अक्षरलिपी

By
अक्षरलिपी: अपेक्षांची मुळाक्षरे

श्रीमान मुंजाळ साहेब, आपण पाठवलेला 'अक्षरलिपी' दिवाळी विशेषांक- २०१७ मिळाला. खरंतर आश्चर्याचा सुखद धक्का अनुभवला यानिमित्ताने. आपल्या व्यग्र दिनचर्येतून अंक आपण माझ्यापर्यंत पोहचवला, हा आनंद विसरता न येणारा.

अक्षरलिपी अंकाविषयी मान्यवरांचे अभिप्राय काही दिवसांपासून मीडियातून वाचतो आहे. अंक हाती आल्यावर याची प्रचिती आली. आमच्याकडील पुस्तकविक्रेत्याकडे अंक हवा म्हणून चारपाच वेळा विचारणाही केली, पण प्रत्येकवेळी खो मिळत गेला. तरीही अंक हाती येण्याची आस सोडली नव्हती. अंक आला की कळवतो, म्हणून विक्रेत्याने आश्वस्त केलेलं. अंकाबाबत अभिप्राय वाचून कुतूहल आणखी वाढत राहिले. अन् अनपेक्षितरित्या अंक हाती आला. हा आनंद वर्णनातीत. माझ्यासारख्या एका सामान्य वाचकापर्यंत आपण अंक पोचता केला, ही बाब शब्दांच्या चौकटीपलीकडील आहे. 

अंक हाती आल्या आल्या अथपासून इतिपर्यंत पाहिला. अंक केवळ आणि केवळ सुंदर, समृद्ध...! अंतरंग आणि बाह्यरंगानेसुद्धा. गेले दोनतीन दिवस ही समृद्ध 'अक्षरांची लिपी' सोबतीला होती. विचारविश्वाचे परीघ विस्तारणाऱ्या या अक्षरांच्या पाऊलखुणांचा माग घेत चालत राहिलो.

दिवाळीचा माहोल संपून काही दिवस उलटून गेले. अनेकांचे अनेक अंक वाचून झाले. त्याविषयी अनुकूल प्रतिकूल प्रतिक्रिया माध्यमांचे हात धरून चालत राहिल्या. अशावेळी आपण या अंकाविषयी अभिप्राय, प्रतिक्रिया- खरंतर हे शब्दही खूप मोठे आणि दूरचे वाटतात. कारण एकतर अभिप्राय देण्याइतपत अधिकार आपल्याकडे असायला लागतो. तो नसला तर निदान अधिकारवाणीने लिहिण्याइतपत शब्दांची साधना असायला लागते. आपण तर त्याच्या आसपासही नाहीत, मग प्रतिक्रिया देऊन न देऊन अंकाच्या असण्या-नसण्यात कोणतं मोठं परिवर्तन घडणार आहे. हा विचार काही केल्या मनातून निरोप घेत नव्हता. प्रतिक्रिया द्यायला आपल्याकडे नाव असावंच असं काही आहे का? सामान्य वाचक म्हणून मत व्यक्त करू नाही शकत का? असे काहीसे वळणावळणांनी धावणारे विचार अधिक प्रबल होत गेले.

अभिप्रायासाठी (?) थोडा उशीरच होतोय. पण हे संचित हाती लागल्याने व्यक्त होण्यावाचून अन्य विकल्प नव्हता. खरंतर अंकाने लिहिण्यास बाध्य केले, म्हणणेच अधिक संयुक्तिक. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काळात असं काही धाडस करणं अंगलट येण्याची शक्यताच अधिक असते. अंकनिर्मितीचं सव्यापसव्य करताना म्हणूनच कोणालाही दहावेळा विचार करायला लागतो. आर्थिक गणितांचे आडाखे बांधायला लागतात. चुकलेच तर झळ सोसण्याची तयारीही असायला लागते. असं असताना या लोकांनी हे धाडस करावं कशाला? हा प्रश्न उगीच मनात आणखी नवे प्रश्न निर्माण करीत होता. पण चाकोरीचे रस्ते सोडून नव्या वाटा शोधण्याची आस असली की, असं काही वेगळं घडतं. साहित्यातील सकस असं काही हाती लागतं. महाराष्ट्राच्या साहित्य परंपरेत दिवाळीअंकांनी अनेक नवे आयाम निर्माण केलेत. उंचीची परिमाणे तयार केलीत. कालोपघात त्यांच्या कार्याचे ठसे अंकित झाले. अंकांच्या अशा उज्ज्वल इतिहासाला कवेत घेत उंचीची नवी परिमाणे ठरवणारा अंक पहिल्याच प्रयत्नात व्हावा, याचंच अप्रूप अधिक वाटलं. संपादक म्हणून विषयनिवडीपासून ते अंक वाचकांच्या हाती पोचवण्याच्यापर्यंतच्या प्रवासात अंकाप्रती असणारी आपली अढळ निष्ठा आणि बांधिलकी प्रत्येक वळणावर प्रत्ययास येते. याचं श्रेय निर्विवादपणे महेंद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले आणि प्रतीक पुरी या तीनही संपादकांचे.

