Maati | माती

By // No comments:
माती पासून माणसे वेगळी करता येतात? की ती मुळातच वेगळी असतात? मला तरी नाही वाटत तसं. मातीतून केवळ रोपटीच उगवून येतात असं नाही. माणसेही मातीची निर्मिती असतात. हे म्हणणं कदाचित वावदूकपणाचं वाटेल कुणाला. पण थोडा आपणच आपला धांडोळा घेतला तर जाणवेल की, मातीने दिलेल्या अस्मिता माणसांचं संचित असतं. मातीशी त्याच्या जगण्याचे संदर्भ जुळले आहेत. तो अनुबंध आहे आयुष्याचे तीर धरून वाहत येणाऱ्या आस्थेचा. धागा आहे जगण्याचा. माती केवळ कुठल्या तरी जमिनीच्या तुकड्याची निर्मिती नसते. सर्जनाचा सोहळा असते ती. आकांक्षांचे कोंब अंकुरित करणारी. स्वप्ने रुजत असतात तेथे अनेक. तिच्या कणाकणातून अध्याय लिहिलेले जातात आयुष्याचे.

माणूस भावनाशील वगैरे प्राणी असला, तरी तो काही फक्त भावनांवर जगत नसतो. भावनांचे भरलेले आभाळ मनात वसतीला असणे संवेदनशील असण्याचा भाग असला, तरी जगण्यासाठी सारी भिस्त भाकरीवरच असते. भाकर मातीशी बांधली गेलीये. नाहीतरी जगण्याचे सगळे कलह भाकरीच्या वर्तुळाभोवतीच तर प्रदक्षिणा करत असतात. भाकर काही कोणी सहजी झोळीत टाकत नाही. तो शोध ज्याचा त्यानेच घ्यायचा असतो. भाकरीसाठी घडणारी वणवण माणसाला सश्रद्ध बनवते. त्याच्या श्रद्धेचं एक झाड मातीत घट्ट रुजलं आहे, कतीतरी वर्षांपासून. म्हणूनच माती माणसांची श्रद्धा आहे, असे म्हटले तर अतिशयोक्त ठरू नये. श्रद्धेचा हा प्रवाह शतकानुशतके आस्थेचे किनारे धरून वाहतो आहे. अजूनही मातीला माय मानणारे, म्हणणारे आहेत. आईच्या गर्भाशयातून जन्म मिळत असेल, तर मातीच्या गर्भाशयातून जगणं येत असतं. मातीतून केवळ रोपटीच नाही, तर माणसांच्या आकांक्षांचे कोंब अंकुरित होत असतात.

एखाद्या गोष्टीला नगण्य ठरवताना माणसे 'मातीमोल' असा शब्द वापरतात, पण एक गोष्ट आकळत नाही. जर माती मोल न करण्याइतपत नगण्य असेल, तर वावराच्या टिचभर बांधावरून एकमेकांची टाळकी का फोडली जातात? देशाच्या सीमा कुठल्या तरी जमिनीच्या तुकड्यावरच्या केवळ रेषाच असतील, तर आक्रमणे का होत असतात? दुर्योधन सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन पांडवांना द्यायला का तयार नव्हता? ओंजळभर का असेना माती आपली असावी, म्हणून माणसे भिडतात एकमेकाला. मातीतून उगवणारे प्रश्न अनेक गुंते घेऊन येतात अन् मूठभर मातीच्या मालकीसाठी माणसे वर्षानुवर्षे भांडत राहतात.

