Araman | अरमान

By // 10 comments:

अरमान
 
माणूस परिस्थितीचा निर्माता असतो की, परिस्थिती माणसाला घडवते, सांगणे अवघड आहे. काही असले तरी परिस्थितीने पुढ्यात आणून पेरलेल्या प्रसंगांना तोंड देत साऱ्यांनाच सामोरे जावे लागते, एवढं मात्र नक्की. पण कधीकधी परिस्थितीचे पाश असे काही आवळले जातात की, माणूस बाहुले बनून नाचत राहण्याशिवाय काहीच करू शकत नाही. जीवनसंगरात टिकून राहण्यासाठी केलेले सगळे सायास, प्रयास अपयशाचे धनी ठरतात. संघर्ष करूनही हाती शून्यच उरते. परिस्थितीने आखून दिलेल्या वर्तुळाच्या परिघात सीमित झालेली माणसे गरगरत राहतात दिशाहीन पाचोळ्यासारखी. जगण्याच्या सगळ्याच दिशा अंधारतात, तेव्हा धुक्यात हरवलेल्या प्रतिमा आपलाच चेहरा शोधीत राहतात वेड्यासारख्या. ओळख हरवलेले चेहरे नियतीने निर्धारित केलेल्या मार्गाने चालत राहतात स्वतःचा शोध घेत, सारं काही सोबत असूनही हाती काहीच नसलेल्या रित्या ओंजळी घेऊन. अंधारल्या वाटेवर चालताना अंतर्यामी कोंडलेली स्वप्ने कधीतरी उजळून येण्याची प्रतीक्षा करीत पळत राहतात, भग्न क्षितिजाकडे दिसणाऱ्या चिमूटभर प्रकाशाच्या ओढीने. जगण्यात सामावलेली पराधीनता नियतीच्या संकेतांना साकोळून आयुष्याच्या झोळीत येऊन पडते. कधीतरी अवचित एखाददुसरा आनंदाचा कवडसा दूरच्या क्षितिजावर लुकलुकताना दिसतो. मनात आशेचे फुलपाखरू भिरभिरायला लागते. पंखांमधली सारी ताकद एकवटून उजेडाच्या खुणावणाऱ्या बिंदूकडे झेपावते, काहीतरी हाती लागल्याच्या आनंदात. पण तोही भासच. मृगजळाचे प्राक्तन गोंदून आलेला धूसर क्षण वंचना घेऊन आयुष्यात विसावतो. अनपेक्षित हाती लागलेले चारदोन चुकार कवडसे अस्वस्थ वर्तमान बनून भविष्याच्या शोधात दिशाहीन वणवण करीत राहतात. ललाटी लेखांकित केलेलं प्राक्तन घेऊन माणसे सभोवताली आखून दिलेल्या शून्याभोवती प्रदक्षिणा घालत राहतात. शेवटी हाती उरते शून्य. हे शून्यही शून्यात विलीन होते आणि मागे उरतात या शून्य प्रवासाच्या काही स्मृती, त्याही प्रश्नांचे भलेमोठे चिन्ह घेऊन.

शून्यापासून सुरु होऊन शून्यावर संपणारा प्रवास काहींच्या जगण्याची बदलता न येणारी प्राक्तनरेखा बनतो. नशिबाने ओढलेली ही लकीर आयुष्यावर मिटता न येणारे ओरखडे काढीत राहते. परिस्थितीनिर्मित शून्य सोबत घेऊन जगणारी माणसं धडपडत राहतात सुखाच्या शोधात. जगण्यासाठी अनेक धडपडी करूनही अपयशाच्या भळभळणाऱ्या जखमा उरी घेऊन परिस्थितीच्या आवर्तात हरवलेलं असंच एक नाव स्मृतिकोशात कायमचं कोरलं गेलं आहे. जन्म-मृत्यूच्या नोंदी असणाऱ्या अभिलेखात ‘अरमानशा सुलेमानशा फकीर’ या नावाची वर्णमालेतील काही अक्षरांनी केलेली नोंद हीच त्याची पूर्ण ओळख, बाकी आयुष्यात सगळीकडून अपूर्णताच. अरमान किती सुंदर नाव! आपल्या असण्यात अनेक इच्छा-आकांक्षांना साकोळून घेणारे. अंगभूत सूर, नाद, लय घेऊन स्वतःच्या तालात निनादणारे. स्वप्नांच्या विश्वात विहार करणारे. पण वास्तव कधीकधी कल्पितापेक्षाही अधिक भयावह असते. त्याच्या भयावहतेची कल्पना नसते, म्हणूनच अज्ञानात आनंद शोधण्याशिवाय माणूस फार काही करू शकत नाही. वास्तवाच्या वाटेवर चालताना परिस्थितीचे निखारे पदरी बांधून चालणे काहींचे अटळ प्राक्तन ठरते. नियतीने त्यांच्या ललाटी हे अभिलेख कोरून कायम केलेले असतात. सगळे विकल्प संपतात, तेव्हा प्रयत्नांशिवाय दुसरे काही हाती उरतेच कुठे. आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतर नसते. समोर दिसणाऱ्या निखाऱ्यांवर स्वतःला भाजून घेण्याव्यतिरिक्त पर्याय नसतात.

