कारणासह कारणाशिवाय

By // No comments:
माणूस मुळात श्रद्धाशील जीव आहे हेच खरं. त्याची कशावर तरी श्रद्धा असते, हे सार्वकालिक सत्य. ती कशावर असावी, कशी असावी आणि किती असावी, याची काही नेमकी परिमाणे नसतात. पण प्रयोजने मात्र प्रत्येकाची असू शकतात. फारतर प्रत्येकाची वेगळी असतील. श्रद्धा नावाचा प्रकार केवळ आजच उदित झाला असं नाही. काल त्याच्या जगण्यात तो होता, आज आहे अन् उद्याही असणार आहे. असलंच काही वेगळं तर त्यांच्या असण्यात असेल इतकंच. माणूस आपणच आपल्या शोधात अनेक वर्षांपासून अखंड वणवण करतो आहे. काल आज आणि उद्या अशी नावे घेऊन आयुष्यात विसावलेल्या काळाच्या बिंदूना सांधण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणच आपल्याला उपसून पाहतो आहे. कोरून पाहतो आहे. म्हणून त्याला तो गवसला असं नाही. अन् कोणाला सापडला असंही नाही. म्हणून धांडोळा घेणं काही संपलं नाही. कशावरतरी विश्वास ठेवून तो वर्ततो आहे. कशावर तरी असणारा विश्वासच त्याच्या सश्रद्ध विचारांचे अमूर्त रूप नाही का? दिसत तर नाही, पण जाणवतं. कोणी निसर्ग मानतो, कोणी नियती एवढाच काय तो फरक. प्रवासाचे पथ वेगळे असले तरी विसर्जन बिंदू एकच. 

अर्थात, कोणी कोणता पर्याय निवडावा, हा त्यांचा पसंतीचा भाग. निवडलेल्या वाटेने वळती केलेली पावले मुक्कामच्या ठिकाणी निर्वेध पोहोचावीत म्हणून कदाचित श्रद्धांचा आयुष्यातील वावर आनंददायी वाटत असेल. आयुष्याचा प्रत्येक प्रहर प्रमुदित असावा म्हणून आस्थेचे ओंजळभर कवडसे वेचून आयुष्याला वेढून असणारा अंधार सगळाच संपवता नाही आला, तरी कोरभर का असेना; पण तो दूर करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. रात्रीचा काळोख दिवसभराच्या कष्टातून विराम देणारा विकल्प असला, तरी प्रकाशाने उजळून निघालेल्या पहाटेचे आकर्षण अधिक असतं. 

प्रहराच्या परिभाषा अन् प्रगतीच्या व्याख्या अवगत असतात, त्याच्या जगण्याचा प्रवाहच कुठल्यातरी श्रद्धेचे किनारे धरून वाहत असतो. श्रद्धा मग ती कोणतीही असो, ती नेमकी कशावर असावी, याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. पण सोयीचे कंगोरे मात्र असू शकतात. ते कसे असावेत, याबाबत अपेक्षांची काही आवर्तने अवश्य असू शकतात. तसे नियंत्रणाचे निकषही. 

श्रद्धा धारण करण्यासाठी प्रत्येकवेळी प्रबळ कारण असायलाच हवं असंही नसतं. कोरभर कोपरे धरून ती जगण्यात विसावलेली असते. कारणासह आयुष्यात अधिवास करून असते, तशी कारणांशिवायही वसती करून असू शकते. श्रद्धेची सूत्रे वापरून आयुष्याची प्रयोजने शोधता येतात; पण प्रत्येकवेळी त्याची अचूक उत्तरे मिळतीलच याची खात्री नाही देता येत. आस्थेच्या लहानमोठ्या पणत्या हाती घेऊन अंतरी अधिवास करून असलेल्या स्वप्नांना साकळून आणण्यासाठी पावलापुरता प्रकाश पेरण्याचा प्रयोग श्रद्धा करीत असते. 

श्रद्धेचं क्षेत्रफळ निर्धारित करणारी सुनिश्चित परिमाणे नसतात. तो प्रासंगिकतेचा परिपाक असतो. श्रद्धा काही वस्तू नाही कुठून उचलून आणायला. अथवा कोणी सांगितलं म्हणून लगेच अंगीकारायला सोपस्कारही नाही. जीवनाकडे बघण्याचे पैलू प्रत्येकाचे निराळे असतात, तसे आयुष्याकडे पाहण्याचे कोनही वेगळे. डोळस श्रद्धा त्याला दृष्टिकोन देते. तिच्याविषयी केवळ आसक्ती असून भागत नाही, तर आस्था असायला लागते. तिच्या पावलांनी डोळसपण अंगणी चालत यावं. त्यासाठी आपणच आपल्याला तपासून पाहावं लागतं. धांडोळा असतो अफाट पसाऱ्यातून उन्नत करणारं असं काही हाती लागण्याचा. खरंतर श्रद्धा एक भावजागर. भावनांच्या प्रतलावरून तो प्रवाह पुढे सरकत असतो. अंतरी अधिवास करून असलेले भाव तिला अधिक गहिरे करीत असतात एवढं मात्र खरं. ओलाव्याच्या वाटेने मुळांचा विस्तार होत राहतो, तशी ती विस्तारत राहते. त्यासाठी कुणी स्वाक्षरीचे झोकदार फराटे ओढून आज्ञांकित केलेलं परिपत्रक काढण्याची आवश्यकता नसते. 

