Pathey | पाथेय

By // 2 comments:

शुभेच्छा... एक लहानसा शब्द. म्हटलं तर खूप मोठा आणि नाहीच मानलं, तर अगदी बिंदूएवढा. आस्थेने पाहिलं तर आभाळाएवढा; नाहीच असं बघता आलं तर अगदीच नगण्य, नजरेत न भरण्याएवढा. तरीही या शब्दाच्या असण्या-नसण्याला मर्यादांचे तीर धरून वाहणाऱ्या आयुष्यात अनेक आयाम असतात. ते असावेत की नाही, याबाबत कोणास काय वाटते माहीत नाही. पण कोणी कुणाला शुभेच्छा दिल्यात म्हणून प्रगतीची शिखरे एखाद्याला सत्वर संपादित करता येतात असं नाही. आणि नाही दिल्यात, म्हणून दैनंदिन जगण्याच्या प्रवाहात फार काही क्रांतिकारक बदल घडतात असंही काही नसतं. आपल्याकडून काही देणं आणि कुणाकडून काही घेणं हे दैनंदिन व्यवहाराचं एक वर्तुळ असतं. अशी कुठलीतरी वर्तुळे माणूस आत्मीय समाधानासाठी शोधत असतो. म्हणून ती जगण्यात कोरून घेणे आवश्यक असतं का? आणि नाहीच आखून घेता आली अशी एखाद्याला, म्हणून जगण्याचे प्रवाह पात्र बदलतात का? याचं उत्तर नाही, असंच सांगता येईल.

पण...

तरीही 'पण' हा शब्द उरतोच. या 'पण'मध्ये सकारात्मक, नकारात्मक भावनांचा किती कल्लोळ एकवटलेला असतो. आयुष्याच्या वाटेवर चालताना अनेक कल्लोळ अंतर्यामी साठवून ठेवावे लागतात. अंतरीचे वणवे अंतरीच दडवून ठेवावे लागतात. त्यांना अविचारांच्या वाऱ्यापासून सुरक्षित राखण्यासाठी कसरत करायला लागते. जगण्याचा ताल आणि तोल सांभाळावा लागतो. जगण्याचे सूर सापडले की, आयुष्याला सौंदर्याचे साज सहज चढवता येतात. सद्विचारांचे साज लेवून आयुष्याला देखणेपणाच्या कोंदणात अधिष्ठित करावे लागते. सौंदर्याचे ताटवे उभे करून निगुतीने सांभाळावे लागतात. आयुष्यात सकारात्मक विचारांना सांभाळता आले की, जगण्याला सजवणे सुगम होतं, एवढं मात्र नक्की.

संघर्ष माणसाच्या जगण्याचे आदिम अंग आहे. ती उपजत प्रेरणा असते. निसर्गाच्या अफाट पसाऱ्यात टिकून राहण्याचा प्रवास सुगम कधीच नव्हता आणि नसतो, म्हणून माणसाच्या मनात एक अनामिक अस्वस्थता अनवरत नांदती असते. हे अस्वस्थ असणं जेवढं शाश्वत, तेवढंच सुखांचा शोध घेणं. संघर्षाचा प्रवास अक्षर असतो, तितकाच टिकून राहण्याचा कलहही अक्षय असतो. टिकून राहण्यासाठी प्रेरणांचे पाथेय सोबत असले की, जीवनावरची श्रद्धा अगणित आकांक्षांनी मोहरून येते. मोहर दीर्घकाळाचा सोबती नसतो, पण गंधाळलेपण घेऊन नांदतो, तेव्हा जगण्याचे श्वास आपल्याला आश्वस्त करीत राहतात. हे नांदणेच संस्कृतीचे संचित असते आणि ते अक्षय असणे माणसांच्या सांस्कृतिक जगण्याचे अंतिम प्रयोजनसुद्धा. तुमच्या जगण्यात, असण्यात, विचारांत, उक्तीत, कृतीत ही प्रयोजने अनवरत प्रवाहित राखण्याची अपेक्षा म्हणूनच समाज नावाचा किमान समान विचारांना सोबत घेऊन चालणारा घटक करीत असतो. अपेक्षांच्या वाटेने चालणे सुगम कधीच नसते. हे सुगमपण आयुष्यात नांदते ठेवण्यासाठी आपलेपणाने ओथंबलेला किमान एक शब्द तरी आपल्यासाठी असावा, असं प्रत्येकाला वाटत असतं आणि हे आपलेपण आयुष्याच्या ओंजळीत सामावून घेण्यासारखं दुसरं सुख इहतली नसतं.

म्हणूनच...

कोणी कोणाला शुभेच्छा दिल्या म्हणून वर्ष चांगलं जाईल आणि नाहीच दिल्या; म्हणून वाईट असेल असेही नाही. काळ त्याच्याच मस्तीत चालत असतो. म्हटलं तर वर्षांच्या वाटचालीत बदलत काहीच नसतं. बदलतात कॅलेंडरची पानं. दिसा-मासाचे पंख लावून गिरक्या घेत राहतात ती नुसती. गतीची चाके पायाला बांधून चालणाऱ्या अनेक वर्षांतील आणखी एका वर्षाने माणसांनी निर्धारित केलेल्या कालगणनेतून निरोप घेतलेला असतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या जिवांच्या आयुष्यातून एक वर्ष वजा झालेले असते. आणि काळाच्या गणतीत एकाने वाढलेले असते. खरंतर कमी होणे काय आणि वाढणे काय, हे सगळेच विभ्रम. आभास आणि आनंद यांच्या सीमारेषांवर कुठेतरी रेंगाळणारे. अनंत, अमर्याद, अफाट अवकाशात विहार करीत वर्षे येत राहतात आणि जातातही. त्यांचं येणं आणि जाणं माणसांना नवे नाही आणि प्रत्येक गोष्टीत नावीन्य शोधण्याचे प्रयत्नही फार अलीकडचे नाहीत. कालचक्राच्या अफाट पसाऱ्यातील वर्ष हा एक लहानसा तुकडा. असे किती तुकडे आपल्या आयुष्यात असतात? अगदी ओंजळभर! पण माणसे ते साकळत राहतात. हाती लागलेल्या चारदोन तुकड्यांना आनंदतीर्थ बनवण्यासाठी उगीच धडपडत राहतात. याचा अर्थ असा नाही की, माणसांनी आनंदाचे तुकडे वेचून आपल्या अंगणी आणण्यासाठी यातायात करू नये. पण सत्य हेही आहे की, तुमची इच्छा असो वा नसो, जे घडतं तेही अटळ असतं आणि नाही घडत तेही नियतीचं देणं असतं, आपण त्या बदलाचे फक्त साक्षीदार.

३१ डिसेंबर आणि १ जानेवारी या बिंदूना जोडणाऱ्या रेषेवरच्या काही क्षणांच्या स्वागताला समोरं जावं कसं, याची नियोजने झाली असतील. प्रत्येकजण आपापल्यापरीने आनंद मिळवतील. कर्कश संगीताच्या तालावर रंगणाऱ्या धुंध फेसाळ रात्रीला काहींची बेधुंध पाऊले थिरकतील. मध्यरात्री कोणत्याही डेसिबलची मर्यादा न सांभाळता फटाक्यांचे आवाज निद्रिस्त जगाला जागवतील. गारठलेल्या थंड वातावरणात अन् तारठलेल्या डोळ्यांच्या धुंधीत नवं वर्ष येईल आणि पुढे जाईल. अर्थात, सगळेच नववर्षाचं असं स्वागत करत असतील, असं नाही. काही परिवर्तनप्रिय मनं आस्थेची छोटीशी पणती हाती घेवून अंधारल्या वाटा उजळून टाकण्यासाठीही निघतील.

जगात वावरताना विसंगतीचा प्रत्यय पावलोपावली येतच असतो. म्हणून सगळं जगच विपर्यासाने भरले आहे असेही नसते. जगाचे दैनंदिन व्यवहार चौकटींच्या कठोर कुंपणात बंदिस्त केलेले असतात. त्यांना ध्वस्त करण्याचं बळ किती बाहूंमध्ये असतं. शोधलं तर प्रवाहाच्या विरोधात पोहणारी अशी मूठभरही माणसे हाती लागत नाहीत. म्हणून सामान्यांनी जगण्याशी भिडू नये, असंही नसतं. ज्यांच्या ललाटी नियतीने सुखांची रेखा अंकित केली असते, ते तरी पूर्ण समाधानी असतात का? रोजच्या जगण्याला भिडणारी माणसे योद्धेच असतात. भाकरीचा चंद्र सदनी आणण्यासाठी कष्टाचे पहाड उपसायला लागतात. सुखाच्या चांदण्या वेचून आणणे हा काही सहजसाध्य खेळ नसतो. खेळ खेळून बघताना जिंकण्या-हरण्याची क्षिती बाळगून आयुष्याचे तारू किनाऱ्यावर लागत नसते. वादळाच्या वंशजांना वादळाची मोट बांधून आणण्याची स्वप्ने येत असतात. तसेही अनेक वादळे झेलल्याशिवाय किनारे कोणाला गाठता आले?

माणसांच्या आयुष्यात समस्यांची कमी कधी होती? कधीच नाही! कालानुरूप त्यांची रूपे कदाचित वेगळी असतील इतकेच. पोटात खड्डा पाडणारी भूक माणसाला अस्वस्थ वणवण करायला भाग पाडते. आयुष्य पणाला लावणारा संघर्ष सार्वकालिक सत्य आहे. या पसाभर वर्तुळाचा शोध आयुष्यभर पुरतो. अनेकांची आयुष्ये वर्तुळाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपली. आजही यात फार मोठ्याप्रमाणात सुगमता आली आहे असे नाही. माझ्या वाट्याला जरा अधिक सुखे आली म्हणून जगाच्या विवंचना संपल्या असा अर्थ होत नाही. पण मी याचा विचार किती करतो? अर्थात, हा ज्याचा त्याचा प्रश्न म्हणून सोडून देता येईलही, पण बराच मोठा समूह विवंचनेच्या वर्तुळात गरगरतोय, हे विसरणे आपल्या अंतस्थ अधिवास करणाऱ्या नैतिक विचारांचा अधिक्षेप नाही का? कुणास वाटेल, जगाच्या विवंचना, प्रश्न कधी नव्हते? काल अधिक होते, आज प्रखर आहेत आणि उद्या तीव्र असतील कदाचित. संपतील याचीही शाश्वती कोणी देऊ शकत नाही. कुणाला वाटेल, कुठल्यातरी अनभिज्ञ विवंचनांचा विचार करत कुणाचातरी येणारा उद्या सजवण्यासाठी आमचा आज का म्हणून वाया घालवायचा? आम्हाला आनंदतीर्थी नेणारी वाट गवसली असेल, तर का म्हणून वेदनांच्या वस्त्यांकडे वळायचे? तात्विकदृष्ट्या असा युक्तिवाद कितीही समर्पक असला, तरी तो संयुक्तिक असेल असे नाही. एक समूह समस्यांशी संघर्ष करतांना पिचतो आहे आणि आम्ही सुखांच्या शिखरांवर पोचण्याच्या मनीषेने पळतो आहोत. याला विपर्यास नाही तर आणखी काय म्हणता येईल?

आनंद साजरा करण्याचं भाग्य इहतलावरील साऱ्यांच्याच ललाटी नियतीने लेखांकित केलेले नसते. जाणाऱ्या आणि येणाऱ्या वर्षाचं स्वागत लाखो माणसं करत असतील, तेव्हा हजारो माणसं अशीही असतील, जी अर्धपोटी, उपाशीपोटी थंडीत कुडकुडत उद्यासाठी भाकरीची स्वप्ने पाहत असतील. कदाचित आपल्याला ती दिसत नसतील किंवा आनंदाच्या शिखरावर विहार करीत असल्याने आपण त्यांच्याकडे पाहिले नसेल. शेकडो आदिवासी डोंगरदऱ्यात, रानावनात आपल्या मूठभर जगण्याचा शोध घेत भटकत असतील. भटके विमुक्त आपापली पालं घेऊन व्यवस्थेच्या चौकटीत आपलं हरवलेलं अस्तित्व शोधत असतील. घरसंसार चालवायचा कसा, याची न सुटणारी कर्जबाजारी कोडी घेऊन शेतकरी शेतात पेरलेल्या पिकात उद्याची सुखं शोधत असेल. हक्काच्या शिक्षणाचा कायदा असूनही शाळेत शिकून जगण्याची कोणतीही स्वप्न पुस्तकात सापडली नाहीत, म्हणून लहान, लहान हात कचऱ्याच्या कुंडीत जगण्याचे वास्तव कुणीतरी फेकलेल्या उष्ट्यात शोधत असतील. नियतीने, परिस्थितीने पदरी घातलेलं जगणं सगळंच काही आखीव चौकटींमध्ये बसवता येत नसलं, तरीही मनात एक आस असतेच, निदान यावर्षात तरी आहे त्यापेक्षा अधिक समाधान माझ्या अंगणी नांदावे.

माणूस उत्सवप्रिय प्राणी आहे, हे खरेच. पण ते साजरे कसे व्हावेत, याची काही परिमाणेही असतात. मर्यादांची कुंपणे असतात. समाजाचे वर्तन व्यवहार सुरळीत मार्गस्थ व्हावेत, म्हणून अनेक वर्षांच्या अनुभवातून संकलित केलेलं हे संचित असतं. अर्थात, ही बंधने ऐच्छिक असली तरी त्यांत स्वतःला बांधून घ्यायचं की नाही, हा ज्याचा त्याचा प्रश्न. कोंदणात अधिष्ठित झालेला हिरा अधिक सुंदर दिसतो. पण सांप्रत अशा गोष्टींना महत्त्व न देण्याइतपत विचारांत शुष्कपण येत आहे. ताटव्यात फुललेल्या फुलांचा बहर जेवढा देखणा असतो, तेवढाच कोमलही. असं देखणंपण त्याच्या सौंदर्यासह जपता यायला हवं. उच्छृंखलपणा जगण्याची गुणवत्ता उतरणीला लावतो. हाती साधने आहेत म्हणून त्यांचा बाजार मांडणे कितपत रास्त असते? नजरेचा थोडा कोन बदलून आसपास पाहिलं तरी कळेल, जगाचा चेहरा आनंदापेक्षा चिंतेचाच अधिक आहे. मान्य आहे, जगाचे सगळेच चेहरे मला प्रमुदित करता येणार नाहीत. पण चिंताग्रस्त चेहऱ्यावरची एक रेघ मिटवता आली तरी खूप आहे. त्यासाठी फार मोठा अलौकिक त्याग वगैरे करायची आवश्यकता नाही. आपल्या अंगणभर पसरलेल्या उजेडातला कोरभर कवडसा अंधारल्या जगात पोहचवता आला तरी खूप आहे. आपल्या चांदण्यातला चतकोर तुकडा वेगळा करता येतो त्याला जगण्याची प्रयोजने शोधावी नाही लागत. त्यांचं जगणंच चांदणं झालेलं असतं.

हा सुखाचा पांढरा आणि दुःखाचा काळा अशा रंगात जगण्याला विभागता नाही येत. काळा आणि पांढरा या दोघांच्या संयोगाने जो ग्रे शेड असणारा रंग तयार होतो, तोच शाश्वत असतो. बाकी सगळं आभासाच्या झुल्यांवर हिंदोळे घेणं. या रंगाच्या डावी-उजवीकडे थोडं इकडेतिकडे सरकताना हाती ज्या छटा लागतात, त्याच आयुष्याचे खरे रंग असतात. बाकी फक्त झगमग. तिलाही सार्वकालिक चमक असेलच असे नाही. किंबहुना ती तशी नसतेच. म्हणूनच 'जगी सर्व सुखी कोण आहे, विचारी मना तूचि शोधूनि पाहे' असा प्रश्न मनाला रामदासांनी विचारला असेल का? तसेही आयुष्य काही फुलपाखराचे रंग लेऊन विहार करीत नसते. त्यात संगतीपेक्षा विसंगतीच अधिक असते. उपेक्षा, विवंचना, समस्यांना कमतरता कधीच नसते. म्हणून सुखांची आस असू नये, असं कुठे असतं. सुखांचा सोस असणे वेगळे आणि पावलापुरता प्रकाश शोधत अंधारलेल्या कोपऱ्यात उजेडाचं चांदणं आणण्यासाठी प्रयत्न करीत राहणे, त्याहून वेगळे असते आणि हे वेगळेपण जपणारी माणसेच काळाची खरी ओळख असतात. अशा माणसांची धडपड म्हणूनच आस्थेचा विषय असते. काळाच्या पालखीला खांदा देणारी माणसे समाजजीवनाचे संचित असतात. प्रेरणा असतात, जगावं कसं, हे समजून घेण्यासाठी.

कॉपी पेस्ट आणि फॉरवर्ड...

By // 4 comments:
वातावरणातल्या गारठ्याने हुडहुडत सूर्याच्या कोमल किरणांना आपल्या कुशीत घेऊन रविवारची निवांत सकाळ अंगणात अवतीर्ण झाली. आजूबाजूला धुक्याने पडदा धरलेला. गल्लीतली मोकाट कुत्री रस्ता आपलाच आहे, या थाटात रस्त्याच्या मधोमध सुस्तावलेली. पाखरांचा एक थवा आकाशात आनंदाने विहार करतो आहे. शेजारच्या आंब्याच्या झाडावर बसून पाखरांचा उगीचच गलका चाललेला. क्लासला जायचे म्हणून मधूनच सुसाट वेगाने स्कूटरवरून पोरं-पोरी रस्त्यावरील अडथळ्यांना हुलकावणी देत भुरकन पुढे निघून जातायेत. नेहमीपेक्षा पेपर टाकायला जास्तच उशीर झाल्याने पेपरवाला पोरगा रस्त्यावरूनच दारासमोर पेपर भिरकावत सायकल दामटत निघाला आहे. उन्हाच्यासोबत बसलेलो. शेजारी मोबाईल. वर्तमानपत्रात असचं काहीतरी इकडचं तिकडचं वाचत, पाहत रमलेलो. कोणतातरी संदेश आल्याची मंद किणकिण वाजवून मोबाईलने लक्ष वेधलं. वर्तमानपत्र बाजूला टाकून मोबाईल घेतला आणि लागलो बघायला.

कुठल्यातरी निष्काम सेवेची बातमी बनून एक व्हिडिओ फॉरवर्डचे पंख लावून आमच्या सेवाभावी सहकाऱ्यांनी तयार केलेल्या आणि नेटाने चालवलेल्या अन् इच्छा नसताना चिकटवलेल्या- खरंतर बाहेर पडूनही कुणीतरी उत्साहाने परत त्याच वर्तुळात ओढून घेणाऱ्या व्हाट्सएपच्या ग्रुपवर आला. नेहमीप्रमाणे चारदोन जणांनी आवडीचा संकेत म्हणून त्या व्हिडिओवर तीनचार फुले वाहिली. काहींनी ठेंगा दाखवला, तर काहींनी विनम्रपणे हात जोडून आदरांजली (आदर या अर्थाने, श्रद्धांजली या अर्थाने नाही.) वाहिली. रविवार असल्याने असेल किंवा आणखी काही कारण असेल, नेहमीपेक्षा अधिक संख्येने उत्साहमूर्ती समूहात आपापली कॉपीपेस्टची हत्यारे परजून अवतरले आणि त्यावर मान्यतेची मोहर अंकित करण्याच्या स्पर्धेत स्वतःला आजमावू लागले.