परिस्थितीने पदरी दिलेली दाहकता सोशीत आयुष्यभर आपलाच शोध घेणारा अरमान माझ्या गावातल्या अनेकातला एक. त्याच्या असण्याची दखल जगाने घ्यावी, असे अनन्यसाधारण काहीही नसलेला. चारचौघांसारखा सरळरेषेत जगणारा. समाजाने निर्धारित केलेल्या नियमांच्या चौकटींमध्ये सभ्यतेचे सारे संकेत सांभाळून वागणारा. याच्या असण्याने ना व्यवस्थेच्या वर्तुळात कोणते तरंग उठणार होते, ना त्याच्या नसण्याने कोणती पोकळी निर्माण होणार होती. पण काही माणसे अशीही असतात, ज्यांच्या असण्या-नसण्याने कोणाला काही फरक पडणार नसला, तरी त्यांच्या स्मृती काळाच्या तुकड्यावर आठवणींचे गोंदण करून जातात. अरमानला त्याच्या नावाच्या अर्थाचे अन्वयार्थ कधी लावता आले नाहीत. जगण्याचे रोजच उसवणारे पापुद्रे सांधताना होणारी दमछाकच एवढी मोठी होती की, अर्थांचे आयाम समजून घायला अवधी कधी मिळालाच नाही. जगणे कितीही सुंदर असले, तरी मनावर गारुड करणारे मोहतुंबी पदर उकलून स्वतःकडे आणि जगाकडे बघण्याइतकी उसंत नियतीने कधी मिळू दिली नाही. प्राप्त परिस्थिती असे काही फासे जीवनपटावर फेकीत होती की, खेळलेला प्रत्येक डाव जगण्याची आधीपेक्षा अधिक कोंडी करीत होता. पडलेल्या पाशातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात अधिकाधिक गुरफटत होता. गुंत्याच्या गाठी अधिक घट्ट पीळ घालीत होत्या.

तसेही कुणाचा जन्म कुठे व्हावा, हे काही कोणाच्या हाती नसते. आपले जन्मपूर्व संदर्भ नियती निर्धारित करीत असते. माणसं नियतीनेच आखून दिलेल्या मार्गाने मुकाट्याने चालत राहतात, मनात सजवलेल्या स्वप्नांच्या प्रदेशाच्या दिशेने. घर, घराणे, कुल, परिस्थिती निवडण्याचे विकल्प माणसाच्या हाती असते, तर कदाचित जगात दुःख, यातनांचा वेदनादायी प्रवास घडलाच नसता. वेदनांचा वेद हाती घेऊन चालताना त्याची पारायणे करण्याची आवश्यकता राहिलीच नसती. पण हाही नुसता कल्पनाविलास. वास्तवात असे काही संभव होत नाही. आयुष्याच्या झोळीत पडलेलं दान आपलं मानून स्वीकारावंच लागतं. काही ते हसत स्वीकारतात, काही मुकाट्याने, सर्वबाजूंनी पर्याय संपले म्हणून काही आपलं मानतात, एवढाच काय तो फरक असतो. श्वास वाट्यास आल्यावर त्यांची स्पंदने सुरु असेपर्यंत घडणारा प्रवास अटळ प्राक्तन असतं. लाथ मरीन तेथे पाणी काढीन, असे कोणी म्हणत असला तरी जगणं ओझं वाटायला लागतं, तेव्हा अशी विधाने निव्वळ मानसिक समाधानासाठी केलेल्या कवायती वाटतात. तसंही जगणं एक कसरतच असतं. काहींना जरा अधिक उंचीवर त्याची दोरी बांधून मिळते. त्यावरून स्वतःला सावरत चालावंच लागतं.

गाव म्हटले की, गावाचा आणि माणसांचा स्वभावही स्वाभाविकपणे सोबत येतोच. स्वभावदर्शक शब्दांच्या साऱ्या छटा वास्तवात साकारणारी माणसे प्रत्येक वेळी, प्रत्येक काळी तसेच प्रत्येक स्थळी असतात. समाजात ती एकेकटी असली, तरी शोधली की सहज सापडतातही. पण अर्थांचे अनेक आयाम घेऊन जगणारे अपवाद. नकोसं जगणं सोबत घेऊन नियंता काहींना इहलोकी पाठवत असतो. नियंत्याचं हेच लेणं लेऊन अरमान अठरा विश्वे दारिद्र्य हीच एकमेव दौलत असणाऱ्या घरात जन्माला आला. त्याच्या आगमनाने चंद्रमौळी घरात आनंदाचं चांदणं बहरलं. गरिबाघरी धनदौलतीची स्वप्ने सहसा सोबत करीत नसतात. पण कधी कधी दारिद्र्यातही आनंदाचा कवडसा मोडक्या छपराच्या फटीतून उतरून वसतीला येतो. सुलेमानचाचाच्या मोडक्या संसारात अरमानच्या आगमनाने प्रकाशाची क्षीण थरथर झाली. थरथरणारी वात हाती लागली. ती तो जीवापाड जपत राहिला. परिस्थितीच्या वादळवाऱ्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत राहिला. त्याच्या मनी आनंदाचं झाड डवरून आलं. अल्ला दयावान असल्याची खात्री पटली. परवरदिगारच्या इनायतने हे सुख अंगणी आलं, याचं त्याला किती अप्रूप. खुदा किती दयाळू आहे, याचं वर्णन करतांना तो कधी थकत नसे. मुलाच्या जन्माने मनात साकोळून ठेवलेल्या मूठभर अरमानांची पूर्तता झाली. मुलाचे नाव अरमान ठेऊन आकांक्षांच्या आकाशात सुखाची इंद्रधनुष्यी स्वप्ने रंगवू लागला. पाचवीलाच पुजलेल्या दारिद्र्यात दैववश हाती लागलेल्या सुखाच्या क्षणांचा शहेनशहा समजत राहिला.

