कारणासह कारणाशिवाय

By
माणूस मुळात श्रद्धाशील जीव आहे हेच खरं. त्याची कशावर तरी श्रद्धा असते, हे सार्वकालिक सत्य. ती कशावर असावी, कशी असावी आणि किती असावी, याची काही नेमकी परिमाणे नसतात. पण प्रयोजने मात्र प्रत्येकाची असू शकतात. फारतर प्रत्येकाची वेगळी असतील. श्रद्धा नावाचा प्रकार केवळ आजच उदित झाला असं नाही. काल त्याच्या जगण्यात तो होता, आज आहे अन् उद्याही असणार आहे. असलंच काही वेगळं तर त्यांच्या असण्यात असेल इतकंच. माणूस आपणच आपल्या शोधात अनेक वर्षांपासून अखंड वणवण करतो आहे. काल आज आणि उद्या अशी नावे घेऊन आयुष्यात विसावलेल्या काळाच्या बिंदूना सांधण्याचा प्रयत्न करतो आहे. आपणच आपल्याला उपसून पाहतो आहे. कोरून पाहतो आहे. म्हणून त्याला तो गवसला असं नाही. अन् कोणाला सापडला असंही नाही. म्हणून धांडोळा घेणं काही संपलं नाही. कशावरतरी विश्वास ठेवून तो वर्ततो आहे. कशावर तरी असणारा विश्वासच त्याच्या सश्रद्ध विचारांचे अमूर्त रूप नाही का? दिसत तर नाही, पण जाणवतं. कोणी निसर्ग मानतो, कोणी नियती एवढाच काय तो फरक. प्रवासाचे पथ वेगळे असले तरी विसर्जन बिंदू एकच. 

अर्थात, कोणी कोणता पर्याय निवडावा, हा त्यांचा पसंतीचा भाग. निवडलेल्या वाटेने वळती केलेली पावले मुक्कामच्या ठिकाणी निर्वेध पोहोचावीत म्हणून कदाचित श्रद्धांचा आयुष्यातील वावर आनंददायी वाटत असेल. आयुष्याचा प्रत्येक प्रहर प्रमुदित असावा म्हणून आस्थेचे ओंजळभर कवडसे वेचून आयुष्याला वेढून असणारा अंधार सगळाच संपवता नाही आला, तरी कोरभर का असेना; पण तो दूर करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. रात्रीचा काळोख दिवसभराच्या कष्टातून विराम देणारा विकल्प असला, तरी प्रकाशाने उजळून निघालेल्या पहाटेचे आकर्षण अधिक असतं. 

प्रहराच्या परिभाषा अन् प्रगतीच्या व्याख्या अवगत असतात, त्याच्या जगण्याचा प्रवाहच कुठल्यातरी श्रद्धेचे किनारे धरून वाहत असतो. श्रद्धा मग ती कोणतीही असो, ती नेमकी कशावर असावी, याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. पण सोयीचे कंगोरे मात्र असू शकतात. ते कसे असावेत, याबाबत अपेक्षांची काही आवर्तने अवश्य असू शकतात. तसे नियंत्रणाचे निकषही. 

श्रद्धा धारण करण्यासाठी प्रत्येकवेळी प्रबळ कारण असायलाच हवं असंही नसतं. कोरभर कोपरे धरून ती जगण्यात विसावलेली असते. कारणासह आयुष्यात अधिवास करून असते, तशी कारणांशिवायही वसती करून असू शकते. श्रद्धेची सूत्रे वापरून आयुष्याची प्रयोजने शोधता येतात; पण प्रत्येकवेळी त्याची अचूक उत्तरे मिळतीलच याची खात्री नाही देता येत. आस्थेच्या लहानमोठ्या पणत्या हाती घेऊन अंतरी अधिवास करून असलेल्या स्वप्नांना साकळून आणण्यासाठी पावलापुरता प्रकाश पेरण्याचा प्रयोग श्रद्धा करीत असते. 

श्रद्धेचं क्षेत्रफळ निर्धारित करणारी सुनिश्चित परिमाणे नसतात. तो प्रासंगिकतेचा परिपाक असतो. श्रद्धा काही वस्तू नाही कुठून उचलून आणायला. अथवा कोणी सांगितलं म्हणून लगेच अंगीकारायला सोपस्कारही नाही. जीवनाकडे बघण्याचे पैलू प्रत्येकाचे निराळे असतात, तसे आयुष्याकडे पाहण्याचे कोनही वेगळे. डोळस श्रद्धा त्याला दृष्टिकोन देते. तिच्याविषयी केवळ आसक्ती असून भागत नाही, तर आस्था असायला लागते. तिच्या पावलांनी डोळसपण अंगणी चालत यावं. त्यासाठी आपणच आपल्याला तपासून पाहावं लागतं. धांडोळा असतो अफाट पसाऱ्यातून उन्नत करणारं असं काही हाती लागण्याचा. खरंतर श्रद्धा एक भावजागर. भावनांच्या प्रतलावरून तो प्रवाह पुढे सरकत असतो. अंतरी अधिवास करून असलेले भाव तिला अधिक गहिरे करीत असतात एवढं मात्र खरं. ओलाव्याच्या वाटेने मुळांचा विस्तार होत राहतो, तशी ती विस्तारत राहते. त्यासाठी कुणी स्वाक्षरीचे झोकदार फराटे ओढून आज्ञांकित केलेलं परिपत्रक काढण्याची आवश्यकता नसते. 

उताराचा हात धरून पाण्याने वाहते राहण्यात एक सहजपण असतं. कळीचं फुलात रुपांतरीत होण्यात स्वाभाविकपण सामावलेलं असतं. आस्थाही अशी सहजपणे आयुष्याचं अविभाज्य अंग बनते. एखाद्या गोष्टीविषयी आपलेपण अंतरी नांदते असण्यात वावगं काही नाही. पण त्यात अखंड डोळसपण मात्र असायला हवं. 

पाहणे आणि शोधणे यात अंतराय असतं. पाहण्यात हेतू असेलच असं नाही. कारणाशिवायही ते घडू शकतं. पण शोधण्यात सुनिश्चित दृष्टीकोन असतो. त्यासाठी दृष्टी असायला लागते. डोळे सगळ्यांना असतात; पण पाहावे काय, हे मेंदूच्या आज्ञेने ठरते. मेंदूला नियंत्रित करण्यासाठी विवेकाच्या वाती अन् विचारांच्या ज्योती अनवरत तेवत्या असायला लागतात. ज्योतीचा प्रकाश जगण्यात पेरता आला की, अंधाराचे अर्थ गवसतात अन् आयुष्याचे अन्वयार्थ सापडतात. नाही का? 
- चंद्रकांत चव्हाण 
••

0 comments:

Post a Comment