कॉपीपेस्टफॉरवर्डच्या उदंड पिकाने आबाद असणाऱ्या या ग्रुपवर मी सहसा कॉमेंट, लाईकचा खेळ नाही खेळत. पण कुणीतरी अनपेक्षितपणे कुणाच्यातरी वाढदिवसानिमित्त आपले प्रेम व्यक्त करून मोकळा होतो आणि पळून जातो. नंतर जाग येणारे आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी आणि अमक्या-तमक्या स्नेह्यावर आमचंपण प्रेम आहे, हे प्रदर्शित करण्यासाठी चढाओढीने शुभेच्छांचा वर्षाव करीत राहतात. सहकाऱ्याप्रती स्नेह प्रदर्शित करण्याच्या घाईत आधीच कुणीतरी आपल्या नावासह गृपच्या भिंताडावर चिटकवलेला मॅसेज कुणीतरी कुठलीही खातरजमा न करता कॉपी करतो. तेथेच फॉरवर्ड करायचा असल्याने शुभेच्छांना उशीर नको, म्हणून आधीच्या नावासह देतो ढकलून. ग्रुपवरील भिंतीचा एक कोपरा आपल्या रंगाने रंगवण्याच्या नादात आपण काय केलं आहे, हे काही त्याच्या लक्षात येत नाही. मग कुणीतरी जागरूक नागरिक त्याला काय चुकले ते सांगतो. या उत्साही जबाबदार नागरिकाला आपल्या कर्तव्याची सविनय जाणीव होते. शुभेच्छांचं पुण्य आपल्या पदरी जमा करून घ्यावं, म्हणून पुन्हा शोधमोहीम घडते. मनाजोगता कोणतातरी संदेश सापडतो आणि हा सुटकेचा निश्वास टाकून पुन्हा नव्याने आदर व्यक्त करून ग्रुपच्या माळरानावर रांगत राहतो.

एव्हाना स्नेहाचा वादळी पाऊस सुरू झालेला असतो. ढगांनी गच्च भरून आलेल्या आभाळात मध्येच लख्खकन एखादी वीज चमकून जावी, तसं कोणालातरी कुणाच्यातरी राहिलेल्या श्रद्धांजलीची मध्येच आठवण होते आणि वाढदिवसासोबत श्रद्धांजलीचे दुःखार्त सूर ग्रुपच्या आसमंतात विहार करू लागतात. सहवेदनांच्या दुथडी भरून वाहणाऱ्या प्रवाहासोबत आधीच संवेदना व्यक्त करणारे आपण सहवेदना व्यक्त करायचे राहिलो की काय, या शंकेने थोडेसे विचलित होतात. संदेश पाठवण्यासाठी आपल्याला काय नव्याने पैसे मोजावे लागतात की, वैशिष्ट्यपूर्ण असे काही तयार करून लिहावे थोडेच लागते. आहे आयते समोर घ्या उचलून, असा शुद्ध व्यावहारिक विचार त्यांच्या मनात चमकून जातो. आपल्या समयसूचकतेवर खुश होतात आणि कुणीतरी आधीच फेकलेला संदेश उचलतात आणि देतात परत ढकलून. मृतात्म्याला स्वर्गलोकात शांती आणि यांच्याही आत्म्याला इहलोकी कर्तव्यपूर्तीप्रीत्यर्थ समाधान लाभते. व्यावहारिक जगण्याचे एक वर्तुळ पूर्ण झालेले असते. वाढदिवस मागे पडून थोडावेळ श्रद्धांजलीदिवस साजरा व्हायला लागतो. थोड्यावेळाने जन्म आणि मरण दिवसाचे प्रेमळ-दुःखी, सहर्ष-करुणार्त असेच आणखी काही संदेश एकरूप होऊन हातात हात घालून फिरायला लागतात. हे अनपेक्षित उमलून आलेलं प्रेम पाहून स्वर्गात पोचलेल्या आत्म्यास उगीच येथे आल्याचा पश्चाताप होत असेल.

तर सांगायचा मुद्दा असा की, समूहावर हे सगळं सुरू असताना मी त्या व्हिडिओवर बऱ्यापैकी मोठाचमोठा अभिप्राय खरडला आणि दिला सोडून, मुद्दामच. अर्थात, इतरांच्या दृष्टीने काहीतरी आणि तेही सविस्तर, अनाकलीय (हे त्यांचं माझ्याविषयी निरीक्षण) भाषेत लिहिण्याची वाईट खोड असणारं मी एक जुनं खोड असल्याने, त्यांनी सवयीने फारसे मनावर घेतलेले नसते. आजही शंभरातल्या नव्याण्णवांनी मनावर घेतले नाही. मनावर घेऊन उगीच आपला रक्तदाब का वाढवून घ्यावा, हा साधासा व्यवहारी विचार करून त्याला फाट्यावर मारले. नेहमीच्या सवयीने कॉपीप्रिय लोकांच्या हे सगळे आवाक्याबाहेर असल्याने, ते त्याच्या वाट्याला गेले नाहीत. कारण स्वतः व्यक्त होण्याचे कष्ट कोण घेतो. शिवाय आपण काही लिहावं, तर उगीच चूक घडून आपली असणारी नसणारी उंची सिद्ध होण्याची भीती मनात. त्यापेक्षा डोंगर दुरून साजरे दिसतात, ते पाहावे आणि आनंद घ्यावा म्हणून असेल कदाचित, कोणी अशा रिकामटेकड्यांच्या उद्योगांकडे वळत नसावेत. तेवढ्यात कुठूनतरी सापडलेली आणि त्याच्यासाठी फार म्हणजे फारच महत्त्वाची आणि आर्थिक वगैरे क्रांती घडवण्यास कारण ठरू शकणारी, कसल्यातरी वेतनआयोगाची जुनाट बातमी नवं लेबल लावून एखाद्या सासुरवाशिणीला माहेरी आणल्याच्या आनंदात ग्रुपवर कुणीतरी आणून सोडली. लागले सगळे आपल्या आर्थिक श्रीमंतीच्या गणितांना आखायला. कुणीतरी चेहऱ्यावरून मोरपीस फिरवल्याचा आनंद वेतनाच्या वाढत्या आलेखाला प्रगतीचे गमक समजणाऱ्यांना व्हायला लागला. असं काही-काही अन् तेच-ते; पण पाठवणाऱ्याच्या दृष्टीने प्रत्येकवेळी नवं आणि सर्जनशील वगैरे वगैरे टपकट राहिलं, गळक्या नळातून पडणाऱ्या पाण्यासारखं.

मी पाठवलेला अभिप्राय एकाने वाचला. म्हणजे का वाचला असेल, याचं नवल वाटलं. कारण वाचून व्यक्त होण्याची समूहाची सवय नाही आणि ज्यांनी तसा प्रयत्न केला, त्यांना कुणी कधीही भीक घातली नाही. त्यांचं प्रेम खऱ्याअर्थाने ‘स्व’ऐवजी ‘समष्टी’कडे अधिक आहे. या अर्थाने त्यांना वैश्विक विचारधारा असणारे नक्कीच म्हणता येईल. बरं या अपवादाने अभिप्राय वाचून ‘खूप छान...!’ म्हणून परत रिप्लायही दिला. माझ्यासाठी हे जरा आश्चर्यजनक होतं. कारण समूहात अशी अपेक्षा करणं म्हणजे देवलोकातून इहलोकी विहार करायला आलेल्या अप्सरा अनपेक्षितपणे फक्त आणि फक्त आपणासच भेटाव्यात आणि त्यांनी आपल्यासोबत सुमधुर संवाद करावा...! हे जेवढं सत्य, तेवढंच आमच्या समूहावर कोणीतरी संवाद साधणं. त्याच्या रिप्लायला उत्तर देताना म्हणालो, ‘कॉपीपेस्टफॉरवर्डचे उदंड पीक घेणाऱ्या कसदार वावरात उगवलेलं हे तणकट आहे.’ वाचून त्याने हास्यरसाने ओथंबलेली एक मस्तपैकी इमोजी फेकून मारली. बाकीचे तसेच स्थितप्रज्ञ.

दुसऱ्या दिवशी निवांत वेळेत चहा घेण्यासाठी आम्ही एकत्र जमलो होतो. बोलताना सहज विषय निघाला. ग्रुपवरील संवादाचा धागा पकडत तो म्हणाला, “कारे भो, सेवा आणि स्वार्थ म्हणजे नेमकं काय? तुला काय वाटले, जगात सगळीच माणसे देवमाणसे आहेत आणि त्यांना सेवेव्यतिरिक्त काहीच कामे नसतात..."

त्याच्या प्रश्नाचं उत्तर देणे भाग होते. कुठूनतरी वाचलेलं वाक्य आठवलं, तेच उचललं आणि दिलं फेकून त्याच्या अंगावर. म्हणालो, "सेवेत जग फुलवण्याची ताकद असते. निष्काम सेवा नंदनवन उभे करते."

"अरे, पण सेवा कुणाची? सामान्य माणसांची का? कोण विचारतो रे सामान्य माणसांना! आपण मास्तर लोक उगीच नैतिकतेच्या शिखरांकडे आशावादी डोळ्यांनी बघत राहतो. कसली सेवा आणि कसले काय. सगळ्यांना स्वार्थ मात्र बरोबर समजतो."

"समाजातील फाटकी माणसे आपल्या वकुबाने काम करतात, तेव्हा सेवेचा अर्थ समजतो. अशा कामांचे मोल संपत्तीची साधने वापरून कसे करता येईल? संपत्तीने तुमच्याकडे असणाऱ्या भौतिक सुखांची उंची समजेल, पण नैतिकतेची उंची कशाने मोजाल? माणसांच्या भल्यासाठी कष्टणाऱ्यां अन् समाजातील दूरितांचे निर्मूलन करू पाहणाऱ्या नैतिक विचारांची उंची मोजायला संपत्तीची साधने कुचकामी ठरतात."- मी

त्याच्या बोलण्याच्या प्रतीक्षेत चेहऱ्याकडे बघत राहिलो. थोडी अस्वस्थ चुळबूळ. म्हणाला, “तरीही जगात दोनच गोष्टी सत्य आहेत. एक पैसा आणि दुसरा मृत्यू! कसली आलीये नैतिकता अन् कसले आलेयेत मूल्ये. तुझं हे सगळं तत्वज्ञानपर बोलणं व्याख्यानात, पुस्तकात खपवायला ठीक आहे. वास्तवात प्रयोग करणे अवघड आहे. मूल्यांची चाड आणि अन्यायाची चिड किती जणांना असते अशीही?"

माझं म्हणणं पटवून देणं आवश्यक असल्याने बोलत राहिलो तसाच पुढे. म्हणालो, "सुखांच्या उताराने वाहणाऱ्या प्रवाहांना धनिकांच्या जगात भले प्रतिष्ठा असेलही, पण सेवेला संपत्तीचं आकर्षण कसं असेल? संपत्ती मोजून एकवेळ सुख मिळत असेलही, पण समाधान मिळेतेच असे नाही. सगळ्याच गोष्टींचं मोल काही संपत्तीत करता नाही येत आणि हे माहीत असणारी माणसे या मोहापासून स्वतःला अलग ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात."

“झालं प्रवचन तुझं? हे फक्त शिकवायला सोपं असतं, आचरणात आणणारी माणसं फार थोडी असतात, समजला."- तो.

विषय पुढे ढकलत आणखी एकजण म्हणाला, "एवढं विरक्त राहायचं, तर कशाला माणसाचा जन्म घेऊन वाया घालवायचा. त्यापेक्षा इतर प्राणीच बरे, नाही का?"

"नाही नाही, तसे म्हणायचेही नाही मला! तुमचं म्हणणं मान्य, पण सीमित अर्थाने."

मध्ये कुणाला बोलण्याची संधी मिळू न देता म्हणालो, “तुम्ही परत म्हणाल, आता हा कोणता नवीन अर्थबोध? नाही, काही नवीन वगैरे नाही! आहे तो तुम्हालाही चांगलाच अवगत आहे. आणि तो समजून घेण्यासाठी फार मोठं शिक्षण तुमच्याकडे असायला हवे किंवा तुम्ही कोणी अभ्यासक अथवा प्रकांड पंडित असणे आवश्यक नाही."

"मग कशाला एवढे तत्वज्ञानाचे धडे शिकवायचे नसते उद्योग करता आहात?"- परत तो आपलं घोडं दामटत राहिला.

"हे बघा, डोळे सगळ्यांना असतात, नाही का? म्हणजे ज्यांच्यावर निसर्गाने आघात केला नाही किंवा काही झाले नाही, असे कोणीही सामान्य. बऱ्याच जणांचं सौंदर्य त्या डोळ्यांत सामावलेलं असतं. हे चांगलंच; पण डोळे नुसतेच सुंदर असून भागत नाही, त्यांना दृष्टीही असावी लागते."

"मान्य! पुढे बोला. विषय बदलवू नका."

"तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. मी विषयाच्या रस्त्यावरच आहे. डोळ्यांनी जग दिसते, पण ते समजून घेण्यासाठी दृष्टी असायला लागते. या अर्थाने डोळस माणसांना समाजातील दुःख, दैन्य अधिक स्वच्छ दिसते. कारण त्यांच्या डोळ्यांवर संपत्तीचा थर साचून ‘मोती’बिंदू झाल्याने दिसणं धूसर झालेले नसते."

आता सगळे ऐकण्याच्या मुद्रेत उभे. एकेक करून यांना बाटलीत बंद करता येण्याची शक्यता वाढल्याने माझा आत्मविश्वास अधिक वाढला. त्यांना कोणतीही संधी न देता म्हणालो,"आता तुम्ही परत शंका विचारण्याआधीच सांगतो, ज्यांना समाजातील दुरिते दिसतात ते समाजापासून दूर कसे राहतील? पैसा जगण्यासाठी आवश्यक असतो, हे बंदा रुपया खरे. पण तो किती असावा? याची काही परिमाणे आपण तयार केली आहेत का?"

"नाहीत!"

माझ्या मुखातून प्रकटणाऱ्या अमृतवाणीच्या श्रवणाने धन्य होत माझा भक्त होण्याच्या वाटेवर उभा असलेला कुणीतरी आवाज प्रकटला.

"आनंदाने जगता आले आणि तेवढेच समाधान अंतरी नांदते राहिले, की पुरे. पण पैसा माणसांच्या मनावर गारुड करून आपलं सार्वकालिक महत्त्व अधोरेखित करीत आला आहे. त्याच्या मोहपाशातून मुक्त राहणे भल्या भल्याना अवघड असते. म्हणूनच की काय, तो सगळ्यांना हवाच असतो. पैशाने सगळी जादू करता येते, पण जादूने कोणताही पैसा तयार करता येत नाही. केवळ याच कारणाने त्याची जादू सगळ्यांना मोहित करीत असेल."

“असेल, त्याचं काय?"- तो

"एकदाका या संमोहनाच्या आवर्तात आपण आलो की, ही कुंपणे उल्लंघून बाहेर येणे अवघड होत असते. म्हणूनच माणसांना मोठेपण मिरवण्यात धन्यता वाटत असेल. मग स्वनाम धन्यतेसाठी कवायती सुरू होतात आणि स्वतःला महान करण्याचे प्रयोग करून पाहिले जातात."

“असे प्रयोगशील संशोधक किती असतात आपल्या आसपास? मोजून चारदोन आणि तुम्ही सगळ्यांनाच पिंजऱ्यात उभे करायला निघालात. हे काही रुचत नाही बुवा आपल्याला." – पुन्हा त्याची शंका.

"साहेब, आवडनिवडचा प्रश्न येतोच कुठे! तुम्ही काहीही म्हटले, तरी त्यात अंतराय थोडीच येणार आहे. स्वतःला समर्थ समजणारी अशी माणसे बेगडी मुखवटे घेऊन आपणच उभ्या केलेल्या मखरात मढवून घेणास उत्सुक असतातच."

"पटतंय बघा, तुमचं म्हणणं!"- पसंतीची मोहर अंकित करणारा आणखी एक आवाज.

"समाजात निरपेक्ष भावनेने घडलेली कामं पाहून माणसांविषयी आस्था वाढते. असं काही पाहून स्वतःला धन्य समजावे, तर दुसरीकडे स्वतः स्वतःचे नगारे बडवणाऱ्याची संख्याही काही कमी नाही जगात. अभिनिवेशाच्या तुताऱ्या फुंकून माणुसकीची बेगडी गाणी गाणारे खूप आहेत."

"आता कसं रास्त बोललात!”- माझा भक्त होण्याच्या वाटेने निघालेल्या महानुभावाकडून सकारात्मक प्रतिसाद.

“माझ्याकडून साऱ्या जगातला अंधार दूर होणार नाही, हे माहीत असलेली साधी माणसे पावलापुरता प्रकाश पेरत चालतात तेव्हा वाटतं. यांच्यासमोर आपण कोण आहोत? या ‘कोण’ शब्दाचं उत्तर ज्याला मिळतं, त्याचे अहं आपोआप गळून पडतात, पक्व फळासराखे. नाही का?”

“हा! हे पटतंय बघा, तुमचं म्हणणं.”- भक्तासह आणखी दोनतीन प्रतिसाद.

“कोणाला आवडो अथवा नावडो, परिस्थितीने शिकवलेलं शहाणपण समजून घेण्यासाठी शाळेतील अभ्यासाच्या परीक्षा नसतात. आपणच आपले परीक्षार्थी आणि आपणच प्राश्निक असतो या परीक्षेचे. फक्त मातीत मिसळून पुन्हा नव्याने उगवून येण्यासाठी विसर्जनाची तयारी असायला लागते, नाही का?"

मी आणखी काही बोलण्याच्या पावित्र्यात होतो, तेव्हाशी एकाच्या मोबाईलची रिंग वाजते. माझ्या बोलण्याकडे लक्ष असणाऱ्यांची अस्वस्थ चुळबूळ अधिक गहिरी होत जाते. हा इशारा होता, पूर्णविराम घेण्याचा. समजायचं ते समजलो आणि त्यांच्या उत्साही हालचाली निरखत राहिलो, प्रश्नांकित नजरेने.

अष्टावधानी वगैरे असणाऱ्या या साऱ्यांचा अधून मधून मोबाईलकडे बघत संवाद सुरु होता. आकलनाची सगळी कौशल्य वापरून ही विद्या अवगत केल्याने असेल कदाचित, हे सगळं त्यांना जमत. डोळे, हात, बोटांची अखंड कवायत सुरु. मोबाईलच्या स्क्रीनवरच्या दृष्यांमध्ये जीव एकवटून जमा झालेला, बोधकथांमधील पोपटाचा कशात तरी जीव असतो तसा. कोणत्यातरी ग्रुपवरून आलेले संदेश कोणालातरी ढकलून देताना फार मोठं काम पार पडल्याच्या आनंदलहरींवर काहीजण झुलत होते. कुणी आहे तेवढ्या वेळात काल खेळताना अपुऱ्या राहिलेल्या मोबाईलमधील खेळाची पुढील पायरी पकडण्याचा प्रयत्न करीत होते...

तेवढ्यात एकजण खूप मोठं घबाड हाती लागल्याच्या आनंदात ओरडला, “अरे, हा पहा नवा व्हिडिओ...! मस्तयं...!! ग्रुपवर फॉरवर्ड करतो...!”

उत्सुकता शिगेला. उघडला ग्रुप एकेकाने. लागले व्हिडिओ बघायला. सेकंदाच्या हिशोबाने पुढे सरकणाऱ्या घड्याळाच्या काट्यासारखे चेहऱ्यावरील हावभाव क्षणाक्षणाला बदलत राहतात. स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांना प्रतिसाद दिले जातात. त्यांच्या चेहऱ्यांवरील बदलणाऱ्या रेषांचे अर्थ शोधत मी पाहत राहतो त्यांच्याकडे, काही नवे हाती लागते का या अपेक्षेने...  

आपल्यातला कुणीही मी

By // 2 comments:

कुणाला मी मोठा समजतो, कुणी मला. हा दैनंदिन व्यवहारात सहज प्रत्ययास येणारा अनुभव. कुणीतरी आपल्यास मोठं समजतात. ही बाब सामान्य म्हणून जगताना सुखावणारी असते, याबाबत संदेह नाही. हे सगळं नशीब वगैरे आहे, असं मी म्हणणार नाही. कुणी म्हणत असल्यास अजिबात हरकत नाही, कारण नियती, दैव वगैरे मानणे माझ्या विचारात नाही आणि प्रयत्नांची वाट सोडणे स्वभावात नाही. मला माणसे विचारांनी मोठी असलेली बघायला आवडतात. समाजात माणूस म्हणून वागणं ही देणगी नसते. ते अनुभवाने आणि स्वभावदत्त गुणाने संपादित केलेलं शहाणपण असतं. माणसे मोठी होताना पाहण्यातला आनंद अनुभवता येण्यासाठी स्वतःला लहान होता आलं पाहिजे. मोठेपण स्वयंघोषित कधीच नसते. 'स्व'भोवती प्रदक्षिणा करणाऱ्यांना गती असते, प्रगती नसते.