गरिबाला स्वप्ने पाहण्याचा अधिकार कदाचित नियती देत नसावी; पण स्वप्ने आम्हालाही पाहता येतात, हे सुलेमानचाचाने नियतीलाच निक्षून सांगितले. अरमानच्या घरभर धावणाऱ्या पावलांना सोबत करीत आणखी काही पाऊले पडक्या घराच्या ओसरीवर धावू लागली. त्याच्या पाठीवर भाऊ ‘सिराज’ जन्माला आला. दारिद्र्याच्या दलदलीत अधिवास असणाऱ्या घरांत स्वप्नांची कमले फुलू लागली. जीवनात वसंत अवतरला. त्याच्या मोहक गंधात मर्यादांच्या चौकटींनी बंदिस्त असणाऱ्या घराचे कोपरे चेहऱ्यावर प्रसन्न हास्याची लकेर लेऊन फुलत राहिले. सुलेमानचाचा साऱ्यांना त्याची दारिद्र्यातील संपत्ती सांगू लागला. “यही मेरी असली दौलत है। खुदाने मेरेलिये धन-दौलत नही बक्षी तो क्या हुवा। ये मेरे किमती हिरे जो मेरे पास है, वो मेरा टुटाफुटा आशियाना बदल देगे। एक दिन ऐसा भी आयेंगा, जिस दिन रोजीरोटी के लिये दरदर नही भटकना पडेगा।” सांगताना त्याच्या डोळ्यांमध्ये कितीतरी स्वप्ने साकोळून यायची, शब्दागणिक नक्षत्रांप्रमाणे चमकत रहायची. पण काळ ना कोणाचा सोयरा असतो. ना कोणाचा सखा. तो आपल्याच तालात आणि आपल्याच डौलात आपली ध्वजा फडकावत चालत राहतो. काळ त्याच्या तोऱ्यात चालत राहिला. सुलेमानचाचाची स्वप्ने त्याला सोबत करीत राहिली, त्याच्या निबीड अंधाऱ्या उदरात लपलेली आपली पसाभर सुखं शोधत राहिली.

काळ कधीकधी सूड उगवतो. त्या सूडसत्राच्या आवर्तात कोण कसा गुरफटेल कोणास माहीत. त्याला गती असते तशी प्रगतीही असते. कृतीही असते; पण दुर्दैवाने दृष्टी नसते. पायाखाली येणाऱ्या दिशाहीन वाटेने तो पळत राहतो, आपलं सावज शोधत. त्याच्या नजरेस श्रीमंत-गरीब, राव-रंक असं काहीही दिसत नसतं. काळाच्या कराल तडाख्यात सुलेमानचाचा सापडला आणि नियतीच्या एका आघाताने सारं उध्वस्त झालं. काडीकाडी गोळा करून बांधलेलं घरटं उधळलं गेलं. या परिवाराची परिस्थिती पाहून हळहळण्याशिवाय कोणी काहीच करू शकत नव्हतं. गावातली माणसे सांगत, ‘चांगल्या माणसाच्या वाट्यास असे भोग का यावेत? काही कळत नाही.’ ज्या माणसाने गावात कुणाचं चुकुनही कधी वाईट केलं नाही. कोणाच्या वाईटावर एका चकार शब्दाने बोलला नाही, त्याच्या नशिबी अशा जिवघेण्या यातना का याव्यात? की गतजन्माचा व्यवहार नियती पूर्ण करते आहे? अर्थात, अगतिक विधानांशिवाय माणसांच्या हाती काहीच नसल्याने, असे निराशेचे सूर शब्द बनून हळहळत राहायचे.

माझ्या आयुष्याच्या उमलत्या वयाची वीसबावीस वर्षे गावमातीच्या गंधाने अजूनही भारलेली आहेत. घडणाऱ्या लहानसहान घटनांच्या स्मृतींनी प्रेरित आहेत. गावाने माझ्या जगण्याच्या प्रत्येक कृतीत संवेदनांची प्रयोजने पेरली. दारिद्र्यातही मनाची श्रीमंती कधी ओसरू न देणाऱ्या संस्कारांचं मनाच्या मातीवर सतत सिंचन केलं. गावमातीने जिवाभावाची नाती दिली, तशी आपलेपणाच्या ओलाव्याने ओथंबलेली माणसेही दिली. या मातीतला अनमोल ठेवा काही असेल, तर मला मिळालेले मित्र. ही श्रीमंती भरभरून वाट्याला आली. काही वयाने मोठे, काही लहान, तर काही समवयस्क; पण मैत्रीच्या नात्यात वयाची बंधने कधी बांध घालू शकली नाहीत. मैत्रीच्या नितळ नात्यात कधी अंतराय आला नाही. माझ्यापेक्षा वयाने दोनतीन वर्षांनी लहान असणारा अरमान आम्हां साऱ्यांच्या मैत्रीच्या नात्यातला बहरलेला ऋतू होता. निर्झरासारखा प्रसन्नपणे वाहणारा. या वाहत्या उत्साहाला थांबण्याचा शाप नव्हता.

