Aatmaswar | आत्मस्वर

By // No comments:
गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर दीपिकाच्या ‘माय चॉइस’ व्हिडीओची चर्चा सुरु आहे. अडीच मिनिटाच्या या व्हिडीओत वादग्रस्त काही आहे की नाही, हे ज्याचे-त्याचे व्यक्तिगत मत आहे. ही ध्वनिचित्रफित पाहून काहींनी त्यावर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली. स्त्रीमुक्तीचा आणि सक्षमीकरणाचा आवाज मुखरित केला म्हणून जशी प्रशंशा झाली, तसे प्रतिकूल मते विरोधाचे आवाज घेऊन प्रकटले. भारतीय स्त्रीच्या वर्तनाचे हे वास्तव नसल्याचा निर्वाळा काहींनी दिला, तर काहींनी चित्रफितीतील न आवडणाऱ्या विधानांना विरोध दर्शविला. मतमतांरांचे शब्दबंबाळ ओझे सोबत घेऊन त्यावर चर्चा घडत राहिल्या. अर्थात, अशा विषयावर वैचारिक वादसंवाद उभे राहतील, मतमतांतरे घडतील याची जाणीव प्रदर्शनाआधी संबंधिताना नसेल, असे नाही. समाजात समर्थनाचे सूर असतात, तसे विरोधाचे आवाजसुद्धा असतात. लोकशाही व्यवस्थेचे एक चांगले असते. यात प्रत्येकाला आपापल्यापरीने व्यक्त होता येते. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हात धरून मनातील भावनांना व्यक्त करीत विचार मांडता येतात.

या निमित्ताने जगण्यातील वैचारिक मोकळेपण सोबत घेत आलेला विचार आस्थेचा आत्मस्वर बनून प्रकटला. परंपरांचा पायबंद पडलेल्या व्यवस्थेत स्वतःचे सुख शोधण्याचा हक्क नियतीने आम्हालाही दिला आहे. बंधनांच्या शृंखलांतून मुक्त होण्याकरिता मदतीच्या कोण्या हाताची आवश्यकता असण्याचे प्रयोजन उरले नसल्याचा निर्वाळा व्हिडिओतील प्रातिनिधिक आवाजातून दिला गेला. हे सगळं पाहून काहींच्या मनात संदेह निर्माण झाले. हा आवाज मुक्तीचा, स्वैरआचरणाचा की विचारातील सैलावलेपणाचा म्हणून प्रश्नांकित चर्चा ऐकायला आल्या. स्त्रीस्वातंत्र्यास अनुकूल असणारे समर्थनाच्या शब्दांना घेऊन उभे राहिले, तर हा वर्तनातील स्वैराचार असून, असं वागणं नैतिकतेच्या कोणत्याच चौकटीत बसू शकत नाही, म्हणून टीकेची झोडही उठली. मतस्वातंत्र्य असणाऱ्या व्यवस्थेत वाद, संवाद, प्रवाद असू शकतात, ते तसे असावेतही. सगळ्यांना सगळ्याच गोष्टी आवडतील किंवा आवडाव्यात, असे सहसा घडत नाही. एखाद्या विचारात स्वीकारण्याइतपत चांगले काही असते, तसे नाकारण्यासारखेही काही असू शकते. म्हणून प्रवादांना कायम ठेवून आवडणाऱ्या, न आवडणाऱ्या गोष्टींचे समर्थन, खंडन करण्यात कोणाला संदेह असण्याचं कारण नाही. प्रत्येकाला आपलं मत अभिव्यक्त करता येते. तसेच या चित्रफितीतील विचारांबाबतही असू शकते.

स्त्री संस्कृतीचे रमणीय रूप असते, असे म्हणतात. तिच्या सामर्थ्याचा सगळ्याच संस्कृतींनी मुक्तकंठाने गौरव केल्याचे आपण पाहतो. एकीकडे कर्तृत्वाच्या गाथा गाऊन, तिच्या क्षमतांवर शिक्कामोर्तब करायचे. ‘यत्र नार्यस्तु पूजन्ते’ म्हणायचे, तर दुसऱ्या बाजूला ‘न स्त्री स्वातंत्र्यम् अर्हति’ म्हणून वागायचे. स्त्रियांबाबत अशा विचारांनी वागणे घडत असल्याचे पाहतो. ते सरावाचं झालं असल्याने, त्याविषयी कोणाला फार काही वाटतही नाही. पुरुषपणाला अनुकूल असणाऱ्या जगाचा हा चेहरा काही नवा नाही. जगात कोणत्याही भूमीवर स्त्रीविषयक विचार जवळपास सारखेच असल्याचे सामाजशास्त्राच्या परिशीलनाने कळते. पुरुषधार्जिण्या विचारांनी वर्तणाऱ्या जगात पुरुषप्रधानता समाजाच्या अंगवळणी पडलेली असल्याने, नेहमीच स्त्रीला पुरुषांच्या नजरेतून पाहिले जाते. स्त्री असणे हीच एक चौकट सांस्कृतिक प्रवाहाने शेकडोवर्षापासून निर्माण करून घेतली आहे. या चौकटीना भक्कम करण्यासाठी तिच्या स्त्रीसुलभवर्तनाचं कोंदण दिलं गेलं. तिचं त्याग, समर्पणादी गुणांनीमंडित असणे आयुष्य सार्थकी लागणं समजलं गेलं. सेवापरायण असणं कुटुंबासाठी अनिवार्य आवश्यकता ठरवली गेली. मातृत्वाने तिच्या स्त्रीत्वाला पूर्णतेचे नवे आयाम मिळतात, असा समज आजही कायम आहे. या सगळ्यांसोबत तिच्याठायी विनम्रता असणं कुलीन संस्कारांचे द्योतक ठरवलं गेलं. तिने काहीही केलं, तरी तिच्या आयुष्याची सगळी प्रयोजने पुरुषाशी निगडित कशी असतील, याची पद्धतशीर काळजी समाजाचे नीतिनियम तयार करणाऱ्यांनी करून ठेवलेली आहे.

