झालं असं की...

By // 1 comment:
गेल्या सप्ताहातील ही गोष्ट. गोष्ट म्हटल्यानंतर काहीतरी ऐकायला, नाही म्हणजे वाचायला मिळणार, या अपेक्षेने तुम्ही जरा सावरून वगैरे बसला असाल तर एक सांगून ठेवतो, तुमचा भ्रमनिरास नक्कीच होणारये, अगदी शतप्रतिशत! खरंतर मी हे काही सांगतो आहे, याला गोष्ट म्हणावं का? हाच मोठा प्रश्न आहे. गोष्टीसाठी किमान काही निकषांच्या लहानमोठ्या पट्ट्या आवश्यक असतात. त्या परिमाणांनी समोरच्या पसाऱ्याला मापावं लागतं. याचा अर्थ सगळा पसारा मापात बसतोच असं नाही. बसवता येतो, असंही नाही. तरीही कुणी अशी काही परिमाणे टाकून मोजलं तर ‘गेल्या सप्ताहातील गोष्ट’ हे माझं विधान सपशेल बाद होतं. पण पद्धत असतेना, असं काहीसं म्हणायची की गोष्ट अशी अशी होती वगैरे वगैरे.


असो, तर त्याचं झालं असं की, व्हॉटसअॅपच्या एका समूहात मला समाविष्ट करून घेण्यासाठी समूहप्रशासक भावाचा संदेश आला. आता तुम्ही विचाराल की, संदेश काय एकट्या तुम्हालाच येतात का काय? आले तर यात नवीन ते काय? समजा नवीन काही असलं, तर ते काही जगावेगळं वगैरे थोडीच असणार आहे. आणि या भावाला काही नावबिव आहे की नाही? आहे हो...! सांगतो ना सावकाश. एका दमात किती प्रश्न समोर उभे केले तुमचे तुम्ही? मान्य आहे की माणसांच्या मनातून प्रश्न वजा केले, तर मागे काय उरेल हाही प्रश्नच आहे. नाव कसंही असो सरळ, वाकडं, आवडतं, नावडतं ते सगळ्यांनाच असतं. आहे ते नाव त्याच्याकडे असतंच, पण कोणीतरी कुठल्याशा निमित्ताने आणखी काही नावे त्याला चिटकवून देतो. एकुणात काय की, नाव नाही असा इहतली कोणी नाही. निदान मलातरी गवसला नाही.
 
शेक्सपिअर वगैरे नावाच्या कोण्या मोठ्या माणसाने लिहून की सांगून ठेवलंय, नावात काय असतं म्हणून. ते त्यानं विलायतेत वगैरे सांगितलं. पण आपल्याकडे कोणालाही विचारलं तर हमखास सांगेल की, ‘बस नामही काफी है...’ वगैरे वगैरे. नाममहात्म्याची महती माहीत असणारी आपण माणसे. कोणाकोणाला कोणकोणत्या नावांनी आठवणीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात कायम कोंबत आलो आहोत. एखाद्या नावाविषयी आस्था असणं काही वावगं नाही. अनुरक्त असण्यात अतिशयोक्ती नाही अथवा कोणी अंतर राखून असेल, तर तसं असणंही स्वाभाविकच. एखाद्या गोष्टीबाबत काही इकडे, थोडे तिकडे करणारे कंगोरे असतातच. अशावेळी प्रश्न पडतो, नेमका कोणता कोपरा आपला म्हणावा. बुद्धिमंत माणसे सतत शब्दांशी खेळत आली आहेत. सामान्यांच्या वकूबाची काही काळजीच नसते हो महानतेची महती माहीत असणाऱ्या या माणसांना. त्यांचा प्रवासच महत्तेच्या वाटा धरून चालणारा. तर ते असो. हे काही फार फार महत्त्वाचं नाही येथे.

तर, तो भाऊ म्हणाला. सर, “तुमची हरकत नसेल तर आमच्या अमक्या अमक्या समूहात तुम्हाला जोडून घेतो...” समूहाचं नाव येथे उधृत करायलाच हवं, असं काही नाही. नामाची महती मलाही मान्य असली तरी. हे महात्म्य वगैरे खरं असलं, तरी माणसाच्या मनाला वास्तवापासून विलग नाही करता येत, हेही खोटं नाहीये. वास्तव हे आहे की, आपल्या आकलनाचे सगळे संदर्भ कुठल्यातरी नावाभोवती प्रदक्षिणा करत असतात. नाव वाजत राहण्यासाठी अन् गाजत ठेवण्यासाठी काय आणि किती कष्ट करायला लागतात. नाव नावाजलेलं असेल तर प्रश्नच नाही, पण कुठल्याशा कारणाने वाजलेलं असलं तर संधी साधून गाजवावं लागतं, नाही का?

हा जो नामजप मी करतो आहे, त्याचा संदर्भ व्यक्तीपूजेशी आहे. अन्य कोणत्या बाबींशी नाही, हे आधीच नमूद करून घेतो. नाही तर माझ्या नावालाच महात्म्याची लेबले लावून मंडित केलं जाईल. झालं परत विषयांतर... असं असतं वाहवत जाणं. काही सवयी सहज सुटत नाहीत हेच खरं. आता कुणी याला जित्याची खोड... वगैरे म्हणलं तर राग यावा असं काही नाही. तर, तो भावड्या म्हणाला, “समूहावर सगळेच बऱ्यापैकी साहित्यिक अन् विचक्षण वाचक वगैरे असल्याने इतर समूहांमध्ये असणारा वैताग येथे असण्याची शक्यता नाही.”

