संदेहाच्या परिघाभोवती

By // 1 comment:
नियती, नियंता, निसर्ग वगैरे गोष्टींना काही अंगभूत अर्थ असतो का? समजा असलाच तर त्याचे कंगोरे सगळ्यांना खरंच कळतात का की, केवळ आस्थेचे किनारे धरून सरकणे असते ते. की अनुमानाच्या आधाराने वाहणे? समजा नसलाच काही अर्थ, तर त्या नाकारण्यामागे काही आखीव कारणे असतात का? खरंतर काही गोष्टी शब्दांत नेमक्या नाही कोंडता येत अन् वाक्यात मांडता. त्या जाणीव अन् नेणिवेच्या सीमारेषांवर रेंगाळत असतात. अर्थात, या अन् अशा शब्दांना काही आशयघन अर्थ आहे की नाही, हे स्वीकारणं ज्याच्या-त्याच्या आकलनाचा जेवढा भाग आहे, त्याहून काकणभर अधिक आस्थेचा असतो. नियतीच्या नियंत्रणावर विश्वास आहे, ते नियंत्याच्या अस्तित्वाला आपलं मानतात. नाही ते याचं श्रेय निसर्गाच्या नियत व्यवहाराच्या पदरी पेरतात. याबाबत जवळपास सगळेच आपल्या विचारांच्या वाती पेटवून पावलापुरताका असेना प्रकाश पेरत प्रवासाचे पथ उजळू पाहतात. सभोवती नांदणारे विचार अन् असणारे सगळेच विषय काही कोणी कोरून दिलेले किनारे धरून सरळ पुढे सरकत नसतात. काही संदेहाच्या परिघाभोवतीही भ्रमण करत असतात. काही किंतु, परंतुही त्याच परिघात नांदते असतात.

नियती म्हणा की, नियंता किंवा निसर्ग अथवा आणखी काही. त्यामुळे कृतीत खूप मोठी तफावत तयार होते असंही नाही. कुणी नियती प्रमाण म्हणतात, कुणी नियंता, कुणी निसर्ग. असलाच काय फरक तर आपापल्या बिंदूंवर उभं राहून पाहण्याचा. नियती, दैव वगैरे गोष्टी असण्यावर प्रगाढ श्रद्धा असणारे अगणित आहेत. किंबहुना आहे मानणाऱ्यांचीच संख्या अधिक आहे. तसं निसर्ग सगळंकाही असल्याचे सांगणारेही संख्येने कमी नाहीत. कुठला तरी कोपरा आपला म्हटला की, त्यासोबत त्याच्या असण्या-नसण्याचे कंगोरेही कळायला हवेत. पण कुठली तरी एकच बाजू आपली म्हटलं की, विस्ताराची वर्तुळे आक्रसत जातात. एकदाका परीघ संकुचित व्हायला लागले की, क्षितिजे धुक्यात हरवतात. कुठल्यातरी अनामिकाच्या हातात आयुष्याचे अर्थ सुपूर्द केले की, मुक्तीचा पथ प्रशस्त होतो असा विचार करणाऱ्यांचं ते भागधेय बनतं. ज्यांना विश्वाचे व्यवहार निसर्गाच्या नियंत्रण कक्षेत विहार करताना दिसतात, ते त्याचा ताल आणि तोल आयुष्य अर्थपूर्ण करण्याचे प्रमाण मानतात. अनामिकाचे अस्तित्व मान्य नाही म्हणणारे अन्य विकल्प पाहतात. 

कोणी कोणत्या गोष्टींना अधोरेखित करावं, हा शेवटी भावनांचा भाग असतो. विचारांना, भूमिकांना दोलायमान करणारे अनेक प्रसंग आयुष्यात येतात. साध्यासरळ जगण्याला कधी इकडे, कधी तिकडे भिरकवतात. वावटळीत सापडलेल्या पाचोळ्यागत आयुष्य गरगरत राहते. ना दिशा, ना रस्ता, ना मुक्कामाचं ठिकाण. वारा नेईल ती दिशा अन् थांबेल ते ठिकाण. सैरभैर जगण्याला कुठला तरी आधार हवा असतो. कुणाला माणसात तो मिळतो. कुणाला अंतरी अधिवास करून असणाऱ्या अनामिक आकृतीमध्ये आपलेपण सापडतं. कोणाला तो कुठे मिळतो, हे महत्त्वाचं नाही. तो आहे ही भावनाच अधिक सुखावणारी असते, नाही का? 

आयुष्याच्या पटावर पहुडलेल्या वाटेने प्रवास करताना अनपेक्षित व्यवधाने समोर उभी राहतात. ती आहेत म्हणून पळून जाणं हा काही पर्याय असू शकत नाही. आस्थेची पणती पेटवून पावलापुरता प्रकाश पेरत काही माणसे चालत राहतात. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून वातीला आबाधित अन् तिच्या ज्योतीला सुरक्षित राखण्यासाठी श्रद्धेचा पदर पुढयात ओढून धरतात. काही कोसळतात, काही कोलमडतात. काही उसवतात, काही विखरतात. म्हणून सगळेच उखडतात असं नाही. काही भिडतात परिस्थितीला. समोर येऊन दोन हात करतात संकटांशी, ध्वस्त झालो तरी माघारी न वळण्याची तयारी करून. 