उताराचा हात धरून पाण्याने वाहते राहण्यात एक सहजपण असतं. कळीचं फुलात रुपांतरीत होण्यात स्वाभाविकपण सामावलेलं असतं. आस्थाही अशी सहजपणे आयुष्याचं अविभाज्य अंग बनते. एखाद्या गोष्टीविषयी आपलेपण अंतरी नांदते असण्यात वावगं काही नाही. पण त्यात अखंड डोळसपण मात्र असायला हवं. 

पाहणे आणि शोधणे यात अंतराय असतं. पाहण्यात हेतू असेलच असं नाही. कारणाशिवायही ते घडू शकतं. पण शोधण्यात सुनिश्चित दृष्टीकोन असतो. त्यासाठी दृष्टी असायला लागते. डोळे सगळ्यांना असतात; पण पाहावे काय, हे मेंदूच्या आज्ञेने ठरते. मेंदूला नियंत्रित करण्यासाठी विवेकाच्या वाती अन् विचारांच्या ज्योती अनवरत तेवत्या असायला लागतात. ज्योतीचा प्रकाश जगण्यात पेरता आला की, अंधाराचे अर्थ गवसतात अन् आयुष्याचे अन्वयार्थ सापडतात. नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण 
••

सगळेच कंगोरे कळतात असं नाही

By // 1 comment:
विवक्षित विचारांनी घडलेला विवेकशील समाज निर्माण करण्यासाठी विचार पेरावे लागतात. नुसते पेरून नाही थांबता येत. त्याला आणखी पुढच्या वळणावर वळतं करावं लागतं. जाणीवपूर्वक जतन करावं लागतं. तो काही कुठला समारोह नसतो, मिरवून घेण्यासाठी केलेला. सरावाने हे घडत गेलं पाहिजे. त्यात सहजता असावी. केवळ उद्दिष्टापर्यंत पोहोचायचं म्हणून केलेली कवायत नसावी. विचार रुजवणे म्हणजे काही वृक्षारोपण समारोह नाही. आला पावसाळा की, लावली रोपे. आसपास थोडं सजगपणे पाहिलं तर वृक्षारोपण शब्दाभोवती काळाने कोरलेल्या दृश्य-अदृश्य अर्थाचे कंगोरे कळतील. 

अर्थात ते अथपासून इतिपर्यंत वास्तव असतील असं नाही अन् अवास्तव असतील असंसुद्धा नाही. काही गोष्टींचे सगळेच कंगोरे कळतात असं नाही. वृक्षारोपण हा विषयही याच कक्षेभोवती विहार करणारा. आकलनाच्या मर्यादा अन् कृतीच्या शक्यतांमध्ये तो बऱ्यापैकी गांभीर्य हरवून बसला आहे, असं कुणी म्हणत असेल तर ते फारसं वावगं ठरू नये. रोपं तर लाखोंनी लागत असतील, पण त्यातील जगतात किती? हे न उलगडणारं कोडं आहे. झाडं लावायला फार श्रम नाही, पण जगवण्यासाठी प्रचंड सायास करायला लागतात. प्रतीक्षा करायला लागते त्यांना बहराने डोलताना पाहण्यासाठी. विचारांचंही यापेक्षा वेगळं कुठे आहे. वृक्ष डोळ्यांना दिसतो, विचार कृतीतून कळतात. असला तर एवढाच फरक आहे  त्यांच्यात. मात्र उगवून येणं दोनही ठिकाणी सारखंच. केवळ वृक्षालाच नाही तर विचारांनाही पर्याप्त अवधी द्यावा लागतो, रुजण्यासाठी अन् बहरून येण्यासाठीही. 