आता याला तुम्ही संवाद म्हणा की आणखी काही. काहीही असलं, तरी ते काही फार आवश्यक नाही. सांगणं महत्त्वाचं. समूहात असण्याचे अगणित अनुभव अनेकांना आहेत, म्हणून त्यावर तुमचा वेळ खर्ची नाही घालत. मूळ मुद्द्यावर येतो. त्याचं म्हणणं वाचून येथे वैताग नाही, या एका वाक्यावर रेंगाळलो. वैताग नाही, चांगली गोष्ट आहे. पण आपल्यालाच या सगळ्या गोष्टींचा वैताग असेल तर...? आता तुम्हाला वाटेल की, हा काय स्वतःला मोठा साहित्यिक, विचारवंत वगैरे कोणी समजतो का? की आपलं नसलेलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी उगीच आढेवेढे घ्यायचे? नाही हो, मी असा काहीही नाही. अंशमात्रही नाही. खरंतर काहीच नाही, हे म्हणणं अधिक सयुक्तिक. पण असं कुठे आहे की, सामान्यांनी आपले विचार व्यक्त करू नयेत. एखादी गोष्ट नसेल आवडत तर भूमिका घेऊ नये का?

असो, विषय भलतीकडे वळतो आहे. तर वाचून वगैरे लिहलं, “भावा, मला तुमच्या समूहात घेऊन फारसा काही उपयोग नाही. म्हणजे असंय की, माझा आजपर्यंत कुठल्याही समूहातील वास्तव्याचा लौकिक आहे की, सबंधित समूहातील सगळ्यात अधिक निष्क्रिय सदस्य कोण? असं कुणी विचारलं तर डोळे झाकून माझं नाव घेता येतं. बऱ्याचदा, म्हणजे जवळपास नेहमीच म्हणाना, याबाबतीत माझा प्रथम क्रमांक ठरलेला. आयुष्यात काही कुठली बक्षिसे नाही मिळवता आली कधी. पण कोणी भविष्यात समूहावरील निष्क्रिय सदस्याला बक्षीस दिलं, तर ही संधी मात्र कधीच हातची जाऊ देणार नाही मी. समूहावर ना मी कुठली प्रतिक्रिया देत, ना कुठल्या पोस्ट पाठवत. म्हणजे एका अर्थाने असून अडचण... वगैरे वगैरे.”

“असूद्या हो सर, त्यानी फारसा काही फरक पडत नाही अन् असंही तुम्ही करीत असलेलं लेखन चांगलंच (?) असतं. निदान यानिमित्ताने का असेना कधीतरी, काहीतरी समूहावर येईल. किमान एखाद दोनांकडून वाचलं जाईल.”

मूठभर काय पण टोपलीभर मांस आधीच कृश असलेल्या माझ्या देहावर चढलं. साला, एवढे दिवस आपण कोण, हेच आपल्याला कळत नव्हतं की काय, असं उगीच वाटून गेलं! आता आपण एवढे उंच झालोच आहोत तर घ्या मिरवून, हा मनाला सुखावणारा विचार अधिक प्रबळ होत गेला. खरे असोत की खोटे, असे साक्षात्कार अधूनमधून झाले की, आयुष्य गोड, मधुर काय म्हणतात, ते वाटायला लागतं, नाही का? तर ते असो. नाईलाजाला कोणत्याच शास्त्रात अन् शस्त्रात क्षतिग्रस्त करण्याचा काडीमात्र इलाज नसतो. म्हणूनच त्याला नाईलाज म्हणत असावेत. शेवटी काय... तर आणखी एका समूहावरचा निष्क्रिय सदस्य म्हणून यादीत सन्मानाने स्थानापन्न झालो.

आता तुम्ही म्हणाल, निष्क्रिय राहायचं तर मग जागा कशाला अडवून बसायची. स्पष्टपणे नाही म्हणजे नाही सांगायचं ना! बरोबर आहे तुमचं म्हणणं. माझी अजिबातच हरकत नाही. पण काय असतं की, स्नेह नावाचा एक मधाळ प्रकार असा काही असतोना की, तेथे अन्य उपाय चालत नाहीत. आणि गुंता तेथेच असतो. या स्नेह नावाच्या प्रकाराचं क्षेत्रफळ अजिबातच काढता नाही येत. त्याच्या लांबीरुंदीखोलीची मापे मोजणं अवघड. एकूण प्रकरण असं असल्याने ज्याकाही मर्यादा असतात, यांनाच कोणी भीड, मुर्वत वगैरे म्हणतात. त्याला वळसा टाकून पुढे नाही पळता येत माझ्यासारख्या सामान्य माणसाला. असामान्यपणाची लेबले कोणालाही लावता येतात, पण खरं कारण मोह टाळता नाही येत हेच खरं. समजा पलायनाचा पर्याय स्वीकारला, तरी तुमच्याविषयी एक प्रतिमा तयार झालेली असते, त्याचं काय? ती धूसर होणे अथवा काळवंडणे कोणाला रास्त वाटेल? असं आडमुठेपणाने वागणंही सयुक्तिक नसते, नाही का? झालं परत विषयांतर. मोहात्मा बनणं काही केल्या टाळता नाही येत हेच खरे.