आसपास नांदणाऱ्या परिस्थितीचं सम्यक भान असलं की, नेणिवेच्या कोशात कोंडलेल्या सुरवंटाला आकांक्षांचे पंख येऊ लागतात. जगण्याला वेढून असणाऱ्या जाणिवांच्या परिघाभोवती आपलेपण नांदते असले की, आयुष्याला आनंदाची अभिधाने आकळतात. ती कुठून उसनी नाही आणता येत. कुणाच्या आशीर्वादाने नाही मिळवता येत. नेणिवेकडून जाणिवेकडे होणारा प्रवास आपणच आपल्याला नव्याने गवसणं असतं. आपण कोण, या प्रश्नाच्या उत्तरात माणसाच्या प्रगतीचा प्रवास सामावलेला आहे. तसा त्याच्या श्रद्धांचा इतिहासही. माणूस फार बलदंड प्राणी नाही. निसर्गाने सोबत दिलेल्या मर्यादा घेऊन तो जगतो आहे. निसर्गाच्या अफाटपणासमोर त्याचं अस्तित्व नगण्यच. त्याचं असं यकश्चित असणंच अंतरी श्रद्धा पेरून जात असेल का? 

आपल्या ओंजळभर अस्तित्वाला अबाधित राखण्याची सहजवृत्ती प्रत्येक जीव धारण करून असतो. स्व सुरक्षित राखण्यासाठी आयुष्य केवढा आटापिटा करायला लावतं. केवढ्या परीक्षा पुढयात मांडून ठेवलेल्या असतात. निसर्गाने पदरी पेरलेले श्वास टवटवीत राखण्यासाठी केवढी यातायात करतो जीव. वाघाच्या मुखी पडलेल्या हरिणाला क्षणक्षणांनी क्षीण होत जाणाऱ्या अन् देहाचा निरोप घेणाऱ्या श्वासाचं मोल कळतं. वादळाच्या एका आवर्तात हरवण्याचे सगळे संदर्भ साकळलेले असतात. भूकंपाच्या हादऱ्यांनी मातीशी जखडून असलेल्या मुळांची महती कळते. हे आकळणे आपणच आपल्याला पारखून पाहणे असतं, नाही का?

- चंद्रकांत चव्हाण
**

एक किंतु अधिवास करून असतोच

By // 1 comment:
व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती समाज अन् अपेक्षांच्या परिघाभोवती समाजाचे विचार प्रदक्षिणा करीत असतात. आणि या सगळ्यांसोबत माणसांचं आयुष्य परिवलन करीत असतं. भूगोलात गतीचे, विज्ञानात प्रगतीचे अर्थ काही असोत, तेथल्या गती प्रगतीला नियमांचे काही निकष असतील. नियम निर्धारित करणाऱ्या काही व्याख्या असतीलही. पण आयुष्याला व्याख्यांच्या चौकटीत ठाकून ठोकून नाही बसवता येत. बसवता आलं असतं आवश्यकतेनुसार, तर कशाला एवढी व्यंग दिसली असती आसपास. 

एक खरंय की, त्याच्या आकृत्या करता नाही आल्या, तरी मनाजोगते आकार देण्याचे विकल्प उपलब्ध असतात. प्रश्न फक्त एवढाच की, कोणी कोणत्या तुकड्यांना जोडत देखणा कोलाज करायचा. आयुष्याचे किनारे धरून वाहणाऱ्या प्रत्येक  गोष्टीला, निदान स्वतःपुरते असले तरी किमान काही अर्थ असतात. हे खरं असलं तरी एक सत्य फारश्या गांभीर्याने लक्षात घेतलं जात नाही ते म्हणजे, आयुष्याला वेढून असणाऱ्या सगळ्याच आवश्यकतांच्या पदरी प्रयोजने पेरता नाही येत. कधी कधी प्रासंगिकताही प्रबल असतात. अशावेळी प्रयोजनांचा प्रवास डोळसपणे समजून घेता यायला हवा. जगण्याच्या वाटेवर प्रयोजने आवश्यक असली अन् आपल्या असण्याला प्रगतीच्या वळणाकडे नेणारी असली, तरी त्याच्या पसाऱ्यात आयुष्य हरवून जाऊ नये. 

