्या विरोधात अवाक्षरही न काढता जगणे स्त्रियांसाठी शाप ठरले होते. अवहेलनेच्या आघातानी घायाळ होऊन कुठलाही विरोध न करता हेच आपलं प्राक्तन आहे, असे मानीत जगणाऱ्या भारतीय नारीच्या हाती पाटी-पेन्सिल देऊन महात्मा फुलेंनी उपेक्षित आवाजाला स्वाभिमानाचा मार्ग दिला. ज्ञानज्योत हाती घेऊन परिवर्तनाचे पथ प्रशस्त केले. बंधनांमध्ये बंदिस्त असणाऱ्या स्त्रियांना आत्मभान, आत्मसन्मान देत त्यांच्यातले विझलेले आत्मतेज जागे केले. देशातील दारिद्र्य, गरिबी, विषमतेची दाहकता पाहून व्यथित झालेल्या महात्मा गांधींनी आपल्या दैनंदिन गरजा सीमित करून साध्या जगण्याचा स्वीकार केला. त्यांनी केलेल्या सुखांच्या त्यागात माणुसकी सामावली आहे. समाजाने नाकारलेल्या, तिरस्कारलेल्यांच्या जगण्याला सन्मान देण्यासाठी बाबा आमटेंनी आनंदवन उभे केले. भूमंडळी माणूस नावाचं अस्तित्व अबाधित राहावे, म्हणून प्रयत्नरत राहणाऱ्यांच्या सद्विचारात माणूसपण साठलेलं आहे. विधायक कार्याच्या मशाली हाती घेऊन अंधारलेले रस्ते उजळण्यासाठी निघालेल्या पावलांच्या ठशात माणुसकीधर्म विसावला आहे. ‘खरा तो एकचि धर्म’ या विचारांनी वर्तणाऱ्या स्नेहधर्मात, प्रेमधर्मात माणुसकी थांबली आहे.

अनेक आदर्श स्मृतिरुपाने सोबत करीत असतांनासुद्धा आज माणुसकीधर्माचा संकोच होत आहे. स्वार्थपरायण भाव अधिक मोठा होत आहे. देशातल्या संतानी, सुधारकांनी माणूसधर्माचा जागर घडवूही सदाचाराचा आधार ढासळत चालला आहे. विज्ञानतंत्रज्ञानाने सांप्रतकाळी सुखांची आरास मांडली असतांना धर्माच्या नावाने अधर्म होतो आहे. अद्यापही समाजव्यवस्थेतून जातीयतेचे ग्रहण सुटले नाही. आपल्या आसपास अगणित सुविधांचं जग उभं असतानाही माणसांना गावकुसाबाहेरचं, रानोमाळ अस्वस्थ वणवण करीत भटकंतीचं जीवन जगावं लागणं, हा माणुसकीधर्म कसा काय असू शकतो? सणवारात, समारोहात भोजनाच्या पत्रावळीवर हजारोंचा खर्च होतोय. पण मंडपाच्याबाहेर पोटातल्या भुकेला दोन घास मिळतील, म्हणून कोणीतरी उपाशी उपेक्षित, वंचित, विकल जीव आशाळभूतपणे वाट पाहत बसलेला आहे. लोकांनी पत्रावळीवर टाकलेलं, राहिलेलं उष्ट-खरकटं जमा करण्यासाठी धडपडत आहे. या जगण्यालाच विधिलिखित मानणाऱ्या परिस्थितीशरण, अगतिक माणसांना सन्मानाने दोन घास देण्याची व्यवस्था आमच्या माणूसधर्माला अजूनही का करता आली नसेल?

एकीकडे नारीचा सन्मान करायचा तर दुसरीकडे परंपरेचे पायबंद घालून आकांक्षांच्या आकाशात विहार करू पाहणाऱ्या तिच्या पंखाचा विच्छेद करायचा. तिच्यावर अत्याचार करून नाजूक आयुष्य, कोमल जीवन संपवून टाकायचं. हा जगण्याचा कोणता माणूसधर्म? महिला सबलीकरणाच्या वार्ता कराव्यात आणि त्यांच्यावर अत्याचार घडल्यावर प्रतिकारासाठी तेवढ्यापुरतं पेटून उठलं म्हणजे काम संपत नाही. मनातला आक्रोश अन्यायाचं उच्चाटन करण्यासाठी वणव्याचं रूप धारण करतो, तेव्हा माणुसकीधर्माचा जागर घडतो. माणुसकी नुसती शिकून आणि शिकवून येत नाही. ती आचरणात आणावी लागते. समाजपरायण विचाराने वर्तणारी माणसे माणूसधर्माचा जागर करीत समाज घडवण्यासाठी उभी राहतात, तेव्हा परिवर्तन घडते. समतेचे दीप प्रज्वलित करून विधायक वाटेवर चालण्यासाठी माणसांना प्रेरित करतात, तेव्हा संस्कारांचा जागर घडतो. संस्कारातून संस्कृती साकारते. या साकारला मिळालेला आकार हाच माणुसकीधर्म असतो.