पुरुषीसत्तेतून निर्मित मानसिकतेच्या विरोधात आवाज बुलंद करीत कोण्या लावण्यवतीने माझं मन माझं आहे. माझं शरीरही माझंच असल्याने त्याच्यावर कोणी हक्क सांगू शकत नाही, म्हणून समाजाला प्रश्न विचारला असेल, तर त्यात चिंता करण्यासारखे असे काय आहे? व्यवस्थेत आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी तिने परंपरेच्या चौकटीना ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यात प्रश्नांकित मुद्रेने पाहण्यासारखे काही नाही. माझं अस्तित्व, माझं शरीर माझंच असल्याने, ते सजवायचं की, तसंच असू द्यायचं, कोणास समर्पित व्हायचं अथवा नाही, ही वैयक्तिक निवड असल्याचं तिचं सांगणं आव्हान वाटणारच. समाजाची रचनाच स्त्रीला दुय्यमस्थानी ठेवून झाली असेल, तर प्रतिकाराचे स्वातंत्र्यकांक्षी आवाज वातावरणात किती काळ टिकतील? या आत्ममुक्तीच्या स्वरांचा आवाज क्षीण करण्याची व्यवस्था संस्कृतीने आधीच करून घेतलेली असल्याने, प्रतिकाराचा प्रतिध्वनी फार दूरवर पोहचणे अवघड असते.

शेकडोवर्षापासून परवशतेचे पाश व्यक्तित्वाभोवती जखडले असतील, तेथे मुक्तश्वास वाट्यास येणे अवघड असते. स्त्रीचे वस्तूकरण करून तिच्यावर मालकी सांगणारा विचार परंपरेने रुजवला असल्याने त्याचा पीळ लवकर सैल होणे अवघड आहे. पुरुषाची मालकी सांगणाऱ्या अनेक निशाण्या; आजही स्त्री स्वच्छेने म्हणा किंवा परंपरेने दिल्यात म्हणून मिरवते आहे. गळ्यातील मंगळसूत्र, माथ्यावरील कुंकू, पायातील जोडवे, साखळ्या, हातातील बांगड्या- ज्यांना सौभाग्यालंकार, या गोंडस नावाने मंडित करून ही आभूषणे वापरणे, हीच स्त्री म्हणून जगण्याची सम्यक पद्धत असल्याचे तिच्या मनात रुजवले जात असेल आणि तसेच घडविले जात असेल, तर प्रतिकाराची मूळं रुजण्यासाठी अवकाश मिळतेच किती? बंधने स्वीकारावीत किंवा नाकारावीत, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, असे विचारणारे आवाज समाजाचे लक्ष वेधण्यासाठी आवश्यक असतात. पण ही बंधनंच अभिमानाने मिरवण्यात धन्यता मानली जात असेल, तर त्यात प्रतीकात्मकता उरतेच किती? स्त्रियांसाठी विवाहित असण्याची ही ओळखचिन्हे, मग पुरुषांना अशी काही चिन्हे, तो विवाहित असण्याबाबत का नको? असा प्रश्न व्यवस्थेला विचारण्याचे धाडस कोणी केल्यास, तो अधिक्षेप कसा काय ठरू शकतो?

