Jaate | जाते

By // 9 comments:
जातं:

‘घट्या पाट्या टाकी ल्या…!’ अशी साद घालीत रस्त्यावरून आवाज ऐकू येतो आहे. घरासमोरील आंब्याच्या झाडाखाली दुपारच्या निवांतवेळी वाचन करीत बसलो होतो. आवाजाची आवर्तने सुरु. वाढत्या वयाच्या साऱ्या खुणा देहावर धारण करून दारासमोरून एक बाई चालली आहे; घरातलं कुणी जातं, पाटा, वरवंटा टाकून घेतोय का, या अपेक्षेने ती परत-परत साद घालते आहे. कष्टाने रापलेला तिचा देह वार्धक्याच्या वाटेने आयुष्याच्या उतरणीवर लागलेला. अंगावर नववारी लुगडं तेही वापरून जवळपास विटलेलं. एका हातात लहानसा हातोडा. डोक्यावर धडूत्याचं बोचकं. त्यात छिन्नी वगैरे सारखी आणखी काही जुजबी औजारे. माणसांनी गजबजलेल्या वस्तीतून साद घालीत ती बाई चालते आहे. साद घालणाऱ्या आवाजात कुणी आपणास हाक देईल, याची आस लागलेली. रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपापल्या वैभवाला मिरवीत तोऱ्यात उभ्या असलेल्या इमारतीसमोरील रस्त्यावरून तिची थकलेली पावलं आयुष्याच्या चुकलेल्या गणिताचं ओझं दिमतीला घेऊन पुढे सरकत आहेत. चेहऱ्यावरील सुरकुत्यांमध्ये जगण्याच्या प्रवासातील सारी प्रश्नचिन्हे एकवटलेली. सायासप्रयासाने हाती लागणाऱ्या कामातून जीवनकलहाच्या प्रश्नांची उत्तरे ती शोधू पाहते आहे. प्लॉट संस्कृतीच्या तुकड्यांमध्ये विभागलेल्या जगण्यावर मध्यमवर्गीय प्रतिष्ठेची झूल पांघरलेलं कोणतंही दार किलकिलं होत नाही, की कुठूनही थांबा! म्हणून आवाज काही तिच्या कानी येत नाही. येईलच कसा? जवळपास साऱ्यांनीच स्वयंखुशीने आपापल्या घराचे कोंडवाडे करून घेतलेले. पैसा मोजून आणलेल्या आभासी सुखांची त्यात आरास मांडलेली. घरांना विज्ञाननिर्मित साधनांनी वेढलेलं. सुखाच्या मृगजळी सहवासात माणसांनी स्वतःला सीमित करून घेतलेलं. स्वयंघोषित प्रगतीच्या चौकटी उभ्या करून सजवलेल्या बंदिस्त घरात पारंपरिक साधनांना आहेच कुठे जागा. आता आहेत कुठे घरात जाते, पाटे-वरवंटे शिल्लक? असलेच तर तेही अपवाद. जगणं धावत्या चाकावर स्वार झालेलं. प्रगतीच्या प्रचंड वेगात हे संथ लयीतलं जगणं हरवले. त्यासोबत पारंपरिक प्रवाहांचे संदर्भसुद्धा.

साद घालीत जाणाऱ्या आवाजाने पुस्तकाच्या पानातून लक्ष विचलित झालं. भूतकाळातील एकेक आठवणी नकळत मनाभोवती फेर धरू लागल्या. फार काही जास्त नाही, पण पंधरा-वीस वर्षे मागे जावून पाहिले, तर गावात तेव्हा असे एकही घर नसेल, ज्यात ग्रामपरंपरेशी नाते सांगणाऱ्या जाते, पाटा-वरवंटा वगैरे सारख्या वस्तू नसतील. या वस्तूंशिवाय जगण्याची कुणी कल्पनाही करू शकत नसे. अशा कितीतरी गोष्टींची मुळे ग्रामसंस्कृतीच्या मातीत घट्ट रुजलेली होती. या वस्तू दैनंदिन जगण्याचा अविभाज्य भाग होत्या. या वस्तूंच्या निर्मितीसोबत जुळलेला आणि त्यांला उदरनिर्वाहचे साधन मानणारा माणसांचा एक वर्गही होता. दगडापासून पाटा-वरवंटा, जाते तयार करणारे, गुळगुळीत झाल्यावर टाकून देणारे त्यातील एक. त्यांच्या जगण्याच्या वाटा निर्धारित करणाऱ्या या वस्तू काही त्यांच्या पदरी ऐहिक श्रीमंतीचं दान देणाऱ्या नसल्या, तरी कष्ट करून प्रामाणिक जगण्याला प्रतिष्ठेचे प्रांगण उपलब्ध करून देणाऱ्या होत्या. श्रम करून माणसाला सन्मानाने जीवनयापन करता येते, याचा वस्तुपाठ होत्या.