अन्याय घडत राहणे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत आयुष्याचा वसंत सरून पानगळ अंगणी विसावणे हा काही आनंदाचा भाग नसतो. यातनादायी वाटेने प्रवास घडणे, माणसांच्या जगण्याची धवल बाजू नसते. तो कुठे होत असेल आणि मी कवचात सुरक्षित असेल, तर उपयोगच काय कमावलेल्या शहाणपणाचा, आणि शिकलेल्या ज्ञानाचा? स्वतःला मखरात बसवून घेऊन भक्तांकडून पूजा करून घेणारे, आरत्या ओवाळून घेणारे आसपास अनेक असू शकतात; पण सत्य हेही आहे की, मखरे फारकाळ आपली चमक टिकवून ठेऊ शकत नाहीत. त्यावर परिस्थितीनिर्मित गंज चढतोच चढतो. गंज लागलेल्या लोखंडाला मोल नसतं. म्हणून गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही बरे.

आदर मनातून उमलून यायला हवा. त्यात उगवत्या सूर्याची सहजता आणि उमलत्या फुलांची स्वाभाविकता असायला हवी. उगीच ओढून ताणून आणलेले अभिनिवेश नकोत. आईन्स्टाईनच्या बुद्धिमत्तेबाबत जगाला संदेह नाही. स्टीफन हॉकिंसच्या प्रज्ञेविषयी कोणी शंका घेत नाही आणि आम्ही जिनिअस वगैरे आहोत, असे त्यांनीही जगाला कधी ओरडून सांगितले नाही. जगानेच त्यांचे मोठेपण मान्य केले. पण कुणाला अर्ध्या हळकुंडात रंगण्याचा सोस असेल, तर कुणी काही करू शकत नाही.

जगात मागून एकही गोष्ट मिळत नाही. पात्र बनून ती मिळवावी लागते. आदर, सन्मान या गोष्टींना हुरळून जाणारे अनेक असतीलही, पण त्यामुळे आयुष्य संपन्न, समृद्ध वगैरे नाही होत. श्रीमंती येते ती कष्टाने आणि प्रसिद्धी मिळते इतरांसाठी केलेल्या कामाने. जंगलात कळपाने फिरणारे हरीणही वाघ समोर आल्यावर कळप सुरक्षित ठेवण्यासाठी जिवाच्या आकांताने ओरडते. कधी वाघाच्या भक्षस्थानी पडते, पण समूहाला वाचवते. त्या मुक्या प्राण्याला जे कळते ते मला, आपल्याला कळू नये, हा वर्तनविपर्यास नाही का?

मी कोणी मोठा नाही. पण आत्मसन्मान जागा असणारा आणि अंतर्यामी निनादणाऱ्या स्पंदनांच्या सुरांचे गोफ गुंफून, त्याची गाणी गात ओंजळभर स्वप्नांच्या मुक्कामाकडे चालणारा आहे. माझं जगणं योग्य असेल ते करण्यासाठी आणि खरं असेल तेच बोलण्यासाठी आहे, असं मी समजतो. तोंडपूजा करून आणि मान तुकवून मोठं होता येतं, पण मान खाली जाते, तिचं काय? जगण्यात मिंधेपण कधीही येऊ नये. कारण मिंधेपणाने मिळालेल्या साम्राज्यापेक्षा स्वाभिमानाने मिळवलेले स्थान अधिक मोलाचे असते. निदान मलातरी असं वाटतं.

असो, माणूस जगतो दोन गोष्टींवर. एकतर भीतीने, नाहीतर प्रीतीने. भीतीचं भय असणारे 'स्व'प्रतिमेच्या प्रेमात पडलेले असतात, तर माणुसकीचा गहिवर घेऊन जगणाऱ्यांची मूल्यांवर प्रीती असते. जे सात्विकतेवर स्नेह जडवून असतात, ते द्वेषाची बीजे कधीच पेरत नाहीत. त्यांचं स्वप्न असतं स्नेहाची नंदनवने फुलवणे. मला नंदनवने नाही फुलवता येणार, पण आपलेपणाच्या ओलाव्याचे भरलेल्या ओंजळभर तुकड्यात आस्थेची रोपे नक्कीच वाढवता येतील, नाही का?
**
(इमेज गुगलवरून साभार)

जगणं श्रीमंत करू पाहणारी माणसं

By // 11 comments:
(जळगावात 'परिवर्तन'संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी 'अभिवाचन महोत्सवाचे' आयोजन केले जाते. यानिमित्ताने केलेलं हे लेखन संगणकाच्या फोल्डरमध्ये पडून होतं. हवा असणारा लेख शोधताना अनपेक्षितपणे हे हाती लागलं. कार्यक्रम पार पडून तीनचार महिने तरी उलटून गेले असतील. प्रासंगिक निमित्ताने लिहिलेला हा लेख पुन्हा वाचताना जाणवले की, काही कामे अशी असतात, ज्यांची प्रासंगिकता कधीच पूर्ण होत नाही. म्हणूनच...)

स्थळ: रोटरी हॉल, मायादेवी नगर. वेळ: रात्रीचे दहा. ‘परिवर्तन’ आयोजित अभिवाचन महोत्सवात दिशा शेख हिच्या कवितांच्या अभिवाचनाचा आणि मुलाखतीचा कार्यक्रम संपला. अर्थात, संपवावा लागला. हॉलमधून बाहेर पडलो. कार्यक्रम पाहून, ऐकून एकेक माणसे बाहेर पडतायेत. आजचा कार्यक्रम कसा, याविषयी त्यांच्या आपापसात चर्चा सुरु आहेत. यशस्वीतेची प्रमाणपत्रे सुपूर्द करीत निघालेली माणसे प्रसन्न मुद्रेने आपापल्या घराकडे मार्गस्थ होतायेत. हॉलबाहेरील मोकळ्या जागेत थांबून काहीजण बोलत आहेत. मी आणि माझा एक स्नेही कार्यक्रमाविषयी बोलत उभे. कुणीतरी एक गृहस्थ आमच्याकडे चालत आले. माझा त्यांचा कुठलाही परिचय नाही. पण माझ्या स्नेह्याशी त्यांची ओळख. स्नेह्याने त्यांची जुजबी ओळख करून दिली. आम्ही काय बोलत आहोत, याचा अदमास घेत राहिले थोडावेळ. माझं आणि स्नेह्याचं बोलणं सुरु.

आमच्या चर्चेत सहभागी होत ते म्हणाले, “सर, आजच्या अभिवाचन कार्यक्रमाविषयी तुमचं मत काय आहे हो?”
“अप्रतिम...! शब्दातीत...!!” - मी

“अहो, सर! नुसतं अप्रतिम काय म्हणतात. अद्वितीय, न भूतो... वगैरे असं काय असतं ते बोला हो! काय उंचीचा कार्यक्रम घेतात ही माणसे. परिवर्तनविषयी नुसतं ऐकून होतो, आज अनुभव घेतला. काय बोलू... माझ्याकडे शब्द नाहीत.”

त्याचं मनापासून बोलणं ऐकून सुखावलो. पुढे त्यांच्याशी याच विषयावर आम्ही बोलत राहिलो. माझं बोलणं थांबवत ते म्हणाले, “सर, अण्णांशी बोलताना तुम्हाला मी पाहिले. तुमची चांगली ओळख दिसते. शंभू अण्णांना सांगा हो, हा मुलाखतीचा आणि अभिवाचनाचा कार्यक्रम अर्धाच झाला. दिशा शेख आणि अण्णांना पुन्हा ऐकायचं आहे. या कार्यक्रमाचं आयोजन नाही का करता येणार पुन्हा?”

या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं आणि असतं, तरी माझ्या सांगण्याने त्यांचं समाधान झालं असतं की नाही, माहीत नाही. पण एखाद्या कार्यक्रमाची उंची किती असावी आणि यशाची परिमाणे कोणती असावीत, याचा वस्तुपाठ ही प्रतिक्रिया होती. अशा उत्स्फूर्त प्रतिक्रिया किती कार्यक्रम आणि आयोजकांच्या नशिबी असतात? सांगणं अवघड आहे. पण एखादी संस्था, त्या संस्थेच्या कार्यक्रम, उपक्रमांना वाहून घेणारी, निरपेक्ष मानसिकतेने काम करणारी माणसे काहीतरी वेगळ्या वाटा निवडून चालत राहतात, इतरांनाही आपल्यासोबत नेतात, तेव्हा यशाची व्याख्या सामान्यांच्या प्रतिक्रियांच्या शब्दांत परिभाषित होते आणि तीच प्रमाण असते अन् तेच अशा कार्यक्रमांचं यश असतं.

अशाच धवल यशाला सोबत घेऊन चालणारी ‘परिवर्तन’ संस्था नव्या वाटा जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात निर्माण करू पाहते आहे. भले तिची पदचिन्हे मनोभूमीत अजून ठसठशीत उमटली नसतील; पण या पाऊलखुणा आश्वस्त करणाऱ्या आहेत, याविषयी संदेह नाही.

‘परिवर्तन’ प्रयोग करते आहे. परिसराच्या प्रांगणात वाचन संस्कार रुजवण्याचा अन्  माणसांच्या मनाला आणि विचारांना कुबेराचं वैभव देण्याचा. म्हणूनच जळगावच्या साहित्य, कला क्षेत्रात काम करणाऱ्यांना ही बाब खूप दिलासादायक वाटते. 
     
पुस्तक नावाचा प्रकार ज्या समाजात सामावलेला असतो. तो समाज वैचारिकदृष्ट्या समृध्द असतोच, पण त्याच्या सामाजिक जगण्याला अनेक आयाम मिळत असतात. तुमच्याकडे स्थावर-जंगम संपत्ती किती याला महत्त्व असेल, तर त्याचे परीघ सीमित असू शकतात. पण ज्ञानाने संपन्न श्रीमंतीला मर्यादांची कुंपणे सीमित करू शकत नाहीत. मुलभूतगरजांच्या पूर्तीकरता अनेक विकल्प असतात. जगण्याची आसक्ती त्यांचा शोध घ्यायला बाध्य करते. मनाला नैतिक उंचीवर अधिष्ठित करण्याची परिमाणे, साधने अनेक असली तरी पुस्तकासारखे खात्रीलायक साधन अन्य आहे की नाही, माहीत नाही. पुस्तकांचा माणसांच्या आयुष्यातला प्रवेश त्याच्या जगण्याच्या दिशांना निर्धारित मार्गाने नेण्यासाठी प्रेरणा देणारा असतो, याविषयी संदेह नाही.

समाजात पुस्तकांचे वाचक असे कितीसे असतात? असा एक प्रश्न पुस्तक आणि वाचनसंस्कृती या विषयाच्या अनुषंगाने नेहमीच चर्चिला जातो. याविषयी आपल्या सामाजिकविश्वात फारशी अनुकुलता आढळत नसल्याने वाचन, वाचनसंस्कार, पुस्तके याबाबत नकाराचे सूर स्पंदित होतांना दिसतात. याचा अर्थ वाचनवेडे, पुस्तकवेडे नाहीतच, असे नाही. त्यांची संख्या आपल्या आसपास तुलनेने अल्प आढळते आणि हाच खऱ्याअर्थाने आमच्या सांस्कृतिकदृष्ट्या किंतु-परंतुचा प्रश्न आहे. खरंतर आपल्याकडे पुस्तके नाहीत असंही नाही. पण आपण पुस्तकांकडे फक्त एक साहित्यकृती म्हणून पाहतो. त्यांना भाषिक, सांस्कृतिक, वैचारिक अस्तित्व असतं, हे बऱ्याचदा आमच्या गावीही नसतं. पुस्तकांच्या वाचनाबाबत उदासीन असणारा विचार जगण्याची परिमाणे संकुचित करतो. अशावेळी अभ्यास, व्यासंग हे शब्द खूप दूरचे वाटायला लागतात. माणसे कोणती पुस्तके वाचतात त्यावरून त्याच्या वैचारिक श्रीमंतीचा अदमास करता येऊ शकतो.

वाचनाचे हेतू ज्ञान, माहिती, व्यासंग, अभ्यास, आनंद आदि काही असले, तरी पुस्तकांच्या वाचनाने, परिशीलनाने जगण्याला उंची प्रदान करता येते, हे भान सतत असणे म्हणूनच आवश्यक असते. पुस्तकांचं आणि समाजाचं नातं दैनंदिन व्यवहारापुरतं सीमित राहू नये, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. अर्थात, असे करूनही आपल्या विचारविश्वात वाचनविषयक सजगता किती आहे? हा प्रश्न नेहमीच संदेहाच्या परिघावर असतोच असतो. कधीकाळी समाजात शिक्षितांचे प्रमाण मर्यादित असल्याने आणि विद्याव्यासंग काही लोकांपुरता सीमित असल्याने पुस्तकांच्या हजार-पाचशे प्रतींची विक्री फार मोठे यश वाटायचं. काही अपवाद वगळता, आताही यात फार मोठा फरक पडला आहे असं नाही. वाचनाविषयी अनास्था असेल किंवा स्वतः पुस्तक विकत घेऊन वाचायचं, हा विचारच मूळ धरू शकत नसल्याने असेल असे घडतं. म्हणून वाचनवेड्या माणसांनी आपले प्रयत्न सोडून दिले आहेत असे नाही. ही माणसे संख्येने विरळ असतील, पण आशेची अशी बेटे अथांग अनास्थेच्या आवरणात आशावाद जागवत उभी असलेली दिसतात.

जळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक परगण्यात ‘परिवर्तन’ नावाचं आशेचं भूशिर कला, साहित्य, संगीत, नाटक विषयक आस्था असणाऱ्यांना आश्वस्त करीत उभे आहे.

एखाद्या संस्थेच्या यशाची परिमाणे कोणती असावीत? तिच्या कार्याला कोणत्या पट्ट्यांनी मोजावे, याची काही परिमाणे असतीलही. अशा गोष्टींची पर्वा न करता निरासक्त विचारांनी कार्य करणाऱ्यांचे मोल शब्दातीत असते. असे काम ‘परिवर्तन’ जळगावात करते आहे. संवेदनशील विचारांनी संपन्न व्यक्तित्वे जळगावच्या आसमंतात पाहणाऱ्यास लीलया आढळावीत, याकरिता अनवरत धडपड करीत आहेत.

शंभू पाटील आणि परिवर्तन हा द्वंद्व समास आहे. त्यांचे हे सगळे सायासप्रयास पाहून, ही माणसे हे सगळं का करीत असावेत? असा प्रश्न साहजिकच मनात उदित होतो. बरं या सगळ्या धावपळीतून यांना असा कोणता मोठा लाभ होणार आहे? लाभ नाहीच, पण प्रसंगी पदरमोड करून, झिजून ही माणसे कोणता आनंद मिळवतात कोण जाणे? प्रत्येकवेळी केली जाणारी कामे लाभाची गणिते समोर ठेऊनच करावीत असे नसते. खरंतर यांची जातकुळी ‘ऐसी कळवळ्याची जाती, करी लोभावीण प्रीती’ हीच आहे. आणि हाच कळवळा या माणसांना उर्जा देत असतो. म्हणूनच की काय पद, प्रतिष्ठेची वसने बाजूला सारून शंभू अण्णांना कार्यक्रमस्थळी एखाद्या प्रेक्षकाला बसायला खुर्ची नसेलतर कुठूनतरी स्वतः उचलून आणून देण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. इतकं विनम्रपण ज्यांच्या ठायी आहे, त्यांना विनम्रतेच्या परिभाषेची पारायणे करण्याची आवश्यकताच काय?

‘परिवर्तनच्या’ कार्याला अनेक आयाम आहेत. सगळ्याच चौकटीना स्पर्श करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न असतो. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजे परिवर्तनच्या माध्यमातून आयोजित केला जाणारा ‘अभिवाचन महोत्सव’. खरंतर ‘अभिवाचन महोत्सव’ परिवर्तनची वेगळी ओळख होत आहे. अभिवाचन कार्यक्रम जळगावच्या वैचारिक श्रीमंतीला वैभव प्राप्त करून देण्याचा यशस्वी प्रयत्न आहे. गेल्या तीन वर्षाच्या कार्यक्रमांवर एक ओझरता कटाक्ष टाकला तरी याचं प्रत्यंतर येईल. अभिवाचन महोत्सवात वाचनासाठी निवडलेल्या साहित्यकृती अभिजात वाचनाच्या निकषांना प्रमाण असल्याची साक्ष देतील. वाचनाने अंतर्यामी आनंद निनादत राहावाच; पण सोबत विचारविश्वाच्या वर्तुळाचा परीघ विस्तारत राहावा, याची काळजी असतेच असते. म्हणूनच की काय मागच्या वर्षी कोणत्या साहित्यकृतींचे वाचन झाले, हे यावर्षाच्या अभिवाचन महोत्सवात आवर्जून आठवते. यातच त्यांचे यश सामावले आहे.

वाचनाचे प्रयोग माणसांना नवे नाहीत. पण त्यात नावीन्य निर्माण करण्याचे प्रयास नक्कीच नवे असतात. अभिवाचन महोत्सवात निवडलेल्या साहित्यकृतींचे वाचन करताना घेतलेल्या मेहनतीचा परिपाक कार्यक्रमस्थळी प्रत्ययास आल्यावाचून राहत नाही. वाचनासाठी निवडायच्या वेच्यांपासून मंचावरील सादरीकरणापर्यंत कोणत्या दिव्यातून जावे लागते, हे थोड्या संवेदनशील विचारांनी या धडपडीकडे पाहिले तरी कळते. वाचनाचा प्रयोग तास-दीडतास असला, तरी त्यामागे काही आठवडे वेचाल्याचे विस्मरणात जाऊ नये. रंगमंचावर सादरीकरण करताना विषयाला न्याय देणारी ही माणसे म्हणूनच आस्थेचा विषय होतात. आशयानुरूप वेशभूषा असो, रंगमंचीय व्यवस्था असो किंवा परिवर्तनच्या कसलेल्या कलाकारांनी साहित्यकृतींचे केलेले वाचन असो, ही एका ध्यासाची काहणी आहे, हे मान्य करावेच लागते.

गेल्या तीन वर्षापासून होणारा हा महोत्सव नव्या दिशेने, नव्या वळणाने वळताना निखरतो आहे. या वर्षी सात दिवसाच्या प्रयत्नांकडे पाहिले तरी सहज दिसेल. जयंत दळवींच्या ‘संध्याछायाने’ प्रारंभ आणि कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त ‘गगनाला पंख नवे’ या कार्यक्रमाने समारोप झालेला हा महोत्सव आनंदाची अनवरत पखरण करणारा होता, याबाबत दुमत नसावे. रसिकांना प्रत्येक दिवशी नव्या वळणावर नेणारा हा कार्यक्रम वाचनाचा आनंदपर्यवसायी विकल्प होता. दिशा शेख हिच्या कवितांचं अभिवाचन आणि शंभू अण्णांनी दिशाच्या घेतलेल्या मुलाखतीतून अभिवाचन महोत्सवाला एक वेगळ्या उंचीवर नेऊन अधिष्ठित केलं. या कार्यक्रमातून तृतीयपंथी वर्गाला व्यवस्थेत वर्तताना वाट्यास येणाऱ्या वेदनांचे एकेक पदर उलगडत गेले. सामाजिक, सांस्कृतिक प्रवाहासोबत वाहताना यांच्या रोजच्या जगण्यातील जाणवणाऱ्या समस्यांना मुखरित करणारा ठरला. तास-दीडतास सलग कार्यक्रम असला की, प्रेक्षकांमध्ये चुळबुळ सुरु होते; पण दोन तास उलटूनही हॉल आणखी काहीतरी ऐकण्यास आतुर आहे, हा अनुभव सुखावणारा होता.

डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचा ‘गालिब और मै’ या कार्यक्रमाची बैठकच वेगळ्या विषयाला आणि विचाराला अधोरेखित करणारी आणि म्हणूनच गालिब सोबत गजल आणि शेरांना समजून घेताना या साहित्यप्रकारची जाण आणि भान अधिक विस्तृत करणारा ठरला. ‘सय’- सई परांजपे , ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’- अरुणा ढेरे यांच्या साहित्यकृतींवर आधारित वाचनाने मंजुषा भिडे, हर्षल पाटील, श्रेया सरकार, आर्या शेंदुर्णीकर, मानसी जोशी आदींनी अभिवाचनाचे प्रयोग कोणत्या उंचीवर नेता येतात याची परिमाणे प्रेक्षकांच्या मनात कोरून तुलना करण्यासाठी कायमच उपलब्ध दिली. ‘झाड लावणारा माणूस’ आणि ‘एक ध्येयवेडी- मलाला’ या साहित्यकृतींना अनुभूती आणि पलोड शाळेच्या उमलत्या वयाच्या मुलांकडून सादर करणे परिवर्तनच्या दूरदृष्टीचा परिपाक आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये. मुलं भविष्य आहेत. या भविष्याला सुसंस्कारित करण्याचा हा प्रयत्न दूरगामी परिणाम करणारा आहे. ‘गगनाला पंख नवे’ हा समारोपाचा कार्यक्रम कविवर्य ना. धों. महानोर यांच्या पंच्याहत्तरी निमित्त कृतज्ञ सोहळा होता. खरंतर याला कृतार्थ सोहळा म्हटल्यास वावगे ठरू नये. महानोर दादांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या कार्यक्रमाने महोत्सवाची सांगता झाली असली, तरी अभिवाचन महोत्सवाने रसिकांच्या मनात वाचनाचे पेरलेले बीज पुढच्या वर्षापर्यंत नक्कीच तरारून येईल याबाबत आश्वस्त करणारे होते.

एखाद्या कार्यक्रमाचे अपयश तात्काळ नजरेस पडते. यशाच्या व्याख्या करताना माणसे हात जरा आखडता धरतात. तो धरू नये, असे नाही. पण काहीतरी वेगळं करण्यासाठी वाटाही निराळ्या शोधण्याची तयारी ठेवावी लागते. एवढेच नाही, तर आलेलं अपयशही पचवायची मानसिकता असायला लागते. धोपट मार्ग टाळून प्रघातनीतीच्या परिघाबाहेर काही करू पाहणाऱ्यांना कुठलं तरी वेड धारण करून धावावं लागतं, म्हणूनच आजचे वेडे उद्याचे प्रेषित ठरतात. ही सगळी माणसे कुणी प्रेषित, कोणी महात्म्ये वगैरे नाहीत. ती तुमच्या आमच्यासारखीच आहेत; पण त्यांच्यात एक गोष्ट वेगळी आहे, ती म्हणजे, आपण जे काही करतो आहोत, ते काही समाजावर उपकार म्हणून नाही, तर समाजाप्रती असणारं आपलं उत्तरदायित्त्व आहे, या भावनेने काम करत आहेत. त्यांच्या या कार्याला उदंड यश मिळो, असं म्हणणं म्हणूनच अप्रस्तुत होणार नाही. ही माणसे पुस्तके वाचतात. अभिवाचन कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षक श्रवण करतात. श्रवणाकडून आपल्यापैकी काहीजण वाचनाकडे वळले, तरी यांच्या प्रयत्नांना यश मिळालं, असं म्हणता येईल. वाचनासाठी वेळ नाही, ही सबब लटकी वाटते. वेळ शोधावा लागतो. आर्थिक गणिते पुस्तकांसाठी जुळवता येतात, त्यांना जगण्याची श्रीमंती शिकवावी लागत नाही. म्हणूनच या माणसांनी समाजातील माणसांना श्रीमंत करण्यासाठी चालवलेल्या या उद्योगाला अंगभूत श्रीमंती आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्त ठरू नये.
***

अक्षरलिपी

By // No comments:
अक्षरलिपी: अपेक्षांची मुळाक्षरे

श्रीमान मुंजाळ साहेब, आपण पाठवलेला 'अक्षरलिपी' दिवाळी विशेषांक- २०१७ मिळाला. खरंतर आश्चर्याचा सुखद धक्का अनुभवला यानिमित्ताने. आपल्या व्यग्र दिनचर्येतून अंक आपण माझ्यापर्यंत पोहचवला, हा आनंद विसरता न येणारा.

अक्षरलिपी अंकाविषयी मान्यवरांचे अभिप्राय काही दिवसांपासून मीडियातून वाचतो आहे. अंक हाती आल्यावर याची प्रचिती आली. आमच्याकडील पुस्तकविक्रेत्याकडे अंक हवा म्हणून चारपाच वेळा विचारणाही केली, पण प्रत्येकवेळी खो मिळत गेला. तरीही अंक हाती येण्याची आस सोडली नव्हती. अंक आला की कळवतो, म्हणून विक्रेत्याने आश्वस्त केलेलं. अंकाबाबत अभिप्राय वाचून कुतूहल आणखी वाढत राहिले. अन् अनपेक्षितरित्या अंक हाती आला. हा आनंद वर्णनातीत. माझ्यासारख्या एका सामान्य वाचकापर्यंत आपण अंक पोचता केला, ही बाब शब्दांच्या चौकटीपलीकडील आहे. 

अंक हाती आल्या आल्या अथपासून इतिपर्यंत पाहिला. अंक केवळ आणि केवळ सुंदर, समृद्ध...! अंतरंग आणि बाह्यरंगानेसुद्धा. गेले दोनतीन दिवस ही समृद्ध 'अक्षरांची लिपी' सोबतीला होती. विचारविश्वाचे परीघ विस्तारणाऱ्या या अक्षरांच्या पाऊलखुणांचा माग घेत चालत राहिलो.

दिवाळीचा माहोल संपून काही दिवस उलटून गेले. अनेकांचे अनेक अंक वाचून झाले. त्याविषयी अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया माध्यमांचे हात धरून चालत राहिल्या. अशावेळी आपण या अंकाविषयी अभिप्राय, प्रतिक्रिया- खरंतर हे शब्दही खूप मोठे आणि दूरचे वाटतात. कारण एकतर अभिप्राय देण्याइतपत अधिकार आपल्याकडे असायला लागतो. तो नसला तर निदान अधिकारवाणीने लिहिण्याइतपत शब्दांची साधना असायला लागते. आपण तर त्याच्या आसपासही नाहीत, मग प्रतिक्रिया देऊन न देऊन अंकाच्या असण्या-नसण्यात कोणतं मोठं परिवर्तन घडणार आहे. हा विचार काही केल्या मनातून निरोप घेत नव्हता. प्रतिक्रिया द्यायला आपल्याकडे नाव असावंच असं काही आहे का? सामान्य वाचक म्हणून मत व्यक्त करू नाही शकत का? असे काहीसे वळणावळणांनी धावणारे विचार अधिक प्रबल होत गेले.

अभिप्रायासाठी (?) थोडा उशीरच होतोय. पण हे संचित हाती लागल्याने व्यक्त होण्यावाचून अन्य विकल्प नव्हता. खरंतर अंकाने लिहिण्यास बाध्य केले, म्हणणेच अधिक संयुक्तिक. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काळात असं काही धाडस करणं अंगलट येण्याची शक्यताच अधिक असते. अंकनिर्मितीचं सव्यापसव्य करताना म्हणूनच कोणालाही दहावेळा विचार करायला लागतो. आर्थिक गणितांचे आडाखे बांधायला लागतात. चुकलेच तर झळ सोसण्याची तयारीही असायला लागते. असं असताना या लोकांनी हे धाडस करावं कशाला? हा प्रश्न उगीच मनात आणखी नवे प्रश्न निर्माण करीत होता. पण चाकोरीचे रस्ते सोडून नव्या वाटा शोधण्याची आस असली की, असं काही वेगळं घडतं. साहित्यातील सकस असं काही हाती लागतं. महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेत दिवाळीअंकांनी अनेक नवे आयाम निर्माण केलेत. उंचीची परिमाणे तयार केलीत. कालोपघात त्यांच्या कार्याचे ठसे अंकित झाले. अंकांच्या अशा उज्ज्वल इतिहासाला कवेत घेत उंचीची नवी परिमाणे ठरवणारा अंक पहिल्याच प्रयत्नात व्हावा, याचंच अप्रूप अधिक वाटलं. संपादक म्हणून विषयनिवडीपासून ते अंक वाचकांच्या हाती पोचवण्याच्यापर्यंतच्या प्रवासात अंकाप्रती असणारी आपली अढळ निष्ठा आणि बांधिलकी प्रत्येक वळणावर प्रत्ययास येते. याचं श्रेय निर्विवादपणे महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले आणि प्रतीक पुरी या तीनही संपादकांचे.

आसपासच्या आसमंतात अस्वस्थपणाचं मळभ दाटून आलं आहे. विचारांमध्ये साचलेपण येत आहे. नितळपण घेऊन वाहणारे प्रवाह आटत असतांना हे साचलेपण अधिक गहिरे होत आहे. वर्तनाचे सगळे व्यवहार स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपत आहेत. मखरात मढवून घेण्याच्या काळात माणसांच्या जगण्याचे सगळेच धागे उसवत आहेत. माणसाचं माणसापासून आणि आसपासच्या आसमंतातून हे सुटणं आणि तुटणं समजून घेत एका निश्चित भूमिकेतून अंकाची निर्मिती घडली आहे. संपादकीयात असंच काहीसं सांगणं अधिक आश्वस्त करणारे आहे. संक्रमणाच्या काळातून घडणारा प्रवास दिशा हरवतो आहे. पायाखाली पडलेल्या पायवाटा अडथळे ठरत आहेत, अशावेळी सामान्यांना अभिव्यक्त होण्याचे माध्यम ‘अक्षरलिपी’ अंक ठरावा, ही बाब नि:संदेह प्रशंसनीय आहे.  

वर्तमानातील गुंतागुंतीच्या प्रश्नांचा आणि जटिल समस्यांचा वेध घेणारी विचक्षण नजर अंकासाठी संपादनाचे काम करणाऱ्यांकडे असायला लागते. आपण या निकषावर खरे उतरला आहात. अंकासाठी निवडलेल्या विषयांमधून आपण निश्चित भूमिकेपासून विचलित होत नसल्याचे प्रत्ययास येते. एखादा अंक वाचकांना आरंभापासून अंतापर्यंत आवडला, असं सहसा घडत नाही. अंकातील कुठलातरी एखादा भाग आवडतो. नंतर बाकीची पाने केवळ आहेत म्हणून उलटवली जातात; पण ‘अक्षरलिपी’ यास अपवाद आहे, असं म्हणणं अतिशयोक्त नाही होणार. अंकातील एक भाग खूप उंचीवर विहार करतो आणि दुसरा जमिनीवर सरपटतो आहे, अशा नकारात्मक विचारांचे कवडसे मनातून डोकवायला अंकात फटी नाहीत.

अंकातील कथाविभाग वाचकांच्या पदरी संपन्नतेचं दान देतो. वर्तमानाच्या वाटेने विसंगतीचा वेध घेणाऱ्या कथा अंकाला वेगळे परिमाण देतात. समकालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक पीळ अन् मनोव्यापाराचे विविध पैलू कथालेखकांनी समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. कथा नव्या जाणिवा अन् वेगळ्या विषयांना सोबत घेऊन आल्या आहेत. अंकातील रिपोर्ताज सामान्यांना अनभिज्ञ चौकटींच्या विश्वात जीवनयापन करणाऱ्या जगाशी अवगत करून देताना महत्त्वाची भूमिका घेतो. वेगळे विश्व वाचकांसमक्ष मांडण्याचे श्रेय अंकातील रिपोर्ताजला निःसंदेह द्यावे लागेल. माणसांच्या जगात असून माणसांनी दुर्लक्षित केलेल्या ममताबाई आणि सोनाबाईंच्या संघर्षकहाण्या अंतर्यामी अस्वस्थपण जागवतात. स्त्रियांच्या संघर्षमय जगण्याचा वेध घेतात. भवतालचे कवडसे पकडणाऱ्या कविता वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या आहेत. कविताविभाग वर्तमानाचे वास्तव नेमकेपणाने अधोरेखित करतो. खाद्य संस्कृतीवरील लेख त्या-त्या समाजघटकांची संस्कृती आणि सामाजिक परिप्रेक्ष्यांना नव्याने दिशा देतात. जातिधर्माच्या अनुषंगाने चालत येणारी आहारपद्धती आणि काळाचा परिपाक म्हणून खाद्यसंस्कृतीत होत गेलेले बदल या लेखांनी समर्थपणे टिपले आहेत.

जाहिरातीपासून मुक्त अंक ही बाब वाचकांना सुखावणारी असली, तरी अंकनिर्मिती करणाऱ्यांना आनंद देणारी नक्कीच नसते. या अंकात जाहिरातींचे गतिरोधक नसल्याने वाचक आरंभापासून अंतापर्यंत अंकाशी जोडला जाऊन आशय विषयाशी समरस होतो. अंकात ज्या छायाचित्रकार, लेखक, कवींनी आपले योगदान दिले आहे. त्या सर्वांचे अभिनंदन करण्याइतपत मी काही मोठा नाही, पण यांच्या लेखणीची उंची अंकाच्या चौकटींना नवी परिमाणे देणारी आहे. निमित्त म्हणून दिवाळी अंक विकत घेऊन आपण सांस्कृतिकदृष्ट्या सजग आहोत, असं वाटणारेही आसपास असू शकतात. काही अशा वेगळ्या प्रयत्नांना स्वीकारून त्यांची वाट प्रशस्त व्हावी म्हणून शुभेच्छांचं पाथेय घेऊन उभे असतात. केवळ घटकाभर विरंगुळा म्हणून  पाहणारेही असतात. कोणी कोणत्या दुर्बिणीतून याकडे बघावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण हेही वास्तवच की, साहित्य, कला, संस्कृतीच्या संवर्धनात योगदान असल्याचं आपणच आपणास प्रशस्तिपत्र देऊन अंक तयार होत नसतात. हे प्रकर्षाने प्रतिबिंबित करणारा आणि समकालाचा वेध घेणारा एक वैचारिक दस्तऐवज म्हणून या अंकाकडे खात्रीने पाहता येईल.

कालसुसंगत विचारधारा अंगीकारणारे आणि सामाजिक भान जपणारे साहित्य, वेगळेपण अधोरेखित करणारे विषय, निवडीपासून मांडणीपर्यंत आखीव-रेखीवपण घेऊन येणारी संपादनाची चौकट या दिवाळी अंकाचं बलस्थान आहे. उत्तम निर्मितीमूल्य, सुबक मांडणी आणि सुंदर सजावट, नेमकी छायाचित्र आणि त्यांना नेमकेपणाच्या आशयात गुंफणाऱ्या कवितेच्या ओळी या अंकाच्या जमेच्या बाजू आहेत.

सर्व पातळ्यांवर विचारपूर्वक नियोजन करून उत्तम दर्जाचा दिवाळी अंक हाती सोपवल्याप्रीत्यर्थ महेद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतीक पुरी आणि लेखन तसेच निर्मिती प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! या ‘अक्षरलिपी’ची अक्षरे मनावर गोंदवून घ्यावीत आणि संग्रही ठेवावीत अशीच आहेत. म्हणूनच आपल्याकडून पुढच्या वर्षी प्रकाशित होणारा दिवाळीअंकही असाच उंचीची परिमाणे अधोरेखित करणारा, वाचनीय, कसदार आणि सर्वसमावेशक व्हावा, अशी अपेक्षा करण्यास कोणालाही संदेह नसावा.
**

किंमत: ₹१३०
अंकासाठी संपर्क: महेंद्र मुंजाळ
mahendramunjal@gmail.com
aksharlipi2017@gmail.com
संवाद: ७७४४८२४६८५

वाघूर: शोध समृद्ध किनाऱ्यांचा

By // No comments:

वाघूर: शोध समृद्ध किनाऱ्यांचा

दिवाळी अंक महाराष्ट्राचं सांस्कृतिक संचित आहे, असं म्हणणं अतिशयोक्त होणार नाही. प्रत्येकवर्षी प्रकाशित होणाऱ्या चार-पाचशे दिवाळी अंकांचा विचार करताना भले आर्थिक नसेल, पण या वैभवाला बऱ्यापैकी सांस्कृतिक बरकत आहे, असे कोणास वाटत असेल, तर असे वाटण्यात वावगे काहीच नाही. विज्ञानवाटेने घडणाऱ्या प्रवासामुळे इलेक्ट्रॉनिक माध्यमे सहज उपलब्ध असल्याने व्हर्च्युअल अवकाश दिवाळी अंकांची नवी वाट संपन्न करू पाहतो आहे. मोठ्या संख्येने प्रकाशित होणाऱ्या अंकांच्या आर्थिक, सामाजिक यशापयशबाबत मतेमतांतरे असू शकतात. कदाचित हे मुद्दे वाद-संवादाचा विषय असू शकतात, पण प्रकाशित होणारे प्रत्येक अंक गुणवत्तेच्या निकषांवर खरे उतरतात आणि उतरून उरतात असे नाही. जे उरतात ते लोकस्मृतीतून सहसा सरत नाहीत. 

अंकांचं परिशीलन, परीक्षण त्यांच्या प्रकाशनानंतर होणं ओघानेच येतं. सिद्धहस्त लेखण्या आणि विचारांतून त्यांच्या गुणांचा, गुणवत्तेचा यथासांग गौरव होत असतो. याचा अर्थ सगळ्याच अंकांच्या ललाटी हे भागधेय अंकित असतं असं नाही. काही गुणांमध्ये उजवे असतात, काही गुणवत्तेत मोठे ठरतात; पण फार थोड्या अंकांना गुण आणि गुणवत्तेच्या चौकटी सांभाळता येतात. म्हणूनच ते दीर्घकाळ मनाच्या मातीत रुजत जातात. प्रत्येकवेळी नव्याने. 

आपण वाचतो किती? हा प्रश्न नेहमीच कुठूनतरी ऐकायला, वाचायला मिळत असतो. शिकतांना वाचन अनिवार्य आवश्यकता असते. ते पाठ्यपुस्तकापुरतं सीमित असतं बहुदा. म्हणूनच की काय अतिरिक्त वाचनाचा गंध नसणारी अनेक माणसे आसपास सहज नजर फिरवली तरी सापडतात. वाचनसंस्कार, वाचनसंस्कृतीविषयी बरेच सांगितले, लिहिले जाते. हल्ली तर मोबाईल फोनमुळे स्मार्ट झालेल्या तंत्राने सहेतुक वाचन हरवत चालल्याचा सूर सजत असल्याचे समजते. हे कितपत संयुक्तिक हे ज्याचे त्याने ठरवावे.

अभिरुची आणि सर्जन साहित्याच्या परगण्यास संपन्नता प्रदान करीत असतात. अभिरुचीचा दर्जा उन्नत असेल, तर सर्जनाला श्रेष्ठता लाभते आणि संकलनास उंची. अशीच अंगभूत उंची घेऊन तीन पावलात वाचनाचं अवकाश व्यापणारा अंक म्हणून ‘वाघूरकडे’ आश्वस्त विचारांनी पाहता येईल. दर्जा, गुणवत्ता आणि योग्यता कोणत्याही अंकाच्या असण्याला अर्थपूर्णता प्रदान करतात. या सगळ्याच आयामांना आपल्यात सामावणारे नाव म्हणून मान्यवरांच्या मनात ‘वाघूरने’ गेल्या तीन वर्षाच्या प्रवासात स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. अर्थात, शीर्षस्थानापर्यंतचा प्रवास कधीही सुगम नसतो. त्या वाटांनी घडणारा प्रवास आपल्या आत अनेक कहाण्या घेऊन मुक्कामाच्या दिशेने निघालेला असतो. त्याकरिता परिशीलन, प्रामाणिक परिश्रम आणि प्रसंगांना सामोरे जाण्याइतपत सहनशीलता अंगी असायला लागते. या गुणांचं पाथेय सोबत घेऊन चालणारे सव्यसाची संपादक ‘नामदेव कोळी’ यांनी वाघूरला हे स्थान मिळवून दिले आहे. हे म्हणणं कोणाला कदाचित अतिशयोक्त वाटेल, पण यावर्षाचा ‘वाघूर’ दिवाळी अंक हाती घेतल्यानंतर याचं प्रत्यंतर येईल.

वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी वेगळ्या वाटांचं मनात गोंदण घडणं आणि गोंदलेल्या खुणांचा मागोवा घेत मुक्कामाकडे मार्गस्थ होणं घडत असेल, तर निर्मितीचा आनंद वेगळा ठरतो. दर्जा आणि त्यानुसार लाभलेलं देखणेपण अन् मान्यवर साहित्यिकांच्या समृद्ध लेखणीतून सजलेला ‘वाघूर’ म्हणूनच महत्त्वाचा अंक ठरतो.

कोणत्याही पुस्तकाचे अथवा अंकाचे केवळ बाह्यरंग देखणे असणे पुरेसे नसते, तर अंतरंग समृद्ध असणे तेवढेच अनिवार्य असते. या दोनही निकषांची पूर्तता करणारा हा अंक मुखपृष्ठ ते मलपृष्ठ असा देखणा प्रवास वाचकास घडवतो. वाघूरची मांडणी आकर्षक आहेच, पण मजकूर वाचकाच्या मनात घर करतो. अंकात जागोजागी पेरलेली रेखाचित्रे आशयाला अधिक गहिरेपण देतात. सुंदर फॉण्ट, नॅचरल शेडचा कागद आणि हाती सहज विसावणारा आकार या साऱ्यांचा परिपाक अंक प्रत्येक पानागणिक मनात रुजत जातो. अंक बाह्यांगाने समृद्ध आहेच, पण सिद्धहस्त साहित्यिकांच्या साहित्याने त्याचा अंतरंग अधिक संपन्न केला आहे, म्हणूनच एक जमलेला अंक म्हणू या!

प्रत्येकवर्षी विशेष पुरवणीचा प्रघात वाघूरने कायम ठेवत यावर्षी श्रेष्ठ साहित्यिक ‘सआदत हसन मंटो’ यांच्या साहित्यावर आधारित पन्नास पानांची विशेष पुरवणी (याआधीच्या अंकांत ‘सलाम दादा’ ज्ञानपीठ विजेते लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यावर आणि ‘सैराट, नागराज आणि आपण’ या विशेष पुरवण्या) या अंकाचा आत्मा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. २५२ पृष्ठसंख्येत कथा, ललित, समीक्षा, सिद्धांत, निबंध, आठवणी या परगण्यातून सफर करताना वाचक हरकून जातो. गुलजार, चंद्रकांत देवताळे, रवींद्र पांढरे, प्रवीण बर्दापूरकर, माधुरी शेवते, अशोक कोळी, गणेश विसपुते, रणधीर शिंदे, यशवंत मनोहर या आणि अशा नामवंत साठोत्तरी-नव्वदोत्तरी पिढीतल्या साहित्यिकांच्या कसदार लेखण्या सहज आविष्कृत झाल्या आहेत.

जाहिरातींच्या जंजाळातून अंकांना मुक्त होणं आर्थिक पातळीवरील गणिते आखताना अवघड असते. त्याला इलाज नाही. पण वाघूरमध्ये ही हर्डल्स अडथळा ठरत नाहीत. मोजक्या जाहिराती योग्यजागी विसावाल्याने वाचकांचा वाचनप्रवास विनाव्यत्यय सुरु असतो.

साधना, ऋतुरंग, मुक्तशब्द, अंतर्नाद, अनुभव, मौज, हंस, दीपावली आदि नामवंत अंकांच्या पंगतीत लीलया सामावणारे ‘वाघूर’ हे एक नाव स्वतःचे किनारे कवेत घेत संगमाच्या शोधात वाहते आहे, आसपासचे परगणे समृद्ध करत. याचं श्रेय ‘नामदेव कोळी’ यांच्या विचक्षण संपादनाला आहेच, पण अंकाला मुखपृष्ठाच्या माध्यमातून देखणेपण देणारे प्रकाश वाघमारे, अंकाच्या संसाराची सुंदर मांडणी करणारे विकास मल्हारा आणि रेषांची लयदार पखरण करणारे सगळे कलासक्त हात आणि अंकनिर्मितीचा गाडा ओढण्यास सहकार्याचा सतत संवाद ठेवणाऱ्या प्रमोद इंगळे यांना निर्विवाद. एकुणात सकस वाचनाच्या शोधात असणाऱ्या आणि वेगळेपणाच्या मागावर असणाऱ्या वाचनप्रेमींनी या अंकाला वाचावंच, पण वाचनाच्या वाटेने नव्याने वळलेल्या वाचकांनी वाघूरच्या वळणावर जरा वेळ विसावणे अधिक आनंददायी असेल, याबाबत कोणाच्या मनात संदेह असण्याचे कारण नसावं. म्हणूनच नितांत सुंदर अंक वाचकांच्या हाती देणाऱ्या सगळ्यांचे अभिनंदन आणि पुढील अंकासाठी शुभेच्छा देताना पुढील वर्षासाठी अधिक अपेक्षा ठेवण्यात काही अतिशयोक्त आहे असे वाटत नाही.

संपादक: नामदेव कोळी
स्वागतमूल्य: रुपये २५०/-
अंकासाठी संपर्क: ७७६८००४४०४, ९४०४०५१५४३

मेल: waghoor@gmail.com
***

Kavita: Kavi Ani Vachakanchi | कविता: कवी आणि वाचकांची

By // 6 comments:
चित्र, शिल्प, साहित्यादी कलांचे जीवनातील स्थान नेमकं काय असतं? ते असतं की आपण कलासक्त नाहीत, असे कोणी म्हणू नये यासाठी; केवळ कुणी तसं म्हणालं म्हणून आपणही तसंच सांगतो. की याहीपेक्षा अधिक काही अशा सांगण्यात अनुस्यूत असते. सांगणं जरा अवघड आहे. आसपासच्या गोष्टींकडे पाहण्याचे पैलू प्रत्येकाचे वेगळे असतात अन् त्या अनुषंगाने त्याचे विचार प्रकटत असतात. तसंही व्यक्ती तितक्या प्रकृती, या न्यायाने सगळ्यांना सगळ्याच गोष्टी आवडायला हव्यात असंही कुठेय! कला, क्रीडा, साहित्यातील माणसाला काहीतरी आवडत असतंच. आवडणारं नेमकं काय, हे सांगता येईलच असे नाही. जगण्यासाठी मुलभूत गरजांची पूर्तता होणं आवश्यक असतं. त्यानी देहाचं भरणपोषण होतं, पण मनाचं काय? खरंतर मनाची बैठक वेगवेगळ्या प्रस्तरांवर अधिष्ठित असते. म्हणून त्याला समजून घेताना आधीच ठरवून घेतलेल्या पट्ट्यांनी मोजणं जटिल आहे. आसपास असणाऱ्या गोष्टींच्या आकलनाचे अनेक आयाम असतात. मनाला संपन्न करण्यासाठी अशी विखुरलेली श्रीमंती वेचता यायला हवी.

कलाक्रीडासाहित्य जगण्याच्या परिघाला समृद्ध करीत असतात, याबाबत संदेहच नाही. यांच्याशिवाय माणूस पशूवत असल्याचे म्हटले जाते. नेमकं हेच वेगळेपण माणूस आणि अन्य जीव यांच्यात उभी रेष ओढून माणसाला वेगळं करतं. कलावंत जन्मावा लागतो की घडवता येतो, हा वादविषय असू शकतो. कला सगळ्यांना अवगत असतात का? सगळ्यांना त्यांची समज असते का? हा भाग नंतरचा. हा विचार थोडावेळ वेगळा ठेऊया! खरंतर कलाविहीन जगणं आयुष्याचा प्रवास रुक्ष करण्याचं कारण असतो.

साहित्याच्या परगण्यात विहार करणारा वाचक मुळातच वाचनवेड घेऊन जन्माला येतो की, परिशीलनाने घडतो. की घडवता येतो? कारणे काहीही असोत, वाचक ही साहित्याची सार्वकालिक आवश्यकता आहे, एवढं मात्र नक्की. असं असेल, तर तो सारख्याच योग्यतेचा असू शकत नाही, हेही दुर्लक्षून चालत नाही. लिहित्या हाताना संवेदनशील, सुजाण वाचक मिळणे यासारखे सुदैव नाही. कोणी कादंबरी वाचनाच्या मार्गाने चालतो, कोणी कथेच्या विश्वात रमतो, कुणी नाटकांच्या संवादात गुंततो, कुणी कवितेच्या गावाला निघतो. प्रत्येकाच्या पसंतीचे परगणे भिन्न असतात. पण जाणत्या साहित्यिकांइतकाच सजग वाचकही महत्त्वाचा.

साहित्याची निर्मिती कशासाठी आणि कुणासाठी, या प्रश्नांची उत्तरे प्रत्येकाच्या अनुभवाच्या कक्षेत शोधता येतील. कधीकाळी माध्यमे सीमित असल्याने आणि ज्ञानसंपादनाचे विकल्प सीमित असल्याने साहित्यनिर्मितीच्या व्यवहारावर मर्यादा येणं स्वाभाविक होतं. काळाने कूस बदलली विज्ञानतंत्रज्ञानाने परिघाचा विस्तार झाला अन् अभिव्यक्तीला माध्यमांचा अवकाश गवसला. प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी प्राप्त झाली. सोशलमीडियाने या वाटा अधिक प्रशस्त केल्या. माध्यमांच्या भिंती व्यक्त होऊ पाहणाऱ्यांच्या अंगणी येऊन विसावल्या. लेखणी हाती घेऊन व्यक्त होऊ पाहणाऱ्याचं विश्व विस्तारायला लागलं.

व्हर्च्युअल विश्वाच्या भिंतींवर व्यक्त झालेल्या सगळ्याच गोष्टी भले साहित्यनिकषांच्या साऱ्याच चौकटीत अधिष्ठित होत नसतीलही. पण व्यक्त होण्यासाठी असणाऱ्या मर्यादांची कुंपणे संपली, एवढं मात्र खरं. फेसबुक, व्हॉटसअॅप, ब्लॉगस् यासारख्या माध्यमांवर मोठ्याप्रमाणात लिहलं जातंय. अर्थात, ते किती वाचलं जातंय, हा आणखी वेगळा प्रश्न. त्याची उत्तरे काही असोत, पण लेखनाचे विविध प्रकार हाताळल्या जाणाऱ्या या माध्यमांत लिहिणाऱ्यांचा सगळ्यात अधिक वावर कवितेच्या परगण्यात असलेला आढळेल. अर्थात याबाबत वाचकांची अन्य काही निरीक्षणे असू शकतात. पण कवितेचं पीक उदंड आलेलं आहे. असं म्हटल्यास त्यात फार काही अतिशयोक्त आहे असे वाटत नाही.

कविता म्हटल्यावर सगळ्यात आधी आठवतात, त्या आपण शाळेत असतांना शिकलेल्या कविता. या कविता विसरलेला माणूस अपवादभूत असेल. भले कविता सगळी पाठ नसेल, पण त्यांच्या काही ओळी सहज ओठांवर रुंजी घालत असतात. नसेलच काही आठवत, तर कवितेचं नाव, आशय आठवत राहतो. श्रावणमासी असो, क्रांतीचा जयजयकार असो, पिवळे तांबूस ऊन कोवळे असो अथवा अन्य कोणत्या. या कविता विसरणं थोडं अवघडच. कारण त्यांचं गारुड म्हणा किंवा त्या-त्या कवींची किंवा कवितांची ही ताकद आहे असे म्हणा, त्याने काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट अप्रत्यक्ष अधोरेखित केली जाते ती ही की, या कवींच्या आणि कवितांच्या योग्यतेच्या कविता आता दृष्टीस पडत नाहीत, वगैरे वगैरे. अर्थात, या विधानात तथ्य किती, हा ज्याचा त्याचा प्रश्न. भलेतर याला नॉस्टेल्जीया म्हणा हवं तर. हेही म्हणण्यात काल्पनिकता किती किंवा तथ्य किती, याचं उत्तर आपापल्या परीने स्वतःच शोधावं. कसदार लेखन कालच होतं आणि आज तसं किंवा त्या योग्यतेचं लिहिलं जातच नाही, असं नाही. ते लिहलं जातं आणि त्या योग्यतेचं असतं याबाबत संदेहच नाही. वाचक कालही होता, आजही आहे. याचा अर्थ त्याची इयत्ता मोजण्याचं कारण नाही. सजग वाचक सार्वकालिक असतो आणि राहील. सकस साहित्याच्या शोधात असणाऱ्यांची धावपळ सार्वकालिक असते. आणि सर्वस्थळी असते.

साहित्याचा वाचक मग तो कोणत्याही प्रकारचे साहित्य वाचू देत, आपल्यासोबत त्याच्या वैयक्तिक आवडीनिवडी, अपेक्षा, संकेत, पूर्वग्रह, मते घेऊन तो विहार करीत असतो. त्याला हव्या असणाऱ्या साहित्याचा आनंद घेत असतो. तो सविकल्प असेल अथवा निर्विकल्प. तो कसाही असू द्यात, पण वाचक घटका दोनघटका आनंदलहरींवर विहार करतो, हे महत्त्वाचं. अर्थात, साहित्याचा निर्विकल्प आनंद कितीजण घेऊ शकतात? अनुमान बांधणे अवघड आहे. या आनंदाची पातळी उच्च असल्याने या परगण्यात पोहचणारे संखेने कमी असतात, एवढं मात्र म्हणता येईल. या विधानाला मर्यादा असल्या तरी.

मराठीतील इतर साहित्यप्रकारापेक्षा कवितेला बरकत जरा जास्तच असल्याचे म्हटले जाते. यातील उपहास विसरूयात! लिहिल्या जाणाऱ्या कविता आणि प्रकाशित होणाऱ्या कवितासंग्रहांची संख्या पाहताना अशा गोष्टींवर विश्वास ठेवावा लागतो. या अनुषंगाने एक प्रश्न समोर उभा राहतो, तो म्हणजे, भारंभार लिहिल्या जाणाऱ्या अशा कवितांना कोणत्या परगण्यात अधिष्ठित करावे. लिहिणारा हाती माध्यम आहे म्हणून लिहितो. वाचणाऱ्यास ते सहज उपलब्ध आहे म्हणून वाचतो. पण या दोघांच्यात संवाद किती? आणि दोघांना कवितेची समज किती? या प्रश्नावर घोडं अडतं. माध्यमांवर लिहून लाईक कॉमेंटसचा रतीब सुरु असला, म्हणजे ती कविता अथवा अन्य लेखन योग्यतेच्या साऱ्याच निकषांवर खरे उतरतेच असे नाही. ‘मी तुला, तू मला’, असा लाईक, कॉमेंटसचा सुरु असणारा खेळ लेखनाच्या मर्यादांना समोर येऊ देत नाही, हेही वास्तवच. अर्थात, येथे सगळाच कचरा असतो असे नाही. खूप दर्जेदार लेखनही येथून हाती लागतं, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

कवितालेखनासाठी स्वतःचं असं काही आपल्याकडे असावं लागतं, तसंच हे समजायलाही. कवितेचं सौंदर्य केवळ वरपांगी नसून, ती आतूनच मोहरून यावी लागते. कवितेचे अर्थ आणि मनातील अर्थ यांच्या संवादाचा सांधा जुळणं म्हणून आवश्यकच. कविता काळाच्या अफाट अवकाशात भिरभिरत असते. या परिभ्रमणात परिवर्तनाची आवर्तने तिला टिपता यायला हवीत. त्याआधी तिला परिवलनाची गती गवसायला हवी. कविता कोणतीही असो, काळाची मुद्रा तिच्यावर अंकित झालेली असते. कविता जशी चांगली असते, तसा चांगला वाचकही असतो. तसाच चांगला कवी, साहित्यिकही असतोच. या साऱ्यातील चांगला हा शब्द कदाचित व्यक्तीसापेक्ष विचार असू शकतो.

वाचक रसिक असतोच, पण कवीच्या सगळ्याच कविता त्याला समजतील असे नाही. त्यासाठी त्याला परिश्रम घ्यावे लागतात. कवितेतील आशयसौंदर्य, भाषासौंदर्य, अर्थसौंदर्य समजून आनंद घ्यावा लागतो, तशीच असली तर कवितेतील दुर्बोधताही समजून घ्यावी लागते. कवीच्या लेखणीतून प्रकटलेल्या कवितेचे हेतू भावजागर, लोकजागर असतातच; पण ती विशिष्ट ध्येयानेही प्रेरित असतेच. ती काळाच्या गतीने निर्माण केलेल्या प्रश्नचिन्हांना समजून शब्दांकित करीत असते. साहित्यिकाचा संबंध भोवतालाशी असतो. आसपासचे प्रश्न, समस्या त्याला अस्वस्थ करतात. या संबंधातून त्याच्या मनावर मूल्यांचे संस्कार होतात. मनावर कोरल्या गेलेल्या रेषा कलाकृतीचं रूप धारण करून दृगोचर होतात. त्याची भाषा परिसरातून त्याच्याकडे येते, तसेच अनुभवसुद्धा. त्याला जे प्रश्न दिसतात, त्याकडे तो प्रकृतीधर्मानुसार बघतो. हे बघणं त्याच्या लेखणीची निर्मिती असते. वाचकांचं या सगळ्याला समजून घेणंही संवेदनशीलतेचा प्रत्यय असतो.

साहित्यिक का लिहितो? त्याने लिहायलाच हवे का? असे प्रश्न साहजिकच कधी तरी वाचकांच्या मनात डोकावून जातात. याबाबत काही लिहिते हात ‘स्वान्त सुखाय’ भूमिका घेऊन लिहिण्याचं समर्थन करतात. पण मनात आलं आणि लिहिलं, असं होत नाही. व्यक्त होतांना पूर्वसुरींच्या वाटांचं अनुकरण होत असतं. स्वतःला समृद्ध करण्यासाठी याही गोष्टीची आवश्यकता असते. या वाटेने चालताचालता लिहिणाऱ्याला आपली वाट सापडणे अपेक्षित असते. केवळ अनुकरणातून कोणीही संपन्न वगैरे होऊ शकत नाही. मनात साचले ते ओसंडून वाहू लागले, म्हणून काही कविता होत नसते. कविता कशी असावी आणि कशी नसावी, याचा विचार किमान एकदातरी लिहिणाऱ्यांकडून व्हायला हवा. आसपासच्या प्रश्नांकडे तटस्थपणे पाहता येत नाही, तोपर्यंत अनुभव सापडत नाही. लेखनाला अनुभवाचं कोंदण लाभत नाही, तोपर्यंत साहित्याला डूब मिळत नाही. प्रासंगिक आवेगांनी कविता तयार होत असल्या, तरी त्यांना चिरंजीव अस्तित्व असेलच असेही नाही. कविता काही कारखान्यातील उत्पादन नाही. दिला कच्चा माल, झाली प्रक्रिया अन् वस्तू हातात. असे होत नसते. सांप्रत कवितेचं आलेलं उदंड पीक पाहताना असंही असू शकतं, असं वाटायला लागतं.

सोशल मीडियाच्या भिंतींवर दिवसातून चारपाच कवितांचा, नसेल एवढं काही सूचत तरी निदान एकदोन कवितांचा घातलेला रतीब पाहताना लिहिणाऱ्यांच्या प्रतिभेचं कौतुक वाटतं. आणि त्यांना वाहवा करणाऱ्या वाचकांच्या संवेदनशीलतेचंही. काहींच्या नावावर दोनतीन वर्षात चारपाच कवितासंग्रह दिसतात. तसं पाचदहा वर्षात एखादाच संग्रह नावी असणारेही आहेत. हा ज्याच्या त्याच्या आवडीचा भाग असला, तरी वाचक किती वाचतात? कितीजण संग्रह विकत घेतात? याचा विचार होतोच असे नाही. एकेक आवृत्ती संपायला पाचसहा वर्षे प्रतीक्षा नामांकित कवींच्या कवितासंग्रहांना करायला लागत असेल, तर इतरांविषयी विचार करण्यात काहीच हशील नाही. अर्थात आपल्या आसपास ऐकू येणारी अशी विधाने अनुमानाधारित असू शकतातं. वाचकांना वाचण्यास बाध्य करणारे लेखन साहित्यिकाच्या लेखणीतून व्हायला हवे असे म्हणतात. असे लेखन होत नाही, असे नाही; पण वाचकांची मानसिकता, वाचनाचा कल याही गोष्टींचा विचार करावा लागतोच की.