स्त्रियांची बंधमुक्ती ज्या समाजाच्या चौकटीत टीकेचा विषय होतो, तेथे सुधारणांना संधी असतेच किती? विज्ञानतंत्रज्ञानाने जगाचे वर्तनप्रवाह बदलले; पण स्त्री आणि पुरुष यांच्या प्रासंगिक वर्तनातील संगती पूर्णांशाने लागली आहे, असे दिसत नाही. शिक्षणाने ती साक्षर झाली असेल; पण स्वतंत्र झाली काय? तिच्या विचारांचे आकाश विस्तारले. घराबाहेर पडून अर्थार्जनाचे चक्रही ती फिरवू लागली; पण अशा किती स्त्रिया आहेत, ज्या हे सगळं करूनही परंपरेच्या शृंखलांतून मुक्त झाल्या आहेत. ‘माझं घर माझा संसार’ या चौकटीतूनच ती आजही स्वतःचा शोध घेते आहे. ती मुक्त झाली असे वाटत असेल; पण ही मुक्तताच तिला पुन्हापुन्हा त्याच त्या वर्तुळावर आणून उभी करते. परिस्थितीवश काही अपवादांना आपलं सामर्थ्य सिद्ध करायची संधी मिळाली, त्या व्यवस्थेच्या शीर्षस्थानी जाऊन पोहचल्या; पण बहुसंख्य आहेत तेथेच आहेत. त्यांच्या ललाटी अंकित झालेल्या कष्टाच्या गाथा काही सुखात रुपांतरीत होत नाहीत.

स्त्रीचं दिसणं तिच्या असण्याशी नेहमीच जोडलं गेलं आहे. तिचं गौरवर्णांकित असणं, चाफेकळीगत नासिका, कृशकटी इत्यादी, इत्यादी असणं आणि या सगळ्या सौंदर्यखुणांना मिरवणारा सुडौल बांधा असणं, ही जणू अनिवार्यता असते. जेव्हा तिच्या देहाच्या आकारात तिचं स्त्रीपण शोधलं जातं, तेव्हा तिचे स्वतःचे अस्तित्व तिच्यासाठी उरतेच किती? सोबतीच्या कोणातरी पुरुषाच्या नजरेतून ती साकार होत असते. सौंदर्याची परिभाषा समजून तिने वर्तावे, अशीच अपेक्षा असते. चित्रपट, मॉडेलिंगसारख्या क्षेत्रात तर तिच्या अटकर बांध्याशी तिच्या बाईपणाचे सगळे संदर्भ जुळलेले दिसतात. तिथे तिचे असणे महत्त्वाचे नाही, तर दिसणे महत्त्वाचे ठरते. वर-वधूसूचक जाहिरातींमधील वधू आजही गौरवर्णांकित, सुस्वरूप, सुंदर, गृहकृत्यदक्ष अशीच असते. पुरुष गृहकृत्यदक्ष, प्रेमळ, समजूतदार असावा, याची आवश्यकता नसतेच का? नसावी, कारण संस्कृती स्त्रीच्या सौंदर्याची परिभाषा करते, त्याच पट्टीत तिने स्वतःला फिट्ट बसवायचे, दिसायचे आणि वागायचेसुद्धा. मुक्तीचे मोकळे श्वास घेण्यासाठी काही आवाज प्रातिनिधिक स्वरुपात अशा निमित्ताने स्पंदित होत असतील, तर तो परिवर्तनाचा स्वतःपुरता प्रारंभ का ठरू नये? आत्मभान आलेले काही मोजके आवाज फारतर असे म्हणू शकतात; पण बहुसंख्य स्त्रिया परंपरेचे जोखड सोबतीला घेऊन अद्यापही संघर्ष करीत गाव-वस्ती, वाड्या-पाड्यावर झगडत आहेत; कधी दैवाला, तर कधी वाट्यास आलेल्या स्त्रीदेहाला दोष देत. मुक्ततेसाठी व्यवस्थेच्या भक्कम भिंतींवर आघात करीत आहेत. तरीही तिच्या ललाटी लिहिलेले दुय्यमत्त्वाचे अभिलेख आहेत तसेच आहेत.

मला आठवते, आमच्या गावात येणारा मुख्यरस्ता पारासमोरून आहे. पारावर आजही बरीच मंडळी विसावलेली दिसते. तेव्हाही असेच असायचे. शेतातातून किंवा आणखी कोठून असेल, या रस्त्याने गावात येणाऱ्या महिला पायताण हाती घेऊन अनवाणी पायांनी चालत यायच्या. माझी आजी, माझी आई अशाच चालत येताना मी पाहिल्या आहेत. तेव्हा मनात एक प्रश्न यायचा, पुरुष मंडळी हाती पायताण घेऊन काही चालत येत नाहीत, मग महिलांनाच अशी सक्ती का? आईला, आजीला तसे विचारले, तर त्या सांगत, ‘पारावर गावातील नात्यागोत्याची, मोठ्या मानमरातबाची माणसे बसलेली असतात, त्यांच्यासमोर असं उद्धटासारखं कसं चालायचं आणि हीच तर आपली परंपरा आहे.’ खरंतर त्यांना त्याचं वाईट वाटत होतं की नाही, माहीत नाही; पण कदाचित त्यांनी आपली मानसिकताच तशी घडवून घेतली होती. आजही कदाचित कुठे असे घडत असेलही, माहीत नाही. गावात प्रवेशताना लेकीसुना डोक्यावर हातभर पदर घेऊन, दबकत चालताना दिसत असतील, तर याला परिवर्तन वगैरे कसं म्हणावं? याला मोठ्यांचा आदर वगैरे म्हणावं, तर मग मोठ्यांनी त्यांचं मोठेपण थोडं नजरेआड करून का वर्तू नये? पण तसं होणार नाही, कारण पुरुषांनी सर्वत्र असावं स्त्रीने मात्र कुठेच नसावं, हा विचार वागण्यात घट्ट रुजला आहे, तो इतक्या लवकर जाईलच कसा.