माझा सभोवताल उध्वस्त होत आहे. पण मला काय त्याचं म्हणून मी निष्क्रिय राहत असेल, तर माझ्यात आणि अन्य प्राण्यात फरक काय? आग लागल्यावर तुमचं घर सुरक्षित ठेवायचं असेल, तर शेजारच्या घराला लागलेली आग पसरू नये म्हणून आधी शेजारच्या घरावर पाणी टाकून नियंत्रित करावी लागते. शेजार जळत असेल आणि आपण म्हणत असू, अजून माझ्यापर्यंत त्याची दाहकता नाही, तर तुम्ही किती काळ सुरक्षित राहाल? इहतलावरील माणसांचं वास्तव्य सरासरी साठ-सत्तर वर्षाचं असतं असे मानले, तर आपण गेल्यावर एकच गोष्ट आपल्यानंतर शिल्लक उरते, ती म्हणजे आपल्या संस्कारसंपन्न जगण्याच्या आठवणी. तुमच्या इहतलावरील वास्तव्याच्या आठवणींना माणुसकीचा गहिवर असेल, तर तुम्ही खऱ्याअर्थाने जगलात. तुमचं तसं जगणं हाच खरा माणुसकीधर्म असतो. अनंत काणेकरांच्या दोन मेणबत्त्या लघुनिबंधात वाक्य आहे, ‘स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास.’ असं दुसऱ्यासाठी जगणं आणि मरणं म्हणजेच माणुसकी. अशाच कोणत्यातरी सत्प्रेरित वर्तनाच्या कृतीतून निर्माण होणारा उदात्त विचार म्हणजे, मानवधर्म.

khedyakade | खेड्याकडे

By // 4 comments:
खेड्याकडे चला!

शाळेत दहावीच्या सराव परीक्षा सुरु. वर्गावर पर्यवेक्षण करीत होतो. पेपर संपला. उत्तरपत्रिका जमा केल्या. परीक्षा क्रमांकानुसार एकत्र लावताना, माझ्याच वर्गातील काही मुली सर, आत येऊ का? म्हणून विचारीत वर्गात आल्या. त्यांना काहीतरी विचारायचे आहे, त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होते. “हा, बोला काय तक्रार तुमची?” म्हणून मी त्यांना बोलतं केलं. थोड्या थांबल्या. काय बोलावं याचा विचार करीत राहिल्या. त्यातील एकीने विचारले, “सर, ‘खेड्याकडे चला’ या विषयावरील निबंधाविषयी विचारायचं आहे. सर, या निबंधात नेमकं काय लिहावं? नीट समजतच नाही.” जमा करून घेतलेल्या उत्तरपत्रिका थोड्या बाजूला ठेवल्या अन् मुद्दामहूनच म्हणालो, “समजत नाही म्हणजे? तुम्हाला वर्गात निबंधलेखन शिकवलं. निबंध कसे लिहावेत, हे समजावे म्हणून उदाहरणासह नोट्ससुद्धा दिल्या. पुस्तकातील ग्रामीण पार्श्वभूमी असणाऱ्या पाठांचं अध्यापन सुरु असताना त्या संदर्भात ओघाने आलेले बोलणं तुम्ही ऐकत होतात. समजून घेत होतात. मग तरीही पुन्हा असे पहिले पाढे पंचावन्न कसं काय? तुम्हाला खेडी माहीत नाहीत. खेड्यांविषयी काहीही वाचलं, ऐकले नाही तुम्ही?” असं काहीसं बोलून त्या काय बोलतात, म्हणून माझं बोलणं थोडं थांबवलं.