कवितेची व्याख्या अनेकांनी आपापल्या परीने केलेल्या आहेत. त्या परिपूर्ण की त्यातून अजून काही निसटलेलं आहे, हा प्रश्न थोडा बाजूला ठेऊयात. अंतर्यामी आनंद निर्माण करते, संवेदनशील मनाला विचार करायला उद्युक्त करते ती कविता, असं म्हटलं तर कोणतीही कविता आनंदाचं अभिधान असते, भावनांचं निधान असते, तशी अनुभवाचं अधिष्ठानही असते. तिच्यात भावनांची स्पंदने अखंड निनादत राहतात. ती सौंदर्याचा वेध घेत असते. समस्यांवर बोलत असते. वैगुण्यांना अधोरेखित करीत असते. सामाजिक दूरिते पाहून विचलित होत असते. तिचा प्रवास कालातीत असतो. एकाचवेळी ती भूतवर्तमानभविष्याच्या पटलावरून विहार करीत असते. तिचा प्रवास धरतीपासून अंबरापर्यंत होत असतो. तिचं आकाश मर्यादांच्या परिघात बंदिस्त नसतं. म्हणूनच तिच्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांना मर्यादांच्या चौकटी नसतात. कविता जेव्हा जगणं होते, तेव्हा ती जीवनाविषयी नेमके बोलत असते. म्हणूनच की काय कवीला बोलकं होतांना समकालाचं भान असावं लागतं.

आसपास दुभंगतोय. परिस्थिती उसवते आहे. जगण्याचे पेच अधिक जटील होत आहेत. माणसांचं असणं आस्थेच्या तरंगांवर अधिष्ठित असल्याचा काळ हरवला आहे. केवळ बाजारपेठाच वस्तूकेन्द्री होत नसून माणसाचंही वस्तूकरण होत आहे. व्यवस्थेला तडे जाताना जगणं प्रत्येक सांध्यातून निखळत आहे. माणूस माणसातून झपाट्याने वजा होतो आहे. जागतिकीकरणाच्या व्यवस्थेत स्वार्थकेन्द्री भूमिकांना बरकत येत आहे. सामान्यांचा जगण्याचा आधार दोलायमान होतो आहे. आसपास जाणवणाऱ्या कंपनांची भीती मनात साकळते आहे. संवादाची साधने वाढली, पण माणसांच्या मनात अधिवास करून असणारा स्नेहसहवास संपतो आहे. आभासी जगण्याचा समस्या अनेक विसंगत कहाण्यांना जन्म देतायेत. माणसाचं उद्ध्वस्त होणं साहित्यात मांडलं जातंय, ही त्यातल्या त्यात जमेची बाजू. पण येथेही प्रत्येकाच्या अनुभवांचा वकूब सीमितच. आयुष्याच्या पूर्वार्धात खेड्यात राहिलेला साहित्यिक नंतर शहरातल्या झगमगाटात येऊन विसावतो आणि गावाकडच्या गोष्टी लिहितो. यात वावगे काहीही नाही. पण त्याला वर्तमान अनुभवांची डूब असल्याशिवाय खोली मिळेल का? कोणीतरी वेदनांचे ओरखडे अनुभवल्या, पाहिल्याशिवाय कसे कळतील?

माध्यमांची उपलब्धता वाढली याचा अर्थ कविता अधिक कसदार, सकस झाली, असे कसे म्हणता येईल. हा एक झालं, ती अधिक सहज झाली. याच विचाराने वाचक अधिक सुजाण झाला, अधिक गंभीर झाला असा होतोच असे नाही. कितीतरी कविता सोशल मीडियाच्या भिंतींवर आदळतायेत. त्यांच्या अशा लाटा येणं, त्यावर स्वार होऊन काही काळ झोके घेत परत विसर्जित होणं म्हणजे, ना कसदार कविता, ना सर्जनशील कवी, ना संवेदनशील वाचक! हा तात्कालिक दृश्याचा परिपाक असतो. पहाटेच्या प्रसन्न प्रहरी क्षितिजाला धरून धुक्याचा पडदा पसरलेला असावा. आसपास दवबिंदूनी ओथंबलेपण भरून यावे. सार्वत्रिक आनंदाचा सोहळा संपन्न होत असल्याची अनुभूती मिळावी, असं चित्र शब्दांमध्ये लिहिताना कितीही सुंदर वाटत असले, तरी वास्तव काही एवढे रमणीय नसते. सूर्याच्या उदयाचली येण्याने हे सगळे संपणे अटळ आहे, याचीही जाणीव असणे आवश्यक नाही का? आहे आणि नाही  या अक्षांवर लोलक झोके घेत असतो, अशावेळी तो नेमक्या कोणत्या बाजूने कलतो, हे महत्त्वाचं. म्हणूनच अशा दोलायमान परिस्थितीत दोहोंच्या समन्वयाने हाती येईल, ते साहित्य टिकाऊ असावं, अशी अपेक्षा करण्यात वावगं काही नाही.
***

Kavita | कविता

By // No comments:
हरवलेले गंध

तत्त्वांच्या ठायी असणारे सौजन्य
चौकटी नसणाऱ्या कोपऱ्यात ढकलता येतं
समर्थनाचे पलिते पेटवून
अभिसरणाच्या वार्ता करणाऱ्या
कुठल्याही आवाजाला अगदी सहज

विचारांना अभिनिवेशाचे साज चढले की
प्रतिमा पूजनीय अन् प्रतीके अस्मिता होतात
अभिमान, स्वाभिमानाच्या परिभाषित अंमलात
चौकटींनाही झिंग चढते वेगळं असण्याची
त्यांनाही अलौकिक अस्तित्व असल्याचा
अवकाळी साक्षात्कार घडतो

माणसाला धर्म अफूची गोळी
असल्याचा साक्षात्कार झाला कधीतरी
पण धर्मच मॅगझीनात येईल,
हे तरी कुठे ठाऊक होते कोणाला
अतिरेकाला बेगडी तत्त्वात स्थापित
करायचं ठरवलं की
शतकांच्या पसाऱ्यातून समर्थनाचे मुद्दे
उपसून काढता येतात सोयीचे अर्थ लावून नेमके

खरंतर भुकेचा प्रश्न समोर असणाऱ्यांचा
एकमेव धर्म भाकरी असते
पण भाकरीला लागलेल्या ग्रहणाची गणिते
आकळत नाहीत तेव्हा
संवेदनांचे गंध हरवत जातात
अन् पळत राहतात वैराण वाटांनी
चतकोर सुखांचे रंगहीन तुकडे शोधत

शांतीची सूक्ते रचणाऱ्या महात्म्यांचे विचार
विकल होऊन पंख कापलेल्या जटायूची
असहाय धडपड करीत राहतात
ढासळणाऱ्या बुरुजांना सांभाळत
अन् जखमांच्या भळभळणाऱ्या कहाण्या
मात्र तशाच उरतात

**

निसटलेली क्षितिजे

करपणाऱ्या आकांक्षांचे कोंब
ओलाव्याच्या ओढीने मुळं
मातीत रुतलेली
अंधाराच्या आवर्तात स्वप्ने
विखुरलेली अस्ताव्यस्त
उजेडाच्या प्रतीक्षेत मलूल झाल्या वाटा
आणि
क्षितिजे पावलांच्या ठशातून निसटलेली
तरीही पावलांना ओढ चौकटींनी
वेढलेल्या मुक्कामाची

**

ओंजळभर ओलावा

अस्तित्वाच्या मातीला घट्ट
बिलगून राहिलेली मुळं
खोदत गेलं की सापडतील
पण उकरलेल्या मातीने त्यांचं
असणं सैलावतं त्याचं काय?

उन्मळून टाकणाऱ्या आघातांना
झेलत झाडं उभी राहतात
आकाश डोक्यावर घेऊन
रोजच बदलत जाणाऱ्या त्याच्या
पुसटशा स्पर्शाच्या अपेक्षेने

बहरतात मातीतल्या
ओंजळभर ओलाव्याच्या गारव्याने
आस लावून बसतात आस्थेच्या
कोमल किरणांच्या वर्षावाची
प्रतीक्षा करतात चिंब भिजवून
कोंभाना जन्म देणाऱ्या धारांची

**

भग्न मनोरथ

ऋतूंचे संपलेले सोहळे अन्
विसर्जनाच्या उदास कहाण्यांची
सोबत करीत प्रत्येक पळ
पळत राहतो दिशाहीन वाटांनी
आस्थेचे चार ओले तुकडे
वेचून आणण्यासाठी

उजेडाची भकास गाणी
वारा गातोय कातर थरथर घेऊन
विटलेल्या सुरांच्या सोबतीने
हरवलेल्या आवाजाला स्नेह शब्दांचा
पण शब्दांचे नाद मात्र केविलवाणे
एकटेच अस्वस्थ वणवण करणारे

काट्यांच्या कुंपणात फुलांची
कोमल स्वप्ने गुरफटली
वणव्याच्या दाहकतेने
जन्माआधीच बीजं करपली
अंकुरांच्या अभिशापाने गळे
आवळले अगणित आकांक्षांचे

पुनर्जन्माच्या प्रतीक्षेत शिळा
पावन पावलांची आस लावून
पण पायच येथून तेथून मातीचे
स्वार्थाच्या धुळीने माखलेले अन्
सोबत जखमांच्या शापदग्ध कहाण्या

भग्न मनोरथांच्या
पिचलेल्या वर्तुळात वांझोट्या
अपेक्षांची कलेवरे जागोजागी
कुण्या प्रेषितांच्या पावलांचा कानोसा घेत
उत्थानाच्या प्रतीक्षेत

**

काळोखाच्या कुशीत

माणसं सुटी सुटी अन् आवाज विखुरलेले
दिशांच्या भकास पोकळीत विरलेली
कितीतरी भग्न स्वप्ने

मनावर विकल्पांची असंख्य पुटे चढलेली
सोबत मूकपण पांघरलेला निबिड अंधार
जगण्याचे तिढे सहजी न सुटणारे
प्रश्नांचे गहिरेपण अन् उत्तरांचे शून्यात हरवणे

निर्लेपपणावर आसक्तीचं शेवाळ
पसरलयं ऐसपैस
संवेदनांचा शुष्क व्यवहार
निरर्थकता अधोरेखित करतोय जगण्याची

सत्व आणि स्वत्व टिकवू पाहणारी
संचिते बंदिस्त प्रगतीच्या बेगडी झगमगाटात
स्वत्व विरघळत चाललंय क्षणाक्षणाने
तत्त्वांना ग्लानी कसली

गर्दीत असंख्य विकल चेहरे
ओळख विसरलेले आपल्याच शोधात
प्राक्तनाची वसने परिधान करून
अभ्युदयाच्या आकांक्षेने निघालेल्या
आकृत्या हरवत आहेत भोंगळ गजबजाटात
उरतायेत मागे काळाचे अवघड पेच

काळोखाच्या कुशीत दडलेल्या
अगणित असाहाय कहाण्या
अन् जगण्याचा आसक्तीत
मलूल हालचालींची क्षीण थरथर

**

Kavita | कविता

By // 1 comment:
परिघाभोवतीच्या प्रदक्षिणा
 
शक्यतांच्या परिघाभोवती घडणाऱ्या
प्रदक्षिणा मनाच्या मातीत रुजवत जातात
अगणित पांगळी स्वप्ने
संभव असंभवच्या कड्यावर झुलणाऱ्या
वांझोट्या आकांक्षा आणि
अपेक्षाभंगाच्या विमनस्क कहाण्या

संभाव्यतेची परिमाणे पडताळून पहातांना
भिरभिरणाऱ्या मनात आकाशाचा तुकडा
उतरत जातो स्वप्नांचं इंद्रधनुष्य घेऊन
चौकटींना गहिरेपण देताना उलगडत जातात
त्याच्या एकेक छटा घट्ट बिलगलेल्या रंगातल्या

संवेदनांची स्वप्ने आकांक्षांच्या विस्तीर्ण पटावर
कोरत जातात आकृत्या आस्थेच्या
उमलत राहतात एकेक पाकळ्या
प्राक्तनाच्या रेषा ललाटी अंकित करून

कळत जातात परिघाचे एकेक पदर
आणि नियतीकडून दत्तक घेतलेल्या
वेदनांच्या वर्तुळाचा आशय
जगण्याचा हरवलेला गंध
भटकत राहतो सैरभैर
विसावणाऱ्या वाटेच्या शोधात

पण हेही खरंय,
वेदना आणि संवेदनांच्या वाटेवर काळाने
आस्थेची एक अस्पष्ट रेषा अंकित केलेली असते
जी वाहत असते सुखांचे संकल्पित
प्रवाह आपल्या गर्भात धारण करून
येणाऱ्या उद्याला जन्म देण्यासाठी

**

प्रश्न असतातच आसपास

प्रश्न असतातच आसपास अगणित
अनाकलनीय शंकांची चिन्हे सोबत घेऊन
ना त्यांना अंत, ना वांच्छित विकल्प
माणूस मात्र एकेकटा सुटा
त्यांच्या उत्तरांच्या शोधात
कित्येक शतकांपासून

प्रत्येक वळणाला नवी चिन्हे
अगदी ठरवून समोर येत राहिली
संयमाची सत्त्वपरीक्षा घेण्यासाठी
सारं कसब वापरून तो उत्तरांच्या
आडव्या उभ्या चौकटी सजवत राहिला
विसंगत तुकडे जोडून

समुद्र उपसत राहिला अथांग समस्यांचा
हरकला ओंजळभर आभाळ हाती
लागल्याचं पाहून
प्रश्न मात्र कुत्सितपणे हसत राहिले
त्याच्या क्षणिक आश्वस्त होण्याने
अन् विखुरलेल्या बिंदूंना सांधत
चौकटी जोडत राहिले

जात, धर्म, वंश, राष्ट्र, देश, प्रदेश असंच
आणखी काय काय पेरत राहिला
काळ प्रश्न बनून मातीच्या कुशीत
गढूळलेल्या आभाळाच्या साक्षीने
उगवणाऱ्या प्रत्येक अंकुराची चौकट वेगळी
आणि कोबांच्या कहाण्या निराळ्या
आव्हान देत उभ्या पुढ्यात
वांझोट्या अस्मितांची काटेरी कुंपणे तयार करून

**

प्रवाह

प्रवाहाचं मूळ शोधत उगमाकडे
चालत जाऊन हाती लागेलही,
पण दुभंगणाऱ्या आस्था आणि
अपेक्षांच्या विखुरलेल्या स्वप्नांचा
उगम शोधावा कुठून
पुढ्यात आणून उभं केलं जात असेल
ओसाड आभाळ अन् वैराण वाळवंट
तर कोणती क्षितिजे अशी
उरली असतील जेथून ओलावा
पाझरत राहील आपल्यापर्यंत
पोहचेलही तो कदाचित,
पण मार्गात जागोजागी
छिद्रे करून ठेवली आहेत
उपसून घेण्यासाठी बेईमान्यांनी
त्यांना चुकवत कसा पोहचेल तो
होरपळणाऱ्या अंगणी

**

परिवर्तनाचे ऋतू

गोठलेल्या अंधाराला छेदणारे
कवडसे आणण्यासाठी आत्मतेजाचा
ओंजळभर सूर्य शोधावा कोणत्या क्षितिजाआड
वणवा बनून धगधगत राहावे की
स्वत्व हरवलेल्या वाटेवरून चालताना
विद्रोह करावा स्वतःच स्वतःशी
विषण्ण विद्रोहाच्या उदरात
फक्त काळोखच नाचत असेल तर
इमानी सूर्याचे दान कोणत्या दिशांना मागावे
हरवलेलं जगणंच प्राक्तन झालं असेल
तर कोणत्या परिभ्रमणाची प्रतीक्षा करावी
जे स्थितीच्या अक्षांना फिरवून
परिवर्तनाचे ऋतू आणेल अंगणी

**

मातीच्या उदरातील उदास कहाण्या

काळाच्या प्रस्तरावरून प्रवाह वाहतोय
संचिताचे विखुरलेले तुकडे वेचित
तरीही ओंजळी रित्याच
भावनांची स्पंदने मुकी अन्
प्रवाह आत्ममग्न झालेले

क्षितिजावर कोरलेली कातर थरथर
अन् अंधारलेल्या दिशांना सोबत
हरवलेल्या आकृत्यांची 
उजेडालाच गिळू पाहणारा काळोख
निरर्थक पेच उभे करतोय

जगण्याचा तळ ढवळून हाती काही
लागण्याची शक्यताच हरवून गेली
वरवरच्या तवंगांना गहिरेपणाची
डूब दिली जात असेल तर अथांग
असण्याला संदर्भ उरतातच कोठे

भौतिक सुखांच्या बेगडी वेष्टनात
जगण्याचा बिंदू व्यावहारिक होतो आहे
आत्ममग्न अभिनिवेशाच्या झुली पांघरून
प्रगतीच्या पावलांचे ठसे
अंकित होतायेत भुसभुशीत मातीत
प्राक्तनाचं गोंदण करून

मनावर विकल्पांचे थर साचत आहेत
समग्र जाणिवांचे भान विसरून
दुःखाचे अर्थ दुसऱ्यापुरते उरलेत
संवेदना वेदनांच्या मुशीतून नाही
वाहत हल्ली

अनियंत्रित हव्यासातून उगवत
जातात स्वार्थाचे कोंब
वाढत राहतात बांडगुळासारखे
मुळं मात्र शोधत राहतात
ओलावा हरवलेल्या मातीच्या
उदरातील उदास कहाण्या
**

Vikalp | विकल्प

By // 7 comments:
आयुष्याच्या वाटेने चालताना जगण्यात विसावणाऱ्या क्षणांचे प्रयोजन आपल्यासाठी नेमके काय असते, याचा आपण ठरवून सखोल वगैरे विचार कधी केलेला असतो का? मुळात ते असते की, फक्त समाधानासाठी तसं म्हणायचं असतं? तसेही समाधान शब्दाचे निश्चित असे परिमाण सांगता येईल, असे वाटत नाही. समजा या प्रयोजनांचं उत्तर कृतकृत्य होणे वगैरे असे काही असेल, तर सगळ्यांच्या वाट्यास ते सारखेच असते, की प्रेत्येकासाठी भिन्न? बरं, या क्षणांचं मोल मोजून घेण्याचं शहाणपण सगळ्यांना सारखं अवगत असतं का, की ज्याच्या-त्याच्या वकुबाने त्याचे स्तर ठरतात? निश्चित विधान करणे जरा अवघड आहे. कारण एकतर असे स्तर माणसांच्या पात्रता अधोरेखित करतात किंवा मर्यादा निश्चित करतात. मर्यादांचे बांध पडले की, जगण्यात साचेबद्धपणा येतो आणि तो संवेदनांना निष्क्रिय करतो. संवेदनशीलता वांझ होणे आणि आयुष्याला मर्यादांची कुंपणे पडणे व्यवस्थेतील व्यंग ठरते. यदाकदाचित असला आपल्या संवेदनांचा प्रवास समृद्ध वगैरे, म्हणून आयुष्याला अपेक्षित आकार मिळेलच, असे नाही. तरीही परिस्थितीला धडका देण्याएवढा आत्मविश्वास असलाच आपल्याकडे, तर तो जगण्याला नेमक्या कोणत्या उंचीपर्यंत नेऊ शकतो? खरंतर विशिष्ट उंची गाठणारा प्रवास त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. संभवतः परिस्थिती अनुकूल अथवा प्रतिकूल असली, तर मिळणाऱ्या गोष्टींचे मोल त्यानुरूप होत असते का? समजा नसेल होत तर, अन्य विकल्प तपासून पाहण्याची आवश्यकता असते का? क्षणभर गृहीत धरू, असा विचार कुणी एखाद्याने केलाच नाही, म्हणून जगण्याचे काही आडाखे चुकले, तर विसकटलेलं आयुष्य पुन्हा नव्याने सजवता येत नाही का?