या व्हिडीओतील मतांबाबत वादप्रवाद असू शकतात, नव्हे ते असावेतही. शब्दांच्या, विचारांच्या साचेबद्ध चौकटीतून संस्कृती बंदिस्त करता येत नाही. स्वातंत्र्याचा संकोच जितका संस्कृती विकासाला मारक, तेवढाच स्वैराचारही घातक असतो. समाजाचं जगणं निरामय असण्यासाठी नियमांची शृंखला तयार करावी लागते. माणसांचे परस्पर संबंध निकोप असावे लागतात. विचारांच्या पातळीवर हे जेवढे सत्य आहे, तेवढेच अन्य बाबतीतही. विवाहपूर्व, विवाहोत्तर संबंधाबाबत या व्हिडीओतील मत वैयक्तिक बाब झाली. अर्थात, तोही स्वातंत्र्याचा भाग आहे. ज्याला जसं जगायचं असेल, तसं जगण्याचं स्वातंत्र्य त्याला असतंच ना! कोणी काय घ्यावं, हा ज्याचा-त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. आणि हे समजण्याइतपत समाज विचार करू शकतो.

एकीकडे समतेच्या वार्ता करीत स्त्री-पुरुष समानतेचे नगारे वाजवायचे; पण एखादे वास्तव असे अचानक समोर आले की, त्यापासून लांब का पळायचे? समाजात सगळंच आलबेल चाललेलं असतं असंही नाही. नजरेआडचं वास्तव वेगळंही असू शकतं. समाजात वागण्याच्या पद्धतीत कालोपघात बदल घडवावे लागतात. बदलांना सर्वसंमतीचा अर्थही असायला लागतो. व्यवस्थेत राहूनच बदल करायचे असतात. व्यवस्था प्रयत्नपूर्वक घडवावी लागते. घडणीचा हा काळ कधीच लहान नसतो. त्याची वाटचाल अव्याहत सुरूच असते. कालपटावरील सादप्रतिसाद, क्रियाप्रतिक्रियांचे संगीत समाजाचे जगण्याचे सूर संपन्न करीत असते. ज्याने-त्याने आपल्या विचारांची एक तार छेडून त्यातून आपला सूर शोधायला हवा. समाज अनेक सुरांनी सजलेली विचारांची मैफल असते. ती कधी रंगते, कधी दुभंगते, तर कधी भंगतेही. असं दुभंगलेपण सांधण्यासाठी नव्या विचारांची, दिशांची आवश्यकता असते. ती विचारातून आणि संवादातून स्थापित करावी लागते, एवढंमात्र नक्की.

Mukhavata | मुखवटा

By // No comments:
सुरेश भटांची एक सुंदर कविता काही दिवसापूर्वी वाचनात आली. ‘रस्त्याने केवळ सावल्याच चालतात, माणसं कुठे दिसत नाहीत, माणसांनी गजबजलेल्या माझ्या देशात, माणूसपण भेटतच नाही.’ माणूसपणाबाबत आपल्या वर्तनातील विसंगतीचे वास्तव ही कविता समर्पक शब्दांत शब्दबद्ध करते. माणूस म्हणून आपल्या जगण्यातील मर्यादाना प्रकर्षाने अधोरेखित करते. माणूस आणि माणूसपण दोहोंचे वेगळेपण समाजात सध्या जाणवण्याइतपत ठळक झालं आहे. कधीकाळी माणूस वेगळा आणि माणूसपण त्याहून वेगळे, असं काही गृहीत धरलंचं नसायचं. माणूस असला म्हणजे माणुसकी अपरिहार्यपणे सोबत असायलाच हवी, ही एक माफक अपेक्षा असायची. पण आजचं वास्तव या गृहितकाशी तुलना करून पाहताना विपरीत दिशेने कुठेतरी लांबवर उभे असलेले दिसण्याइतपत परिस्थितीत परिवर्तन घडून आलेय.

चैतन्य असेल तेथे परिवर्तन असतेच, असे म्हणतात. परिस्थितीतील परिवर्तनाशिवाय माणसांच्या जगण्यात प्रगती असंभव आहे. प्रगतीच्या वाटा तयार करताना बदलांच्या दिशा कोणत्या असाव्यात, ते ठरवावे लागते. मार्ग कोणते असावेत, तेही नक्की करायला लागते. बदलांना परिस्थिती सापेक्ष मर्यादांची काही बंधने पडत असतात. परिवर्तन घडवून आणताना मर्यादांचेही भान असायला लागते. मर्यादांच्या सीमा पार केल्या जातात, तेव्हा समोरील प्रश्न अधिक गुंतागुंतीचे होत असतात. प्रश्न अवघड झाले की, माणसं उत्तरांच्या शोधासाठी आपल्या हाती कोणतातरी मुखवटा घेऊन बदलांच्या भूमिकांमध्ये शिरतात. व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी मुखवटे धारण करून कवायती करीत राहतात.