सुमार उंचीचा, अंगापिंडाने बऱ्यापैकी भरलेला; पण थोडा स्थूलतेकडे कलणारा. अरमानला दारिद्र्यात मिळालेली ही एकमेव निसर्गदत्त श्रीमंती. आणि त्याने कमावलेला स्वभावाचा सरळपणा ही त्याची स्वअर्जित दौलत. अंगावर बारा महिने तेराही काळ विसावलेला रंगीत बनियन. तो कधीतरीच नवा दिसायचा. चाळणी होईपर्यंत अंगावरच त्याचं वास्तव्य. धुण्यापुरता अंगावरून बाहेर पडायचा. खाकी हाप पँट आणि पांढरा सदरा शाळेत गणवेश म्हणून सक्तीचा असल्याने सदरा तेवढा शाळेच्या वेळेपुरता देहावर दिसायचा. अर्थात, तोही गोधडी शिवायच्या जाड्याभरड्या धाग्यांचे गोंदण करून अधिक देखणा झालेला. मधल्यासुटीत कुठल्याशा कारणांनी मित्रांशी झोंबाझोंबी केल्याने बाही आणि शोल्डर यांची बहुदा फारकत झालेली असायची. तडजोड करीत संसार करणाऱ्या जोडप्यांसारखा मोडणारा संसार कुठल्यातरी धाग्यांनी जबरदस्तीने सांधून ठेवलेला असावा, तसा टाके घालून सदरा आणि बाही सावरलेली. कमरेवरच्या पँटने कायमची एकात्मकता जपलेली. जोडलेल्या ठिगळांना मूळचा रंग असलाच पाहिजे म्हणून याची कोणतीच सक्ती नसायची. तिचा उपयोग शरीर आणि लज्जा रक्षणार्थ असल्याचा याचा दावा. कधीतरी सणवाराच्या निमित्ताने किंवा काही कारणाने खुशीत असला की, डोक्यावर जाळीची गोल टोपी दिसायची. टोपी डोक्यावर असली की, जगातल्या श्रीमंतांच्या यादीत आपलंही एक नाव असल्याच्या थाटात हा वावरायचा. मिनिटाला दहावेळा चापून-चोपून नीट बसवायचा. त्या दिवशी याचे हात मोकळे असण्यापेक्षा डोक्यावरच अधिक असायचेत. पायात चप्पल असण्याचा सार्वजनिक प्रघात नसण्याचा तो काळ. अरमानचे याबाबत वर्तनही कालसंगतच; पण आपलं वेगळेपण जपणारं. कधीतरी याच्या पायात पादत्राणे असली, तर त्यांची जोडी कधीच जमलेली नसायची. एका पायात स्लिपर आणि दुसऱ्या पायात चप्पल, हे ग्रेट कॉम्बिनेशन तोच करू जाणे. त्याची त्याला कधी खंत वाटली नाही. त्याच्या दृष्टीने चप्पल पायात आहे, हेच एक समाधानाचे कारण. की परिस्थितीने त्याला शिकवलेलं हे शहाणपण होते, सांगणे अवघड आहे.

गावाकडून नदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ऐसपैस पसरलेला माळ पोरासोरांना अंगाखांद्यावर खेळवत राहायचा. अशा कितीतरी पिढ्या त्याने आपल्या कुशीत घेऊन वाढवल्या. शाळेत जाणे सगळ्यांना सक्तीचे असल्याने मुलं शाळेकडे निघून गेलेली असायची. सगळा धिंगाणा, धावपळ अचानक थांबायची. दुपारच्या उन्हात मरगळ घेऊन आळसावलेला माळ निवांत पहुडलेला राहायचा, मावळतीकडे झुकणाऱ्या सूर्याकडे टकामका पाहत; संध्याकाळी पुन्हा जाग येणाऱ्या पावलांच्या, आरोळ्यांच्या प्रतीक्षेत. पोरासोरांच्या धावत्या पावलांची नक्षी आपल्या देहावर कोरून लेकुरवाळेपण अनुभवत सुखावलेला दिसायचा. लेकरांचं हुंदडणं कौतुकाने पाहत मनाशी हसत राहायचा. वात्सल्याचा पान्हा घेऊन ममतेने पाझरत राहायचा. कबड्डी, सूरपारंब्या, आबाधबी असे काय-काय खेळ खेळत राहायचा मुलांसोबत. विटीदांडूचा खेळ बहरात आलेला असायचा. कोणावरतरी राज्य असायचं. पट्टीचे खेळणारे त्याची दमछाक करीत राहायचे. अशावेळी अरमान सगळ्यांचे सावज ठरलेला. राज्य देण्यासाठीच हा खेळला, घेण्यासाठी खेळणे याच्या कुंडलीत नसावे. क्वचित त्याचं राज्य आलं की, पुढच्या दोनतीन मिनिटात, हे औटघटकेचे राज्य संपलेलं असायचं. पण त्याचं प्रामाणिकपण आपल्यावरचं राज्य देताना कधी ढळलं नाही. रडीचा डाव तो कधी खेळलाच नाही. पळून-पळून धाप लागली की म्हणायचा, “अरे यार, जरा रुको तो सही। सास तो लेने दो गरीब को। मै कहा भागा जा रहा हू।” तरीही सारे एकच कल्ला करायला लागले की याचं ठरलेलं “देखो, मै अभीतक भागता रहा हू। नही बोला क्या मैने। ज्यादा करोगे तो सचमुच भाग जाऊंगा।” मग मुलं त्याला थोडी उसंत द्यायची. हा आपला पुन्हा उभा राहायचा एखाद्या वीराच्या थाटात, राहिलेलं राज्य देण्यासाठी. अरमान पळत राहायचा आणि मुलं ओरडून त्याला प्रोत्साहन देताना देहभान विसरायची. कुणालातरी शाळेची वेळ झाल्याची आठवण व्हायची. रंगात आलेला खेळ टाकून सारे सुसाट सुटायचे. सकाळ असेल, तर संध्याकाळी आणि संध्याकाळ असेल, तर उद्या सकाळी राज्य देण्याच्या बोलीवर खेळ थांबायचा. ही उधारी घेऊन अरमान सतत खेळत राहिला. मुलं त्याच्या भोळेपणाचा फायदा करून घेत त्याला खेळवत राहिली. पण त्यातही एक निर्व्याज आनंद होता, ओथंबून आलेलं आपलेपण होतं.