आसपासच्या आसमंतात अस्वस्थपणाचं मळभ दाटून आलं आहे. विचारांमध्ये साचलेपण येत आहे. नितळपण घेऊन वाहणारे प्रवाह आटत असतांना हे साचलेपण अधिक गहिरे होत आहे. वर्तनाचे सगळे व्यवहार स्वार्थाच्या परिघाभोवती प्रदक्षिणा करण्यात संपत आहेत. मखरात मढवून घेण्याच्या काळात माणसांच्या जगण्याचे सगळेच धागे उसवत आहेत. माणसाचं माणसापासून आणि आसपासच्या आसमंतातून हे सुटणं आणि तुटणं समजून घेत एका निश्चित भूमिकेतून अंकाची निर्मिती घडली आहे. संपादकीयात असंच काहीसं सांगणं अधिक आश्वस्त करणारे आहे. संक्रमणाच्या काळातून घडणारा प्रवास दिशा हरवतो आहे. पायाखाली पडलेल्या पायवाटा अडथळे ठरत आहेत, अशावेळी सामान्यांना अभिव्यक्त होण्याचे माध्यम ‘अक्षरलिपी’ अंक ठरावा, ही बाब नि:संदेह प्रशंसनीय आहे.  

वर्तमानातील गुंतागुंतीच्या प्रश्नांचा आणि जटिल समस्यांचा वेध घेणारी विचक्षण नजर अंकासाठी संपादनाचे काम करणाऱ्यांकडे असायला लागते. आपण या निकषावर खरे उतरला आहात. अंकासाठी निवडलेल्या विषयांमधून आपण निश्चित भूमिकेपासून विचलित होत नसल्याचे प्रत्ययास येते. एखादा अंक वाचकांना आरंभापासून अंतापर्यंत आवडला, असं सहसा घडत नाही. अंकातील कुठलातरी एखादा भाग आवडतो. नंतर बाकीची पाने केवळ आहेत म्हणून उलटवली जातात; पण ‘अक्षरलिपी’ यास अपवाद आहे, असं म्हणणं अतिशयोक्त नाही होणार. अंकातील एक भाग खूप उंचीवर विहार करतो आणि दुसरा जमिनीवर सरपटतो आहे, अशा नकारात्मक विचारांचे कवडसे मनातून डोकवायला अंकात फटी नाहीत.

अंकातील कथाविभाग वाचकांच्या पदरी संपन्नतेचं दान देतो. वर्तमानाच्या वाटेने विसंगतीचा वेध घेणाऱ्या कथा अंकाला वेगळे परिमाण देतात. समकालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक पीळ अन् मनोव्यापाराचे विविध पैलू कथालेखकांनी समर्थपणे उलगडून दाखवले आहेत. कथा नव्या जाणिवा अन् वेगळ्या विषयांना सोबत घेऊन आल्या आहेत. अंकातील रिपोर्ताज सामान्यांना अनभिज्ञ चौकटींच्या विश्वात जीवनयापन करणाऱ्या जगाशी अवगत करून देताना महत्त्वाची भूमिका घेतो. वेगळे विश्व वाचकांसमक्ष मांडण्याचे श्रेय अंकातील रिपोर्ताजला निःसंदेह द्यावे लागेल. माणसांच्या जगात असून माणसांनी दुर्लक्षित केलेल्या ममताबाई आणि सोनाबाईंच्या संघर्षकहाण्या अंतर्यामी अस्वस्थपण जागवतात. स्त्रियांच्या संघर्षमय जगण्याचा वेध घेतात. भवतालचे कवडसे पकडणाऱ्या कविता वेगळ्या उंचीवर नेणाऱ्या आहेत. कविताविभाग वर्तमानाचे वास्तव नेमकेपणाने अधोरेखित करतो. खाद्य संस्कृतीवरील लेख त्या-त्या समाजघटकांची संस्कृती आणि सामाजिक परिप्रेक्ष्यांना नव्याने दिशा देतात. जातिधर्माच्या अनुषंगाने चालत येणारी आहारपद्धती आणि काळाचा परिपाक म्हणून खाद्यसंस्कृतीत होत गेलेले बदल या लेखांनी समर्थपणे टिपले आहेत.