तर, मी लिहतो... म्हणजे असंय की, काहीतरी निमित्ताला कारण देऊन माझ्याकडून खरवडलेल्या अक्षरांना अधोरेखित करून आंतरिक आस्थेतून स्नेही मंडळी मला लिहितो वगैरे नावाचं लेबल चिटकवतात. आपल्याकडे नसलेल्या अशा बिलोरी आरशांच्या नक्षीने सजवलेल्या झुली कोणी अंगावर टाकून जात असेल, तर त्या अधिक देखण्या वाटायला लागतात. त्याचं अप्रूप वाटतंच कितीही नाही म्हटलं तरी. मी काय किंवा आणखी कोणी काय, शेवटी माणूस या शब्दापर्यंतच आपला परीघ असतो, नाही का?

लेखक म्हणवून घेणं कितीही आनंददायी असलं, तरी लिहित्या हातानी लेखांकित केलेल्या अक्षरांनी आयुष्यातील असे कोणते प्रश्न निकाली निघाले? केवळ अक्षरांचा संभार सांभाळून जगण्यातून विवंचनानी काढता पाय घेतला, प्रश्नांनी अखेरचा आचका घेतला. काळवंडलेलं आभाळ नितळ वगैरे झालं, असं कधी प्रकर्षाने प्रत्ययास वगैरे आलं आहे का? अशा सरळसोट गोष्टी घडणं जरा अवघड आहे. निदान आपल्याकडे तरी तसे दिसत नाही. अन्यत्र असेलही असं काही, माहीत नाही. खरंतर एवढा इतमाम आपल्याला पेलवत नाही. कोणी म्हणत असेल की, अवधी लागत असला तरी साहित्याच्या परिशीलनाने परिस्थितीत परिवर्तन वगैरे नक्कीच होत असतं. त्याकरिता लिहावं. असेलही कदाचित तसं. चांगली गोष्ट आहे. स्वप्ने सगळीच वाईट नसतात, हेही खरेच.

आता वादाला अनायासे मुद्दा मिळाला असेल कोणाला तर आधीच सांगतो, काही विधाने, घटना, प्रसंग, पात्रे वगैरे वगैरे केवळ काल्पनिक असतात. त्यांचा जीवित अथवा मृत व्यक्ती, वस्तू, प्रसंग, स्थळ, घटना इत्यादी इत्यादीशी दुरान्वयानेही संबंध नसतो. असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. हुश्श! आता कसं मोकळं वाटतंय! काय असतं की, हल्ली माणसांची मने फार म्हणजे फारच प्रचंड कोमल, संवेदनशील वगैरे झाली असल्याने कशावरून अन् कोणत्या कारणांनी दुखावतील हे सांगण अवघड. बरं ज्याचं हे संवेदनशील मन वगैरे दुखावलं गेलं, त्या दुखावणाऱ्या जिवाला तरी माहीत असतं की, नाही कोण जाणे, आपण का दुखावले गेलो आहोत? उगीच आपल्यावर आघात नको व्हायला. नाहीतर आपली आपण आतापर्यंत आस्थापूर्वक सांभाळलेली आकृती बिघडायची.

जे काही असेल ते असो, साहित्याचा विद्यार्थी असल्याने मनातले विचार बऱ्यापैकी शब्दांकित करता येतात इतकेच. एम. ए. तीसएक वर्षांपूर्वीच झालं. पण अजूनही विद्यार्थीच समजतो मी स्वतःला. (विनयशीलता!) समोरचा माणूस एवढा विनयाने वाकला की कसं मूल्यांनी संपन्न, संस्कारांनी समृद्ध असल्याचं वाटतं नाही! आपली संकृती, परंपरा अशाच वागण्यातून सुंदर दिसते नाही का? स्वतःला विद्यार्थी म्हणवून घेताना एक चांगलं असतं की, झालाच काही गाढवपणा आपल्याकडून तर सुटायला मोकळं. हा यातला अध्याहृत फायदा. खरंतर साहित्य विषयातून अभ्यास करणाऱ्या कुणाही विद्यार्थ्याला किमान स्तरावर अभिव्यक्त होता यायलाच हवं, नाही का? हे जरा अवघड होतंय नाही?

साहित्यातून पदवी, पदव्युत्तर पदवी संपादित करणारे धड चार चांगली वाक्ये लिहू, बोलू शकत नसतील, तर याला प्रगतीच्या कोणत्या कप्प्यात कोंडावं? आला वादाचा मुद्दा! असो, कुणाला तसं वाटत वगैरे असेल तर वरच्या परिच्छेदात उल्लेख केला आहेच. निव्वळ योगायोग समजावा. परत हुश्श!! अर्थात उत्तम गुण खात्यात जमा होण्यामागे कोणत्यातरी आयत्या नोट्सच्या रतीबाची किमया अथवा उत्तम स्मरणशक्तीची पुण्याई असू शकते. याला काही कोणी आव्हान नाही देऊ शकत, नाही का?

