नकळत
मानेभोवती दोराची गाठ
हळूहळू घट्ट करत नेताना,
त्याच्या डोळ्यात काय बरं थरथरलं असेल?
माणसांनी गच्च भरलेलं अंगण,
हळहळणारे दीर्घ श्वास
चिरफाड केलेला स्वतःचाच
श्वेत निश्चल देह
गावाच्या वेशीवरूनच
धाय मोकलत येणारी पोटूशी लेक की,
पायाशी शिळा होऊन पडलेली
ऊन-पावसाची सोबतीण?
दिसली असतील का त्याला
कवाडाआड भेदरलेली
त्याचीच दोन पाखरं
उजवायला आलेली दुसरी कुँवार पोर
सैरभैर झालेली खुंट्यावरली जोडी
मातीत चाक रूतून,
झिजत गेलेली जुनाट बैलगाडी
तरीही का थांबले नसतील थरथरणारे हात?
डोळ्यांपुढे
फिरले नसेल का ऋतुचक्र
पूर्वजांच्या वारशाचे
वावराच्याच मातीत मिसळल्या
बापाच्या हाडांचे
हिरव्या पिवळ्या ओंब्यांचे
मोहर जळल्या आंब्यांचे
करपलेल्या रानाचे
हरपलेल्या भानाचे
तेव्हाही आठवली असेल का,
फेडरेशन समोर चार दिवस
ताटकळलेली कापसाची बंडी?
बाजार समितीत भिजलेली तूरीची रास
हातात आलेली आलेली उत्पन्नाची राख
जिच्या कुशीत उभं आयुष्यचं नांगरलं
त्या मातीनं दाखवल्या असेल का वाकुल्या?
की देऊन पाहिलं असेल शेवटलं फोल आश्वासन
जो चोच देतो
तोच दाणा देईल
या भंगार समजुतीवर
श्रध्दा ठेवून
माघारी होणाऱ्या
निष्प्राण
खोपटाच्या परवडीकडे
केला म्हणावं कानाडोळा?
की,
निस्तेज दिवाळी,
बेरंग शिमगा,
भणंग दसरा
अन् उमेदीची पानगळ
करीत येणारी
बेचव संक्रांत
यांचीच दिसत होती पुनरावृत्ती?
आतून पाझरली असेल का
विवेकाची बासरी
की हललं असेल
आठवणींचं रानं?
की ठेवला असेल
कर्जाएवढाच मोठ्ठा धोंडा
छातीत धडधडणाऱ्या हृदयावर
परतीचे दोर हातीच लागू नये म्हणून
शेवटी ह्या लटकलेल्या
देहाचं संपणं
सगळ्यांनी बघितलं
पाझरणाऱ्या नेत्रांनी
खरंतर
त्याने याआधीच हजारदा
घेतला होता फास
आतल्या आत
जगाच्याही नकळत
पुनीत मातकर
•
विश्वाच्या अफाट पसाऱ्यात माणसांचे अस्तित्व नगण्य. त्याच्या असण्याला अनेक आयाम असले तरी प्रत्येकवेळी ते आकळतातच असे नाही. दैव, नियती, नशीब या शब्दांना आयुष्यात काही अर्थ असतो का? माहीत नाही. पण असला, नसला म्हणून त्यानी काही आमूलाग्र परिवर्तन घडून जगणं सुगम होतं असंही नाही. दैव जगण्याच्या दिशा निर्धारित करते, असे मानणाऱ्यांना अरत्र परत्र नियती खेळ खेळताना दिसते. नाकारणाऱ्यांना ते केवळ विकल मनाचे खेळ वाटतात. या सगळ्या शब्दांचा कोशातला अर्थ काही असू द्या; पण आयुष्याच्या कोशात त्यांना काही अर्थ असतात आणि प्रत्येकासाठी ते वेगळे असतात, असं म्हणणाऱ्यांची इहतली वानवा नाही. अर्थात, असं मानणाऱ्यांना तेवढं स्वातंत्र्य असलं, म्हणून इतरांनीही कोणतीही प्रश्नचिन्हे अंकित न करता त्याचा स्वीकार करावा असेही नाही. मनाचे खेळ मनात उदित होतात अन् मनातच मावळतात. प्रारब्धवाद प्रयत्नांपासून विचलित करीत असतो एवढं मात्र नक्की. मनगटावर विश्वास असणारी माणसे परिस्थितीने केलेल्या आघातावर पर्याय शोधत राहतात. जगण्यात दैवाधीनतेचा अधिवास असणे, प्रारब्धाला प्रमाण मानणे त्यांच्या दृष्टीने पराभव असतो.