मातीशी माणसे जुळलेली असतात, मग कारणे काहीही असोत. माती त्यांच्या जगण्याच्या परिघाला व्यापून असते. मातीचं माणसाला वेढून असणं सार्वकालिक आहे. ते काल होतं, तसं आजही आहे अन् उद्याही असणार आहे. पण काळाने कूस बदलली तसे आयुष्याचे संदर्भही बदलत गेले. मातीचा गंध साकळून वाहणारा वारा दिशा हरवल्यागत झाला आहे. मातीत जन्म मळलेली अनेक माणसे आजही आहेत, पण त्यांचं असणं विसकटत आहे. मातीच्या कणांशी नातं सांगणारी आयुष्याची रोपटी अंतरीच्या ओलाव्याअभावी मलूल होत आहेत. आयुष्य रुजलं, तेथे आज आठवणींचे ओसाड अवशेष उरले आहेत. माणसांचा राबता असणारं गाव शिवार मरगळ घेऊन जगत आहे. मातीवरचा त्यांचा विश्वास ढळतो आहे. शेतीमातीशी बांधलेली माणसे टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी परागंदा होत आहेत. स्वप्ने घेऊन नांदणारे आयुष्याचे आभाळ वांझोट्या ढगांसारखे भटकत आहे. सुखांचा सांगावा घेऊन येणारा वारा वाट चुकलेल्या पोरागत दिशाहीन वणवण करतो आहे. व्यवस्थेने आखलेल्या अक्षाभोवती आयुष्य प्रदक्षिणा करतंय, उत्तरांच्या शोधात. पण परिवर्तनाचे ऋतूच हरवले असतील, तर आयुष्याचे परगणे बहरतीलच कसे?

अस्तित्वाचा शोध माणसांना आणखी किती वणवण करायला लावेल? माहीत नाही. असहाय अस्वस्थता साऱ्या शिवारभर कोंडून राहिली आहे. जगण्याच्या प्रश्नांची टोके अधिक धारदार होत आहेत. सगळे विकल्प संपले की, शेवटाकडे पावले वळतात. अवकाळी मरणकळा अनुभवणारं शिवार गलबलून येतं. गोठ्यातील गव्हाणी रित्या होत आहेत. गुरेवासरे जीव गुंतवायचे विषय नाही राहिले आता. मळे पोरके होत आहेत. सगळेच विकल्प संपले की, माणसे हरवत जातात, प्रश्नांच्या जटिल गुंत्यात. सारं काही करून हाती शून्यच उरणार असेल, तर जीव कुणात गुंतलेच कसा? जगण्याचाही मोह पडावा, असं काही असायला लागतं. पण आहेच कुठे तो आस्थेचा कवडसा. राजाने छळलं, पावसाने झोडपलं, तर दाद कोणाकडे मागावी? आसमानी सुलतानी आपत्ती शेतकऱ्याच्या आयुष्याला लागलेली ग्रहणे आहेत. व्यवस्था मुकी बहिरी झाली की, आक्रोश हवेतच विरतात. शेती-मातीशी बांधलेला जीव गेला काय अन् राहिला काय, आहेच मोल किती त्याच्या आयुष्याचे? पाचपन्नास हजाराच्या कर्जपायी तो आयुष्याच्या धाग्यांना कापतो. खरंच व्यवस्था एवढी निबर झाली आहे का? लोकांचं दुःख पाहून सुखांचा त्याग करणारे, अंगावर केवळ एक पंचा परिधान करून आदर्शच्या परिभाषा अधोरेखित करणारे संवेदनशील नेतृत्व फक्त इतिहासाच्या पानापुरते उरले का?