खरंतर हे आणि असे अनेक प्रश्न आपल्या आसपास असतात. रोजच्या जगण्याचा भाग असल्याने, ते इतके सरावाचे होतात की, त्याकडे लक्ष जातंच असं नाही किंवा रोजचंच असल्याने त्यांची चिंता करून आपला आज का वाया घालवावा, असे समजून उत्तरे एकतर परिस्थितीवर सोडून दिली जातात किंवा दैवाच्या हाती सोपवून दुर्लक्ष केलं जातं. अर्थात, हे सगळं वाचून तुम्हाला वाटत असेल, काय हा रिकामटेकडा माणूस! विचार करण्यासारखे इतके सगळे संदर्भ आसपास असतांना उगीचच शब्दांचे खेळ खेळून पांडित्याचा वगैरे आव का आणत असेल हा? नाही, असं काहीच नाही हो! मी कोणी विद्वान नाही आणि पंडित वगैरे तर अजिबातच नाही. पांडित्य शब्द तुम्ही तुलनेकरिता वापरत असाल, तर चुकता आहात. कारण पंडित शब्दाचा अर्थ समजण्याएवढा तरी वकुब असायला लागतो. त्याच्या आसपास पोहचण्याची पात्रता तरी आहे का माझ्याकडे. त्याऐवजी अकलेचे तारे तोडतो वगैरे म्हणणेच ठीक, नाही का? असो, जे काही असेल ते. पण एव्हाना तुमच्या मनात एक उद्वेगजनक विचार आला असेल, एवढं विसंगत लिहतोयेस, तर तूच सांग ना बाबा, तुला काय वाटतं आणि नेमकं काय म्हणायचं आहे. उगीचच गोलगोल भवरी कशाला खेळतो आहेस? अर्थात, तुमच्यापैकी कोणाला सात्विक वगैरे प्रकारातला संताप अनावर झाला असेल. हा समोर असता, तर हाणलाच असता असे वाटत असेल, तर मला अजिबात राग वगैरे नाही येणार.

मला विचारणार असाल याबाबत काही, तर नेमके सांगणे खरंच अवघड आहे. अवघड आहे ना! मग कशाला कोलांटउड्या मारतोयेस रे रताळ्या, असाही विचार मनात क्षणभर चमकून गेला असेल, नाही का? आता फिरतोच आहे गरगर, तर सांगायला लागेलच ना, थोडं इकडचं, थोडं तिकडचं असं काहीतरी! तर त्याचं कारण असं- असा हिशोब कधी मी केला नाही. तशी आवश्यकता वाटली नाही. आवश्यकता नाही! म्हणजे स्वतःला काय महंत, महर्षी, महात्मा समजतोयेस तू! म्हणून संतापाची एक अस्पष्ट लहर या मजकुरावरून तुमची नजर फिरताना मनात नक्कीच येऊन गेली असेल नाही का? तर त्याचं असं आहे की, असे काही भव्यदिव्य वाटण्याइतके देखणे आयुष्य पदरी पडले नाही. मिळालं ते फार मोठी उंची असलेलं, प्रचंड खोली आणि अफाट विस्तार सोबत घेऊन वाट्यास आलं नाही. आहे ते सरळ रेषेत जाणारे, अगदी नाकासमोर दिसणाऱ्या वाटेने. पायाखालच्या मातीशी थोडी सलगी करीत आपलेपण शोधत निघालेले. समाजाने निर्धारित केलेल्या साऱ्याच नाहीत, पण ध्वस्त करण्याची हिम्मत नसलेल्या चौकटींना प्रमाण मानून मुकाट्याने मार्गक्रमण करणारे. अशा सीमांमध्ये संकुचित झालेलं जगणं कोणते नवे आयाम आपल्या असण्याला देऊ शकतं?

यशस्वी होण्यासाठी जगण्याला आशयघन बनवणारे काहीतरी नियतीकडून घेऊन यावे लागत असेल का? की नशीब, प्राक्तन, नियती असं काहीही नसतं? असेल, नसेल ज्याचे त्याला माहीत. पण हेही वास्तव दुर्लक्षित करून चालत नाही की, आपणच आपल्या वाटा शोधत मुक्कामाच्या मार्गाला चालायला लागतं. कदाचित याबाबत मत-मतांतरे असू शकतात. असायला हवीत आणि नसली, तरी काही हरकत नाही. ज्याच्या मनात मुक्कामाचे मार्ग कोरलेले नसतात, ते नियतीच्या नावाने आपलं असणं-नसणं अधोरेखित करीत राहतात. असं म्हटलं तर अतिशयोक्त ठरू नये. अर्थात, हाही एक पलायनवादच. तुम्ही याचं नेमकं उत्तर काय द्याल? मला कसे सांगता येईल! पण माझ्याकडून अपेक्षितच असेल, तर माझ्यापुरतं हे सगळं समजून घेणं आणि त्याचे अर्थ लावून सांगणं अवघड प्रकरण आहे. पण एक मात्र नक्की सांगू शकतो, माणसाच्या आयुष्याचा प्रवास प्रामणिक परिश्रमांची गाथा असतो.

नियतीने निर्धारित केलेल्या वाटांवरून चालणे नाकारून नव्या वाटा निर्मिणारे, आयुष्याचा आशयगर्भ अर्थ शोधण्यास प्रेरित करून त्या दिशेने वळते करणारे पर्याय तरी किती होते माझ्याकडे? तसे आजही फार आहेत, असे नाही. नव्हते म्हणणेही अर्धसत्य. असलेले दिसत नव्हते म्हणा किंवा त्यांच्यापर्यंत पोहचण्याची पात्रता नव्हती किंवा तसे साहस केले नाही म्हणा. काहीही म्हटलं, तरी अर्थ एकूण एक तोच. क्षणभर मानू या की, जगणं अर्थपूर्ण करणारी फारशी परिमाणे आयुष्याला नव्हती, म्हणून त्याच्याकडे अधिक संवेदनशीलपणे पाहण्याचे प्रयोजन उरले नसेल कदाचित. पण प्रयोजने तरी शोधली का? असतील तर कोणती आणि नसतील तर का नाही शोधली? हा तुमचा पुढचा प्रश्न. काहीही असो, मला वाटतं इहतली वास्तव्य करणारा असा कोणीही माणूस नसेल, जो प्रयोजनाशिवाय काही करीत असेल. प्रयोजने असतात. नसल्यास शोधावी लागतात. शोधूनही सापडत नसल्यास निर्माण करावी लागतात. निदान मलातरी असं वाटतं इतकंच. वाटतं म्हणून साऱ्यांनाच ते अवगत असतील असे नाही आणि परिस्थिती प्रत्येकवेळी पायघड्या घालून तुमच्या मार्गावर उभी असेल, असेही नाही. 

जगण्याला विशिष्ट आकार देऊन आपलं असणं-नसणं प्रयत्नपूर्वक साकारावं लागतं. सुयोग्य परिमाणे ठरवून आयुष्याच्या पटावर अस्तित्व कोरावं लागतं. आपल्या असण्याला सहजपण देणारी सूत्रे ठरवून घ्यावी लागतात. उत्तराचे विकल्प शोधावे लागतात. हाती येणारी उत्तरे परत नव्याने पडताळून पाहावी लागतात. आधीच घडवलेल्या साच्यांच्या मुशीत ओतून मिळालेला आकार, म्हणजे सर्जन नसते. जगण्याचे साफल्य वगैरे नसते. नावीन्य असले, तरी त्याला दीर्घ अस्तित्व असेलच असे नाही. ठरवलेली सूत्रबद्ध गणिते मला कधी कळलीच नाहीत. तसंही गणित म्हटले की, अजूनही भीतीने पोटात आकडे येतात माझ्या. हिशोब ठेवण्याइतके सुजाणपण नव्हते, म्हणून असेल किंवा विकल्पांचे विश्लेषण करायला अवधीच देता आला नसेल किंवा तेवढा वकूब नव्हता, म्हणून असेल. कारणे काही असोत, पलायनाच्या वाटा आणि समर्थनाचे तोडके शब्द शोधून आयुष्याच्या यशापयशाची सूत्रे सापडत नसतात. जगण्याच्या गणितांची उकल होत नसते. आयुष्यातील सगळेच गुंते काही सहज सुटत नसतात. गुंतलेल्या धाग्यांच्या गाठी निरगाठी अपेक्षित दिशेने वळत्या कराव्या लागतात. वळणाला अनुकूल करीत सोडवाव्या लागतात. चुकीच्या दिशेने ओढला गेलेला एक धागाही गुंता अधिक अवघड करतो. गुंत्यांमध्ये गुरफटणे आणि त्यातून सुटण्यासाठी प्रयत्न करणे स्वाभाविकच. काही गुंते लहान असतात, काही मोठे. काहींचे सुघड, काहींचे अवघड, एवढाच काय तो फरक. बाकी गुंते जवळपास सारखे आणि त्यांचे सातत्यही समानच, फक्त प्रसंग, पात्रे आणि स्थळे तेवढी वेगळी.

जगणं मूलभूत गरजांशी निगडित असतं, तेव्हा सुखाची निश्चित अशी काही परिमाणे असतात का, हा प्रश्नच नसतो. शेकडो सायासप्रयास करूनही सुखाचं चांदणं दूरदूर पळत राहणं, त्याचा कवडसाही अंगणी न दिसणं, हीच समस्या असते. खऱ्या म्हणा किंवा आभासी, काही म्हणा, वर्तनाचे व्यवहार सुखांचा शोधात माणसाला अस्वस्थ वणवण घडवतात, तेव्हा जगणं आनंदयोग वगैरे असल्याचं म्हणणं किती बेगडी असतं, याचं प्रत्यंतर प्रकर्षानं येतं. मर्यादांच्या चौकटी आखून सीमित केलेल्या वाटेने चालताना मूलभूत गरजा ज्यांच्या समोरील प्रश्नचिन्हे असतात, ते सुखांचा युटोपिया काय शोधतील? ज्यांच्या आकांक्षांचं क्षितिज चार पावलांवर दिसतं, पण जगणंच दोन पावलांवर संपतं, त्यांना बहरलेल्या मोसमाचे अप्रूप काय असणार? मोहरलेल्या परगण्यात पोहचण्यासाठी धाप लागेपर्यंत धावूनही हाती शून्यच लागत असेल, त्यांनी सुखांची परिभाषा कुठून अवगत करावी?

सुख म्हणजे काय असते? सुख सोबत असले म्हणजे आयुष्याच्या सफलतेची ग्वाही देता येते का? सफल आयुष्याची परिमाणे नेमकी कोणती आणि कशी असतात? त्यांच्या व्याख्या कशा परिभाषित होतात? सुखांचा अधिवास सगळ्यांच्या अंगणी सारखाच असतो का? सुखं सतत नांदती असतात की, त्यांना प्रासंगिकतेचे पर्याय असतात? समाधानाचे कवडसे नेमके काय असतात आणि ते कुठून येतात? समजा असे कवडसे वगैरे काही असले, तरी त्यांना आपल्या अंगणी आणण्याएवढ्या वाटा आयुष्यात असायला हव्यात ना! जगणंच समस्यांनी बंदिस्त झालं असेल, तर पर्याप्त समाधान, या शब्दाला काही अर्थ तरी उरतो का? माणसाचं सगळं जगणंच अनिश्चितेच्या आवर्तात वसतीला असते. हे अनिश्चित असणेही आभासी असते. प्रश्नांचा गुंता नुसता! अजूनपर्यंत निदान मलातरी या सगळ्यांची परिभाषा पूर्णपणे समजली नाही. कोणाला अवगत असेल, तर माहीत नाही. भलेतर समाधानासाठी याला अपवाद वगैरे म्हणू शकतात तुम्ही आणि मीसुद्धा.

आयुष्याचा विस्तार समस्यांच्या चौकटींमध्ये सीमित झाला की, जगणं विवंचनेच्या वर्तुळात बंदिस्त होते. ज्याला रोमँटिक वगैरे जगणं असं काही म्हणतात, तो रोमान्स किती जणांच्या आयुष्यात सामावलेला असतो? बरं, या रोमान्स शब्दाची परिभाषा करताना आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अवकाश परिणाम करणारा घटक असू शकतो का? समस्यांच्या जंजाळात भोळवंडून निघालेल्यांच्या आयुष्यात कुठला आला आहे जगण्याचा रोमान्स. त्यांच्यासाठी असा रोमान्स फक्त कुठल्यातरी कथा-कहाणीपुरता उरतो. अशा कहाण्या नेहमीच आनंददायक तरी असतात किंवा तशा प्रस्तुत केल्या जातात. अर्थात, आनंदाचा अधिवास आपल्या अंगणी अनवरत असावा, असं वाटण्यात काही वावगं नाही. आनंदाची वने शोधणे, सुखांचे परगणे निर्माण करणे माणसाची उपजत प्रवृत्तीच आहे. परिस्थितीच्या वाहत्या प्रवाहात सर्वकाही अनुकूलच असेल, असेही नाही. आमच्या पिढीच्या संकल्पित सुखाच्या व्याख्येत या गोष्टी नव्हत्या. कारण परिस्थितीनेच सगळ्या शक्यतांच्या विस्तार सीमित करून घेतलेला असायचा. नियतीने प्रश्नचिन्हांशीच सोयरीक घडवून आणल्याने, प्रश्नांचा परिघ आणि त्याभोवतीच्या प्रदक्षिणा तेवढ्या रोमँटिक वाटत राहिल्या.

माझ्या परिचयातल्या एक गृहस्थाच्या चिरंजीवाचा विवाह नुकताच संपन्न झाला. तुम्ही म्हणाल, आता यात काय विशेष? याआधी का माणसे विवाह करीत नव्हती? हा काय जगातला आगळा-वेगळा विवाह आहे? नाही, तसे नाही. वेगळा वगैरे नसला, तरी एक उदाहरण म्हणून सांगण्यासाठी बोललो. तर हा प्रेमविवाह होता. तुम्ही परत प्रश्न विचारण्याआधीचं सांगतो, कोणीतरी प्रेमाच्या परगण्यात विहार करून विवाह करणे, याचंही अप्रूप असण्याचं कारण नाही हो! प्रेमविवाह होतच असतात. त्यातील काही थोडे संमतीने, बरेच अन्य मार्गाने आणि खूप अनुत्तरित. पण त्यांनी उमद्या मनाने मुलाला विवाहाची अनुमती दिली. अशी अनुमती मिळणं, निदान माझं म्हणणं तुम्हाला सांगण्यासाठी अप्रूप आहे, असं समजूया! खरंतर त्यांच्या उमदेपणाचं कौतुक करायला हवे. पण माणूस दुसऱ्याच्या उमदेपणाला स्वीकाराच्या चार चांगल्या शब्दांनी अधोरेखित करील, तर तो माणूसच कसला!

माझ्या काही स्नेह्यांसोबत याबाबत मी बोलत असतांना बऱ्याच जणांना जणूकाही या माणसाने जगण्याच्या चौकटींना ध्वस्त करण्याची सुपारी घेतली आहे, असा भाव चेहऱ्यावर होता. एवढंच नाही तर आपल्या मतांच्या समर्थनार्थ संस्कृतीच्या, समाजाच्या पारंपारिक प्रवाहातून वेचलेल्या विचारांची आयुधे हाती घेऊन ते लढत होते. तेही स्वतःला अनुकूल असतील तेच आणि तेवढेच मुद्दे घेऊन. त्यांच्या मते असं घडणं सर्वथा अयोग्य. अशा वागण्यामुळेच सामाजिक संरचना विचलित होते आहे. पारंपारिक चौकटींवर आघात होत आहेत. मी त्यांच्या मतांशी सहमत असण्याचा प्रश्नच नव्हता. विसंवादाच्या वर्तुळात आणून उभ्या केलेल्या संवादात त्यांच्याकडून व्यक्त केलेली मते वारंवार विखंडीत करीत असल्याने त्यांच्या दृष्टीने मीही त्याच वर्तुळातला. थोडक्यात, एक आधीच कामातून गेलेला आणि चाललेला हा दुसरा. मुलांना समजून घेण्याएवढे मोकळेपण आपल्या ठायी असले की, सगळेच नाहीत; पण यौवनात पदार्पण करून मनी वसणारी क्षितिजे कुणाच्यातरी सोबतीने शोधायला निघालेल्या मनांचे प्रश्न बऱ्यापैकी सुटतील. नाही का! पण हे सगळं सहज घडतं का? नाही. आणि हा नकार बऱ्याच प्रश्नांना सोबत घेऊन येतो. आपले अहं सांभाळणं अधिक महत्त्वाचं वाटत असल्याने प्रेमाच्या मार्गाने स्वतःचा शोध घेत निघालेल्यांच्या वाटेवरचे काटे वेचण्याऐवजी पेरण्याचेच प्रकार अधिक घडतात.

व्यवस्थेने तत्कालीन गरज म्हणून कधीकाळी निर्माण केलेल्या चौकटींना प्रमाण मानून जगण्याच्या आमच्या सवयी अजूनही सुटत नाहीत, असं म्हटलं तर कदाचित कोणाला राग येईलही. पण त्याला इलाज नाही. कुणाला राग आला म्हणून आणि कोणी सुधारणेच्या वाटेने वळता झाला, म्हणून समाज लगेचच अंतर्बाह्य सुधरत, बिघडत नसतो. सवयी एकतर सोडाव्या लागतात किंवा झुगारून द्याव्या लागतात, तेव्हाच अपेक्षित बदल घडतात. अंगवळणी पडल्या की, त्यांच्या मर्यादाही संस्कार वाटायला लागतात. झुगारून देण्यासाठी खूप मोठे बळ अंगी आणावे लागते. ते सगळ्यांनाच जमतं असं नाही. समाज माणसाच्या जगण्याची अनिवार्य आवश्यकता आहे, असं तुम्ही म्हणाल. मान्य, एकदम मान्य! पण याचा अर्थ तो सर्वकाळी, सर्वस्थळी योग्यच असेल, असेही नाही. जो समूह प्रासंगिक पातळीवर परिवर्तनाला नकार देतो, तो प्रगत वगैरे कसा म्हणणार आहोत आपण? प्रगतीच्या काही परिभाषा असतात. प्रासंगिक पर्यावरणानुसार त्या परिभाषित करायला लागतात. पुढे चालून परिवर्ताला कालानुरूप पावले टाकण्यासाठी पथ निर्माण करून ठेवावे लागतात. त्यांचा परीघ परिस्थितीला ठरवू द्यावा. आपण त्या प्रदेशाचे परीक्षण करावे. अनुकूल अगत्याने अंगीकारावे. नको असणारे विसरण्याएवढे प्रगल्भपण विचारांत असावे, असं मला तरी वाटतं. प्रासंगिक अभिनिवेश ओढून ताणून जगण्यात आणायचे. कुठूनतरी आणलेल्या संदर्भांचे स्टीकर त्यांना चिकटवायचे. मनाजोगते चिटकवून झाले की वृथा समर्थन करायचे, ही कवायत हवीच कशाला. दत्तक घेतलेले असे अभिनिवेश जटिल समस्या निर्माण करतात. 

एकाने दुसऱ्याचं आणि दुसऱ्याने पहिल्याचं जगणं सांभाळावं, कारण सोबत असण्याची ती सार्वकालिक आवश्यकता असते. असं काही आमच्या जगण्यात नव्हतंच, असं नाही. पण जगण्याचा परिघच मर्यादांनी बंदिस्त असल्याने समोरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यातच कौशल्ये खर्ची पडली. आपण कसे ‘मेड फॉर इच अदर’ आहोत, म्हणून मिरवण्यासाठी काळही फारसा अनुकूल नव्हता, निदान परंपरांना प्रमाण मानणाऱ्या आमच्या परिसरात तरी. परिस्थितीही अशा मानसिकतेला धार्जिणी नसल्याने, उपलब्ध अवकाशाच्या चौकटीत आपल्या सुखांचं आभाळ आखून समाधानाच्या चांदण्या शोधण्याचा प्रयत्न करण्याला पर्याय नसे. पदरी पडलेले पवित्र मानायचे, हा एक विकल्प हाती असायचा. अर्थात, अशा स्वीकारला सहवासाची, सहवासातून बहरणाऱ्या आस्थेची, आस्थेतून गडद होत जाणाऱ्या आपलेपणाची परिमाणे असायची. बऱ्याचदा मनाच्या मनोगताना विसरून संवाद करत राहणे घडायचे. आजच्या इतकं स्पष्ट सांगण्याएवढं धाडस सगळ्यांकडे कुठे असायचं. बहुदा नसायचेच. मागील पिढीच्या मर्यादित विचारांचा अवकाश आणि संस्कार घेऊन जन्मलेल्या जवळपास सगळ्यांचा अनुभव थोडेफार अनुकूल-प्रतिकूल संदर्भ वगळले तर सारखाच. तुम्ही म्हणाल, मग आता काय वेगळे आहे यात? परिस्थिती थोडीफार इकडेतिकडे सरकतच असते. हो, खरंय तुमचं म्हणणंही. पण आताही परिस्थितीचा परीघ फार विस्तारला आहे असे नाही. अशा विचारांच्या भोवती दाटलेलं मळभ बऱ्यापैकी विरलेलं असलं, तरी त्याच्या कृष्णछाया संपल्या आहेत का? मला वाटतं, पूर्णपणे नाहीत. 