माझ्या बाजूला घोळका करून उभ्या असलेल्या मुलींमधून एक मुलगी बोलती झाली. म्हणाली, “सर, तुमचं म्हणणं सगळं ठीक आहे. खेडं, खेड्यातील जीवन, तेथील माणसांचे दैनंदिन दिनक्रम, त्यांचे जीवनव्यवहार याबाबत वाचून माहीत आहे; पण ते पुरेसं आहेच कुठे? आणि या ग्रामीण जगण्याचा आम्हाला अनुभव तरी असा कुठं आहे!” त्या मुलीचं बोलणं रास्तच होते. थोडा विचार केला. मनात म्हणालो, या मुलींचं तरी कुठं चुकतंय. जर अनुभूतीच नसेल, तर सहानुभूती तरी कुठून निर्माण व्हावी? विषयाची पुरेशी माहितीच नसेल, तर या विषयावरील निबंधाचे लेखन त्यांना करता कसे येईल? लागलो निबंधाविषयी त्यांच्याशी बोलायला. त्यांनी या निबंधात काय, कसं, किती लिहावं म्हणून बोलत राहिलो. निबंधाचे लेखन व्यवस्थित करता यावे यासाठी एक एक मुद्दे सांगत राहिलो. त्या ऐकत राहिल्या. काहींनी ऐकलेले मुद्दे मनात साठवले. काहींनी हाती वही, पेन घेऊन ऐकलेले मुद्दे कागदावर गोठवले. त्यांचं समाधान झालं असावं. वर्गात जशा चिवचिव करीत आल्या तशाच चिवचिवाट करीत बाहेर निघूनही गेल्या. उत्तरपत्रिकांचा गठ्ठा घेऊन जमा करण्यासाठी मीही शिक्षक दालनाकडे चालता झालो.

सराव परीक्षा सुरु असल्याने असेल त्यात हा प्रश्न निबंधासाठी विचारलेला. नाहीतर असेल कोणत्यातरी सराव प्रश्नपत्रिका संचात. त्यांना अपेक्षित उत्तर नसेल मिळालं कुठे आणि असलं तरी त्यांच्या मनाप्रमाणे नसेल, म्हणून आल्या धावतच विचारायला. कदाचित आज ऐकलेल्या चर्चेवरून, मुद्द्यांवरून लिहितीलही निबंध बऱ्यापैकी. पण त्या मुलींचं बोलणं मात्र मनात घर करून राहिलं. ‘आम्हाला खेड्यातल्या जगण्याचा अनुभव तरी कुठे आहे?’ त्यांचं म्हणणं तसं खरंच. आताच्या पिढ्यांची गावाशी असणाऱ्या संपर्काची नाळ तुटत चालली आहे. ती टिकवून ठेवण्याची प्रयोजनेही फारशी उरली नाहीत. यांच्यातील बहुतेक मुलामुलींचे आईबाबा, त्यांच्या आदल्या पिढ्या गावातच घडल्या, वाढल्या. नंतर शिकूनसवरून उदरभरणाच्या क्रमसंगत वाटेवरून नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना गावातून बाहेर पडावे लागले. शहरात येऊन स्थिरावले. विसावले. तरीही गावाशी जुळलेल्या त्यांच्या मनाच्या तारा गावपणाच्या आठवणींनी स्वरांकित होत राहिल्या.

गाव आणि शहराला जोडणारी त्यांची मने आस्थेचे साकव बांधून आपल्या लहानपणातील वास्तव्याच्या भूमीशी निगडित राहिले. नंतरच्या पिढ्यांनी सर्वसुखसुविधांनी मंडित काळात जन्म घेतला. सुविधा म्हणजेच जीवन अशा समजाने गावाशी, गावपणाशी फारसं जुळवून घेण्याचा प्रयत्न केला नाही. घरच्यांनी, आप्तस्वकियांनी गावाशी, ग्रामसंस्कृतीच्या प्रवाहाशी त्यांना आणण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र इन्टरनेट, फेसबुक, बर्गर, पिझ्झा, सुपरमार्केट, मॉल कल्चरमध्ये वाढणारी मुलं अग्रीकल्चर संस्कृतीशी तितकीशी जुळलीच नाहीत. गावाकडच्या घरातील मंगलकार्ये, सणवारांना जाणारी ही मुलं तशी गावात प्रासंगिकच थांबली. तिथं नाही रुजू शकली.

रुजणार तरी कशी? त्यांच्या अस्तित्वाच्या मुळांना संघर्ष करीत टिकून राहण्यासाठी ओलावा शोधण्याची आवश्यकताच नव्हती. असली तरी फार थोडी. कुंडीतल्या शोभेच्या रोपाप्रमाणे काळजी घेत त्यांचं भरणपोषण होत राहिलं. जगण्यासाठी संघर्ष करीत, वाऱ्याशी हितगुज करीत, आभाळाला स्पर्श करण्याचं स्वप्न उरी घेऊन फुलणाऱ्या माळावरील एकाकी फुलाचं फुलणं त्यांच्या वाट्याला आमच्या पिढ्यांनी येऊच दिलं नाही. आमची पिढी, आम्ही अभावात जगलो. जगण्याचा वाटांनी स्वतःला शोधीत येथे आलो. पण खरं जगणंच राहून गेलं. ही भावना मनात कायमच सोबतीला असल्याने निदान पोरांना असं उपेक्षित जिणं जगावं लागू नये, म्हणून काळजी घेत राहिलो. या रोपट्यांना रुजवण्यासाठी हवं नको, ते करीत राहिलो. आम्हाला जे करता आले नाही. मनात असूनही नियतीने तशी संधीच दिली नाही, म्हणून यांना तरी अभावग्रस्त जीवनाला सामोरे जायला लागू नये, या विचाराने त्यांना वाढवीत, घडवीत राहिलो.