समाजात दोन ध्रुवांमधील अंतर वाढत जाणे नांदी असते भविष्यातल्या कलहाची. विषमतेच्या वाटा वाढत जाणे अन् समतेचे पथ आक्रसत जाणे अनेक प्रश्नांचं उगमस्थान असतं, हे कळतच नसेल का कुणाला. की क्रांतीच्या इतिहासाचे विस्मरण झालं असेल? माहीत नाही. पण अस्वस्थता प्रश्न घेऊन नांदते आहे आयुष्याच्या वर्तुळात. परिस्थितीची दाहकता माणसांना सैरभैर करते. कुणी तुपाशी, कुणी उपाशी हा माणसांच्या जगण्याचा अर्थ नाहीच होऊ शकत. परिस्थितीने पोळलेले हात परिवर्तनाचे हत्यार धरताना थरथरत नसतात. ही अस्वस्थता केवळ आक्रंदन नसते. उसवलेल्या माणसांच्या मनातील उद्रेक, संताप सात्विकांच्या जगात मान्य नसेल. शिष्टसंमत विचारांत अधिष्ठित करता येत नसेल त्याला. पण जगणंच प्रश्न होतं, तेव्हा सज्जनांनी आखून दिलेल्या चाकोऱ्या उत्तरे देतीलच असे नाही. कधीतरी चौकटींच्या पलीकडे असणारे पर्यायही तपासून बघायला लागतात. पर्यायांची प्रयोजने पाहून प्रश्नांची प्राथमिकता नाही आकळत. प्राधान्यक्रम आखताना माणूस केंद्रस्थानी असावा लागतो, तेव्हाच पसायदानाचे अर्थ उलगडतात, नाही का?
**

मोह

By // No comments:


काही गोष्टी निसर्गनिर्मित असतात, काही माणसांनी तयार केलेल्या. निसर्गाकडून मिळणाऱ्या गोष्टी स्वाभाविकपणे वाट्यास येत असतात. प्रासंगिकता त्यांचे प्राधान्यक्रम ठरवत असते. काही माणूस स्वतः निर्माण करतो. ती त्याची परिस्थितीजन्य आवश्यकता असते. उदात्त असं काही विचारांत वसाहत करून असेल, तर ते योजनापूर्वक घडवावे लागते. ते काही वाहत्या उताराचे पाणी नसते. सहजपणे मार्गी लागायला. इहतली जगणाऱ्या प्रत्येकाला त्याच्यापुरता इतिहास असतो, तसा भूगोलही. काहींच्या वाट्याला अफाट असतो, काहींचा पसाभर, एवढाच काय तो फरक. अथांग, अफाट, अमर्याद वगैरे केवळ शब्दांचे खेळ, परिमाण दर्शवणारे. त्यांचे परिणाम महत्वाचे. ओंजळभर कर्तृत्वाच्या इतिहासाचे गोडवे गाऊन कोणाला मोठं वगैरे होता येत नसते. इतिहास केवळ गोडवे गाण्यासाठीच नसतो, तर परिशीलनासाठीही असतो. तसा अज्ञाताच्या पोकळीत हरवले संचित वेचून आणण्यासाठी प्रेरित करणाराही असतो. प्रेरणांचे पाथेय सोबत घेऊन आपणच आपल्याला पारखून घेत आपल्या वकुबाने परगणे आखून घ्यायला लागतात. त्या आपल्या मर्यादा असतात.

कृतार्थ क्षण आयुष्यात काही सहज अवतीर्ण होत नसतात. यशापयश त्यात्या वेळी घेतलेल्या निर्णयांचा परिपाक असतो. इतिहासाच्या परिशीलनाने त्याची कारणे समजून घेता येतात. भविष्य सुंदर करण्यासाठी वर्तमानातील मृगजळी सुखांचा मोह त्यागता येत नसेल, तर मिळवलेलं महात्म्य वांझोटे ठरते. त्याला आकार असतो, आत्मा नसतो. सत्प्रेरित विचाराने उचललेली चिमूटभर मातीही स्नेहाचे साकव उभे करू शकते. सुखांचा अवास्तव हव्यास माणूसपणावर प्रश्नचिन्हे अंकित करतो. तसंही समाधान सापेक्ष संज्ञा असते. पूर्तता भोगात नसते, ती त्यागातून उजळून निघते. काळाच्या अथांग विवरांमध्ये डोकावून पाहण्यासाठी नजर कमवावी लागते. अर्थात, हे सगळ्यांनाच अवगत असते किंवा मिळवता येईलच, असे नाही. पण अगत्य सगळ्यांनाच साधते. मोहाचा काकणभर त्याग समर्पणाची परिमाणे उभी करतो, फक्त त्याची परिभाषा समजून घेता यायला हवी. संस्कृतीने दिलेल्या संचिताचे गोडवे गाऊन, मूल्यांचे परिपाठ करून संस्कारांचे संवर्धन होत नसते. त्यांचं संक्रमण होणे आवश्यक. मूल्य शिकवण्यात असतातच, पण आचरणात आल्यास अधिक सुंदर दिसतात. माणसांचा सहज स्वभाव स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणेचा असला, तरी त्यागाची वर्तुळे निर्मितीचाही आहे. फक्त या दोहोंतलं अंतर आकळायला हवं, नाही का?