जाहिरातीपासून मुक्त अंक ही बाब वाचकांना सुखावणारी असली, तरी अंकनिर्मिती करणाऱ्यांना आनंद देणारी नक्कीच नसते. या अंकात जाहिरातींचे गतिरोधक नसल्याने वाचक आरंभापासून अंतापर्यंत अंकाशी जोडला जाऊन आशय विषयाशी समरस होतो. अंकात ज्या छायाचित्रकार, लेखक, कवींनी आपले योगदान दिले आहे. त्या सर्वांचे अभिनंदन करण्याइतपत मी काही मोठा नाही, पण यांच्या लेखणीची उंची अंकाच्या चौकटींना नवी परिमाणे देणारी आहे. निमित्त म्हणून दिवाळी अंक विकत घेऊन आपण सांस्कृतिकदृष्ट्या सजग आहोत, असं वाटणारेही आसपास असू शकतात. काही अशा वेगळ्या प्रयत्नांना स्वीकारून त्यांची वाट प्रशस्त व्हावी म्हणून शुभेच्छांचं पाथेय घेऊन उभे असतात. केवळ घटकाभर विरंगुळा म्हणून  पाहणारेही असतात. कोणी कोणत्या दुर्बिणीतून याकडे बघावे हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पण हेही वास्तवच की, साहित्य, कला, संस्कृतीच्या संवर्धनात योगदान असल्याचं आपणच आपणास प्रशस्तिपत्र देऊन अंक तयार होत नसतात. हे प्रकर्षाने प्रतिबिंबित करणारा आणि समकालाचा वेध घेणारा एक वैचारिक दस्तऐवज म्हणून या अंकाकडे खात्रीने पाहता येईल.

कालसुसंगत विचारधारा अंगीकारणारे आणि सामाजिक भान जपणारे साहित्य, वेगळेपण अधोरेखित करणारे विषय, निवडीपासून मांडणीपर्यंत आखीव-रेखीवपण घेऊन येणारी संपादनाची चौकट या दिवाळी अंकाचं बलस्थान आहे. उत्तम निर्मितीमूल्य, सुबक मांडणी आणि सुंदर सजावट, नेमकी छायाचित्र आणि त्यांना नेमकेपणाच्या आशयात गुंफणाऱ्या कवितेच्या ओळी या अंकाच्या जमेच्या बाजू आहेत.

सर्व पातळ्यांवर विचारपूर्वक नियोजन करून उत्तम दर्जाचा दिवाळी अंक हाती सोपवल्याप्रीत्यर्थ महेद्र मुंजाळ, शर्मिष्ठा भोसले, प्रतीक पुरी आणि लेखन तसेच निर्मिती प्रक्रियेत सहभागी असलेल्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन! या ‘अक्षरलिपी’ची अक्षरे मनावर गोंदवून घ्यावीत आणि संग्रही ठेवावीत अशीच आहेत. म्हणूनच आपल्याकडून पुढच्या वर्षी प्रकाशित होणारा दिवाळीअंकही असाच उंचीची परिमाणे अधोरेखित करणारा, वाचनीय, कसदार आणि सर्वसमावेशक व्हावा, अशी अपेक्षा करण्यास कोणालाही संदेह नसावा.
**

किंमत: ₹१३०
अंकासाठी संपर्क: महेंद्र मुंजाळ
mahendramunjal@gmail.com
aksharlipi2017@gmail.com
संवाद: ७७४४८२४६८५

0 comments:

Post a Comment