टीका आणि प्रशंसा

By // No comments:

टीका आणि प्रशंसा यातील अंतर दोन टोकाचे असते. परस्पर विरुद्ध बिंदूंवर त्यांचा अधिवास असतो, हे वास्तव नाकारता नाही येत अन् याबाबत संदेह असण्याचे संयुक्तिक कारणही नाही. त्या आपल्या विचारांच्या अन् जगण्याच्या दोन बाजू असतात. एखाद्याने कुठल्याशा विषयावर, व्यक्तीवर, व्यवस्थेवर नकारात्मक टिपणी केली, म्हणून तो काही तसाच नसतो. नाही केली म्हणून खूप नितळ वगैरे असतो, असंही नाही. कदाचित ते अभिनिवेश वगैरेही असू शकतात अन् अभिनिवेश अभ्यासातून येतात असंही नसतं. तो तात्कालिक भावनांचा आवेग असू शकतो अथवा त्याकडे बघण्याच्या प्रासंगिक परिमाणांचा परिपाक.

विचार अन् भावना एकत्र नांदत्या नसतात, असं नाही. त्यांचं सख्य सौंदर्याशी असतं. सुंदरतेला परिमाणांच्या पट्ट्यां लावून नाही मोजता येत. ते पाहणाऱ्याच्या नजरेत असतं. नितळ नजरेला निखळ दिसतं. मोजता येतं ते मर्यादांच्या कुंपणात बंदिस्त झालेलं असतं. सगळीच वर्तुळे काही सीमांकित नाही करता येत. विचार हे असे एक वर्तुळ आहे, ज्याचा परीघ परिभाषेभोवती प्रदक्षिणा नाही करत. त्याचं भ्रमण नव्या परिभाषा लेखांकित करतं. विचारांच्या वर्तुळात विहार करणाऱ्याला विसंगतीचे अर्थ अवगत असतात अन् वैगुण्यांसोबत विसावलेले विसंगतीचे विश्वही. वैचारिक चर्चेच्या वर्तुळातून बाहेर पडणे. उगीच आगपाखड करून एखाद्याच्या माथी खापर फोडणे, याचा अर्थ आपणही अर्धाच विचार करतो आहोत, असा नाही का होत? विचारांचा प्रतिवाद विचारांनी होणे, हे आपल्या वैचारिक प्रगल्भतेचे परिमाण असते अन् आपल्या प्रज्ञेचा परिणत असण्याचा परिपाक.

प्रतिवादाच्या परिभाषा पर्याप्त परीघ घेऊन प्रदक्षिणा न करता स्वतःभोवती परिवलन करीत असतील, तर विचारांना त्यांचं आभाळ गवसेल कसं? वाद-संवाद, खंडन-मंडन निकोपपणे करता येणे अवघड नसते. फक्त नजरेला थोडं दूरचं क्षितिज बघता यायला हवं. मुद्द्यांना मुद्देसूद मार्गाने नेता येणे संतुलितपणाचे व्यवच्छेदक लक्षण असते. केवळ आणि केवळ माझीच मते ग्राह्य आणि संग्राह्य असं नसतं.

प्रश्न कुठून कसे निर्माण व्हावेत, याच्या काही व्याख्या नसतात. ते का निर्माण झालेत, याची उत्तरे असतीलच असेही नाही. कुठल्याशा अभिनिवेशातून निर्मित प्रश्न विचारांचे परीघ सीमांकित करतात. प्रदक्षिणा असतात त्या संकुचित वर्तुळांभोवती घडणाऱ्या. खरंतर प्रवादांचाही प्रतिवाद करता येतो. फक्त वादप्रवादांच्या पाठीमागे असणाऱ्या विचारांची वलये तेवढी समजून घेता यावीत. विचार परिवर्तनीय असतात. वाहत्या विचारांना नितळपण लाभते. पाणी साचले की कुजते. विचार तुंबले की दूषित होतात, म्हणून त्यांचं वाहत राहणं महत्त्वाचं. विचारांची वर्तुळे विस्तारत जातात तसे अभिनिवेशाचे अर्थ आकळत जातात. विचार विस्ताराचे विश्व विसरतात, तेव्हा अभिनिवेशाना अनकालीय अर्थ प्राप्त होतात.