कधीकाळी माणसातलं साधेपण ही त्याची श्रीमंती समजली जायची. साधेपणातील सौंदर्याला सुंदर साजाचं लेणं लागलेलं असायचं. साधेपणाने जगण्यात माणसाचं सर्वस्व सामावलेलं असायचं. जगण्याची प्रयोजने लहानसहान असूनही माणूस म्हणून ती प्रकर्षाने जाणवत रहायची. साधेभोळेपणाने जगण्याला समाजात सहज सन्मान असायचा. कोणतेही वेगळे अभिनिवेश धारण न करता जीवनयापन करणारा ‘भोळा सांब’ म्हणून ओळखला जायचा. ही साधेपणाची सार्वत्रिक श्रीमंती आसपास नजरेचा कटाक्ष टाकला तरी डोळ्यांना सहज दिसायची. पण जग जसजसं बदलत गेलं, तसं साधेपणातलं ऐश्वर्यही संपलं आणि जगणं आत्मकेंद्रित झालं. सहजपणाणे वागणे आणि त्याच सहजतेने समाजात वावरणे जवळपास दुर्मिळ झालं आहे. प्रत्येकजण हाती कोणतातरी हाताचा राखूनच आपल्या वागण्याच्या दिशा ठरवतो आणि केवळ आपण ठरवलेल्या दिशेनेच चालत जाऊन आपला अभ्युदय घडून येणार आहे, असे समजून वागतो.

याचा अर्थ माणसांच्या जगण्यातून साधेपण सगळंच संपलं आहे, असा नाही. मात्र, त्याने बऱ्याचअंशी काढता पाय घेतला आहे. नितळ, निर्मळ, निर्व्याज आदी शब्दांच्या अर्थछटा शब्दकोशातील अर्थापुरत्या सीमित झाल्या आहेत, असं वाटण्यासारखी परिस्थिती वर्तमानात दिसू लागलीये. माणूस जर इहलोकीचे नवल वगैरे असेल, तर त्याच्या वागण्यातून ते दिसायलाही हवे. पण दिसणं आणि असणं यात अंतर वाढत आहे. त्याच्या वर्तनातून साधेपणाने जगण्यातील नवलाई हरवत चालली आहे. अगदी असं आणि असंच काही अजून सार्वत्रिक चित्र नसेल; पण स्वतःभोवती स्वार्थाची वर्तुळं उभी करून; त्यावर भक्कम भिंती घातल्या जात आहेत. वर्तुळाच्या अलीकडे आणि पलीकडे अशी दोन स्वतंत्र विश्वे माणसांनी स्वतःसाठी निर्माण करून घेतली आहेत. पलीकडील जगात घडणाऱ्या कोणत्याही घटनांचा साधा आवाजही या भक्कम चिरेबंदी वर्तुळात पोहचू शकत नाही.

आहेरे आणि नाहीरे, हा वर्गकलह तसा माणसांच्या जगाला नवा नाही. पण अलीकडे आहेरे वाल्यांनी आपल्या सुखासीन जगण्याचे नियम स्वतःच तयार करून घेतले आहेत. यांच्या जगात अभावाला स्थान नाही. स्वतःपुरता सुखाचा एक मुखवटा चेहऱ्यावर चढवून घेतला आहे. यांच्या मुखवट्यांचे रंग कधी विटत नाहीत. सामान्यांशी यांना काही देणे घेणे नसल्याचे, समाजातून बोलणे घडते, ते आपण ऐकतोही. अर्थात, या विधानात पूर्णतः तथ्य आहे असे नाही. एका बाजूने पंचतारांकित सुविधांनी मंडित जगणं आणि दुसरीकडे अष्टोप्रहर समस्यांकित जगणं, हे जणू समाजाचं चित्र होऊ पाहत आहे. या दोन्ही जगांचं जगणं नानाविध मुखवट्यांना धारण करून घडत असल्याने आपला खरा चेहरा विसरत चाललं आहे. एकीकडे सुखाने रंगवलेला, तर दुसरीकडे परिस्थितीजन्य समस्यांनी बेरंग होऊन विस्कटलेला मुखवटा. पण मुखवटे तसे दोन्हीकडे कायमच. एक मुखवटा समाधानाने फुललेला, तर दुसरा सततच्या संघर्षाने करपलेला.

