विकल्प संपले की, उरते केवळ हताशपण. बऱ्याचदा अशा प्रसंगांना सामोरे जाणे घडते. पण हताशेचे पळ चालते झाले की, निवळलेल्या अभाळासारखं सगळं काही नितळ होतं. पुन्हा नव्याने आभाळ निळाई पांघरून गात राहतं. झडून जाणे असेल, तर बहरून येणेही असतेच ना! सुज्ञांना हे अवगत नसते, असं कसं म्हणावं? विवंचना शब्दाचा अर्थ आकळला की, विनंतीच्या परिभाषा समजावून सांगाव्या नाही लागत. आयुष्यच मुळात एक संघर्षाचे सूत्र असते. संघर्ष वैयक्तिक असतो, तसा सामूहिकही असतो. समूहाच्या स्तरावर घडतो, तेव्हा मान-अपमान, एखाद्याला दिले जाणारे महत्त्व, एखादी गोष्ट दुर्लक्षित करणे या गोष्टींना फारसे अर्थ नाही उरत. ती प्रासंगिक गरज असू शकते. प्रासंगिकतेचे अर्थही परिस्थितीनुरूप बदलू शकतात. परिवर्तनशील विचारांना परिभ्रमण घडणे क्रमप्राप्त असते. ज्यांना काळाचे पडदे सारून भविष्यातील अंधार-उजेडाचे आकलन घडते, त्यांना अंधाराच्या व्याख्या अन् उजेडाच्या परिभाषा समजावून नाही सांगायला लागत.
तिमिरातून तेजाकडे नेणाऱ्या प्रार्थना ज्यांना अवगत असतात, त्यांना पणत्यांचं मोल माहीत असतं. याचा अर्थ प्रार्थनेत परिवर्तनाचे पर्याय सामावलेले असतात असे नाही. बदल घडण्यासाठी पर्याप्त प्रयत्न प्रधान कारण असते. असेल माझा हरी... म्हणून कोणी वर्तत असेल, तर हरीही त्याला पाहून हरी हरी केल्यावाचून राहणार नाही. हरी हरेक चिंतांचे हरण करीत असेल, नसेलही; पण स्वप्रयत्नाने परिस्थिती परिवर्तनाचे अक्ष फिरवणाऱ्यांकडे पाहून मनातून हरकत असेल. प्रयत्नांस कोणी परमेश्वर मानतो, कोणी परमेश्वरालाच प्रयत्न. पण प्रामाणिक प्रयास ज्यांचे परमेश्वर बनतात, त्यांच्या घरी देव्हाऱ्यात नाही, पण मनात भगवंत आपलं घर अवश्य बांधतो.
काम कोणतेही असो, निवड स्वतः स्वीकारलेला पर्याय असतो. यशप्राप्तीचा आनंद त्याचा असतो, तसे प्रमादही त्याचेच असतात ना? पराजयाच्या पाऊलखुणा दिसायला लागल्या की, पलायनाचे पर्याय स्वीकारणे कितपत संयुक्तिक असते? अस्मितांचे अर्थ ज्ञात असूनही अनभिज्ञ असल्याचे कोणी अशावेळी प्रदर्शित करत असेल अन् भविष्यातली अधिक गहिरी संकटे आपली नाहीतच, असं कोणास वाटत असेल, तर ती आपणच आपणाशी केलेली प्रतारणा नाही का ठरत? अर्थात, कोणास काय वाटावे, काय नाही, हे समजण्याचे स्वातंत्र्य प्रत्येकास असते. स्वातंत्र्य आबाधित असण्यासाठी अस्मितांना आस्थेचे आयाम असायला लागतात. स्व तंत्राने जीवनयापन करायचे किंवा कसे, हे काही कुणी त्रयस्थ ठरवत नसते. ते स्वतःलाच निर्धारित करावे लागते, नाही का? समजा कुणी नियंत्रणाचे सूत्रे हाती घेऊन स्वातंत्र्याचा संकोच करत असेल, तर मुक्तीसाठी स्वतःच विकल्प शोधावे लागतात.
विकल्पांची निवड करता येते कुणालाही, पण निर्धाराचा धनी कोणीच नाही होऊ शकत. तो फक्त एकच व्यक्ती करू शकतो, तो म्हणजे केवळ आपण आणि आपणच. मला माहिती आहे सुविचारांनी जग नाही बदलत. असे असते तर समाजात एवढी दुरिते दिसलीच नसती; पण विचार पेरले की, एक दिवस ते उगवून येतील, ही आशा असतेच, नाही का? परिवर्तनाचे पथ प्रत्येकाला निर्माण नाही करता आले, तरी बदलाच्या ऋतूंची प्रतीक्षा करता येतेच ना?