गावागावातून आपला फाटका आणि भटका संसार पाठीवर घेऊन फिरत राहणारी ही माणसे अनिकेत असली, तरी अनेकांच्या निकेतनात यांनी तयार करून दिलेल्या वस्तूंमुळे कोणतातरी कोपरा सजलेला असायचा. दळताना विशिष्ट लयीत ऐकू येणारी जात्यांची घर-घर शब्दांचा साज लेवून कोण्या मानिनीच्या सुरेल आवाजाची सोबत करीत झऱ्यासारखी झुळझुळ वाहत रहायची. दळण करताना कोण्या ललनेच्या ओठी आलेले शब्द जीवनाचं गाणं बनून प्रकटायचे. राग, लोभ, प्रीती, स्नेह, दुःख, वेदना सोबत घेऊन जात्यातून निघणाऱ्या पिठासोबत ते उमलून यायचे. मनात घर करून वसतीला असलेला आनंद, व्यथा, वेदना मनाच्या गाभाऱ्यातून ओठी यायच्या. शब्दांना सूर सापडायचे, सुरांना गाणे आणि गाण्याला जगणे. शब्द कधी आनंदाची पखरण करणारे, तर कधी वेदनांनी विव्हळणारे. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी त्यात आस्थेचे रंग भरले जायचे. कधी काळजाला चिरे पाडणारा, कधी सासर-माहेर द्वंद्वात अडकलेला, कधी सणावाराला माहेरच्या माणसाची प्रतीक्षा करणारा, कधी आईबापाने दिल्याघरी कष्टाचं जगणं जगूनही त्यांना आयुष्य मागणारा आवाज हृदयातून उमलून यायचा.

रात्रीच्या अंधाराला छेद देत प्रकाशाची पखरण करणारा विजेच्या दिव्यांचा लख्ख उजेड गावाच्या सोबतीला तेव्हा नव्हताच. रात्र काय अन् सकाळ काय कंदील, चिमण्यांची सोबत करीत उजेड हलक्या पावलांनी अंगणात उतरायचा. चिमणीच्या, दिव्यांच्या मिणमिणत्या उजेडात सकाळच्या प्रहरी जात्याला सश्रद्ध अंतःकरणाने हात जोडून बायाबापड्या दळण दळायला बसायच्या. वजनदार जातं फिरवताना कस लागायचा. दळताना बारीक पीठ यावं म्हणून जात्यावर दगडाचे वजनदार पेंड ठेवले जायचे. एकट्याने हे ओढणे अवघड असायचं म्हणून दोघीजणी समोर बसून जातं फिरवत असायच्या. सरावाने त्यांचे हात गहू, ज्वारी, बाजरी त्याच्या मुखी मूठ-मूठ ओतीत राहायच्या. त्याभोवती पांढऱ्याशुभ्र पिठाचं गोल खळं पसरलेलं. हलक्या हाताने ते डब्यात, टोपलीत भरलं जायचं. माय, मावशी, आजी, आत्या कुणीतरी जातं बराच वेळ ओढीत राहायच्या. चेहऱ्यावरील घाम लुगड्याच्या पदराने टिपत दळण दळायची लगबग चाललेली असायची. घरातील कामांची झुंबड उडालेली असायची. कामं आवरून शेताचा रस्ता धरायचा असे. घरातलं कुणी तेथूनच पीठ घेऊन चुलीवर भाकरी थापत बसलेलं असायचं. त्यातही एक घाई झालेली असायची, कारण गडी-माणसांना शेतात जातांना भाकरीचं गठुडं सोबत न्यायला लागायचं. 