अरे हे काय चाललंय? विषयांतर नको. मूळ मुद्दा सोडून भलतीकडेच चाकं वळतायेत. हो, आलोच! हे असं होतं बघा. माणसाचा स्वभावाच असा की, तुम्हाला चांगलं लिहिता, बोलता येतं असं कुणी सांगितलं की, आपल्या असलेल्या नसलेल्या; बहुदा नसलेल्याच उंचीचे आकस्मिक साक्षात्कार व्हायला लागतात. आत्मप्रतिमा, आत्मप्रत्यय वगैरे मानसशास्त्रातील संकल्पना आपल्याकरिताच तयार झाल्याचं वाटायला लागतं. असतो हो स्वभाव माणसाचा थोडा असा आणि थोडा तसा. सुखावतो तो असं काही सकारात्मक ऐकायला आलं की. सगळ्यात लिप्त असतो तो. अलिप्त राहायला तो काय अलौकिक असं काही सोबत घेऊन जन्माला आलेला नसतो अथवा कोण्या महात्म्याने निर्देशित केलेल्या वाटेने प्रवास करायला संतमहंतही नसतो.

असो. शेपूट वाढतच चाललं आहे आणि विषय बाजूला पडतोय. तर मी लिहितो म्हणजे काय करतो. हे मी कसं सांगावं? मनात उदित होणाऱ्या विचारांना अक्षरांच्या कुशीत देऊन भावनांना आकार देण्याचा प्रयत्न करतो. तर, माझ्या अशा व्यक्त होण्याला कुणी वेगळी शैली, कुणी आगळी अभिव्यक्ती वगैरे गोंडस नावांनी संबोधतात इतकंच. (निर्व्याज स्नेह, दुसरं काय...) खरंतर शैली अभिव्यक्ती वगैरे खूप भारदस्त शब्द झाले.

असो. प्रत्येकाच्या व्यक्त व्हायच्या काही धारा असतात, तशा काही धारणा. काही वाटा असतात, काही दिशा. अक्षरांची संगत करीत निघालेल्या वाटेवर काही अवचित भेटतं. शब्दांशी सख्य साधताना संवाद घडतो अन् त्याला अक्षर परिमाण लाभतं. याचा परिणाम अशा मोठेपणाच्या झुली आस्थेतून चढवल्या जातात. इच्छा असो, नसो मिरवाव्या लागतात. त्या दिसतात छान. वाटतात त्याहून छान. पण याचा अर्थ सगळं सुंदरच असतं असं नाही. काही सोयीचे कंगोरेही असतात त्याला.

कोणी सांगतो की, तुमचं हे-ते लिहिलेलं मस्त आहे. कोणी कळवतो की, तुमच्या अमक्या-तमक्या अनुभवांना घेऊन केलेलं लेखन मनात प्रसन्नतेचा परिमल पेरून जातं. खरंतर कोणी काही लिहितो तेव्हा यात वेगळं असं काहीच नसतं. आपल्या असण्या-नसण्यावर परिसराचे, परिवाराचे, वातावरणाचे संस्कार वगैरे होणं साहजिक असतं. कुणाच्याही बाबतीत सहज घडणारी ही क्रिया आहे. त्यात नवं काहीच नाही. असलंच काही, तर त्याठायी असणारी संवेदनशीलता. फक्त तिला तेवढ्याच तरल मनाने प्रतिसाद देता यायला हवा. कदाचित मला तो बऱ्यापैकी देणं जमलं इतकंच. हे भागधेय म्हणू माझं हवंतर. हे पाथेय दिमतीला घेऊन व्यक्त होतोय, यात वेगळं ते काय?

अस्तित्वाच्या मुळांपासून सहजी विलग होणं अवघड. साहित्य, कला, संगीत वगैरे गोष्टींशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या घरात जन्मलो. पण आस्थेच्या कोंदणात सजलेल्या संदर्भांना समजून घेणाऱ्या परिसरात वाढलो, घडलो असल्याने, हे संचित सोबत घेऊन आयुष्याचे अर्थ परिमित का असेनात समजून घेतोय. आणि हो, हे समजून घेताना एक समजलं की, आयुष्य खूप लहान आहे अन् आसपास अमर्याद... आता उरलेल्या उन्हाळ्यापावसाळ्याची बेरीज करत जगण्यातून वजा होत जाणाऱ्या चिन्हांचे अर्थ लावतो आहे. बघू, नियती म्हणा अथवा निसर्ग किती सोबत करतोय. आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यासाठी अन् आनंदासाठी आवश्यक असणाऱ्या काही विधायक उचापती करतोय, तो जगण्याचा एक भाग मानतो. नाकासमोर चालणे वगैरे म्हणतात ना तसाच आहे. कुणाच्या अध्यात, ना मध्यात. फार बोलघेवडा नाही, पण माणूसघाणाही नाही. ज्याला भिडस्त वगैरे स्वभाव म्हणतात ना, तसाच काहीसा! अंतरावर उभं राहून कुणासाठी ओंजळभर काही करता येणं संभव असेल तर करणारा.

आता या लिहण्याला कुणी परिचय समजा, मिरवणूक म्हणा, मखरात मंडित होणं समजा की आणखी काही, त्यानी असा कितीसा फरक पडणार आहे? फार काही जगावेगळं कर्तृत्व नसलेला, पण आपली वाट शोधण्यासाठी ओंजळभर आस्था घेऊन चालणारा नक्कीच आहे. कुणीतरी आखून दिलेल्या चौकटीत चारचौघांसारखा विहार करीत असलो, तरी कुंपणे पार करण्याची उमेद घेऊन आनंदाची अभिधाने शोधण्याची आस अंतरी कायम असणारा अवश्य आहे.