शाळेत जाण्यासाठी वाहने असण्याचा तो काळ नव्हता. असलेच काही तर दोनतीन जणांकडील मोडक्यातोडक्या सायकली. गावापासून दोनतीन कि.मी. अंतरावर असणाऱ्या शाळेत सगळेच पायी जायचे. वाटेवरून हुंदडत रहायचे. ऋतुमानानुसार शेतात उपलब्ध होणाऱ्या वस्तू चोरून खात राहायचे. मुगाच्या शेंगा, काकड्या, टरबूजं, केळी, तुरीच्या शेंगा कायकाय ओरबाडत राहायचे. सगळेच रस्त्याला लागलेले असायचे. पण अरमान घरून उशिरा निघायचा तोही मोठ्या थाटात, त्याच्याकडे असणाऱ्या मोडक्या सायकलवरून. ही सायकल त्याच्या कोणत्यातरी नातेवाईकाने त्यांच्याकडे वापरायला कोणी नाही म्हणून दिलेली. डोक्यावरील टोपीनंतर त्याला अधिक जवळची आणि प्रिय असणारी ही दुसरी वस्तू. खरंतर लोखंडी सांगाड्याचा आकार सायकलचा असल्यामुळे तिला सायकल म्हणायचे; एकसंघ सायकलचे कोणतेही गुणधर्म नसलेली ती एक वस्तू होती एवढेच. कधी घंटी आहे, तर सीट नाही. घंटी, सीट आहे तर मडगार्ड नाहीत आणि हे सगळे असले, तर ब्रेक नाहीत. हा सारा ऐवज सोबत घेऊन मस्तपैकी शीळ घालत, कधी भसाड्या आवाजात मोठ्याने सिनेमाची गाणी म्हणत अरमान सायकल दामटत राहायचा. मुलांचा घोळका त्याच्या वाटेवर मुद्दामहून आडवा. तो दुरूनच ओरडायचा ’अरे, हटो! इसमे ब्रेकच नही है, मरोगे साले सब के सब!’ मुलांना माहीत असायचं, याच्या सायकलला ब्रेक नाहीत. हा सीटवरून उतरून दांड्यावर यायचा आणि दोन्ही पाय मोकळे सोडून जमिनीवर घासत सायकलचा वेग आवरायचा प्रयत्न करायचा. कोणीतरी आडवा येऊन हँडल पकडून थांबवायचा. ‘या खुदा!’ म्हणत हा सुटकेचा श्वास सोडायचा. खाली उतरून सावरेपर्यंत कुणीतरी त्याच्या मोडक्या सायकलवर टांग टाकून रस्त्याने लागलेला असायचा. पळायचा सायकल घेऊन, पण परतायचा हातपाय सोलून आणि बोंबलायचा अरमानच्या नावाने. तेव्हा हा सांगायचा “देखो बापू, मैने तुमकू पहेलेही बोला था। इसमे ब्रेक नही है, तो तुम कायकू ले गये। मैने बोला था क्या सायकल लेके जावो।”

शाळेत, वर्गात, गावात कुठेही असला तरी अरमान कधी चिडला, रागावला असं अपवादानेच घडलं असेल. वर्गात भिंतीकडील रांगेत कोपऱ्यातला शेवटचा बाक याची बसायची नेहमीची जागा. ही याची शाळेतील स्वयंघोषित जागीर. येथे बसलो म्हणजे मास्तरांचं लक्षच नसतं आपल्याकडे, हे याचं स्वनिर्मित तत्वज्ञान. शाळा आणि याच्या पत्रिकेतील गुण कधी जुळले नाहीत. अम्मी-अब्बा जबरदस्तीने येथे पाठवतात, म्हणून त्यांच्या समाधानासाठी हा येथे येणारा. शारीरिक शिक्षणाचा एक तास वगळला, तर सगळे विषय एकजात याच्या शत्रूयादीत येऊन स्थानापन्न झालेले. मराठीच्या तासाला अहिराणीत एखादा पाठ का नसावा? या प्रश्नाचं याला सतत कोडं पडलेलं असायचं. खरंतर आपल्याला अहिराणीत शिकवलं पाहिजे असं याचं म्हणणं. हिंदी याला समजायला जवळची असली, तरी यार इसमे कुछ दम नही. हे याने परस्परच ठरवून टाकलेलं. अहिराणीविषयी याला नितांत प्रेम असलं, तरी याची अहिराणी बहुदा मराठी, हिंदी, उर्दूमिश्रित. सारीच राष्ट्रीय एकात्मता. या भाषांना त्याने एकाच पात्रातून वाहत ठेवले. भूगोलातल्या डोंगर, दऱ्या, नद्या याला आपल्या गावातल्या परिसरापेक्षा कधीच सुंदर दिसल्या नाहीत. इतिहासातल्या लढायात याचा पक्ष नेहमीच छत्रपतींच्या बाजूने राहिला. शिवाजी महाराज याच्यासाठी सुपर, ग्रेट वगैरे होते. त्याच्यासाठी जीव की प्राण. ‘यार ये दुश्मन लोक हमारे यहां आये। आये तो आये, हमे परेशान करते रहे, अच्छा हुवा इनका राज डूब गया।’ हा याच्या इतिहासाचा अस्मिता जागर. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासच खरा इतिहास. बाकी सगळा मिळमिळीत, हा याच्या इतिहासाच्या अध्ययनातून मिळवलेल्या ज्ञानाचा शेवट. गांधीजींनी इंग्रजांना हाकलले म्हणतांना जणूकाही हाच त्यांना हाकलायला गेला होता, या आवेशात कथन करीत राहायचा. म्हणूनच की काय इंग्रजांचाच नाही, तर इंग्रजीचाही याला प्रचंड तिटकारा. गणित-भूमिती याचे सगळ्यात मोठे आणि बलवान शत्रू, म्हणून त्यांच्याशी त्याने कशी संघर्ष केला नाही. हे विषय शोधणारे रिकामटेकडे असावेत, असे याला प्रामाणिकपणे वाटत असे.