खरंतर माणसांना त्यांचा स्वतःचा चेहरा घेऊन जगता येणं काही अवघड नाही. नियतीने दिलेला परिस्थितीचा चेहरा स्वीकारून साधसंच जगण्यात माणूसपणाचं सगळं शहाणपण सामावलेलं असतानाही; माणसं आपली अंगभूत पात्रता विसरून वेगवेगळे मुखवटे परिधान करीत कोणत्यातरी मोजपट्टीवर स्वतःला सिद्ध करू पाहतात. समाजात प्रत्येकाच्या हातात आपली एक मोजपट्टी असते. त्या वापरून समोरच्याला मोजण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणून त्यांच्याकडील पट्ट्यांच्या लांबीची, उंचीची चिंता माणसानं का करावी? त्यांच्या पट्ट्यांची मापं आपल्याला लावून घेण्याच्या नादात आपली उंची वाढवण्यासाठी माणसं नको तितकी धडपडत राहतात. हेलपाटतात. स्वतःला सिद्ध करण्यासाठी मुखवटे हाती घेऊन उभे राहतात. या धडपडीचा शेवट काय असेल, याचा विचार न करता आपली वाट चालतच राहतात.

माणसाच्या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न अनेक अभ्यासकांनी, मानसशास्त्रज्ञांनी केला आहे. समाजशास्त्र्यांनी माणसांच्या सामाजिक वर्तनाचा विषय तयार करून अभ्यासला. यामुळे विचारवंतांच्या, बुद्धिमंतांच्या हाती कोणत्या गोष्टी लागल्या. हा मतांतरांचा वेगळा विषय आहे. माणसांना जगण्यासाठी नेमकं काय हवं असतं? खरंतर त्याच्या मूलभूत गरजांची पूर्ती झाली की, त्यात संतुष्ट असायला काय हरकत असावी? काहीच नाही; पण समाधानही नाही. मनातून समाधान नसेल तर आणखी नवे काही घडण्याची शक्यताच मावळते. त्यागात जगण्याचं सौंदर्य सामावलेलं असतं, भोगात विकृती. निरामय विचारांनी वर्तणारा माणूसच समाजाच्या जगण्याचा देखणा चेहरा असल्याचे सांगून-सांगून जगभरातील संतमहंत थकले. तरीही माणसांच्या मनातील विकार काही निरोप घेत नाहीत अथवा कमी झालेले दिसत नाहीत. जगात अन्याय, अनाचार, अत्याचार घडतोच आहे. अनेक विसंगतींनी जग खच्चून भरले आहे. कलहांनी फाटले आहे. समस्यांची संकटे उभी ठाकतच आहेत. याची कारणे काय असावीत? ‘स्वार्थ’ या एका शब्दात याचं उत्तर सामावलेलं आहे, असे वाटते. माणूस नावाच्या अध्यायाच्या लेखनाचा प्रारंभ स्वतःपासून सुरु होतो. स्वार्थासाठी माणसं बरंच काही करू शकतात. अर्थात स्वार्थाची परिभाषाही परिस्थितीजन्य आणि परिवर्तनशील असते. काही माणसं जगण्यातलं साधेपण आपल्यात सहज सामावून घेत असतात. कष्टाच्या भाजीभाकरीत त्यांना जीवनाचा अमृततुल्य स्वाद सापडतो. काही तूपसाखरेच्या गोडीसाठी विसंगत मार्गही निवडतात. प्रत्येकाच्या निवडीत त्यांची आवड सामावलेली असते, तो त्यांच्या स्वतःचा चॉइस असतो. असे असले तरी प्रत्येक चॉइसवर समाजमान्यतेची मोहर नाही उमटत.

समाजपरायण विचारांचं भरभरून लेणं आमच्या भूमीला लाभलेलं आहे. समाजाच्या भल्यासाठी वर्तणारी कनवाळू मनांची मांदियाळी येथे अनवरत सोबत करीत आहे. असे असूनही व्यापक विचारांनी वर्तणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे.’ हा विचार केवळ शाळेतील प्रार्थनेपुरता बंदिस्त होत चालला आहे. दुसऱ्याच्या दुःखाने विकल होणारा चेहरा नजरेआड होत आहे. समाजपरायण विचारांचं लेणं ल्यालेले देखणे चेहरे हरवत जाऊन त्याची जागा मुखवट्यांनी घेतली आहे. हे मुखवटे परिधान केले की, जगाला आपल्या पद्धतीने सहज वळवून घेता येते, असे वाटायला लागते; पण हे काही कायमच घडत नाही. तसं करताही येत नाही, कारण उसना घेतलेला मुखवटा उतरल्यावर खरा चेहरा समोर येतोच. असे असूनही माणसांना मुखवटे सोबत घेऊन वर्तावेसे का वाटत असावे?