घराच्या ओसरीत, विशिष्ट जागी ही जाती मांडलेली असायची. त्या जागांनाही स्वच्छतेचा गंध असायचा. जात्याभोवातीच्या जागेला शेणाने सारवणे, मातीने पोतारणे घडायचे. स्वच्छतेची काळजी जाणीवपूर्वक घेतली जायची. कुण्या रसिकमनाच्या कल्पकतेने त्याच्याभोवती गेरू, चुना वगैरे तत्सम साहित्यानिशी रांगोळीसारखे रेखांकन केलेलं असायचं. घरातल्या बायांचा जीव जात्यात गुंतलेला असायचा. सकाळी दळण दळण्याचे, दही घुसळण्याचे सरमिसळ आवाज कानी पडायचे. गायी-म्हशींचे दूध गोठ्याकडून चुलीकडे आणले जायचे. पातेल्यात ओतले जायचे. चुलीतील धुराने अख्खं घर भरलेलं असायचं. बिछान्यातून उठून आम्ही मुलं सरळ जात्याकडे पळत जायचो. पारोश्या अंगाने येथे का आलास, म्हणून हमखास बोलणं ऐकावं लागायचं. कोळशाचं बारीक वाटलेलं असेल, नाहीतर चुलीत जाळलेल्या गोवऱ्यांच्या राखेचं मंजन कोणीतरी जबरदस्तीने हातात कोंबून जायचे. ते हाती घेऊन दात घासत तेथेच बसायचो. दात घासण्याकडे तसेही फारसे लक्षच नसायचं. नजर जात्याभोवती जमा झालेल्या पिठाकडे. मऊशार पिठावर बोटांनी रेघोट्या ओढण्यात काय आनंद वाटायचा कोणास माहीत? पण पांढऱ्याशुभ्र मऊ पिठाला परत-परत स्पर्श करावासा वाटायचा. आई ओरडत राहायची. फारच झालं की, पाठीत धपाटे घातले जायचे. रट्टा बसला की, भोकाड पसरीत बसायचो. आजी, आजोबा असे कुणीतरी आईवर ओरडायचे. आजी तेथून उचलून आपल्यासोबत न्यायची. एव्हाना दात मंजनाने घासले आहेत, याचा विसर पडलेला असायचा. चुलीवर तापायला ठेवलेलं दूध ग्लासात ओतून हाती यायचे. रडतच ते ओठी लावले जायचे.

जातं बहुतेक सगळ्यांच्या आस्थेचा विषय. उदरभरणाचे पहिलं काम त्याच्यामुळेच; म्हणूनच की काय, त्याबाबत मनात एक श्रद्धा असायची. खेळतांना आम्हा पोरासोरांचा पाय नकळत जात्याला लागला की, कुणीतरी पाय पडायला सांगायचे. असे का करत असावेत, याचा उलगडा काही तेव्हा होत नसायचा. पण आज कळतं, की ही आस्था अतीव श्रद्धेतून निर्माण झालेली असायची. रोजच्या जगण्याचे अनेक धागे फिरणाऱ्या जात्याच्या वर्तुळाभोवती गुंफलेले असायचे. जात्यातून केवळ भाकारींसाठी पीठच दळले जात नसे, तर उडीद, मूग, तूर, हरभरा आदी भरडून डाळीही केल्या जायच्या. अर्थात यासाठी आणखी लहानमोठ्या आकाराची जाती असायची. पीठ दळण्यासाठी वेगळे, धान्य भरडण्यासाठी आणखी वेगळे. दळताना त्यांना विशिष्ट लयीत ओढायचे कौशल्यसुद्धा निराळे. हे सगळं सरावाने आत्मसात केलेलं, शिकलेलं. कुणाकडे कधी जातं टाकलेलं नसलं, खराब झालेलं असलं, की शेजारची कुणीतरी सायजा, बायजा दळण घेऊन हक्काने शेजारच्या घरी जायच्या. कुणाला त्यात अवघडल्यासारखे काही वाटत नसायचे. प्रायव्हसी वगैरे सारखे स्वतःची स्पेस शोधणारे आधुनिक प्रकार नसायचे. जगण्याच्या नात्यात स्वकेंद्रित जगण्याला प्रमाण मानणारी ‘स्पेस’ नावाची पोकळी नसायची. आस्था, आपुलकी, स्नेह अंगभूत गोडवा घेऊन साठलेला असायचा. त्यासोबत आपलेपणाचा हक्कही गृहीत असायचा.