बऱ्याचवेळी आपण ऐकतो, वाचतो भारत कृषिप्रधान देश आहे. म्हणून पर्यायाने तो खेड्यांचाही देश आहे. सुमारे साडेपाच- सहा लाख खेड्यांनी या देशाचं देशपण जपलं आहे. देशाला घडवलं आहे. अजूनही बराचसा भारत खेड्यातच वसला आहे. खेडी या देशाचा गौरव आहेत, अस्मिता आहेत. म्हणूनच की काय महात्मा गांधीनी ‘खेड्याकडे चला’ या ग्रामोद्धाराच्या मंत्राचा जागर करीत प्रजेला खेड्याकडच्या वाटांनी वळते करण्याचा प्रयत्न केला. जीवनाच्या संपन्नतेचा पथ दाखवीताना आपणच आपल्या अस्तित्वाच्या मुळांचा शोध घेण्यास प्रवृत्त केले. खेडी घडली तर देश घडेल, या उदात्त विचारातून परंपरेच्या जोखडात बंदिस्त असलेल्या ग्रामजीवनाला मुक्तीचा ध्यास घेण्यासाठी समर्पणाचे श्वास दिले.

अशाच समर्पित भावनेतून महाराष्ट्रही घडला आहे. तापी, पूर्णा, कृष्णा, भीमा नद्यांच्या पाण्याने सिंचित आणि सातपुडा, सह्याद्रीच्या कडेकपारीनी मंडित असलेला महाराष्ट्र देशाचं राकट, कणखर वैभव आहे. जीवन समृद्धीच्या वाटा शोधणाऱ्या, गती अन प्रगतीचे नवे आयाम उभे करणाऱ्या सुमारे त्रेचाळीस हजार खेड्यांनी हे ‘महा-राष्ट्र’ घडविले आहे. याच खेड्यांनी ‘महाराष्ट्र’ संस्कृती घडविली आणि वाढविलीही आहे. उदात्त हेतूने प्रेरित सत्ताकारण, राजकारण करताना परकीय आक्रमकांशी, आक्रमणांशी समर्थपणे दोन हात करीत संघर्षातून ‘स्वराज्य’ निर्मितीचे तोरण या भूमीच्या ललाटी बांधणाऱ्या, युगप्रवर्तक छत्रपती शिवबांनी मराठी मनाची अस्मिता पुलकित केली. या मातीतून ग्रामव्यवस्था सक्षम केली. शेकडो वर्षाच्या इतिहासाची परंपरा असणारा महाराष्ट्र ‘महान राष्ट्र’ करण्याचं काम खेड्यांनीच केलं. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, संस्कृती, संस्कार, इतिहास घडविणारी बहुतांश ध्येयवेडी माणसं खेड्यातून, खेड्यांच्या मातीतून सत्व आणि स्वत्व घेऊन महाराष्ट्राच्या इतिहासाचे कर्ते म्हणून प्रकटले.

कधीकाळी गावाचं गावपण सांभाळीत ‘स्वयंपूर्ण’ जगणाऱ्या ग्रामजीवनावर ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी राजवटीच्या आगमनाने आघात झाला. औद्योगिकक्रांतीने साम्राज्यवादी राष्ट्रांच्या स्वार्थपरायणतेला महत्वाकांक्षेचे धुमारे निर्माण केले. त्यांच्या सत्तालालसेतून येथील ग्रामव्यवस्थेत, व्यवस्थापनात प्रतिगामी बदल घडले अन् या बदलांनी हळूहळू गावंही स्वतःचा चेहरा हरवून बसली. शतकानुशतके अनुभवातून मिळविलेल्या शहाणपणावर, कौशल्यावर जगणारी साधी माणसं या व्यवस्थेने विकल केली. या अभिशापित सत्तेशी संघर्ष करीत, धडका देत स्वातंत्र्य मिळवलं. स्वातंत्र्याच्या आगमनाने असंख्य भारतीयांच्या मनात नवअस्मितांचा जागर घडत राहिला. सुख-सुविधांनीमंडित जगणं घडवण्याचा विचार आकांक्षांच्या क्षितिजावरून उदयाचली आला. कृषिप्रधान व्यवस्था असणाऱ्या आपल्या देशाच्या विकासाचा पथ ग्रामीणपरिसरातूनच अपेक्षित प्रगतीच्या, साध्याच्या दिशेने जातो याची आठवण करून देत ‘खेड्यांकडे चला’ म्हणीत गांधी नावाचा महात्मा खेडी, खेड्यातील जीवनात आनंदपर्यवसायी परिवर्तन घडवू पाहत होता. त्यांचा हा विचार सोबतीला घेऊन स्वातंत्र्यानंतर गावांना गावपण देण्यासाठी वेगवेगळ्या योजना हाती घेऊन महाराष्ट्र गावांच्या विकासाकडे वळता झाला; पण योजनातून खेडी खरंच पूर्णतः बदलली का? या प्रश्नाचे उत्तर काही अद्याप मिळत नाहीये. स्वातंत्र्योत्तर काळात खूप प्रयत्नांनी खेड्यांसाठी विकासाभिमुख योजना आखल्या गेल्या. मुलभूत सुविधा, उद्योग, आरोग्य, शिक्षणादींच्या माध्यमातून रुजवल्याही. भलेही त्यांना नेत्रदीपक, सर्वंकष वगैरे असे काही नसेल; पण यश मिळाले आहे, हे वास्तव आहे. पण तरीही अजून बरेच प्रश्न शिल्लक आहेत. ज्यांची उत्तरे शोधायची राहिली आहेत.