मुखवटा म्हणजे माणूस नाही, हे माहीत असूनही अंतर्यामी असणारी कोणतीतरी अस्वस्थता माणसांना बेगडी मुखवट्यांना धारण करून जगायला बाध्य करते. जग हे एक रंगमंच असून त्यावर प्रत्येकाला आपापली भूमिका घेऊन जीवनयापन करावे लागते, असे म्हणताना आपण अनेकदा ऐकले असेल. पण या मंचावर वावरताना आपली भूमिका कोणती असेल, हे ठरवायचे कुणी आणि कसे? एकीकडे दिसणारी अगदी साध्यासरळ स्वभावाची माणसं, तर दुसऱ्या बाजूने अंगभूत पात्रता नसतानाही; वेगवेगळ्या कोलांटउड्या मारून आपली मखरे तयार करून स्वतःची आरास मांडणारी माणसं. अशी विसंगती समाजात अनेकदा दिसते. स्वतःचा वकुब ओळखून वागणारी माणसंही समाजात संखेने खूप आहेत. अशा माणसांच्या सत्प्रेरीत वर्तनातून निर्मित विचार साधेपणाची संगत करीत माणसांनी जगावे कसे, हे सांगणारा वस्तुपाठ असतो.

पद, पैसा, प्रतिष्ठा यांना जगण्यात अवास्तव महत्त्व आल्याने; यांच्या प्राप्तीसाठी माणसं चाकोरीतलं, चाकोरीबाहेरचं सगळंकाही करायला तयार असतात. चुकलेल्या वाटांनी चालणं घडून मनातील अस्वस्थतेचे अंगण समृद्ध होत असते. ही अस्वस्थताच माणसांच्या जगण्याच्या साध्याशा वाटा अवघड करते. ‘बिकट वाट वहिवाट नसावी,’ हे शब्द अशावेळी सुविचारांपुरते उरतात. जगणं संपन्न होण्यासाठी माणसाकडे वर्तनातील प्रांजलपण आणि मनातील नितळपण असले तरी पुरेसे असते. कोणत्याही मुखवट्याशिवाय आपली प्रतिमा मनाच्या आरशात दिसायला हवी. पण मनावर आसक्तीने काजळी धरली असेल, तर आपले आपण दिसावे कसे? कवयित्री बहिणाबाई म्हणतात, ‘पाहीसनी लोकायचे येवहार खोटेनाटे, बोरीबाभळीच्या अंगावर आले काटे.’ हव्यासापायी जखमा देणाऱ्या काट्यांची कुंपणे आपण स्वतःभोवती का तयार करावीत? केवळ जगाला दाखवता यावे म्हणून स्वयंघोषित चांगुलपणाचा मुखवटा का धारण करावा?

माणसांच्या वागण्याबाबत व्यक्ती तितक्या प्रकृती, असे म्हटले जाते. व्यक्ती कितीही असू द्या; पण विचारांची प्रकृती सुदृढ असायला हवी. इतरांच्या जगण्यात सामावलेले सुख पाहून आनंदी होणाऱ्या माणसांची मांदियाळी हल्ली विरळ होत चालली आहे. समोर तोंडभरून कौतुक करणारी माणसं प्रसन्नतेचा मुखवटा धारण करून संवाद करतात; पण पाठ वळली की हीच माणसं निंदेचे आघात करतात, तेव्हा त्यांचा बेगडी चेहरा कितीही लपवला तरी दिसतोच. आपल्याकडील आहे त्याचा कोणताही लोभ न ठेवता समर्पणशील वृत्तीने जगणारी आणि तसेच वागणारी माणसं समाजजीवनाचं नवनीत असतात. प्रसंगी लहानमोठा त्याग करीत समाजजीवन समृद्ध करणारी माणसं हल्ली हरवत चालली आहेत. हे हरवलेपण आठवणींपुरते उरले आहे. समाजातील वंचित, उपेक्षित चेहऱ्यांवर हास्य फुलवण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरील हास्य देणारी माणसं समाजातून झपाट्याने कमी होत आहेत. त्यांची जागा प्रसिद्धीसन्मुख समाजसेवकांनी घेतली आहे. सेवेचा मुखवटा परिधान करून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणवून घेत मिरवीत आहेत.

काही दिवसापूर्वी शिक्षकदालनात आम्ही शिक्षक निवांत गप्पा करीत बसलो होतो. नेहमीप्रमाणे इकडचं तिकडचं बोलणं सुरु होतं. बोलण्याच्या ओघात विषय समाजाच्या बदलत्या वर्तनप्रवाहांवर येऊन स्थिरावला. एक शिक्षक म्हणाले, “सर, हल्ली डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवावा, याचा धीरच होत नाही हो! कोण, कुठे, कसा आपल्याला तोंडघशी पाडेल, हे सांगणं अवघड आहे. समाजात, आप्तस्वकीयात, सहकाऱ्यात वागावे कसे, याची गणितं सोडवणं कठीण होत आहे.” कदाचित त्यांना ओळखीच्या कुणाकडून असा अनपेक्षित वागण्याचा अनुभव आला असावा. पण तसे जाणवू न देता त्यांनी विधानाचे सार्वत्रिकीकरण करून मनातल्या खंतावलेपणाला विचारांचे बोट धरून वाट मोकळी करून दिली असावी.