काळ कधी नव्हे इतका माणसाला अनुकूल असताना आणि हाती विज्ञानाने दिलेली निरांजने असताना अभ्युदयाच्या नव्या क्षितिजाकडे निघालेल्या माणसांच्या पायाखालच्या वाटा का अंधारून येत असतील? अज्ञानाची सांगता करण्याची संधी सोबत असतानाही माणसे संकुचित विचारांच्या साच्यात का गुंतत जातात? जगण्याच्या गतीत प्रगतीऐवजी गुंताच अधिक वाढतो आहे. ‘स्व’ला स्वैर सोडून ‘स्व-तंत्राने संचार घडणे, म्हणजे स्वातंत्र्य नाही. सामान्यांच्या आकांक्षांना मुखरित करणारा स्वर स्वातंत्र्याचे सहज रूप असतो. तो आसपासच्या आसमंतात अनवरत निनादत राहणे समाजाची सार्वकालिक आवश्यकता असते. त्यासाठी आपला आसपास समजून घ्यावा लागतो. समजून घेतांना आपणच आपल्याला आधी तपासून पाहावे लागते. मनावर साचलेल्या धुळीचे पदर पुसून काढावे लागतात.

माणूस आपला वकुब विसरून आत्मकेंद्रित जगण्याला प्रमाण मानायला लागला की, संवेदना आपले आकाश हरवून बसतात. आकाश आपलं अफाटपण विसरलं की, समोरची क्षितिजे खुजी होत जातात. अनभिज्ञ दिशांनी आणि अनोळखी वाटांनी साकळून आणलेली मोहतुंबी सुखे मनाला सुखावत राहतात, तसा मनात अधिवास करून असणारा स्वार्थ अधिक प्रबळ होत राहतो. आयुष्याची क्षितिजे संकुचित झाली की, स्वार्थाचा परीघ विस्तारत जावून संकुचित जगण्याला आत्मलब्ध प्रतिष्ठा प्राप्त होत जाते. उच्छृंखलपणाचे वारे वाहू लागले की, विचार पाचोळ्यासारखे सैरभैर भिरभिरत राहतात दिशा हरवून. मनाचं आसमंत अविचाराच्या काजळीने काळवंडू लागलं की, उजेड पोरका होतो.

साऱ्यांना स्वतःभोवती सुखांचा परिमळ सतत दरवळत राहण्याची आस लागली आहे. सुखांच्या प्राप्तीची परिमाणे बदलत आहेत. त्यांचा परीघ संकुचित होतो आहे. त्याग. समर्पण आदि गोष्टी सांगण्यापुरत्या उरतात, तेव्हा संस्कार घेऊन वाहणारे प्रवाह किनारा हरवून बसतात. ‘मी’ नावाच्या संकुचित परिघाभोवती माणसाचं मन घिरट्या घालू लागलंय. या परिघाच्या प्रदक्षिणा त्याच्या प्रगतीची परिभाषा होऊ पाहते आहे. माणसातील माणूसपण संकुचित विचारांच्या वर्तुळांनी वेढलं गेलं की, त्यातील सहजपणा संपतो. जगण्यातून सहजपण सहजपणे निघून जाणे आपल्या वर्तनातील विपर्यास नाही का?