अभिनिवेश कुठून जन्माला येतील याची काही सूत्रे नसतात. त्यांचे साचे मात्र संकुचित विचारांतून घडवता येतात. ते वैयक्तिक असतील अथवा सामूहिकही असू शकतात. त्यांना देशप्रदेशाच्या सीमा असतीलच असे नाही. त्यांचा अधिवास सर्वत्र असू शकतो. कधी ते आगंतुकपणे चालत येतात. कधी त्यांना आवतन देऊन बोलावलेलं असतं. अभिनिवेशांच्या असण्याला समर्थनाचे टॅग लावता येतात. त्यांना विषयाच्या मर्यादा नसतात. ते कोणत्या कारणांनी प्रबळ ठरतील याचे आडाखे नाही बांधता येत. त्यांच्या वैयक्तिक असण्यात माज असतोच, पण सामूहिक असण्याला उन्माद चढतो. वंशीय, धर्मीय अभिनिवेशांनी विश्वात खूप मोठे कलह घडवले आहेत.

माणसाला संघर्ष काही नवे नाहीत. पण प्रत्येकवेळी त्यामागे समर्थनाची नवी प्रयोजने पेरली जातात. हे काही आज घडतंय असंही नाही. विश्वातील सगळ्याच प्रदेशात यावर खूप मोठं मंथन घडलं आहे. चर्चेच्या माध्यमातून समाज ढवळून निघाला आहे. ब्रुनोला जिवंत जाळलं गेलंय, सॉक्रेटिसला विषाचा प्याला घ्यावा लागला. सॉक्रेटिसला शिष्यांच्या मदतीने पलायनाचे पर्याय उपलब्ध होते, पण त्याने सत्याच्या प्रतिष्ठापनेसाठी त्या पथावरून घडणारा प्रवास नाकारला. मी पलायन करणे म्हणजे सत्याचा मार्ग नाकारून स्वार्थासाठी संकुचित होणे असा होतो अन् हे मला मान्य नाही म्हणण्याइतकं प्रगल्भपण त्याच्याकडे होतं.

वाद कुठे नाहीत? वादांना निर्विवादपणे सामोरे जाता यावे. ते विचारांच्या कक्षेत विहार करणारे असावेत. विचारांनी विचारांचे दिवे प्रज्वलित करावेत. त्याच्या प्रकाशात आयुष्य वाचावे. जगणं वेचावे, कृतीत विचार पेरावेत. यासारखा चांगला विचार आणखी कोणता असू शकतो? आपले विचार रास्त असतील, तर कोणीतरी स्वीकारेलच. नसतील कोणाला मान्य, तो नाकारेल. ते स्वीकारावेत असा आग्रह नको अन् नाकारलेत म्हणून आकस नको. आयुष्याकडे बघायचे प्रत्येकाचे काही पैलू असतात. त्यांची परीक्षा त्यानेच घ्यावी. तपासून पाहावं स्वतःच स्वतःला. शोध घ्यावा आपणच आपला. हे सुयोग्य आहे असं म्हणणं अयोग्य असेल, तर त्याला नाकारण्याचा एखाद्याचा अधिकारही योग्यच.

आयुष्याचे अर्थ शोधताना कधीतरी अनपेक्षित काही समोर येतं अन् आपणच आपल्याला खरवडून काढायला भाग पडतं. पृष्ठभागावर साचलेले धुळीचे कण थोडे बाजूला सारता आले की, दृश्य प्रतिमाने अधिक नितळ होतात, नाही का? हे असं काही असतंच आसपास. म्हटलंतर वास्तव अन् नाहीच मानायचं तर अवास्तवसुद्धा. स्वीकाराचा ना आग्रह, ना नकाराचे दुःख. ना कोणता अभिनिवेश, ना उपदेश, ना सल्ला. असं काहीसं जगण्यात रुजवता आलं की, आयुष्य फार काही अवघड गणित नाही राहत. खरंतर वास्तव हेही आहे की, सगळीच गणिते सुघड नसतात. म्हणून ती सोडवायची नसतात का? उत्तरांच्या बिंदूवर पोहचण्यासाठी मधल्या पायऱ्या गाळून नाही टाकता येत. हवं असणारं आपलं काही सहजपणे सापडतं, काही सुटतं, तर काही निसटतं. हवं ते आणि आहे ते, सदासर्वकाळ एकाच ठिकाणी मुक्कामाला कसे असेल?