सकाळी व्हॉट्सअपवर एक मॅसेज आला त्यात लिहलेला मजकूर होता, 'सर्वात मोठे पाप म्हणजे अन्यायाशी तडजोड' वाचून क्षणभर थांबलो. रेंगाळलो. वाटलं न्याय-अन्यायाच्या नेमक्या संज्ञा काय असतात. एकाचा न्याय दुसऱ्याला अन्याय वाटू शकतो. किंवा या उलटही. अन्याय घडत राहतो, न्याय मिळवावा लागतो. न्यायाच्या चौकटींना विस्तार असतो. अन्याय तुमच्या सहनशीलतेच्या कक्षा पाहून वाढत राहतो. त्याला किती वाढू द्यायचे, हे आपल्या प्रतिकारावर अवलंबून असतं. सात्विकतेचे अर्थ शोधून आयुष्य सुंदर करण्यासाठी न्याय्यतत्वे सांभाळावी लागतात. वाचतांना वाटलं की, माणूस शेकडो वर्षांपासून इहतली नांदतो आहे, सृष्टीविकासाच्या क्रमातील सर्वात परिणत जीव आहे. जगाच्या कल्याणच्या वार्ता करतो आहे. मग असे असूनही त्याच्या विचारांच्या वर्तुळांचा परीघ का विस्तारत नसेल? की स्वतःभोवती घडणाऱ्या प्रदक्षिणांना विश्व समजण्याचा प्रमाद त्याच्याकडून घडत असेल? माहीत नाही. पण ज्यांना न्याय-अन्याय, अस्मिता, स्वाभिमान, समायोजन, सहकार्य, परमत सहिष्णुता शब्दांचे आयाम आकळतात, त्यांना कोणत्याही मखरात मंडित नाही करावे लागत. स्वतःच्या मर्यादा ज्यांना माहीत असतात, त्यांना संघर्षाचे अर्थ कोणाकडून अवगत करून घेण्याची आवश्यकता नसते. त्यांची लहानशी कृती संघर्षाचे प्रतिरूप असते. अर्थात त्यासाठी आत्मप्रतिती, आत्मानुभूती असावी लागते, नाही का?
कष्टावीण येथे कोणाला काही मिळते का? बहुदा नाही. तत्त्वांच्या प्रतिष्ठापणेस प्रयत्न लागतात. ते जगण्यात रुजवावे लागतात. जतन करावे लागतात. वाढवावे लागतात. मग तरीही पलायनाचे पथ काहीजण का शोधत असतील? श्रमसंस्कारांचा जागर फक्त जणांच्या मनात कष्ट कोरण्यासाठी नसतो. श्रमशिवाय संपादित केलेली संपत्ती महात्मा गांधींच्या मते एक पातक आहे. याचं भान किती जणांच्या मनात असेल? अर्थात असा 'किती' शब्द प्रश्नचिन्ह घेऊन येतो, तेव्हा आपणच आपणास तपासून बघायला लागतं. जगातले संघर्ष काही नवे नाहीत. फक्त ते नवी नावे धारण करून नव्या रुपात येतात एवढेच. आयुष्यच एक संघर्ष असेल, तर तो काही टाळता येत नाही. मग जी गोष्ट टळत नसेल तिला सामोरे जाण्यात संदेह कशाला हवा? विवंचना अवश्य असू शकतात. त्यांच्या विमोचनाचे विकल्प शोधता येतात.
काही गोष्टी स्वनिर्मित असतात, काही परिस्थितीनिर्मित, तर काही परंपरेचे किनारे धरून येतात. संचित असते ते त्या-त्यावेळेला घडणाऱ्या कृतींचे. परंपराही अशाच कुठून तरी उगम पावून वाहत राहतात, समाजमनाचे तीर धरून. अर्थात त्या सगळ्याच सुयोग्य असतील किंवा सगळ्याच त्याज्य असे नाही. काही वाहतावाहता नितळ होत जातात. काही साचून गढूळ. त्यांना निवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मनावर शेकडो वर्षांची चढलेली पुटे धुवायला अवधी द्यावा लागतो. सुरवातीस अपवाद असतात, नंतर तेच प्रघात बनतात, पुढे प्रघातनीती होते. माणसाचा इतिहासच वाहण्याचा आहे. वळणे अनेक असतात. बांध घालावे लागतात. सुरवातीस त्यांची उंची मोठी नसते. ती सावकाश वाढवावी लागते. हे होईल, कारण परंपरा जन्माला घालतो माणूस अन् मोडतोही माणूसच, नाही का?
••