हे लिहिण्याची काही आवश्यकता होती का? बरं लिहलं, तर एवढा फाफट पसारा कशासाठी? अन् संबंध जोडायचाच, तर तो बादरायण कशाकरिता? असं कुणाला वाटत वगैरे असेल तर तुमचा तो हक्क अबाधित आहेच. आयुष्याला अर्थ देणाऱ्या, न देणाऱ्या सगळ्याच गोष्टी ठरवून कराव्यात असं कुठे आहे? काही सहज करून बघाव्यात अशाही असतातच. जावं कधीतरी त्याही वाटेने पावले वळती करून. व्यक्त आणि अव्यक्त यातलं अंतर कळण्याइतके कृतीचे कंगोरे आयुष्यात कोरता यावेत. ते कोरता आले की आयुष्याला आकार देता येतो. भले सगळ्याच आकारांची सुंदर शिल्पे नसतील होत. नाही का?
- चंद्रकांत चव्हाण  

**

ज्याचा त्याचा विठोबा

By // 1 comment:
काय कारण होतं ते नेमकं आठवत नाही आता. पण काही दिवसांपूर्वी गावी गेलो होतो. पाऊसकाळाच्या आगमनाची नुकतीच चाहूल लागलेली. आसपासच्या आसमंतात तसे बदल जाणवू लागलेले. निसर्ग आपली वाट पकडून चालत असतो. ती त्याची नियती नसते, ना त्याचं भागधेय, ना प्राक्तन. नियतमार्गाने प्रवास करणं त्याचा परिपाठ असतो. त्यात पर्याय नसतात, ना कोणता प्रत्यवाय असतो. तो आपल्या आगमनाचा आनंद घेऊन येतो, तशा प्रस्थानाच्याही पाऊलखुणा मागे पेरून जातो. संकेत देतच असतो तो आपल्या गमनागमनांचे. फक्त ते कळण्याएवढं जाणतेपण आपल्या कृतीत नांदतं असायला लागतं. पावसाळ्यापूर्वी करून घ्यायच्या वावरातल्या, घरातल्या कामांची झड लागलेली. सगळ्यांना घाई झालेली. सगळी माणसं आपापलं काम हातावेगळं करण्याच्या घाईत. कुणी शेतात रमलेला. कुणी बांधबंदिस्ती करण्यात लागलेला. घराकडे यायचा रस्ता वावराकडूनच असल्याने थोडावेळ थांबलो. पाहत राहिलो बांधावरून सगळ्यांची लगबग. त्यांची ती लगीनघाई. ऊनसावलीच्या संगतीने कष्टणाऱ्या देहांची ब्रह्मानंदी टाळी लागलेली. कामं करणाऱ्यांत उगीच कशाला लुडबूड, म्हणून निघालो तिकडून अन् गावरस्ता धरून पुढच्या पाचसहा मिनिटात घरी पोहचलो. 

घराच्या ओसरीवर माय, मावशी, मामी नेहमीप्रमाणे गप्पा करीत बसलेल्या. यांच्या सोबतीला असणाऱ्या आसपासच्या आयाबायाची वर्दळ नसल्याने ओसरी बऱ्यापैकी शांत. कदाचित काही दुवे कुठल्याशा कारणांनी अन् कामांमुळे अंतरावर राहिले असावेत आज. नाहीतर ओसरी ओसंडून वाहत असते या सगळ्या समवयस्क बायांच्या गप्पांतून. लेकरं अन् घर सांभाळणं याचं रोजचं काम. सक्तीने म्हणा अथवा संकेतांनी यांच्या पदरी पेरलेलं. खरंतर वाढत्या वयाच्या वाटाच या वळणावर आणून उभ्या करतात. त्यात निवड वगैरे भाग बहुदा नसतोच. पोरं शेजारी हाताला लागेल त्या वस्तूसह खेळण्यात रमलेले. गाडी अंगणात उभी केली. ओट्याच्या पायऱ्या पार करून ओसरीत आलो. पायातले बूट काढून कोनाड्याकडे सरकावले अन् पडवीत पडलेल्या पोत्यावर जावून बसलो. 

मला असा अनपेक्षित घरी आलेला पाहून सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अस्पष्ट प्रश्नचिन्ह रेखांकित झालेलं. माझ्या चेहऱ्याकडे बघत त्यांचे डोळे काही अदमास घेऊ पाहतायेत. उत्तर शोधू पहातायेत. माझ्या घरी येण्याला काही ठोस अन् खास कारण नसल्याचे, थोडं इकडचं तिकडचं बोलण्याच्या ओघात कळल्यावर कदाचित त्यांना हायसं वाटलं असावं. 

ओसरीच्या उजव्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत चारहात अंतरावर कोपऱ्यात तिवईवर विसावलेल्या माठाच्या डोक्यावर ध्यानस्थ बसलेला ग्लास आईने उचलला. त्यापासून चार पावलं दूर आपलं आसन मांडून बसलेल्या रांजणातून त्याला आकंठ अंघोळ घालून पदराने पुसत माठाकडे चालत आली. ग्लास स्वच्छ असल्याची परत खात्री करून त्याला माठात बुडवला. पाणी भरला ग्लास माझ्या हाती देत मी काय सांगतो का, म्हणून माझ्या चेहऱ्याकडे पाहत राहिली. आल्या पावली परतायचं असलं की, नेहमीच्या सवयीने हा जेवण करणार नाही याची पूर्ण खात्री असतानाही जेवणाचं बघते म्हणून आग्रह करू लागली. माझं नेहमीप्रमाणे उत्तर तिच्या पुढ्यात. चहा करते सांगून माझ्या होकार नकाराची वाट न पाहता चुल्ह्याकडे वळती झालीदेखील.