खेडी ओस पडत असल्याचे बोलले जाते. आपण ऐकतो. प्रसंगी अनुभवतोही आहोत. खेड्यातून जगण्याच्या वाटा शोधत माणसं शहरांकडे धावत आहेत. शहराचं बकालपण वाढत आहे. खेड्यात जगताना निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरे शोधण्यासाठी बाहेर पडलेली माणसे शहरातील नव्या प्रश्नांना सामोरी जात आहेत. भाकरीसाठी चाकरी शोधत आलेली, ही माणसं उपेक्षेच्या नव्या गुंत्यात गुरफटत आहेत. खेड्यातील तगमग शहराच्या झगमगाटाकडे आकर्षित होतेय. प्रश्न सुटण्याऐवजी नवेच प्रश्न जन्माला येत आहेत. शासनस्तरावरून प्रयत्न होऊनही बेकारी, दारिद्र्य, उपासमार, अंधश्रद्धा, जातीयतेचे अभिलेख काही मिटत नाहीत. ललाटी लिहिलेल्या अशा अभिशापातून मुक्ती काही होत नाही.

जगण्याचं निर्व्याजपण शिकविणाऱ्या संत गाडगे महाराज, संत तुकडोजी महाराजांचे व्यसनमुक्तीचे प्रयत्न आदर्शरूपाने समोर असताना, व्यसनांच्या आवर्तात खेडी का अडकतायेत? एकवेळ गावात दूध मिळणार नाही; पण अपवाद सोडले तर मद्याचे मळे गावोगावी बहरलेले सापडतील. व्यसनाधीनता वाढत आहे. व्यसनांनी प्रवाहपतित झालेल्यांना प्रतिष्ठेच्या प्रांतात कसे आणता येईल? प्रबोधनाच्या परगण्यात प्रवेशित करण्यासाठी विचारांचे परगणे उभे करावे लागतील. ग्रामीण, शहरी राहणीमानातील अंतर कमी करावे लागेल. माणसांच्या जीवनातील विसंगती, तफावत दूर करून शहरांकडे वाहणारे प्रवाह उपजीविकेच्या संधी निर्माण करीत थोपवावे लागतील. काहीतरी विधायक करण्याचं स्वप्न मनात घेऊन जगणाऱ्यांच्या हाती स्वप्नपूर्तीचं आकाश आणि अवकाशही द्यावं लागेल. छोट्या-मोठ्या उद्योगांची चक्र गावातच गतिमान करावी लागतील. गतीसोबत परिसराची प्रगती घडविण्यासाठी माणसं घडवावी लागतील.

खेडी संपन्न, समृद्ध होणं आवश्यकच. गावापर्यंत रस्ते पोहचले हे चांगलंच; पण त्याच रस्त्यांनी जगण्याची साधनंही पोहोचणं गरजेचे आहे. वीज, पाणी, आरोग्य, शिक्षणासारख्या सुविधा पोहोचवताना त्याचं समन्यायी वितरण होणं आवश्यक आहे. आठ-दहा तास विजेच्या नावाने अंधार असेल, आरोग्यकेंद्रे आहेत; पण औषधं नाहीत. शाळा आहेत, शिक्षक नाहीत. शाळा, शिक्षक दोन्ही आहेत; पण विद्यार्थी नाहीत आणि हे सगळे आहेत, तर शिक्षणच नाही. अशी परिस्थिती असेल आणि साध्यासाध्या गोष्टींकरिता माणसांची अस्वस्थता वाढत चालली असेल, तर ती गावात थांबतीलच कशी? पूर्वीची गावं आज असणार नाहीत, दिसणार नाहीत, हे खरं आहे. काळाच्या ओघात जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. पूर्वीच्या मर्यादित ग्रामीण व्यवहारांना आज व्यापक स्वरूप आलंय. गाव तेथे पार आहे. पारावरील स्वारही आहेत. पण तेथून चालणारा गावाचा कारभार गावाला गावपण देणारा आहे का?