मनातले सल, व्यथा, वेदनांना दळण दळताना एकमेकींशी बोलून वाट मोकळी करून दिली जायची. नव्यानेच सासरी आलेल्या मुलीच्या घरकामांची परीक्षा जात्यावरील दळण दळताना व्हायची. काही कामे तिला सफाईदारपणे करता येत नसतील, तर युक्तीच्या चार गोष्टी हक्काने सांगितल्या जायच्या. जावा, नणंदा, वहिन्या एकमेकींची थट्टा करीत राहायच्या. अशावेळी कोणी नवपरिणत वधू त्यांचं सहज सावज असायचं. मनातलं गुज एकमेकींना सांगितलं जायचं. ऐकलं जायचं. दुःखाने भरलेले डोळे आसवांना मोकळी वाट करून देत जात्यासोबत मुक्त वाहायचे. तेवढ्याच आस्थेने त्यांना संयमाचे बांध घातले जायचे. समजुतीच्या चार गोष्टी शिकवल्या जायच्या. स्त्रीचा जन्मच असा. वेदनांचा सहवास टाळूनही न टळणारा, म्हणून परिस्थितीत टिकून राहण्याची नवी उमेद, नवी स्वप्ने मनाच्या मातीत रुजवली जायची. सासरी होणाऱ्या जाचास सामोरे जाणाऱ्या सुनांना धीर द्यायचा. बाईचा जन्मच कष्ट उपसण्यासाठी, म्हणून त्या नवख्या पोरीची समजूत काढून दुःखावर फुंकर घातली जायची. आपलं जगणंही जात्यासारखं परिस्थितीभोवती गरगर फिरणारं, म्हणून मनात आसक्तीचे दीप लावले जायचे. आपलेपणाचा ओलावा घेऊन वाहणाऱ्या गोडव्याने, आस्थेने ओथंबलेल्या आश्वस्त शब्दांनी घडणाऱ्या संवादातून खचलेल्या जिवाला धीर यायचा. कधी थट्टामस्करीला उधान आलेलं असायचं. तोंडाला पदर लाऊन ओठी आलेलं हसू कोंडलं जायचं.

आज हे सगळं बदललं. कालचक्राची सोबत करीत, प्रगतीचे पंख लेऊन जग बरेच पुढे निघून आले आहे. गावात पिठाच्या गिरण्या आल्या. जात्यावर केले जाणारे दळण-कांडण भूतकाळात जावून विसावले. आतातर घराघरातून लहान चक्क्यांनी आपलं आसन मांडलं आहे. जात्यांची थकवणारी घरघर संपली. मिक्सर, ग्राईंडर, प्रोसेसर भन्नाट वेगात फिरत आहेत. त्यांच्या कर्कश आवाजात विशिष्ट लयीत चालणारी जात्यांची घरघर संपली. त्या आवाजाचा गोडवाही हरवला. त्यासोबत ओठी येणाऱ्या ओव्या, गाणी इतिहास जमा झाली. बायाबापड्यांच्या मनातील सुख-दुःख बोलून हलकं करायचं हक्काचं ठिकाण हरवलं. बोलणं थांबलं. मनातील अंधाऱ्या गाभाऱ्यात भावना आस्थेचा ओलावा शोधत आहेत. प्रगतीच्या पंख लेऊन विहार करणारी माणसं जगण्याच्या नव्या परिमाणात बंदिस्त झाली आणि मनेही आपल्याभोवती तयार करून घेतलेल्या वर्तुळात कोंडली गेली.

गावात विजेच्या दिव्यांचा लखलखाट होण्याआधी डीझेल इंजिनवर चालणाऱ्या चक्क्या आल्या. त्यावेळी त्यांचीही एक गम्मत वाटत असायची. हाती हॅण्डल घेऊन गरगरा फिरवीत इंजीन सुरु केलं जायचे. सुरु झालेल्या इंजीनमधून निघणारा धूर छतापर्यंत पाईप टाकून बाहेर फेकला जायचा. बऱ्याच ठिकाणी औषधाच्या इंजेक्शनची रिकामी बाटली विशिष्ट कोनात पाईपाच्या तोंडावर बांधलेली असायची. इंजीन सुरु झाले की, त्यातून बाहेर फेकल्या जाणाऱ्या हवेने शिट्टीसारखा आवाज ऐकू यायचा. त्या आवाजाने चक्की सुरु झाली आहे, हे गावाला कळायचे. त्यासाठी ओरडून सांगायची गरज नसायची. ज्याच्या मालकीची चक्की असायची असा एखादाच असायचा. त्याची गावातील ओळखही चक्कीवाला म्हणूनच. पुढे सरावाने त्यांना तेच नाव चिकटायचं. अजूनही माझ्या गावात पहिली पिठाची गिरणी सुरु केली, त्या घराची ओळख चक्कीवाला अशीच आहे. आतातर गावात दोन-तीन चक्क्या आल्या. गावात पहिली पिठाची गिरणी सुरु करणाऱ्यांकडे आता ती राहिली नाही, तरी त्यांची चक्कीवाला ही ओळख काही पुसली जात नाही.