‘पराधीन आहे पुत्र मानवाचा’ म्हणताना नियतीशरण अगतिकता अधोरेखित होत असल्याचे काहींना वाटते, काहीना नाही. परिस्थिती सगळीकडून कोंडी करते, तेव्हा पर्याप्त पर्याय हाती नसलेली माणसे करूही काय शकतात? सारे प्रयास विफल होऊ लागतात, तेव्हा आयुष्याची सूत्रे हाती घेतलेल्या अनामिक प्रयोजनांना श्रेय दिले जाते. आयुष्यात येणारे ऋतू जगण्याच्या वाटेवर हरवतात, तेव्हा परिस्थितीने पेरलेल्या अन् नियतीने करपलेल्या आकांक्षांच्या कोंबांना मातीतून उखडताना पाहण्याशिवाय आणखी काय करता येणे संभव असते? दैवाने मांडलेल्या जुगारात फेकलेले प्रत्येक फासे नकार घेऊन येत असतील, तर उरतेच काय हाती? प्रयत्नवादाच्या परिसीमा गाठल्या जातात, टोकाचा संघर्ष करूनही परास्त होणे भागधेय होते, तेव्हा नियतीच्या परिघाभोवती प्रदक्षिणा अटळ प्राक्तन ठरते. नियतीने नेमलेल्या वाटा सगळ्यांनाच नेमक्या गवसतात असे नाही. पण हे सगळं मानायला मन तयार नसतं.
माणूस मुळात श्रद्धाशील जीव. त्याच्या आयुष्याची प्रयोजने कशाशी तरी निगडीत असतात. काही प्रयत्नांना परमेश्वर मानतात. काही परमेश्वरावर सगळं सोपवून निष्क्रिय कर्मवादाचे अध्याय वाचत परिस्थिती परिवर्तनाची प्रतीक्षा करीत राहतात. काही भिडतात आयुष्याला. कारणे निसर्गनिर्मित असतील, तर त्यावर कोणाचे आधिपत्य नसते. माणसांच्या निमित्ताने ते आयुष्याचे किनारे धरून वाहत येऊन जगण्यात विसावत असतील, तर प्रयत्नांना काही एक अर्थ उरतो. पण कधी कधी प्रसंगच असे काही उद्भवतात की, कोण्यातरी अनामिक शक्तीच्या हाताचे माणूस कळसूत्री बाहुले होतो. खेळत राहतो रोजच जगण्याशी. कुणीतरी खेळवत राहते आयुष्याला. मनात वसतीला असलेली एकेक स्वप्ने सुटू लागतात. आयुष्याची सगळीच सूत्रे अन् उत्तरे चुकू लागतात. चुकलेले पर्याय अनेक गुंते आणतात.