मी मध्येच उगवल्याने मावशी आणि मामीचा थांबलेला संवाद पुढचा धागा पकडून नव्याने सुरु झाला. वारीसोबत पायी जायचा बेत आखत होत्या दोघीही. त्यांच्या बोलण्याकडे आधी फारसं लक्ष नाही दिलं. पण त्यांचं आपापसातलं बोलणं ऐकून कळलं की, याचं यंदा पायी वारी करणं पक्कं झालंय. त्यांना थांबवत पुन्हा विचारून खात्री करून घेतली, विषय नेमका काय आहे. त्यांचा संवाद वारी या एका शब्दाभोवतीच भ्रमण करीत होता. दोघीही आपल्या मतावर ठाम. कुणी कितीही अन् कसेही अडथळे आणले, तरी निर्णयापासून तसूभरही विचलित व्हायचं नाही, हे जवळपास नक्की झालेलं.

त्यांचं बोलणं ऐकून थोडा अदमास घेतल्यावर माझ्या विचारांची पट्टी चिटकवत म्हणालो, “तुमची वयं किती असतील आता?” 

माझ्या बोलण्याचा मथितार्थ न समजल्याने दोघीही माझ्याकडे नुसत्या बघत राहिल्या थोडा वेळ. असेल याला सहज विचारायचं वगैरे वाटलं असावं म्हणून मामी बोलत्या झाल्या. म्हणाल्या, “असतील साठबासस्ट किंवा अशीच थोडी कमी अधिक काही!”

“तुम्हांला काय वाटतं, या वयात पायी वारी पेलवेल तुम्हांला? झेपेल हे सगळं सहजपणे.” मी

माझ्या बोलण्याचा अर्थ त्यांना लागला असावा. माझ्या स्वयंघोषित विचारधारेवर पलटवार करीत आत्मविश्वासाने मावशी बोलली, “न पेलवायला काय झालं? आणि आम्ही कुठे थकलो आहोत अजून? चांगल्याच तर आहोत. आमचे हातपाय चालतायेत. प्रकृतीच्या चिंता करण्याजोगत्या कुठल्या कुरबुरी अजूनतरी नाहीत. आमच्याहून अधिक वयाची बायामाणसे पायी वारी करतात. ते काही वाढत्या वयाचं गाणं नाही गात बसत.” 

“कोण काय करतो यापेक्षा आपण काय करू शकतो, हे अधिक महत्त्वाचं असतं, असं नाही का वाटत तुम्हांला? पण तुमचं गणित तर वेगळंच दिसतंय. समोरच्या कुणी बायाबापड्या वारी करायला निघाल्यात, म्हणून तुम्हीही तसं करावं असं काही असतं का?” माझ्या विचारांचं घोडं नेटाने पुढे दामटत राहिलो मी. 

“तसं नाही काही. वारी काही आम्हाला नवी आहे का? कितीदा जाऊन आलो.” मावशीने आपल्या म्हणण्याच्या समर्थनार्थ भूतकाळ खोदायला सुरवात केली.

“हो, खरंय तुमचं म्हणणं. पण त्यावेळेचं तुमचं असणं आणि आताचं वय याचा काही विचार कराल की नाही?” त्यांना फार युक्तिवाद न करू देता म्हणालो. 

“काय होतं त्याने. चालवेल तेवढं चालू अन् नाहीच जमलं तर असतातच वाहने सोबत. जावू बसून पुढे त्यातून.” मामीने पर्याय तयारच करून ठेवला असावा बहुतेक. तो माझ्या पुढ्यात आणून मांडला.

आपण माघार घ्यायची नाही हे ठरवूनच त्यांना पुन्हा प्रश्न विचारला, “समजा, नाही गेलात वारीला तर काय होणार आहे?”

“काय होईल की नाही, हे काही माहीत नाही. तुला समजावून सांगता येण्यासारखं आमच्याकडे नाही काही. आम्ही काही तुझ्यासारखे शिकलोसवरलो नाहीत. पण एक खरंय की वारी करण्याचं मनात आलं. नाही जाता आलं वयाच्या या अखेरच्या पडावात, तर राहून गेलं याची रुखरुख राहील कायमची. हातपाय धड आहेत तोपर्यंत जाऊन यावं. थकलो की कोण जाऊ देईल आम्हाला. ती राहायला नको म्हणून चाललो आहोत इतकंच.” मावशी 

“समजा राहिली खंत तर त्याने तुमच्या जगण्यावर असा कोणता मोठा परिणाम होणार आहे? सलग नसलेही, पण अधूनमधून का असेना आतापर्यंत वारी करत आलातच ना! तेवढी पुण्याई पदरी पडली असेल तर ती काय कमी आहे? त्यावर विठोबा काही हरकत नाही घेणार आणि विचारणारही नाही की माझ्या भेटीत एवढा खंड का पडला म्हणून.” माझ्या प्रश्नांचे शेपूट वाढवत बोललो. 