शाळा नावाच्या विश्वापासून जरा अलिप्त राहणारा. बऱ्याचदा मधल्यासुटीनंतर हा वर्गात दिसण्याऐवजी घराकडे जाणाऱ्या परतीच्या रस्त्यावर हमखास दिसायचा. तासावर वर्गात येणारे शिक्षक याला शोधून प्रश्न विचारणार, हे ठरलेलं. हिंदीचा तास वर्गात सुरु होता. शिक्षकांनी याला प्रश्न विचारला, “अरमान, बोलो क्या है इस सवाल का जवाब?” आपल्याला प्रश्न विचारू नये म्हणून स्वतःला लपवत सुरक्षित होऊ पाहणारा अरमान प्रत्येकवेळी कसनुसं करीत उभा राहायचा. हा उभा राहिला तरी वर्गात खसखस पिकायची. आज आपली यातून सुटका नाहीच म्हणून आलेल्या प्रसंगाला सामोरे जात चेहऱ्यावर उसनं अवसान आणीत वेंधळेपणाने गडबडीत बोलून गेला “लाजवाब है सर!” अख्खा वर्ग हास्याच्या लाटेवर स्वार होऊन तरंगत राहिला बराचवेळ. शिक्षकही आपलं हसू लपवू शकले नाहीत. अर्थात, शाळेतल्या सगळ्याच शिक्षकांना त्याच्या वागण्या-बोलण्याविषयी माहिती होती. त्याच्या नितळ, निर्व्याज स्वभावाविषयी मनातून आस्थाच होती. अरमानचं उत्तरासाठी बोलणं वर्गातील सगळा ताण संपवण्याचं रामबाण औषध होतं.

गावाला लोकसंख्येच्या परिमाणात मोजताना मूठभर विशेषण पुरेसे ठरेल, पण या मुठीत किती विविधता सामावलेली होती. जात, धर्म या ओळखी पुसता न येणाऱ्या असल्यातरी माझ्या गावात यामुळे माणसांमध्ये वितुष्ट आल्याचे मलातरी आठवत नाही. मिळणाऱ्या ओंजळभर समाधानाच्या सुखात सारे संतुष्ट होते. गावाच्या गरजा फार मोठ्या नसल्याने सुख या शब्दाची सीमा सीमित करून सगळे आनंद अनुभवत होते. सारे खावून-पिऊन समाधानी होते. अर्थात, हे वर्णन कोणत्या कथेतले नाही. गाव असेही असू शकते का? याचे प्रमाण माझा गाव. इतर गावांत वसतीला असणाऱ्या माणसांसारखी माझ्या गावातही विविध जाती-धर्माची माणसे वास्तव्याला आहेत. त्यात मुस्लीम समाजाची पाचसहा घरे निवाऱ्याला विसावलेली. कधीपासून माहीत नाही, पण खूप वर्षे झाली असतील. परंपरेने दिलेली ओळख काहीही असली, तरी नावांचं वेगळेपण वगळता या कुटुंबाना विलग करता येईल, असे काहीच नव्हते यांच्यात आणि गावातल्या माणसात. पिढ्यानपिढ्या येथल्या मातीशी समरस झालेली. गावमातीचा गंध घेऊन वाढलेली. यांच्या आणि गावातील लोकांच्या वागण्यात परस्परांचा धर्म कधी आड आल्याचे दिसले नाही. सण, उत्सव, परंपरा, जत्रा साऱ्यांच्याच होत्या, साऱ्यांसाठीच होत्या. वेगळंपण शोधूनही सापडणे असंभव. गावसणाला, जत्रांना, धार्मिककार्याला ही माणसे गावाने कधी वगळली नाहीत. गावाच्या जत्रेत-उरुसात वाजणाऱ्या ढोल-ताशाच्या मधुर नादाला कधी धार्मिकतेचा आवाज आला नाही. पोटझोड्याच्या ठेक्यावर साऱ्यांना ताल धरून नाचवणारे हात कोणत्या धर्माचे आहेत, हा विचार कुणाच्या मनाला कधी शिवला नाही. लग्नकार्यासारख्या वैयक्तिक समारंभात रात्रीला बीद फिरतांना नाचणाऱ्यांना बँडपेक्षा पोटझोड्याचे अधिक आकर्षण असायचे. अशा समारंभात अरमानला वाजा वाजवताना पाहणे आनंदयोग असायचा. देहभान विसरून वाजा वाजवताना अरमान सुरांचे दुसरे रूप झालेला असायचा. घामाने चिंब भिजून अंगावरून धारा वाहत राहिल्या, तरी याचा आवेश तसूभरही कमी होत नसायचा. जणू त्याचा देहच आवाज झालेला असायचा.