शेतीने जग वसवलं. माणसाच्या अस्तित्वाची मुळं मातीत रुजली. या जगाभोवती माणसाचे मूठभर जग साकारले. या जगाने त्याला जागा दिली. जगण्याची प्रयोजने त्याने शोधली. मातीतून केवळ पिकांचे कोंबच नाही, तर तोही उगवून आला. व्यवस्थेचे चाक शेतीमातीच्या वाटेने प्रगतीच्या दिशेने पळू लागले. मातीत मिसळून जाण्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. लाखांचा पोशिंदा म्हणून व्यवस्थेने त्याचं मोल अधोरेखित केलं. कृषीसंस्कृतीवर मोहर अंकित झाली. जगाच्या भुकेचे प्रश्न सोडवणारा, म्हणून मातीत राबणाऱ्यांच्याप्रती कृतज्ञभाव समाजात सतत राहिला. काळ बदलला तशी माणसे बदलली. जगण्याची सगळीच समीकरणे नव्या दिशांचा शोध घेऊ लागली. कोणी उद्योगाच्या वाटेने निघाला. कुणी नोकरीच्या दिशेने पळाला. कोणी कुणाच्या चाकरीत अडकला. पोटासाठी दाही दिशा धावणारी माणसे आयुष्याची प्रयोजने नव्याने शोधू लागली. टिकून राहण्याची साधने होती, त्यांनी साध्याच्या दिशेने कूच केले. पण ज्याच्याकडे जमिनीच्या तुकड्यापलीकडे काहीच नव्हते, ते मातीच्या मोहात अडले. तेथेच आपल्या प्राक्तनाचा शोध घेऊ लागले. मातीचा लळा असणारी ही माणसे मातीमोल होतील, असे कधी वाटले नाही. पण काळानेच चाके अशी फिरवली की, ही माणसे परिस्थितीच्या आवर्तात आहे तेथेच भिरभिरत राहिली.
अख्खं आयुष्य मातीत मिसळलेल्या माणसांच्या जगण्याच्या दिशा हरवल्या. आयुष्याची दशा झाली. कुणी आहे त्या प्रसंगाना सामोरे जात राहिला. पण नियतीनेच त्यांना अशा वळणावर आणून उभे केले, जेथून परतीचे मार्ग संपले. अभिमन्यूचं प्राक्तन घेऊन ही माणसे व्यूहात लढत राहिली. परिस्थिती परिवर्तनाचे पर्यायही परागंदा झालेले. एखाद्या दुःखाला प्रारब्ध किती कारण असतं? माहीत नाही. पण धोरणे कारण होत असतील, काहीकेल्या आयुष्याचे हरवलेले ऋतू बदलत नसतील, केवळ वणवण वाट्यास येत असेल, तर कोणत्या क्षितिजाकडे आशेने पाहावे? सगळीकडून होणारी कोंडी जगण्यावरील श्रद्धा विचलित करते. सगळे विकल्प संपतात, तेव्हा कोणत्या दिशांना आयुष्याचे दान मागावे? मूठभर देह विसर्जित करण्याचा निर्णय घेताना नेमकं काय वाटत असेल? त्याचा जीव कशाकशातच गुंतत नसेल का? की गुंतून राहण्याइतकेही पाश समोर राहत नसतील?
ही कविता वाहती वेदना घेऊन अंतर्यामी अस्वस्थपण कोरत जाते. हे उसवणं केवळ एका जिवाचं नाही, व्यवस्थेच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा करणाऱ्या सगळ्यांचंच आहे. मरणाला मुक्तीचा मार्ग मानणाऱ्या विचारांपर्यंत पोहोचणाऱ्या अभागी आयुष्याचं आहे. काळजाला चिरत जाणारी वेदना आहे. जळत्या निखाऱ्यावरून चालणे आहे.
शेतकरी व्यवस्थेतील महत्त्वाचा घटक, पण व्यवस्थाच एखाद्याला नाकारायला लागली तर? वाटा अवरुद्ध होतात, तेव्हा काय करावे? मरणाचं काही कोणाला अप्रूप नसतं. इहतली अधिवास करणाऱ्या जिवांच्या प्रक्तनातला मरण अटळ भाग असला, तरी त्याला अवकाळी येण्याचा शाप नसावा. टाळता न येणारं कारण आयुष्य विसर्जित करायला एक निमित्त असू शकते. पण ही काही जगण्याची प्रघातनीती नाही. बिकट वाट असली, म्हणून काही ती वहिवाट होत नसते. मरणाच्या डोळ्यात डोळे घालून दोन हात करण्यात जिवाची इतिकर्तव्यता असते. पण आपलेपणाने ओथंबलेलं आभाळ दूरदूरही दृष्टीस दिसत नसेल, सगळ्याच दिशा अंधारून आल्या असतील, तर चालावं किती अन् कुठपर्यंत? आस्थेचा लहानसाही कवडसा कुठे गवसत नसतो, तेव्हा प्रश्नचिन्हे गहिरी होत जातात.