पंचायती राजव्यवस्थेने गेल्या काही दशकांमध्ये खूप सकारात्मक बदल घडविले आहेत. गावातील कालचे चिखलमातीने माखलेले रस्ते काँक्रिटचे झाले. त्यांना देखणेपण मिळाले. म्हणून माणसांच्या मनांचेही काँक्रिटीकरण होऊ द्यावे का? माणसांच्या मनाचे हळवे कोपरे सांभाळीत अधिक सक्षम बनवावे लागेल. ग्रामस्वच्छता अभियानाने गावं, गावातील रस्ते स्वच्छ केले; पण गाव घडविण्यासाठी माणसांची मनेही स्वच्छ करावी लागतील. विज्ञानतंत्रज्ञानानेमंडित सृष्टी त्यांच्या हाती देताना त्यांच्या जीवनातील आणि जगण्यातील अंधश्रद्धा, निरक्षरता, बेरोजगारी, दारिद्र्य यासारखी दुरिते दूर करावी लागतील. आदर्श गावं प्रयत्नपूर्वक घडवावी लागतील. आदर्शगाव ही संकल्पना बक्षिसांसाठी, बक्षिसांपुरती न उरता सगळीच गावं आदर्श परंपरांच्या वाटेवरून चालत राहावीत, असे काहीतरी करावे लागेल. लहानमोठ्या शेकडो गावांमधून घडलेला, वाढलेला आणि रुजलेला संपन्न विचारच सक्षम भारत घडवेल. कारण भारताची खरी ओळख खेडीच आहेत. तोच भारताचा चेहराही आहे. गरज आहे या चेहऱ्यांवर संपन्नतेच्या प्रसन्न, प्रमुदित हास्याला फुलविण्याची. हे देशातील शहरात आणि खेड्यात राहणारी एकशेवीस कोटी माणसंच फक्त करू शकतात. कारण म्हणतात ना ‘एकमेका साह्य करू...’

Aamachyaveli | आमच्यावेळी

By // No comments:
आमच्यावेळी असं नव्हतं!

शिक्षक दालनात आम्ही काही शिक्षक ऑफ तासिकेला बसलो होतो. काहीजण निवांतपणे पेपर वाचत होते. काहीचं असंच इकडच्या तिकडच्या विषयावर बोलणं सुरु होतं. बोलण्याच्या ओघात चर्चेचा प्रवाह विद्यार्थ्यांच्या वर्तनाकडे वळला. वेगवेगळ्या विचारांनी, मतप्रवाहानी चर्चेत रंग भरायला लागले. चर्चेत सहभागी होत एक शिक्षक म्हणाले, “सर, आपल्यावेळी असं काही नव्हतं! सारं कसं करड्या शिस्तीत असायचं. शाळा, शिक्षक यांचा एक धाक असायचा. आणि आता बघावं तर असं.” “अहो, हे होणारच, या मुलांना हल्ली धाक असा कुणाचा राहिलाच नाही आणि तुम्ही तसा निर्माण करायचा प्रयत्न करून तर पाहा, म्हणजे कळेल तुम्हाला काय होतं ते.”- दुसरे शिक्षक. चर्चेत सामील होत तिसरे शिक्षक म्हणाले, “खरंतर काळ बदलला तसं आपणही बदलायला हवे. पण आपण बदलायला तयार असतोच कुठे? परंपरांचा पायबंद पडला म्हणजे नवे मार्ग कसे सापडतील?” त्याचं बोलणं ऐकून पहिले शिक्षक म्हणाले, “सर, तुमचा हा आदर्शवाद सांगण्यापुरता ठीक आहे; पण प्रत्यक्ष आचरणात आणताना समोरचे प्रश्न काय असतात, हेही बघावे लागतात ना! आदर्शवादाने प्रेरित विचारांनी एखाद्या विद्यार्थ्यास- जो काहीच समजून घेण्याच्या परिस्थितीत, मनस्थितीत नाही, त्याला शिकवून बघा, म्हणजे कळेल?” शिक्षकांचं बोलणं मी ऐकत होतो. चर्चेत सहभागी होत म्हणालो, “सर, समस्या असतील, अडचणीही असतील, प्रश्न असतीलही; पण त्यासाठी शोधलेल्या उत्तरात विद्यार्थीहित असेल, तर मुलांना दंडित करणे, हाच एक अंतिम उपाय आपल्याकडे असतो का? मुलांना नीट समजावून घेतलं तर; मला नाही वाटत त्यांच्याकडून नकारात्मक काही घडेल.” “सर, हा तुमचा स्वप्नाळू आदर्शवादच ना शेवटी! अहो, या मुलांना कितीही सांगा, यांची शेपटी वाकडी ती वाकडीच.”- दुसरे शिक्षक.