जगण्यासाठी रोजच्या भाकरीचा प्रश्न या कुटुंबांनी कष्टार्जित साधनांनी सोडवला. यांत्रिकीकरणाचे वारे गावपरिसराला लागले नव्हते तोपर्यंत सुतापासून झोरे विणण्याची कामे ही कुटुंबे करायची. यांनी विणलेल्या झोऱ्यांना मागणी नाही, असे सहसा घडले नाही. कुटुंबातील काहीजण पत्र्याचे डब्बे, टोपल्या, हंडे, कोठ्या घडवण्याचे काम करायचे. कधी हंडे, टोपल्या, धान्य मोजण्याची घडवलेली मापटी बाहेरून आणून विकायचे. काही रोजंदारीने शेतात मजुरीला जाऊन जे काही मिळेल, त्यात समाधान शोधायचे. जगण्याची आस असली, तरी तिला कुबेर बनण्याचा सोस कधीच नव्हता. अरमान शाळेत टिकणार नव्हता. तसा तो टिकलाच नाही तेथे. दहावी नापास होऊन घरच्या वर्तुळात विसावला. लग्न करून संसारी झाला. कष्टाळू स्वभावामुळे मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरू लागला. काळाच्या ओघात अगणित बदल घडले. विज्ञानतंत्रज्ञानाने नवी परिमाणे अंकित केली. तंत्रज्ञानाने कुणाचं काय कल्याण केलं असेल ते असो; पण या बदलांच्या वेगाने नाकासमोर चालणाऱ्या आणि सुतासारख्या सरळ जगणाऱ्या कुटुंबासमोर अनेक प्रश्न उभे केले. झोरे कोणी घेईनात. कारण ताडपत्र्या स्वस्तात मिळू लागल्या. शेराने धान्य मोजण्याचे प्रयोजन फारसे उरले नाही. विनिमयाचे माध्यम म्हणून पैसा प्रमाण मानण्याचा प्रघात पडला. माणसापेक्षा त्यालाच अधिक प्रतिष्ठा प्राप्त झाली. पत्र्याच्या हंड्यांची जागा चकचकीत स्टीलच्या हंड्यानी कधीच घेतली. विनिमयाची माध्यमे बदलली, पण जगण्याचे पर्याय कुठे बदलले. भाकरीचा प्रश्न कालही होता, तसाच तो आजही राहिला. भाकरी कमावण्याचे मार्ग मात्र आक्रसत गेले. भाकरी तीच असली, तरी रोज खात्रीलायकपणे मिळण्याची शास्वती राहिली नाही.

परिस्थिती माणसाला बदलण्यास बाध्य करते. अरमानही बदलला. बदलणे त्याच्या जगण्याची अनिवार्यता होती. स्टीलची छोटी-मोठी भांडी बाजारातून आणून पंचक्रोशीत विकू लागला. यासाठी हाती असणारे मोठे भांडवल त्याच्याकडे होतेच कुठे. कशीतरी गणिते जुळवायची. आला दिवस ढकलत राहायचे. हा क्रम बरेच दिवस सुरळीत चालला. तालुक्याच्या व्यापाऱ्याकडून उधारीने भांडी आणून विक्री करू लागला. कधी रोख, कधी उधारीने. त्याने विश्वास टाकला; पण सगळ्याच माणसांच्या इमानावर विश्वास कसा ठेवायचा? आधीच गरिबी, त्यात त्याला कसा आणि काय, कोण जाणे आर्थिक फटका बसला. साध्याभोळ्या अरमानच्या सरळपणावर हा आघात होता. या आघातातून तो पुन्हा कधी सावरू शकला नाही. असं सांगतात की, या घटनेचाच त्याच्या संवेदनशील मनावर परिणाम झाला आणि त्याचं मनावरील संतुलन सुटलं. काही कळायचं बाजूला राहिलं, तो वेड्यासारखा वागायला लागला. जीवनाची दिशा चुकली. रस्ता भरकटला आणि रस्त्यावर स्वतःशीच बडबड करीत आपल्याच तंद्रीत भटकू लागला. ‘मेरे सब बर्तन ठीक है ना! मै उनको बेचुंगा और नये लेके आऊंगा।’ असे काहीतरी असंबद्ध बरडत राहिला. भटकत राहिला. आईबापाने आणि लहान भावाने सगळं सगळं काही केलं; पण काहीच उपयोग नव्हता. त्याच्या बायकोसमोर मोठाच प्रश्न उभा राहिला. पोटी चार लेकरे, सगळं आभाळच फाटलं कुठं कुठं टाका घालावा. दिवसेंदिवस परिस्थिती अधिक बिकट होत राहिली. कुठे वाट सापडेना. पावलापुरता प्रकाशाचा कवडसा दिसेना. तरीही उमेद सोडता येत नाही. परिवार उमेद घेऊन नशिबाशी झगडत राहिला.

फाटक्या कापडाची झोळी खांद्याला लावून, डोक्यावर त्याची आवडती टोपी घालून अरमान सकाळी सकाळी गावात पीठ मागण्यासाठी निघायचा. दारासमोर उभं राहून अंगणातूनच आवाज द्यायचा. त्याच्याकडे पाहून काळजात चर्र व्हायचं. मनातील आठवणींचे थवे अचानक जागे व्हायचे. सहज म्हणून त्याच्याशी बोलायचो, “काय अरमान, काय रे भो! बरं शे ना.” तेव्हा नुसता चेहऱ्याकडे निर्विकारपणे पाहत राहायचा, कुठलीही ओळख नसल्यासारखा. त्याच्याशी बोलणाऱ्या माणसांकडे त्रयस्थासारखा एकटक बघायचा, संदर्भांचे सारे धागे सुटल्यासारखा. शून्यात हरवल्यासारखा मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत उभ्या जागीच अस्वस्थ हालचाली करीत राहायचा. कधीकाळी आमच्यासोबत खेळताना, शाळेत जातांना सहज बोलायचा, “क्या बापू, तुम हुशार लोक है। तुम पढलिख लोगे। साला, हमेच कुछ आता नही। हमारा इस्कूल मै जाना और आना होकर भी कुछ पल्लू पडताइच नही।” खरंतर त्याला शाळा कधी समजलीच नाही किंवा ती त्याची गरजच नव्हती. शाळा त्याने समजून घेतली नाही; पण जगण्याच्या वाटेवर असताना नियतीने त्याला जीवनही समजू दिले नाही. लाख प्रयत्न करूनही नापास शिक्का त्याच्या जीवनाच्या प्रगतिपत्रकावर पडलाच. जगण्याच्या धडपडीची सगळीच गणिते वजाबाकीची होत गेली. गुणाकार कधी झालाच नाही, निदान बेरीज तरी जुळायची होती; पण तीही चुकलीच. शाळेत गणितापासून सतत दूर पळणारा, येथेही जीवनाच्या गणिताने याला पळवलेच. त्याला असा पाहून माणसे काळजातून तुटत होती, हळहळत होती. सगळेच जेमतेम परिस्थितीचे आणि दारिद्र्याचे सखे-सोबती असल्याने त्याच्यासाठी फार काही करू शकत नव्हते. आपल्या घासातून पसा-मूठ पीठ याच्यासाठी राखून ठेवत होते. दारिद्र्याचे दशावतार पाहणारे घर त्या पिठावर जगत होते. तगत होते. आला दिवस पुढे ढकलत होते.

