वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं.
दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन, वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या. कंगाल होऊन गेल्यावर गतकाळातील ऐश्वर्य आठवणाऱ्या अगतिक माणसासारख्या निस्तेज चेहरा घेऊन उभ्या असलेल्या. उजळणारा दिवस कफल्लकपण घेऊन येणारा अन् मावळणारा पदरी कंगालपण पेरून जाणारा. भार पेलून पेलून खोडाचा थकलेला खांदा, तोही विसर्जनाच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला.
प्रमादाच्या पथावर पडलेली पावले पराभवाचं शल्य अंतरी गोंदवून जातात. यशापयशामागे प्रासंगिक प्रमाद निमित्त ठरत असले, तरी पराभवाचे अध्याय लेखांकित करायला ते एकच कारण पुरेसे असते असंही नाही. निमित्ते म्हणा किंवा प्रासंगिकता म्हणा, परिस्थिती म्हणा अथवा आणखी काही; ती काहीही असू शकतात, नाही असे नाही. ती एकेकटी चालत आलेली असतील अथवा आपणच आवतन देवून आणलेली. ती नियतीने निर्धारित केलेली असतील, निसर्गनिर्मित असतील अथवा आणखी काही. त्यांचे असणे-नसणे परिस्थितीचा परिपाक असू शकतो.
प्रमादांचं परिमार्जन करता येत असलं तरी प्रत्येक प्रमादाला पर्याय नसतो. कधी कधी परिस्थितीच असं काही जाळं विणते की, कोणत्याही कोपऱ्यातून कुठलीही पायवाट दिसत नाही, ना कोणती पळवाट. ना कुठला कवडसा दिसतो आसपास असलेल्या अंधाराला छेदत प्रवासाची वाट दाखवणारा. प्रायश्चित्त हाच एकमेव परिपाक असतो काहीं प्रमादांना. काहींपासून पलायनाचा पर्याय असला तरी प्रत्येकवेळी तो पर्याप्त असेलच असंही नाही.
पुढ्यात पडलेल्या परिस्थितीसोबत पळता येईलच असं नाही. कधी कधी परिस्थितीच माणसांची अशी काही कोंडी करते की, कुंपणांच्या पलीकडे आणखी एक जग आहे आणि तेथे अनेक शक्यता आहेत हेच आठवत नाही. आठवलं तरी अवलंब करायला मन धजत नाही. कच खाणे वगैरे असं काही म्हणतात, ते हेच. कुणी याला परिस्थितीशरण अगतिकता वगैरे म्हणतील. असेलही तसं, पण माणसांची खरी पारख होते पुढ्यात पेरलेल्या प्रसंगांशी दोन हात करण्यात. मग माणूस म्हणून माणसाने माणसांच्या केलेल्या व्याख्या काही असूद्या.
वर्तमान कसा असावा अथवा नसावा, हे निश्चित करण्यासाठी पदरी पडलेल्या काळाच्या तुकड्याचे अन्वयार्थ लावण्याइतकं सुज्ञपण अंतरी धारण करता यायला हवं. ते आलं की, काळाची गणिते सोडवण्यासाठी आवश्यक असणारी परिमाणे गवसतात. पण याचा अर्थ असाही नाही की, उत्तरांपर्यंत पोहचण्यासाठी वापरलेली सगळीच सूत्रे समोर मांडलेल्या समीकरणांची उकल करतात. गुंते सोडवणाऱ्या अर्थांची उकल करण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्रयत्नपूर्वक अवगत करायला लागतात. ती अभ्यासाने आकळतात. सरावाने सख्य साधता येतं त्याच्याशी.
अर्थात, आयुष्याला सामोरे जातांना सगळंच काही पर्याप्त असेल तेच अन् तेवढेच घडेल, अशी अपेक्षा कोणी ठेवत नसलं तरी धवल असं काही पदरी पडावं, ही कामना अंतरी अधिवास करून असतेच ना! भावनांच्या प्रवाहात स्वतःला सामावून घेता आलं की, बहरण्याचे एकेक अर्थ कळत जातात. आपलेपणाचा ओलावा अंतरी अधिवास करून असला की, नात्यांचे अन्वय आकळत जातात. मनात भावनांचं गाव नांदतं असलं की, आपणच आपल्याला नव्याने उलगडत जातो. पण परिस्थितीच्या आघातांनी भोवती नांदणारे परगणेच ओसाड पडले असतील तर... परिस्थिती परिवर्तनाच्या प्रतीक्षेशिवाय माणूस करूच काय शकतो?
काळ तसाही काही कोणाचा सखा नसतो. ना कोणाचा सोयरा. त्याचं सख्य पुढे पळणाऱ्या क्षणाशी. त्याचा हात धरून, तो धावत असतो. त्याच्या पावलांशी जुळवून घेता येतं त्यांना गतीच्या व्याख्या अन् प्रगतीच्या परिभाषा नाही समजून सांगायला लागत. त्याच्याशी संवाद करता आला, ते पुढच्या वळणावर विसावतात. त्याला प्रतिसाद नाही देता आला, ते परिस्थितीच्या पटलाआड जातात. खरं हेच आहे की, विसंवादी असणाऱ्यांवर काळच विस्मृतीच्या वाकळीं घालतो, नाही का?
-चंद्रकांत चव्हाण
••