प्रसंग अन् परिणाम पाहून पर्याप्तपणे व्यक्त होता यायला हवं. खरंतर व्यक्त होणे माणसाचे मन अन् विचारांना चेतन ठेवणारी गोष्ट आहे. चेहरा सजवून देखणा वगैरे होत असला, म्हणून सुंदरतेची परिमाणे नाही मोजता येत त्याने. प्रसन्नतेचा परिमल वाऱ्याशी सख्य साधतो तेव्हाच गंध अनुभूतीचा अर्थ बनतो. प्रमुदितपणाच्या परिभाषा सहजपणे काळपटावर अंकित नाही करता येत. आनंद अंतरी नांदता असला की, चैतन्य चेहऱ्यावर विलसते. आयुष्यातून वाहते, जगण्यातून गवसते. त्यासाठी सीमांकित असल्या तरी, आनंदाच्या संकल्पना ज्ञात असायला लागतात.

काही गोष्टी संस्कृतीचे संचित असते. ते सगळेच सुंदर असते अन् एकजात सगळेच वाईट वगैरे असते, असं नाही. ते समाजमनाचे तीर धरून वाहत येते. मनावर शेकडो वर्षांची चढलेली पुटे धुवायला थोडा अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. वळणे अनेक असतात. बांध घालावे लागतात. सुरवातीस त्यांची उंची मोठी नसते. ती सावकाश वाढवावी लागते. हे होईल, कारण रूढी जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच, नाही का?

संक्रमणाचं स्वप्नं पाहणाऱ्या डोळ्यांना सहकार्याच्या चिमूटभर मातीचंही मोल माहीत असतं. सहकार्याला कशाचीही उपमा देता नाही येत, फक्त त्याचे उपमेय अन् उपमान आपल्याला होता यायला हवं. पण आहे ते विसरून, मिळालं ते नाकारून; कशाशी तरी तुलना करण्याचा मोह अनावर झाला की, आयुष्याचे अन्वयार्थ अधिक अवघड होतात, नाही का?
••

किंतु

By // No comments:

आयुष्याचे प्रवाह काही सरळ रेषेत वाहत नसतात, की त्याचे ठरलेले उतारही नसतात, मिळाली दिशा की तिकडून वाहायला. प्रवासातल्या नेमक्या कोणत्या वाटा आपल्या, हे ठरवताना काही पाहिलेलं, काही साहिलेलं, काही अनुभवलेलं सोबत घेऊन चालणं घडतं. निवडीला पर्याय असले, तरी हे किंवा ते हा गुंता असतोच. अर्थात याबाबत मते आहेत, मतांतरे आहेत, वाद, प्रतिवाद, प्रवाद आहेत. ते काही आजच उद्भवले आहेत असे नाही. विचारभिन्नतेतून येणारे तात्विक वाद नसावेत, असे नाही. त्यावर चर्चा, चिंतन, मंथन घडणे विचारांच्या सुस्पष्टतेसाठी आवश्यकच.

संशोधनाच्या अनुषंगाने उत्खनन करणे अभ्यासकांचे काम. सामान्यांचा या विषयाबाबतचा वकुब पाहताना एक नेहमीच जाणवते, त्यांची मते त्यांच्या आकलनाच्या मर्यादांनी अधोरेखित झालेली असतात. बऱ्याचदा त्यात संभ्रमच अधिक असल्याचं दिसतं. अर्थात, त्यांच्याकरिता हा विषय एक तर भक्तीचा असतो किंवा अपार प्रीतीचा. विषय काही असला, म्हणून तो काही लगेचच आयुष्याच्या वर्तुळात अधिष्ठित होत नाही किंवा जगण्याचे प्रवाह तात्काळ दिशा बदलून घेत नाही. फारतर आस्थेचे, भक्तीचे तीर धरून वाहत राहतो किंवा दुर्लक्षाच्या वाटेने वळतो एवढेच.