अशाच कोणत्यातरी अनुभवाशी परिचित असणारे एक शिक्षक बोलण्यात सहभागी होत म्हणाले, “अहो सर, माणसं सहजपणाणं जगणं विसरून नानाविध मुखवटे धारण करीत जगणं शिकले असतील, तर समाजात आणखी काय नवीन घडणार आहे?” चर्चेत सामील होत आणखी एक आवाज तोच मुद्दा हाती घेत मत बनून प्रकटला, “मुखवट्यांशी सख्य असणाऱ्या अशा लोकांशी वागावं कसं, तेच कळत नाही हो! तुम्ही आपले यांच्याशी कितीही चांगले राहा, यांच्या मनात नेहमीच संदेहाची एक पाल चुकचुकत असते. कोणाकडेही संशयाच्या नजरेने पाहणे; एवढंच आपलं काम असल्यासारखे हे वागतील.” तोच धागा पकडीत पहिले शिक्षक म्हणाले, “यांच्या अशा वागण्याचं अभ्यास करणारं काही शास्त्र वगैरे नाही का? निदान त्याचा अभ्यास करून यांना ओळखता तरी येईल.” “सर, शास्त्र आहे. संशोधन आहे. सर्वकाही आहे; पण आपल्याला यांना अचूकपणे ओळखता तर यायला हवे. समोरचा माणूस ओळखण्याची ही कला फार थोड्या लोकांना अवगत असते. म्हणतात ना, ‘स्वभावो दूरित क्रमः’ याचं वागणंसुद्धा अगदी असंच, हीच यांची वर्गवारी.” दुसऱ्या शिक्षकाचं अनुभवजन्य उद्विग्न मत.

हे सगळं मी ऐकतोय. हातातील वर्तमानपत्र बाजूला ठेवले. अन् त्यांच्या बोलण्यात सहभागी होत म्हणालो, “सर, तुम्हा लोकांचे अनुभव काहीही असू द्यात, एक बाब तुम्ही दुर्लक्षित करीत आहात, असे नाही का वाटत तुम्हाला? ही सगळी माणसं आहेत आणि माणूसपणाच्या साऱ्या मर्यादा घेऊन जगत आहेत. माणसं म्हटली म्हणजे चांगलं आणि वाईट असणारच. यांच्यातही ते असेलंच. हे काही सर्वगुणसंपन्न नाहीत अथवा कोणी संत, महात्म्येही नाहीत. माणूस म्हणून यांना ओळखण्यात कदाचित तुम्ही कमी पडले असावेत. यांना समजून घेण्यासाठी त्यांच्या विचारांचं, वर्तनाचं विश्लेषण फारतर तुम्ही करू शकतात. काही तर्क बांधू शकतात. काही अनुमान काढू शकतात. तुम्ही त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर चढविलेल्या मुखवट्यावरून ओळखण्याचा प्रमाद करीत आहत. तुमच्याकडील मोजपट्टीची मापं लावून, त्यांना तुमच्या अनुभवाच्या कक्षेत मोजत आहात; पण मुखवट्याआडच्या त्यांच्या खऱ्या चेहऱ्याचं काय? तो कसा पाहाल? तो बघण्यासाठी कोणते भिंग वापराल?” बोलणं आणखीही झालं असतं; पण तासिका संपल्याची बेल झाली. पुढच्या तासिकांना वर्गावर जाणं आवश्यक होतं. सगळे उठले. वर्गांकडे निघताना त्यांना म्हणालो, “चला, आपणही काढा आपापला मुखवटा आणि चढवा चेहऱ्यावर! असेही आपल्याला वर्गात गेल्यावर मुलांना तोच तर दाखवायचा असतो ना! चेहरा कसाही असला तरीही.”

नाहीतरी आपण सगळीच माणसं कोणतेतरी ऐच्छिक, अनैच्छिक मुखवटे धारण करून समाजात वावरत असतो. प्रसंगी त्यांना जपत असतो. मुखवट्याआडचा खरा-खोटा, असेल तसा चेहरा दिसू नये म्हणून काळजी घेत असतो. मुखवटे सांभाळीत नियतीने नेमून दिलेली वाट चालत असतो. काहींचा मुखवटा आसपासच्या आसमंतात आनंदाची पखरण करीत आनंदयात्री ठरतो, तर काहींचा असलेल्या आनंदावर विरजण टाकीत असतो. पण तरीही प्रत्येकजण येथे आपापले मुखवटे सांभाळून असतो आणि वेळ मिळताच ते मिरवितही असतो. मुखवट्यांना टाळून माणसांना कसे जगता येईल? अवघड आहे. प्रश्न फक्त एवढाच आहे, आपण निवडलेला मुखवटा कसा आहे याचा. तो कसा असेल याचा शोध मात्र ज्याचा त्याने घ्यायला हवा.