विखंडन अथवा विस्मरण विकल्प म्हणून आमच्या पिढ्यांच्या हाती शिल्लक असायचे; पण आसपासच्या वातावरणाचा दाबच इतका प्रखर असायचा की, तडजोड हा एक तिसरा विकल्प संयुक्तिक वाटायचा. आजच्या स्वातंत्र्याच्या संकल्पनेत कदाचित हे सगळं नाही सामावता येणार. मुक्त विचारांच्या परिघात वर्तणाऱ्यांना मन मारून केलेल्या तडजोडींचं जगणं कदाचित काहीच्या काही वाटेल. पण कधी कधी म्हणतात ना, अज्ञानातही सुख असतं. जाणीवपूर्वक स्वीकारलेल्या अज्ञानातून कोणती हानी पोचणार नसेल, तर अशा सुखांचं स्वागत करण्याला सीमित अर्थाने का असेना, संदेह का म्हणून असावा? सकारात्मक स्वीकारातून आयुष्यात वसंत बहरणार असेल, तर तो अंगीकारणेही काही वावगे नसते. अर्थात, तो काळच बंडखोर विचारांशी मैत्री करण्यास फारसा अनुकूल नसल्याने, हे स्वीकारले जायचे, जाणीवपूर्वक अथवा अनिच्छेने. शेवटी काय, तडजोडच ना! मग ती मनापासून असो की, अन्य कुठल्या कारणांनी मान्य केलेली. नियतीने पुढ्यात आखून दिलेल्या चौकटी सांभाळायचा विचार मनात कोरून घेतल्याने त्या सांभाळल्या जायच्या, फारशी खळखळ न करता. तडजोड सवय झाली की, जगण्याचे अनिवार्य अंग होते. याचा अर्थ तडजोडीच्या चौकटींना ध्वस्त करणारे नसायचे असे नाही, पण अशा बंडखोरांचे प्रमाण बहुदा बोटांवर मोजण्याएवढेच.

आयुष्याच्या वाटेने आत्मशोध घेत निघालेल्या प्रत्येकाकडे ठरवून घेतलेली किंवा ठरवलेली मते असतात. जगण्याला प्रयोजन देणाऱ्या दिशेचा शोध घेण्यासाठी अंतर्यामी असणाऱ्या संवेदनांच्या आदेशाने चालणे घडते. आयुष्याची वाट वेडीवाकडी वळणे घेत पुढे सरकत असते. सुप्त असतील अथवा दृश्य, प्रत्येकाच्या जगण्यात काही अहं असतात. प्रासंगिक कारणांनी असो अथवा सामाजिक दडपणामुळे, ते मनाच्या मातीआड राहिले की, त्यांचे कंगोरे कळत नाहीत. त्यांची टोकं टोचत नाहीत. त्यांच्यावर स्वार्थाची पुटे चढायला लागली की, अधिक धारदार होत जातात. मनाच्या मातीत पडलेले अहं अंकुरित होण्यास अनुकूल परिस्थिती असली की, त्याची रोपटी झपाट्याने वाढत जातात. कुठल्यातरी सांदीकोपऱ्यात वाढणाऱ्या पिंपळाच्या रोपट्यासारखे, कितीही तोडा, परत उगवणारे. शुष्क कोपऱ्यांच्या आश्रयाला अधिवास असणाऱ्या पिंपळाच्या रोपट्याला जगण्याचा ओलावा कुठून मिळत असेल, कोणास ठाऊक? पण त्याची जिगीषा काही, ते सोडत नाही. तोडलं, मोडलं तरी परत परत डोकावून त्याचे कोंब अस्तित्व दाखवतातच.

मनात उगवणारी काटेरी झुडपं माणसांना का नाही तोडून टाकता येत? काटे टोचून रक्तबंबाळ करण्याचा त्यांचा धर्म विसरत नसतील, तर अशा काट्यांचे कुंपण करून संस्कारांचे संवर्धन करण्याचा धर्म माणूस का विसरत असेल? काट्याच्या संगतीने गुलाब मोहरतो. त्याचा रंग, गंध मनाला मोहित करतो. मग मनात साकोळलेला आपलेपणाचा परिमल परिस्थितीच्या वाऱ्यांचा हात धरून का नाही पसरत. नाहीच घडत असं बऱ्याचदा. कारण एवढं उमदेपण जगण्यात जाणीवपूर्वक रुजवावे लागते. आयुष्याच्या नव्या दिशा शोधू पाहणाऱ्यांच्या वाटेवर मनातले अभिनिवेश उभे राहतात. हे अभिनिवेश कुरवाळण्यासाठी वेगवेगळे विकल्प शोधून, खोदून आणले जातात. त्यांना जात, धर्म, वंश, परिस्थितीची धारदार पाती जोडली जातात. पात्यांचा धर्म एकच असतो, जखमा करणं. रक्ताळलेल्या वाटा आणि वाहणाऱ्या जखमा काही माणसांच्या जगण्याची आवश्यकता नाही. पण काय आवश्यक आणि काय अनावश्यक, हे कळण्याइतके सहजपण आपल्या विचारांत असायला हवे ना! माणूस नेमका येथे कमी पडतोय. प्रगतीचे कितीही क्षितिजे त्याला संपादित करू द्या. त्याच्या विचारांचे विश्व विस्तारत नाही, तोपर्यंत त्याने प्रगतीच्या वगैरे वार्ता करणे केवळ खडकावरचा पाऊस असेल. त्यात कोणत्याही बीजांना अंकुरित करण्याचं सामर्थ्य नसतं.

मनाची मनोगते शब्दांच्या वाटेने प्रकटतीलच असे नाही. अपेक्षांची पालवी अंकुरित होणार नसेल, तर मोहरणे खूप दूरची गोष्ट. प्रत्येक पिढीच्या जगण्याच्या चौकटी ठरलेल्या असतात. बहुदा तत्कालीन विचारांच्या परिघात वर्तणाऱ्या समाज नावाच्या समूहाने त्या निर्धारित केलेल्या असतात. या चौकटींना काही नात्यांबाबत आणि नात्यांचे पदर धरून प्रकटणाऱ्या आस्थेबाबत नेहमीच संदेह राहिला आहे. हा संदेह होताच, पण आजही त्याचे पीळ फार सैल वगैरे झाले आहेत, असे नाही. त्याच्या प्रकटनाच्या पद्धती पूर्णतः पालटलेल्या आहेत, असेही नाही. हा एक मात्र घडलं, त्याचा परीघ विस्तारताना विचारांचे वारे थोडी का असेना, पण दिशा बदलत आहेत.

झाडाच्या शाखांपासून विलग होणारे प्रत्येक पान पानगळीचा हात धरून जमिनीकडे गरगरत येते, तेव्हा त्याचा विसर्जनाचा क्षणही साजरा करते. मातीत मिसळून जाताना सर्जनचे स्वप्न घेऊन जाते. अशी कितीतरी स्वप्ने घेऊन माणूस जगतो. तो कालच्या पिढीतील असू द्या, नाहीतर उदयाचली येणाऱ्या पिढीचा. स्वप्नांचा प्रवास सत्यात बदलता आला की, बऱ्याच प्रश्नांची उत्तरे हाती येतात. शेवटी काय आहे की माणूस प्रश्नांच्या संगतीत रमणारा आणि विचारांच्या पंगतीत फिरणारा आहे. त्याच्या जगण्यातून प्रश्नचिन्हे वजा होऊ शकत नाहीत. कारण प्रश्न नसलेला काळ कधी त्याच्या वाट्याला आला नाही आणि येणारही नाही.

आता तुम्ही म्हणाल, हे एवढं सगळं सांगण्याचं प्रयोजन काय तुमचं? सांगतो, तुमच्या वाचन संयमाचा खूप अंत पाहिला आतापर्यंत.

तर त्याचं असं झालं- प्रेमविवाहबाबत आम्हां काही सहकाऱ्यांमध्ये बोलणं सुरु असतांना एका स्नेह्याने मला प्रश्न विचारला, “तुम्ही तुमच्या मुलाच्या विवाहाबाबत त्याच्या मताचा कौल मान्य कराल का?”

“अर्थातच!” क्षणाचाही विलंब न करता मी त्यांना म्हणालो.

माझ्या तात्काळ उत्तराने ते थोडे विस्मयचकित झाले. माझ्याकडून असे उत्तर येईल यावर त्यांचा विश्वास असणे अवघड असावे कदाचित. म्हणाले, “नुसतं सांगायला काय जातं तुमचं! वेळ आली की कळतं, काय असतं या सगळ्याला सामोरे जाणं.”

“अहो, हे सगळं ज्याला संसाराच्या वाटेने चालायचे आहे, त्याला ठरवू द्यायला काय संदेह असावा? त्याचा निर्णय त्याने घ्यावा. आणि मी तरी त्याच्या निर्णयात मध्ये का यावं?”- मी.

मला मध्येच थांबवत म्हणाले, “पण रूढीपरंपरा, प्रथा वगैरे काही असतात की नाही. समाज नावाची चौकट असते. स्वातंत्र्य देणारे तुमचे विचार मान्य हो! पण त्यालाही मर्यादा असाव्यात की नाही?”

त्यांच्या विधानांचा युक्तिवाद करून फारसं काही हाती लागणार नव्हतंच. आधीच ठरवून घेतलेल्या त्यांच्या मतात फारसा बदल घडणे शक्य नव्हते, म्हणून विषयाला पूर्णविराम देत म्हणालो, “आपण हे सगळं परिस्थितीवर सोडून दिलेलं चांगलं नाही का?”

कदाचित त्यांना आपल्या विचारांचा जय झाला, असं वाटलं असावं. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाची अस्पष्ट रेषा हसत राहिली थोडा वेळ तशीच आणि मी त्या रेषेचे अर्थ शोधत राहिलो उगीचच.

बरं हे गृहस्थ उच्चविद्याविभूषित असल्याने त्यांच्या बोलण्याने मी क्षणभर विचलित झालो. त्यांनी संपादित केलेल्या ज्ञानाबाबत माझ्या मनात कोणताही किंतु नाही, पण विद्यासंपादन करून माणूस चौकटींच्या पलीकडे पाहीलच असं नाही. ज्ञानसंपादनाने माणूस शिक्षित होईल, पण परिवर्तनाच्या कृतीने समृद्ध होईल असे नाही. कालसुसंगत मत केवळ शिक्षणाने नाही, तर समजूतदारपणाने येते. बदल स्वीकारावे लागतात. आवश्यक ते स्वीकारून आणि अनावश्यक ते नाकारून पुढचे पथ संपन्न करावे लागतात. यासाठी विचक्षण विचार अंगीकारावे लागतात. काळासोबत चालणारे विचार जगण्याचा भाग झाले की, परिवर्तनाची नांदी ठरतात, नाही का?
***

Kavita | कविता

By // 2 comments:

१. भवताल

भंजाळलेला भवताल, भरकटलेली माणसे
आणि अस्वस्थ वर्तमान
नियतीने निर्धारित केलेलं प्राक्तन की,
स्वतःच आखून घेतलेली वर्तुळं

संस्कृती केवळ एक शब्द नाही
प्रदीर्घ वाटचालीचा इतिहास सामावलेला आहे त्यात
माणसाच्या अस्तित्वाचा
पण तोही आक्रसत चाललाय एकेक पावलांनी

कुठून कुठून वाहत येणारे प्रवाह
अथांग उदरात साठवत राहिला शतकानुशतके
कोरत राहिला अफाट काळाच्या कातळावर लेणी
सजवत राहिला साकोळलेल्या ओंजळभर संचिताला
क्षणपळांची सोबत करीत चिमण्यापावलांनी पळत राहिला
सुंदरतेची परिमाणे शोधत

दिशा बदलली वाऱ्यांनी
अन् पडले मर्यादांचे बांध
कणा कणाने निसटतो आहे हातून वर्तमान
वाहत्या प्रवाहांना पायबंद घातले आहेत
परंपरांनी, कधी प्रसंगांनी तर कधी प्राधान्यक्रमांनी
सगळेच पदर उसवत आहेत एकेक करून

काळाच्या गणिताची सूत्रे राहिली नाहीत
जेवढी वाटतात तेवढी सहज, सुगम
गणिते आधी आखून तयार करता येतात
हवी तशी सूत्रे अन्
मिळवता येतात अपेक्षित उत्तरे
सूत्रांनुसार साच्यात ओतून आकडे

प्रश्न माणसाला नवे नाहीत
काल होते, आज आहेत, उद्याही असतील;
पण त्यांचा चेहरा तेवढा बदलायला हवा
प्रश्नांचे धागे हाती घेऊन हव्या त्या
दिशेने वळवता येतात

खरंतर प्रश्न हासुद्धा नाहीच,
प्रश्न आहे धागे वळवणारे हात
कोणाच्या आज्ञेने चालत आहेत याचा

***

२. प्राक्तनाचे संदर्भ

अस्तित्वाचे प्रश्न आसपास
उत्तरांचे तुकडे साकोळत राहिलो
सुदंर कोलाज करता येईल म्हणून
प्रत्येक चौकटीत शोधत राहिलो आकार
मनात आधीच कोरून घेतलेले
ठरवून घेतलेल्या रंगासहित

सर्जनचे सोहळे सहज नसतात
माहीत असूनही सोयिस्कर दुर्लक्ष करीत गेलो
बहरून येण्याआधी उजाड व्हायचं असतं
याचं भान राहिलंच नाही

ऋतू हलक्या पावलांनी येत राहिले
त्यांच्या सोहळ्याना अनेकदा सामोरा गेलोही
पण त्यांच्यापर्यंत पोहचण्याआधी
परतीला पावलं लागलेली असायची
हाती उरायच्या विसर्जनाच्या देठ खुडलेल्या
निष्प्राण खुणा

स्वप्नाळलेल्या नेत्रात सुखांचे निर्झर
शोधण्याच्या नादात
ओथंबलेल्या पापण्यांची थरथर कळलीच नाही
थेंबाना अडवून धरणारे बांध उभे राहिले नाहीत

नियतीने निर्धारित केलेल्या चौकटींमध्येच
रिता होत राहिलो भरून येण्यासाठी
भरून वाहणे दूरच, पण कधी चारबिंदू
झेलून ओंजळी भरल्या नाहीत

ओंजळीचे रितेपण माझं मीच निवडलेलं
की, परिस्थितीने पदरी पाठवलेलं प्राक्तन
प्राक्तनाचे संदर्भ बदलता येतात
प्रामाणिक प्रयासांनी
पण त्यासाठी ऋतूंनी कूस बदलून अंगणी यावं लागतं
आणि ऋतूंना सामोरे जाण्यासाठी
आपल्या हक्काचं चतकोर अंगण
हाती असायला लागतं
ते आहे आपल्याकडे?

***

३. इतिहास

इतिहास वाहत राहतो परंपरांच्या पात्रातून
उगमापासून संगमापर्यंत काळाचे संदर्भ घेऊन
त्याच्या वाहण्याला स्वतःची दिशा असतेच कुठे
गवसल्या उताराने त्याचं घरंगळत जाणं
तसंही स्वाभाविकच

प्रवाहांच्या स्वाभाविक असण्याला
अर्थाचे अनेक आयाम दिले जातात
संस्कृती, संस्कारांचे अनुबंध शोधून,
मग माथी मिरवत राहतो तो
कधी अहं, कधी अस्मितांचे गाठोडे घेऊन

प्रवाह निर्धारित चौकटीत बद्ध होत जातो
त्याच्या वाहण्याचे अर्थ शोधायचं विसरून
खरंतर इतिहास स्वतः काही करू शकत नाही
त्याच्याकडे सामर्थ्य असतेच कुठे तेवढे
ते चिटकवलं जातं त्याच्या अस्तित्वावर
एखादी लढाई, माघार, पलायन, तह,
जय, पराजयाची लेबले घेऊन

इतिहास ना विजेता, ना पराभूत
दिले जातात त्याला मनाजोगते आकार
त्याच्या एकेक तुकड्यांना साकोळून
माणसे कोरत राहतात कोलाज
शोधत राहतात त्याच्या अथांग पात्रात
आपल्या ओंजळभर अस्मिता

पेटवले जातात पलिते गौरवशाली दिव्यत्वाचे
पायाखाली तुडवल्या जाणाऱ्या
परगण्यांना उजळून टाकण्यासाठी
संकुचित होत जातो तो एकेक पावलाने
आक्रसत जाते अवकाश त्याचे
आणि तोही बनतो मेंदूएवढा कालांतराने

मेंदूच्या करामती उभे करतात सोहळे
सजण्या-सजवण्याचे
कालपटावर गोंदवलेल्या क्षणांचे मोल
गोठवले जाते अभिमानाच्या अक्षरांत
अन् त्याग, समर्पण, कर्तृत्त्व मागे पडून उरतात
फक्त कुंपणातल्या अस्मिता
आणि
त्यांचा जयघोष करणारे काही उत्साही आवाज

***

४. प्रतिमा

प्रतिमांचा प्रवास आभासाकडून वास्तवाकडे
की वास्तवाकडून अभिनिवेशाकडे होतोय
अवघड होत चाललंय
सहज सोप्या आकारांना समजून घेणं

मनात साकोळलेल्या सरळमार्गी अपेक्षांना
कोंदणात सजवण्याच्या संधीही
धुकं पांघरून घेत दृष्टीआड जातायेत
उरल्यात थरथरणाऱ्या काही अस्पष्ट रेषा
कोणत्याही बिंदूंना न जुळणाऱ्या

अस्मितांच्या रेषा ओढून
चौकटीत सजू लागले आहेत
आभा हरवलेले रंग, पण
चेहरा हरवलेला माणूस प्रतिमेच्या
कोणत्याही चौकटीत सामावत नाही
कारण माप घेऊन आधीच
बेगडी महात्म्य आखले जाते
प्रतिमांना सीमांकीत चौकोनी विश्वात
सजवण्यासाठी

प्रतिमांचं दैवतीकरण करताना
समर्थनाचे आभासी शब्द फेकून
भक्तीचे साज चढवता येतात
आपल्या मनसुब्यांवर
अन् भक्त जमा झाले की,
जयघोषांचे नाद ताब्यात घेतात आसमंत

***

५. स्वप्नांचे साचे

कसली आलीये मर्दुमकी
या फाटक्या जगण्याला
काल जगणं जेथे होतं आजही तेथेच आहे.
काळ मात्र पायाला चाकं बांधून
सैरभैर पळतो आहे
आस्थेचा ओंजळभर ओलावा आणण्यासाठी

सीमांकीत चौकोनात कोरलेल्या
सुखांच्या संकल्पित आकृत्यांचे
अस्ताव्यस्त तुकडे
हलकेच आत झिरपत जातात
मातीच्या ओढीने
साठवून ठेवण्यासाठी त्यांना
आत अलवार आस असायला लागते.
पण अंतरीचा डोहात अंधाराचं सावट दाटून
आयुष्यच आभा हरवून बसले असेल
तर प्राक्तनाला दोष देऊन काय उपयोग

स्वप्नेच करपून जात असतील
आणि आकांत कोणाला कळत नसेल
तर प्रश्नांशिवाय उरतेच काय हाती
अर्थात, सगळ्याच प्रश्नांची उत्तरे
साचेबद्ध चौकटीत मिळतीलच याची तरी
शाश्वती असतेच कुठे?
नसली म्हणून
स्वप्ने अशीच टाकून देता येत नाहीत
ठरलेल्या ठरवलेल्या सूत्रांनी
उत्तरे गवसतीलच असंही नाही
नसेल काहीच हाती येत तर
स्वप्नांचे साचेच का बदलून घेऊ नयेत?

***