मुलांच्या शिस्तीच्या, वर्तनाच्या संदर्भात चर्चा वळणं घेत पुढे सरकत असताना तासिका संपल्याची बेल झाली आणि सारे पुढील तासिकेसाठी आपापल्या वर्गावर जाण्यासाठी निघाले. तो विषय तेवढ्यावर थांबला.

पण हे सगळे आज आठवण्याचं कारण मुलांच्या शिस्तीबाबत, वर्तनाबाबत छोट्यामोठ्या तक्रारी शाळेत अधून-मधून सुरु होत्या. याला आणखी निमित्त ठरलं ३१ डिसेंबरचा दिवस. तसं पाहिलं तर इतर दिवसांसारखाच हाही दिवस; पण मुलांनी कुठूनतरी पाहिलं, ऐकलं, अनुभवलं असावं. सरणाऱ्या वर्षाला निरोप देताना सेलिब्रेशन केलं पाहिजे. कदाचित सेलिब्रेशनचे अन्य उत्कट आविष्कारही त्यांनी पहिले असणार. पण अशा पद्धतीने आपणास काही हे सेलिब्रेशन साजरं करणं शक्य नाही आणि कोणी तसं करूही देणार नाही. काय करावं म्हणून त्यांच्यात विचार झाला असेल आणि कोणातरी मनातून विचार प्रकटला असेल. साऱ्यांनी काही थोडे-थोडे पैसे काढले खिश्यातून. आणला वाद्य वाजवणारा. धरला ताल पावलांनी वाद्यांच्या ठेक्यावर. लागले नाचायला. नाचणाऱ्या त्यांच्या पावलांना येऊन मिळाली आणखी काही थिरकती पावलं. विसरले भान आजूबाजूचे. लागली आनंदाची कारंजी थुई थुई उडायला त्यांच्या मनात. सारे देहभान हरपून ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अवस्थेपर्यंत पोहचले. नाचणाऱ्या पावलांसोबत डुलत राहिली. ना कोणाची जाण अन् ना राहिलं कोणाचं भान. आपल्याच तालात रंगले.

आतामात्र त्या वाद्यांचा वर्गात त्रास होऊ लागला. सुरवातीला वाटलं असेल शहरातला कोणतातरी धार्मिक, सामाजिक कार्यक्रम. जाईल मिरवणूक थोड्यावेळाने पुढे. वर्गाच्या खिडकीतून बाहेर पाहिले. अरे, येथेतर आपलीच मुलं नाचतायेत. मुख्याध्यापक कार्यालयातून निरोप आला. सर, बघा आपली काही मुलं तिकडे दिसतायेत. आणि ती सगळी दहावीच्या वर्गातीलच आहेत. दरम्यान धावले काही शिक्षक तिकडे. धरले त्याच्यातील काहींचे बखोटे. आणले धरून कार्यालयात. केले त्यातील काहींच्या पालकांना फोन. आले त्यांचे पालक धावतच शाळेत. त्यांच्या साहसकथा ऐकून तेही बिचारे अचंबित झाले. साऱ्या प्रकारचे जाब विचारले गेले. मुलांचे चेहरे आतामात्र पाहण्यासारखे झालेले. आपलं नक्की काय चुकलं, याचं नीट आकलन त्यांना होत नव्हतं. आतापर्यंत इतरांना वाद्यांच्या तालावर नाचताना त्यांनी पाहिलं; पण त्यांना कुणी थांबवताना नाही पाहिलं. आणि आम्हालामात्र नुसतं थांबवलंच नाही, तर रागावणंही. त्यांना काही समजेना. शेवटी शालेय शिस्त, संस्कार वगैरे विषयावर शिक्षकांनी प्रबोधनपर विचार ऐकवून पाठवलं परत. गेले आपापल्या घरी.