शेतकऱ्याच्या मरणवार्ता सरावाच्या झाल्या असल्याच्या अदमासाने वर्तमानपत्राची पाने निर्विकारपणे उलटली जातात. मरणाचेही सुतक वाटू नये, अशी परिस्थिती अवतीभोवती नांदते आहे. मने कोरडी होत आहेत. संवेदनाचे पाझर आटत आहेत. आसपास उध्वस्त होताना दिसत असूनही कोणाला आकळत नाही, असे तरी कसे म्हणावे? व्यवस्थेत कोरडेपण सामावले असेल, तर माणूस समाजपरायण आहे, हे कोणत्या विश्वासाने सांगावे. ‘मानेभोवती दोराची गाठ हळूहळू घट्ट करत नेताना त्याच्या डोळ्यात काय बरं थरथरलं असेल?’ हा प्रश्न वेदनेचे एकेक पदर उकलत राहतो. आपणच आपल्याला उसवत नेताना ही कविता नि:शब्द करते. जगण्याला विस्तार आहे, मरणाला संकोच. मरणाने देह सुटतो, पण देहाशी निगडीत नाती अन् नात्यांना बिलगून असणाऱ्या भावनांचे काय? मरण एका न उलगडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर असेलही; पण त्यातून आणखी शंभर प्रश्नांच्या वाटा प्रशस्त होतात, त्याचं काय? मरणाऱ्याला कसले आलेयेत पाश अन् कसली आलीयेत बंधने? कोणतेच मोह त्याला अवरुद्ध करू शकत नसतील का? मनात मोहाचा एकही तुटका धागा दिसत नसेल का? की या सगळ्यांच्या पलीकडे तो पोहचलेला असतो? की त्याच्यापुरतं सगळं जगच निरुपयोगी होत असेल? जगण्याइतके इहतली सुंदर काहीही नसल्याचे सांगून सगळेच द्रष्टे, विचारवंत, महात्म्ये थकले, तरी त्यांनी पेरलेल्या विचारांच्या पलीकडे पोहचण्याची परिस्थिती एखाद्यावर का येत असावी?
जगण्याचा उत्सव व्हायला आयुष्य आनंदतीर्थ व्हायला लागते. कृतार्थ शब्दाचा आयुष्यात अधिवास असायला लागतो. सगळीकडे अभावाचे मळभ दाटून आलं असेल, तर ओथंबून वाहणाऱ्या मेघांची आस कशी लागावी? मरणदार काही प्रसन्नतेच्या परिमलाने भरून आलेलं नसतं. माणसांनी गच्च भरलेलं अंगण काही सुखांच्या वार्ता करण्यासाठी एकत्र आलेलं नसत. बापाच्या अवकाळी जाण्याने पोरांवर होणारे आघात शब्दांत कसे अंकित करता येतील? गावाच्या वेशीवरूनच धाय मोकलत येणारी पोटूशी लेक कोणत्या जन्माचे दुःख अनुभवत असेल? पायाशी शिळा होऊन पडलेली ऊन-पावसाची सोबतीण कोणत्या कृत्यांची शिक्षा भोगत असेल? कवाडाआड भेदरलेली पाखरं, उजवायला आलेली पोर, कारुण्याची ही चित्रे मरणाची पट्टी डोळ्यांवर बांधताना त्याला दिसलीच नसतील का? बापाचं मरण डोळ्यांनी पाहणाऱ्या लेकरांना काय वाटत असेल? मालकाच्या जाण्याने सैरभैर झालेली खुंट्यावरली बैलजोडी- खरंतर ही मुकी जित्राबं, त्यांनाही हे जीव लावणं कळलं. सगळं काही समोर असून यापैकी काही काहीच दिसले नसेल त्याला? कदाचित दिसलेही असतील, पण त्यांच्यात जीव गुंतवावा, असं काही गवसलं नसेल. सगळं असून सारं संपलं असेल त्याच्या विश्वात.