काळाची गणिते सहसा चुकत नसतात. त्याची समीकरणे अचूक उत्तरात जुळत असतात. दिवसेंदिवस अवघड होत जाणाऱ्या परिस्थितीतून अरमानचे कुटुंब सुटत नव्हते. दैवाचे भोग सूत्ररूपाने एकेक पायरी उत्तरे शोधत होते. सगळंच नाही, पण काहीतरी ठीक होण्याच्या मार्गावर असताना एक दिवस अरमानने शांतपणे डोळे मिटले. जगाचा निरोप घेतला, अंधाराची सोबत करीत निघून गेला. आशेच्या कवडशाचा हात पकडून अरमान इहलोकी आला तसा अज्ञात अंधारवाटेने निघून गेला, मागे पोरवळा ठेऊन. आईवडील, भाऊ, बायको, पोरं त्याच्या आठवणींसह जगत राहिली. कोंड्याचा मांडा करून आला दिवस ढकलत आणि उद्याची चिंता करीत. आईवडील थकले. लहान भावाने घर सांभाळण्याचे प्रयत्न केले. गावात मिळून मिळून कितीसे काम असेल? उदरनिर्वाह अवघड असतो, त्याला पर्याप्त सुविधा हव्या असतात. पोट आणि पोटातील भूक काही ऐकत नसते. दुसऱ्या वाटा शोधणे गरजेचे होते. घरच्या अवघड परिस्थितीने शिक्षणाची वाट अर्ध्यावर थांबवलेली. म्हणून शहरात बांधकामाच्या सेंट्रिंगसाठी कामावर जावू लागला. परिस्थितीच्या आवर्तात रुतलेली घराची चाकं थोडी हलली; पण नियतीच्या मनात परत काही वेगळेच असावे. तिने परत एकदा अचूक वेळ साधली. चार पैसे वाचतील म्हणून रस्त्याने जाणाऱ्या मोटारसायकलवर याने लिफ्ट घेतली, ती आयुष्याची अखेरची ठरली. नवी उमेद घेऊन चालणाऱ्या आयुष्याच्या प्रवासाला पूर्णविराम मिळाला. अपघातात तोही गेला, जीवनाच्या कलहात संघर्ष करतांना हरला. अगणित प्रश्नाचं मोहळ मागे ठेऊन गेला.

नियती रुष्ठ होऊन कोणत्या जन्माचा सूड उगवत होती, कोणास माहीत. घर परत एकदा कोसळलं. पण उमेद कोसळत नसते. वय झालेले अरमानचे अम्मी-अब्बा दोन हात करीत नियतीशी धडका द्यायला पुन्हा एकदा उभे राहिले. लहान मुले सांभाळीत, घर परत उभे करण्यासाठी खस्ता खात लढत राहिले. अरमानला जावून दहा-बारा वर्षे झाली. मजुरीच्या कामावर जावून पोटापुरत्या भाकरीच्या प्रश्नांचं उत्तर शोधीत मुलं मोठी झाली. पण त्यांच्या जगण्याच्या वर्तुळातून अरमानच नाही गेला, त्याच्यासोबत परिवाराचे अनेक अरमानही सोबत घेऊन गेला. परिस्थितीच्या आवर्तात हरवलेला आकार जगण्याच्या विस्तीर्ण पटावर कोणताही कोलाज कोरत नाही. त्याच्या जीवनाचे चित्र कधी सुंदर चौकटींच्या प्रमाणबद्ध आकारात बंदिस्त करून रंगवले गेलेच नाही. अरमान नियतीच्या दुर्दैवी पाशात अडला. परिस्थितीच्या पाशातून मुक्त होण्यासाठी नियतीशी दोन हात करतांना कालचक्राच्या गतीत अडकला. मुक्त होण्यासाठी झटत राहिला, झगडत राहिला; पण त्याचा प्रतिकार तोडका पडला. नियतीने त्याच्या परिवाराच्या ललाटी असे भोग का लिहिले असावेत? याचे उत्तर कदाचित नियतीलाही देता येणार नाही. हे सगळे भोग आपल्याच वाट्याला का? याचा जाब खुदाकडे तो विचारेल का? ‘आम्ही असं काय केलं होतं तुझं, म्हणून आमच्या वाट्याला हे सगळं दिलं?’ हे विचारण्याचे बळ त्याला तेथे असेल का? की तेथेही हा हसत असेच म्हणत असेल, ‘क्या तुम भी...’