पिठाच्या गिरण्या आल्या आणि जात्यांची गरजच संपली. मिक्सर, ग्राईंडरने पाटा-वरवंटा दैनंदिन जगण्यातून हद्दपार केला. त्यासोबत घटे (जातं) पाटे (पाटा-वरवंटा) तयार करणारे, टाकून देणारेही. ही सगळी माणसं गावगाड्यातून हळूहळू उणे होत गेली. विज्ञानतंत्रज्ञानाने माणसांच्या जगण्याची नवी ओळख निर्माण केली. पण परंपरागत कौशल्यावर जगणाऱ्यांची ओळख हरवली. व्यवस्थेच्या चौकटीतून परिस्थितीने त्यांना हद्दपार केले. नियतीने त्यांच्या ललाटी जगण्यासाठी दाही दिशा वणवण करायला लावणारी भटकंती लेखांकित केली. कुणी म्हणेल गरजच काय या साधनांची आता, एवढी सगळी विज्ञाननिर्मित साधने आणि त्यांच्यासोबत चालत येणारी सुखे हाती असताना. या सगळ्या पारंपरिक वस्तूंची गरज कदाचित संपली असेलही. विज्ञानाने सुखं देणारी साधने माणसांच्या हाती दिली; म्हणून तो सर्वार्थाने सुखी झाला आहे का? या प्रश्नाचं उत्तर काही असो. कदाचित काही सुखे हाती लागलीही असतील; पण अनेकांना व्यवस्थेतून विस्थापित करून दारोदारी भटकायला लावणारं जगणं ज्यांच्या जीवनात आलं, त्याचं काय?

रस्त्यावरून ओळीने उभ्या असलेल्या ढाबा नामक संस्कृतीला सध्या बऱ्यापैकी बरकत आलेली दिसते. येथे येऊन जिभेचे चोचले पुरवण्याच्या छंदाला हल्ली खवैय्येगिरी, भोजन रसिकता वगैरे असे काही संबोधले, समजले जाते. काही ढाब्यांवर जेवण चुलीवर तयार करून दिले जात असल्याच्या जाहिराती डिजिटल पाट्यांवर वळणदार अक्षरांनी कोरलेल्या दिसतात. सामिष स्वयंपाकासाठी येथे वापरला जाणारा मसाला पाट्यावरवंट्यावर वाटून वापरला जात असल्याचं आश्वस्त केलेलं असतं. लोकांना त्या चवीची मोहिनी पडतेही. जिभेचे चोचले पुरे करता येतात. पण कष्टाच्या जगण्याला आनंदयोग मानून; या वस्तू जीव ओतून तयार करणाऱ्यांचे काय? प्राप्त परिस्थितीलाच जीवनयोग समजून जगणाऱ्यांचं काय? हे प्रश्न कदाचित कोणाच्या मनात येत असतील, नसतील माहीत नाही; पण ही माणसे विज्ञानप्रणित साधनांनी निर्माण केलेल्या सुखांच्या वर्तुळातून बाहेर फेकली गेली. या लोकांनी परंपरागत कौशल्ये वापरून तयार केलेल्या साधनांना चव निर्मितीचे श्रेय द्यायचे आणि हे काम करणाऱ्यांना सोयीस्कर विसरायचे याला काय म्हणावे?

जाते, पाटा-वरवंट्याने कधीकाळी परिसरात श्रमसंस्कार रुजवले, त्यांचं काय? ही साधने केवळ प्रासंगिक गरजपूर्तीची साधने नव्हती, तर जगण्याचं अनिवार्य अंग होती. अजूनही आठवते एखाद्या घरी लग्नकार्य असले की, पहिली खरेदी केरसुणी, माठ, सूप आदी वस्तूंची असायची. वधू-वराच्या अंगाला लागणारी हळद जात्यावरच दळली जायची. आज इव्हेंट मॅनेजमेंटच्या जमान्यातील बेगडी चमक-धमकमध्ये कदाचित या सगळ्यांची आवश्यकता उरली नसेल आणि हे करायला कोणाकडे तेवढा वेळही नसेलही. पण परंपरेचा बंध तुटला तो तुटलाच, त्याला परत सांधणे अवघड आहे. अशा अनेक गोष्टी आपल्या संस्कृतीच्या पात्रातून वाहताना प्रगतीच्या प्रवाहात हरवल्या. जाते त्यातीलच एक. नुसते जातेच नाही हरवले, तर त्यावर दळताना ओठी येणाऱ्या गाण्यांचे सूरही संपले आणि सोबत सांस्कृतिक अंगाने चालत येणारे संदर्भसुद्धा.