गळ्याभोवती दोर गुंडाळताना का थांबले नसतील थरथरणारे हात? उन्मळून टाकणाऱ्या संकटांना सामोरे जात केलेला संघर्ष डोळ्यांपुढे क्षणभरही तरळला नसेल? राबराब राबून, हाडाची काडे करून वावराच्या मातीतच मिसळलेल्या बापाचे स्मरण झाले नसेल का? घराला सावरून धरणाऱ्या बापाची जिगीषा समजलीच नसेल का? कदाचित कळलेही असेल. करपलेल्या रानाचे उदासवाणे दिसणे जिव्हारी लागले असेल. आठवली असेल फेडरेशनसमोर चार दिवस ताटकळलेली कापसाची बैलगाडी. बाजार समितीत भिजलेली तूरीची रास. हातात आलेली उत्पन्नाची राख. सगळंच उखडून टाकणारं. जिच्या कुशीत उभं आयुष्यच नांगरलं, त्या मातीनंच वाकुल्या दाखवल्या तर कोणाकडे पदर पसरायचा? सगळेच विकल्प संपलेले. प्रश्न सहजपणे करता येतात. सुखी आयुष्याचे सूत्रे शिकवता येतात, पण जगण्याची उत्तरे का देता येत नसतील विनासायास?
‘जो चोच देतो तोच दाणा देईल’ या समजुतीवर श्रध्दा ठेवून आपल्या माघारी निष्प्राण होणाऱ्या खोपटाच्या परवडीची जाणीव अंतर्यामी अंशमात्रही स्पंदित झाली नसेल का? की कानाडोळा करून अगतिकतेने काळजावर धोंडा ठेवला असेल? चोच दिली, चाराही दिला; पण दाणे वेचण्याची ताकदच उरू दिली नसेल, तर कसं लढावं माणसाने? सणांचे रंग आयुष्याला बेरंग करीत राहिले येताना अन् जातांना ओरखडे सोडून गेले. येणारा दिवस फक्त कर्जाचे आकडे वाढवत जीवनाशी खेळत राहिला. विवेकाने वागला तर माणूस प्रेषित होतो, पण व्यवस्थेने कोणताही विवेक आयुष्यात राहूच दिला नसेल, तर तो कुठून उसनवार आणावा? सारासार विचार करण्याची प्रेरणा परागंदा झाली असेल अन् कुठूनही आपलेपण घेऊन येणारे कवडसे प्रवेशायला जागच राहू दिली नसेल, तर दोष नेमका कुणाचा? नियतीचा की निसर्गाचा की निर्माण झालेल्या परिस्थितीचा?
मरणाऱ्याला पलायनवादी ठरवून मोकळं होता येतं, पण हताश होण्यामागची कारणे शोधायला लागतात. उत्तरे तयार करून कोसळलेले बुरुज बांधावे लागतात. जगणं उभं करायला लागतं. लढण्यासाठी बळ देणारे हात दिमतीला असायला लागतात. व्यवस्था असा हात का होऊ शकत नसेल? आयुष्याचीच माती झाल्यावर मनाने दगड होण्याचा निर्णय घेतला असेल. ठेवला असेल धडधडणाऱ्या काळजावर उचलून तो. परतीचे दोर हाती लागूच नये म्हणून मनातून आधीच कापून घेतले असतील तर? त्याच्या देहाचं संपणं पाझरणाऱ्या नेत्रांनी सगळ्यांनी बघितलं. पण याआधीच हजारदा फास घेतला होता आतल्या आत त्याने, जगाच्याही नकळत. त्याचं रोजचं मरणं कोणत्या जन्माची झाडाझडती असेल? त्याचं आपणच आपल्यापासून असं तुटत जाणं अन् आसक्तीच्या वर्तुळातून सुटत जाणं दिसलंच नाही. उपेक्षेच्या वाटेने घडणारा त्याचा प्रवास कुणालाही दिसला नसेल का? की काळाने कोणाला बघायला उसंतच मिळू दिली नसेल? निसर्गाने दिलेलं आंधळेपण अटळ असेल; पण डोळे असून दृष्टी हरवणे अगतिकता असते, नाही का?
चंद्रकांत चव्हाण
••