शोधणं आलं म्हणजे सापडणंही आहेच

By // No comments:
माणूस नावाच्या प्राण्याच्या अनेकांनी अनेक अंगांनी अनेक व्याख्या केल्या आहेत. त्या यथार्थ किती, अतिशयोक्त किती अन् अगम्य किती, ते त्यालाच माहीत. पण सार्वकालिक वास्तव हे आहे की, तो दिसतो तसा नसतो अन् असतो तसा कळतोच असं नाही. कुणी म्हणेल, यात नवीन काय? अशी संदिग्ध विधाने म्हणजे माणूस समजून घेणं नसतं काही. लिहायचं म्हणून काहीही शेंडाबुडखा नसलेली विधाने अक्षरांकित करायची अन् अर्धवट विचारांनी भरलेल्या गोण्या पाठीवर ठेवलेलं घोडं पुढे दामतट ठेवायचं असा अर्थ नाही का होत, असल्या विधानांचा?

अर्थात, हे आणि असं काहीसं म्हणणं एक बाजू म्हणून अमान्य करण्याचं कारण नाही. कुणाचं काही मत असलं अन् ते एखाद्यास मान्य नसलं, तर त्याला फाट्यावर मारून पुढे निघावं असंही नसतं. मत कोणतंही असो, समर्थनाच्या बाजूने असो की, विरोधाच्या अंगाने, त्यासोबत भलाबुरा काही असला तरी एक अर्थ असतो, अनुभव असतो. तो धारणांचे किनारे धरून सरकत असतो. असं असेल तर त्याला नाकारायचं तरी कसं? कारण त्याच्यापुरतं ते वास्तव असतं अन् न टाळता येणारं असतं. त्याला असणाऱ्या कंगोऱ्यांचा अर्थ अवगत करून घ्यायला विचारांचा विस्तार समजून घ्यावा लागतो. परिस्थितीचे पदर पकडून तो प्रवाहित असतो. कुणाच्या अपेक्षांची परिपत्रके घेऊन वाहत नसतो.

अनुभव नावाच्या अनुभवाला अनुभवण्याचे अनुभव प्रत्येकाचे निराळे असतात. व्यक्तिसापेक्षतेच्या परिघाभोवती ते प्रदक्षिणा करत असतात. ही सापेक्षता मान्य केली, तर प्रत्येकाच्या वाट्याला आलेली अनुभूती वेगळी असण्याची शक्यता अवास्तव कशी ठरवायची? वास्तव वेगळं असतं अन् कल्पित त्याहून भिन्न असू शकतं. ते नाकारण्यात कोणतंही हशील नसतं. असं असलं तरी आयुष्य काही कल्पनेचे किनारे धरून पुढे नेता येत नाही. त्याला वास्तवाच्या प्रतलावरून प्रवास करावा लागतो. खरं हेही आहे की, चांगली माणसे बेरजेच्या गणितात नाही सापडत. चांगल्याचा अभाव असणं काही असामान्य नाही. चांगल्या गोष्टींचा अभाव आसपास असण्यात नवीन असं काही नाही. आदिम काळापासून इहतली नांदता असणारा हा प्रश्न. म्हणून माणसाचा चांगुलपणावरचा विश्वास उडला असंही नाही. याचा अर्थ चांगुलपण सगळंच संपलं असाही होत नाही.  

माणूस विचारशील वगैरे जीव असल्याचा निर्वाळा जवळजवळ सगळ्यांनीच दिला आहे. कदाचित त्याच्या वर्तनात प्रासंगिक विसंगती असेलही. कोणी म्हणेल यात ते काय विशेष? अन्य जीव विचार करत नसतील कशावरून? यात वादाच्या वाटेने वळायचं प्रयोजन नाही. करत असतीलही. पण माणूस अन् अन्य जीव यात असणारी जगण्या, वागण्या, असण्याची तफावत समजून घेणार आहोत की नाही? विचार सगळेच करतात हे मान्य. पण याचा अर्थ असाही नाही की, सगळेच सम्यक अन् सुयोग्य विचारांनी वर्ततात. सदवर्तनाच्या व्याख्येत सुव्यवस्थित सामावतात. विचार आहेत हे मान्य, पण विकारही सोबत आहेतच की. बहुदा काकणभर अधिकच आहेत. त्यांना वगळून  निखळ माणूस सापडला का कोणाला? 

माणूस विचार करतो हे ठीक. पण स्वतःचा विचार अधिक आणि आधी करतो, नाही का? असेल तसं. सगळेच जीव स्वतःपासून सुरू होतात अन् बऱ्याचदा स्वतःजवळ संपतात. स्व सुरक्षित राखण्याची उपजत जाण असतेच अन् आसपासच्या असण्याचं भानही. जगाचं जगणं समजून घ्यायचीही आस अंतरी असते. कदाचित हेच कारण अज्ञात किनारे धरून वाहण्यास प्रेरित करत असेल. जिज्ञासा दिमतीला घेऊन माणूस आपणास माहीत नसणाऱ्या प्रदेशात काय आहे हे डोकावून पाहतो. कदाचित या कुतूहलामुळेच तो आसपासच्या अगणित अज्ञात कोपऱ्यांचा धांडोळा घेत असतो. म्हणूनच इतर जिवांपेक्षा वेगळाही ठरतो.

शोधणं आलं म्हणजे, सापडणंही आहेच. पण प्रत्येकवेळी काही सापडेलच असंही नाही. शोधणं अन् सापडणं दरम्यान आपल्या असण्यानसण्याचा अर्थ लावणंही ओघाने आलंच. अर्थ लावायचा तर आपल्या चौकटी पार करणंही आहेच. काही मिळवायचं, तर आसपास असलेले बांध पार करायला लागतात. बंधने मोडायची तर आधी स्वतःला तपासून पाहणं घडावं. एल्गाराच्या व्याख्या पडताळून पहाव्या लागतात. आपणच आपल्याला नीटपणे पाहता यावं, म्हणून आपल्या उंचीचे संदर्भ समजून घ्यावे लागतात. त्याकरिता स्वतःच स्वतःला पारखून पाहावं लागतं. पाखडून घ्यावं लागतं. असतील काही पापुद्रे तर खरवडून काढायला लागतात. असतील काही व्यवधाने तर त्यांच्या आवश्यकता पाहाव्या लागतात. बंधने परिस्थितीने निर्माण केलेली असोत अथवा आणखी कुणी. बंधनांच्या बांधांच्या पलीकडून परिवर्तनाचे सूर साद घालत असतात. त्यांना प्रतिसाद देता यावा. बदलाचा आवाज नसेल ऐकू येत तर दोष कानांचा की, कानांना आज्ञा देणाऱ्या मेंदूचा? माहीत नाही. पण योग्यवेळी बदलून घेता आलं की, आपल्या आयुष्याचे एकेक अज्ञात पैलू आश्वासक वाटू लागतात अन् साद घालणारे अनोळखी आवाज आपलेच आपल्याला कळत जातात. 
- चंद्रकांत चव्हाण
••