“मिळाली संधी तसे आपल्या घरांतून, गावातून कुणी ना कुणी पिढ्यानपिढ्या वारीच्या वाटेने चालतायेत. ती सगळी माणसे काय वेडी होती म्हणून नाही. सगळ्यांना दरवेळी जाता येतंच असं नाही. अधूनमधून का जाणं असेना, पण विठ्ठल भेटीची आस अंतरी असतेच ना. विठ्ठल कोणासाठी काय असेल असो, पण त्याला आपला मानणाऱ्यांसाठी सगळं आहे. असं सगळ्यावर कुणी पाणी सोडून देतो का?” मावशी.

“अरे, पण तुमचं वय झालं, याची थोडी तरी काळजी असूद्या.”  मी.

“कसलं वय आणि कसली काळजी. आमचं काय बरंवाईट होणार असेल तर ते बघायला आहे पांडुरंग. त्याला त्याची काळजी. आम्ही कशाला करायची?” मामी. 

“म्हणजे साक्षात विठ्ठल येथे आला तरी तुम्हांला वारीच्या वाटेवर चालण्यापासून थांबवू नाही शकत, असंच म्हणायचं आहे ना!” मी.

“तसं समज हवं तर. तो विठ्ठल एकदा मनात येऊन बसला की, जनात वावरताना आपण कोण हे कळतं. पण त्याच्यासाठी आधी विठ्ठल तर समजून घेता यायला हवा ना!” मावशी.

त्यांचं मत बदलण्याचा निष्फळ प्रयत्न करीत म्हणालो, “एवढी वर्षे विठ्ठल समजून घेत आलात ना! मग आता त्यालाही थोडी संधी द्याना तुम्हांला समजून घेण्याची.” 

आपापल्या मतांसाठी आमचं आग्रही बोलणं सुरु असताना मध्येच आईने चहा आणून सगळ्यांच्या पुढ्यात ठेवला. चहा घेताना विषय पुन्हा पूर्वपदावर. त्या त्यांच्या विचारावर ठाम. मी माझ्या मतावर कायम. वारी निघेल तेव्हा निघेल, पण या आधीच वारीच्या वाटेने वळत्या झालेल्या. 

परिस्थितीने त्यांच्या जगण्यात वाढत्या वयाच्या बंधनाचे बांध घातले, तरी मनाच्या मातीत रुजलेला विठ्ठल काही त्यांच्या जगण्यातून सुटणं अन् विचारातून वजा होणं शक्य नाही. विठ्ठल नावाची ही वेल त्यांच्या आयुष्याला बिलगून आहे. त्यांच्या श्रद्धा, त्यांची भक्ती ह्या वेलीला लागलेली मधुर फळे. ती बहरतच राहील. मुळांपासून कोणी कितीही विलग करायचा प्रयत्न केला तरी तिचे अंकुर आषाढीचे वारे वाहू लागले की, वठलेल्या झाडावर हलकेच हिरवी पालवी दिसायला लागावी तसे अंकुरित होतात. त्यांना खुडण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी ते डोकावतच राहतील, हेही अमान्य नाही करता येत. खरं हेही आहे की, सगळ्याच गोष्टी विज्ञानाच्या चौकटीत तपासून पाहता येतातच असं नाही. या चौकटीपलीकडील चिमूटभर विश्वाचा विचार करताना कुणाचे काही नुकसान होणार नसेल तर पाहूही नयेत. कधी कधी भावनांच्या प्रतलावरून प्रवास करून आपणही तपासून पाहावं त्यांच्या मनाला अन् मनात वसती करून राहिलेल्या ओंजळभर श्रद्धांना, हेच खरं.

पंढरपुरात कोणी, कशासाठी जावं? हा प्रश्न अशावेळी विचारणं गौण आहे. काहींना तेथे आयुष्याची प्रयोजने सापडतात, कुणाला जगण्याची कारणे. कुणाला आनंदाची अभिधाने. कुणाला आणखी काही. कुणाला काही सापडो, आपण मात्र आपल्याला शोधण्यासाठी जावं. लागतं का काही नवं हाती ते पाहावं. मनात अधिवास करून असणारे अहं गळून पडावेत म्हणून वारीत चालत राहावं. माणसाची मनोगते समजून घेता यावीत म्हणून माणूस बनून मिसळून जावं आपणही माणसांत. भक्तिरंगी रंगलेल्या गर्दीत विसर्जित करून घ्यावीत आपण भोवती कोरून घेतलेली वर्तुळे. सोडून द्यावं जाणीवपूर्वक जतन करून ठेवलेलं आपलं मीपण.

आयुष्यात आनंद नांदता राहण्यासाठी फार मोठे सायास करायची आवश्यकता नाही. त्यासाठी ओंजळभर ओलावा अंतरी वाहत राहिला तरी पुरतो. आनंदाची अभिधाने समजून घेण्यासाठी यापेक्षा वेगळं काय हवं? काय आणि किती हवं हे कळलं की, आपणच आपल्याला उलगडत जातो नव्याने. वारीच्या वाटेने आपण नेमकं काय शोधतो? सुख, समाधान, आनंद की आणखी काही? काही हवं म्हणूनच शोधायला जावं का? कारणाशिवाय काहीच करू नये का? प्रत्येकवेळी संदर्भच हवेत कशाला? शोध केवळ सुखांचाच असतो का? चिमूटभर समाधानाचे अंशही असतातच ना मनाला लगडून! 