व्यवस्थेने कोरलेले किनारे धरून वाहताना अनेक गोष्टींचं आपल्या अंगणी आगमन होतं. यातल्या सगळ्याच गोष्टी काही आवतन देवून आणलेल्या नसतात. आगंतुकासारख्या अनपेक्षितपणे आयुष्यात येऊन विसावतात काही. त्यांच्या वेढ्यातून मुक्तीसाठी पलायनाचा पर्याय असला आपल्याकडे, तरी प्रत्येकवेळी तो वापरता येतोच असं नाही. परिस्थितीने पुढयात मांडलेल्या सारीपटावर आयुष्याच्या सोंगट्या सरकवत पलीकडचे किनारे गाठावे लागतात. आसपास अगणित घटना घडत असतात. याचा अर्थ सगळ्याच काही अंतरी आनंदाची अभिधाने कोरणाऱ्या नसतात. परिस्थितीमुळे पदरी पडलेल्या म्हणा किंवा कुणी पायघड्या टाकून आणलेल्या सगळ्याच काही उन्नत करणाऱ्या नसतात. काही आभाळाशी गुज करीत आपणच आपल्या प्रेमात पडणाऱ्या असतात, तशा अधःपतनाच्या आवर्तात भिरकावणाऱ्याही असतातच. 

आपल्या ओंजळीत येऊन पडलेल्या किती गोष्टीचं सम्यक आकलन असतं आपल्याला? समजणाऱ्या सगळ्याच गोष्टी काही सहज, सुलभ नसतात. आणि न समजणाऱ्या सुगम असतात असंही नाही. अर्थांचे काही स्पष्ट-अस्पष्ट कंगोरे त्यांना असतात, आशयाच्या काही अज्ञात जागा असतात, तसा परिस्थितीचा प्रासंगिक पैसही असतोच. काही विषयच मुळात असे असतात की, अस्पष्ट का असेना, त्यांच्याबाबत अंतरी द्वैत नांदतं असतं. द्वैत निर्देशित करणारी रेषा कदाचित नीट दिसत नसेल एवढेच. अशावेळी नेमकी भूमिका कोणती घ्यावी, याबाबत एक किंतु अंतर्यामी अधिवास करून असतो. बरं हे काही आजच घडतंय असंही नाही. काळाचे किनारे धरून हा संदेह वाहतोच आहे. किती कालावधी लोटला असेल या संभ्रमावस्थेला, ते काळालाही आता स्मरत नसेल. 

हो आणि नाही यांच्या सीमा जोडणाऱ्या रेषेवर एक संदेह सतत नांदता असतो. जिवांच्या जगण्याची निसर्गदत्त प्रेरणा आहे ती. इकडे वळावं की, तिकडे पळावं, अशी काहीशी दोलायमान स्थिती असते. तराजूच्या दोनही पारड्यात पडणारं वजन सारखं असलं की, स्थिर असण्याचं अन्य प्रयोजन नसतं. पण दुसऱ्या भागात थोडं अधिक केलं की, तो तिकडे कलतो. माणसांच्या जगण्याबाबतही असंच काहीसं असतं. आयुष्य ठरलेल्या चाकोऱ्या धरून प्रवास करणं नसतं की, वाटा-वळणे टाळून मार्गक्रमण करणं. आलीया भोगाशी... म्हणत प्राप्त परिस्थितीसमोर शरणांगती स्वीकारून ठिकाणे गाठणंही नसतं. तर आपणच आपला शोध घेणं असतं. हा धांडोळा घेताना आपल्याला काय हवं, हे समजण्याइतपत शहाणपण आपल्या विचारात नांदतं असावं.  

राव असो अथवा रंक, प्रत्येकाचा प्रवास ठरलेला असतो. फरक एवढाच की, कोणाची क्षितिजे दूरपर्यंत विस्तारलेली असतात. काहींची पावलापुरती. परिस्थितीने पेरलेल्या वाटेने पावले पडत असतात अन् मन स्वप्नांच्या मागे पळत असतं. इच्छा असो नसो चाकोऱ्यांशी सख्य साधावं लागतं. थांबला तो संपला वगैरे म्हणणंही कदाचित याच भावनेचा परिपाक. 

पळणं काहींना आयुष्याची अनिवार्यता वाटते. काहींना कर्तव्य. पुढयात पडलेले प्रसंग काहींना दैव वाटतात. काहींना परिस्थितीने घेतलेली परीक्षा. काहींना नियंत्याच्या संकेत सूत्राने चालणारे. काहींना नियतीनिर्धारित अन् नियंत्रित खेळणे वाटतो. नशीब माणसांशी सतत खेळत असल्याचा त्यांना विश्वास असतो. त्यांच्या दृष्टीने पराधीन आहे पुत्र मानवाचा, हेच सत्य असतं. सीमित अर्थाने हे खरंय की, इहतली माणसांइतका परावलंबी जीव अन्य कोणी नसावा. तरीही प्रयासांच्या परिभाषा प्रत्येकाच्या पृथक असतात. परिस्थितीशी धडका देण्याची प्रयोजने सगळ्यांची सारखी कशी असतील? 
चंद्रकांत चव्हाण