समाज कोणताही आणि कोणत्याही परगण्यात वसती करून असुद्या. त्याला जाणीवपूर्वक घडवावा लागतो. त्याला विचारांचे अधिष्ठान द्यावे लागते. नीतिसंमत नीतिसंकेत काळाच्या पटलावर कोरावे लागतात. प्रत्येककाळी अन् प्रत्येकवेळी वर्तनातील कृतीबाबत समाजात एकमत झाले आहे, असे फार कमीवेळा दिसते. कारण एखाद्याला एखादी कृती नैतिक वाटते, ती समोरच्याला कदाचित न-नैतिक वाटू शकते. प्रत्येकजण आपल्या आकलनाच्या परिप्रेक्षात संबंधित घटनेकडे पाहत असतो. म्हणूनच नैतिक कोणते अन् न-नैतिक कोणते, याबाबत समजुतीच्या सीमारेषा तशा धूसरच असतात. त्याभोवती संदेहाचं धुकं दाटलेलं असतं. त्यांच्या धूसर असण्यामुळेच प्रत्येकजण आपापल्यापरीने एखाद्या घटनेचे अर्थ, अन्वयार्थ लाऊन मोकळा होतो. 

अर्थ चपखलपणे लावता येण्यासाठी विचार विचक्षण असणे आवश्यक असतं. अर्थात, आपल्यापरीने अर्थ लावायला कोणीही मोकळे असले, तरी एक गोष्ट उरतेच. ती म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक स्वातंत्र्य अन् त्याला असणाऱ्या विस्ताराच्या सीमा अन् विस्ताराचा परीघ सीमांकित करणारी मर्यादांची कुंपणे. स्वातंत्र्य शब्दही संदेहाचे अनेक कंगोरे घेऊन विहार करत असतो. या शब्दाने निर्देशित होणाऱ्या अर्थाच्या परिभाषाही प्रत्येकाच्या अन् प्रत्येकासाठी वेगळ्या असतात. त्यात अंगभूत अर्थाच्या सातत्यापेक्षा सोयीचे कंगोरे अधिक असतात. 

विषमतेच्या वाटा विस्तारत जाणे अन् समतेचे पथ आक्रसत जाणे अनेक प्रश्नांचं उगमस्थान असतं, हे कळतच नसेल का कुणाला की इतिहासाचे विस्मरण झालं असेल? माणसात अंतर वाढत जाणे नांदी असते कलहाची. परिस्थितीची दाहकता माणसांना सैरभैर करते. कुणी तुपाशी तर कुणी उपाशी असणे, हा माणसांच्या जगण्याचा अर्थ नाहीच होऊ शकत. परिस्थितीने पोळलेले हात परिवर्तनाचे हत्यार धरताना थरथरत नसतात. ही अस्वस्थता केवळ आक्रंदन नसते. उसवलेल्या मनातील उद्रेक, संताप सात्विकतेच्या परिभाषेत सामावत नसेलही कदाचित. शिष्टसंमत विचारांत अधिष्ठित करता येत नसेल त्याला. पण जगणंच प्रश्न होतं, तेव्हा सज्जनांनी आखून दिलेल्या चाकोऱ्या प्रत्येकवेळी सम्यक उत्तरे देतीलच असे नाही. म्हणून कधीकधी चाकोऱ्यांचं चरित्र तपासून घ्यावं लागतं. 

व्यक्तिगत स्वातंत्र्याला जीवनात काही अंगभूत अर्थ असतात. लोकशाही शासनप्रणाली अंगिकारणाऱ्या प्रदेशात तर त्यांना वादातीत महत्त्व असतं. असले वाद थोडे इकडचे, काही तिकडचे तरी असे विषय सर्वमान्य मार्गाने, सामंजस्याने, चर्चेतून निकाली काढता येतात. त्यासाठी विचारांना विश्वात्मक कल्याणाचे अर्थ अवगत असायला लागतात. नसले तर करून द्यायला लागतात. विश्वात्मक शब्द काही नवा नाही आपल्याकरिता. संत ज्ञानेश्वरांनी सुमारे सातआठशे वर्षापूर्वीच हे पसायदान आपल्या पदरी टाकलं आहे. ते केवळ पाठांतर अन् पारायणासाठी नाही. तर जगणं संकुचित करू पाहणाऱ्या संदर्भांचे परिघ पार करण्यासाठी आहे. 

व्यवस्थेच्या पसाऱ्यात वर्तताना कोणी कुणाला अधोरेखित केलं किंवा नाही केलं, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात काही बदल घडत असतात का? ते पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असं सांगता येईलही. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. मग ते वैयक्तिक असोत की सार्वत्रिक. अंतरीचे वणवे संयमाच्या राखेआड दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखायला लागते. हे व्यापक असणंच माणसांच्या मोठेपणाच्या परिभाषा अधोरेखित करीत असते. त्यांच्या प्रगतीच्या वाटा निर्मितीचे कारण असते, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••