कोणाला कुठून काय शोधायचं शोधू द्यावं. ती आवश्यकता असेलही कुणाची. वारीच्या वाटेने आपण माणूस अवश्य शोधावा. आसपास नांदणाऱ्या कोलाहलातून सापडलंच तर समाधानही वेचावं. वाचावं गर्दीत विहरणाऱ्या अनोळखी चेहऱ्यांना. समजून घ्यावेत त्यावरच्या रेषांचे संदर्भ. समजून घावेत त्यांच्या पदरी पडलेल्या दुःखाचे अर्थ अन् लावावेत ओंजळीतून सुटलेल्या सुखाचें अन्वयार्थ. आयुष्याचे कोपरे सतत सुखांनी भरलेलेच असावेत असं नाही. त्यासाठी अंतर्यामी पर्याप्त या शब्दाचा अधिवास असणे पुरेसे असते. कोणी काय म्हणावं याची काही सुनियोजित सूत्रे नसतात. कोणाला काही म्हणू द्या, आपल्याला काय वाटतं हे अधिक महत्त्वाचं. कोणी म्हणतं सुखाचंही सुख शोधण्यासाठी आम्ही वारीच्या वाटेने चालतो. असेलही तसं. न असायला काही कारण नाही. कारण सुखांच्या व्याख्या सगळ्यांच्या सारख्या असतील तरी कशा? मिळालं तर आणावं साकळून तेथून ते अन् टाकावं नियतीने प्राक्तनात वणवण गोंदलेल्या जिवांच्या झोळीत. 

श्रद्धेचे तीर धरून सरकणारे भक्तीचे प्रवाह वाहत आहेत असेच अनेक वर्षांपासून पंढरीच्या वाटेने. ना त्यांच्या स्थितीत बदल घडला, ना त्यांच्या गतीत अवरोध आला. ना त्यांच्या समाधानाच्या परिभाषेत परिवर्तन घडलं. समजा नाहीच जाता आलं, तर आहे तेथेच शोधावा आपला विठोबा. शेवटी विठ्ठल मानला तर सर्व आहे. नाहीच उमजला, समजला तर एक प्रतीक आहे, आपणच आपल्याला ओळखण्याचं, नाही का? 

प्रत्येकाचा विठोबा वेगळा. ना त्याला अंत, ना आरंभ. खरंतर तो आरंभ आणि अंत या बिंदूना सांधणारा साकव आहे. दुभंगण्यापासून अभंग ठेवतो तो. त्याला आकारात कोंबून काही साकार होत असेल अथवा नसेलही. त्याने फार फरक नाही पडत. निराकाराला नामानिराळे ठेऊन आपण आपल्या अंतरी अधिवास करणारे आकार त्याला देऊन आकृती उभी करतो. याला कोणी आस्था वगैरे म्हणत असेल, कोणी श्रद्धा, कोणी भक्ती तर त्यात अतिशयोक्त काही नाही. आस्थाही अगत्याने अंतरी जपता यायला हव्यात, नाही का? देव आस्तिकांचा आहेच, नास्तिकांसाठी नाही असंही नाही. मानला तर आहे अन् नाहीच मानला तर नाही. त्याचं असणं-नसणं गौण. भक्ती, श्रद्धा असणं महत्त्वाचं. त्याच्या निमित्ताने आपल्यात असणाऱ्या 'मी'पणाचा परीघ कळत असेल, मनात विहरणाऱ्या विकल्पांच्या वर्तुळांचा विस्तार कमी होत असेल, अंतर्यामी दाटलेलं अविचारांचं तणकट वेचून वेगळं काढता येत असेल तर त्यात वावगं काही नाही. 

मांगल्याचे अधिपत्य आयुष्याच्या चौकटींना अर्थ देते. ओंजळभर आयुष्याला अर्थपूर्ण आयाम देणारे प्रयोजन म्हणून विठ्ठल पाहायला काय हरकत आहे? प्रघातनीतीचे परिघ आयुष्याला वेढून असतातच. पण त्यापलीकडे आणखी काही गवसत असेल तर ते वेचावं. निवडून घ्यावं. पाखडून पाहावं. फोलपटे वेगळी करून घ्यावीत. पारखून पाहावं परत परत या पसाऱ्यातून आपण आपल्याला. विठ्ठल कुणाला कुठे, कसा, केव्हा गवसेल, कसे सांगावे? असलाच काही फरक तर कोणाला तो वारीत भेटतो, कुणाला वावरात सापडतो इतकंच. 

अशी कुठली सूत्रे असतील यां माउल्यांच्या जगण्याची? अशी कोणती समीकरणे असतील यांच्या आयुष्याची? माहीत नाही. कदाचित त्यांनाही सांगता नाही येणार. असं काय असेल सर्वातून सर्व वजा करूनही यांच्या असण्यानसण्यात विठ्ठल ओंजळभर शेष उरण्याची? काय म्हणावं या सगळ्याला? कशी संगती लावावी याची? या अडाणी बायांना विठ्ठल खरंच कळला आहे की, आपल्या पुस्तकी शहाणपणामुळे तो आपल्यापासून अंतरावर राहिला असेल? सांगणं अवघड आहे. पण एक खरंय की, सगळेच विषय तर्काच्या सहाणेवर घासून नाही पाहता येत. प्रत्येकवेळी मोजपट्ट्या वापरून विदवत्ता ठरवता येतेच असं नाही. विचारांच्या विश्वात विहार करणारे किंतु कधीतरी श्रद्धेच्या परिघातही तपासून पाहता यायला हवेत, नाही का?
- चंद्रकांत चव्हाण
••