असेच पुढचे दोनचार दिवस उलटले असतील. सराव परीक्षेचा पेपर संपल्यावर त्या दिवशी सेलिब्रेशन करणाऱ्या आणि पाहणाऱ्या मुलांमधून काही मुलं भीत भीतच आली माझ्याकडे. म्हणाली, “सर, आमचं चुकलं, आम्ही नको होतं असं करायला त्या दिवशी! सर, इतरांना नाही पण तुम्हाला म्हणून सांगतो, तुम्ही आम्हाला खूप चांगलं समजून घेतात. सर, तुम्ही शिस्तीचे कठोर असले तरी आम्हाला लेकारांसारखं वागवतात; नव्हे मित्रांसारखं समजतात. यापुढे असं नाही होणार, कधीच नाही!” त्याचं हे बोलणं ऐकून अवाक व्हायची वेळ आता माझी होती. कारण, आम्ही ते सगळं एव्हाना विसरलो होतो. अन् मुलंच ती शेवटी. त्यांनी नाही तर एन्जॉय करायचं कुणी? असं म्हणत तो विषय आमच्या शिक्षकांपुरता संपला होता. त्याचं पश्चातापदग्ध बोलणं ऐकून त्यांना म्हणालो, बाळानो! तुम्ही आनंद साजरा केला, यात तुमचं काहीच चुकलं नाही; पण तो आनंद साजरा करायचा कसा, याची पद्धतमात्र चुकली. तुम्हाला आनंद साजरा करण्याचं स्वातंत्र्य आहे; पण मला वाटतं स्वातंत्र्य आणि स्वैराचार या गोष्टी तुम्हाला पुरेश्या समजलेल्या दिसत नाहीत किंवा तुम्ही त्या समजून घेतल्या नाहीत. अरे, तुम्ही स्वैराचाराला स्वातंत्र्याची वसनं चढवायला निघालात, कसं चालेल हे असं?” असं बरंच काही काही समजावून सांगितलं. त्यांना ते आवडलं असावं. त्यांच्या चेहऱ्यावरचे क्षणापूर्वीचे अपराधीपणाचे भाव पालटले. मुलं खुलली मनावरचं ओझं कमी झाल्यासारखे वाटले. मनातला सल सैल झाला असावा. बोर्डाच्या परीक्षा फार काही दूर राहिल्या नाहीत. आतातरी अभ्यासाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या, असे सांगून पुढच्या कामाकडे वळलो.

तसं पाहता या मुलाचं असं काय चुकलं? आनंदप्राप्ती ही तर आपली उपजत प्रवृत्ती. त्यांनीही तेच तर केलं. पण त्यांची पद्धत चुकली. हा दोष नेमका कुणाचा? त्यांच्या पालकांचा, त्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा की, त्यांना शिकविणाऱ्या आम्हां शिक्षकांचा? मला वाटतं, हा दोष असेलच तर त्यांच्या वाढत्या वयाचा आहे. या वयातच मुलांना व्यवस्थित सांभाळावं लागतं ना! मग, त्यांना सांभाळणाऱ्या आम्ही साऱ्यांनी त्यांच्या उमलत्या वयास का सांभाळू नये? किशोरावस्थेतील त्यांच्या जीवनातील स्पंदने आपणास का ओळखता येऊ नयेत? या वयातील प्रचंड ऊर्जा सकारात्मक मार्गाकडे वळती केली, तर विधायकतेची शिखरं उभी राहतील. कोणातरी कवीने म्हटले आहे, ‘उठल्या सुटल्या देऊ नको मला भान वाढत्या वयाचे, वयास चुकवीत असेच आहे मला फुलायचे.’ या फुलणाऱ्या फुलांच्या गंधकोषी आपण जपल्या तर सगळ्याच नाहीत; पण बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील. कोणतीही मुलं बरीवाईट नसतात. वाईट असतो, त्यावेळी त्यांच्या मनात येणारा चुकीचा विचार. अविचारांची ही काजळी वेळीच दूर केली, तर विवेकाची दिवाळी साजरी नाही का होणार?

आपण त्यांच्याकडे कसं पाहतो, यावर ते ठरतं. माझ्या या मताला तुम्ही माझी श्रद्धा समजा की, अंधश्रद्धा किंवा स्वप्नाळू आदर्शवाद. ‘आमच्यावेळी असं नव्हतं!’ म्हणून काय होईल? काळ कोणताही असू द्या, मुलं ती मुलंच ना शेवटी! आपण त्यांना जरा समजून घेतलं, थोडं त्यांच्या वयाचं होऊन त्यांच्याशी संवाद साधला तर कदाचित या समस्यांची उत्तरेही मिळतील. यासाठी आवशकता आहे, त्यांच्याकडे पाहण्याच्या कॅलिडोस्कोपला थोडं फिरवण्याची. त्याचा कोन बदलला की, त्यातील नक्षीही बदलेल. पुढचं दिसणारं चित्रही बदलून रमणीय आकार धारण करणारं असेल. म्हणतात ना आकाशही जागोजागी रितं असतं पण कोतं कधीच नसतं, नाही का?