कधीतरी चुकून पाटा-वरवंटा, जाते टाकून देण्यासाठी साद घालणारा आवाज कानी येतो. पण त्या आवाजातला आत्मविश्वासही आता हरवल्यासारखा वाटतो. कोणी प्रतिसाद देईल का? या शंकेतून निर्मित संदेह घेऊन केविलवाणा झाल्यासारखा ऐकू येतो. तो ऐकून मनाच्या गाभाऱ्यात अंग आकसून बसलेल्या स्मृतींची पाने सळसळायला लागतात. एकेक आठवणी जाग्या होतात. ग्रामीण संस्कृतीचे सांस्कृतिकबंध निर्माण करणारे स्वयंपूर्ण चित्र नजरेसमोरून सरकून जाते. मनःपटलावर उमटलेल्या प्रतिमांनी क्षणभर अंतर्यामी अस्वस्थता भरून येते. पण मी यासाठी काय करू शकतो? काहीच नाही, कारण मीसुद्धा विज्ञाननिर्मित संस्कृतीने निर्माण केलेल्या प्रगतीच्या वर्तुळात फिरणारा आणि त्या गतीलाच प्रगती समजणारा मळलेल्या वाटेवरचा पथिक. प्रवास करताना मुक्कामाचे कोणतेही नवे ठिकाण शोधू न शकणारा. फारफारतर यानिमित्ताने मनाच्या गाभाऱ्यात बंदिस्त आठवणी हात धरून धूसर झालेल्या काळाच्या सीमेवर आणून उभ्या करतात. भूतकाळ जागा होतो. आपलं असं काही निसटलेलं हाती लागल्यासारखे वाटते. पण माझ्यात, माझ्या शब्दांत कालचक्राला उलट फिरवण्याइतकी ताकद आहेच कुठे? तेवढी पात्रता असायला मी काही असामान्य कोटीतला कोणी नाही. विश्वाच्या पसाऱ्यात आहेच किती जागा माझ्या अस्तित्वाला. परिस्थितीच्या परिघाभोवती घडणाऱ्या परिवलनाला प्रगती समजणाऱ्या अनेकातला मीही एक. काळाच्या प्रवाहाला वेगळे वळण देणारा एखादा युगप्रवर्तक विद्यमानकाळी इहतली असेल का? या प्रश्नाचे उत्तर शोधूनही हाती काही न लागणारा. असणे संभव नाही, अशी स्वतःची समजूत काढून घेणारा. कारण विज्ञानप्रणित साधनांनी हाती लागलेल्या स्वयंघोषित सुखांची उंची वाढत जाते, तेव्हा संस्कृतीने निर्माण केलेल्या साध्याशा साधनांनी गाठलेली प्रगती संपते. प्रगतीला परिस्थितीचे पायबंद पडतात तेथे नवे भव्य, दिव्य घडण्याची शक्यता उरतेच किती? अर्थात या वर्गाने असेच पारंपरिकतेच्या चौकटीत अभावात जगावे असे चुकुनही वाटत नाही, पण यांचे जगणं उध्वस्त होताना जगण्याची नवी प्रयोजने, विज्ञानप्रणित प्रगत साधने यांच्या हाती देण्याचे उत्तरदायित्त्व आपले आहे, असे प्रगतीच्या पंखांवर स्वार झालेल्या माणसांनी मानायला नको का? चुकून कधीतरी एखाद्यावेळी परिस्थितीच्या शुष्क होत जाणाऱ्या प्रवाहाच्या पात्रातून वाहत येणारा असा आवाज कानी येतो. काही वर्षांनी तोही असण्याची शक्यता नाही. जातं, पाटा-वरवंटा काय असतो, ते पुढच्या पिढ्यांना चित्रातून दाखवावे लागेल. कदाचित तेव्हा ते यालाच क्लासिक वगैरे असं काही म्हणतील का? माहीत नाही; पण जगण्याच्या वेगात आपण आणखी काय काय हरवणार आहोत, कोणास माहीत?