अनुकूल-प्रतिकूल बाजू प्रत्येक विचारामागे असतात, हे कसे नाकारता येईल? असलाच काही फरक, तर आहे आणि नाही या दोन बिंदूंच्या मध्ये घडणाऱ्या प्रवासातील रेषेवर असतो. तसेही काळाच्या अफाट पटलावर उभ्या असणाऱ्या साऱ्याच कहाण्या काही समान नसतात. प्रत्येक जण आपआपल्या परिघांना घेऊन आपणच आखून घेतलेल्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करत राहतो. ते प्रत्येकाला आकळतातच असे नाही. शेकडो स्वप्ने मनात वसतीला असतात. ती असू नयेत असे नाही, पण साऱ्या आकांक्षा पूर्ण होतीलच याची शाश्वती देता येते का? तरीही माणूस भटकत राहतोच ना, सुखाच्या लहानमोठ्या तुकड्यांना जमा करत. अंतर्यामी एक ओली आस बांधून असतोच, उद्याची प्रतीक्षा करीत. ती आहे म्हणूनच आयुष्याचे नव्याने अर्थ शोधत राहातो.

जगण्याचेही ऋतू असतात? असावेत. सर्वकाळ सुखांचा राबता काही कोणाच्या आयुष्यात अधिवास करून नसतो. हा सावल्यांचा खेळ असतोच सुरू सतत. फरक असलाच तर त्यांच्या कारणांत असतो. ती प्रत्येकाची आणि प्रत्येकासाठी वेगळी असतात. आनंदतीर्थे सगळ्यांच्या अंतरी कोरलेले असतात. त्याची शिल्पे साकारतातच असं नाही. कधी ओबडधोबड दगडालाही शेंदूर फासून देवत्व मिळतं. याचा अर्थ त्यात सगळंच सामावलेलं असतं असं नाही. कुणीतरी त्यात देवत्व शोधतो. कुठल्या तरी आकाराला साकार करून माणूस त्यात आपल्या आस्था शोधत राहतो. आयुष्याचेही थोड्याफार फरकाने असेच नाही का? अर्थात शेंदूर काही सहज लागत नाही. काहीच असे असतात. काहींनी स्वतःच लावून घेतलेला असतो. शेंदूर लागल्याने जगणं आनंदी होतंच असं नाही. आनंदाचा लेप आयुष्यावर लावता यायला हवा.

पानगळ ज्यांना समजून घेता येते, त्यांना बहरण्याचे अर्थ उलगडतात. सुखांचा अखंड वर्षाव आयुष्यात कधी होत असतो? आयुष्यात उन्हाळे येणारच नाहीत असे नाही. म्हणूनच संत तुकोबांना ‘सुख पाहता जवापाडे…’ लिहिणं जमून आलं असेल का? समर्थ रामदासांना ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे…’, हे मनाला विचारावेसे वाटले असेल का?

सुखांची काही सूत्रे असतात? असती तर साऱ्यांनी नसती का आत्मसात केली. ती नसतातच. शोधावी लागतात. नसतील गवसत, तर स्वतःच तयार करून घ्यावी लागतात. सुख आणि समाधानाच्या परिभाषा वेगळ्या असतात. पद, पैसा, प्रतिष्ठा वगैरेत कुणाला सुखाचा शोध लागतो. पण समाधान? ते असेलच असे नाही. काहींकडे सगळं काही असतं, मग तरीही त्यांना आणखी काही का हवं असतं? सुखाची परिभाषा सतत बदलत असते. समाधानाची व्याख्या विस्तारत असते. तिला विराम नाही. ऋतू अंगणी येतात जातात. साद देत राहतात. त्याचे सूर कळले की, जगणं गाणं बनतं. हे सहज साकार होतं असं नाही. त्यासाठी आपणच आपल्याला नव्याने तपासून पहावे लागते. नाही का?
••